कीप डॉक्टर अवे..
मी सध्या सत्तर वर्षांची झालेली असल्याने, म्हातारडी, थेरडी वगैरे झालेली आहे. सभ्य भाषेत ज्येष्ठ नागरिक. वयपरत्वे माझे सर्व अवयव दुखत असतात. मी तिकडं लक्ष देत नाही.
म्हातारपणी दुखायचंच म्हणून समाधान मानून घेते. माझे गुढगे दुखतात इथंपर्यंत ठीक आहे. पण माझी बोटं दुखतात, विशेषतः दोन्ही हातांचे अंगठे दुखतात, हे वाचून तुम्हांला आश्चर्य वाटेल.
अंगठे हा काय दुखावा असा अवयव आहे का? उद्या भुवई दुखेल, नखं दुखतील, कानाची पाळी दुखेल!
तर अशी ही माझ्या अवयवदुखीची तऱ्हा. हाताचे अंगठे दुखायला लागले की मला लिहिताना, टाईप करताना त्रास होतो.
म्हणजे लिहिणं खुंटलंच. चेकप सगळा करूनही उत्तर एकच. वयानुसार हे होणारच. सवय करुन घ्या. प्रत्येक सांध्याचे व्यायाम करा. तर असो.
एकदा माझी सर्वसाधारण मनुष्यप्राण्याप्रमाणे कंबर दुखायला लागली. म्हटलं, बँकबेडिंगचे माफक व्यायाम करताना दुखावली असेल. मग ते व्यायाम थांबवले. त्यानंतरही थांबेना.
मग सगळेच व्यायाम थांबवले. (किती छान!)
चोळलं, शेकलं, वेदनाशामकं घेतली. पडून राहिले. थांबायचं नाव नाही. म्हातारपणी होणारच या नेहमीच्या विचाराने सहन करत करत बरेच महिने दुखत राहिली. मग ठरविलं आता डॉक्टरांकडे जायचं. घरचे म्हणाले, "साध्या डॉक्टरांकडे नको. स्पेशालिस्टकडे जा."
माझ्या समवयस्क पण टुकटुकीत तब्येतीच्या मैत्रीणीच्या ओळखीच्या एका डॉक्टरांकडे अपॉंईंटमेंट घेण्यासाठी तिने स्वतः फोन केला. पण त्यांच्या सेक्रेटरीनं सांगितलं, 'एक महिन्यानंतरची मिळेल.' म्हणजे आता त्या डॉक्टरांचं मुखदर्शन घ्यायचं तर एक महिना थांबावं लागणार. त्यापेक्षा दुसरा बघावा.
तरी माझी मैत्रीण म्हणाली,"ते माझ्या पर्सनल ओळखीचे आहेत. मी त्यांना मोबाईलवर फोन करून याच आठवड्यातली अपॉईंटमेंट घेते. "मी कमरेवर हलकेच हात ठेवत आनंदानं म्हटलं,"बरं".
तिनं फोन केला. डॉक्टर म्हणाले,"तुम्ही परवा या. माझे अपॉईंटमेंटवाले पेशंटस् संपले की मी तुम्हांला आत बोलवेन".
माझी माझ्याच वयाची मैत्रीण आणि मी आनंदित झालो. त्या डॉक्टरांची ओपीडी मोठ्या हॉस्पिटलमध्ये होती.
आम्ही हॉस्पिटलला पोहोचलो. हॉस्पिटलच्या दारात वॉचमननं आमचं सामान तपासलं. बरोबर नेलेला बिस्किटाचा पुडा काढून घेतला आणि म्हणाला,"खाण्याचे, बाहेरुन आणलेले पदार्थ अलाऊड नाहीत. पाण्याची बाटली घेऊन जा."
आम्हांला हवे असलेले ऑर्थोपेडिक सर्जन कोणत्या विंगमधे,कोणत्या मजल्यावर आहेत ते त्यानं समजावून सांगितलं. हॉस्पिटलमधे इतक्या लिफ्टस् आणि इतक्या पाट्या होत्या की वॉचमननं समजावलेलं असूनही आम्ही गोंधळून गेलो.
तिथली कॅन्सर विभागाची पाटी पाहून तर मला 'आपल्याला कमरेचा कँन्सर तर झाला नसेल ना 'अशी शंका आली. मनावर दडपण आलं. आम्ही पुन्हा एकदा लिफ्टमनला विचारलं. त्यानं दूरवर बोट करत एक कोपऱ्यातली लिफ्ट दाखवली आणि पुन्हा एकदा ऑर्थोपेडिक चा पत्ता समजावून सांगितला.
आम्ही कोपऱ्यातल्या लिफ्टकडे गेलो. ऑर्थोपेडिक सेक्शनची पाटी आणि दिशादर्शक बाण पाहिला. त्या सेक्शनकडे गेलो.
तिथं प्रचंड गर्दी होती. इथं माझा नंबर कधी लागणार तोही अपॉईंटमेंटविना?! .. एक चिंतेची आणि एक शंकेची अशा दोन पाली माझ्या मनात खूपच मोठ्या आवाजात चुकचुकल्या.
आता दुपारचे दोन वाजले होते. डॉक्टरांनी आम्हांला दोन वाजताच बोलावलं होतं. म्हटलं,"चला,वेळेवर पोहोचलो आपण. आपण नेहमी कशा वेळेत बरोबर प्लॅन करुन पोचतो".. मैत्रीण आणि मी काऊंटरवर जावून नाव नोंदवून आलो आणि 'डॉक्टर ओळखीचे आहेत अपॉईंटमेंटशिवाय बोलावलंय वेळ मिळाला की मधेच बोलावणार आहेत.लहानसंच काम आहे,वेळ लागणार नाही' असं सगळं सांगितलं. ती 'बसा' म्हणाली. पण बसायला जागाच नव्हती. तोबा गर्दी होती.
आम्ही उभ्याच राहिलो. माझी कंबर दुखत होती. एकदा एका पायावर एकदा दुसऱ्या पायावर अशी मी उभीच राहिले. बराच वेळ गेला. कोणीच तरुण पेशन्ट दिसत नव्हते आणि सर्वांचीच अवस्था वाकलेली. तेव्हा आपली बसण्याची जागा सोडून अनिश्चित काळासाठी मला जागा ऑफर करण्याची रिस्क कोणीच घेईना.
तीन वाजले. मी आणि मैत्रीण पुन्हा काऊंटरपाशी गेलो.
विचारलं,"केव्हा लागेल नंबर? आमचा केसपेपर तरी करा."
ती म्हणाली, "केसपेपर करता येईल. पण डॉक्टर अजून आले नाहीत. ते चार वाजता येतील. त्यांच्याशी तुमच्याबाबत बोलून फाईल तयार करेन.
"माझी कंबर खचली.मी म्हटलं,"अजून आलेच नाहीत? पण त्यांनी तर आम्हांला दोन वाजता बोलावलं होतं. तोपर्यंत सर्व पेशन्ट संपलेले असतील असं म्हणाले. आणि तुम्ही म्हणता की अजून ते आलेच नाहीत?
"हो मॅडम पण ते आणखी चार हॉस्पिटल्समधे व्हिजिटिंगला जातात. तिथं त्यांचा वेळ जातो. येतीलच. बसा."
इतक्यात तिचा इंटरकॉम वाजला. तिनं तो उचलला.ही आम्हांला 'तुम्ही कटा'अशी सूचना होती बहुधा. आम्ही चुळबुळत पुन्हा भिंतीला टेकून उभ्या राहिलो.
चार वाजता डॉक्टर येणार हे कळल्यावर माझं कंबरडंच मोडलं होतं. मी मैत्रीणीला म्हटलं," आपण घरी जाऊया. दुखू दे माझी कंबर. नको इथं थांबायला."
तेवढ्यात एक माणूस बाकावरुन उठला. तिथं जागा रिकामी झाली. आम्ही दोघी वयाला न शोभेलशा चपळाईनं ती जागा लपकावली. तरुणपणी म्हणजे रिटायरमेंट वयापर्यंत लोकलमधे चढण्याचा आणि चवथी सीट पकडण्याचा अनुभव गाठी असल्यानेच आम्ही हे करु शकलो. बसायला जागा मिळाल्यावर डॉक्टरांची वाट पाहायला हुरुप आला.
चार वाजता मात्र डॉक्टर खरंच आले. माझ्या मैत्रीणीकडे त्यांनी पाहिलं. कोणालाच अजिबात ओळख न दाखवता कोऱ्या चेहऱ्याने ते त्यांच्या कन्सल्टिंग रुममधे गेले.
आम्ही दोघी पुन्हा काउंटरपाशी गेलो. "आता डॉक्टरांशी बोलून माझी फाईल तयार करता का प्लिज?", मी विचारले.
ती 'बरं' म्हणाली. इंटरकॉमवर डॉक्टरांशी बोलली. माझा केसपेपर तयार करुन, तो फाईलमधे घालून ती फाईल तिनं आम्हांला दिली.
"बोलावतील. बसा", तिने आश्वासन दिले. कन्सल्टिंग फी एक हजार रुपये. मुकाट्यानं दिली.
आम्ही बसलो. एक एक पेशंट आत जात होता. वीस मिनिटं आत थांबत होता. सगळं काम कूर्मगतीनं चाललं होतं.
आम्हांला वाटायचं की डॉक्टर मधेच आपल्याला बोलावतील. एकदोन पेशंटस् तर दहा मिनिटांतच बाहेर आले. वाटलं, आपला नंबर लवकर लागेल. आमच्या आशा पल्लवित झाल्या.
आम्हांला आता भूक लागली होती. त्या हॉस्पिटलमधे मस्त कँटीन बिंटीन होतं. तिथं जाऊन मस्त काहीतरी खावं आणि कॉफी प्यावी असं वाटत होतं. पण मैत्रिणीला वाटलं, "तेवढ्यात आपल्यालाच नेमकं डॉक्टरांनी आत बोलावलं तर?"
मी गप बसले. मलाही ते पटलं.
आता सहा वाजले होते. वॉचमननं जप्त केलेली बिस्किटं आठवली. खाण्याचं राहू दे. मोबाईलवरची गाणी ऐकायला इअरप्लग्जस्, वाचायला पुस्तक, झोपायला एखादी सतरंजी, उशी आणली असती तर किती बरं झालं असतं, असं वाटून गेलं.
मोबाईलवरचे व्हिडिओज्, कोणी कोणी पाठवलेले यू ट्यूब, गेम्स, गप्पा सगळ्याचा कंटाळा आला.
शेवटी पावणेसातला डॉक्टरांनी आम्हांला आत बोलावलं. आमचा कानांवर विश्वास बसेना. झपाट्याने आम्ही आत शिरलो. आत गेल्यावर डॉक्टरांना मी ताबडतोब म्हटलं, माझी कंबर दुखतेय, (नाहीतर पुन्हा त्यांना काहीतरी इमर्जन्सी फोन यायचा).. तीन चार महिने झाले. डॉक्टरांनी मला पडद्याआड नेलं. टेबलावर झोपवून मणके दाबून पाहिले. कसल्याशा रबरी हातोड्याने ठोकून पाहिले. गुढग्यात पाय वाकवून बघितले.
काही प्रश्न विचारले. नंतर त्यांच्या मागे उभ्या असलेल्या असिस्टंटला बोलावले. ते बोलत होते, ती केसपेपरवर लिहित होती. पाच मिनिटांनी ते मला म्हणाले,"एक्सरे काढायला लागतील. खाली जाऊन तो काढा, मला दाखवा. ट्रॅक्शन लावावं लागेल. फिजिओथेरपी लागेल. त्याने नाही झालं तर अँडमिट व्हावं लागेल. सर्जरी हाच ऑप्शन फायनली"
मी हादरलेच.भर एसीत मला घाम फुटला.
"सध्या एक्सरे करून या, मग बघू", डॉक्टरांनी आम्हाला कटवलं.
दोघी केबीनमधून बाहेर पडलो. भुकेनं खाली पडायची पाळी आली होती. पण एक्सरे विभाग बंद होईल ह्या भीतीनं आधी तिकडे गेलो. तिथंही गर्दी होतीच. पुन्हा रांगेत बसलो. एक्सरे काढण्यासाठी पेशंटस् तयार होत होते आणि आत जात होते.
मी वाट बघत होते. आता भूक मेली होती. बरोबर आणलेलं आणि वॉचमननं अलाऊ केलेलं पाणी दोघी घोटघोट पीत होतो.
शेवटी तीन चार कोनांतून मणक्याचे एक्सरे काढून झाले. त्यांचे काही हजारांत बिल झालं. डॉक्टरांना एक्सरे दाखवला. नंतर एकदाचे घरी गेलो.
मग क्रमाक्रमानं औषधं, गोळ्या, ट्रॅक्शन, फिजिओथेरपी (दररोज सातशे रुपये), कमरेचा पट्टा हे सोपस्कार झाले. पट्टा अतिशय अनकंफर्टेबल असतो. बसलं, चाललं की तो वर सरकतो. तो लावून कुठल्याही समारंभाला जाता येत नाही. माझी कंबर पूर्णपणे दुखायची थांबलेली नाही. मी आता एक तात्पर्य काढलंय. "एकदा जडलेलं दुखणं पूर्णपणे बरं कधीच होत नाही. माणूस त्या दुखण्यासकट जगायला शिकतो. कशाला अंगदुखीसाठी डॉक्टरकडे जाऊन कष्टाचे, घामाचे साठवलेले पैसे वाया घालवायचे?
तेव्हा 'कीप डॉक्टर अवे'..
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सर्व स्पेशालिस्ट डॉक्टरांकडे
'कीप डॉक्टर अवे'..>>>>
बाकी सगळं ठीक आज्जे, एका
हेच म्हणणार होतो
छान
एकदम बरोबर वर्णन
न्युरो फिजीशियनचा सल्ला घेऊन
आज्ज्ये, या वयात कुठे
माझी सर्वोच्च न्यायालयात केस
हम फिरसे कहत है
हा अनुभव सगळ्यांना च कधीतरी
खरं आहे
विनोदी लेखन असलं तरी तुमचा
छान
Thums up
तपासण्यांचे अनुभव नुकतेच
गवि-खरंय.
भारीच हो आज्जी! आज्जी रॉक्स!
आजी साहेबएकदा जडलेलं दुखणं
चांगला डॉक्टर
सहमत आहे
सहमत आहे. ..
कल्याण जवळ. ..
सारख्यासारख्या गोळ्या खाऊन
म्हातारडी, थेरडी वगैरे झालेली
मस्त खुसखुशीत लेखन. डॉक्टर