मेळघाट २: नरनाळा किल्ला

Primary tabs

प्रचेतस's picture
प्रचेतस in भटकंती
6 Apr 2020 - 4:50 pm

मेळघाट १: शहानूर-धारगड सफारी

आता दुपारी ३ च्या सुमारास जायचे होते नरनाळा किल्ला बघायला त्याविषयी पुढील भागात.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शहानूरच्या वनखात्याच्या रिसॉर्टवर दुपारी जेवण केले. इथले जेवण अगदीच साधे, शिवाय चवदारपण नाही. अर्थात जंगलात फिरायला यायचे म्हटले तर खायचे प्यायचे चोचले जरा बाजूलाच ठेवावे लागतात. तर जेवण करुन थोडावेळ झोपलो आणि दुपारच्या नरनाळ्याच्या सफरीसाठी वनखात्याचा गाईड ठरवला. नरनाळा किल्ल्यावर जाण्यासाठी डांबरी रस्ता असून थेट किल्ल्यात गाडी जाते मात्र वनखात्याचा गाईड अत्यावश्यक असतो. ६०० रुपये किल्ल्याची प्रवेश फी आणि गाईडचे ३०० असे एकूण ९०० रुपयांची पावती फाडून आम्ही आमच्या गाडीतून मार्गस्थ झालो. शहानूर गेत मधून आत शिरताच लगेचच दोनेक किमी अंतरावर डावीकडे एक फाटा फुटून नरनाळा किल्ल्याची चढाई सुरु होते आणि सरळ जाणारा कच्चा रस्ता जंगलात शिरतो ह्याबद्द्ल मी मागच्या भागात लिहिलेच होते.

नरनाळा किल्ला

नरनाळा किल्ला हा नरनाळसिंग ह्याने बांधला असे मानले जाते. १० व्या शतकात नरनाळ सिंग ह्या गोंड राजाने ह्याची निर्मिती केली आणि १३ व्या शतकात हा किल्ला खिलजी सुलतानांच्या ताब्यात गेला. खिलजींच्या अस्तानंतर हा किल्ला बहुधा बहमनींच्या ताब्यात गेला , नंतर बहमनींची शकले होऊन हा किल्ला वर्‍हाडच्या इमादशाहीच्या ताब्यात आला व नंतर १५ व्या शतकात मुघलांच्या ताब्यात गेला. ह्या विभिन्न कालखंडात इथं तटबंदीयुक्त विभिन्न बांधकामे उभारण्यात आली. हा किल्ला अतिशय प्रचंड असून ह्याचे पूर्वेला जाफराबाद आणि पश्चिमेला तेलियागड असे दोन भाग आहेत. आजमितीस गडावर पूर्ण रान माजलेलं असून चालत गडभ्रमंती करण्यास परवानगी नाही. ३६२ एकर इतक्या प्रचंड परिसरात ह्या किल्ल्याचा विस्तार असून किल्ल्यावर वेगवेगळ्या बाजूस जवळपास ३६० बुरुज, ६ मोठे दरवाजे आणि २० लहान दरवाजे आहेत.

किल्ल्याच्या जवळपास ३/४ उंचीवर गडाचा पहिला दरवाजा लागतो. शहानूर दरवाजा.

a

इथून दिसणारी किल्ल्याची तटबंदी.

a

शहानूर दरवाजातून दिसणारी खालच्या बाजूच तटबंदी, डाव्या बाजूस शहानूर गाव आणि दूरवर धूसर अकोट नगर.

a

ह्यानंतर जवळपास एखादा किमी अंतर गेल्यावर गडाचा मेहंदी दरवाजा लागतो. तीन कमानींनी बनलेला हा दरवाजा गडाच्या मुख्य महाकाल द्वारसंकुलाचाच एक भाग आहे. दरवाजात पहारेकर्‍यांसाठी देवड्या, ओसर्‍या आहेत.

मेहंदी दरवाजा
a

मेहंदी दरवाजातूनच इथलं प्रमुख आकर्षण असलेल्या महाकाली दरवाजात जाता येते, मात्र गाडीसाठी बाह्यवळण असून तो मार्ग गडाच्या तटबंदीला वळसा घालत महाकाली दरवाजाच्या पुढच्या बाजूस येतो.

महाकाली दरवाजा

हे येथील एक प्रमुख आकर्षण. हा अत्यंत भव्य दरवाजा असून प्रवेशद्वारावर, बाजूच्या कोटांवर अतिशय सुबक नक्षी कोरलेली आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूंवर अत्यंत सुबक अशी कमळं कोरलेली आहेत. आजूबाजूला पहारेकर्‍यांसाठी देवड्या, त्यांवर नक्षीदार गवाक्षं, जाळीदार सज्जे आहेत. अंतर्गत कोरलेल्या जिन्यांतून महाकाली दरवाजाच्या माथ्यावर जाता येते. प्रवेशद्वारातच खोबण्यांमध्ये घुबडांचा निवास असून त्यांची उंदराची हाडे, केस इत्यादींचा समावेश असलेली त्यांची विष्ठा दरवाजात पडलेली असते.

प्रवेशद्वारावर फारसी भाषेतील दोन मोठे शिलालेख असून एक शिलालेख दरवाजाच्या सर्वात वरील बाजूस असून दुसरा शिलालेख प्रवेशद्वाराच्या दोन कमानींच्या मधल्या भागात मध्यभागी असलेल्या कमळाच्या खालच्या बाजूस आहे.

a

a

शिलालेख आणि नक्षीदार कमळं

a

देखणे नक्षीकाम

a

a

महाकाली दरवाजातून बाहेर आल्यावर

a

महाकाली दरवाजा पाहून आमची गडफेरी सुरु झाली. गडावरही वनखात्याचे एक चेकपोस्ट असून त्यात दोन्/तीन वनकर्मचारी मुक्कामास असतात. गाईडने दिलेल्या माहितीनुसार गडावर सध्या दोन अस्वले आणि एका वाघाचा वावर होता त्यामुळे त्याने गाडीतून न उतरण्याचा सल्ला दिला. त्या दिवशी शहानूरच्या जंगलातून नुकताच एक वाघ खालच्या बाजूस म्हणजे अकोटच्या दिशेने गेला होता त्यामुळे गडावरील सर्व वनकर्मचारी आणि शहानूरचेही वनाधिकारी त्याला वाघास शोधवयास व त्याला परत जंगलात पाठवण्यास अकोटला गेले होते त्यामुळे वर कुणीही नव्हते. गडाला गाडीतूनच फेरी मारता येते.

महाकाली दरवाजाजवळच घोड्यांची पागा आहे.

a

a

जवळच शक्कर तलाव आणि काही कमानदार बांधकामे आहेत.

a

आमच्याकडे वेळ कमी असल्याने तसेच खाली उतरण्यास परवानगी नसल्याने जमेल तसे अवशेष गाडीतूनच आणि गाईड सांगेल तिथेच मोजक्या ठिकाणी उतरुन पाहता येत होते.

किल्ल्यावरील फेरीचा रस्ता

a

a

a

किल्ल्यावर फिरताना विविध ठिकाणी विखुरलेले अवशेष दृष्टीस पडतात.

a

झाडीत दडलेले दरवाजे

a

महारुखांनी गिळंकृत केलेली बांधकामं

a

मोती तलाव

a

a

किल्ल्यावर जागोजागी वन्यप्राण्यांच्या निरिक्षणासाठी मचाणं उभारण्यात आली आहेत.

a

पूर्वी गडाचा एक प्रमुख असलेला उत्तरेकडील बाजूचा दरवाजा-दिल्ली दरवाजा आज पूर्णपणे झाडोर्‍यात बुडून गेला आहे, अशक्य रानामुळॅ तिथं उतरणं जवळपास असंभव आहे.

a

a

इथलं अजून एक आकर्षण म्हणजे इथली भली प्रचंड अशी नउगजी तोफ. अतिशय भव्य अशी ही तोफ असून ही बांगडी पद्धतीची आहे. म्हणजे लो़खंड ओतून बांगडीसारख्या रिंगा करुन त्या एकत्र सांधणं.

a

a

a

निश्चितच ह्या तोफेमुळे गडाचे मारगिरी करण्याचे सामर्थ्य कितीतरी पटीने वाढलेले असावे.

नऊगजी तोफेच्या इथून दिसणारा गडाचा एक दरवाजा

a

गडावर नैसर्गिक पाणवठे खूप असल्याने अतिशय समृद्ध वनजीवन आहे. अस्वल, वाघांसोबतच नीलगायी, सांबार, रानडुकरे, विविध पक्षी ह्यांचा सहवास तेथे आहे.

मोती तलावाच्या इथून दूरवर कड्याच्या टोकाशी असलेल्या एका फांदीवर सर्पगरुड दिसला.

a

मोती तलावाच्या इथेच भरपूर सांबार पण दिसले. आता जवळपास साडेपाच/ पावणेसहा वाजले होते, परतीची वेळ झाली होती, महाकाली दरवाजापाशी सांबारं उभी होती. आम्ही अतिशय स्तब्ध झाल्यामुळे त्यांना आमची चाहूल लागत नव्हती. सांबार अगदी जवळ आले होते, अचानक त्याला आमची चाहूल लागल्याने जोरात कॉल देत ते ख्यॅक करत धूमतटाक पळाले.

a

a

a

नरनाळा किल्ल्याची सफर पूर्ण झाली होती. संपूर्ण किल्ला तसेच काही महत्वाचे अवशेष मात्र बघता आले नाहीत तरी जितकं पाहिलं आणि अनुभवलं तितकं नक्कीच मनाला समाधान देणारं होतं. आता वेध लागले होते ते जंगलातील मचाणावरील रात्रीच्या मुक्कामाचे, त्याविषयी पुढच्या भागात.

क्रमशः

प्रतिक्रिया

किल्लेदार's picture

6 Apr 2020 - 11:20 pm | किल्लेदार

नरनाळा किल्ल्याची बरीच माहिती मिळाली. मी कदाचित २००३ साली गेलो होतो. अकोटपर्यंत बस आणि तेथून चालत नरनाळा गाठला. किल्ल्यावर अक्षरश: कोणीही नव्हते. नुकताच पावसाळा होऊन गेल्यामुळे सगळीकडे हिरवेगार होते. शक्कर तलाव तुडुंब भरला होता. हा तुमचा लेख वाचून वाटतं की तो फारच धाडसी ट्रेक होता. आता परत पायी जाण्याची हिम्मत होणार नाही.

यावरून मला २०१४ मधली कोलखास ची ट्रिप आठवली. मी एकटाच होतो. २ किमी चाच पण ऐन जंगलातून जाणारा एक शॉर्टकट पकडला होता. १ किमी अंतर जेमतेम कापले असेल. दरदरून घाम सुटला आणि कमरेचा अर्ध्या वितीचा चाकू उपसून कसाबसा उलट्या वाटेने परत हमरस्त्यावर आलो. "प्रायमल फीअर" म्हणजे काय हे त्या दिवशी उमजलं.

अकोटपासून चालत म्हणजे जवळपास २०/२२ किमी पल्ला गाठलात की तुम्ही. किल्ल्यावर तेव्हा वन्यप्राण्यांचा कितपत वास असावा माहित नाही पण पूर्वी गडावर मुक्त प्रवेश असे. आता वनखात्याच्या निर्बंधामुळे जाणे सहज शक्य नाही, तसेच जंगलातल्या बहुतेक सर्व लहानसहान वस्त्याही आता अभयारण्याच्या हद्दीबाहेर स्थलांतरित करण्यात आलेल्या आहेत. ह्या सर्व कारणांमुळे इथला एकूनच मनुष्यप्राण्याचा राबता कमी होऊन वन्य प्राण्यांचा वावर कमालीचा वाढला आहे.

किल्लेदार's picture

7 Apr 2020 - 9:15 pm | किल्लेदार

ओह्ह. नाही. एवढं चालल्याचं आठवत नाही. कदाचित कुठलंतरी वाहन पकडून गडाच्या पायथ्याशी आलो आणि मग चढलो. अर्थात तरीही बराच वेळ लागला. प्रवेश-फी वगैरे काही नव्हती. अगदी मुक्त प्रवेश होता. पण तेव्हाही रान बरंच माजलेलं होतं आणि निश्तितच भीतीदायक होतं.

गवि's picture

6 Apr 2020 - 11:22 pm | गवि

हाही भाग उत्तम.

वनक्षेत्राच्या आतच हा किल्ला आहे का? कोणी फिरकत नसेल तर तिकिट खिडकी कुठे? प्रवेश फी एवढी जास्ती का?
हा भाग आणि फोटो छान.

प्रचेतस's picture

7 Apr 2020 - 9:17 am | प्रचेतस

हो. नरनाळा किल्ला कोअर विभागात मोडतो. शहानूर गावाच्या किंचित पुढे वनखात्याचे फॉरेस्ट गेस्ट हाऊस आहे तिथे बुकिंग करता येते. तिथेच चेकपोस्ट गेट आहे, तेथूनच आत प्रवेश मिळतो. कुणालाही सहजी जाता येऊ नये म्हणूनच दर खूप जास्त आहेत. वनखात्याची जिप्सी १२०० रू + गाईड ३०० अथवा स्वतःचे वाहन ६०० रु + गाईड ३०० असे दर आहेत.

प्रशांत's picture

7 Apr 2020 - 10:15 am | प्रशांत

वल्ली हा हि भाग आवडला.
नरनाळा किल्ला गावापासुन जवळ असुनही पाहयचा राहुन गेला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Apr 2020 - 3:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नरनाळ्या किल्ल्याची सफ़र छान. फ़ोटोही छान आलेत. खरं तर अशा ट्रीपा पावसळ्यात चांगल्या असं वाटतं.
तोफ़ेच्या ठिकाणावरुन दिसणारा दरवाजा, तोफ़, आवडली. किल्यावरील असलेलं नक्षीकाम काम सुंदर.
ही कोणती शैली आहे, कोणास ठावूक, पण अशी नक्षीकाम अनेक ठिकाणी दिसते. मुगल शैली ?

पुलेशु. वाट पाहतोय.

प्रचेतस's picture

8 Apr 2020 - 4:19 pm | प्रचेतस

महाकाली दरवाजा म्हणजे बहुतकरून इस्लामिक शैली आहे, मूळच्या जुन्या यादवकालीन (गोंड राजांनी केलेल्या) शैलीचे पण काही अवशिष्ट दिसतं.

मस्त जमून आला आहे हा भाग. नरनाळा मला केव्हाचा बघायचा आहे, बघूया कधी जमते आहे ते ? बाकी महाकाली दरवाजा हा कदाचित महाराष्ट्रातील किल्ल्यावरच्या दरवाज्यापैकी सर्वात देखणा दरवाजा असावा.
मात्र अभयारण्य झाल्यामुळे हा गड आता पुर्णपणे पहाणे अशक्य झाले अर्थात नाईलाज आहे.

कंजूस's picture

7 Apr 2020 - 4:44 pm | कंजूस

दुरून नमस्कार.

चौकटराजा's picture

7 Apr 2020 - 7:21 pm | चौकटराजा

फोटोतील कमळे व आणखी नक्शीकाम वाखाणण्यासारखे आहे कारण दगड आहे बेसाल्ट ज्यात बारीक कोरीव काम तसे अवघड्च ! कमानी पहाता " की स्टोन " असलेली टू आर्च ब्रिटिशानीच भारत देशात आणली हे दिसून येते. कदाचित पोर्तगीजानी सुद्धा !

जेम्स वांड's picture

8 Apr 2020 - 1:21 pm | जेम्स वांड

किल्ल्याचा एकूण घेर ऐकूनच छाती दडपली राव. काय रौद्र सौंदर्य आहे हे. त्याशिवाय गडावरच फिरणारी वन्यजीव संपदा पाहून तर मॅन अगदीच तृप्त झाले.

सौंदाळा's picture

8 Apr 2020 - 9:51 pm | सौंदाळा

इथून दिसणारी किल्ल्याची तटबंदी
तटबंदी पुर्णपणे शाबूत असेल तेव्हा हे कसे दिसत असेल हा विचार करूनच छाती दडपली.
पायी फिरून किल्ला न बघता आल्यामुळे तुम्ही नक्की नाराज झाला असाल.
काय माहीत पण ही मालिका वाचताना एक अदभुत, गूढरम्य फिलिंग येत आहे.

चौथा कोनाडा's picture

9 Apr 2020 - 11:07 am | चौथा कोनाडा

नरनाळा किल्ला आणि परिसराची भटकंती अप्रतिम !
महाकाली दरवाजा खुपच सुंदर आहे. देखणे नक्षीकाम भुरळ घालणारे ! अवशेष आणि बांगडी तोफ खतरनाकच !
जाळीमागले सांबार तर अप्रतिम !
प्रचेतसने घडवलेली अदभूत सफर !

अत्रुप्त आत्मा's picture

9 Apr 2020 - 4:27 pm | अत्रुप्त आत्मा

व्वा व्वा ! मजा आली!

पैलवान's picture

12 Apr 2020 - 7:29 pm | पैलवान

जबरदस्त अनुभव असणार आहे मेळघाटच्या सफरीचा