पुणे ते कन्याकुमारी सायकल सफर पूर्वार्ध-२

केडी's picture
केडी in भटकंती
9 May 2020 - 11:25 am

1

मे मध्ये तसेही लांब पल्ल्याच्या राईड्स उन्हामूळे करता येत नाहीं, त्यामुळे तसं फारसं बिघडत न्हवत. हात स्लिंग मध्ये ठेवुन आता हळूहळू ऑफिस ची कामे घरून करायला लागलो. चारचाकी/दुचाकी चालवता येत न्हवती त्यामुळे थोड्या आठवड्याने ऑफिसमध्ये शेर राईड ने जायला लागलो.

२० मे ला झालेल्या अपघातापूर्वी, १६ मे ला एकदा ऑफिसात सायकल वर जाऊन आलेलो, जाऊन येऊन ५२ किमी. ऑफिसमध्ये सायकल वर जायची कल्पना सुचली ती इतर देशात आणि अगदी आपल्याकडे सुद्धा लोकं हे करतात हे वाचून.

व्यायाम करायला वेळ मिळत नाही, वेळ द्यावा लागतो, मग वर्कआऊट ऑन युर वे टू वर्क! म्हणून मी आणि मित्र बऱ्याच वेळेला ऑफिसमध्ये सायकल वर जायचो. आता ह्यात वेगळीच आव्हाने असतात.

एक तर आपल्याकडे बेभान असणारी रहदारी, सायकलस्वारांना न जुमानणारे दुचाकी चारचाकी, ट्रक, बस व टेम्पो चालक. (आता जिथे रस्ताच मुळात छोटा त्यात तुम्हाला कोण देणार जागा सायकल चालवायला), त्यातून मग साहजिकच येणारी भीती, काळजी. (कशाला करताय हे? इस इट सेफ टू राईड बाईक्स ऑन इंडियन रोड्स?)

"बी ब्रेव्ह, टेक रिस्कस, नथिंग कॅन सबस्टिट्यूट एक्सपिरियन्स".

आपल्याकडे, किंवा इतर जगात कुठेही, सायकल चालवण्यात रिस्क (धोका) हा आहेच. पण तो किती घ्यावा आणि कसा कमी करावा हे आपल्या हातात आहे. सायकलिंग करताना काही बंधनं आणि काही नियम हे अनिवार्य आहेत. हेल्मेट घालणं, सायकलिंग साठी बनवलेले भडक रंगाचे कपडे (पोपटी किंवा तांबडे टी-शर्ट, रिफ्लेक्टिव्ह जॅकेट्स, सायकलिंग शॉर्टस) जेणेकरून तुम्ही लांबून सुद्धा अगदी स्पष्टपणे आणि ठळक ओळखु याल. रात्री सायकल चालवणे वर्ज्य, अर्थात अगदीच वेळ पडली तर पुढे आणि मागे मोठे दिवे हे देखील अनिवार्य. कायम रस्त्याच्या डाव्याबाजूला पांढऱ्या पट्टी वरून/जवळ चालवणे, ग्रुप मध्ये असाल तर एका मागे एक अश्या रचनेत.

पुन्हा ऑफिसमध्ये पोचल्यावर अंघोळीसाठी सोय हवी. मी माझ्या कंपनीच्या ज्या ज्या ऑफिसेस मधून काम केलंय, त्यात फक्त २ ठिकाणी अंघोळीची सोय होती. इतर ठिकाणी, वॉशरूम मध्ये जाऊन, टॉवेल ने अंग पुसून, मग सोबत नेलेले डिओड्रंट चे भरपूर फवारे मारून कपडे बदलून बसायचो. एका ऑफिसमध्ये ऍडमिन च्या मागे लागून बाथरूम मध्ये एक बॉयलर (गिझर) लावून घेतला, कारण थंडीच्या दिवसात त्रास व्हायचा गार पाण्याचा. अर्थात त्यांनी लावला तो अगडबंब २०/३० लिटर चा गिझर! तो सुरू करणार कधी, आणि ते पाणी तापणार कधी!

सायकलने ऑफिसमध्ये जाताना अजून एक प्रश्न म्हणजे सोबत न्यायचा लॅपटॉप, बदलायचे कपडे. ते मी लॅपटॉप च्या बॅगेत कसे बसे कोंबून मग ती बॅग पाठीवर घेऊन निघायचो.

कपडे बदलून झाली की ते आधीचे घामटं कपडे मग क्यूबिकल मध्ये खाली चक्क वाळायला टाकायचे!

त्या ऑफिस च्या राईड नंतर सायकल वर पुन्हा बसलो तेच अगदी सप्टेंबर मध्ये! पावसाळ्यात खरं तर राईड करायची मज्जाच काही
और असते, पण हात काही साथ देईना. त्यात उगाच रिस्क नको, म्हणून राईड्स केल्या नाहीत.

शेवटी आता दोनच महिने राहिले आहेत त्यामुळे सरावासाठी सप्टेंबर च्या शेवटच्या शनिवारी एक राईड केली, विंझाई मंदिर, ताह्मणी घाटाच्या अलीकडे, साधारण ५० किमी (जाऊन येऊन १००).

नुकत्याच संपलेल्या पावसामुळे, रस्ता अतिशय खराब झालेला, हाताला रस्त्यावरचे खड्डे चांगलेच जाणवत होते, जाताना तरी हळूहळू गेलो, परतीच्या वाटेला मात्र अगदीच वाट लागली! शेवटी हँडल धरवेना, पिरंगुट घाटाच्या अलीकडे बायकोला कॉल केला आणि तू ये, आता शक्य नाही म्हणून थांबलो...राईड अर्धवट सोडावी लागली, त्याला बरीच करणे होती, अर्थातच हात, प्रचंड उन्हामुळे होणारा त्रास आणि सँडल सोर ची चाहूल!

सँडल सोर, सायकलस्वारांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम! हा त्रास शब्दशः "मागे" लागला की धाब्बे दणाणतात!

मागे एकदा, एक तीन दिवसांची राईड केलेली, पुणे आरावी आणि परत. पहिल्या दिवशी ताह्मणी माणगाव मार्गे आम्ही १७० किमी कापत पोचलो मुक्कामी. नियोजनाप्रमाणे खरं तर दुसरा दिवस आराम करून मग तिसऱ्या दिवशी परत असा प्लॅन होता. पण एकंदरीत पहिल्या दिवशी पडलेल्या श्रमामुळे आणि रस्त्याच्या परिस्थितीमुळे आम्ही दुसऱ्या दिवशी दुपारी ६० किमी सायकल चालवून माणगाव ला मुक्काम केला, म्हणजे शेवटच्या दिवशी फक्त ११० किमी चा पल्ला गाठावा लागणार होता.

पुण्याच्या अलीकडे, साधारण ३० ते ४० किमी. राहिलेले असताना मला सँडल सोर चा त्रास सुरू झाला, ते शेवटचे अंतर अक्षरशः मी बुड सीट वर नं टेकवता चालवत आलेलो!

विंझाई राईड नंतर मात्र माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली! राईड नंतर पुढे आठवडाभर हात सारखा दुखत होता, हाताला सूज आली, आणि पहिल्यांदाच मला जाणीव झाली की बहुदा कन्याकुमारी पर्येंत पोचणे अवघड आहे.

त्यात ४ पैकी एकाने (सेथु), त्याला ऑफिस च्या कामामुळे माघार घ्यावी लागेल असे आमच्या व्हाट्सएपच्या ग्रुप वर कळवले!

मग मी सुद्धा, मी माघार घेतो असे सुचवले. पण आनंद आणि किरण मात्र मानायला तयार न्हवते. "तुला जमेल तशी चालवं, हात दुखला तर टेम्पो थांबवू" वैगेरे सूचना यायला लागल्या. खरंतर सायकल राईड ला आपण सायकल चालवावी हा माझा अट्टाहास असतो, पुणे कन्याकुमारी राईड करायची म्हणजे आपण सायकल चालवतच न्यायला पाहिजे. दुसरी मनात शंका म्हणजे सेथु (जो आहे खरं तर मल्लू, पण वाढलाय नागपूरात) गलपटला म्हणजे आमचा मुख्य भाषेचा आधार गेला. अनोळख्या राज्यात भाषा न समजता मी कसा टेम्पो अडवणार आणि काय सांगणार कोणाला? त्यात तिकडे सगळ्या पाट्यांवर जिलब्या आणि कडबोळी!

मग एक अजून सूचना म्हणजे आपण अर्धी करूयात राईड, थोडक्यात मधून कुठून तरी सुरू करू आणि मग कन्याकुमारी गाठू. हे देखील मला तितकेसे पटणारे न्हवते. एक तर मेहेनत घेऊन अख्खी राईड प्लॅन करायची आणि मग करायची ती अशी अर्धवट? बायकोच्या भाषेत माझी "खाईन तर तुपाशी" वृत्ती आड आली.

आपण अजून राईडस करू, त्यात तुला कसं झेपतंय ते बघ, असे इतर दोघे म्हणाले. मी अजून एक दोन छोट्या राईड केल्या आणि त्रास कायम होत गेला. १५०० किमी सायकल राईड करणे म्हणजे तुम्ही शारीरिक आणि मानसिक दृष्टीने अतिशय तयार पाहिजे हे लक्षात आलं. मित्र अजूनही चल, आपण करू वैगेरे सांगत होते, पण कुठेतरी माझा आत्मविश्वास मात्र कमी झालेला आणि मी ठाम राहिलो. दोघेही प्रचंड नाराज झाले! प्लॅन फिस्कटला! सेथुने विमान तिकीटं रद्द केली!

मला खूप वाईट वाटलं! एवढे महिने नियोजन करून केलेला प्लॅन असा माझ्यामुळे फिस्कटला!

आता पुढे करायचे काय हा मोठा प्रश्न उभा राहिला. सुट्टी तर आधीच टाकलेली, मग ती कॅन्सल करावी असा एक विचार आला मनात, आणि अश्या वेळी माझा एंडयुरो मधला पार्टनर आणि कोकण वेडा अमित ने भुणभुण सुरू केली की आपण परत गोवा गाठू.
(आदल्या ट्रिप ला ह्याला काही कारणाने येतां आलं न्हवत, त्यामुळे त्याची ती ईच्छा आजही अपूर्णच होती).

मी आधी स्पष्ट नकार दिला. मला आता कोणीही विचारलं तर मी हेच सांगेन की पुणे ते कन्याकुमारी च्या १५०० किमी राईड पेक्षा आम्ही केलेली पुणे-कोंकण-गोवा ही राईड जास्ती खडतर वाटली मला. कोकणातले ते वर-खाली वळणा वळणाचे रस्ते, एक गाव सोडलं की डोंगर उतरून पुन्हा दुसरा डोंगर चढत जायचे, हे सत्र सदैव चालूच राहते कोकणात. त्यात काही ठिकाणी पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा झालेली असते आणि अश्या वेळी चढावर अजिबात गती मिळत नाही.
माझ्या मानत अजून एक भीती होती. सायकल वर जेव्हा तुम्ही रस्त्याने जाता, तेव्हा तो रस्ता तुम्हीं अगदी जवळून अनुभवता, आणि तो बऱ्यापैकी लक्षात राहतो. आमची आधीची गोवा ट्रिप झाल्यानंतर आम्ही सहकिटुंब अशीच कोस्टल गोवा ट्रिप केली कार ने, त्याच रस्त्याने, आणि मला प्रत्येक चढ, उतार, कुठे पाणी प्यायला थांबलो, नाश्ता, जेवण कुठे कुठे हे अगदी डोळ्यांसमोर पुन्हा उभं राहत होत, (बायको पोरं शेवटी वैतागली नाही हेच नवल!)

तर पुन्हा गोव्याला जायचे म्हणजे नाही म्हणायला थोडा अंगावर काटा आला, कारण ते रस्ते, चढ उतार हे पाढे पाठ झाल्यासारखे डोळ्यासमोरून पुन्हा फिरले. ह्यावर अमित ने तोडगा काढला. आपण रोज कमी अंतर कापू आणि ५ ऐवजी ९ दिवसात गोवा गाठू असा प्लॅन त्याने तयार केला.

मी शेवटी तयार झालो.(सुलेमानी किडा बहुदा ह्यालाच म्हणत असावे!). या दुसऱ्या गोवा ट्रिप चा अनुभव अजूनच सुंदर होता. अगदी कोकणातील छोट्या छोट्या गावात, कधी कोळ्यांच्या वस्तीत मुक्कामाला राहिलो. ह्या ट्रिप मध्ये आम्ही कुठल्याही हॉटेल चे आगाऊ बुकिंग केले नाही, जमेल तितके जायचे, आणि मग विचारपूस करत मुक्कामासाठी हॉटेल शोधायचे.

आमच्या ह्या सायकल ट्रिप चा आराखडा साधारण असा होता:
पुणे ते माणगाव - ११० किमी
माणगाव ते आरावी - ६० किमी
आरावी ते दापोली - ७५ किमी
दापोली ते गुहागर - ६० किमी
गुहागर ते रत्नागिरी - ७५ किमी
रत्नागिरी ते मिठगावणे - ५५ किमी
मिठगावणे ते आचरा - ७८ किमी
आचरा ते निवती - ६० किमी
निवती ते आरंबोल, गोवा - ५५ किमी

ह्या ट्रिप मधली काही निवडक क्षणचित्रं इथे देतोय

2

ह्या ट्रिप मध्ये त्रास झाला, हाताला सपोर्ट मिळावा म्हणून घातलेले आर्म वॉरमर ने दंडाला मोठे मोठे फोड आले, हात अधुन मधुन चांगलाच ठणकायला लागायचा, पण त्याकडे दुर्लक्ष करायचे.

मला बघून (एकंदर आकारमान) बऱ्याच लोकांना शंका येते, की हा माणूस एवढे लांब पल्ल्याच्या सायकल राईड खरंच करतो?

सायकलिंग इस ऑल अबाऊट माईंड ओव्हर बॉडी. वन्स यु साईन अंडर द डॉटेड लाईन, यु आर कमिटेड!

त्यामुळे एकदा तुम्ही मनाची समजूत काढली, की मग शरीर आपोआप साथ देतं. एंडयुरो च्या वेळी प्रॅक्टिस करताना एका मित्राने मोलाचा सल्ला दिलेला, कधीही तुम्हाला ही रेस सोडून द्यावीशी वाटली तर तो निर्णय एक तास पुढे ढकला. त्या एका तासात बरच काही बदलतं, कदाचित पुढे उतार येतो, रस्ता चांगला होतो, पण सर्वात महत्त्वाचं जे होतं ते म्हणजे तुमचा निर्णय बदलतो!

इतक्या सायकल राईड केल्यावर मग फॅमिली सोबत ट्रिप करणे क्रमप्राप्त होते. त्यामुळेच, २०१८ च्या डिसेंबर साठी मी एक फॅमिली रोड ट्रिप आखली. पुणे कोंकण, गोवा, आणि शेवटी सिंताकोर (कारवार जवळ समुद्रात एक बेट आहे, त्यावर हे नुकतेच सुरू झालेले हे एक अतिशय सुंदर रिसॉर्ट).

ह्याच दरम्यान किरणने आमच्या सायकल व्हाट्सअप्प ग्रुप वर पुणे कन्याकुमारी करण्याचे बोलून दाखवले. मी आधीच नकार कळवून टाकला, कारणं आता फॅमिली ट्रिप रद्द करणे शक्य न्हवते.

किरण आणि त्याच्यासोबत अजून ३ जणांनी पुणे कन्याकुमारी सायकल सफर यशस्वीरीत्या पार केली! माझ्या प्लॅन च्या आधारावर, मध्ये मध्ये वेगळ्या वाटा निवडत ते सुखरूप कन्याकुमारीला पोचले.
रोज त्यांचे व्हाट्सएपच्या ग्रुप वर आलेले पोस्ट/फोटो पाहून कुठेतरी थोडा हेवा वाटायचा. त्यांनी देखील कुठलेही हॉटेल बुकिंग केले नसल्यामुळे, अधूनमधून मला फोन वर किंवा व्हाट्सअप्प वर विचारायचे, मग मी त्यांना पाहिजे ती माहिती द्यायचो. थोडक्यात त्यांनी माझं, त्यांच्या ह्या मोहिमेचे बॅक ऑफिस करून टाकलेले!

त्यांची मोहीम संपली, आणि बऱ्याच वर्तमानपत्रांत त्यांचे फोटो व मजकूर झळकले! त्यात नियोजक म्हणून चक्क माझे नाव टाकून मोकळे हे पठ्ठे! ती बातमी घेऊन मग माझी खेचायला सुरवात झाली! मी देखील भरपूर हसून घेतलं. पण मनात मात्र निश्चय केला की आपण ही मोहीम करायचीच!
3

२०१९ च्या सुरवातीलाच मी पुन्हा आमच्या मावळ्यांना हाक दिली. सेथु आधी आढेवेढे घेत होता, पण त्याला सांगितलं, अरे जिंदगी ना मिलेंगी दोबारा! तो तयार झाला, आनंद सुद्धा हो म्हणाला पण १२ दिवस सुट्ट्या मिळणार नाहीत म्हणून त्याने आम्हाला नंतर पुढे जॉईन होऊन राईड करायचे कबुल केले. सर्वात कौतुक वाटले ते किरणचे, आदल्याच वर्षी जाऊन आल्यानंतर सुद्धा त्याने आमच्यासोबत येण्यासाठो होकार दिला! टीम पुन्हा उभी राहिली. दिवस आणि रूट ठरले. परतीची विमान तिकीटं पुन्हा बुक झाली!!

एकत्र सराव पावसानंतर करू, तो पर्येंत आपापले व्यायाम आणि सायकलिंग सुरू ठेवावे हे ठरले. पण २०१९ हेच मुळात पावसाचे वर्ष निघाले! अगदी नोव्हेंबरमध्ये सुद्धा पाऊस सुरूच होता!

सरावासाठी फार लांब पल्ल्याच्या राईड्स जमेना! मला पुन्हा टेन्शन यायला लागले. शेवटी प्रस्थान करायच्या साधारण १५ ते २० दिवस आधी थोडाफार सराव करता आला. तो देखील नेकलेस राईड, साधारण २०/२२ किमी रोज.

सामानाची बांधाबांध सुरू केली. राईड ला जाताना कमीतकमी वस्तू सोबत ठेवायच्या हे अनुभवातून आलेलं, त्यामुळे एक दोन टी-शर्ट, शॉर्टस आणि मुख्य म्हणजे पंक्चर किट, दोन बदलीच्या ट्युबा, हवा भरायचा पंप, बदलीचे ब्रेक पॅड, छोटा, सायकल साठी असणारा टूलकीट, वाटेत तोंडात टाकायला चिक्की, चॉकलेट वैगेरे...सायकली सर्व्हिसिंग करून आणल्या.

डिसेंबर ६, २०१९ च्या रात्री सायकल सज्ज झाली. उद्या सकाळी ६:०० ला नवले पुलाखाली भेटून, किरण, सेथु आणि मी प्रवासाची सुरवात करणार होतो!

क्रमशः

प्रतिक्रिया

प्रशांत's picture

9 May 2020 - 5:43 pm | प्रशांत

खुपच छान लिहताय.. थांबु नका. पुढचे भाग लवकर येवु द्या...

कन्याकुमारी सायकल सफर झाली ते तुमच्या प्लॅन मुळे. मी सायकल घेताना कधी विचार पण केला नव्हता कि कन्याकुमारी ला सायकलने जाईल. सायकल घेतल्या नंतर एकदा वल्लीने मला विचारले कि एवढी महाग सायकल घेतली मग काय कोकणात कधी जाल, यावर मी त्याला सांगितले कि मी जास्तीत जास्त लोणावळा जाईल सायकलने (लॉकडाउन मुळे मिस करतोय लोणावळा राईड).

तुम्हि बनवलेला प्लॅन बघुनच कन्याकुमारी जायचे विचार करायला लागलो. नवरात्रीत रोज सकाळी ५० किमि सायकलिंग केल्यावर आत्मविश्वास वाढला. कन्याकुमारी सायकलने जायचे म्हटले कि घरचे, मित्र, नातेवाईक मुर्खात काढायचे. सायकल पेक्षा कार ने जा असे सल्ले मिळायचे.
अशावेळी तुमचा प्लॅन त्याना दाखवायचो/सांगायचो आणि गप्प बसवायचो. मी तर सगळीकडे सांगुन टाकलं होते कि प्लॅन प्रमाणे हॉटेल सुद्धा बूक केली.

आता असाच काश्मिर ते पुणे प्लॅन बनवा (राईड करतांना कॉल घेवुच)

वाट पाहतोय काश्मिर प्लॅन ची आणि पुढच्या लेखाची.

निनाद आचार्य's picture

10 May 2020 - 9:35 pm | निनाद आचार्य

दोन्ही लेख वाचले. तुम्ही खूप छान, सलग लिहिता. कुठेही कंटाळा येत नाही. त्यामुळे पुढील प्रवासाचा वृत्तान्त ऐकायची उत्कंठा लागली आहे. ही मालिका गाजणार यात शंकाच नाही.
रच्याकने, हात बरा होण्यासाठी काय उपचार केलेत?

केडी's picture

11 May 2020 - 3:42 pm | केडी

निनाद,
प्रतिक्रियेसाठी आभार!

हाताला थोडे व्यायाम केले, मुख्यत्वे मला दावा हात नीट वळवता येत न्हवता (प्रसाद घ्यायला डावा हात पुढे केला तर तो नीट सपाट होत नाही अजूनही). पण मग फिझियो ने दाखवलेले व्यायाम नियमितपणे केले.

मोदक's picture

10 May 2020 - 11:26 pm | मोदक

भारी लिखाण.. एक सलग भाग येऊदेत.

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

केडी's picture

11 May 2020 - 3:44 pm | केडी

थँक्स रे!
हो येईल लवकरच, त्यावर किरण आणि मी काम करतोय...

सतीश विष्णू जाधव's picture

11 May 2020 - 3:56 pm | सतीश विष्णू जाधव

तुमच्या नियोजनामुळेच किरण आणि त्याच्या साथीदारांनी पुणे कन्याकुमारी सायकल सफर यशस्वीपणे पूर्ण केली. तुम्ही स्वत: या सफरीत नव्हता याची खंत आहेच पण मित्रांनी पूर्ण केली याचा परमानंद सुद्धा आहे.
"ही मोहीम करायचीच" हा तुमचा निश्चय नक्कीच पूर्ण होईल!
सुंदर सायकल सफर.......
आवडली.....

अतिशय सुंदर... भारी लिहिले आहे....
मनापासून आवडले.. फोटो पण एका पेक्षा एक भारी..

माझ्या ही पहिल्या long सायकल ट्रिप बद्दल लिहायचे आहे.. पण काय नविन लिहिणार म्हणून अनेक वेळा टाळले गेले..
तुमचे लिखान पाहून वाटत आहे.. लिहायला पाहिजे आपलेच आपल्या साठी..

प्रेरणा दायी आहे लिखान...

लिहीत रहा... वाचत आहे...

गणेशा.. फॉर्मल रिक्वेस्ट पाठवू का सायकल ट्रिप बद्दल लिहा म्हणून...?

हसतो आहे तुझ्या रिप्लाय मुळे..
आणि सायकल बद्दल चे लिखान सुरु करताना तुझा उल्लेख येणार हे मात्र नक्की..

Weekend ला लिहितो नक्की, कसे का असेना ते..

लिही रे नक्की.. वाट बघतो आहे.

अरे लिही तर तू...तू म्हणालास तसं, एलता स्वतःसाठी लिहायचंय... लोकं इकडे प्रोत्साहन देत राहतात..तू घे लिहायला...

श्री अरूण वेधीकर (नंतर झालेले माझे मित्र) सन १९७९साली सायकलवरून श्रीनगरला निघाले होते. मी त्याकाळातच श्री नगरला होतो. पण त्यांची भेट झाली नव्हती. दूरवरची सफर करायची व जमले तर मित्र मिळवून काही पोटापाण्याचा प्रश्न सोडवायचा. या इराद्याने ते निघाले. त्यांनी आपल्याला आलेले अनुभव पुस्तकरूपाने सादर केले होते. ललित साहित्याचा तो अनुपम नमूना आहे. त्यातील काही वेचक प्रसंगांची ओळख पुर्वी सादर केली होती. आपण असेच दूरच्या प्रवासाला निघाला आहेत म्हणून विरंगुळा म्हणून वाचायला सादर करत आहे आपल्याला आवडले तर काही किस्से नंतर सादर करेन.

इंदूर – देवास - सारंगपूर

अरूण वेढीकर सायकलवरून मजल दर मजल करत मध्य प्रदेशात येतात तेंव्हाच्या कथा भागातील मजा मजा सादर...
पान 60 इंदूर
... मध्य प्रदेशाची राजधानी होती. इंदूरवर अस्सल मराठी छाप दिसते. भाषेचा गोडवा कानात साठवावा असा. मराठीला उर्दू-हिन्दी शब्दांची खमंग फोडणी... ‘अरे यार माजरा काय आहे? खमखा चिल्लावून राहिलाय ? इतका शोर मचून का राहिलाय?...
... इंद्रेश्वर मंदिरामुळे याला इंद्रपूर म्हणत. पुढे इंदूर - इंदौर असा अपभ्रंश झाला...राजवाड्या पुढच्या गोयल मंदिरा शेवटी खास मिठाईची गल्ली आहे. तिथे गोड पदार्थ, भांगघोटा वगैरेची अनेक दुकाने दिसतात. फुफाट्यात भाजलेले किंवा तुपात तळलेले कणकेचे गोळे म्हणजे दालबाटी. तर तळलेले मसालेदार कंद म्हणजे गराडू...
पान 64 ... देवास
देवास मागे पडलं, मी माझ्या नादात होतो. इतक्यात उजवीकडच्या शेतातून एक क्रुद्ध झालेला एक बैल माझ्या रोखाने एवढा अचानक उधळला... त्याला चुकवण्याच्या प्रयत्नात मी त्याच्या सरळ रेषेत आलो आणि पुढच्या क्षणी माझ्या डोळ्यासमोर काजवे चमकले. मातीने भरलेल्या त्याच्या कणखर मस्तकाची निसटती धडक बसून मी सायकल सकट उडालो. ...त्याचं शिंग माझ्या बरगडीत अडकण्या ऐवजी कॅरियर वरील बॅगेत अडकल्यामुळे ती लांब जाऊन पडली. माझ्या डाव्या गुडघ्यावर मात्र या प्रसंगानं चांगलचं शिक्कामोर्तब केलं होतं. अर्थात लोकांची सहानुभूती व पाहुणचारही घडवला. ...
अर्ध्या घटके नंतर पुन्हा मार्गस्थ झालो. परंतु भलं मोठं वशींड हालवीत फेसाळलेल्या तोंडानं खेटून गेलेलं ते वृषभाचं धूड माझ्या कायमचं लक्षात राहिलं.... मी नदीकाठच्या मृत बैलाच्या शिंगावर माझी अंडरवेअर वाळत घातली होती.. ते या बैलाला कसं कळलं ते मला अजूनही कळलेलं नाही. ते काहीही असो. पण बंधू प्रेम असावं तर असं...!
... रात्रीचे 8.30 झाले होते. सायकल व सामान चक्क रस्त्याकडेच्या वाळूत ढिगाजवळच ठेऊन मी समोरच्या शेतात असलेल्या वऱ्हाडाकडे वळलो. काळोखातून ठेचकाळत निर्लज्जपणे पंक्तीच्या एका टोकाला फोल्डींग चेयर मिटावी तसा मटकन खाली बसलो.... ‘बंबय से आया हूं’ ह्या पुस्तीनं जादू केली. एवढ्यात एक पत्रावळ टाकून, ‘आवी मुसाफिर भाय, खाना खाव’... कुणीतरी तोंड वेंगाडत म्हणाले. काही जण हेंगाडी हेलात मराठी सुद्धा बोलत होते. तिथ इतकं उष्ट खरकट पडलं होतं माझ्यासारखे आणखी तार जण जेवून उठले असते.... मी सक्त मजूरीच्या कैद्यासारखा जेवू लागलो. गवताळ मैदानामुळं भरपूर ग्रास हॉपर्स होते. गॅसबत्यावरून ते जेवणातही पडत होते. परंतु हे अत्यंत तुकतुकीत पोपटी रंगाचे नि स्वच्छ असतात. त्यामुळे झुरळांसारखी त्यांची शिसारी येत नव्हती. उलट त्यांना आरामात काढताना ‘अशँ पलायचं नई बशीत. भाज्येल ना... लशापण तिकट हाये.’... असे मनांत म्हणत होतो.... सर्कसच्या तंबू सारखा घोळ असलेले झगे घातलेल्या अस्तव्यस्त बायका, काही अत्यंत रेखीव, कमनीय पण गचाळ, लोक बसल्या जागेवरून तंबाखूचा लाळ पचकन थुंकत होते. त्यांच्याकडे बघणं म्हणजे घशातला घास उलटण्याचीच भिती... आयुष्यात निदान जेवताना तरी मी अशी किडेगिरी कधी केली नव्हती. ...
...दिवसा जबरदस्त ऊन आणि रात्री भरमसाठ थंडी. निसर्गाच्या मनमानी स्वभावातला तो मोठा दुर्गूण होता. म्हणजे असं की रात्री मी निजत होतो कूलर मधे आणि दिवसा शिजत होतो तो कुकर मधे..
सारंगपूर
हे ठिकाण देवास पासून 16 किमीवर होतं. आता वृषभमुद्रांकित गुडघा छान ठणकू लागला होता. इथून अदमासे वीस एक किमीपर्यंत पोपटांच्या झुंडीच्या झुंडी पहायला मिळाल्या. त्यांच्या गतीत स्वातंत्र्यामुळं चापल्य होतच पण कुणाची लाचारी नसल्याने स्वरातही कर्कश्यपणा होता. वाटेत एका म्हशीच्या पाठीवर चक्क सात गायबगळे ओळीनं बसलंलं पाहिले. पटकन जमेल तसा फोटो काढावा म्हणून थांबलो. तेवढ्यात ते उडून पसार झाले...!
...पान 72 ... दोन एकशे फुटांच्या उंच टेपाडावरची एक आदिवासी गढी दिसली... आपला रस्ता चुकल्याची पक्की खात्री झाली. चुकलो खरा... तेवढ्यात गढीवर गलका झाला. पाठोपाठ 3-4 शिकारी कुत्री जंगल दणाणून सोडत माझ्या मागे लागली. माझं क्षणात पाणी पाणी झालं. विचार करायला क्षणभर उसंत नव्हता... जीव मुठी धरून मी सायकल पिटाळली. मगाचा चढाव आता माझ्या मदतीला आता घसरगुंडीसारखा धावून आला. तिथं मला वाचवणारे कुणीच नसल्यामुळे, दगड धोंडे, खड्डे, बरोबरचं सामान कश्शाचही भान न ठेवता मी धनुष्यातून सुटलेल्या बाणासारखा निघालो. कुत्री ही फुटलेल्या धरणातून सुटलेल्या पाण्याच्या लोंढ्यासाऱखी मागे होतीच! सायकलचा आरसा रथावरील निष्णात सारथ्याप्रमाणे मला सूचना देत होता. तेवढाच आधार...!
अर्धा किमी तंगड्या उडवूनही हा द्विपाद प्राणी आपल्या तडाख्यात सापडत नाही असं पाहून त्या श्वान चौकडीचा आवेश मावळला. त्यातल्या एका दोघांनी आपापल्या पसंतीच्या दगडांना सलाम केल्यावर ते टोळकं माझा नाद सोडून पुन्हा गढीकडे वळलेलं दिसलं. कदाचित ती त्यांची हद्द असावी. तसं असेल तर हद्द संपली म्हणून नाहीतर मीच संपलो असतो...!
मगाशी मी – ‘रस्त्यावर कुण्णी कुत्रं ही नाही’ काय म्हटलं तर साली कुत्री मागे लागावी...
घामान थबथबून मी पुन्हा मुख्य रस्त्यावर आलो. एवढ्यात इंदूरकडे जाणाऱ्या एका सरदाराच्या मोटरसायकलवरून कसलं तरी पुडकं पडलं. मी जोरात शीळ मारून थांबवलं. तो वळून परतला. ‘ये संभालये’ मी ते त्याच्या हातात देत म्हटलं. त्यात काय होतं कळलं नाही पण तो मध्यमवयीन ग्रहस्थ इतका खूष झाला की त्यानं चक्क 10 रुपयाची नोट जबरदस्तीनं माझ्या टी शर्टाच्या खिशात कोंबली! (त्यावेळी 10 रुपये म्हणजे सुद्धा चंगळ होती!) त्याच्या दाढीधारी चेहऱ्यावरून कृतज्ञता ओसंडत होती. त्याचं नाव त्यान सुरजीत सिह परमार असं सांगितलं....
पान 74...
... उन आणि पडछायेच्या कललेल्या एकटेपणाला मी आधीच कंटाळलो होतो. मी त्या तरुतली पोहोचलो. तिथं आष्टा, जंगली बदाम,शाल्मली, करंज, पांढऱ्या फुलांनी नटलेला बुचाचा वृक्षही होता. तिथे उतरलेल्या लोकांची अवस्था मात्र रानटी होती. दाट जंगलात टोळ्या टोळ्यांनी राहणाऱ्या फासेपारधी वंशाचे ते लोक, मागासलेले असूनही खरे खुरे रसिक होते. भाले बर्च्या धनुष्य-बाण, जमिनीवरचे तसेच झाडावरचे फास त्याच बरोबर कुत्र्यांचा त्यांच्या शिकारीत महत्वाचा वाटा होता. अदिवासींच्या मानाने हे लोक खूपच बोल घेवडे होते!....
संध्याकाळी 5च्या सुमारास सारंगपूर इथं पोचलो.( बाझ बहाद्दर आणि राणी रुपमती या प्रसिद्ध प्रेमी जोडीमधल्या रूपमतीचा जन्म जिथं झाला तेच हे सारंगपूर!)...
... पुढे माऊ गावाजवळ एका देवळात थांबलो. गाभाऱ्यात खोलगट जागी महादेवाची अक्षरशः तडा गेलेली पिंड होती. इथं थांबावं की नाही असा विचारात असताना मी जे पाहिलं त्यानं माझ्या अंगावर सरसरून काटा आला. 6-7 फुटावर एका खांबापाशी भल्या मोठ्या नागाचं एक पिवळं जर्द वेटोळं फुटभर फणा काढून बसलं होतं! एरवी सर्पाची भिती न बाळगणारा मी या क्षणी इतका हादरलो की माझं मलाच नवल वाटलं...
... बैलगाडीखालीच चादर अंथरून पडण्याचा विचार मी अंमलात आणला. पेंढ्याचा एक गठ्ठ्या आरामात उशाखाली घेतला. विळ्याच्या पात्यासारखी दिसणारी चतकोर चंद्रकोर क्षितिजाकडे निघालेली पाहून पांढऱ्या ढगांच्या टारगट झुंडी तिला लगट करत होत्या. आणि आभाळाचं काय? ...
आबाळ होतं थकलं... वाकलं होतं पाठीत
गुपचुप मग झोपलं... चांदण्याच्या मिठीत!

......
भाग 3

केडी's picture

12 May 2020 - 8:30 am | केडी

छान आहेत अनुभव, पुस्तक वाचायला नक्कीच आवडेल..कोणत्या प्रकाशनाचे आहे पुस्तक? पुस्तकाचे नाव जरूर कळवा.

लेख माला संदर्भ सादर केला आहे.
फोटो आणि लिंक मात्र दिसत नाहीत असे वाटते... जमले की फोटो नंतर सादर करेन.

http://www.misalpav.com/node/30327

एकूण भयानक दूरचा खडतर सायकल प्रवास असणार!

वाचणार.

सहज सिम्प्लि's picture

7 Jul 2020 - 9:13 pm | सहज सिम्प्लि

खूपच उत्तम लिहिलंय. प्रवास कसा झाला याची फार उत्सुकता आहे.