मेळघाट ४: कोळकास (अंतिम)

प्रचेतस's picture
प्रचेतस in भटकंती
13 May 2020 - 10:56 am

मेळघाट १: शहानूर-धारगड सफारी
मेळघाट २: नरनाळा किल्ला
मेळघाट ३: मचाणावरची एक रात्र

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मचाणावरील एक अविस्मरणीय रात्र घालवून सकाळी ७ च्या आसपास परत शहानूर येथील मुक्कामाच्या जागेत आलो. रात्रभर जागरण झाले असल्याने आंघोळ करुन सर्वच जण परत झोपलो. आता निघायचे होते ते सातपुडा ओलांडून पलीकडच्या भागात जाण्यासाठी, कोळकासला.

कोळकास

वास्तविक कोळकासचे आमचे चेक इन सकाळी ११ वाजता होते पण शहानूर येथील वनाधिकार्‍यांच्या मतानुसार दुपारी अडीच तीनच्या आसपास निघाल्यास संध्याकाळी घाटात यदाकदाचित काही वन्यपशू दिसू शकतील. त्यानुसार ११ च्या आसपास आम्ही शहानूर सोडले. अकोटला जेवण करुन परत उलटे फिरुन कोळकासला जाऊ असे सर्वानुमते ठरले. वाटेत पोपटखेड अकोट रस्त्यापासून थोडे आत गजानन महाराज संस्थान आहे, महाराजांनी सजल केलेली विहिर तेथे आहे. विहिरिचे पाणी खूप थंडगार आणि मधुर आहे. ही विहिर बघून आम्ही अकोटला गेलो. तेथे एका हॉटेलवर जेवून परत पोपटखेडला आलो. पोपटखेडला सेमाडोह रस्त्यावर वनखात्याचे प्रवेशद्वार आहे. तेथे एन्ट्री केल्यावर आम्ही आत प्रवेश करते झालो. हा जो पोपटखेड हरिसाल रस्ता आहे तो प्रचंड सुंदर आहे मात्र अगदी निर्जन आहे. अरुंद आणि खराब रस्ता आणि पूर्ण सातपुड्याची चढाई असल्याने गाडी जेमतेम २० किमी प्रतितास ह्या वेगानेच पुढे जात होती. हा पूर्ण रस्ता कोअर एरियातून जातो. वाटेत खटकाली, कोहा, तारुबंदा अशा अगदी लहान वस्त्या आहेत. जेमतेम ५६ किलोमीटरचा हा रस्ता पण कोळकासला पोहोचण्यास ४ तास घेतो. ह्या भागातून जाताना गाडीत पेट्रोल पूर्ण क्षमतेने भरलेले असणे आवश्यक आहे. पुढे हरिसालच्या पुढे असलेल्या धारणीपर्यंत पेट्रोल पंप कुठेही नाही, सेमाडोहला पण पेट्रोल मिळत नाही.

हा रस्ता आहे विलक्षण सुंदर, गाडी हळूहळू वळणे घेत हलके हलके घाट चढत होती, उजवीकडे असलेल्या दरीची खोली क्षणाक्षणाला वाढत होती. मेळघाट हे शुष्क पानगळीचे जंगल असल्याने उन्हाळ्यात इथं प्रचंड रखरखाट भासतो. पाने नसल्याने सागांचे उंच उंच सोट सतत दिसत राहतात. दरीतच एक नदी वळणे वळणे घेत पुढे जात होती. वानरे सागांच्या आश्रयाने एकमेकांच्या संगतीत बसलेली होती. एका ठिकाणी दरीत खोलवर झाडावर एक सर्पगरुड दिसला. जवळपास दिड दोन तासांनी आम्ही सातपुड्याच्या माथ्यावर आलो. येथे एक खिंड आहे तेथून्च परत उताराला सुरुवात होते आणि घाट तारुबंदा येथे संपतो. खिंडीच्या पुढचा रस्ता मात्र एकदम चांगला आहे. आतापर्यंत अतिशय खडबडीत असलेला रस्ता येथे मात्र मख्खन होतो. उजवीकडचा एक फाटा अमरावतीला चिखलदरा मार्गाने जातो तर सरळ उतरणारा रस्ता तारुबंदा गावावरुन हरिसालला पोहोचतो.

घाटातून दिसणारे दृश्य

a

पोपटखेड-कोळकास रस्त्याचे चलचित्र

तारुबंदा सोडल्यावर मात्र जवळपास सपाटीचा प्रदेशच आहे. सागाची लक्षावधी झाडे आजूबाजूला दिसतच असतात. वाटेत माळरानावर काही लहान वाड्या/वस्त्या अधूनमधून दिसतात मात्र त्यांचा परिसर सगळा कुंपणाने बंदिस्त केलेला दिसतो. अशातच एका उंच निष्पर्ण सरळसोट वृक्षाखाली एक एकूटवाणे राऊळ दिसले.

a

तारुबंदाच्या नजीकच एका पुलावरुन आम्ही मेळघाटातली सर्वात सुप्रसिद्ध नदी ओलांडली ती म्हणजे सिपना. आता हीच नदी पुढील दोन दिवस आमची सोबत करणार होती. कोरकू भाषेत सिपना म्हणजे साग. सागांच्या जंगलातून वाहणारी नदी म्हणजे सिपना. सिपनाचे पात्र विस्तीर्ण आहे मात्र उन्हाळ्यात पाणी अगदी कमी होऊन जवळपास संपूर्ण पात्र उघड्यावर येते आणि त्यातील सफेद दगडांमुळे ते अगदी पांढरेशुभ्र दिसते. नदी ओल्यांडल्यावर डावीकडे जाणारा रस्ता हरिसाल-धारणीतून निघून मध्य प्रदेशात जातो तर उजवीकडचा रस्ता सेमाडोह - परतवाडा मार्गे अमरावतीला जातो. ह्या रस्त्याला वळल्यानंतर ७/८ किमी अंतरावर कोळकासला वळायचा एक फलक आहे. मूळात कोळकास हे गाव नाही. तर ते आहे वनखात्याचे एक पर्यटन संकुल. ह्या संकुलाच्या शेजारी सिपना नदी आणि सर्व बाजूंनी घनदाट जंगल आहे. ह्या संकुलाचे दोन भाग आहेत अप्पर (वरचे)कोळकास आणि लोअर (खालचे)कोळकास. खालच्या कोळकासमध्ये पर्यटकांसाठी कॉटेज, डोर्मिटरीज, एक कॅन्टीन आणि वनखात्याच्या कर्मचार्‍यांसाठी राहण्याची घरे आहेत. खालच्या कोळकासमधूनच एक रस्ता उंचावर जातो ते म्हणजे वरचे कोळकास. वरच्या कोळकासला एक व्हिआयपी गेस्ट हाऊस असून तिथं ४ प्रशस्त खोल्या आणि मध्यभागी एक कॉन्फरन्स हॉल आहे. तर बाजूला गेस्ट हाऊसच्या कर्मचार्‍यांसाठी एक दोन खोल्या आहेत. पैकी २ खोल्या व्हिआयपींसाठी कायम राखीव असतात तर दोनच खोल्या पर्यटकांसाठी उपलब्ध असतात. इंदिरा गांधी ह्या कोळकासला आल्यावर ह्याच गेस्ट हाउसवर राहिल्या होत्या आणि त्या जिथे मुक्कामाला होत्या नेमक्या त्याच खोलीचे आरक्षण आम्हाला मिळाले. इंदिरा गांधीनी येथे आल्यावरच मेळघाटचे सौंदर्य आणि येथील वन्यसंपदा पाहून हे राखीव क्षेत्र घोषित केले आणि भारताच्या अगदी सुरुवातीच्या अभयारण्यांमध्ये मेळघाटाचा समावेश झाला. गेस्ट हाऊसवर जेवणाची सुविधा पर्यटकांसाठी नाही. अगदी चहा/नाष्टा जेवणासाठीही यायला लागते ते खालच्या कोळकासच्या कॅन्टिनमध्ये. अंतर जेमतेम अर्धा किमी आहे मात्र दोन्ही बाजूंना घनदाट जंगल आणि अस्वलादी वन्यपशूंचा सतत वावर असल्याने शक्यतो चालत जाण्याचे धाडस दिवसाच करावे. रात्रीच्या जेवण्यासाठी गाडी घेऊन येणेच श्रेयस्कर.

गेस्ट हाऊस हे उंचावर असल्याने खाली सिपना नदीच्या घोड्याच्या नालासारख्या किंवा एखाद्या नेकलेससारख्या प्रवाहाचे अतिशय सुंदर दृश्य दिसते. उन्हाळ्यात पाणी आटल्यामुळे बहुतांशी कोरडा प्रवाह दिसतो मात्र पावसाळ्यात हेच दृश्य अतिशय सुंदर दिसते. गेस्ट हाऊसच्या समोरच एक लहानशी बाग तिथं कड्यावर टाकलेली बाकडी आणि खाली सिपना नदीचे अद्भूतरम्य दृश्य.

सिपना नदीचा वक्रीभूत होऊन वाहणारा प्रवाह.

a

a

व्हिआयपी गेस्ट हाऊस

a

सिपना खोली जिथे आम्ही मुक्काम केला

a

इंदिरा गांधी इथेच राहिल्या होत्या
a

रात्रीची भटकंती

खोलीवर सामान टाकून आणि जरा फ्रेश होऊन आम्ही परत ८ च्या सुमारास खाली कॅन्टीनला आलो. कॅन्टीनमध्ये एकच खानसामा आहे. आता त्यांचे नाव नक्की आठवत नाही पण बहुधा पवार का कायसे होते. ते म्हणाले इथं तयार काहीच नसतं, ऑर्डरप्रमाणे बनवून देतो. साधारण तासाभरात जेवण तयार होईल. मग आम्ही दाल तडका, जिरा राईस, फुलके आणि बटाट्याची रस्सा भाजी असा मेनू सांगितला आणि मग आता तासभर काय करायचे म्हणून सेमाडोहपर्यंत जाऊन येऊ असे ठरवले. सेमाडोह येथून सुमारे १५ किमी अंतरावर आहे. गाडी अगदी हळूहळू चालवत निघालो. रात्री इथल्या रस्त्यांवर वन्यप्राण्यांचे हमखास दर्शन होते. रात्री त्यांना रस्ता निर्वेधपणे ओलांडता यावा म्हणून हरिसालवरुन आणि सेमाडोहच्या पुढे दोन्ही बाजूंपासून येणारी वाहने टप्प्याटप्य्याने बंद ठेवली जातात. आम्ही अगदी निवांतपणे प्राण्यांचा अंदाज घेऊन सेमाडोहपर्यंत जाऊन आलो. सेमाडोहला पर्यटकांसाठी मोठे संकुल आहे. तिथूनच चिखलदर्‍याला एक रस्ता जातो. गाव तसे लहानसेच आहे पण रस्त्यावर असल्याने जेवणासाठी काही टपरीवजा हॉटेलं आहेत. अर्थात जेवण अगदी साधेच मिळते. सेमाडोहवरुनच इथल्या सफारीचे बुकिंग करता येते. दुसर्‍या दिवशीच्या दुपारच्या सफारीचे बुकिंग करावयाचे आम्ही ठरवले होते.

सेमाडोह वरुन परत निघालो. वाटेत झाडीत काही खसफसल्यासारखा आवाज आला. गाडी कडेला थांबवून आम्ही ठाव घेण्याचा प्रयत्न करत होतो. खुसपुस मोठी आहे. नक्कीच एखादा मोठा प्राणी जवळपास असावा. बहुधा ते सांबार असावे. खुसपुस नंतर कमी कमी होत जाऊन नाहीशी झाली. पुढे उजव्या बाजूस रस्त्याच्या लगतच एक लहानसा प्राणी चालताना दिसला. अगदी स्पष्ट दिसला. तो होता खोकड. हा कोल्ह्याचाच जातीतला एक प्राणी. कुत्र्यापे़क्षा लहान, काळसर पाठ आणि पिवळा रंग. अगदी तुरुतुरु चालत होता. अंधारामुळे अर्थातच फोटो काढणे जमले नाही. साडेनऊच्या आसपास परत कोळकासच्या कॅन्टीनला आलो. गरमागरम जेवण तयारच होते, शेगाव सोडल्यानंतर प्रथमच खर्‍या अर्थाने चांगले जेवण मिळाले. इथल्या खानसाम्याच्या हाताला चव आहे. दाल तडका, फुलके, बटाटा रस्सा भाजी आणि भात. अगदी साधेचेच जरी जेवण असले तरी विलक्षण चवदार. जेवण करुन सिपना खोलीवर गेलो आणि जरा गप्पा मारुन लगेचच निद्राधीन झालो.

सेमाडोह सफारी

दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर उठून समोरील सिपनाच्या दरीचे दृश्य पाहिले. येथे अनेक पक्षी आहेत. कॅन्टीनला जाऊन चहा पोहे खाल्ले आणि दुपारच्या जेवणाची ऑर्डर दिली आणि आम्ही परत सेमाडोहला निघालो. सेमाडोहला जाऊन आधी दुपारच्या (३ वाजताच्या) सफारीचे बुकिंग केले. इथले जंगल शहानूरसारख्ये दर्‍याखोर्‍यांनी भरलेले नसून बर्‍यापैकी समतल आहे. त्यामुळे जरी आमची होंडा मोबिलिओतून सफारी करणे शक्य असले तरी प्राणी पाहण्याच्या दृष्टीने ओपन जिप्सी घेणे अधिक उत्तम. बुकिंग करुन आम्ही सेमाडोह परिसर बघण्यासाठी निघालो. सेमाडोहवरुनच एक फाटा रायपूरला (मेळघाटातीलच एक लहानसे गाव) जातो. हाच दूनी रस्ता. जंगल सफारीतील गुल्लर गेट, खापरा, खांडू गेट ह्याच रस्त्यावर आहेत. हा रस्ता अतिशय खराब आहे पण दोन्ही बाजूंना अतिशय सुंदर घनदाट जंगल आहे. मध्येच अर्धा किमीचा कॉन्क्रीट रस्त्याचा एक पट्टा आहे. आणि त्याच्यापुढे एक प्रशस्त ओढा आणि पुढेच वनखात्याचे एक गेट आहे. तिथपर्यंत जाऊन आलो. हा रस्त्याचाच भाग असल्याने येथे रात्री येण्यास मनाई नाही मात्र रस्ता सोडून जंगलात प्रवेश करता येत नाही. आम्ही परत येथे रात्री येण्याचे ठरवले.

परत दुपारी कोळकासला जाऊन जेवण केले, रात्रीच्या जेवणाचीही ऑर्डर दिली आणि लगेचच दुपारच्या सफारीसाठी सेमाडोहला परत आलो. तेथे गाडी लावून वनखात्याच्या जिप्सीने ३ वाजता निघालो. ह्याच रायपूर रस्त्याला लागलो आणि वनखात्याच्या गेटवर ड्रायव्हर आणि गाईडने नोंद केली आणि आम्ही जंगलात शिरलो.

इथले जंगल विलक्षण सुंदर आहे. शहानूरच्या जंगलात हिरवाई तशी अभावानेच मिळते, सर्वत्र सागाची झाडी आहेत येथे मात्र सागांच्या दाट जंगलाबरोबरच पांढर्‍या सालीचा अर्जुन, भुत्या, मोह, ऐन असे असंख्य महारुख आहेत त्यामुळे येथील जंगल बरेसचे हिरवे आहे. येथे बरीच पाणी फेकणारी झाडे आहेत. आता त्या वृक्षांचे नाव मी विसरलो. ह्या उंच वृ़क्षांवर असंख्य फुले येतात आणि ही फुले पाणी भरुन ठेवतात. त्यांचे पाणी सतत खाली ठिबकत असते. अक्षरशः पाणी अंगावर शिंपडल्यासारखे वाटते. गाईडच्या म्हणण्यानुसार ह्या वृक्षांचे हे वैशिष्ट्य असल्यामुळे वाघही ह्या वृक्षांच्या गारव्याला येऊन बसतो. कोळकास सेमाडोह हमरस्त्याला देखील हे वृक्ष मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांच खालचा रस्ता अगदी नुकताच धुतल्यासारखा ओलेता दिसतो.

जिप्सी अगदी हळूहळू जात होती. वाटेत एक एकूटवाणा गवा दिसला. थोडे पुढे जातात झाडीत एका भेकराने दर्शन दिले.

जंगलातला रस्ता

a

भेकर
a

a

पांढर्‍या सालीचे भुत्याचे झाड (घोस्ट ट्री)

a

पुढे जाताच एका ठिकठिकाणी कोरड्या पडलेल्या नदीपात्राच्या पलीकडे (ही गुल्लर नदी) गव्यांची एक टोळी दिसली.

a

a

a

येथून पुढे गेल्यावर लगेचच एका सर्पगरुडाचे अत्यंत जवळून दर्शन झाले. अगदी खालच्या फांदीवर तो येऊन बसला होता. काय तो प्रचंड पक्षी, त्याची बाकदार चोच, त्याचे मजबूत पाय, पायांच्या भक्ष्य निसटू न देणार्‍या मजबूत नख्या.

सर्पगरुड

a

a

a

a

सर्पगरुड बर्‍याच वेळ निरखून झाल्यावर आम्ही पुढे निघालो. जंगल आपलं विलक्षण वैभव दाखवत होतंच. पुढे गव्यांची अजून एक मोठी टोळी दिसली. मात्र भेकर वगळता कुरुंग काही दिसले नाहीत.

गव्यांची मोठी टोळी

a

जंगल

a

वेड्या राघूंच्या जोडीने दर्शन दिले

a

a

वृक्षराजीत मोर सुखनैव फिरत होते.

a

सेमाडोहच्या सफारीचे एक चलचित्र

अजून एक चलचित्र

आता सफारी संपत होती. जाताना गुल्लर नदीचे पात्र ओलांडून गुल्लर गेटने बाहेर पडलो

गुल्लरचे कोरडे पडलेले पात्र

a

रात्रीची अविस्मरणीय भटकंती

सफारी संपवून वनखात्याच्या संकुलापाशी साधारण सातच्या सुमारास आलो. तिथं पार्किंगला ठेवलेली आमची गाडी ताब्यात घेतली आणि गावातल्याच एका टपरीवर चहा बिस्किटे खाऊन अंधार पडल्यावर परत त्याच दूनी (रायपूर रस्त्यावर लागलो). कुठल्याही जंगलात सूर्य मावळल्यावर अतिशय वेगाने अंधार पडतो. आमच्याजवळ एक फ्लॅशलाईट होता मात्र त्याचा वापर अगदी जरुर पडल्यासच करायचे ठरवले होते. गाडी अगदी थांबवत थांबवत जेमतेम १० किमी प्रतितास किंवा त्यापेक्षाही कमी वेगाने आम्ही जात असतो. रस्ता खराबच होता मात्र अंधारातल्या रस्त्याचे दृश्य विलक्षण दिसत होते. अगदी सुरुवातीलाच रस्त्याच्या उजव्या बाजूला चढावावर एक रानडुक्कर दिसला. मोठ्याने डुरकावून तो विलक्षण वेगाने निघून गेला. तसेच पुढे जात राहिलो. बाजूच्या झुडुपात पांढरे डोळे चमकले. हे बहुधा सांबार असावे.. बर्‍याच वेळ एकाच जागेवर ते निश्चलपणे उभे होते. असाच ७/८ किमी प्रवास करुन वनखात्याच्या गेटवर गेलो. तेथील वनाधिकारी श्री. जमदाडे लगेचच बाहेर आले. हे गेट जंगलाच्या अगदी कोअर भागात आहे आजूबाजूला दाट जंगल आणि शेजारी रायपूरला जाणारा रस्ता. त्यांच्याशी जरा गप्पाटप्पा झाल्या. ते म्हणाले मागच्या आठवड्यातच येथील एका ओढ्यापाशी वाघाने शिकार केली होती. वाघाचे भय येथील वनकर्मचार्‍यांना नाही मात्र येथे भिती आहे ती अस्वलांची. ती कधीही येथील गेटपाशी येतात.

त्यांच्याशी गप्पा मारुन परतीला लागलो. वाटेत रस्त्याच्या खालच्या बाजूस असलेल्या खोलवणातून एक रानमांजर बाहेर पडले आणि वेगाने दिसेनासे झाले. तपकिरी रंगाचे रानटी ससे तर असंख्य दिसले. सावकाश गाडी चालवत परत रात्री १० च्या सुमारास कोळकासला आलो. आल्याआल्याच गेटवरील सुरक्षारक्षकांनी सांगितले की की नुकतीच दोन अस्वले गेटसमोरील रस्त्याने निघून गेली. अगदी थोडक्यातच चुकामूक झाली म्हणायची.

उपाहारगृहात जेवण केले. सकाळी ६ वाजताच चेक आउट करायचे असल्याने खानसाम्याचा सगळा हिशोब करुन गेस्ट हाऊस वर आलो. बॅगा भरुन ठेवल्या जेणेकरुन सकाळी लगेचच गाडीत भरुन निघता यावे.

परतीचा प्रवास

रात्रीच गूगल मॅपवर परतीचा प्रवास कसा करावयाचा ते पाहून ठेवले होते. दोन पर्याय होते. धारणी-बुर्‍हाणपूर-बुलढाणा-चिखली-जालना-औरंगाबाद पुणे आणि धारणी-बुर्‍हाणपूर- फैजपूर -यावल-चोपडा- अमळनेर-धुळे-चांदवड-लासलगाव-संगमनेर-पुणे. पैकी दुसरा पर्याय अधिक लांबचा असूनही रस्ता मात्र चांगला होता. आम्ही दुसर्‍या मार्गाने जायचे ठरवले.

सकाळी ५ वाजता उठून आंघोळी करुन आम्ही ६ च्या सुमारास येथून निघालो. कोळकास संकुलातून बाहेर पडताच लगेचच एका सांबर्‍याच्या जोडीने दर्शन दिले. हरिसालमार्गे धारणीला गेलो. धारणीतून लगेचच मध्यप्रदेशाची हद्द सुरु होते. बुर्‍हाणपूरपर्यंत रस्ता मध्यप्रदेशातूनच जातो. वाटेत पेट्रोल भरुन घेतले आणि बर्‍हाणपूरला आलो. मुघलांची मोठी बाजारपेठ पूर्वी तिथे होती जी संभाजी महाराजांनी लुटली होती. बर्‍हाणपूर सोडल्यावर लगेचच महाराष्ट्राची हद्द सुरु होते. तिथून रावेर फक्त २० किमी. रावेरला ९ च्या आसपास पोहे खाऊन पुढे निघालो. हा संपन्न प्रदेश. दोन्ही बाजूंना केळीच्या प्रचंड बागा, सगळीकडे हिरवाई. पुढे मात्र चोपडा सोडल्यावर प्रचंड रखरखीत प्रदेश सुरु होतो तो पार चांदवडपर्यंत. अंमळनेरच्या पुढे रस्त्याचे काम सुरु असल्याने जागोजागी डायव्हर्जन्स होती. वाटेत धुळ्याला जेवण केले आणि मुंबई आग्रा महामार्गाला लागलो. हा रस्ता अतिशय मस्त. पण खूप कोरडा, कुठेही हिरवाई नाही, एकदम रखरखाट, वैतागवाणा. मात्र ह्या रस्ताने चांदवडला येताना अजिंठा सातमाळाचे रांगेचे अतिशय सुंदर दृश्य दिसते. रस्त्याच्या समोरील बाजूसच उजवीकडून दिसत असलेला धोडप, रवळ्या जवळ्या, कोळधेर, राजदेहेर, इंद्राई असे विविध राकट किल्ले दाखवत डावीकडे चांदवड किल्ल्यास वळसा घालून पुढे निघतो. आम्ही नाशिवरुन न जाता लासलगाव फाटा पकडला आणि लासलगाववरुन आतल्या रस्त्याने संगमनेरच्या पुढे बाहेर पडलो. भूक अशी नव्हतीच त्यामुळे घारगावच्या पुढे चहा घेऊन पुढे निघालो. आता संध्याकाळ झाली होती. साधारण ८ च्या सुमारास पुण्यास पोहोचलो व रातॄ ९ पर्यंत घरी आलो. शेवटचा हा भर उन्हाळ्यातला रखरखाटी प्रवास सोडल्यास एकंदर जंगल भटकंती अतिशय सुरेख झाली होती व पुढील वर्षाचे ताडोबा किंवा नागझिरा जंगल भ्रमंतीच्या योजना ठरवल्या गेल्या. त्याप्रमाणे ह्या वर्षीचे एप्रिलअखेरचे नागझिर्‍याचे बुकिंगही फेब्रुवारीतच करुन ठेवले गेलेमात्र दुर्दवाने लॉकडाउनमुळे रद्द करावे लागले. आत ते थेट पुढच्या वर्षीच.

समाप्त.

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

13 May 2020 - 12:22 pm | चांदणे संदीप

मस्त झाली मेळघाटाची सफर. क्षण न क्षण अनुभवता आला वल्लीदा तुमच्या सुरेख लेखनामुळे.
आता पुढच्या वेळी मी येणार सोबत. नाहीतर उपोषणाला बसेन चिंचवडात. ;)

सं - दी - प

प्रचेतस's picture

15 May 2020 - 11:13 am | प्रचेतस

धन्यवाद.
नक्की जाऊयात

पुन्हा सगळे मागचे भाग वाचून, एकत्र रिप्लाय देणार..
रुमाल टाकून ठेवतो येथे

गणेशा's picture

13 May 2020 - 11:55 pm | गणेशा

अतिशय सुंदर लिहिले आहेस मित्रा..
चारही भाग वाचले.. अतिशय सुंदर..
मचाना वरील रात्र हा भाग तर अनुभव आणि लिखाणाचा हिराच म्हणावा लागेल.
निव्वळ अप्रतिम...

सदानन्द's picture

13 May 2020 - 1:42 pm | सदानन्द

नोव्हेबर १९ मधे , शहानूर सफारीच पुन:स्स्मरण आपले लेख वाचून झाल.

सुरेख लेखन.

छान झाली आहे ट्रिप. विडिओ पाहिले. दिलेल्या वेळेत एखाद्या प्राण्यास तिकडे येण्याची हुक्की आली पाहिजे.
वाटेत बुर्हाणपूरला काही पडीक किल्ले आहेत. पण उन्हात कंटाळवाणे झाले असते.

सुरेख वर्णन. वाखुसाआ.

विडिओमध्ये टाइटल टाकणारी apps शोधली.
१) video editor Inshot ( https://play.google.com/store/apps/details?id=com.camerasideas.instashot ) app मध्ये टाइटल टाकता येत आहेत.

या App पेक्षा VideoShow Video Editor ( https://play.google.com/store/apps/details?id=com.xvideostudio.videoeditor) app मध्ये कंट्रोल्स चांगले वाटले. पण रेझलूशन / फाइल साईजवर लक्ष ठेवायला हवं. ते फार वाढत आहे.
एक प्रयत्न वरच्या सेमाडोह सफारी विडिओचा.

प्रचेतस's picture

15 May 2020 - 11:14 am | प्रचेतस

एडिटिंग मस्त झालेय काका.

चौथा कोनाडा's picture

20 May 2020 - 5:40 pm | चौथा कोनाडा

+१

भारी !
आजकाल असे वर्णनपर व्हिडो बरेच येत असतात. छान माहिती मिळत असते !

MipaPremiYogesh's picture

13 May 2020 - 11:13 pm | MipaPremiYogesh

वाह वळलीसाहेब, खूपच मस्त वृत्तांत..एकूणच छान झाली ट्रिप..CSE खूप भारी दिसतोय..

मोगरा's picture

14 May 2020 - 12:05 am | मोगरा

सुंदर भटकंती.

किल्लेदार's picture

14 May 2020 - 4:39 pm | किल्लेदार

फारच अप्रतिम...
मला तर काही वेळ मीच बिबट्या आहे आणि नदीकाठानं फिरतो आहे असा भास झाला ...
बोली भाषेतील शब्द वापरले की आणखीनच मजा येते.

चौथा कोनाडा's picture

20 May 2020 - 5:49 pm | चौथा कोनाडा

+१

मीच बिबट्या

:-))) किल्लेदार :-))) :-))) :-))) :-)))

किल्लेदार's picture

21 May 2020 - 5:23 am | किल्लेदार

:)

किल्लेदार's picture

14 May 2020 - 4:56 pm | किल्लेदार

अरेच्या चुकीच्या धाग्यावर चुकीचा प्रतिसाद. एकाच वेळी दोन जंगल-सफाऱ्या वाचताना माझीच शिकार झाली :) :) :)

बादवे ...
हाही भाग मस्त. कोळकासहून जवळच एक धबधबा आहे. बहुदा जवाहर का असंच काहीसं नाव आहे. तोही बघणेबल आहे.
मी ६ वर्षांपूर्वी गेलो तेव्हाही एक "इगरापवार" नावाचाच कोणीतरी होता.
मी लोअर कोळकासच्या एकदम नदी-बाजूच्या खोलीत राहिलो होतो. अप्परहून व्ह्यू छान आहे पण नवीन असल्यामुळे रस्टिक फील येत नाही. फोन करायला मात्र रात्री अप्परलाच यावे लागे. त्यात मी ऍक्टिवाने गेलो असल्यामुळे रात्रीच्या वेळी "प्रायमल फीअर" म्हणजे काय असते ते समजले.

ऍक्टिव्हावरून गेलात म्हणजे भलतेच धाडस केलेत तुम्ही.
आम्ही गेलो ते तेव्हा लोअर कोळकासच्या नदीच्या बाजूने असलेल्या खोलीसमोरून अस्वले आल्याची हूल उठली होती, मात्र ती दिसली नाहीत.

किल्लेदार's picture

18 May 2020 - 3:11 am | किल्लेदार

कधी कधी ते वेडे धाडस वाटते पण ठीक आहे. असे पण करावे म्हंटले कधीतरी ☺️☺️☺️

गवि's picture

14 May 2020 - 5:17 pm | गवि

हाही भाग उत्तम.

अगदी तपशीलवार. हे सर्व पूर्वी पाहिलेलं असल्याने अगदी नीट डोळ्यासमोर आलं परत. कोलकाजला पाळीव कुत्र्याच्या गळ्याभोवती पत्र्याची धारदार टोके बाहेर आलेली संरक्षक कॉलर घातलेली पाहिली होती. वाघ मान पकडतो, त्यापासून संरक्षण असं तिथल्या लोकांनी सांगितलं.

प्रचेतस's picture

15 May 2020 - 11:17 am | प्रचेतस

हे सर्व अजूनही आहे, कुत्र्यांच्या गळ्याला काटेदार कॉलर आजाही दिसतात.

गवि's picture

15 May 2020 - 1:30 pm | गवि

वाचून बरे वाटले

म्हणजे,

"सिपनाकाठी कुत्र्याकंठी कॉलर आता उरली नाही",

असं म्हणायची गरज नाही.

चौकटराजा's picture

15 May 2020 - 4:13 pm | चौकटराजा

प्रत्यक्ष जाऊन आल्यासारखे वाटले कारण तपशीलवार टिपण ! पक्ष्यांचे फोटो छान आलेत विशेषतः मोराचा !

सौ मृदुला धनंजय शिंदे's picture

16 May 2020 - 12:39 am | सौ मृदुला धनंजय...

खूपच सुंदर !! अगदी तपशीलवार वर्णन .सर्वच फोटो अप्रतिम आहेत.

प्रशांत's picture

19 May 2020 - 5:54 pm | प्रशांत

हा ही भाग आवडला वल्लीशेठ...

ट्रिप प्लॅन करायला पाहिजे.

सौंदाळा's picture

19 May 2020 - 9:43 pm | सौंदाळा

मस्तच झाली जंगल सफर

चौथा कोनाडा's picture

20 May 2020 - 5:39 pm | चौथा कोनाडा

व्वा, जबरदस्त ! या भागाची खुप दिवसांपासून वाट पहात होतो !
झाडांचे फोटो, सर्पगरूड, गवे, व्हिक्लिप्स ई जबरदस्त आहे !
आणि वर्णन तर अप्रतिम !!!!

अभिजीत अवलिया's picture

22 May 2020 - 7:16 pm | अभिजीत अवलिया

लिखाण आवडले. प्रत्यक्ष जाऊन अनुभव घेईन लवकरच.

तुषार काळभोर's picture

23 May 2020 - 10:02 pm | तुषार काळभोर

अतिशय तपशीलवार, जरूर तिथे फोटो टाकत (तरी प्रत्येक लेखात दहा तरी फोटो अजून हवे होते असे वाटले) मस्त वर्णन केलंय.
प्रत्यक्ष जाऊन बघण्याची इच्छा निर्माण करणारं लेखन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 May 2020 - 12:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपली तपशीलवार सफर आवडली. उन्हाळ्यातलं जंगल फारच भयंकर वाटतं. लेखनातले फोटो वर्णन अप्रतिम. आपल्याबरोबर आम्हीही या सफरीचा आनंद घेतला इतकी ही सफर चित्रदर्शी होती. आपल्या पुढील सफरीला शुभेच्छा आहेतच.

लिहिते राहा. आपली लेखनशैली उत्तम असल्या कारणाने वाचतांना कंटाळा येत नाही.

०दिलीप बिरुटे

जेम्स वांड's picture

6 Jun 2020 - 4:30 pm | जेम्स वांड

कसलं अप्रतिम लिहिता राव, आजकाल आपली मते ठोकत लिहायचा प्रवाद दिसून येतो पण तुमच्या लेखनात त्याचा लवलेशही सापडला नाही बरंका, बाकी गव्यांचा एक अनुभव राधानगरीला घेतला होता, त्याची आठवण आली एकदम.

तुमची प्रकाशचित्रणकला पण अतिशयच उत्तम...

परत एकदा

जियो

चिखलदरा (उंची १००० मिटर्स) तिथेच आहे हे वाचून त्या हिल स्टेशनचे युट्युब विडिओ पाहिले. पण ते खास नाही वाटले. परंतू स्थानिक लोकांना एक उंचीवरील ठिकाण जवळच मिळाले.

सह्याद्रीच्या आसपास महाबळेश्वर, पाचगणी ( १४००- १२०० मि) सोडल्यास
सातारा,वाई (७२० मि);
नाशिक, पुणे,कराड,कोल्हापूर,सांगली शहरे फक्त ( ६००-/+ मि ) आहेत.

त्यामानाने कर्नाटकात बेंगळुरु , मैसुरु, कोडगु, चिकमगळुरु असा बराच भाग १००० मिटर्स अथवा अधिक उंचीवर आहे.