कथा-चिखल गुलाब

मकरंद घोडके's picture
मकरंद घोडके in जनातलं, मनातलं
17 Oct 2019 - 5:03 pm

जेव्हा पहिल्यांदा या इथं सायकल चालवायला शिकलो असेल तेव्हा अगदी हाफचड्डी होतो मी ..आता फक्त वय वाढलंय बाकी सगळं आहे तिथं आणि तसंच आहे. फुलपॅन्टवाला मोटरसायकलस्वार असा विचार करत नदीच्या कडेने निघाला. त्याची नजर पुन्हा तेच सारं शोधत पुढे निघाली.

भला मोठा नदीकाठचा विस्तार.कपडे धुवायला आणि म्हशी आंघोळीसाठी म्हणून फार वर्दळ राहते या पायरस्त्याला! शाळकरी पोरं , रानात जाणारे गडी-बाया,एसटीतुन उतरणारे उतारू असा सगळा गोतावळा सदा न कदा इथंच वस्तीला असतो.
काही आंब्याची काही अशोकाची आणि खूप सारी नारळाची एका ओळीत असणारी झाडे आणि वर अमर्याद निळ्या नवलाईचं आभाळ तसंच खाली निळी हिरवी लांबच लांब नदी.

इथल्या वाऱ्यात जादू आणि आणि एक प्रकारचा मोकळा गंध आहे.
फुलपाखराला बरोब्बर ठाऊक असतं कोणत्या फुलात मध असतो
तसं ते माणसाला पण ठाऊक असतंय .ते आपसूकच अशा जागेला जाऊन घट्ट चिकटून बसतंय! सगळ्या वयातली माणसं कधी ना कधी इथं येणार म्हणजे येणारच!

... एकदाचं ते झाड समोर आलं आणि तो बुंधाही दिसला.
बदाम बाण आहे तिथेच होता.. थोडा पुसट झाला होता खरा पण खाणाखुणा अजूनही तशाच होत्या.

२३वर्षांपूर्वी....

बाजाराचा दिवस असला की चौफेर गर्दी होते.भरपूर खायला मिळतं.बाजार कसा प्रफुल्लित झालेला असतो.दिन्याची आई तिथं हार ओवत बसली होती.पुढ्यात झेंडू मोगरा आणि गुलाब सजला होता.वर ढग मधे मधे गुरगुरत होते.आज पडणार पाऊस बहुतेक अशी चिन्हं होती.
हे एवढूस हाफचड्डीतलं पोर खांद्याला दप्तर लावून कुठून सगळ्यांना ढुसण्या मारत आलं आणि दिन्याच्या आईसमोर गपकन उभं राहिलं.
गुलाब कशीये गड्डी?
पाच ला वाटा!
चार गड्डी दे मावशे
या बया एव्हढी फुलं? कुणाचं लगीन काढलं व्हय रे भाड्या? आन एवढे पैशे कुटून आनले तू?
तू दे बरं मला उशीर होतोय..
पिशवी हँडल ला लटकवली दप्तर हातानेच दोन्ही काखेत फिट्ट केलं आणि तो बुंगाट निघाला..
बाजार ओलांडून खालच्या दगडी आळीतून वर सायकल हाणीत गावाच्या मूळ पारावरून उजव्या अंगाला रॉकेल च्या दुकानासमोरची गर्दी त्याने किरिंग किरिंग घंटीने हलवली आणि कसलातरी आनंद मनात घेऊन तो जोशाने सायकल मारतच राहिला..
शाळेचं आवार नजरेत आलं तसं एकदम शिस्तीत हळूच सायकलवरून उतरून एका कोपऱ्यात लायनीत सायकल लावली.तशा तिथं सायकली चार पाचच होत्या पण त्या सगळ्या एका लायनीत!
हापचड्डीत ठेवलेली चुरगळलेली गांधी टोपी काढली हातानेच सायकलच्या शिटावर अंथरून एकसारखी केली.नाकासमोरून डोक्यावर चढवली आणि अनवाणी पायाने झपाझप वर्गाकडे निघाला.

आता आतमध्ये गेलं की चिडीचूप बसायचं आणि बघत राहायचं काय होतंय ते..ही वेळ सगळ्यात जास्त हवीहवीशी आणि जास्त जीवघेणी.चुकून जरी नजरानजर झाली तरी एवढा खोलवर आणि गोड असा खड्डा पडतो पोटात!ते मन का हृदय काहीतरी असतंय का नसतंय तिथं कुठंतरी काहीतरी हालतं आतमध्ये!
तो जागेवर जाऊन बसला.शाळेचे टोल झाले.प्रार्थना झाली,परिपाठ झाला आणि गुरुजी वर्गात शिरण्यापूर्वी जी दहा सेकंद होती तेवढ्यात त्याने तिला पाहून घेतलं.ते नेमकं शेजारी बसलेल्या निल्याने बघितलं.
माझ्याकडं काय बघतो रं माकडा? गुरजी आले ते बघ.
तो काहीच न बोलता खिडकीतून बाहेरच्या हापशावर पाणी खेळत असलेली पोरं बघत बसला.
एकदम त्याच्या लक्षात आलं गुलाबाची पिशवी तिकडे सायकललाच राहीलीये. पण नंतर ठीक वाटलं-उगा वर्गात त्यावरून दंगा नको.
मग एका मागोमाग टोल पडत राहिले भाषा गणित विज्ञान नागरिकशास्त्र असे अंगावर येऊन गेले पण त्याने ते काही मनावर घेतले नाहीत-मनात फक्त गुलाबाची पिशवी आणि संध्याकाळचे शाळेचे शेवटचे टोल! शाळा सुटली..

एकदाचा सूर्य मावळला.आता हळूहळू अंधार पडत जाणार डोंगरावर देवीची आरती होणार आणि नेमकी त्या नदीच्या बाजूने ती आपल्याला घरी जाताना दिसणार!
मी तिला भेटणार आणि ही गुलाबाची फुलं तिला देणार आणि बोलणार.
बोलणार? काय बोलणार मी?तुझ्या वर्गात आहे तू मला आवडते? तू छान दिसते? तुला गुलाब छान दिसेल? नाही नाही..
मी एवढं बोलू शकेल? ती ऐकेल ते? पण ती थांबेल का? ती मला ओळखेल का? आणि ती काय बोलणार? त्याने शाळा सुटली तशी सायकल काढली आता मैदानात पोरं क्रिकेट लंगडी खो खो कबड्डी असे डाव मारून खेळत होती काही चिंगळी मधेच सायकलचा मोकळा टायर कोवळ्या झाडाच्या काठीने निबार हाणत धावत खेळत होती.

साडे सहा वाजले आणि एकदाची देवळाची घंटा वाजली.देवाची आरती सुरू झाली तसं त्याच्या छातीत धड धड होऊ लागलं! त्याने आरती डोक्यावर फिरवून डोळ्यावर ती गरमाई घेतली. धावत जाऊ सायकल स्टँड काढलं. फिरवून पलीकडे पाय पॅडलवर टाकला.

दोन चार पावसाचे थेंब झेलत त्या बहारदार झाडाच्या बाजूने ती निघाली होती. तेलाने चिपचिप भिजवलेल्या आणि लाल रिबिनीने सजवलेल्या दोन वेण्या, गोऱ्या रंगा वरचढ अशी पांढरी फटटक पावडर.नाक एकदम सरळ सरळ.डोळे बोलके टपोरे आणि पावसाच्या चाहुलीने विस्फारलेले.

त्याच्या सायकलीने वेग पकडला.शीट कुरकुरलं.खड्ड्यात जाऊन लांबवर चिखल राड्यातून ते बाहेर आलं आणि सरळपट्टीत मातीत नक्षी उमटवत गेलं.या सायकलच्या नळीला कधीतरी वाटलं असणार कोणीतरी आपल्या बोकांडी बसावं आणि हळूच हँडलच्या दोन्ही बाजूला जे हात आहेत तिथे एकदम वीस बोटं लहरावीत-दहा निगरगट्ट आणि दहा एकदम कोमल घट्ट. एकदम किरिंग किरिंग घंटी वाजावी... अहाहा यड्या दंगाच सगळा!त्याने खोल श्वास घेतला..हँडल ला मुठी आवळल्या..
ती झपाझप घराकडे निघाली वर सगळा काळाशार ढगांचा गुरगुर आवाज येत होता त्यामुळे ती जराशी घाबरली होती तरी तसं न दाखवता चालतच होती! इतक्यात कडाडकन वीज कोसळण्याचा आवाज झाला आणि कुणीतरी वरून फोटो काढावा तसं गाव चमकलं!
तिने त्या प्रकाशात भोवताल बघितला..नदी मध्ये छोटे छोटे थेंब पडताना दिसले..डोंगरावरच्या देवीचा भगवा झेंडा दिसला.. आणि एकदाचा पाऊस चौफेर सुरू झाला.. लगबगीने ती आडोसा शोधू लागली.

त्या गडबडीत रस्त्यावरचा सगळा चिखल तुडवत ती एका झाडाच्या बुंध्याजवळ आली.
डोक्यावरच्या दोन्ही बाजूने लाल रिबिनीतून पाणी टपटपू लागलं.

त्याने लांबूनच पाहिलं आणि बरोब्बर ओळखलं..आपल्या मनाने आपला मानलेला माणूस कसा पण असू दे कुठं पण असू दे तो ओळखू येतोच!
पण पुढे जाऊन बोलायचं कसं हे काही ठरेना..
मनाचा हिय्या करून तो सायकलवर बसला.मुठी गच्चम आवळल्या आणि टांग मारली..

तिच्या पायामुळे जिथे जिथे चिखल खोलगटात आत गेला होता त्या प्रत्येकामध्ये त्याने खाली वाकून गुलाब पेरले आणि उरलेले गुलाब परत पिशवीत टाकले.हाताला थोडे काटे बोचले खरे पण आतून ऊर भरून आलेला.

ती एकदम गर्रकन वळली तसा पाऊस टपोरे थेंब घेऊन पडू लागला आणि समोर फुललेला चिखल गुलाब तिने पाहिला!

आता पाऊस जोरात पडतोय,तसा तो नेहमी असतोच पण आपण काही नेहमीचे सवयीचे नसतो ना,कायम बदलत असतो क्षणाक्षणाने.. किंबहुना मोठेच होत असतो.पण आता त्या सायकलवाल्याला खूप आतून लहान व्हावंसं वाटत होतं कारण त्याला ते कळलं होतं हे जे समोर घडतंय ते पुन्हा होणे नाही!

दोन वेळा नजरेनेच तो तिला व्यक्त झाला.तीही बहुतेक लाजून समजायचं ते समजली असणार कारण जाताना तिने दोन वेगवेगळ्या भावमुद्रा बनवल्या ज्या आजही या पावसासारख्या ओल्या आणि तजेलदार आहेत.
ती निघून गेली तरी तो कितीतरी वेळ तिथेच उभा राहून भिजत राहिला.
मग सहज लक्ष त्या आडोशासाठी म्हणून असणाऱ्या झाडाकडे गेलं आणि तिथे बदाम बाण कोरलेला पाहून त्याला कितीतरी वेळ ते आपल्यासाठीच कुणीतरी आधीपासून कोरून ठेवलं आहे असं वाटून गेलं..

त्या झाडाच्या पोटावर कोरलेल्या बदामबाणात तो सायकलवाला रोज श्वास घेत राहिला..
छप्पन हजार देऊळ घंटा एक साथ आणि तिच्या आठवणींची बरसात- रोज होते.आता पुन्हा पाऊस पडला नाही तरी चालेल. सायकलवाल्याचं मन मात्र कायमचं ओलचिंब झालेलं असतं !

आज..

त्या रस्त्याच्या कडेला मोटारसायकल लावून तो त्या झाडाच्या बुंध्याजवळ गेला तो बदाम बाण हात लावून पाहिला.. मग उगाच त्या उन्हाने रापलेल्या रस्त्याकडे बघत राहिला.. डोळ्यावरचा चष्मा काढला..डोळ्यात हे पाणी कुठून आलं ते काही कळेना.. पुन्हा चष्मा लावला आणि नदीच्या कडेकडेने एक एक जागा न्याहाळत मोटरसायकलवरून निघून गेला..

कथाअनुभव

प्रतिक्रिया

सुमीत's picture

17 Oct 2019 - 8:15 pm | सुमीत

हळुवार मनाला भिडनारी

यशोधरा's picture

17 Oct 2019 - 9:38 pm | यशोधरा

मस्त कथा. आवडली.

पद्मावति's picture

17 Oct 2019 - 11:16 pm | पद्मावति

मस्तंच!

दादा कोंडके's picture

17 Oct 2019 - 11:40 pm | दादा कोंडके

मस्त!

पुणेकर भामटा's picture

18 Oct 2019 - 12:49 am | पुणेकर भामटा

तुमची कथालेखनशैली आवडली!

जेम्स वांड's picture

18 Oct 2019 - 7:41 am | जेम्स वांड

कसला फ्लो आहे, पावसाळ्यातलं गाव एकदम उभं झालं डोळ्यामहोरं

श्वेता२४'s picture

18 Oct 2019 - 11:06 am | श्वेता२४

लिखाणाची शैली अतीशय ओघवती आहे. लिहीत रहा. अजुन वाचायला आवडेल.

प्राची अश्विनी's picture

18 Oct 2019 - 11:19 am | प्राची अश्विनी

आवडली.

शित्रेउमेश's picture

18 Oct 2019 - 1:10 pm | शित्रेउमेश

मस्त... अलवार प्रेमाची कथा....

मस्तच लिहिलंय .. छान वाटलं वाचून .. धन्यवाद ..

ज्योति अळवणी's picture

18 Oct 2019 - 7:07 pm | ज्योति अळवणी

आवडली कथा. लिखाण ओघवंत

जॉनविक्क's picture

19 Oct 2019 - 1:22 pm | जॉनविक्क

गोष्ट आवडली

नावातकायआहे's picture

20 Oct 2019 - 10:09 pm | नावातकायआहे

लिहीत रहा

फारएन्ड's picture

20 Oct 2019 - 11:08 pm | फारएन्ड

जबरी आहे! आवडली.

Jayant Naik's picture

21 Oct 2019 - 4:56 am | Jayant Naik

गोष्ट सुखांत नाही हे उघड आहे पण ते तसे का झाले याची उत्सुकता वाटली. ते या कथेत आले असते तर गोष्ट अजून भारी झाली असती का ?

मकरंद घोडके's picture

22 Oct 2019 - 11:22 am | मकरंद घोडके

कथा आवडतेय हे पाहून लिहण्याला नवा हुरूप मिळत आहे. आपण सर्वांच्या प्रतिक्रिया वाचून आनंद झाला.