Skip to main content

रवा इडली

लेखक रेवती यांनी शनिवार, 03/01/2009 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: एक वाटी अख्खी उडीद डाळ (साल नसलेली), अडीच वाट्या जाड रवा, मीठ, एक टेबलस्पून तेल, पाणी कृती : उडीद डाळ किमान पाच तास पाण्यात भिजवा. नंतर डाळ वाटून घ्या व पाणी घालून पातळ करा. एका कढईत रवा भाजून घ्या पण रंग बदलू देवू नका. रवा कोमट झाल्यावर वाटलेल्या डाळीच्या मिश्रणात घाला. कालवून घ्या व पाण्याचं प्रमाण गरज वाटल्यास याचवेळेस वाढवा. मिश्रण पातळ असले पाहीजे कारण रवा नंतर पाणी शोषून घेतो. चवीनुसार मीठ व एक टेबलस्पून तेल घाला. नीट मिसळून उबदार जागी ठेवून द्या. साधारण आठ ते दहा तासात पीठ फुगून येते. मिश्रण अजिबात ढवळायचे नाही. इडलीपात्राला तेलाचा हात लावून घ्या व चमच्याने वरवरचे पीठ घेऊन पात्रात घाला. इडल्या वाफवून काढाव्यात व चटणी, सांबाराबरोबर सर्व्ह कराव्यात. वरील साहित्यात लहान आकाराच्या ३० इडल्या होतात. ही पाककृती माझ्याकडच्या पुस्तकातील आहे. थोडे बदल केले आहेत. वाटल्यास आपण वरील पिठात थोडे मटार, बारीक चिरलेले गाजर, कोथिंबीर व मिरीपूड घालू शकता. हे जिन्नस पीठ वाटल्यावर मिसळावे लागतात. रेवती

वाचने 27940
प्रतिक्रिया 71

प्रतिक्रिया

क्या केहेने भाभीजी..! अत्यंत मनमोह्क फोटो.. वा र लो..! तात्या.

हम्म्म्म..... जुलूम आहे हो जुलूम. बिपिन कार्यकर्ते

In reply to by आपला अभिजित

आम्हीही येतो! :) छान पाकृ. इडली मी रवा घालून सहसा करीत नाही, पण आता करीन तेव्हा अशीच करून पाहीन.

In reply to by आपला अभिजित

जरूर या. आमच्या घरी येण्यासाठी आमंत्रणाची गरज नाही. फक्त फोन करून सांगा. उद्या या खरच. चित्राताई व विकासही येतायत. मजा येइल. रेवती

चटणीचा रंगच आमंत्रण देणारा आहे. आणि इडलीचा स्पॉंजीनेसच ती किती हलकी झाली असणार हे दाखवतोय. जुलूम हेच खरं.

छान पाकृ. फोटो पण जबरदस्त. धन्यवाद. फोटीतील चटणी ची पण पाकॄ मि़ळेल का?

In reply to by पक्या

वरील चटणीसाठी साहित्य मोजून घेतले नव्हते म्हणून अंदाजे देत आहे. साधारण एक मोठी वाटी ओले खोबरे, अर्ध्या वाटीला थोडे कमी डाळं (फुटाण्याचं, सालं काढलेलं), हिरव्या मिरच्या, छोटा आल्याचा तुकडा, लसणीची एक मोठी पाकळी, मीठ, थोडी साखर हवी असल्यास, पाव चमचा चिंच कोळ, फोडणीचे साहित्य. लाल मिरची सुकी, कढीपत्ता, उडीद डाळ. खोबरं ते चिंचेचा कोळ मिक्सरवर बारीक वाटावे. पळीफोडणी हळद न घालता करावी व त्यात उडीद डाळ, सुकी मिरची, व कढीपत्ता घालावा. ही फोडणी चटणीवर ओतावी व एकत्र करावे. रेवती

अरे वा, रेवती, फोटो आणि कृती खुप छान आहे.:) पुढच्या वेळी अशा प्रकारे इडली करून पाहिन. चटणीची ही पाककृती दे ना. :)

फोटू जबरी आला आहे. पटकन एक इडली उचलुन घ्यावी असे वाटते.

अरे वा.. छान पाकृ आणि फारच मस्त फोटो. इडल्या खरोखरच उचलून घ्याव्याश्या वाटत आहेत. :) -- लिखाळ. माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.

In reply to by लिखाळ

अरे वा.. छान पाकृ आणि फारच मस्त फोटो. इडल्या खरोखरच उचलून घ्याव्याश्या वाटत आहेत अगदी असंच म्हणते.. रेवती ताईनी मला पाहुणचाराला बोलावलेच आहे.. आता जायला पाहिजे लवकरच.. :) --शाल्मली.

एक होती इडली ती खूप चिडली तरातरा धावली सांबारात जाऊन पडली सांबार होते गरम इडली झाली नरम चमचा आला खुशीत बसला बशीच्या कुशीत (इथे माझी मुलगी `कुशीच्या बशीत' म्हणायची!) चमच्याने पाहिले इकडेतिकडे इडलीचे केले तुकडेतुकडे मुलांनी केली इडली फस्त इडली झाली होती मस्त!

In reply to by मीनल

अख्ख्या उडीदडाळीच्या वापराने इडली ज्यास्त स्पाँजी होते असे दाक्षिणात्य मैत्रिणीने सांगितले होते (कारण माहीत नाही). तसा अनुभव आला म्हणून मीही आता अख्खी डाळ फक्त इडलीसाठी वापरते. रेवती

बडबडगीत मस्त आहे. इडल्या एकदम टॉप!!!!!

फोटोवरूनच इडल्यांचा हलकेपणा जाणवतोय! तसा नेहेमी तांदूळच वापरला आहे, आता रवा वापरून पहायला हवा. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

रवा इडली ची कृती आणि फोटो दोन्ही आवडले. रवा इडलीत आंबटपणा नसल्याने मला रवा इडली अत्यंत प्रिय आहे. मला एक शंका आहे इडलीचा रवा(इडलीसाठी वापरतात तो) आणी जाडा रवा दोन्ही एकच आहे का की दुकानात इडलीचा रवा म्हणून वेगळा रवा मिळतो.

In reply to by विकि

रवा हा साधा रवा आपण शिरा करताना वापरतो तो आहे. हा रवा गव्हाचा असतो. रेवती

रवा इडली आता करुन पाहीली पाहीजे.

लैच भारी फोटो आला इडलीचा !!! रव्याची इडली सांगावी लागेल बनवायला !

रवा इडलीचा (मला माहित पडलेला) इतिहास .. महायुद्धाच्या काळात तांदुळ मिळणे मुश्किल झाल्याने इडली-प्रेमी मंडळींनी रवा डोसा व रवा इडली हे प्रकार तयार केले. इडली शिवाय जगतील ते मद्रासी कसले ? :)

पाकृ, इडली आणि बडबडगीतही ... कालच एम.टी.आर.च्या मिश्रणाची रवा इडली करताना, हे घरी कसं बनवायचं याचा विचार करत होते. धन्यवाद रेवतीताई. अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

इडली के व ळ सुं द र! इडली आणि चटणीच्या पाकृसाठी धन्यु रेवती!

सर्व वाचकांचे मनापासून आभार. आपल्या प्रतिसादांमुळे उत्साह वाढला आहे. पुढची पाककृती लवकर टाकण्याचा प्रयत्न करीन. रेवती

In reply to by रेवती

रवा डोसा च्या पा. कृ. ची वाट पहात आहे. इडली आणि चटणीचे फोटो फारच सुरेख

करुन पहिन

आत्ता पाहिली ग रेवती रवाइडली, सहीच दिसतेय. उचलून तोंडात टाकावी अशी.. कित्त्येक महिन्यात केली नाही ग रवा इडली.. आता लवकरच करेन..:) स्वाती

धन्यवाद हेमू व स्वातीताई! आज मिपा उघडल्यावर एकदम इडली समोर आली आणि मी दचकले;) (बरेच दिवस झाले पाक्रु देऊन म्हणून). रेवती

एकदम हिट्ट पाकृ आहे रेवतीताई :) धन्यवाद!

http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/hungry-2.gif

In reply to by मारकुटे

सांबर
हा शब्द वाचून हरणाच्या समसंज्ञ चुलतभावाची आठवण झाली अन त्या डाळद्रावणात सांबराचे लेग पीस टाकलेले आहेत असे दृश्य डोळ्यांसमोर उभे राहून भडभडून आले.

In reply to by मारकुटे

दिलगिरीबद्दल धन्यवाद. अन खरा उच्चार आहे "सांबार". उत्तरभारतीयांचा सांबर उच्चार लै डोक्शात जातो.

In reply to by बॅटमॅन

उच्चार काहीही असला तरी पदार्थाची चव बदलत नाही. बोली भाषेत अनेक उच्चार होतात. वेगवेगळे उच्चार केले जातात. गंगा गँगस होते. सिंधू इंडस होते. मुंबई बॉम्बे होते. संवाद महत्वाचा असतो. मुळचा उच्चार जो आपण मानतो तोच खरा असं कशावरुन? शेवटी तो संकेत आहे. आणि तोच असला पाहिजे असा अट्टाहास चुकीचा ठरतो. काळाच्या ओघात प्रमाण उच्चार बदलत जातो. समोरचा माणूस उच्चार वेगळा करतो म्हणून डोक्यात राख घालून कसं चालेल? कदाचित काळाच्या ओघात तोच उच्चार प्रमाण होईल. काय सांगावे? कालाय तस्मै नमः

In reply to by मारकुटे

उच्चार काहीही असला तरी पदार्थाची चव बदलत नाही.
शिवी दिली तरी माणूस बदलत नाही असे अर्ग्युमेंट देऊ का यावर =))
बोली भाषेत अनेक उच्चार होतात. वेगवेगळे उच्चार केले जातात. गंगा गँगस होते. सिंधू इंडस होते. मुंबई बॉम्बे होते.
मुद्दा हुकला आहे. भारताबाहेरच्यांनी केलेल्या उच्चारांशी कर्तव्य नाहीये मला.
मुळचा उच्चार जो आपण मानतो तोच खरा असं कशावरुन? शेवटी तो संकेत आहे. आणि तोच असला पाहिजे असा अट्टाहास चुकीचा ठरतो. काळाच्या ओघात प्रमाण उच्चार बदलत जातो.
अर्थातच. पण तो शब्द ज्या भाषेतला आहे तेथील रूढ संकेत मी सांगितला तर चुकले का?
समोरचा माणूस उच्चार वेगळा करतो म्हणून डोक्यात राख घालून कसं चालेल? कदाचित काळाच्या ओघात तोच उच्चार प्रमाण होईल. काय सांगावे? कालाय तस्मै नमः
सकाळी डोक्याला तेल लावतो ते सोडून आजवर अन्य काही घातल्याचे आठवत नाही. कालौघात काय होईल ते होवो. सध्या काय आहे ते मी सांगितले. सांबर हा उत्तरभारतीय संकेत आहे आणि मराठीत एका प्राण्याचे नावही तेच आहे सबब मूळ शब्द सुचवला इतकेच.

In reply to by बॅटमॅन

>> पण तो शब्द ज्या भाषेतला आहे तेथील रूढ संकेत मी सांगितला तर चुकले का? पण मी त्या भाषेत बोलतच नव्हतो. माझ्या भाषेत मी मला हवा तो शब्द वापरला. चुकले का?

In reply to by मारकुटे

मराठीत मी बहुतांना सांबार असाच उच्चार करताना पाहिले आहे तस्मात माझ्यासाठी संकेत तोच आहे.

In reply to by मारकुटे

>>मुंबई बॉम्बे होते. आता तर हद्दच झाली. हे शिंचे पुणेकर मुंबईला बॉम्बे म्हणतात. मुंबई ही मुंबईच आहे. मुं ब ई. समजलं. चला दहा वेळा लिहून काढा.

कारण नसताना पाकृच्या धाग्यावरील शाब्दिक कसरती थांबवाव्यात असे सांगू इच्छिते.

In reply to by कवितानागेश

इडल्या, बुडल्या! बाकी 'सांभार' म्हणे संभाजी महाराजांवरुन पडलेलं नाव आहे. (कधीतरी नजिकच्या भूतकाळात मिपावरच वाचलेल्या लेखातली माहिती असावी)

मस्त झालीय इडली...करुन पहायला हवे आता. एक शंका: अतिशय थंड वातावरणात पिठ कसे आंबवावे? मागच्या विकांताचा बेत फसला :(

In reply to by शिद

भट्टी (गॅस ओव्हन) थोडा वेळ ( ५ मिनेटे ) गरम करुन, नंतर पिठ रात्रभर ठेवावे.

In reply to by शिद

राघवसाहेब म्हणतायत तसं अव्हन अगदी २ मिंटे गरम करून , नंतर बंद करून त्यात पीठ झाकून ठेवले जाते पण माझ्या अव्हनमधील लाईट ढणढण्या असल्याने मी लाईट चालून करून ठेवल्यास सहा तासात पीठ्न फुगते. हा प्रयोग करायचा नसल्यास कांद्याचा शेंडा, बुडखा कापावा, साले काढावीत व पिठात बुडवून ठेवावा. पीठ फर्मेंट झाल्यानंतर काढून घ्यायला विसरू नये. छोटा कांदा नसल्यास (जो आमच्या इथे मला कधी मिळत नै), मोठ्या कांद्याचा तुकडाही चालेल.

In reply to by रेवती

>>>>कांद्याचा शेंडा, बुडखा कापावा, साले काढावीत व पिठात बुडवून ठेवावा. अरे व्वा! हा प्रयोग करून पाहिला पाहिजे.

पाकृ आवडली, फोटोत एवढी चांगली दिसते, तर खायला हि खूप छान असणार! ही इडली पाहून मला एक छान विषय मिळाला.धन्यवाद रेवती ताई. बडबड गीत ही आवडले! Keep it up! आपला मिपास्नेही: आयुर्हीत

अगागागागा! तोंडाला पाणी सुटलं हो फोटो बघून ! श्या! भारी!