ट्रेकानुभव : वाहनांचे किस्से

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am

body {
background-image: url("https://i.postimg.cc/mZ0mm9NL/diwali-fireworks.png");
}

/* जनरल */

h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}

.shirshak {
background-image: url("https://i.postimg.cc/YqkfF6BT/Orange-Gradient-Background.png");
padding:16px;
margin-top: -54px;
height:80px;
}

.glow {
font-size: 40px;
text-shadow: 1px 1px 0 #444;
font-family: 'amita',cursive;
color: #fff;
padding:16px;
line-height: normal !important;
margin-top: -27px;
}

.majkur {padding:10px;}
.majkur a:link {color:#cc0000;}

#slide-nav .navbar-toggle { display: none !important;}

.input-group {
display: none !important;
}
.navbar-nav { display: none !important;}

.page-header { padding-top:16px !important;}

.col-sm-9 {
background-image: url("https://i.postimg.cc/kMS0JTBP/main-bg.png");
}
.chitra {
background-color: white;
padding:10px;
border: 1px solid #ccc;
}

मिपा दिवाळी अंक  २०१९
अनुक्रमणिका

ट्रेकानुभव : वाहनांचे किस्से

आपण सर्वांनाच अनेकदा प्रवास करावा लागतो. बर्‍याच जणांना कामानिमित्ताने रोज, अगदी एका गावातून दुसर्‍या गावी जावे लागते. निरनिराळ्या कामानिमित्त, सभा-समारंभासाठी देश-परदेशात जावे लागते. पर्याय नसल्याने केलेले प्रवास कंटाळा आणतात. पोटापाण्यानिमित्त केलेली भटकंती म्हणजे नाइलाजाने पाय ओढत जाणे. मात्र या रुटीनचा वैताग येऊन काही बदल म्हणून आपण बाहेर पडतो ते मस्त भटकायला. हा प्रवास मात्र खूपच आनंद देऊन जातो. बरेच अनुभव आणि आठवणींचा रम्य खजिना हे असे प्रवास देऊन जातात. मात्र खास डोंगरभ्रमंतीसाठी किंवा ट्रेकिंगसाठी बाहेर पडल्यानंतर मात्र अचाट किस्से होतात. वल्ली म्हणाव्यात अशा अनेक लोकांशी गाठ पडते, वन्य प्राणी दर्शन देऊन जातात, निसर्गाची अकल्पित रूपे नजरेला पडतात, क्वचित अनपेक्षित प्रसंगाला तोंड देण्याची वेळ येते. प्रत्यक्ष डोंगर किंवा गड पायी चढायचे असले तरी पायथ्यापर्यंत पोहोचण्यासाठी वाहन लागतेच. या वाहनांच्या प्रवासात काही वेळा धमाल होते. मला आलेले असेच काही अनुभव आपण या धाग्यात वाचणार आहात.

tata-truck

सुरुवात करतो माझ्या पहिल्याच ट्रेकमध्ये आलेल्या ट्रकच्या अनुभवाने. डोंगराच्या गाभ्यात वसलेल्या कोणत्यातरी आडवळणाच्या गावी जायचे, तर प्रसंगी उपयोगी पडतात ते हे ट्रक ड्रायव्हरच. आयुष्यातील पहिला म्हणावा असा ट्रेक केला तो राजगडावर. चेलाडी फाट्यावरून खाजगी जीपने मार्गासनीला तर पोहोचलो. डोक्यावर बालेकिल्ल्याचा मुकुट घातलेला राजगड खुणावत होता. पण पायथ्याच्या गावी जायचे कसे ? तेवढ्यात एक वाळूचा ट्रक आला, तो वाजेघर, खरीवकडे निघाला आहे ही आनंदाची बातमी अ‍सली, तरी पुढे बसायला जागा नव्हती. अर्थातच मागे वाळूवर बसण्याखेरीज पर्याय नव्हता. ट्रेकमधल्या या पहिल्याच प्रवासाने पुढे आम्हाला काय दिव्य करावी लागणार आहेत, याची चुणूक दाखवली. जानेवारीच्या सकाळच्या थंड हवेत, त्या ओलसर वाळूवर बसणे हे चांगलेच दिव्य होते. पण राजगडच्या भन्नाट नजार्‍याने आम्हाला त्याचे फार काही वाटले नाही. वाजेघरला उतरल्यानंतर त्या ड्रायव्हरने आम्हाला भलतेच मार्गदर्शन केले. वास्तविक भोसलेवाडीमार्गे पायर्‍यांच्या वाटेने महादरवाजामार्गे आरामात गडावर पोहोचलो असतो. पण... ड्रायव्हरमामांनी मात्र आम्हाला भुतोंडे गावाकडे चढणारा रस्ता दाखवला. या रस्त्याने बापूजी बुवाच्या खिंडीपर्यंत चढलो. मात्र नंतर रस्ता उतरायला लागला आणि आपले काहीतरी चुकले याची खातरी झाली. अर्थात नंतर राजगड सर झाला.

मात्र तो दिवस आम्हाला अनेक अनुभव देऊन जाणार होता. सोपी वाट म्हणून आम्ही महादरवाजाच्या वाटेने उतरून वाजेघरला पोहोचलो आणि तिथे आता एस.टी. मिळणार नाही अशी बातमी ऐकली. अर्थात 'दूधगाडी येणार असून ती तुम्हाला चेलाडी नाक्यापर्यंत पोहोचवेल' असा दिलासा मिळाला. पाच-दहा मिनिटांत निळ्या रंगाचा तो ४०७ टेम्पो डुलत डुलत आला. नेमके त्या संध्याकाळी माझ्या एका मित्राचे रिसेप्शन होते. लवकर घरी पोहोचून रिसेप्शन्ला जाता येईल, असा प्लॅन केला. पण पुढे काय वाढून ठेवले आहे हे तेव्हा कळले असते तर? अर्थातच आम्हा दोघांची रवानगी ट्रकच्या मागच्या बाजूला झाली. दूध आणि शेण यांचा संमिश्र वास भरलेल्या त्या हौद्यात बसणे एक शिक्षा होती. थोडा वेळ सहन करू, असा विचार करून बसलो. पण प्रत्येक गाव आणि वस्ती इथे थांबे घेत घेत ट्रक निवांत चालला होता. अखेरीस अडीच तासांच्या रडतखडत चाललेल्या त्या प्रवासाचा अंत झाला आणि अक्षरशः सुटकेचा निश्वास टाकत आम्ही बसला हात करायला पळालो.

आता पहिल्याच ट्रेकमध्ये असे भयानक अनुभव आल्यानंतर एखाद्याचा धीर सुटून तो पुन्हा ट्रेकच्या नादाला लागला नसता. पण माझ्याबाबत झाले उलट. त्यातील गंमत समजल्यानंतर पहिला ट्रेक संपायच्या आधी पुढच्या ट्रेकचा प्लॅन ठरायला लागला. अर्थात निरनिराळ्या वाहनांचे अनुभव गाठीशी जमा झाले.

पहिला किस्सा ट्रकचा झाला, तर ट्रकचेच आणखी काही अनुभव सांगतो. पुणे-नगर ते पुणे-नाशिक या दोन रस्त्यांच्या मधल्या प्रदेशात नगर जिल्ह्यात काही भौगोलिक चमत्कार बघायला मिळतात. निघोजची रांजणकुंड, वडगाव ( दार्‍या) लवणस्तंभ, अणे-बेल्हा गावाच्या मधल्या अणेघाटातील गुलंचवाडीचा शिलासेतू आणि नारायणगावजवळील बोरी गावाच्या परिसरात सापडणारी ज्वालामुखीची राख उर्फ टेफ्रा. रांजणगावच्या महागणपतीचे दर्शन घेऊन निघोज गाठले आणि गावतील बारव आणि कुकडी नदीच्या पात्रातील रांजणकुंड पाहून वडगावला जाण्यासाठी थांब्यावर उभे राहिलो. दुपारची वेळ आणि आडबाजूचे गाव, यामुळे खूप वेळ गाडी आली नाही. अखेरीस एका ट्रकला हात केला. ट्रकचा मागचा हौदा पूर्ण भरलेला होता आणि पुढेही जागा नव्हती. अखेरीस सीट आणि गिअरबॉक्सचे दांडके यांच्या सांदीत कसाबसा बसलो. रस्ता अर्थातच प्रंचंड खड्ड्यांचा होता. त्यात छोटा घाट आला. ड्रायव्हर सतत गिअर बदलत होता. पण त्रास सहन करण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र ही लिफ्ट घेण्याचा एक फायदा झाला - ड्रायव्हरने वडगाव दार्‍याला जाणारा शॉर्टकट दाखवला.

tippers

असाच एक प्रसंग रसाळगडहून परत जाताना आला. गड बघून आंबिवलाला उतरलो, ते तिथे बस मिळेल या आशेने. पण ना बस आली, ना दुसरी कोणती गाडी थांबायला तयार. अखेरीस एका पिवळ्या रंगाच्या अजस्र टिपरला हात केला. तो थांबला, पण त्याने स्पष्ट सांगितले की पुढे जागा नसल्याने मागे हौद्यातून बसावे लागेल. कुंडलीतच बहुधा ट्रकच्या हौद्याचा योग असल्याने, नाइलाजाने वर चढलो, ते कप्पाळावर हात मारून घेतला. कारण हौदा सिमेंटच्या धुळीने पूर्ण माखला होता. बसणे शक्यच नव्हते, पण उभा असताना टेकलो तरी कपडे सिमेंटने भरले असते. वर घरच्यांचा गैरसमज व्हायचा, मुलं ट्रेकला जातात की कोठे कामाला? कोकणातील वळणदार रस्त्यावरून ट्रकने खेडच्या दिशेने प्रवास सुरू केला आणि आमची सत्त्वपरीक्षा सुरू झाली. कसेबसे कठड्याला धरून तो प्रवास संपवला आणि भरणा नाक्याला उभे असणारे लोक काय म्हणतील याची काळजी न करता मिसळ चापायला हॉटेलकडे वळलो.

अर्थात बहुतेकदा या ड्रायव्हर लोकांचे सहकार्याचे अनुभव येतात. ठाणे जिल्ह्यातील समुद्रकिनार्‍याचे छोटे गड पाहात टेकडीवरचा भवानगड पाहिला. पण आता लवकरात लवकर केळवे गाठून सफाळा स्टेशनकडे जाणारी बस मिळवणे आवश्यक होते, कारण उशीर झाला तर मेमू मिळणे अशक्य होते. एका ट्रक ड्रायव्हरला हात केला आणि अडचण सांगितली, त्याने अगदी योग्य जागी सोडले. तितक्यात एक रिक्षा सफाळ्याला चालली होती. त्याला थांबवून ट्र्क ड्रायव्हरला भाड्याचे विचारले, तर तो म्हणाला, "अरे, भाडे राहू दे, ती रिक्षा पकड पटकन, नाहीतर मेमू जाईल." आणि एक रुपयाही न घेता तो गेलासुद्धा. रिक्षात बसलो खरा, पण मंडळी, ही रिक्षा तुमच्या डोळ्यासमोर येईल तशी अजिबात नव्हती. रिक्षावाला रिक्षावर बॉडी चढवायला सफाळ्याला चालला होता... थोडक्यात, चालकाच्या समोरची काच सोडली तर रिक्षा सर्व बाजूंनी उघडी होती. अर्थात लंडन बसने असाच प्रवास करण्यासाठी लोक काही पाउंड मोजतात, इथे हा प्रवास मी चकटफू केला. कारण आमच्या गप्पा इतक्या रंगल्या की रिक्षावाल्याने पैसे न घेताच सफाळे स्टेशनला सोडले आणि पंधरा मिनिटांत मेमू आलीच.

सुरुवातीच्या काळात अगदी ट्रेकिंग ग्रूपबरोबर केलेले काही ट्रेकही मिळेल त्या वाहनातून केलेत. हरिश्चंद्रगडाला जाताना आळेफाट्यापर्यंत एस.टी.ने, तर तिथून खिरेश्वरपर्यंतचा प्रवास ट्रकने केला किंवा ढाक बहिरीला जाताना कामशेतपासून ट्रक बुक करून, त्यातल्या दोरीला पकडून धमाल करत जांभिवली गाठली, या फक्त आठवणी राहिल्या आहेत. कारण आता एस.सी. टू बाय टू बस असल्याखेरीज कोणत्याही ट्रेकचे बुकिंग होणे कठीण आहे.

पण प्रवासात येणार्‍या अडचणी आणि त्यातून मार्ग काढत जाण्यात खरी गंमत आहे. मधुमकरंदगडला जाताना, मित्रांनी मला वाईला जॉइन होण्यास सांगितले होते. पाचवडपर्यंत तरी मी पोहोचलो, पण पुढे गाडी मिळेना. एका चहाच्या टपरीपाशी थांबलो असता, एक पिक अप जीप थांबली, त्याच्या मागच्या हौद्यात खताची पोती होती. त्याने मला वाईला सोडण्याची तयारी दाखवली, पण गाडीत जागा नसल्याची अडचण सांगितली. अर्थात असल्या किरकोळ गोष्टीने डगमगेल तर तो ट्रेकर कसला? मी सॅकमधून वर्तमानपत्र काढले, त्या पोत्यांवर पसरवले आणि मस्त बैठक जमवली आणि मध्यरात्री बारा वाजता वाईच्या गाढ झोपी गेलेल्या स्टँडवर प्रवेश केला.

fevicol-ads

अर्थात या खाजगी वाहतूक करणार्‍या जीपने जायचे म्हणजे काही वेळा जिवावरचा खेळ होतो. रोहिडा पाहून मांढरदेवीमार्गे वाईला येत होतो. गाडी अक्षरशः खचाखच भरली होती, ड्रायव्हरने मागच्या फाळक्यावर उभे राहून स्टेफनीला पकडण्यास सांगितले. पूर्ण अंबाड घाटातून हा असा जिवावर उदार होउन प्रवास केला. अर्थात पुन्हा हा प्रकार कधी केला नाही. आपण फेव्हिकॉलची जाहिरात गंमत म्हणून पाहतो, पण आजही भारतातील ग्रामीण भागात हा असा प्रवास करावा लागतो, हे सत्य आहे. शेंडी-साम्रद रस्त्यावर एका खाजगी जीपवर माणसे अक्षरशः शक्य तिथे बसलेली पाहिली आहेत.

रांगणा ट्रेक संपता संपता असाच अनुभव आला. मी कुडाळकडून नारुरमार्गे रांगणा चढलो, पण परत जाताना गारगोटी-कोल्हापूरमार्गे जाऊ या, असा विचार केला आणि चिकेवाडी ही वस्ती गाठली. मात्र बस सात-आठ कि.मी. लांब भटवाडीतून जाते, असे समजले. आता घनदाट आणि अस्वले, गवे असलेल्या जंगलातून हे अंतर कापायचे म्हणजे जिवावरचा खेळ ठरला असता, मात्र कागल तालुक्यातील मुरगुड गावातील एक कुटुंब जीपमधून तिथे आले. रांगणागडावरची रांगणाई ही त्यांची कुलदेवता. त्यांनी लिफ्ट देण्याची तयारी दाखवली, पण गाडीत जागा नव्हती. अखेरीस जीपच्या टपावर कॅरियरला पकडून मी आणि त्या कुटुंबातील एक जण असे 'जब प्यार किसीसे होता है'मधील देव आनंदच्या स्टाइलने बसलो. अर्थात आम्हाला आशा पारेख दिसली नाही तरी चालेल, पण एखादी अस्वली दिसता कामा नये इतकीच इच्छा होती. जंगलातला रस्ता तो, असायचा तितकाच सपाट असणार. वाटेत असणारी दगडांच्या टेंगळ्यामुळे जीप अक्षरशः डोलत होती. त्यात वरून झाडांच्या फांद्याचा मारा. अखेरीस जीपमध्ये सरकून जागा करून देण्यात आली. आम्हा दोघांना आत घेऊन जीप पाटगावच्या दिशेने धावू लागली.

DSCN8592

कधीकधी प्रवासात अचंबित करणार्‍या काही गोष्टी पाहायला मिळतात. कासजवळचा भांबवली धबधबा पाहायला गेलो असताना, अचानक घाटाई मंदिरापाशी ही जुनी मॅटॅडोर दिसली. हिला शेवटचे कधी बघितले होते, ते आठवतही नव्हते.

शेवटी येऊ या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याच्या एस.टी.बसकडे. बरेच जण 'लाल डब्बा' म्हणून हिणवत असले, तरी आम्हा ट्रेकर्ससाठी इच्छित स्थळी घेऊन जाणारी आणि कोणताही खाजगी वाहनचालक गाडी घालू धजणार नाही अशा रस्त्यावरून घरी परत नेणारी आमच्यालेखी 'लाल परी' आहे.
maharashtra-state

या एस.टी. बसच्या प्रवासात झालेले काही किस्से लिहितो. बसचा एक छोटासा प्रवास एका विशेष कारणासाठी माझ्या लक्षात राहिला. एकदा नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सोनगड, पर्वतगड आणि डुबेरगड हे तीन किल्ले बघायचे ठरवले होते. पहाटे चार वाजता संगमनेर स्टँडवर चाचपडत उतरलो आणि एका गाड्यावर चहाने नरडे शेकून खाजगी जीपमधून अकोले स्टँडकडे निघालो. जीपचे ड्रायव्हरमामा भलतेच बोलके निघाले. माझी भलीमोठी ट्रेकिंग सॅक बघून त्यांनी चौकशी सुरू केली. ते पेमगिरी या गावचे होते. पेमगिरी गावाच्या पाठीशी टेकडीवजा, पण ऐतिहासिक महत्त्व असलेला पेमगिरी उर्फ शहागड आहे, शिवाय देवनागरी शिलालेख असलेली गावातील बारव आणि थोड्या लांब अंतरावर असणारा प्रचंड वटवॄक्ष ही सर्व ठिकाणे पाहिली होती. साहजिकच ड्रायव्हरमामांनी मला थेट अकोले स्टँडमध्ये समशेरपूरच्या गाडीत बसवून दिले. इतक्या भल्या पहाटे बस कशासाठी? असा मला प्रश्न पडला. कारण ड्रायव्हर, कंडक्टर आणि बसमधील एकमेव प्रवासी मी, असे तिघांनीच तो प्रवास केला. अर्थात समशेरपूर गावात पोहोचल्यावर, कॉलेजला जाणार्‍या विद्यार्थ्यांच्या गर्दीचा गराडा पडला आणि मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले.

बर्‍याचदा एस.टी.ला खूप गर्दी होते, साहजिकच बसायला जागा नसेल तर उभे राहून प्रवास करावा लागतो. बसच्या मागच्या भागात जागा नसेल, तर ड्रायव्हरच्या केबिनमध्ये गिअर कव्हरवर बसून प्रवास करण्याशिवाय पर्याय नसतो. खरे तर मला ड्रायव्हरच्या केबिनमधील सीट फार आवडते. प्रवासात फुल्ल १८० अंशाचा पॅनोरमा बघायला मिळतो. ही सीट कंडक्टरसाठी राखीव असते, पण काही वेळा इथे वाहक बसत नाही, साहजिकच मी ती बळकावतो. पण एकदा मला अशा ठिकाणी बसून प्रवास करावा लागला आहे , ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. रायरेश्वर बघायचे बरेच दिवस मनात होते, म्हणून पहिल्या बसने भोर गाठले. त्या दिवशी कोणत्यातरी संघटनेमार्फत रायरेश्वरला शपथ घ्यायचा उपक्रम होता, त्यांच्याच टेम्पोमधून थेट रायरेश्वरला वरपर्यंत जायला मिळाले. रायरेश्वर पाहून मधल्या वाटेने केंजळगड गाठला. उतरून खाली आलो आणि आंबवड्याचा पूल आणि पंतप्रतिनिधींची समाधी पाहून भोर गाठले तो रात्रीचे आठ वाजलेले. स्टँडवर पुणे बस खचाखच भरली होती. पुढच्या बसमधून जाऊ या, असा मी विचार करत होतो, तेव्हा समजले की हीच शेवटची बस. आता ही बस पकडण्याला पर्याय नव्हता. बसमधे मुंगीला पाय ठेवायला जागा नव्हती, तिथे मी कसा जाणार? शेवटी ड्रायव्हर चढला आणि मला विचारले, "येणार का?". "कसं?" माझा प्रतिप्रश्न. त्याने हात देउन मला वर घेतले आणि ड्रायव्हरची सीट आणि दार यांच्या मधल्या जागेत - म्हणजे थेट पुढच्या चाकावर मी बसलो. पाय लांब करून बसल्यावर माझा पाय आरामात गाडीच्या अ‍ॅक्सिलेटरपर्यंत पोहोचला. मनात आणले असते तर ते काम मी करू शकलो असतो. दुर्दैवाने सगळे प्रवासी पुण्याचे असल्याने थेट स्वारगेटपर्यंत मला हा असा प्रवास करावा लागला.

शेवटचा किस्सा लिहितो आणि थांबतो. ज्या एस.टी. बसविषयी मी कृतज्ञ आहे, तिने एक चांगलाच लक्षात राहणारा अनुभव दिला. वास्तविक हा अनुभव मी मागे लिहिला आहे. उन्हाळ्याची सुट्टी घेऊन कोठेतरी ट्रेकला जाऊ या, असा आमचा खल चालू होता. उन्हाळा असल्याने जंगलट्रेक ठरवायचा, म्हणून कोल्हापुर जिल्ह्यातील शिवगड आणि मुडागड नक्की केले. दुसर्‍या दिवशी मुडागड पाहून दुपारी तीनला पडसाली या मुडागडच्या पायथ्याच्या गावातील शाळेत गप्पा मारत बसलो. शेवटची एस.टी. संध्याकाळी ५ वाजता असली तरी ती रद्द होऊ शकते, म्हणून आम्ही चार वाजताची एस.टी. पकडायचे ठरवले. घुर्रर्र आवाज करीत चारची एस.टी. गावात दाखल झाली आणि आम्ही चौघे आणि दोघे गावकरी असे मोजकेच लोक एस.टी.त बसलो. कंडक्टरने दहा मिनिटात तिकीट काढायचे काम संपवले आणि आमच्या गप्पात सामील झाला. आम्ही किल्ला बघायला आलो ही माहिती त्याला नवीन होती. मुडागड वगैरे त्याला माहीत नव्हते. मी माझ्याकडील माहितीची प्रिंटआउट त्याला दिली. आमचे हे चर्चासत्र सुरू होते, तोपर्यंत अचानक जळका वास येऊ लागला. सगळे एकमेकाकडे बघू लागलो, तोपर्यंत धूर यायला सुरुवात झाली. ओरडून आम्ही ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली आणि खाली येऊन एस.टी. बसला वळसा घातला. समोरचे दृश्य पाहून आमचे डोळे विस्फारले आणि आ वासला गेला. कारण मागच्या बाजूचे ड्रायव्हरच्या बाजूचे चाक अक्षरशः तुटून अर्धवट बाहेर आले होते. आणखी थोडा उशीर झाला असता तर... नेमक्या त्या ठिकाणी मोबाइलला रेंज नव्हती. ओढ्याच्या काठी एका ठिकाणी रेंज येते असे समजल्याने पळत जाऊन मी रंकाळा स्टँडला फोन केला. पण दुसरी बस लवकर येणार नाही असे समजले. पण तेवढ्यात एक खाजगी जीप तिथे आली आणि थोड्या पैशाच्या बदल्यात त्याने आम्हाला बाजारभोगावला सोडण्याचे कबूल केले. हा अपवाद सोडला, तर एस.टी.चे बहुतेक अनुभव चांगलेच आहेत.

अर्थात काळानुसार गोष्टी बदलतात. ट्रेकला जायचे तर कमी लोक असतील तर स्वत:च्या गाड्या बाहेर निघू लागल्या. अगदी एस.यू.व्ही.तून प्रवास होतात. मोठा ग्रूप असेल तर एस.सी. बस निघते, पण या सगळ्यात आधीच्या प्रवासातील आठवणी निघतातच. कधी एखाद्या ट्रेकला कोणीही नसते किंवा मंडळी ऐन वेळी टांग मारतात, मग मी खांद्यावर सॅक टाकून एस.टी.ने निघतो. कधी अडले तर ट्रक, जीप यांना हात करतो आणि अशाच अनुभवांचा आनंद घेतो.

एकूण काय, एकदा प्रवासाला बाहेर पडल्यानंतर अशा अनुभवांना सामोरे जायची तयारी पाहिजे, नाहीतर गुमान घरी बसावे. केल्याने पर्यटन मनुजा का चातुर्य येते, ते अनुभवातून समजते. तर मंडळी, हे अनुभव आवडले असतील तर जरूर सांगा आणि जमल्यास तुमचेही अनुभव लिहा.

श्रेयनिर्देश: चित्रे आंतरजालावरून साभार.

20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

26 Oct 2019 - 8:26 am | पाषाणभेद

खाजगी ट्रकचालक जे आंतरराज्य वाहतूक करतात ते सहसा लोकल पॅसींजरला लिप्ट घेत नाहीत. पण दिलीच तर छान गप्पा मारतात. अन वरतून भाडेही घेत नाहीत. फक्त ते स्पिडोमिटरच्या काट्यावर चालतात. आपले लोकल खडी डबरवाले मात्र एकदम भन्नाट वाहन चालवतात. रस्ता माहितीचा असतो त्यांचा.
खाजगी वाहनातून प्रवास करणे हा वेगळाच अनुभव असतो. प्रत्येक खेप निराळा अनुभव देत जाते. त्याने माणूस निगरगट्ट होत जातो. स्वभाव पक्का होतो. माणूस बुळा राहत नाही. जशास तसे.

राज्य महामंडळाची एस्टी हा भटक्यांचा एक वीक पॉईंट असतो. कितीही गबाळी असली तरी ती आपलीच एस्टी असते.
(अवांतरः एस्टी महामंडळ मारे एसी बस आण, शिवनेरी आण, ह्या किल्याची बस आण, परिवर्तन कर असे करत असले तरी त्यांच्याकडे एकच मागणी आहे की बस साधीच ठेवा. कॉस्मॅटीक बदल करू नका. जुन्या आकाराची, सीट व्यवस्थेची, पुढच्या सीटला मागे दांडी असलेली, अन मुख्य म्हणजे तीन बाय दोन (३*२) अशी व्यवस्था असलेली बस खरोखरच चांगली होती. त्यात झोपही व्यवस्थीत होत असे. सीट जास्त असल्याने महामंडळाही परवडत होती.
उगाच राजकारण करून , एस्टी महामंडळाला तोट्यात घालू नका. राजकारण्यांचे पोट इतर ठिकाणी भरेल पण असे दात कोरून अन कर्मचार्‍यांना वार्‍यावर सोडून पोट भरू नका अशी विनंती या प्रतिक्रीयेद्वारे आहे.)

आपले मिपा बरेच पत्रकार, रेडीओवाले किंवा शासकिय अधिकार असलेले लोक वाचतात.
(जरी येथले सभासद नसले तरी). तर या दिवाळी अंकाच्या निमीत्ताने हा लेख अन विशेषता: वरील एस्टी बद्दल मत योग्य लोकांपर्यंत जावे हि इच्छा.

(अती अवांतरः शासन किंवा प्रशासन - जे असेल ते - त्यातील लोकांच्या मनात थोडी कल्पनाशक्ती असावी, सामान्य जणतेच्या प्रश्नाबद्दल कणव असावी. ती तर असतेच पण कामाच्या ठिकाणी वापरायला हवी.)

एसटीत सुधारणा शक्य नाही. बसायचं तर बसा, उभे रहा.
एकूण तुम्हास सार्वजनिक वाहन लाभदायक नाही. किस्से मजेदार आहेत. आता एसटी कधी यावर गाववाल्यांच्या उत्तरावर कधीच विश्वास ठेवत नाही. त्यावेळेअगोदर पाऊणतास खरी वेळ असते आणि येतेही. भंडारदराला कळले मुंबई बस साडेबाराची आहे. पावणेबारा झालेले. पटकन बाजूच्या हॉटेलात गेलो. "चहा तयार आहे का?" तो माझ्या ग्लासात घेतला पैसे दिले आणि बाहेर आलो तर बस आलीच. मला घेऊन गेली. चहा पीत प्रवास सुरू झाला. एकट्या माणसासाठी एसटी येते धावून. फक्त स्टॉपला उभे राहा. समोरच्या विरुद्ध बाजूला सावलीतही नको. थांबणार नाही.

पाषाणभेद's picture

26 Oct 2019 - 9:13 am | पाषाणभेद

एस्टी वेळे आधी येते? अजबच आहे राव!
तुम्हाला मिळालेली पावणे बाराची एस्टी साडे अकरा किंवा अकराची असावी.
बाकी एस्टीची वाटचाल खाजगीकरणाकडे जाणून बुजून केली जात असल्याने त्यांच्या फेर्‍यांवर परिणाम झाला आहे.
अनेक सवलतींची खैरात एस्टी महामंडळ देत असते. ती बंद केली पाहिजे.

कंजूस's picture

27 Oct 2019 - 4:41 am | कंजूस

नाही. रोज येण्याची वेळ गाववाले सांगतात. खरी वेळ अगोदरची असू शकते. हा अनुभव तीनचार ठिकाणचा आहे.

जेम्स वांड's picture

26 Oct 2019 - 11:06 am | जेम्स वांड

काय ते अचाट किस्से अन काय ते अचाट अनुभव! च्यामारी दुर्गविहारी नाव सार्थ करताय की कराडकर तुम्ही, प्रचंड आवडला तुमचा समृद्ध अनुभव खजिना. तत्कालीन मावळे करवंदीच्या जाळीतून वाट काढीत तुम्ही वाहने बदलून बदलून काढताय. हर हर महादेव

रोचक, अचाट अनुभव! अजूनही लिहा अनुभव असल्यास.

जातीवंत भटका's picture

26 Oct 2019 - 11:56 pm | जातीवंत भटका

बऱ्याचदा येष्टीने प्रवास करताना , पु.ल.च्या म्हैस मधली दृश्यं डोळ्यासमोरून जातात...

कंजूस's picture

27 Oct 2019 - 4:48 am | कंजूस

इंदिराचे दुसरे नाव प्रियदर्शनी. पण ट्रेकरसाठी एसटीच प्रियदर्शनी. आपण दमून स्टॉपवर उभे राहतो आणि मग तो मोठा होत जाणारा बसचा आवाज जवळ येतो तेव्हा अत्यानंद होतो. रेल्वेची वाट पाहणारा स्टेशनवरचा प्रवासी रेल्वे नसली तरी कंटाळून जात नसतो. आडगाव आडरस्त्यावरचे संध्याकाळचे एसटीचे वाट पाहणे वेगळे.
लेखकाशी सहमत.

चाणक्य's picture

27 Oct 2019 - 10:48 pm | चाणक्य

'प्रवासात काय अनुभव येतील'....ईति बटाट्याच्या चाळीतील कोचरेकर मास्तर.
मस्त लेख हो दुवि. भरपूर भ्रमंती झाली आहे हो तुमची.
आम्ही एकदा ट्रेनच्या ईंजिनाला हात दाखवून थांबवले होते आणि त्याला मागे लटकून प्रवास केला आहे. कर्जतवरून लोणावळ्याला ट्रेन्स येतात तेव्हा घाटामुळे त्यांना डबल ईंजिन लावतात. मग लोणावळ्यावरून हे एक्स्ट्राचं ईंजिन जातं परत कर्जतला. मग वाटेतल्या ठाकरवाडी/ वस्तीवरची ठाकर लोक जातात या ईंजिनावर चढून. आम्ही राजमाची उतरून ठाकरवाडीला आलो आणि कर्जतला जायचं होतं. तेव्हा असंच एक ईंजिन जात होतं. आम्ही हात केला तर ड्रायव्हरने थांबवलं. मग आम्ही ईंजिनच्या मागे उभे राहिलो आणि कर्जतला आलो. मस्त मजा आली होती.

जॉनविक्क's picture

27 Oct 2019 - 11:45 pm | जॉनविक्क

व भीमाशंकर गाठले. महाशिवरात्रीचा दिवस एक दिवस मुक्कामाच्या तयारीने आम्ही गेलो पण दर्शन चटकन झाले आणि उरलेला वेळ कसा घालावावा हा प्रश्न पडला, मी कल्पना काढली आलोत बसने पण आता ट्रेकच्या मार्गाने उतरुयात. एकूण 5 जण होतो, तिघे जण बुळे निघाले व त्यांनी अजिबात माहीती नसलेल्या जँगलात पाऊल ठेवायला ठाम नकार दिला. एक जण तयारीचा होता, म्हटला हरकत नाही उतरुयात. इथून खांडस व पुढे कर्जत असा प्लॅन ठरला. गाईडला 50 रु दिले आणी नेमकं कुठून कसे उतरायचे जाणून घेतले, 200-300 मीटर पुढे गेलो तितक्यात तो गाईड पळत पळत जोर जोराने हातवारे करत मागून येताना दिसला.

आमच्यापाशी येऊन म्हणाला, मी रस्ता दाखवला व कोणत्याही परिस्थितीत उजविकडे वळणाऱ्या वाटेला जाउ नका हा सल्लाही दिला पण मनात धाकधूक होती की तुम्ही चुकलात तर काय. पुन्हा शोधाशोध व उसापर आम्हालाच करावी लागेल व त्यात मी तुम्हाला असेच सोडले म्हटल्यावर अजून पंचाईत होईल. 1 तास थांबा खालून दर्शनाला लोक आले होते ते परतणार आहेत त्यांचे सोबत गाठ घालून देतो व तुम्ही एकत्र जा. आम्हाला काय ? सोनेपे सुहागा... जय भोलेनाथ म्हणून तिथंच आडवे झालो.

तास दीड तासाने ते लोक आले व त्यांनी आमची चौकशी केली, गाईडने आमचा रेफरन्स दिल्याची खात्री पटल्यावर सोबत घेतले. ते सर्व सात लोक उत्तर भारतीय होते व एक जण नेपाळी. सर्वांची लष्करात शिपाई म्हणून सेवा झाली होती व आता ते सिक्युरिटी गार्ड म्हणून एजन्सीमधे भरती झालेले होते त्यांचे ट्रेनिंग सेंटर तिथेच कुठेतरी आहे असे ते म्हणाले, वाटेत त्यांनी भरपेट पुरी भाजी व सोबत आणलेले काही पदार्थ खायला घातले. जे काही उरले सर्व वाटेत भेटणाऱ्या स्थानिक आदिवासीना देऊन टाकले, गप्पा टप्पा व निसर्गाचा आस्वाद घेत चार साडेचार तासात खांडसला आनंदात पोचलोही, निरोपाची वेळ झाली असे वाटून आता पुढे सर्वात जवळच्या रेल्वे स्टेशनला कसे पोचायचे विचारल्यावर ते म्हणाले आम्ही आता कर्जतला जाणार आहोत आमची जीप इतक्यात येईलच तर तुम्हीही कर्जतपर्यंत आमच्या सोबतच चला . हर हर महादेव!

तिथून कर्जत पर्यंत त्यांच्या जीपमधून (त्यांच्या भाषेत त्यांच्या मर्सिडीज मधून) धमाल प्रवास केला, आमचे नामकरणही त्यांनी जवान असे केले होते. व आम्ही ड्रायव्हरला ओबडधोबड रस्त्यावरून गाडी सुसाट सोडायला सांगितली त्यामुळे तो ही आम्हाला घाबरवायचे आव्हान स्वीकारून निर्मनुष्य रस्त्याने गाडी वेगाने हाकत होता... अर्थात ते गचके, वेग आम्ही पूर्ण एन्जॉय करत कर्जतला पोचलो. तसे तर अर्ध्या दिवसाचाही सहवास नाही पण निघताना जवळच्या मित्रांना निरोप दिल्याची भावना होत होती, पुन्हा भेट होणार नाही हे माहीत असूनही नशिबाने परत कुठे तरी गाठ पडावि असे वाटतच त्यांचा जड मनाने निरोप घेतला

नाखु's picture

28 Oct 2019 - 7:22 am | नाखु

आणि खुमासदार अनुभव शिदोरी,
खरेच मरापम हीच गावखेड्यातील जीवनवाहिनी आहे.
फस्कलास खाजगी गाड्या शहरात धंदा अडवणूक करतील पण या दुर्लक्ष आणि दुर्गम भागात फक्त लाल डबा सेवा देईल

नाखु

वा वा फार जुन्या आठवणी जाग्या केल्यात.

मे महिन्याच्या एका रणरणत्या दुपारी रायगड उतरलो आणि तसाच जिजाऊंची समाधी बघायला पाचाडला निघालो. बुटांमधूनही पायांना चटके बसत होते. त्यात जिजाऊंची समाधी तर काळ्या कातळातली. बूट काढले आणि उड्या मारतच कसेबसे डोके टेकले.

त्यानंतर सुरु झाला तो जीवघेणा प्रवास. बाभळीच्या फाटक्या सावलीत उभे राहण्यापेक्षा बरे म्हणून एका सिमेंटने माखलेल्या ट्रक मध्ये चढलो आणि पुढचा तासभर धरम-पाजींसारखा शोले-स्टाईल दोन दोऱ्या धरून उभ्याने प्रवास केला. त्यात माझी परिस्थिती जास्त वाईट होती कारण ना रस्ता सरळ होता ना समोर कोणी बसंती नाचत होती.

सुधीर कांदळकर's picture

31 Oct 2019 - 5:47 pm | सुधीर कांदळकर

मजा आली. एसटीवरचे प्रेम पाहून बरे वाटले. कितीही रांगडी असली तरी आई/ताई आपल्याला आवडतेच.

मेमू म्हणजे काय? मेमू गाठून देणार्‍या रिक्षाचे वर्णन मस्त केले आहे. आनंद शोधण्याची वृत्ती झकासच.

धन्यवाद.

कंजूसरावांचा प्रियदर्शिनी शब्द फारच आवडला. त्यांनाही धन्यवाद.

प्रसाद_१९८२'s picture

6 Nov 2019 - 3:52 pm | प्रसाद_१९८२

आवडले. पाभेंचेही लालपरीप्रेम आवडले. एसटी खैरात वाटत नाही तर फक्त गरजूंना मदत करते. लुटारू खाजगी कंपन्या आणि एसटी यात हाच फरक आहे.

धन्यवाद.

झकास जमला आहे लेख! मजा आली तुमचे अनुभव वाचायला.
असेच मस्त मस्त अनुभव आणि किस्से आमच्या बरोबर शेअर करत राहा.

श्वेता२४'s picture

6 Nov 2019 - 1:04 pm | श्वेता२४

.

माझीही शॅम्पेन's picture

6 Nov 2019 - 4:12 pm | माझीही शॅम्पेन

सुन्दर लेख , उत्तम अनुभव , मजा आलि

मुक्त विहारि's picture

21 Nov 2019 - 9:07 pm | मुक्त विहारि

अनुभव आवडले.

ऋतु हिरवा's picture

27 Mar 2020 - 5:37 pm | ऋतु हिरवा

अनुभव भन्नाटच आहेत. एस टी च्या पुढच्या चाकावर बसून गेलात ते भारी !