✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

चौकटींतील रत्ने

ह
हेमंतकुमार यांनी
Mon, 12/16/2019 - 14:41  ·  लेख
लेख
लेखाचा पूर्वार्ध: रोज आपण एखादे तरी छापील वृत्तपत्र चाळतो. त्यात बातम्या आणि जाहिरातींव्यतिरिक्त काही नियमित सदरे असतात. वृत्तपत्रानुसार सदरांचे स्वरूप वेगवेगळे असते. पण बहुतेकांत समान असणारी एक गोष्ट म्हणजे शब्दकोडे. शब्द्कोड्यांचा सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे काळ्यापांढऱ्या चौकटीयुक्त शोधसूत्रे दिलेले कोडे. त्यात उभ्या आणि आडव्या रांगेत शोधायच्या शब्दांचा सुरेख संगम होतो. ही कोडी नियमित सोडविताना सामान्यज्ञान, भाषा, इतिहास, भूगोल, विज्ञान, संस्कृती आणि समाज अशा अनेक क्षेत्रांत विहार करता येतो. शब्दकोडी सोडवणे हा माझा आवडता छंद असून तो आता माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक झालेला आहे. मात्र हे सहजासहजी घडलेले नाही. त्यासाठी विशिष्ट परिस्थिती कारणीभूत ठरली. त्यामुळे एके काळी ‘डोक्याला पीळ’ वाटणारी आणि न्यूनगंड निर्माण करणारी कोडी आता माझ्यासाठी आनंददायी आहेत. कुठल्याही छापील कागदावर कोडे नजरेस पडले की मी त्याकडे चुंबकाप्रमाणे आकर्षिला जातो. सुमारे २० वर्षांच्या माझ्या या शब्दप्रवासाचे हे अनुभवकथन. महाविद्यालयीन जीवनात छापील वृत्तपत्र बारकाईने वाचत असे. तेव्हा आतल्या पानाच्या एका कोपऱ्यात खालच्या बाजूस शब्दकोडे दिसायचे. पण मुद्दामहून त्याच्या वाटे जावेसे कधी वाटले नाही. रविवारच्या अंकातील भले मोठे कोडे पाहून तर त्याची लांबूनच भीती वाटायची. पुढे संसारात पडल्यावर मन रिझवणाऱ्या अनेक गोष्टी मिळाल्या. त्यामुळे वृत्तपत्र बारकाईने वाचणे कमी झाले. आता वाचण्यापेक्षा चाळणेच अधिक असे. त्यामुळे कोड्याचे पान तर दुर्लक्षित होई. यथावकाश आयुष्याच्या मध्यमवयीन टप्प्यावर आलो. आता पूर्वीपेक्षा फुरसत मिळू लागली. पेपरातील ठराविक बातम्या वर्षानुवर्षे वाचून आता त्यातले नाविन्य संपले होते. म्हणून आता त्यातील सदरांकडे अधिक लक्ष जाऊ लागले. तरीसुद्धा कोड्याच्या भागावर फक्त नजर टाकत असे. फारतर त्यातले दोनचार शब्द तोंडीच जमतात का ते बघे. मग जरा अवघड वाटले की तो नाद सोडी. मग एकदा मनाचा हिय्या करून हातात पेन घेतले. म्हटलं, बघू तरी प्रयत्न करून. सुरवात अर्थातच मराठी वृत्तपत्रातील कोडयापासून केली. त्यातल्या शोधसूत्रांवर नजर टाकता असे दिसले, की शब्दांचा आवाका खूप मोठा आहे. भाषा व सामान्यज्ञानापासून ते क्रीडा व चित्रपटांपर्यंत अनेक विषय त्यात अंतर्भूत आहेत. प्रथम चित्रपटासंबंधीचे शब्द सोडवायला घेतले. त्यातले काही जमले. मग पुढची पायरी होती खेळ व खेळाडूंबद्दलचे शब्द. एकंदरीत त्यावर क्रिकेटचा वरचष्मा असतो. त्यामुळे ते शब्द तसे लवकर जमले. मात्र या व्यतिरिक्तच्या विषयांशी संबंधित शब्द सोडवणे हे आव्हान होते. ते पेलत नसे आणि मग मी कोडे सोडून देई. तीसेक शब्दांपैकी ५-६ सुटले तरी विरंगुळा होई. संपूर्ण कोडे सोडवणे हे काही येरा गबाळ्याचे काम नाही, एवढा बोध एव्हाना झाला होता. अधूनमधून इंग्रजी पेपर चाळत असे. मात्र त्यातल्या इंग्रजी क्रॉसवर्डकडे कधी ढुंकूनही पाहिले नाही. “हे आपल्यासाठी नसतेच, ते फक्त फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्या मंडळींसाठी असते”, असा पूर्वग्रह मनात होता. आता मराठी कोड्यात रोज डोकावू लागलो. अजून एक पाऊल पुढे टाकले. कोडे एकट्याने सोडवण्यापेक्षा थोडी कुटुंबाची मदत घेऊ लागलो. एखाद्या शोधसूत्राचे उत्तर अगदी तोंडावर येतंय असे वाटूनसुद्धा योग्य शब्द काही जमत नसे. पण काही शब्द आमच्या एकत्रित प्रयत्नातून सुटल्यावर झालेला आनंद काय वर्णावा? या दरम्यान आयुष्यात एक महत्वाची घडामोड झाली. ध्यानीमनी नसताना एके दिवशी परदेशगमनाची संधी दार ठोठावत आली. कौटुंबिक कारणास्तव मला तिकडे एकटेच जावे लागणार होते आणि तशीच काही वर्षे एकट्याने काढायची होती. प्रथम जाताना थोडी वाचायची पुस्तके बरोबर नेली. तिकडे पोचल्यावर सुरवातीस नवे संगणकीय आणि इतर आधुनिक तंत्रज्ञान शिकत असल्याने कार्यमग्न राहिलो. मात्र ६ महिन्यांनतर एकटेपणा जाणवू लागला. रोजची संध्याकाळ आणि साप्ताहिक सुटीचे २ दिवस अगदी भकास वाटू लागले. साहित्य वाचण्यात काही वेळ जाई. टीव्ही पाहायची विशेष आवड नव्हती आणि तेव्हा व्यक्तिगत जालसुविधाही नव्हती. नुसत्या वाचन-लेखनावर फावला वेळ काढायला एक मर्यादा असते. त्यामुळे आता एखादा छंद शोधणे भाग होते. तिथल्या ६ महिन्यांच्या वास्तव्यानंतर १५ दिवस सुटी मिळाली आणि भारतात आलो. एका दुपारी शांत बसलो असता खोलीतील पेपरांच्या रद्दीने माझे लक्ष वेधले. आता एक विचार सुचला. रोजच्या पेपरातील एक अशी २५-३० मराठी कोडी कापून बरोबर नेली तर? वाचनाला थोडा आधार आणि बुद्धीला चालना असे दोन्ही हेतू त्यात साध्य होणार होते. मग धडाधड ती कोडी कापून घेतली आणि ती ‘शिदोरी’ प्रवासाच्या बॅगेत ठेवली. आता हा कोड्यांचा गठ्ठा घेऊन पुन्हा तिकडे परतलो. मग रोज संध्याकाळी एक छोटे आणि सुटीच्या दिवशी भलेमोठे कोडे सोडवायचे ठरवले. निव्वळ वाचनापेक्षा आता वेगळा अनुभव येऊ लागला. शब्द शोधताना मनाची एकाग्रता होते. अवघड शब्द शोधताना तर मेंदू अगदी तल्लख होतो. जेव्हा असा एखादा शब्द खूप प्रयत्नांती जमतो तेव्हा तर शरीरात आनंदजनकांची निर्मिती होते. अजून एक गंमत सांगतो. एखादा शब्द जाम सापडत नसला की तेव्हा आपण त्याचा नाद सोडतो. पण, त्या दिवसभर तो सापडेपर्यंत ते शोधसूत्र आपल्या डोक्यात असते. मग अगदी एकदम एखाद्या क्षणी डोक्यात वीज चमकावी तसे आपल्याला ते उत्तर मिळते. अशा प्रकारे कोडे सुटण्याची ठिकाणे बऱ्याचदा स्वच्छतागृह, रस्ता किंवा व्यायामशाळा असतात, हा स्वानुभव आहे. आपण जेव्हा या ठिकाणी असतो तेव्हा आपला मेंदू एक प्रकारे विश्रांतीच्या अवस्थेत असतो आणि त्यामुळे असे घडत असावे असा माझा अंदाज आहे. तेच जर आपण कोड्याचा कागद जवळ घेऊन खूप वेळ उत्तर शोधत बसलेलो असू, तर मेंदूच्या थकव्यामुळे उत्तर काही येत नाही. कधीकधी तर ही शोधप्रक्रिया स्वप्नात देखील चालू राहते आणि त्यात ‘युरेका’ चा क्षणही येतो. पण जागे झाल्यावर मात्र त्याबद्दल काहीही आठवत नाही ! जसा मी या शब्दखेळात मुरु लागलो तशी कोड्यांची काही वैशिष्ट्ये लक्षात आली. त्यातले काही अवघड शब्द सामान्य शहरी जीवनात प्रचलित नसतात. ते केवळ कोडे अवघड करण्यासाठी योजलेले असतात. ठराविक दिवसांनंतर ते कोड्यात पुन्हा येत राहतात. अशा तऱ्हेने ते आपल्या ओळखीचे होतात. उदाहरणार्थ, हे काही शब्द पहा: १. कापा, बरका आणि सकल्या या फणसाच्या जाती २. माळवद व दारवंट हे घराशी संबंधित शब्द ३. वापी आणि बारव हे विहिरीचे प्रकार ४. बुरणूस, बुरखुड आणि बेंबारा हे विचित्र शब्द ! जर मी कोडी सोडविली नसती, तर हे आयुष्यात कधी ऐकलेही नसते. अन्य काही शब्द प्राचीन किंवा ऐतिहासिक असतात. सध्याच्या व्यवहारभाषेसाठी त्यांचा काही उपयोग नसतो. पण एकदा का आपण कोड्यांच्या राज्यात विहार करू लागलो, की ते आपले मित्र होतात. अशा प्रकारे कोडी सोडवायचा माझा परिपाठ चालू होता. २-३ महिन्यांत त्याला गती आली. मग भारतातल्या घरी कळवून टाकले की रोजच्या पेपरातले कोडे कापून ठेवा. पुढे जेव्हा माझी सहामाही चक्कर होई, तेव्हा तो साठलेला गठ्ठा घेऊन येई. साधारण वर्षभर ही कोडी सोडवल्यावर आत्मविश्वास आला. तरीसुद्धा प्रत्येक कोडे १००% सुटले असे नसायचे. विशेषतः कोड्यातले पौराणिक, कालबाह्य, संस्कृत वा अरबी/फारसी मूळ असलेले शब्द येत नसत. तिथे सरळ शरणागती पत्करून त्याचे उत्तर पुढच्या अंकात पाहायला लागे. भाषाज्ञान हे अफाट आहे आणि आपले आयुष्य मात्र मर्यादित. त्यामुळे आजही वीसेक वर्षे कोडी सोडविल्यानंतरही मी एखादे कोडे (विशेषतः रविवारच्या अंकातले) पूर्ण सोडवेनच, असे छातीठोक सांगत नाही. नुकताच घडलेला हा किस्सा. प्रवासासाठी म्हणून बॅगेत एक कापून ठेवलेले मोठे कोडे होते. ते ९९% सुटले. फक्त एक शब्द अडला. शोधसूत्र होते “मोठी पळी”. चार अक्षरी शब्द. त्यातल्या १,२ व ४ क्रमांकाची अक्षरेही जमली. पण तिसरे काही सुचेना. म्हणजेच शब्द असा होता: “कब *र”. मी होतो ८ तासांच्या प्रवासात. आजूबाजूच्या एकदोघांना विचारून पाहिले. पण उपयोग नाही. शेवटी माझ्या एका मित्रांना मोबाईलमधून संदेश पाठवला. त्यांनी थेट शब्दकोशात पाहून उत्तर कळवले. ते होते “कबगीर”. या शब्दाचे मूळ अरबी आहे. मग या कोडेनिर्मात्याला मनातल्या मनात दूषणे दिली, “कुठले कालबाह्य शब्द घालतात लेकाचे”. माझा तो प्रवास संपला. आता गम्मत पुढेच आहे. आमच्या एका परिचितांकडे एक उर्दूभाषिक बाई घरकामाला येतात. त्यांना सहज विचारले, की तुम्ही ‘कबगीर’ ऐकले आहे का. त्या ताडकन उत्तरल्या, “हो, माहित हाये की ! अवो, तो खोलगट झारा असतो ना त्यालाच आम्ही कबगीर म्हणतो. सातवीपर्यंत शालेय शिक्षण झालेल्या या बाईंचे ते सामान्यज्ञान पाहून मी अवाक झालो आणि त्यांना मनोमन वंदन केले ! शब्द्कोड्यांचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात: १. शोधसूत्रानुसार त्याचा सरळ अर्थ घ्यायचा किंवा त्याचा समानार्थी/भावार्थी शब्द शोधायचा. २. गूढ कोडी : यात शोधसूत्राच्या ‘अर्थाला’ फारसे महत्व नसते; पण त्यातील शा‍ब्दिक करामतीकडे विशेष लक्ष द्यायचे असते. हे सूत्र बरेचदा एकशब्दी नसून ते शब्दसमूह किंवा वाक्य असते. साधारणपणे मराठी नियतकालिकांतील कोडी ही पहिल्या प्रकारची असतात. वरील दुसरा प्रकार इंग्रजी कोड्यांत नियमित वापरला जातो. किंबहुना प्रतिष्ठित इंग्रजी दैनिकांत रोज दोन्ही प्रकारची कोडी देतात. त्यांची शीर्षके ‘easy’ आणि ‘cryptic’ अशी असतात. साधारण २००५च्या सुमारास माझा आंतरजालावरचा विहार हळूहळू वाढू लागला होता. काम करता करता मध्येच विरंगुळा म्हणून काही मराठीतले वाचायला मिळते का, याचा शोध घेऊ लागलो. माझ्या कार्यालयात तेव्हा कोणी मराठी भाषिक नसल्याने मी मराठी बोलण्यावाचण्यासाठी अगदी तडफडत होतो. असेच एके दिवशी अचानक जालावर ‘मायबोली’ संस्थळाचा शोध लागला. तिथे छान रमू लागलो. पुढे २००७मध्ये असाच अचानक ‘मनोगत’ संस्थळाचा शोध लागला. तिथल्या एका वैशिष्ट्यपूर्ण सदराने तर एकदम अलिबाबाचा खजिनाच सापडला ! ते सदर होते ‘गूढ शब्दकोडी’. मराठीतील अशी कोडी मी प्रथमच पाहिली. याहून एक अद्भूत गोष्ट म्हणजे ती चक्क जालावरच टिचकी मारून सोडवायची होती. हे अजब होते. अगदी हरखून गेलो. या कोड्यातली शब्द्सूत्रे विविध प्रकारची असतात. गमतीदार, गूढ, विचित्र आणि अजिबात अर्थबोध न होणारी, असे अनेक प्रकार त्यात असतात. एक उदाहरण देतो: शोधसूत्र असे आहे: ‘तेजातून अंगावरच्या माराच्या खुणा’ ! आहे की नाही विचित्र? याचे उत्तर असते “प्रभावळ”. असेच असंख्य नमुने त्यात असतात. अशा पहिल्याच कोड्यावर नजर टाकता मला जाणवले, की आपल्याला काही हा प्रकार जालावरच १०-१५ मिनिटांत सोडवायला जमणार नाही. हे म्हणजे डोक्याला जबरी भुंगा लावणारे आहे. मग एक युक्ती केली. साप्ताहिक सुटीच्या आदल्या दिवशी ते कोडे सरळ कागदावर छापून घेतले. मग सुटीच्या दिवशी ते शांतपणे घरी बसून सोडवू लागलो. सुरवातीस डोके पूर्ण बधीर होऊन जाई. सुमारे ६ महिने ही उमेदवारी केल्यावर ती कोडी उमगू लागली. सुमारे १० वर्षे नियमित कोडी सोडवल्यानंतर आत्मविश्वास आला. मग त्यांची आवड निर्माण झाली आणि आता तर त्यांचे व्यसनच लागले आहे. काही दैनिकांत कोडी खूप विचारपूर्वक तयार केली जातात. निव्वळ एक शब्द शोधण्यापलीकडे त्यांची व्याप्ती असते. एखादी लांब म्हण अथवा वाक्प्रचार देखील ओळखायला दिला जातो. अन्य काही दैनिकांची गंमत सांगतो. ती साधारण ‘बस अथवा रेल्वे स्थानकावर खपणारी’ या प्रकारातील असतात. त्याच्या आतल्या पानात तर रोज महाशब्दकोडे असते. त्यातले जवळपास ८०% शब्द हे चित्रपट आणि क्रिकेटशी संबंधित असतात. ही दैनिके “कोड्यांसाठी खपणारे पेपर” म्हणून प्रसिद्ध असतात. माझ्यावर रेल्वे स्थानकावर उशीर झालेल्या गाडीची वाट पाहण्याचा प्रसंग बऱ्यापैकी येतो. त्या वेळात मी कधीकधी एखाद्या तथाकथित प्रतिष्ठित दैनिकाऐवजी असा ‘कोडेवाला पेपर’ घेणे पसंत करतो. उगाचच बातम्यांचा गदारोळ चघळत बसण्याऐवजी अशी मोठी मनोरंजक कोडी इकडेतिकडे बघत सोडविण्यात वेगळीच गम्मत असते ! जेव्हा स्थानकावर येणारी एखादी गाडी चढत्या क्रमाने वेळेचा उशीर करू लागते तेव्हा आपली जाम चिडचिड होत असते. त्यावर उतारा म्हणून ही कोडी अगदीच उपयुक्त आहेत. मराठी कोड्यांच्या अशा (शब्दशः) तपश्चर्येनंतर माझा शब्दसंग्रह चांगलाच वाढला. चौकटींमधून शिकलेले नवे शब्द ही माझ्यासाठी भाषिक साठ्यातील मौल्यवान रत्ने आहेत. कोडी सोडविण्याच्या प्रक्रियेतून मेंदूला एक वेगळे प्रशिक्षण मिळाले. विचारक्षमता रुंदावली तसेच माझ्या लेखनासाठीही चांगलाच फायदा झाला. पण म्हणून निव्वळ तृप्तीचा ढेकर देऊन चालणार नव्हते. आता मला दुसरे काही खुणावू लागले होते. अनेक वर्षे मी इंग्रजी कोडी निव्वळ लांबूनच बघत असे. आता त्यांना हात घालावा असा मनाने कौल दिला. आयुष्यभर फक्त नियमित टेकडी चढण्याऐवजी आता एखादा गड चढण्यास सुरवात केली पाहिजे अशी जाणीव झाली. इंग्रजी शब्द्कोड्यांची व्याप्ती मराठीच्या तुलनेत अधिक आहे. नेहमीच्या चौकटीयुक्त कोड्यांव्यतिरिक्त असणारे अन्य काही प्रकार तर स्तिमित करणारे आहेत. तेव्हा दमादमाने मी तो एकेक प्रकार हाताळायचा संकल्प केला. गेली १० वर्षे त्यांतही मुरलो आहे. ती सोडविण्याचा प्रवास हा अशक्य, अवघड, प्रयत्नांती जमणारे आणि काही प्रमाणात सोपे अशा खडतर टप्प्यांतून झालेला आहे. तो करीत असताना सुरवातीस ठेचकाळलो, मग पायावर नीट उभा राहिलो आणि अखेर चालण्याची गती वाढत गेली. त्याचा वृत्तांत पुढील भागात सादर करेन. ************************************************************************************ क्रमशः
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
भाषा
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
56254 वाचन

💬 प्रतिसाद (74)

प्रतिक्रिया

मस्तच ..

मुक्त विहारि
Mon, 12/16/2019 - 15:37 नवीन
सुडोकू पण उत्तम आहे. सध्या तरी सुडोकूच सोडवत बसतो. www.websudoku.com ही उत्तम साईट आहे. ... केवळ शब्दकोडी सोडवायला म्हणून, दर शनिवारी "महानगर" घेत होतो.
  • Log in or register to post comments

अरे वा! .......

सुधीर कांदळकर
Mon, 12/16/2019 - 16:37 नवीन
मी पण एसटीत वा आगगाडीत बसतांना कोड्यांसाठी वर्तमानपत्रे घेतो. बातम्या पाचदहा मिनिटात वाचून होतात. पण एक कोडे तासभर पुरते. एक मात्र नक्की. शब्दकोडी नित्यनेमाने सोडवल्यामुळे मेंदूचे 'शब्द सर्च इंजिन' मस्त कार्यक्षम राहते अणि इतर सर्व कामात त्याचा उपयोग होतो. बहुतेक मराठी वृत्तपत्रातील कोड्यांमधले शब्द बहुधा एकाच डाटाबेसमधून घेतलेले असतात आणि तेच तेच शब्द पुन्हा पुन्हा येतात. कधीकधी लबाडी पण असते. तरी रटाळ बातम्यांपेक्षा कोडे नक्कीच मनोरंजक असते. एक शब्दकोडेकार महाशय तर दर कोड्याच्या बाजूला स्वत:चा फोटो पण छापून आणतात. पुढील भागाची वाट पाहतो आहे.
गेली १० वर्षे त्यांतही मुरलो आहे.
चविष्ट मुरांबा कसा आहे याची उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments

आता मी कोडे टाकतो ....

चौकटराजा
Mon, 12/16/2019 - 17:17 नवीन
१) मुम्बईच्या विभागाचा मोठेपणा --- २) कधीतरीच वापरायचे फिरकी गोलंदाजाचे अस्त्र
  • Log in or register to post comments

दुरुस्ती

चौकटराजा
Mon, 12/16/2019 - 17:18 नवीन
वरील एक मध्ये उलट्या विभागाचा असे वाचावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

...

हेमंतकुमार
Mon, 12/16/2019 - 18:20 नवीन
वरील सर्वांना धन्यवाद. मु वि, उपयुक्त माहिती. पण मी अंककोड्याच्या अजिबात नादी लागलेलो नाही. एकदोनदा प्रयत्न केलाय पण मला आपले शब्दांचेच राज्य बरे वाटते. सुधीर, अनुभवाशी सहमत. मेंदूचे इंजिन मस्त पळते खरे. चौरा, तुमच्या क्र. १ चे उत्तर ‘महानगर’.
  • Log in or register to post comments

नाही

चौकटराजा
Mon, 12/16/2019 - 18:38 नवीन
तो शब्द आहे माहिम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

दुसरे उत्तर

चौकटराजा
Wed, 12/18/2019 - 13:02 नवीन
माझ्या दुसर्या प्रश्नाचे उत्तर आहे " आर्मर"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

अच्छा !

हेमंतकुमार
Wed, 12/18/2019 - 13:19 नवीन
मी बराच वेळ 'गुगली' चा विचार करत होतो. कोडे ओव्हर द आर्म गेले !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

सुडोकू किंवा शब्द कोडे. ...

मुक्त विहारि
Mon, 12/16/2019 - 23:05 नवीन
ह्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, अल्झायमर व्हायची शक्यता कमी होते. ..ही गोष्ट खरी आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

अल्झायमर आणि कोडी..

हेमंतकुमार
Tue, 12/17/2019 - 08:39 नवीन
अल्झायमर व्हायची शक्यता कमी होते. ..ही गोष्ट खरी आहे का? व्हायची शक्यता कमी होते. ..ही गोष्ट खरी आहे का?
>>> मु वि, तुमचा प्रश्न चांगला आहे. पण त्याचे उत्तर जरा चाचपडतच ‘हो’ असे द्यावे लागेल. यावर अजून बऱ्याच संशोधनाची गरज आहे. तूर्त असे म्हणता येईल: १. काही तज्ञांचे मते विविध कोडी नियमित सोडविण्याने या आजाराचा धोका कमी होऊ शकतो. २. अशी कोडी ही व्यक्तीनुसार ‘झेपेल’ इतक्याच कठीणतेची असावीत. ३. फक्त एकट्याने कोड्यात डोके घालून बसण्यापेक्षा दोघातिघांत मिळून काही बौद्धिक खेळ खेळल्यास अधिक फायदा होतो. ४. यासंबंधी अजून बरेच प्रयोग आणि त्यांचे प्रमाणीकरण होणे आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments

माझ्या घरातील उदहरण

चौकटराजा
Tue, 12/17/2019 - 09:46 नवीन
माझ्या आईला शब्द कोडी सोडवायचा नाद अगदी ७५ वयापर्यन्त होता तरीही तिला त्या नन्तर अल्झायमर हा आजार झाला . तो अलझायमर फारसा गम्भीर नव्हता हे खरे पण अल्झायमरच होता . ती ८५ वर्शे पूर्ण करून गेली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

मेंदू आधारित रोग असल्याने. ...

मुक्त विहारि
Tue, 12/17/2019 - 19:36 नवीन
कितीही संशोधन केले तरी कमीच पडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

+1

जालिम लोशन
Tue, 12/17/2019 - 21:26 नवीन
सुरेख
  • Log in or register to post comments

पावसाळ्यात मुंबई होते तुंबई.

कंजूस
Wed, 12/18/2019 - 05:30 नवीन
पावसाळ्यात मुंबई होते तुंबई. महानगर वाराणसीला म्हणण्याची चाल आहे. मुंबई नगरी बडी बांका। मग दिल्ली? असो. इंग्रजी कोड्याचं उत्तर समोर ठेवून प्रश्न पाहिला तरी याचं उत्तर हे का हे कळत नाही इतकं (क्रिप्टीक )गूढ असतं. चौकटराजांची आइडिआ सुरू करायला हवी. प्रथम सर्वांनी आपापले प्रश्न आणि उत्तर कुणा एकाकडे संदेशाने पाठवायचे, त्याने प्रश्न एका धाग्यात मिपाकोडे १/२/३प्रसिद्ध करून आठवड्याने उत्तर प्रसिद्ध करायची.
  • Log in or register to post comments

+१

हेमंतकुमार
Wed, 12/18/2019 - 07:57 नवीन
जा लो, धन्यवाद कंजूस, छान उदाहरणे व सूचना .
  • Log in or register to post comments

@ कुमार१,

अनिंद्य
Wed, 12/18/2019 - 10:56 नवीन
@ कुमार१, 'चौकटीतील रत्ने' समर्पक शीर्षक आहे लेखाला. असे छंद भाषा समृद्ध करतात. शब्दसंग्रह तोकडा असल्यामुळे एकट्याला शब्दकोडे क्वचितच सोडवता येते, पण 'एन्जॉय द प्रोसेस' म्हणतात तसे आहे. घरी येणाऱ्या तीनही वृत्तपत्रांमधली मराठी आणि इंग्रजी शब्दकोडी पिताश्री काही मिनिटातच सोडवतात, हेवा वाटतो. इंग्रजी शब्दकोडी लीलया सोडवणाऱ्या माझ्या धाकट्या काकांचेही असेच कौतुक वाटत राहते, स्वतःला कधी जमत नाही :-) पुभाप्र
  • Log in or register to post comments

खूप छान लेख

श्वेता२४
Wed, 12/18/2019 - 13:25 नवीन
माझ्या बहिणीमुळे मलाही मराठी शब्दकोडे सोडवायची सवय लागली. त्याचा फायदा म्हणजे शब्दसंग्रह वाढून भाषेवर एकप्रकारची हुकुमत आली. त्याचा फायदा पुढे वक्तृत्व स्पर्धांमध्ये झाला. आम्ही बहिणी नेटाने पूर्ण शब्द कोडे सोडवितच असू. माझी सवय पुढे अभ्याासत सुटली पण बहिण अजुनही सोडवते. मध्यंतरी एका ऑफीसमधल्या सरांना कोणी कायप्पावर शब्दकोडे टाकले होते. पण एक दोन अक्षरी शब्द अडला होता- पान थुंकायचे तबक/भांडे असा. मला शब्द माहित असूनही नेमका आठवेना पण खात्री होती बहिणीला माहित असेल. तीला लगेच कायप्पावर संदेश पाठविला व अपेक्षेप्रमाणे तीने तात्काळ प्रतिसादर पाठविला- तस्त. खूप वाईट वाटले मला त्यावेळी या आनंदापासून मी आता दू गेले आहे. तुमच्या लेखामुळे माझे मस्त स्मरणरंजन झाले. धन्यवाद. पु.भा.प्र.
  • Log in or register to post comments

+१

हेमंतकुमार
Wed, 12/18/2019 - 13:59 नवीन
श्वेता, धन्यवाद
पान थुंकायचे तबक/भांडे = तस्त.
>>> अगदी ! हा शब्द खूप वेळा येतो कोड्यात. हे तस्त मी फक्त चित्रपटातच पाहिले आहे.
  • Log in or register to post comments

मी बर्‍याच काळापूर्वी "तस्त"

शेखरमोघे
Fri, 05/08/2020 - 20:08 नवीन
मी बर्‍याच काळापूर्वी "तस्त" बर्‍याच वेळा पाहिलेले आहे. एखाद्या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे किन्वा काही गायक, वादक, वक्ते पान खाणारे आहेत हे जर माहित असेल तर त्यान्च्या करता लावलेल्या "बैठकी" करता चकचकीत पितळेचा पानाचा "सज्ज" डबा, अडकित्ता आणि तस्त या जरूरीच्या गोष्टी असत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

लेखणीविहीन उकल

गामा पैलवान
Wed, 12/18/2019 - 18:54 नवीन
कुमारेक, एका वयात मलाही मराठी शब्दकोडी सोडवायचा छंद लागला होता. तो आता सुडोकूत रुपांतरीत झाला आहे. :-) एक गंमत करता येते ती म्हणजे लेखणी न वापरता कोडे सोडवणे. कोड्यातल्या चौकटी रिकाम्याच ठेवायच्या. फक्त मनातल्या मनात अक्षरांची नोंद करायची. तुम्हाला कदाचित पुढचा टप्पा म्हणून प्रयत्न करून पाहता येतील. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

मी पण मनातल्या मनात. ..

मुक्त विहारि
Wed, 12/18/2019 - 18:59 नवीन
सुडोकू सोडवायचा प्रयत्न केला. .. पण माझ्या मेंदूला ते प्रकरण झेपले नाही... आमची मजल जास्तीत जास्त, medium level पर्यंतच. . www.websudoku.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

मान्य

नगरी
Tue, 01/18/2022 - 16:29 नवीन
मान्य, पूर्णपणे मान्य कारण आमच्या कडे टोटल 4 डोकी कोड्याच्या मागे पडलेली असतात आणि प्रत्येकात चढाओढ असते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

हा हा !

हेमंतकुमार
Wed, 12/18/2019 - 19:27 नवीन
गा पै व मु वि +१. ............ मितवा : हिंदीतला आणि मराठीतला ! आज ‘मितवा’ हा मराठी चित्रपट पाहिला आणि या शब्दाची मजा त्यात ऐकून मग जालावर वाचली. मितवा चा हिंदी भाषेतला अर्थ आहे : अगदी जवळचा, आपला माणूस. मराठीत या शब्दाचा एक वेगळाच अर्थ शोधण्यात आलाय: मित्र, तत्त्वज्ञ व वाटाड्या या ३ शब्दांतील पहिले अक्षर घेऊन मितवा हा संयोग शब्द तयार केलाय ! म्हणजे इंग्रजीत आपण म्हणतो ना फ्रेंड, फिलॉसॉफर व गाईड. त्याचेच हे रुपांतर .
  • Log in or register to post comments

मितवा...

मुक्त विहारि
Wed, 12/18/2019 - 20:07 नवीन
हा शब्द आवडला. .. मिपा मध्ये असे खूपच "मितवा" मिळाले. पण आमची बायको ही सगळ्यात मोठी "मितवा"....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

वा !

हेमंतकुमार
Wed, 12/18/2019 - 20:19 नवीन
मु वि, आणि आमची पण हो तुमच्याप्रमाणेच !
  • Log in or register to post comments

अफलातून

जॉनविक्क
गुरुवार, 12/19/2019 - 00:53 नवीन
आपण सर्वात पहिली गोष्ट कोणती शिकत असू तर ते म्हणजे शब्द म्हणूनच मेंदूमधे याचे मॅपिंग भरपूर झालेले असते व जेंव्हा आपण कोंडी सोडवतो तेंव्हा या मॅपिंगला चालना व विकास मिळत असल्याने मेंदू तरतरीत होत असावा, प्रयत्न करतो आजपासून :) धन्यवाद.
  • Log in or register to post comments

मस्त विषय

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 12/19/2019 - 08:52 नवीन
शब्द कोडे सोडवायला मजा येते पण एखाद्या शब्दावर अडायला झाले डोक्यात जो भुंगा सुरु होतो तो थांबवणे अशक्य होउन जाते. काही दिवसांपूर्वी अडलेले एक कोडे :- राजाचा खाजगी कारकून, कारभारी लेखक (३ अक्षरी शब्द) सगळे कोडे सोडवून झाले तरी हा एक शब्द काही केल्या सापडत नव्हता. जेव्हा उत्तर समजले तेव्हा अगदी "ह्या" वाटले. अजून एक :- कजाग, नाठाळ, भांडखोर स्त्री (४ अक्षरी शब्द) या वरही बराच काळ असाच अडलो होतो. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

ज्ञा.पै.

श्वेता२४
गुरुवार, 12/19/2019 - 10:52 नवीन
राजाचा खाजगी कारकून, कारभारी लेखक (३ अक्षरी शब्द) - डबिर, दफ्तरी कजाग, नाठाळ, भांडखोर स्त्री (४ अक्षरी शब्द) - कैकाडिण्,कैदाशिण्,महामाया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

ब्रोबर

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 12/19/2019 - 11:19 नवीन
डबीर आणि कैदाशिण हे शब्द त्या कोड्यात अपेक्षीत होते. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४

:D

श्वेता२४
गुरुवार, 12/19/2019 - 11:22 नवीन
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

गंमत....

हेमंतकुमार
गुरुवार, 12/19/2019 - 12:05 नवीन
काही महिने माझ्या कोड्यांत ३ शोधसूत्रांनी अगदी धुमाकूळ घातला होता. या तिघांचे उत्तर एकच आहे. सूत्रे अशी: १. लसणाची पाकळी २. लिंबाची फोड ३. दह्याची कवडी. यांचे उत्तर असलेला शब्द मी कधीच ऐकला नव्हता. कोड्यांमुळेच कळला. बघताय प्रयत्न करून ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४

कुडी?

श्वेता२४
गुरुवार, 12/19/2019 - 12:57 नवीन
कुडी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

बिलकूल

हेमंतकुमार
गुरुवार, 12/19/2019 - 13:06 नवीन
नाही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४

कुमार सर

श्वेता२४
गुरुवार, 12/19/2019 - 21:09 नवीन
मग मला तरी याचे उत्तर येत नाही .उत्तर सांगून टाका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

कापटी? -गा.पै.

गामा पैलवान
गुरुवार, 12/19/2019 - 14:24 नवीन
‌
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

नाय वो !

हेमंतकुमार
गुरुवार, 12/19/2019 - 14:30 नवीन
कापटी म्हणजे (नुसता) तुकडा .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

हे घ्या उत्तर !

हेमंतकुमार
गुरुवार, 12/19/2019 - 21:10 नवीन
बोई
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

या शब्दाचा अर्थ काय

श्वेता२४
गुरुवार, 12/19/2019 - 22:05 नवीन
आणि कुठे कुठे वापरता येतो. प्रथमच कळतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

+१

हेमंतकुमार
Fri, 12/20/2019 - 08:00 नवीन
श्वेता, ‘बोई’ चे तीनही अर्थ शब्दरत्नाकरमध्ये आहेत. व्युत्पत्ती माहित नाही. सहज आठवले. इंग्लीशच्या ‘set’ चे तब्बल १५६ अर्थ आहेत ! त्यापुढे आपली ‘बोई’ बरीच म्हणायची !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४

Set आणि बोई बद्दल धन्यवाद. ..

मुक्त विहारि
Fri, 12/20/2019 - 08:02 नवीन
धन्यवाद. ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

इंग्लीशच्या ‘set’ चे तब्बल १५६ अर्थ आहेत ! ...

Nitin Palkar
Fri, 01/03/2020 - 13:32 नवीन
अबब....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

हायला.. लोक्स एवढं सिरियसली

राघव
गुरुवार, 12/19/2019 - 09:23 नवीन
हायला.. लोक्स एवढं सिरियसली घेत असतात कोड्यांना? :D मी कधी एवढा विचार करून वगैरे कोडं सोडवलं नाही तसं.. जमेल तसं आणि तेवढं सोडवत जायचं, असंच माझं "जिओ और जीने दो" वालं धोरण! सुडोकू आवडतं, पण काही कठीण म्हणजे फारच कठीण असतात. त्यामुळं फार भुगा झाला डोक्याचा की सोडून द्यावं लागतं. पण त्यातून एक कळलं, एखाद्या ठिकाणी कोणता अंक येणार यासोबतच कोणता येणार नाही हेही ओळखता आलं पाहिजे. This goes close to the "Theory of Deduction" by the great Sherlock Holmes!! तरीही अजून फार पुढची सुडोकू नाही सोडवता येत. अर्थात् तेवढा वेळही दिला पाहिजे म्हणा.. :-)
  • Log in or register to post comments

सुडोकू.....

मुक्त विहारि
गुरुवार, 12/19/2019 - 10:07 नवीन
ह्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे, एकाग्रता वाढते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

शब्दकोडे. ..

मुक्त विहारि
गुरुवार, 12/19/2019 - 13:50 नवीन
ह्या बद्दल एक सुंदर लेख वाचनात आला होता... त्या लेखात पहिल्या शब्दकोड्या पासून बर्याच गोष्टींचा आढावा घेतला होता. https://googleweblight.com/i?u=https://www.crosswordtournament.com/more/wynne.html&hl=en-IN
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

मु वि,

हेमंतकुमार
गुरुवार, 12/19/2019 - 15:12 नवीन
धन्यवाद. वाचतो. मागे एका दिवाळी अंकातही असा लेख वाचला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मी पण छापील लेख वाचला होता....

मुक्त विहारि
गुरुवार, 12/19/2019 - 16:09 नवीन
शोधता शोधता अजून एक माहिती मिळाली. अमेरिकेत शब्दकोडी सोडवायची स्पर्धा असते. खाली लिंक देत आहे. खूपच मनोरंजक माहिती मिळेल. https://googleweblight.com/i?u=https://en.m.wikipedia.org/wiki/American_Crossword_Puzzle_Tournament&hl=en-IN
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

वरील सर्वांना धन्यवाद !

हेमंतकुमार
गुरुवार, 12/19/2019 - 10:30 नवीन
* आपण कोंडी सोडवतो तेंव्हा या मॅपिंगला चालना व विकास मिळत असल्याने मेंदू तरतरीत होत असावा * अडायला झाले डोक्यात जो भुंगा सुरु होतो तो थांबवणे अशक्य होउन जाते. * फार भुगा झाला डोक्याचा की सोडून द्यावं लागतं. या सगळ्याशी अगदी सहमत.
  • Log in or register to post comments

आपणच एक शब्द कोडे तयार करून मिपाकरांना का घालत नाही ?

जॉनविक्क
गुरुवार, 12/19/2019 - 16:02 नवीन
इमेज अपलोड करून आपण ते करू शकता, तांत्रिक सहकार्यसाठी तयार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

छान चर्चा

हेमंतकुमार
गुरुवार, 12/19/2019 - 19:09 नवीन
आणि पूरक माहितीबद्दल (मु वि) सर्वांचे आभार ! उत्तरार्ध इथे : https://misalpav.com/node/45833
  • Log in or register to post comments

पुरक माहिती साठी. ..

मुक्त विहारि
Fri, 12/20/2019 - 08:05 नवीन
गुगल आणि विकिपीडिया, जिंदाबाद....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा