स्फुट : अनुभव

राघव's picture
राघव in जनातलं, मनातलं
29 Nov 2019 - 2:26 pm

बऱ्याच दिवसांपासून एखादे (कामाव्यतिरिक्त अवांतर असे) पुस्तक वाचायचे म्हणून ठरवत होतो. काल रात्री मोठ्या उत्साहाने (होय, ही एक अगदी खास सांगण्यासारखी गोष्ट आहे!) एक पुस्तक वाचायला बसलो. जेमतेम ५-६ पानं झाली असतील वाचून तर बाहेर आकाशातली वीज कडाडली अन् घरच्या वीजेने घाबरून अंधारात दडी मारली!! असला वैताग आला म्हणता की ज्याचं नाव ते! जातोय कुठे, बसलो अंधारात!!

हे नेहमी (माझ्यासोबत!!) असेच का होते म्हणून जरा "स्वतःला सहानुभुती" देण्यापासून ते "माणसाला अंधारातही दिसले असते तर काय बहार झाली असती!" इथपर्यंत बरेच विचार मनात एकदम "फास्ट ट्रॅक"ने येऊन गेले. ढगाळ वातावरण असूनसुद्धा जवळच कुठेतरी पायी चक्कर मारायला निघण्याचा मनसुबा मनात डोके वर काढत होताच, पण आपण बाहेर निघा अन् लगेच वीजूताईने वाकुल्या दाखवत परत या हे होऊ द्यायची माझी अजिबात ईच्छा नव्हती! पण काही-काही वेळाच अशा असतात की त्या आपला पुरेपूर अंत पाहतात!! आता जगात डास हा प्राणी(?) कशाला अस्तित्वात आला असावा हा प्रश्न मला नेहमीच पडतो. त्याचे मला पुन्हा मनापासून स्मरण व्हायलाच हवे, असे त्यास नेमके तेव्हाच का वाटावे?? शेवटी मुकाट उठलो जागचा, बाहेर चक्कर मारण्यासाठी!!

ढगाळ वातावरण अन् १०-१०.३० ची रात्रीची वेळ यामुळे तशी रस्त्यावर बऱ्यापैकी सामसूम होती. बेटे रस्त्यावरचे दिवे मात्र चांगले उजेड पाडत होतेत अन् तिकडे आमच्या कॉलोनीत अंधाराचे साम्राज्य! (लगेहाथ इलेक्ट्रीसिटी बोर्डावरही वैताग काढून झाला!) नाही म्हणायला रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून लोक अभ्यास कसा करत असतील, असा आगंतुक प्रश्नही मनात डोकावून गेला. पण मी त्या रस्त्यावरच्या दिव्याखाली बसलोय अन् पुस्तक वाचतोय, असे काहिसे न पचणारे वाचनप्रिय(!) विचार मनात आल्याबरोबर मूळ विचार एकदम रद्द करून टाकला! मुख्य रस्त्यावर एव्हाना कुत्र्यांची वर्दळ चालू झालेली दिसू लागली! बाकी आपल्यासारख्या वैतागणाऱ्या माणसांच्या रात्रीच्या झोपेचे खोबरे करण्यासाठीच ही भटकी कुत्री निर्माण केल्या गेलेली आहेत, अशी शंका गेले काही दिवस मला येऊ लागलेली.

रस्त्याच्या कडेने जात असताना दिसले, एका दिव्याच्या खाली थोड्या बाजुला एक म्हातारी भिकारीण तिच्या रात्रीच्या बिछान्याची तयारी करत होती. एक मरतुकडे कुत्रे तिच्या आसपास रेंगाळत उभे होते. त्या दिव्याच्या भोवती किड्यांनी कोंडाळे केल्यामुळे त्याचा प्रकाशही अंधुकसा होत होता. ठिगळं लावलेल्या दोन फाटक्या पिशव्या हीच तिची काय ती संपत्ती असावी. अंगावरल्या चादरीने(?) फुटपाथवरची थोडी जागा साफसूफ करण्याच्या प्रयत्नात ती होती. तेवढ्यात परत वीज जोराने कडाडली. त्याचबरोबर ते जागजागी फाटलेले तिचे कपडे अन् चादर बघून वास्तवातील प्रखरतेच्या त्या क्षणमात्र जाणिवेने मात्र, माझा वैताग धाडकन जमिनीवर येऊन आदळला. रात्री केव्हाही पाऊस पडेल असे वातावरण होते. त्यापरिस्थितीत पाऊस पडल्यावर ती काय करणार अन् कसा स्वतःचा बचाव करणार या विचाराने मन गलबलून आले. तिला वैताग होत नसेल का? तिची चिडचिड होत नसेल का? असे एक ना दोन अनेक प्रश्नांचं काहूर मनात दाटून आलं. म्हटलं ४ दिवस माझा वैताग होतोय तर माझी चिडचिड मला स्वतःला जाणवण्याइतपत वाढलेलीये.. अन् इथे तिला तर वैताग म्हणजे दररोजचा साथ-संगत करणारा मित्र होता.

सुन्न मनस्थितीत माझी पावले केव्हा घराच्या दिशेने वळलीत हे देखिल मला कळले नाही. घरी पोचलो तर वीज अपेक्षेप्रमाणे आली होती. पण आता ती वाकुल्या दाखवत नव्हती! निदान आजतरी पुस्तक वाचण्याची गरज राहिली नव्हती. क्षणमात्र का होईना, पण एक जिवंत बाड मी अनुभवून आलेलो होतो.

इत्यलम्

[लेखनकाळः २००८ साली केव्हातरी.]

जीवनमानप्रकटनविचार

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

29 Nov 2019 - 2:33 pm | आनन्दा

छान!

मुक्त विहारि's picture

29 Nov 2019 - 2:38 pm | मुक्त विहारि

कधीकधी पाय जमिनीवर यायला हे अनुभव हवेतच.

जॉनविक्क's picture

29 Nov 2019 - 6:51 pm | जॉनविक्क

रोज मात्र हे अनुभव नकोत मन निबर होऊन जाईल

श्वेता२४'s picture

29 Nov 2019 - 3:34 pm | श्वेता२४

आवडले.

प्राची अश्विनी's picture

29 Nov 2019 - 4:10 pm | प्राची अश्विनी

स्फुट आवडले.

अलकनंदा's picture

29 Nov 2019 - 6:02 pm | अलकनंदा

हं.. अशी चुटपुट लागते हे सहृदय मन असल्याचे लक्षण मानावे. निदान दुसऱ्याचे दुःख / ताप पाहून आपले दुःख आकाशाइतके नाही, ही जाणीव होणे, हेही नसे थोडके.

यशोधरा's picture

29 Nov 2019 - 6:28 pm | यशोधरा

असेच म्हणते.

सुबोध खरे's picture

29 Nov 2019 - 8:11 pm | सुबोध खरे

उत्तम लेखन

मदनबाण's picture

29 Nov 2019 - 8:21 pm | मदनबाण

आता जगात डास हा प्राणी(?) कशाला अस्तित्वात आला असावा हा प्रश्न मला नेहमीच पडतो.
अगदी ! किती दिवसांचे ते त्याचे आयुष्य, तरी दुसर्‍याचे रक्त पिउनच जातो !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आवारापन बंजारापन एक ख़ला है सीने में हर दम हर पल बेचैनी है कौन बला है सीने में... :- JISM

सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद!

हा अन् असे आणिक काही अनुभव गाठीला अवचित आलेत आणि न मिटणारे ठसे उमटावेत तसे, आठवणींच्या मातीत कायमचे राहून गेलेत.
हे प्रसंग फार वेगळे आहेत असं नाही. बर्‍याच जणांना असे अनुभव आलेले असणार. मी फक्त व्यक्त केलं.

मला वाटतं emotional quotient चा समतोल साधण्यात अशा अनुभवांचा खूप मोठा हातभार असतो. आपला जगण्याचा दृष्टीकोन बराच बदलतो, समृद्ध होतो.

असं काही नजरेत आलं की आपण अंतर्मुख होऊन स्वतःच्या आयुष्याकडे बघतोच, सोबत दुसरा विचार हाही येतो की अशा प्रकारच्या परिस्थितीत बदल कसा घडू शकेल, आपण आपल्याकडून काय योगदान देऊ शकतो.. बरेचदा काही उत्तर मिळतही नाही, आपलं तोकडेपण प्रकर्षानं जाणवत राहतं. काहीजण यातूनच पुढे जाऊन आपापल्या परीनं बदलासाठी प्रयत्न करते होतात, काहींना त्यातच त्यांचं ध्येयही मिळतं. पण सर्वसाधारणपणे, विचारांना जी चालना मिळते ती सुद्धा फार मोलाची असते. पुढील आयुष्यात आपल्या अनेक निर्णयांवर कळत/नकळत अशा सर्व अनुभवांचा पगडा असतो.