Skip to main content

जुनसर

लेखक मायमराठी यांनी शुक्रवार, 01/11/2019 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
मॉल संस्कृती व ऑनलाईन शॉपिंगच्या झगमगाटापुढे टिकण्यासाठी बऱ्याच दुकानांना कात टाकावी लागली. ज्यांना नाही जमलं ती तशीच दिवाळीच्या गजबजाटात जुनं अस्तित्व टिकवण्याचा क्षीण प्रयत्न करत असतात , त्यांना समर्पित... काजळलेल्या भिंती,त्यांत लपलेला जुनसर वास. मिणमिणती पणती, आसपास जाणवणारा जगण्याचा आभास . खरखरीत फरशी, तिथे घुटमळणारा वावरण्याचा त्रास . लटकत्या हिंमती ,त्यांच्यात असलेली गबाळेपणाची रास. हरलेल्या किंमती,त्यांत मिसळलेला अजीजीचा आवाज . मंद मंद भुवई, तिच्यात सामावलेला अनुभवाचा प्रवास . खडखडती नाणी,त्यांत अडकलेले अर्थशास्त्रही भकास . शून्यातली दृष्टी, तिच्यात कशी येणार सणाची मिजास? थकलेली पाटी, तिच्यातून उडलेली चैतन्याची आरास. श्वासांचीच विक्री, उच्छ्वासांचीच परवली, बदललेल्या जगाला 'Happy Diwali'. - अभिजीत
लेखनविषय:

वाचने 2681
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

वेगळा विचार. उगाचच, पुलंच्या आजी आजोबांचे, त्यांनी स्वतः केलेले उदास वर्णन आठवले.

मी अशी खूप दुकानं बघितली आहेत. गलबलून जायला होतं; काहीच सुचत नाही. काळाचा वरवंटा हळूहळू अशा दुकानांना व मालकांना सपाट करुन टाकतो. असो. आपल्याला हे लिखाण वाचून पु लं च्या लेखनाची आठवण व्हावी यापरतं भाग्य काय असावं? मनोमन आभार.

काय लिहावे? प्रत्ययकारी वातावरणनिर्मिती. जुने जाऊद्या मरणालागी, म्हणावे का?
काळाचा वरवंटा हळूहळू अशा दुकानांना व मालकांना सपाट करुन टाकतो
खरं आहे. मी जाता राहील काय, काय हे सजीव, निर्जीव सर्वांसाठी त्रिकालाबाधित कटू सत्य आहे.

छान!

ऊदास