भाग 7 - लढा पावनखिंडीतला - पुढारीत अप्रकाशित लेख
पन्हाळगडावर चार महिने तळ ठोकूनही अपयशी आणि चार तासात अवघड जागेतील गडावर प्रवेश मिळवणारा दोघेही लष्करी अधिकारी. पण साहस, समयसूचकता, चातुर्य आदि गुणातील तफावत विपरीत परिणाम घडवते...
भाग 7
महाराज विशाळगडाकडे निघाले खरे परंतु तिथे काय परिस्थिती आहे याचा आढावा घेऊन रंगोजी मोरे या विशाळगडावरील गडकऱ्याशी संपर्ककरून त्याला विश्वासात घेऊन गडाचे दरवाजे उघडायसाठी खटपट करायला हवी होती. गडावर सहजासहजी जाण्याला आडकाठी करायला सिद्दीने कोकणातील त्यांच्या बाजूने लढणाऱ्या काही सरदारांच्या सैन्याच्या तुकड्या प्रभानवल्लीच्या रस्त्याने आणून तैनात केल्या असल्याची माहिती महाराजांना होती. पण सैन्यबल किती, कुठे तळ देऊन बसले आहे? त्यांना चकवून गडावर जायची शक्यता नसेल तर कुठे चकमक करायला भाग पाडायचे? वगैरे आडाखे त्यांनी मनात बांधले.
महाराज कासारी नदीचे पात्र जिथे चिंचोळे होते तिथून पैलतीर पार करायला बुट्टीडोलीचा वापर तरंगती नाव असा करून भर पात्रात उतरले. त्यांच्या साहसी कृत्यापासून प्रेरणा घेत अन्य संरक्षकदल पोहत तर काही बुट्टीडोल्यातून सामानासकट गजापुरच्या पैलतीरावर गेले.
गजापुरचे पठार पारकरून महाराजांच्या टेहळणी पथकाने पहाणी केली. गडासमोरील मोक्याच्या जागी तंबू पाहून सिद्दीकडून लढणाऱ्या मराठा सरदार सुर्वे आणि दळवीच्या तळ ठोकून बसलेले सैन्य किमान दोनशे असावे असा कयास बांधला. महाराजांनी प्रसंगावधान राखून मार्ग काढला. सुर्वे-दळवीच्या सैन्याला अंगावर घेऊन विशाळगडाच्या मुख्य दरवाज्यापाशी जायला फार वेळ घालवायला लागेल त्यापेक्षा खाली उतरलेल्या ढगांचा आडोसा, गर्द झाडीतून, दरीत उतरून एकदम विशाळगडाच्या पायथ्यापाशी एकत्र येऊन ह्ल्लाबोल केला तर गडावरील टेहेळण्या करणाऱ्यांना पायथ्याखाली हातघाईची चाहूल लागेल. सुर्वेच्या सैन्याला आपण अचानक गडाच्या पायथ्यापाशी पाहून त्यांची धावपळ उडेल. हत्यारांची तयारीकरून दरीत उतरूनवर चढून यायला वेळ लागेल. अशा बेसावध गोंधळलेल्या सैन्याला वाटेत मारायला सोईचे जाईल. शिवाय कर्णे, शिंगानी पुकारा करून गडाचा दरवाजा पटकन उघडायला शक्यता निर्माण होईल.
गडकरी रंगोजी मोरेचे गडावरील चौक्यावरून गस्त घालणारे विशाळगडावरील तटबंदीवरून दिसणाऱ्या पावसातील विहंगम आसमंतात सगळे शांत आहे खबर देत होते.
महाराजांनी आपल्या संरक्षक तुकडीला सोडून बाकी सैन्याला आदेश दिले की आता खोरनिंको नदीच्या खोऱ्यातील समोरची खाईत उतरायचे. गर्द हिरव्या झाडीतून सर्वांनी खाली उतरून नदी पार करायची. आपल्या कंपनीतील एका स्क्वाडने गडाच्या एका टोकावरच्या (सध्याच्या काळातील हनुमान मंदिराच्या बाजूच्या) दरवाजाला ठोठावून उघडायला प्रयत्न करायचा. उघडला तर ठीक नाहीतर झाडीतून लपत तटाच्या लगत राहून आमच्या येण्याची वाट पहायची. बाकीच्यांनी वेगवेगळ्या वाटांनी तटालगत चढत गडाच्या मुख्य दरवाज्यापाशीच्या भागात लपून राहायचे. नंतर आपण एकदम दरवाज्याकडे पळत सुटायचे. तेंव्हा सुर्वे-दळवीच्या सैन्याला वाटेत अडवून मारकाट करायची.
विशाळगडासमोर सिद्दीच्या सैनिकांचा मोर्चा पाहून महाराजांचे सैनिक खोर्निनको घळीतून खाली उतरून विशाळगडावरील गडकऱ्याला दरवाजा उघडायला लावायचा प्रयत्न करत राहिले. पण पावसाची झोड आणि नेमके कोण मदत मागत आहे याचा संभ्रम वाटून गडकऱ्यांकडून कोणी काही कारवाई केली नाही.
वारुळातून एकदम मुंग्या चवताळून बाहेर पडाव्यात असे महाराजांचे मावळे हर हर महादेव अशी रणगर्जना करत विशाळगडाच्या तटबंदीच्या बाजूने मुख्य दरवाज्याशी जायला भिडले.
इतका वेळ बेसावध असलेले सरदार सुर्वे आणि सरदार दळवी पावसातील झडणाऱ्या पाण्याकडे पहात टिवल्या बावल्या करत होते. ते दरीच्या पलिकडून एकाएकी काय गळाठा आहे ते पाहायला धावले.
दोन समोरासमोरच्या डोंगरमाथ्यामधील दरीची कल्पना यावरून यावी.
सरदार सुर्वेला आपल्याला का इथे तैनात केले आहे याची पक्की जाणीव होती. त्याने सावध होत आपल्या सैनिकांना ओरडून म्हटले, ‘कदाचित शिवाजी सैनिकासह विशाळगडावर लपायला जायची शक्यता आहे. वर चढणाऱ्यांवर बाण फेकून टिपून मारा. मी आणि दळवी आमच्या खास दस्त्यासह खालून वर चढत जाऊन रस्ता आडवतो. कुठल्याही परिस्थिती वरच्या गडकऱ्याने त्यांच्यासाठी दरवाजा उघडता कामा नये’.
नव्या पुलाने जोडलेल्या दरीचे दृष्य – पूल नसताना सुर्वे-दळवीच्या सैनिकांना कसे दरीत उतरून पुन्हावर चढून यावे लागले.
सुर्वे आपल्या सैनिकांसह पोचला तेंव्हा त्याची गाठ नेमकी महाराजांच्या खास पथकाच्या समोर पडली. “अरे हा तर शृंगारपुरचा सूर्याजी सुरवे! त्याच्या बरोबर तो दळवी ... मारा रे या हरामखोरांना”, आपलीच माणसे आपल्याशी लढायला तलवारी घेऊन येतात तेंव्हा दया दाखवून उपयोग नसतो.
महाराजांचे ते भडकलेले रुप पाहून आपले मरण समोर उभे आहे हे ओळखून वेळीच सावध होत सुर्व्याने दळवीला इशारा केला. आणि ते दोघे परत पावली छावणीकडे परतले.
महाराज तातडीने मुख्य दरवाज्याच्या पायऱ्या चढत जात होते. हलकाऱ्यांच्या आरोळ्या व माजलेला गहजब वरून पाहून गडकरी रंगाने मुख्य दरवाज्याचे छोटे दार उघडून कोण आहे याची खात्री करायला आज्ञा केली. दरवाज्याबाहेर खुद्द महाराज आहेत असे कळल्यावर मुख्य दरवाजा पूर्ण उघडला गेला. महाराज आत आले.
‘गडकऱ्यांना बोलवा. सगळ्या तोफांना तयार करा. दारूच्या गोळ्यांचा बंदोबस्त करा. चूड पेटवून आग तयार ठेवा’. महाराजांच्या आज्ञा सुटल्या.
त्या प्रमाणे गडकरी तातडीने कामाला लागले. पावसात भिजत असलेल्या तोफांना कोरड्या कापडाने पुसायला सुरवात झाली. दारूगोळे पडशातून आणून तोफेच्या मोठ्या तोंडाकडून भरून ठासून द्यायला लाकडी ठासण्या आणल्या गेल्या. पावसाची सर थांबली तशी तोफची वात तोफेच्या भोकात घालून दारु भरायला ठासणीने ठोके द्यायला तोफची कामाला लागले.
आधीच भिजलेल्या तोफा, सरदलेले दारूचे गोळे, इरल्याच्या आडोशात बत्ती द्यायला पावसाचे शिंतोडे न पडायची दक्षता घेऊन देखील बत्तीची वात आग पकडत नव्हती. महाराज बेचैन होत ती तयारी पहात होते.
तोफांचे बार व्हायला लागणारी दिरंगाई पाहून महाराजांनी आज्ञा केली, ‘शेण्या पेटवा. गडाच्या टोकाकडे जाऊन तिथे पांढरा धूर करत रहा. निदान इशारा मिळत राहील’.... रंगा मोरेने ताबडतोब शेण्या, तेलाचे बोळे व चकमकीचे दगड देऊन पिटाळले.
गडावरच्या तोफांच्या वातींनी आग पकडलेली पाहून तोफची व आसपासचे मावळे पळून जाऊन कानात बोळे घालून पार लांब जाऊन उभे राहिले. आता केंव्हा ही धडाका होईल. पण काही ना काही कारणाने तोफा धडाडेनात. तेवढ्यात एका तोफेतून घडाम असा प्रचंड आवाज करत विशाळगडाचा आसमंत दणाणला. ती तोफ थंड होई पर्यंत दुसरीच्या वातीने पेट घेतला तिचा आवाज आधीच्या आवाजानंतर जास्त वेळ आसमंतात दुमदुमत राहिला. पुर्ण गजापुरचे खोरे प्रतिध्वनींच्या आवाजाच्या दणक्याने दचकून सैरभैर झाले. तोफां अधून मधून वाजतच राहिल्या. तिकडे आसुसलेल्या कानांवर त्या आदळल्या.
बाजी प्रभू देशपांडेंच्या आत्मसमर्पणाचे काल्पनिक चित्र
उरलेसुरले बाजींचे सैनिक शस्त्रे टाकून खिंडीच्या बाहेर सिद्दीच्या समोर आले. सिवा तिथे नव्हता. तोफांचे आवाज विशाळगडावरून आलेले सिद्दी मसूदने पण ऐकले होते. याचा अर्थ त्याला समजून गेला की सुर्वे- दळवींना लोळवून सिवा गडावर पोचला...
आपल्या घोडदळाला आज्ञा देत तो स्वतः विशाळगडाकडे कूच करून पोहोचला. खाली मान घातलेले दोन्ही सरदार म्हणाले, ‘आम्हा काही माहित नाही की सिवा पन्हाळ्हून पळाला ते. इथे एकदम २-३ शे मावळे समोरच्या दरीतून चढून वर आले आणि एकदम तटाच्या दरवाज्याला भिडले. आम्ही दोघांनी त्यांना कसेबसे पाठलाग करून मारायला शर्थ केली. माझी आणि सिवाची समोरासमोर तलवारीने खटाखटी झाली’. पण मी घाबरून तिथून पळालो हे वगळून तो पुढे म्हणाला, ‘मी सिवाला वर चढून जाताना पाहिले. मघाशी त्यांनी तोफेचे बार काढून आम्हाला घाबरवायचा प्रयत्न केला’.
‘मुर्खांनो, तो तुम्हाला घाबरवायला नव्हे त्या कासारी खिंडीत लपलेल्या त्याच्या सैन्याला आम्ही गडावर पोचल्याची ती खूण होती…’ सिद्दीचे डोके भडकले होते.
‘पण तुमच्या तावडीतून तो सुटला कसा’? सुर्व्याने चकीत होऊन विचारले. ‘ते असू दे’... आपल्या बरोबरच्या सैन्याला विशाळगडाला गराडा घालायला आदेश देऊन तो खालच्या मानेने पन्हाळगडाकडे परतला...
महाराज इंग्रजांची दगाबाजी आणि सुर्वे-दळवीच्या हरामखोरीची आठवण ठेऊन होते. पुढच्या काही महिन्यात राजापूरची इंग्रजांची वखार जाळून राख झाली. हेनरी रेव्हिग्टनचा आगाऊपणा त्यांना भोवला. सुर्वे- दळवींची पळापळ होऊन परागंदा व्हायला लागले... अशी ही पावनखिंडीच्या लढ्याची सांगता... वाटाड्यांच्या मदतीची आणि फसगतीची...
============================================================
सध्याच्या विशाळगडाचे रूप...
वर्गीकरण
अतिशय परिणामकारक
In reply to अतिशय परिणामकारक by श्रीरंग_जोशी
हेच बोलतो
In reply to अतिशय परिणामकारक by श्रीरंग_जोशी
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद...
जबरदस्त लेख माला. ...
In reply to जबरदस्त लेख माला. ... by मुक्त विहारि
हे कशासाठी बोलताय
In reply to जबरदस्त लेख माला. ... by मुक्त विहारि
आभारी आहे...
हा भाग माझ्या व्हॉट्स ॲपवरील मित्रांना पाठवला.
सुंदर लेखमाला.
In reply to सुंदर लेखमाला. by बबन ताम्बे
आपण म्हणता ते बरोबर आहे
हा ही भाग अतिशय उत्कृष्ट आणि
तोफांचा वापर
In reply to तोफांचा वापर by शशिकांत ओक
याविषयी अधिक सविस्तर लिहीतो
सिद्दीचे सैनिक फुद्दू आणि बावळट होते?
In reply to सिद्दीचे सैनिक फुद्दू आणि बावळट होते? by शशिकांत ओक
महाराजांच्या युध्दकौशक्यावर प्रश्नचिन्ह लावतो आहे
समर्पक उत्तर....