भाग १२अंधारछाया प्रकरण ११ - ‘चूळ भरली तर तोंड पोळलं. इतकं तिखट लागलं पाणी मी काय करू बरं? दादांना सांगा, मला पोचवा पुण्याला. तुम्हाला कशाला त्रास माझ्यामुळे उगीच’?

Primary tabs

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
27 Jan 2020 - 2:52 pm

अंधारछाया

अकरा

दादा

शेठचा फोन आला म्हणून ऑफिसमधून गेस्ट हाऊसवर गेलो. परत येता येता आठ वाजले रात्रीचे. मंगलाला म्हणालो, ‘शेठ हरिपाठाच्या अभंगाचे पारायण करणार आहेत. वासुदेवराव जोश्यांना बोलावलय प्रवचन करायला. विठोबाच्या देवळात पुढच्या महिन्यात सुरवात करणार आहेत’.
जेवणं झाली तशी मंगला म्हणाली, ‘आम्ही जाऊन आलो गुरूजींकडे. त्यांना सांगितले हे स्वप्नांचे’. तसे म्हणाले, ‘ही चांगली गोष्ट आहे. आपल्या जपाने बरीच प्रगती झाली आहे असे समजा. कारण ह्या अवस्थेत जी स्वप्ने, जे विचार, बेबीला येत होते, याचे भान तिला आधी नसे. आता तिला तिच्या स्वप्नांची कल्पना आलीय. आता ती स्वप्ने ही कमी होतील तशी तिची बरीच सुटवणूक होईल’.
मला खूपसं हायसं वाटलं. पण म्हणाले, ‘याच्या बरोबर जरा इतर भास होण्याची शक्यता आहे’.
मंगला म्हणाली मी जरा कोदून विचारले, ‘काय काय होते याची कल्पना द्या’. तशी म्हणाले, ‘हे पहा, असे कसे सांगणार मी की अमुकच होईल म्हणून? पण ठोकळमानाने असे म्हणता येईल की तिला घराबाहेर एकटीला सोडू नका. आसपास विहीर बिहीर असेल तर ती तिकडे जाणार नाही याची काळजी घ्या. ती जेवण खाण करते ना याकडे लक्ष ठेवा. पण तिला हे मुळीच भासता कामा नये की तिच्यावर लक्ष ठेवले जात आहे म्हणून’.
मी तिला म्हणालो, ‘उद्याच दार करवून घेऊ, विहिराच्या रहाटाच्या जागी. म्हणजे विहीर अगदीच उघडी राहणार नाही’.
मंगला म्हणाली, ‘बस मधून येताना चढ आला माळबंगल्याचा आणि ही ताठ झाली एकदम! मी तिचा हात हातात घेऊन जप चालू केला. तशी माधवनगरच्या स्टँडपर्यंत शांत झाली. मला जरा चिंताच वाटली बेबीची. आता पुढे आणखी काय होणार म्हणून!
मंगलाने माझ्या पुढे काकांचे इनलँड ठेवले अन बोलली, ‘काकांना आवडलेलं दिसत नाहीये मी पोस्ट कार्ड पाठवलेलं. मला सविस्तर पत्र पाठवायला सांगितलय. विचारतायत बेबी कशी आहे? ताप बीप गेला का? आता टॉनिकस वगेरे घ्यायला सांग. अभ्यासाचे काय करतेय का नीट? ते सगळं सविस्तर कळव’.
‘मी तुला तेंव्हाच सांगत होतो की कार्ड कशाला पाठवतेस? तर बोललीस, पंधरा–वीस दिवसात पत्र पाठवले नाही तर रागावतील ते. पण लिहायची मनस्थिती नव्हती. तेंव्हा खरडल्या चार ओळी’.
‘बरं, असू दे. लिही उद्या–परवा सविस्तर पत्र. म्हणजे त्यांना ही काळजी वाटणार नाही इतकी’.
इतक्यात बेबी उठली. तशी बाथरूमकडे जातेय असे वाटले. स्वंयपाकाच्या घरात बरीच खुडबुड चालू होती. तशी मंगला उठली. पहाते तो, हिने कंदिलाची वात ढणढण पटवलेली! आणि पहातेय त्या आगीकडे.
मी आधी काच खाली येण्याचा खटका दाबला. वात कमी केली. मंगलाने तिला हलवून विचारले, ‘अग बेबी जरा जपून पेटवावा कंदील’.
‘बरं’ म्हणाली, टमरेल भरून घेऊन एका हातात कंदील घेऊन संडासाकडे गेली. परत सगळे बसलो होतो कोचावर मासिकं, पेपर चाळत, वाचत. बराच वेळ झाला. एव्हाना परत यायला हवी बेबी होती, असे वाटून मी मधल्या खोलीच्या दारातून डोकावलो संडासाकडे. तो ही पायरीवर बसलेली, कंदील हातात धरून! मी चपला घातल्या. मंगलाला बोललो, ‘चल मागे’. पोचलो तिच्या पर्यंत. कंदिलाची वात काजळी ओकत होती, ती कमी केली.
‘बेबी इथे का बसलीस? चल घरात’
तशी काही बोले ना. मंगलाने दंडाला घरून उठवलंन तशी ताठरली होती. हलेना तिच्याने. मग मी तिला उचलली आणि आणली घरात.
शरीर सगळे ताठरल्यासारखे झाले होते. आम्ही काय बोललो ते तिला काही कळले नसावे असे डोळे वाटले. पापण्या लवेनात बराच वेळ!
मंगलाने लगेच भस्म लावले आणि सगळे जप करायल लागलो मोठ्याने. शशी–लता ही आले उठून. जप करायला लागले आमच्या बरोबर. साधारण अर्धा तास झाला असेल. जरा नॉर्मल वाटली. तशी हात पाय हलवून अंग ढिले सोडलेन. म्हणाली, ‘मी इथे कशी? मी तर रेल्वेच्या पुलाकडे निघाले होते पालखीतून!
कोणी काहीच बोललो नाही. ‘जप करायला लाग मोठ्याने’ मी म्हणालो. पंधरा–वीस मिनिटात सर्व शांत झाले. सगळे अंथरुणावर पडलोही. पडल्या पडल्या विचार आला, कंदिलाशी चाळे करायला तिला वेळ मिळाला तसे होता कामा नये. आपण आणखी अलर्ट असले पाहिजे. मंगलाला सांगितले, ‘स्टोव्ह, शेगडी, बंबापाशी येऊ देऊ नको तिला’.

मंगला

हिला एकटी ठेवायची नाही असे ठरवले मी, पण ते अवघडच होते कुठं कुठं म्हणून आम्ही लक्ष ठेवणार होतो? आता कालच शशी म्हणाला, ‘बेबी मावशी शनिवार पेठेत दिसली. मी मामाकडून परत येत होतो तेंव्हा. मी आणली तिला हात धरून. रस्त्यात बोलली ही नाही कशासाठी कुठे निघालीय ते’
शशीला सांगितले, ‘हे पहा तू जरा लक्ष ठेव. मावशीला घराच्या बाहेर जाऊ देता कामा नये. शिवाय विहिरीबिहीरी कडे जायला लागली तर लक्ष ठेव’. ‘बर’ म्हणाला, पण त्या बारातेरा वर्षाच्या पोरावर तरी किती विसंबायचे, एकदा वाटले मधूला बोलवावे. तेवढाच आधार वाटतो.
एकशे आठमाळा करते बिचारी रोज. हे ही नसे थोडके. आजी म्हणाल्या मजेने, ‘बाळकृष्णाच्या लीलात जसा बांधून ठेवतात कृष्णाला दोरीने तशी हिच्या ही मनगटाला बांधावी दोरी आणि आपल्या हाताला एक. मग कळेल लगेच कुठे निघाली तर!’. ‘पण आपली नजर चुकवून प्रथम ती दोरी मनगटातून सोडवेल! मग काय उपयोग दोरीचा’? मी म्हणाले.
दुपारची जेवणं झाली. पाटीवर माळांचा सत्याएंशी आकडा पाहिला. मुलं मागे लागली होती, म्हणून चिवडा करायला घेतला. तळता तळता बेबीला हाक मारली, मासला पाहायला. आली माळ ठेवून. वाटी घेतली. झाऱ्याने चिवडा घेतला आणि बसली ओट्या शेजारी. पहिला घास घातलान तोंडात. आणि थू थू करून थुंकलानं! बोलली, ‘कडू कडू लागतय सगळं!’
मी जरा चिवडा तोंडात टाकून पाहिला तिच्या वाटीतला. म्हणाले, ‘अग दाणा लागला असेल एखाद दुसरा कुचका. चिवडा तर ठीक आहे चवीला’.
‘अक्का मला तर कडू कडू लागला. औषधाच्या गोळ्या असतात ना तसा’.
मी जरा चमकलेच. म्हटलं, ‘बर चूळ भर आणि साफ कर सांडलेले’. चूळ भरायला गेली. तो ठसका लागला इतक्या जोरात की बसली मोरीतच मटकन. आम्ही सगळे जमलो तशी रडायला लागली. म्हणाली, ‘चूळ भरली तर तोंड पोळलं. इतकं तिखट लागलं पाणी. मी काय करू बरं? दादांना सांगा, मला पोचवा पुण्याला. तुम्हाला कशाला त्रास माझ्यामुळे उगीच’?
हे बोलले, ‘ते पाहू काय करायचे ते. तू शांत हो. हे लक्षात ठेव की तुला त्रास देणारा आता लवकरच जाणार आहे तुला सोडून. तेंव्हा तू नेटाने जप कर. आणि गुरूजींच्यावर विश्वास ठेव की बरी होशील झटपट’.
कष्टाने उठत बसली मधल्या खोलीत येऊन. माळ घेतलीन करायला. तशी शांत झाल्या सारखी वाटली.

बेबी

सकाळी उठले. अंथरुणा-पांघरुणाच्या घड्या केल्या. गाद्या पलंगावर ठेवल्या. बेडशीट घातले नवीन धुतलेले. राखुंडीने दात घासले. चूळ भरायला पाणी हातात घेतलं तशी कालची आठवण होऊन घेववेना पाणी तोंडात! वाटलं पुन्हा तिखट लागलं तर? काल मी ना जेवले ना पाणी प्याले याच भितीने की कसा लागेल घास’?
राखुंडीची चव तर तशीच वाटली. पहावे तोंडात पाण्याचे थेंब टाकून. विचार आला तशी टाकले दोन चार थेंब तोंडात. नेहमीचीच चव लागली आणि इतकं हायसे वाटले!
पटकन तोंड पुसले. पदर सावरला. साडी खोचली जरा वर करून. कुंचा घेतला केर काढायला. रोज मीच काढे केर घराचा, अंगणाचा ठीक असले तर. बाहेरच्या खोलीतील केर काढता काढता नजर गेली कॅलेंडरवर. नव कोरं कॅलेंडर लागलं होतं. संक्रांत आली पुढच्या आठवड्यात. मनात विचार आला, ‘येऊन आता आपल्याला जवळ जवळ दोन तीन महिने झाले. आता किती राहायचं अक्काकडे? विचाराव का कि मी जाऊ का परत? मग दादांचे बोलणे आठवे, ‘आता जायचे ते बरे होऊनच’. माझ्याशी बोलत मी केर गोळा केला आणि मधल्या खोलीत आले.
कुंचा फिरवता फिरवता केंव्हा थांबले कळलं नाही. आपल्याला कोणी धरलय म्हणजे काय झालं असावं? असा सारखा विचार यायला लागला. वाटलं आपण कोणाच्या आध्यात ना मध्यात! कोणी का बरं पकडाव आपल्याला? मीच का अशी फसले? इतर का नाहीत? माझ्यात काय कमी आहे? आपल्याला नाही कळलं तर कोणाला विचारावं? हां दादांना विचाराव ते सांगतील नक्की.
केर भरून मागे गेले. ती तिथे विहीर दिसली. वाटलं पहाव जरा किती खोल आहे पाणी. वाकून पाहिलं तर आत खूप खोल पाणी दिसलं! वाटले नीट दिसले नाही. म्हणून एक वीट पडली होती ती उचलली आणि टाकली पाण्यात धडा ऽऽऽ म आवाज करून पाणी उसळलं. मी पाहात होते त्या हालणाऱ्या पाण्याकडे! गार गार असेल पाणी. किती खोल गेलं की तळ दिसेल त्याचा? वाटलं एकदा गाठून पहावा तळ!
‘अग्गोबाई ऽऽऽ तू इथे’? असे म्हणत येताना अक्का दिसली. माझ्या दंडांना धरून न्यायला लागली. तशी मी म्हणाले, ‘पाहू दे ना मला विहिरीतले पाणी. किती खोल आहे याचा अंदाज घेत होते’. शशी धावत आला. माझा दुसरा हात धरून ओढायला लागला. तशी मी ही हट्टाला पेटले. ‘हे सगळे माझ्या मागे काय येताय मला काय झालेय? मी ठीक तर आहे’. मी म्हणाले.
‘बाई ग, आधी आत हो! विहिरीपाशी तुझं काय काम आहे’? अक्का तणतणली. हातातला कुंचा शशीने काढून घेतला. तेंव्हा मला जाणवले की माझ्या हाताच्या पकडी किती घट्ट होत्या!
भस्माचा टिळा लावला. ॐ मनः शिवायचा जप चालू केला म्हणायला तशी माझी तंद्री भंग झाल्यासारखी झाली. अक्का आजींना सांगत होती, ‘बरं झालं बाई! तुम्ही म्हणलात विहिरीकडे जा नाहीतर हिने विहिरीत उडी मारायला कमी केलं नसतनं! माझ्या नाही कानांवर आला विहीरीत काही पडल्याचा आवाज!’
‘अच्छा, म्हणजे मी विहीरीवर जाऊन आले की काय? माझ्या मनाला झालेय तरी काय? माझे विचार अन माझ्या वागण्यात असा फरक का’? मी विचार करते मग माझ्यावर नियंत्रण दुसऱ्या कुणाचे आहे?
मला माझ्या विचारावर, वागण्यावर नियंत्रण आणले पाहिजे. मी माझ्या शरीराची असले पाहिजे. माझ्यावर माझी सत्ता हवी. मी कुणाला नाही राहून देणार अशी! एकदम हुरूप आला! वेगळेच वाटले मग. उठले बाहेर बागेत आले. गुलाबाची फुलं तोडून वेणीत खोचली. आसपासच्या झाडावर नजर गेली. नवी पालवी, नवी फुलं, सगळे हसत होते. आनंदात. मजेत. चिमण्या भुरू भुरू उडाल्या आकाशात. इतकं निळं निळं शांत रम्य आकाश. वाटलं कित्येक दिवस झाले आकाश पाहून. जणू पहिल्यांदाच पाहतोय इतके नवीन वाटले आकाश!
बऱ्याच वेळाने मी आत आले ती नव्या उत्साहाने. आपल्याला आता स्वतंत्र व्हायचयं. आपले आपण व्हायचय या निश्चयाने!
मी अक्काला म्हणाले, ‘अक्का मला आज वेगळं वाटतय गं! सगळीकडे पहावं ते नवीन वाटतय गं! आकाशात पक्षी आकाशात हिंडताना, झाडाची पानं, फुलं हालताना. आनंदात आहेत सगळे. असं वाटतय, इतकं जग बदललय गं!’
दादा म्हणाले, ‘जग आहे तसच आहे. तुझी त्याच्याकडे पहायची दृष्टी बदलली आहे!’

डॉ. फडणीस

‘या मिस गोखले, कशी काय तब्बेत आता? ताप बीप पळाला ना’? विचारलं मी.
‘होय डॉक्टर. आता काही तक्रार नाही’. ती म्हणाली. तिचा बीपी, पल्स नॉर्मल वाटले. खाडीलकर नर्स बाईंनी केसशीट आणला. गेल्या दोन महिन्यात म्हणावी तशी इंप्रूव्हमेंट वाटली नाही. तेंव्हा गोळ्या बदलल्या. टॉनिकही बदलले.
‘डॉक्टर मला एक विचारायचय’ मिस गोखले म्हणाली. ‘काय विचारायचय निसंकोचपणे विचार’ मी बोललो.
‘काल परवा पर्यंत मला या गोळया, औषधं घेण्यानं आपल्याला बर वाटेल असा विश्वास नव्हता वाटला. पण आज असं वाटतय की काही औषधं नको, काही नको. मला आनंद वाटतोय. सगळीकडे मजा आहे असे वाटतय! ते का?
मी खरं तर बुचकळ्यात पडलो. तिला नक्की काय म्हणायचय माझ्याकडून काय उत्तराची अपेक्षा आहे हे कळेना. तिला बरं वाटतय ना तिच्या समाधानासाठी बोललो, ‘ही इंप्रूव्हमेंटची स्टेप आहे. तुझ्या मनाने घेतले असेल की मी आता बरी होणार तर, त्याच्यापेक्षा आणखी चांगले औषध ते कुठले’? इतक्यात बाहेरून कोणी सांगत आलं की सीरियस पेशंट आहे सोमवार पेठेत. तसे मी माझे सामान आवरले आणि मोपेडला कीक मारली.

मांडणीअनुभव

प्रतिक्रिया

आंबट गोड's picture

27 Jan 2020 - 3:05 pm | आंबट गोड

या वेळेस बेबीच्या अंगातल्या 'त्या' चं काहीच नाही का स्वगत...?
आपल्याला तर तोच जाम आवडला बुआ...कसला टपोरी आहे!
:-)

सुचिता१'s picture

27 Jan 2020 - 6:27 pm | सुचिता१

दादा, मंगला कीती खस्ता खात आहेत बेबी साठी, आजच्या काळात अशी माणसं दिसत नाहीत.