क्लीक - ३

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
20 Sep 2019 - 8:15 am

डिंग डाँग…" बेलचा आवाज आला. वाजले वाटते पाच. इतकी पक्की वेळ पाळणारा शिर्‍या ग्रेटच म्हणायला हवा. मी कानोसा घेते. " या या या" बाबाचा आवाज " घर सापडायला काही त्रास तर झाला नाही ना" हे वाक्य मी म्हणायचं ठरवलं होतं. बाबा का म्हणतोय! प्रोजेक्ट कॉऑर्डिनेशन नीट व्हायला हवं." विनायकराव नाही आले" बाबा कोणाला तरी विचारतोय.
"नाही त्यांना अचानक...…" एक मस्त हरीश भीमाणी सारखा घनगंभीर आवाज उत्तर देतो. पोटात गुदगुल्या होतात या आवाजाने.

मागील दुवा: http://misalpav.com/node/45328

हा बहुतेक शिर्‍याबरोबर जे कोणी आलंय त्यांचा आवाज असणार. मी बाहेर कितीजण आलेत याचा कानोसा घेते. फार आवाज येत नाहीत. आत्तापर्यंत तरी हा एकच आवाज आलाय. पण हा घनगंभीर आवाज शिर्‍याचा नसणार. कमोडिटी मार्केट वाल्यांचे कुठे आवाज इतके छान ! बाजारात ओरडून ओरडून घशाचं पार ब्रासबँड मधले ते सगळ्यात मोठ्ठं ट्रंपेट की काय ते झालेलं असतं या लोकांचं. रवीवारी बघतेना फुले मार्केटमधे लोकांना ओरडताना. कांदे वीस रुपये , कांदे वीस रुपये…..
टी व्ही वर महाभारत चालायचं त्यावेळेस हरीश भीमाणी त्याम्च्या त्या घनगंभीर आवाजात " मै काल हुं……" वगैरे निवेदन करायचे. त्या आवाजात ते " कांदे वीस रुपये.. कांदे वीस रुपये " म्हणताहेत हे भरपूर प्रयत्न करुनही डोळ्यापुढे येत नव्हतं.इमॅजीनेशनच्याही पलीकडचं . अशक्य आहे.
" अगंकाय म्हणते आहेस? वीस रुपये वीस रुपये.कसला हीशेब करते आहेस" आई माझ्या खांद्यावर थापटी मारून विचारतेय.
मी एकदम दचकते.आईने ऐकले वाटते? मी मनातल्या मनात इतक्या मोठ्यांदा बोलते? मला कळत नव्हतं.
काय झालं?
"कुठे काय! काही नाही. आला का शिर्‍या?" मी सावरायचा प्रयत्न करते.
" कोण शिर्‍या?" आईचा अभवित प्रश्न.
माझ्याकडे या प्रश्नाचे उत्तर तयार नाही. " आले का ते लोक" मी काहितरीबोलायचं म्हणून बोलते.
" हो आत्ताच आलेत. त्यासाठीच तर आत आले. म्हंटलं तुला सांगावं बाहेर हॉलमधे येतेस ना"
हो पण …." मी माझ्या पण नंतरच्या वाक्यावर अडखळते.
हो मला माहीत आहे. तू चहा आणणार नाहीस. त्या साठी मी रौशनी ताईना थांबवून घेतलंय आज. त्या आणतील सगळं हॉलमधे." आईनं माझा " पण" ओळखून पुढचंही सांगीतलं.
"आणि त्यानं त्यांनाच पसंत केलं तर? " शिर्‍याने रौशनी ताईना पसंत केलंय रौशनी ताईंचा दारुडा नवरा रुखवतात मांडलाय असं दृष्य क्षणभर डोळ्यासमोर तरळून गेलं. माझ्या डोळ्यासमोरच ते दृष्य आईलाही ऐकु गेलं असावं. " खीक्क" करुन फुटणा-रं हसू दोघीनीही ओठ मुडपत कसेबसे दाबले. त्यानं एक झालं आईच्या चेहेर्‍यावरचा ताण कमी झाला.
" चला चला ते वाट पहाताहेत." आईने नव्या उत्साहात सांगीतले.
" हो चल. पण तु पुढे हो किंवा नंतर तरी ये." मला ते हिंदी पिक्चर मधलं मुलीला दाखवण्याच्या प्रसंग्गाचं ते टिप्पीकल चित्र डोळ्यापुढे आलं. मुलगी डोक्यावरचा घुंघट हातभर पुढे ओढून येते. सोबत तीची भावजय , मावशी, आई वगैरे तीला पोलीसांनी कैद्याला कोर्टात हजर करताना आणावे तसे दोन्ही कडून धरुन आणतात. मुलीला हे असे धरुन का आणावे लागते हे मला कधीच कळत नाही. ती काय पळून जाणार असते का?
हे मी एकदा बाबाला विचारले होते. त्या प्रश्नावर दाद्या हसता हसता खुर्चीतून खालीच पडला होता.
मी हॉलमधे येते. समोर जीन्स आणि फिक्या गुलाबी रंगाच्या फुल शर्ट मधे एकजण बसलाय. बाबा त्याच्याशीच बोलतोय. बहुतेक हाच शिर्‍या असावा. देशस्थांच्या मानानं गोराच म्हणायचा. त्याचा जो फोटो दाखवला होता त्यात दिसत होता तितका काही वाईट दिसत नाहिय्ये. फोटो बहुधा आधार कार्डावरचा असावा.
लहानपणी परीक्षेला जाताना छातीत धडधडणे , घशाला कोरड पडणे हाताला घाम येणे हे असलं कधी झालं नाही . आजही तसं काही होत नव्हतं..... पण आपण असा का विचार करतोय. ही आपली परीक्षानाहिय्ये. उलट आपणच त्याची परीक्षा घेणार आहोत. ठरलंय ना तसं!
तसंही मला ह्याच्या बद्दल लव्ह अ‍ॅट फर्स्ट साईट वगैरे असं काही वाटलेलं नाहिय्ये.
त्याला आपण रिजेक्ट करु शकतो. आणि त्याबद्दल आपल्याला गिल्टी वाटायचं काही एक कारण नाहिय्ये.
हॉलमधे बाबा आणि शिर्‍या दोघेच आहेत. पण बाबा मघाशी बोलला ते कोणाशी मग? मी इकडे तिकडे पहाते. हॉल मधे दोघांशिवाय कोणीच नाही. ते घनगंभीर आवाजवाले बहुतेक येवून गेले असणार.
" अगं ये ना बैस, श्री मी ओळख करून देतो. फोटोतुन दोघानी एकमेकाना पाहिलय. श्री ही आमची राजकन्या शुभ्रा. आणि शुभ्रा हे श्री" बाबाने आमच्या संभाव्हणाला ट्रीगर दिला. मला काही समजावून सांगायचे असेल किंवा बाबा टेन्शन मधे असला की माझा उल्लेख राजकन्या असा करतो. सोफ्यावर बाबा आणि श्री बसलाय. समोर रिकाम्या दिसलेल्या खुर्चीत मी बसते. डोळे वर करुन पहातेय." स्वप्नाळू पिंगट डोळे, डोक्यावर भुरभुरणारे मौशार सिल्की केस, तेज तर्रार नाक, एका हातात तलवार एका हातात गुलाबाचे फूल . पांढर्‍या शुभ्र घोड्यावरुन तो आला आणि गळ्यातला सिल्कचा लाल स्कार्फ भिरकावत तो तरुन राजपुत्र घोड्यावरून पाय उतार झाला. गुढगे मुडपून तो खाली बसला. आणि त्याने लाल गुलाबाचे फूल राजकन्येसमोर नजराणा म्हणून पुढे केलं' असं हॅन्स अँडरसन्स च्या परीकथेतलं काही घडणार नव्हतं. मी बाबाची राजक्न्या आहेच पण समोर बसलेला राजपुत्र डोळ्यावर बारीक काड्यांचा फ्रेमलेस चष्मा , दोनतीन वर्षांमागे कधीतरी भुरभुरले असती पण आता कपाळाची विस्तारलेली बाउंड्रीलाईन दाखवायला अदबीने मागे सरलेले केस, नाक तेज तर्रार नाहिय्ये पण अगदीच बटाटवडा पण नाहिय्ये. याला पसंत करायचंय? .".. शादी और तुमसे? कभी नही. पान पसंद, पान का स्वाद गजब की मिठास" माझ्या डोक्यात रेडीओवरची जहिरात वाजतेय.
याचं फेसबुक प्रोफाईल पहायचं नाही म्हंटलं ते बरंच झालं. उगाच कुठेतरी केक कापतानाचे , नाहीतर कुठल्यातरी दगडावर चे मॉर्फ केलेले सो कॉल्ड इम्प्रेसीव्ह फोटो पहावे लागले असते.
आपले फोटो पण कसे आसतात नाही.! आधार कार्डावरचा फोटो आणि आपला व्हॉट्सॅपच्या डीपी मधला शेजारी शेजारी ठेवून पाहिलं तर दोन चुलत भावां इतकही साम्य सापडत नसतं दोन्हीत. दोन्ही आपलेच असतात पण उत्तर आणि दक्षीण कोरीयाच्या आर्थीक परिस्थीत जितका फरक किंवा साम्य जाणवेल तेवढं साम्य जाणवतं. दोन्ही फोटोंचा मध्य म्हणजे आपण असतो.
हा आपल्याला अजून क्लीक होत नाहिय्ये. अर्थात क्लीक व्हायलाच हवा असही नाही. या विचारासरशी मला एक भक्कम आधाराचीआधाराची काठी सापडावी तसं होतं
" हॅलो गुड इव्हिनींग.. नमस्कार हाऊ आर यू?" तो घनगंभीर आवाज या शिर्‍याचा होता. मी आश्चर्याने पहाते. हा आवाज या चेहेर्‍याला सूट होत नाहिय्ये. यानं नक्की आवाज डब केलाय इम्प्रेशन मारण्यासाठी …. अर्थात आपण ते पडू दिलं तर ना!
शिर्‍याने शेकहँडसाठी हात पुढे केलाय. " ओह हॅलो गुड इव्हनिंग" मी अभवितपणे शेकहँड करते. हाताचा हाताला स्पर्ष होतो. आकाशात वीज चमकते. शरीरातून चारशे चाळीस व्होल्टचा वीज प्रवाह वाहू लागला अंगावर रोमांच उठले, मागे कुठेतरी पंधरावीस जणी कोरसमधे सा सा री री ग ग प प करत गात आहेत. असं काहीच झालं नाही.
" ओह हॅलो गुड इव्हिनींग " दुपारी पाच वाजता गुड इव्हिनींग म्हणायचे की गुड आफ्टरनून हा संभ्रम असतोच. मान्य आहे की बोलायची औपचारीक सुरवात असते. पण मग ते तिथेच थांबते. प्रोजेक्टच्या इंटरव्ह्यू मधे एक बरेअसतं की गुड मॉर्निंग वगैरेचे शिष्ठाचार सम्पले की थेट टेल मी अबाऊट युवर रेलेवंट एक्स्पिरीयन्स असं विचारून समोरच्याला बोलतं करता येतं. पुढचे एक दहा मिनीटे तरी ऐकता येतं. अगदी फ्रेशर कँडीडेट असला तर टेल मी समथिंग अबाऊट यु. असं विचारता येतं.
इथं कसला एक्सपिरीयन्स विचारणार?
नमस्कार चमत्कार झाल्यानंतरची पुढची दोन मिनीटे अस्वस्थ शांततेत जातात. मला तर मोबाईलमधल्या डिजीटल घड्याळाची टिकटीक सुद्धा मोठ्याने ऐकू आली असेल. आमचं ते अवघडलेपण बाबाच्या लक्शात आलं असावं. " अगं जरा ते श्रीखंड आणायचं होतं ब्रजवासीमधून मी घेवून येतो तुम्ही बोलत बसा" बाबाचा तेथून जाण्यासाठीचा बहाणा.
तुम्ही कशाला जाताय, मीच आणते ना. यांनाही बरोबर नेते म्हणजे बोलणंही होईल" मी बाबाच्या बहान्याचा धागा पकडते. मलाही तसं घरात अवघडल्यासारखं झालंय. बाहेर पळावसं वाततंय. पण या शिर्‍यालाही सोडायचं नाहिय्ये. " चालेल ना हो तुम्हाला" माझ्या त्या प्रश्नावर परिक्षेत एकवीस अपेक्षीत मधला घोकून घोकून पाठ करुन ठेवलेला प्रश्नच पेपरात आल्यावर व्हावा तसा आनंद शिर्‍याच्या चेहेर्‍यावर गणपतीत लाईटच्या माळा चमकाव्यात तसा चमचमला.
त्यालाही तेच हवे असावे.

क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

20 Sep 2019 - 9:35 am | यशोधरा

कुठे मिळतायत हो कांदे वीस रुपयांनी? :D

हा भागपण मस्त झालाय.

महासंग्राम's picture

20 Sep 2019 - 9:47 am | महासंग्राम

च्यायला हे वाचून टेन्शन यायला लागलं कसं होईल काय होईल स्वतःच :)

बाकी झक्कास झालाय हा भाग पुभाप्र

अनिंद्य's picture

20 Sep 2019 - 9:59 am | अनिंद्य

रौशनी ताईंचा दारुडा नवरा रुखवतात मांडलाय :-) :-))))

हे जबरदस्त !

आज तिन्ही भाग वाचले, ही मुलगी पसंत आहे.

रातराणी's picture

20 Sep 2019 - 10:26 am | रातराणी

मस्त ! मस्त!! पुभालटा :)

श्वेता२४'s picture

20 Sep 2019 - 11:08 am | श्वेता२४

मस्तच जमलाय हा भागही. पु.भा.प्र. :)

गड्डा झब्बू's picture

20 Sep 2019 - 1:15 pm | गड्डा झब्बू

झक्कास लिहीताय. पुढचे भाग लवकर येउदेत.

जॉनविक्क's picture

20 Sep 2019 - 1:32 pm | जॉनविक्क

श्रीऱ्या खिक्क ! रच्याकने हे आत्मनुभव कथन तर नाही ? ;)

संजय पाटिल's picture

20 Sep 2019 - 5:49 pm | संजय पाटिल

हाफिसात वाचतोय...
बाजूचे वेड्याकडे बघीतल्यासारखे बघतायात......
हसू लपवयला फार त्रास होतोय....

विजुभाऊ's picture

21 Sep 2019 - 7:43 am | विजुभाऊ

धन्यवाद _/\_
पु भा प्र के. http://misalpav.com/node/45342

नाखु's picture

21 Sep 2019 - 10:40 am | नाखु

पु भा प्र

वाचकांची पत्रेवाला नाखु पांढरपेशा

मीअपर्णा's picture

24 Sep 2019 - 9:04 am | मीअपर्णा

खरं मी फार क्वचित क्रमश: कादंबर्या वाचते. अचानक हीचे तिन्ही भाग सलग वाचले. वाचायला अतिशय मजा येतेय. लिहायची शैली अगदी खिळवून ठेवते.
लवकर लवकर पुढचे भाग टाका :)