ऑब्जेक्षनेबल..
मी रिटायर होण्यापूर्वी एकूण एकतीस वर्षे रेडिओत नोकरी केली. आकाशवाणीवर असताना कोणते शब्द,वाक्यं, गाणी प्रसारीत होऊ द्यायची याबाबत काटेकोर नियम होते. ते पाळावेच लागत. म्हणजे पाळले नाहीत नाहीतर मेमो मिळत. मग मेमोवर न भागलेल्या केसेसना गांभीर्यानुसार प्रसंगी सस्पेन्शन ही भोगावे लागे. तर ते असो.
आता "अबीर गुलाल उधळीत रंग" हा तसा किती रसाळ अभंग आहे की नाही ?!
पण तो आम्ही रेडियोवर लावू शकत नव्हतो, कारण त्यात "उंबर्यासी कैसे शिवू आम्ही यातीहीन " अशी ओळ आहे. म्हणजे आम्ही हीन जातीचे लोक देवा तुझ्या पायरीला कसे शिवू?
यातून हीन समजल्या जाणार्या जातीला मंदिरप्रवेश नाही असा अर्थ होतो आणि तो अर्थातच आक्षेपार्ह आहे. हे सर्वच कर्मचाऱ्यांना लक्षात येईच असं नव्हतं.
याच न्यायाने "थांबली बहिणाई दारी. देऊळातल्या देवा याहो, उतरा ही पायरी " हे गाणे चालत नसे.इथेही बहिणाईला मंदिरप्रवेश नाही असा अर्थ होतो.
"जोहार मायबाप जोहार, तुमच्या महाराचा मी महार " पुढे तर "तुमच्या उष्ट्यासाठी आलो." हे शब्द आहेत.
यात जातिवाचक शब्द आल्याने हे गाणे चालत नसे. जातीला हीन लेखणारा कोणताही शब्द चालत नसे. एकूण कोणत्याही जातीचा तुच्छतेने उल्लेख, वरुन त्याला "डा" अक्षर जोडून अनेक जुन्या पुस्तकांत, साहित्यात असायचा. मूळ साहित्यात तो कोणाच्याही तोंडी किंवा कोणत्याही संदर्भात का असेना.
असले शब्द अर्थातच आक्षेपार्ह होते. आणि त्या शब्दांच्या वापराबाबत शिक्षा होणं योग्यच म्हणता येईल. त्यामुळे कोणतेही उतारे किंवा काव्य जसेच्या तसे उद्धृत करताना खूप काळजी घ्यावी लागायची.
"मराठा रेजिमेंट, महार रेजिमेंट" हे शब्द फक्त सैन्यभरतीच्या निवेदनात चालत. "स्त्री ही पायातली वाहाण आहे,ती पायातच राहिली पाहिजे", असली वाक्यं चालत नसत. मग भले ती खलपात्राच्या तोंडी का असेनात. गीतेतला "चातुर्वर्ण्यम मया सृष्टयम "हा श्लोक चालत नसे. तसेच पुरुषसूक्तातील "देवाच्या मुखापासून ब्राह्मण उत्पन्न झाले. छातीपासून क्षत्रिय ,पायापासून शूद्र निर्माण झाले" अशा अर्थाचे वर्णन चालत नसे गीतेतला "नारी शूद्र यांनाही मोक्ष मिळतो. मग
ब्राह्मणांना, राजर्षिना मिळेल यात काय आश्चर्य ?"अशा आशयाचा श्लोक चालत नसे. अर्थातच यामागचा हेतू अतिशय योग्य असल्याने तक्रार असण्याचं कारण नव्हतंच, पण जनतेतल्या बहुविध प्रकारच्या लोकांकडून स्क्रिप्ट लिहून घेताना, वाचून घेऊन रेकॉर्ड करताना सदैव क्रिकेटच्या अंपायरप्रमाणे डोळ्यात आणि कानात तेल घालून सावध राहावं लागतं असे.
हरिजन,गिरिजन हे शब्द चालत नसत. मग ते अगदी खुद्द महात्मा गांधींनी का म्हटले असेनात. आमच्यातल्या एक बेसावध राहिला. त्याने गांधी जयंतीला एक रूपक सादर केले. त्याने महात्मा गांधीजींच्या भाषणातला काही भाग त्या रूपकात वापरला. खुद्द त्यांच्या भाषणातला उतारा म्हणजे काही आक्षेपार्ह असण्याची शक्यता नाही असं मानून तो गाफील राहिला असावा. पण त्यात "हरिजन" हा शब्द होता. भले तो त्या काळाच्या संदर्भात का वापरलेला असेना. मेमोला कारण झालं!
गांधीजीच्या त्या जुन्या रेकॉर्डस इतक्या अस्पष्ट ऐकू येतात की त्या बिचार्याच्या कानातून तो शब्द कानचुकीने निसटलाही असेल. पण आमच्यापैकी कुणीही नंतर गांधीजींच्या भाषणाच्या रेकॉर्डसना हात लावला नाही.
हे झालं जाती आणि समाजांवरून. पण याखेरीज उदाहरणार्थ म्हणजे कुठल्याही प्रॉडक्टचं, ब्रँडचं वगैरे नाव घेता येत नसे.
नभोनाट्यात "तुझे डोके दुखते आहे का?थांब मी अमृतांजन लावून देते." किंवा "मी मस्तपैकी लक्स लावून आंघोळ करून आलो", "पॉंड्सचा सुवास आसमंतात दरवळला" अशी वाक्ये चालत नसत. जाहिरात होते म्हणून.
"क्रोसीनची गोळी घे" असं न म्हणता "वेदनाशामक गोळी घे" असा संवाद म्हणावा लागे.
आपल्या देशाविरुद्ध ,राष्ट्रध्वजाविरुद्ध कोणाकडून चुकून नकळत काही गैर उद्धृत होऊ नये म्हणून काळजी घेत असू. हे तर साहजिक व्हायचं. पण देशाच्या परराष्ट्र धोरणानुसार एखाद्या राष्ट्राशी आपण मैत्री करायची ठरवली असेल तर त्या राष्ट्राबद्दलही नजरचुकीने वाईट उल्लेख चालत नसे. त्याविषयी माहिती अद्ययावत ठेवावी लागे.
प्रत्येक स्क्रिप्ट हे डोळ्यात तेल घालून वाचले जाई त्यावर "नथिंग ऑब्जेक्षनेबल, सुटेबल फॉर ब्रॉडकास्ट" असा शेरा असेल तरच ते स्क्रिप्ट प्रसारित होई.
ही सर्व काळजी घेणं हा कामाचा आवश्यक भागच होता, पण..
एखादा कार्यक्रम लाईव्ह, म्हणजे थेट प्रक्षेपणवाला असेल तर श्रोता फटकन काय बोलेल यावर आमचा ताबा राहत नसे. त्याची मजा फिर कभी...
प्रतिक्रिया
मस्त ग आज्जे...
हे
सरकारी विनोद !
वा वा ही नोकरी कशी मिळते
खूप बंधने असली की क्रिएटिव्ह
मस्त. क्रमशः करावे ही विनंती
यांचे सेन्सॉर बोर्ड
+1
सरकारी काम
सरकारी काम _/\_
सरकारी काम
ऑब्जक्षनेबल गाणी (लेखात
अर्थातच ती विनंती स्वीकारता
आज्जे लै बेस लिवलंय पुढचे भाग
श्रोता फटकन काय बोलेल, वक्ता म्हणायचंय का?
द्या मेमो आजीला ...
लाईव्ह म्हणजे मुख्यतः डायल इन
वोक्के, असं म्हणायचंय होय, मग बरोबरे !
पूर्वी व आता
गाळीव रत्नेच.
सर्व वाचणाऱ्या आणि प्रतिसाद
हे आवडले.
मस्त किस्से....
माझ्या आठवणीप्रमाणे दूरदर्शन
पहिला डेली सोप शांती का हमलोग
तारेवरची कसरतच की रेडीओवरची
छान लिहिलंय.
छान लिहिले आहे
छान लिहिलय!
माहिती