रसग्रहण इतिहासाचे

शैलेन्द्र's picture
शैलेन्द्र in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am

body {
background-image: url("https://i.postimg.cc/mZ0mm9NL/diwali-fireworks.png");
}

/* जनरल */

h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}

.shirshak {
background-image: url("https://i.postimg.cc/YqkfF6BT/Orange-Gradient-Background.png");
padding:16px;
margin-top: -54px;
height:80px;
}

.glow {
font-size: 40px;
text-shadow: 1px 1px 0 #444;
font-family: 'amita',cursive;
color: #fff;
padding:16px;
line-height: normal !important;
margin-top: -27px;
}

.majkur {padding:10px;}
.majkur a:link {color:#cc0000;}

#slide-nav .navbar-toggle { display: none !important;}

.input-group {
display: none !important;
}
.navbar-nav { display: none !important;}

.page-header { padding-top:16px !important;}

.col-sm-9 {
background-image: url("https://i.postimg.cc/kMS0JTBP/main-bg.png");
}
.chitra {
background-color: white;
padding:10px;
border: 1px solid #ccc;
}

मिपा दिवाळी अंक  २०१९
अनुक्रमणिका

रसग्रहण इतिहासाचे

एखाद्या गोष्टीचे रसग्रहण करणे म्हणजे ती पूर्णतः अनुभवून, आस्वाद घेऊन, आपल्याला ती कशी भावलीय, कशी भिडलीय ते मांडणे. तिचे विविध कंगोरे, छुपे अर्थ जाणून घेणे आणि जाणवून देणे.

इतिहास ह्या विषयाला भिडताना मात्र एका वेगळ्या दृष्टीकोनातून हा प्रयत्न करावा लागतो, ह्याचे साधे कारण म्हणजे इतिहास ही घटनांची गोष्ट आहे. वरवर साध्या वाटणाऱ्या ह्या वाक्याच्या पोटात अनेक अर्थ आहेत, तितकेच जितके इतिहासातील कोणत्याही घटनेच्या पोटात असतात.

images-1

इतिहास ही घटनांची गोष्ट आहे असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा त्यातील घटना हे निखळ सत्य असते, म्हणजे ती घटना घडलेली असते. जोवर त्या घटनेचे घडलेले असणे नक्की नसेल तोवर ती इतिहास होत नाही. अनेक घटना ह्या पौराणिक आणि ऐतिहासिक ह्या दोन प्रदेशांच्या सीमारेषेवर रेंगाळत राहतात, कारण त्या घडल्याची फक्त गोष्ट असते, कथा असते, पुरावा मात्र नसतो. एकदा सर्वमान्य पुरावा मिळाला की ती घटना ऐतिहासिक होते. मात्र घटना आणि घटनेची गोष्ट ह्यात मोठा फरक आहे. फारसीमध्ये इतिहासाला तारीख म्हणतात, आपण दिवसाला, दिनांकाला तारीख म्हणतो. जर इतिहास निव्वळ घडलेल्या घटनांची जंत्रावळी असता, तर त्यात आपल्याला कितपत रस निर्माण झाला असता? पण इतिहास हा त्या घडलेल्या घटनेभोवती रचलेल्या गोष्टीचे भांडार असते.

मानवी समाजाची एक खासियत आहे, ती म्हणजे गोष्टी सांगत राहणे. एकच घटना समाज वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या प्रकारे सांगत राहतो. घटना तीच राहते पण त्यातलं तात्पर्य, त्यातून मिळणारा संदेश मात्र बदलत जातो. एकच गोष्ट आपापल्या सोयीनुसार, आपल्याला आवडेल तशी फिरवली जाते आणि स्वतःपुरते निखळ सत्य म्हणून समाजाच्या माथी मारली जाते. ज्याची गोष्ट जास्त रंजक आणि सोयीची, त्याचे सत्य जास्त बलवान. इतिहास अशा रंजक आणि सोयीच्या कथांनी भरलेला आहे. अनेकदा आपण ज्याला रसाळ ऐतिहासिक काव्य, कादंबऱ्या, चित्रपट किंवा आख्याने म्हणतो, ते म्हणजे अशा घटनांना आजच्या काळाचे कपडे चढवून केलेले सुलभीकरण असते.

अनेकदा इतिहास अशा सुलभीकरणाखाली, सुशोभीकरणाखाली दडपून टाकला जातो. ह्या सुलभीकरणाची गरज का पडते, हे पाहणेही मोठे रंजक आहे.

आपले मूळ शोधणे आणि त्याहीपेक्षा आपला वारसा शोधणे ही संस्कृतीने घडवलेली मानवी मनाची गरज आहे. आपल्या गुणांचा किंवा कृत्यांचा वारसा आणि त्या वारशाचा अभिमान ही माणसाची सामाजिक ओळख आहे किंवा ती तशी असल्याचे भासवले गेले आहे. समाज म्हणून मोठ्या संख्येने एकत्र येण्यासाठी ज्या गोष्टींचा आधार घेतला जातो, त्यात भाषा, धर्म, वंश ह्याचबरोबर सामायिक इतिहास हीदेखील महत्त्वाची गोष्ट मानली जाते. आता एकदा इतिहास महत्त्वाचा मानला, त्याला अभिमान चिकटला की तो अपमानास्पद किंवा लज्जास्पद असण्याचा मार्ग बंद होतो. आपल्या पूर्वजांच्या प्रत्येक कृत्याला न्याय्य, उचित आणि महान ठरवणे ही आपली मजबुरी ठरते. एकदा ही गरज निर्माण झाली की घटनांभोवती कथा तयार होतात. त्या कथा हळूहळू मूळ घटनेपेक्षाही शक्तिशाली होतात. घटनेचे स्वरूप बदलून टाकण्याचे सामर्थ्य त्या कथांमध्ये असते. ज्याला समाजाचा इतिहास म्हणता येईल त्याचे स्वरूप बदलून टाकण्याचे सामर्थ्य त्या कथांमध्ये असते.

ह्या कथांचा दुसरा एक पैलू आहे, जो अनेकदा इतिहासाच्या अभ्यासकांना आणि अस्वादकांना अडचणीचा ठरतो. तो आहे समाजातील बदलती नीतिमूल्ये.

संस्कृती ही एक चल संकल्पना आहे. संस्कृती कधीही एका जागी थांबत नाही. इतिहासातील घटना मात्र एका जागी गोठलेली असते. ती घटना आता बदलणार नसते. कित्येक वर्षांपासून समाजाला ती घटना लिखित इतिहास म्हणून माहीत असते, तसेच समाजाच्या मनातही ती कधीकधी जिवंत असते. जुन्या काळात त्या घटनेकडे समाजाने एका नजरेने पाहिलेले असते. त्या काळानुसार त्या समाजाची नीतिमूल्ये, पाप-पुण्याच्या कल्पना, चांगले-वाईटाची समज, न्याय-अन्यायाच्या व्याख्या वेगळ्या असतात. त्यामुळे समाजाने त्या घटनेला साजेशी आपल्या काळानुसार एक कथा रचलेली असते. इतिहास म्हणून समाजात तीच कथा ज्ञात असते.

images-2

मग समाज बदलतो, समाजाची मूल्ये बदलतात, नीतितत्त्वांची कल्पना बदलते आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे समाजाच्या राजकीय गरजा बदलतात. ह्या समाजातील एका गटाला आपली इतिहासातील जुनी कथा अपुरी वाटायला लागते. कधी खोटीही वाटायला लागते. मग समाज परत इतिहासाची पुनर्मांडणी करायला घेतो. त्या घटनेची अजून चौकशी होते. आपल्याला हव्या त्या पद्धतीने तिची पुनर्मांडणी करण्याचा प्रयत्न होतो. त्याच वेळी ती मांडणी मान्य नसलेला समाजातील दुसरा वर्ग त्याला विरोध करत असतो. इतिहासाची मांडणी आणि पुनर्मांडणी हा खेळ असा सुरूच राहतो.

एक लक्षात घ्यायला हवे की इतिहासात घडलेली कोणतीही घटना काळ आणि व्यक्ती ह्या दोन बिंदूंच्या साहाय्याने आलेखावर रेखाटली जात असली, तरी त्या काळातील सामाजिक परिस्थिती आणि विचारसरणी हे तिचे प्रतल असते. अनेकदा आपण इतिहास व्यक्तींच्या संदर्भात अभ्यासतो, शिकतो आणि सांगतो; परंतु प्रत्येक व्यक्ती ही तिच्या काळाचे अपत्य असते. व्यक्तीपेक्षाही तो काळ, तो समाज आणि ती परिस्थिती जास्त बलवान आणि महत्त्वाची असते. मात्र ज्याप्रमाणे एखादे चित्र कोणत्याही परिमाणात मोजता येत नसते, त्याचप्रमाणे हा समाज आणि त्याची तत्कालीन परिस्थिती इतिहासाच्या आलेखावर नीट नोंदवता येत नसते. त्या समाजातील नीतिमूल्ये, धारणा ह्या आज आपल्याला विचित्र वाटतील अशा असतात.

आणि आपला ऐतिहासिक नायक, ज्याच्याकडे आपण ह्या ऐतिहासिक घटनेचा कर्ता म्हणून पाहत असतो, तो अशा काळाचा, परिस्थितीचा, सामाजिक नीतिमूल्यांचा बंधक असतो, वाहक असतो. एखाद्या क्षणी, मोठ्या हिकमतीने तो नायक आपल्या काळातील, एखाद्या क्षेत्रातील काही मूल्य, काही समजुती ठोकरून टाकतोही, परंतु इतर सगळ्या बाबतीत मात्र ती व्यक्ती आपल्या तत्कालीन समाजाचे आणि काळाचे बंधन पाळत असते. ते बंधन न पाळल्यास कदाचित आसपासचा समाज त्या व्यक्तीला नेता म्हणून स्वीकारणार नसतो. ज्या समाजात व्यक्तीचे यश हे निव्वळ त्याच्यामागे किती लोक उभे राहू शकतात, किती ठामपणे उभे राहू शकतात ह्या गोष्टीवर अवलंबून असते, अशा समाजात ह्या नेत्याला स्वतःचे सगळेच हट्ट पूर्ण करता येणे अशक्य असते. समाजाच्या भावनांचा विचार केल्याशिवाय त्या समाजाला बरोबर घेऊन नेत्याला इतिहास घडवता, बदलता येणार नसतो. बदललेला किंवा घडलेला इतिहास हा मुख्यतः समाजाच्या परिस्थितीत झालेला फेरफार असतो, व्यक्तीच्या आयुष्यातील बदल हा त्यातील फार छोटा भाग आहे.

मराठी समाज स्वतंत्र होणे हा इतिहास आहे, शिवाजी महाराज छत्रपती होणे हा त्यातील छोटासा भाग आहे. स्त्री शिक्षणाची सुरुवात हा इतिहास आहे, सावित्रीबाईंना शेणगोळे खावे लागणे हा त्यातील छोटासा भाग आहे. भारताचा स्वातंत्र्यलढा, देश म्हणून एकीकरण आणि त्याची फाळणी हा महत्त्वाचा इतिहास आहे, गांधीजींचा उदय आणि अस्त हा त्यातला एक छोटासा भाग आहे.

पण होते असे की आपण आपल्या नेत्यांच्या प्रेमात किंवा दुस्वासात असतो. इतिहास म्हणताक्षणी आपल्याला आपल्या आवडीचे महापुरुष आठवतात, आपल्याला न आवडणारे पण समाजात सध्या आपल्या विचारसरणीच्या विरुद्ध बाजूला असणाऱ्या लोकांना आवडणारे महापुरुषही आठवतात. खरे तर ऐतिहासिक व्यक्तिरेखांमधून महापुरुष घडवणे हा भारतीय समाजमनाचा रिकामटेकडेपणाचा आवडता उद्योग आहे. ज्याप्रमाणे तुम्ही एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते झालात की त्या पक्षाच्या प्रत्येक लहानसहान गोष्टीचे समर्थन करण्याचे नैतिक पण नकोसे बंधन तुमच्यावर येऊन पडते, त्याचप्रमाणे एकदा तुम्ही एखाद्या ऐतिहासिक व्यक्तीला महापुरुषाचा दर्जा दिलात की त्या व्यक्तीच्या प्रत्येक लहानसहान कृतीचे समर्थन तुम्हाला करावे लागते.

ते समर्थन करण्यासाठी मग आपण इतिहासाला वेठीस धरतो. आपण नव्या कथा रचतो. आपल्या आजच्या काळातील नैतिक मूल्यांचे गुटी कलम आपण त्या महापुरुषाच्या काळावर करतो आणि त्या समजुतीला कोंब फुटण्याची वाट पाहत बसतो. त्याच वेळी आपल्या प्रेमाचे, द्वेषाचे, इर्षेचे खतपाणी त्या कथेला देत राहतो. हाराकिरीवर येऊन वाद घालतो. भारतीय इतिहासातील वाद हे शक्यतो समाज, सामाजिक वास्तव, परिस्थिती ह्याबाबत नसतात. शक्यतो हे वाद कोणत्या व्यक्तीने काय केले आणि का केले किंवा नाही केले, ती व्यक्ती चांगली किंवा वाईट ह्याबद्दल असतात. अशा पद्धतीने वाद घालणे म्हणजे पृथ्वीवर बसून खडकाळ चंद्र फार शीतल आहे असे ठरवणे आहे. हे आपल्या भावनांचे इतिहासावर आरोपण करणे आहे.

old-books-3-1424709

हे इतिहासाचे रसग्रहण नक्की नाही, किंबहुना आपली इतिहासात असलेली ही भावनिक गुंतवणूक आपल्या इतिहासाच्या योग्य आकलनाला मारक ठरते. आपला इतिहास भावनांच्या ओंजळीतून पाहताना, त्यातले मर्म मासा निसटून जावा तसे निसटून जाते.

हे सगळे बोलायला सोपे आहे, पण करायला अवघड असते. बऱ्याचदा समाज म्हणून एकत्र यायला आपल्याला कारण हवे असते आणि सामायिक इतिहास हे एक उत्तम कारण असते. खरे तर नीट निरखून पाहिल्यास समाजात एखादी चळवळ जागी होत असेल, एखादा राजकीय हट्ट डोके वर काढत असेल, तेव्हा लोकांचा इतिहासातील रस वाढतो. राजकीय नेत्यांच्या तोंडी इतिहासातील दाखले फेर धरायला लागतात. आजच्या गरजेला सुसंगत तितकाच इतिहास तितक्या मापाच्या भिंगातून मोठा करून दाखवला जातो. इतिहासाचा तुकडा पाडला जातो आणि तो लोकांच्या समोर चघळायला टाकला जातो.

खोटे कशाला बोलावे, आपल्यालाही ते आवडत असते. आपलीही काहीतरी बाजू किंवा भूमिका असते. आपल्याला सोयीचा ठरेल तितका इतिहासाचा पाया घेऊन त्यावर ती भूमिका टेकवणे आपल्याला सोपे जाते. इतिहास हा आपला समर्थक होतो. आपला दृष्टीकोन अढळ होत जातो. इतिहास एखाद्या कातळासारखा अखंड असला, तरी आपण त्याचा छोटासा तुकडा काढून त्याची मूर्ती बनवतो, त्याच्या ठायी आपल्या श्रद्धांची गुंतवणूक करतो.

एकदा श्रद्धा गुंतल्या की कथा अढळ होतात. इतिहास समीक्षेच्या, अभ्यासाच्या पलीकडे जातो. कोणताही नवा पुरावा, कोणतेही नवे ज्ञान आता आपले आकलन बदलू शकत नाही. इतिहास पूजनीय होतो. इतिहासातील महानायकाचे दैवतीकरण होते, कधी एखाद्याच्या नशिबी सैतान होणेही येते. एखादी दुसरी पिढी अशा समजुती जगत राहते. काळाचे चक्र फिरत राहते. तोही एक इतिहास होतो.

मग पुन्हा राजकीय गरज बदलते, परत नवी पिढी इतिहासाकडे वळवली जाते. बदललेल्या गरजेनुसार परत एकदा सलग कातळाचा हवा तितका तुकडा तोडला जातो, त्याची नवीन मूर्ती घडवली जाते. काळाचे एक आवर्तन संपते, दुसरे सुरू होते.

इतिहासातील, खासकरून भारतीय इतिहासातील सगळे महापुरुष ह्या आवर्तनातून गेलेत. अगदी ज्यांचे दैवतीकरण झालेय असे महापुरुषही ह्याला अपवाद नाहीत. शिवाजी महाराजांसारखा सर्वकालीन श्रेष्ठ पुरुषही वेगवेगळ्या काळाने वेगवेगळ्या नजरेने पाहिला. जोतिबा फुल्यांचे शिवराय वेगळे, टिळकांचे वेगळे, सावरकरांचे वेगळे, नेहरूंचे वेगळे, बाळासाहेब ठाकऱ्यांचे वेगळे आणि शरद पवारांचे आणखीनच वेगळे.

महाराज तेच, गोष्ट वेगळी..

कथाकार, कादंबरीकार आणि शाहिर यांचा तर मी उल्लेखही नाही करत.

शिवपुत्र संभाजीराजांच्या बाबतीत तर हा गोंधळ इतका मोठा होता आणि आहे की बिघडलेला राजपुत्र ते धर्मवीर हा प्रवास अवघ्या पंधरा-वीस वर्षांत आमच्याच पिढीने पाहिला. राजांचा मृत्यू जितका दुर्दैवी, तितकेच त्यांच्या प्रतिमेचे हे फेरे विस्मयचकित करणारे.

पण मग ह्यातून बाहेर कसे पडायचे? ज्यांना इतिहासातून खरोखर काही समजून घ्यायचे आहे, शिकायचे आहे त्यांनी काय करायचे? इतिहासाचे मर्म कसे हुडकायचे?

images-3

खरे तर ह्याचे निश्चित उत्तर नाही. मात्र एक विशिष्ट दृष्टीकोन आणि मनोभूमिका ठेवल्यास आपल्याला हे मर्म सापडू शकते.

ह्यातली पहिली गोष्ट म्हणजे काही धारणा बदलणे. इतिहासाची पुनरावृत्ती होते असे आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा ते एक तत्त्व म्हणून योग्य असेलही, पण ते मायक्रो लेव्हलवर होत नाही, कारण गेलेला काळ वेगळा असतो, परिस्थिती वेगळी असते, समाजाचे प्रतिसाद वेगळे असतात. त्यामुळे एखाद्या घटनेचा भयगंड किंवा अहंगंड बाळगून सतत वावरणे आणि त्या दृष्टीने इतिहासातून निष्कर्ष काढणे चुकीचे ठरते. त्यामुळेच नेहमीच आपल्याला इतिहासातून काही शिकायला मिळेल ह्या दृष्टीने त्याकडे पाहू नये. इतिहासाकडे निकोप करमणूक किंवा फारतर सत्याचा शोध म्हणून पाहिल्यास आपण त्यापासून अप्रत्यक्षपणे जास्त काही शिकू शकतो.

आणखी जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपल्याला इतिहासाशी बांधून ठेवणाऱ्या अभिमान, प्रेम आणि संलग्नता ह्या तीन गोष्टींचा नीट विचार करणे.

आपण एखाद्या भूमीत जन्मतो, एखाद्या समाजात वाढतो, आपल्या घडणीत त्या भूमीने आपल्याला दिलेल्या अनुकूलतेचा आणि आव्हानांचा मोठा वाटा असतो, आपल्या वैचारिक बैठकीत त्या समाजाने आपल्यावर बिंबवलेल्या मूल्यांचा आणि आपल्या विचारशक्तीला दिलेल्या आव्हानांचा तितकाच मोठा सहभाग असतो. आपण ज्यांना आपले मानतो असे लोक, आपले आईवडील, नातेवाईक, जीवनसाथी सगळे बहुधा याच भूमीत, याच समाजात घडत असतात, आपल्या जडणघडणीत, भूत-भविष्य-वर्तमानात या सगळ्यांचा प्रचंड मोठा भाग असतो. खरे तर, आपण आज जे काही असतो, ते या सगळ्या गोष्टींचे प्रॉडक्ट असतो. ह्या भूमीच्या इतिहासावर, ह्या लोकांच्या इतिहासावर म्हणूनच आपले प्रेम असते, अनेकदा त्याचा अभिमानही असतो.

प्रेम आणि अभिमान या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. प्रेमात कमतरता आणि त्रुटींसह स्वीकार आहे, तर अभिमानात वैगुण्याकडे दुर्लक्ष आणि क्वचित उदात्तीकरणदेखील आहे. अभिमानात एक सुप्त वर्चस्वाची, इतरांना कमी लेखण्याची भावनाही आहे. प्रेमात असलेली स्थिती आणखी चांगली करण्याची ओढ आहे. इतर राज्यांना फक्त भूगोल असेल, पण फक्त महाराष्ट्राला इतिहास आणि भूगोल दोन्ही आहेत, हा अभिमान झाला. महाराष्ट्रासह सगळ्या जगाच्या वारशाचा डोळस स्वीकार, परंतु महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल जास्त आपुलकी हे प्रेम झाले.

त्याहीपुढे जाऊन आपण आपल्याला वारशाने मिळालेल्या गोष्टींबद्दल निव्वळ संलग्नता बाळगू शकतो. हे जरासे कोरडे वाटेल, पण बहुधा ही बदलत्या जगाची गरज ठरणार आहे.

आपल्या इतिहासात आपले कर्तृत्व शून्य असते. इतिहास हा आपल्याला अपघाताने लाभतो. अशा गोष्टींचा, ज्या आपल्याला अपघाताने मिळतात, त्यांचा अभिमान बाळगण्यापेक्षा त्यांचे संलग्नत्व स्वीकारायचे. एकदा हे केले की इतर कोणत्याही समुदायाला, नेत्याला, समाजाला कनिष्ठ न समजताही आपल्याला आपल्या समुदायाशी जोडून घेता येते. तसेच जे आहे त्याबद्दल अभिमान कमी असल्याने, त्यात बदल करून, आणखी चांगल्या समाजाच्या दिशेने पाऊल टाकता येते. जसे आपले घर आपल्याला आवडते आणि म्हणून ते नीटनेटके ठेवायचा आपण यथाशक्ती प्रयत्न करतो, तसेच समाज सुधारण्याचा यथामती प्रयत्न करता येतो. भूतकाळातील घटनांचे जू मानेवर न घेताही समाजाशी जोडून घेता येते.

इतिहासाचा निर्लेप मनाने आढावा घेताना गरुडाची दृष्टी आणि आभाळासारखे मन असेल तर इतिहास आपल्याला मुक्तता देतो, अन्यथा इतिहास ही आपल्या पायातील बेडी असते.

श्रेयनिर्देश : प्रकाशचित्रे आंतरजालावरून साभार.

20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

26 Oct 2019 - 3:11 pm | यशोधरा

उत्तम विवेचन. अतिशय चपखल शब्दांत मांडणी.
लेख अतिशय आवडला.

पद्मावति's picture

26 Oct 2019 - 4:09 pm | पद्मावति

अतिशय सुरेख. उत्तम लेख _/\_

सुधीर कांदळकर's picture

27 Oct 2019 - 5:31 pm | सुधीर कांदळकर


एकच गोष्ट आपापल्या सोयीनुसार, आपल्याला आवडेल तशी फिरवली जाते आणि स्वतःपुरते निखळ सत्य म्हणून समाजाच्या माथी मारली जाते. ज्याची गोष्ट जास्त रंजक आणि सोयीची, त्याचे सत्य जास्त बलवान.

अगदी खरे.


प्रेमात कमतरता आणि त्रुटींसह स्वीकार आहे, तर अभिमानात वैगुण्याकडे दुर्लक्ष आणि क्वचित उदात्तीकरणदेखील आहे. अभिमानात एक सुप्त वर्चस्वाची, इतरांना कमी लेखण्याची भावनाही आहे. प्रेमात असलेली स्थिती आणखी चांगली करण्याची ओढ आहे.

नेमके भाष्य केले आहे.


.....अभिमान बाळगण्यापेक्षा त्यांचे संलग्नत्व स्वीकारायचे.

आवडले.

मस्त, तर्कसुसंगत, निर्लेप मनाने केलेले लेखन. आवडले. धन्यवाद.

इतिहासाचे इतके सुंदर विश्लेषण आत्तापर्यंत कोणी केले नसेल! लेख अतिशय आवडला.

प्रेम आणि अभिमान या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. प्रेमात कमतरता आणि त्रुटींसह स्वीकार आहे, तर अभिमानात वैगुण्याकडे दुर्लक्ष आणि क्वचित उदात्तीकरणदेखील आहे. अभिमानात एक सुप्त वर्चस्वाची, इतरांना कमी लेखण्याची भावनाही आहे. प्रेमात असलेली स्थिती आणखी चांगली करण्याची ओढ आहे. इतर राज्यांना फक्त भूगोल असेल, पण फक्त महाराष्ट्राला इतिहास आणि भूगोल दोन्ही आहेत, हा अभिमान झाला. महाराष्ट्रासह सगळ्या जगाच्या वारशाचा डोळस स्वीकार, परंतु महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल जास्त आपुलकी हे प्रेम झाले.

१००% सहमत.

इतिहासाचा निर्लेप मनाने आढावा घेताना गरुडाची दृष्टी आणि आभाळासारखे मन असेल तर इतिहास आपल्याला मुक्तता देतो, अन्यथा इतिहास ही आपल्या पायातील बेडी असते.

क्या बात है...

गुल्लू दादा's picture

2 Nov 2019 - 10:23 pm | गुल्लू दादा

खूप सुरेख लिहिलंय...कोणा एका नेत्याचा, महापुरुषाचा,समूहाचा किंवा इतिहासातील कोणत्याही नावाजलेल्या व्यक्तीचा टोकाचा द्वेष करणे म्हणजे मूर्खपणा आहे असे मी समजतो. त्यावेळची परिस्थिती, काळ-वेळ याचा संपूर्ण अंदाज वर्तमानात येत नसतो. आत्ताच्या परिस्थितीवरून 'ते' तेव्हा कसे चूक होते हे कसं छातीठोकपणे सांगणार ना. दस्ताऐवजावरून सुद्धा पूर्ण परिस्थिती लक्षात येणे अवघडच. अगदी लेखकाने म्हंटल्याप्रमाणे इतिहासाचा तुकडा टाकून आपल्या समोर चघळायला टाकला जातो..सहमत.

मुक्त विहारि's picture

19 Nov 2019 - 4:44 pm | मुक्त विहारि

शेवटचा परिच्छेद आवडला.