क्लीक- १

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
18 Sep 2019 - 7:54 am

लेमन यलो ,अबोली किंचीत पोपटी असे फिरते रंग दाखवणारी मैसूर सिल्क ची साडी. निळसर पोपटी फिरते रंगवाले फूल स्लीव्ज वालं ब्लाऊज , केस मागे नेत घट्ट बांधलेली सागर वेणी, , कानाच्या मागे केसात माळलेला मोगर्‍याचा गजरा कपाळावर छान अबोली रंगाची मॅचिंग टिकली त्याच लाईट कलरची लिपस्टीक…
डावा हात जमीनीला समांतर धरून नव्वद अंशात काटकोनात कोपर वाकवत पदर फडकावत स्वतःला आरशात न्याहाळतेय.
डोळ्याच्या कडांवर आयलायनरने लावलेल्या काज़ळामुळे आणि घसघशीत गजर्‍यामुळे आरशात साऊथ इंडीयन पिक्चरच्या रम्भा रम्या,अमला, आसीन नामक हीरॉइन्स सारख्या दिसणार्‍या माझ्या त्या प्रतिबीम्बाकडे मी पहातच राहीले. काय क्यूट दिसतेय गं ही! माझे ते प्रतिबीम्ब मलाच न्याहाळत होतं. मानेच्या होणार्‍या हालचालीं बरोबर डुलणारे कानातले पहाताना तेही बेटं असंच म्हणत असणार.
माझ्या त्या प्रतिबीम्बाने आपले पांढरे शूभ्र दात विचकत एक मस्त ब्रॉड स्माईल दिले. मग मी पण दिलं. हे फारच झालं. याहून अधीक ब्रॉड स्माईल देऊन गाल दुखायला लागायच्या आगोदर हे हसणं आवरत्म घ्यायला हवं. मी हसणं बंद केलं. त्या प्रतिबीम्बाने ही हसणं बंद केलं. पण चेहेर्‍यावर एक मिश्कील भाव मागे रेंगाळलाच.
हनुवटीवरून , रसरशीत ओठांवरून चाफेकळी नाकावरून कानावरून माझं लक्ष्य डोळ्यांकडे गेलं. पिंगट डोळ्याना काजलाची बारीक किनार. त्यामुळे ते अधीकच रेखीव वाटत होते. काजळाची किनार काय जादू करते ना! एखाद्या चित्राला फ्रेम केल्यावर ते चित्र अधीकच खुलून दिसावं तशी. मला उगीचच शिंपल्यातला मोती आठवला.
आपल्या या पिंगट डोळ्यांची इतरांवर काय जादू होते ते मी नेहमीच अनुभवलं होतं. ऑफीसमधे इतर बड्डीज म्हणायचेही ' जादू तेरी नजर का " म्हणून. मला कधीच पटायचं नाही ते. पण त्याचा प्रत्यय मात्र नेहमीच यायचा. अगदी कॉलेजात असल्यापासून. व्हायवा असो वा प्रॅक्टीकल लोक डोळ्यांकडे पहात रहायची.
प्रॅक्टीकल एक्झाम मधे प्राईम नम्बर नम्बर शोधायचा अल्गॉरीदम विचारला होता. फॉर नेक्स्ट लूप चे स्टेटमेंट वापरताना काहीतरी गोंधळ होत होता. एक्झामिनरने तोच ओळखून बरोबर पेचात पकडले होते. कसे झाले कोण जाणे आपण एकदम सरांच्या थेट डोळ्यात पाहिले. ते पहातच राहीले. सर पुढचा प्रश्न विचारायचेच विसरले. तब्बल दोन मिनीटभर. स्वप्ना मला पेनने पाठीमागून डिवचत होती. शेवटी मी टेबलावरून जर्नल खाली पाडलं तेंव्हा कुठे सर भानावर आले.
डोळे बाबांकडून मिळाले. पण त्यांच्या डोळ्यांमधे पाहिल्यावर आम्हाला असं कधी नाही झालं. कदाचित आईला झालं असेल. विचारायला हवं तीला कधी.
" डोळ्यात पाहीलं की तारेत पतंग अडकून तो तिथेच फडफडत रहावा तसं होतं. इतरांचं ठीक आहे. पण हे आपलं आपल्यालाच व्हावं? ग्रीक पुराणात नार्सीसस नावाचा कोणीतरी होता म्हणे. त्याला स्वतःचांच प्रतिबीम्ब आवडायचं. इतकं की तो तासन तास पाण्यात प्रतिबीम्ब पहात रहायचा तहानभूक हरपून. शेवटी त्याच्म एका फुलात रुपांतर झालं. ते फूलही पाण्यात स्वतःचं प्रतिबींब पहात असत.
आपला नार्सीसस झालाय आज. होणारच ना! कधी नव्हे ते इतकी नखशिखांत नटलेय. खरंतर नटायला फारसं आवडत नाही. कुठे जायचं असेल तर फारतर पाँड्स च्या पावडरचा हलकसा हात फिरवते चेहर्‍यावरून. तेही तो गंध आवडतो म्हणून. अर्थात नसली तरी फारसे अडत नाही. पावडरने चेहेरा घामेजला दिसत नाही, इतकंच.
आणि रंग कोकणस्थी गोरा नसला तरी अगदी देशस्थी सावळा पण नाहिय्ये. ते एक बरं आहे. त्यामुळे तोंड पावडर लावल्यावर उगाच खारेदाणे असल्यासारखं दिसत नाही.
केस एखादी साधी पोनी किंवा मोकळे , उगाच फिकीर करायची नाही.
शाळेत असताना , समोरच्या काकुंनी कधी वेणी घातली तर त्या डोक्यात इतके तेल ओतायच्या , शनिवारी मारुतीला तेलाचा अभिशेक केल्यानंतर तेल मूर्तीच्या डोक्यावरून तोंडावरून ओघळतं तसे ओघळायचे. तिटकाराच बसला तसं चपचपीत तेल लावायचा. त्यामुळे केस कायम इकडेतिकडे फिरत असल्यासारखे मोकळे भुरभुरत असायचे. अगदी आईनस्टाईन नाही पण एखादी चळवळीतील कार्यकर्ती असावे असे वाटण्याइतपत कोरडे आणि मोकळे. रोज केस विंचरा, एल घाला वेणी फणी करा, रीबीन बांधा, या सगळ्याचा वैतागच यायचा. शाळेच्या युनिफॉर्मचा भाग असावा तशी प्रत्येक मुलगी लाल रेंगाची रीबीन बांधून यायची. सकाळी छान फुले असलेली रीबीन शाळासुटेपर्यंत सुटून पार निर्माल्य झालेलं असायचं तीचं. रेबीन एकाच कारणासठी आवडायची. दुकानातून गोल वेटोळ्यातून कापलेली रेबीनीची करकरीत गुंडाळी घरी आणल्या नंतर तीची धागे निघून नयेत म्हणून पेटत्या उदबत्तीने भोके पाडायची . बस्स इतकेच यासाठी.
आईला तर माझ्याकडे पाहून हीच्या केसांचं काय करायचं हा कायमचा अनुत्तरीत प्रश्न पडलेला असायचा. मलाही कंटाळा होताच. मला बॉय कट करायचा होता. पण बाबाचं म्हणणं की बॉय कट केला की मुलींचे दात पुढे आल्यासारखे दिसते म्हणून बॉयकट बॉबकटवर आला. मज्जा यायची त्यामुळे. पळत जाताना केस मस्त उडायचे. केस उडावेत म्हणून मी चालतानाही उड्या मारत दुडक्या चालीने चालायचे, पाठीवर दप्तर असले तरी.
आणखी एक बरं होतं आंघोळीला रिठे शिकेकाई शांपू कंडीशनर असलं काही लागायच्म नाही. नुसती लक्स ची वडी लावली तरी चालायचं. आम्घोळीनंतर टॉवेलनं एकदा डोकं खसाखसा पुसलं की कोरडं ठाक. गुलमोहोराच्या झाडावर पाऊस पडुन गेल्यावर त्याची पानं पाचदहा मिनीटात वाळून पुन्हा हसत उभी रहावीत ना तसं.
शालीमावशीची वीणा तीचे लांब केस धुतल्यानंतर ती केस पंचात गुंडाळून सरदारजीसारखे डोक्यावर बांधायची. मला तर ते पाहून हसुच यायचे. मी हसायला लागले की ती चिडायची. डोक्यावरचा पंचा ओढून फेकून द्यायची. ओले अस्ल्यामुळे तीचे केस भिजलेल्या कुत्र्याच्या शेपटीसारखे दिसायचे. मला अधीकच हसू यायचे. आणि मी एक हात पोटावर ठेवून रावणासारखी खदाखदा हसत सुटायचे. माझ्या या असल्या वागण्यामुळे आई डोक्याला हात लावून बसायची. तर मावशी म्हणायची " मला तर बाई काळजीच वाटते . कसं होईल हीचं, कोण पसंत करेल या धटींगणाला कोण जाणे"
मावशीने तेंव्हा व्यक्त केलेली काळजी आईच्या मनात कुठेतरी एका कोपर्‍यात वहीवाटीचा हक्क सांगुन घर करून रहात असावी. ज्या पद्धतीने तीने एक्स्ट्रा काळजी घेवून चांगली दोन गंगावने लावून घट्ट सागर वेणी घातली आहे ना त्यावरुन ते स्पष्ट जाणवतेय. शाली मावशीच्या भाषेत सांगायचं तर " एका धटींगणाला नीट साजरं रूप दिलंय"
खरं तर मला तसाही साडी वगैरे मधे गुंडाळून घेणं आवडत नाही.जमत पण नाही. साडी नेसली की स्वतःला उगीचच दोरा गुंडाळलेला वड असल्यासारख वाटत्म. एकदा शाळेच्या गॅदरींगला आईची कसलीशी कडक्क काम्जी केलेली ऑरगंडी साडी नेसले होते. साडीचा तो पिवळा जर्द रंग आणि कांजीच्या कडकपणामुळे गुढीपाडव्याला तोरण लावतोना त्या साखरेच्या गाठीसारखे वाटत होते. धड चालतासुधा येत नव्हते त्या कडक काम्जीमुळे.
छान साडी नेसलेलं , डोळ्यात काजळ घातलेलं , मस्त वेणी घालून गजरा माळलेलं हे असं माझं रुपडं मी कधी पाहिलंच नव्हतं. क्यूट. आरशावरून नजर काढावीशीच वाटत नाहिय्ये. त्यात आईने नको म्हणत असतानाही तीचा मोत्यांचा सर घालायला लावलाय. आईसुद्धा बघतंच राहीली मघाशी, मेस्मेराईज झाल्यासारखी. आत्ता आरशात पाहिल्यावर माझं पण तेच झालेय.
नटणं मुरडणं मुलीना नैसर्गीकरीत्याच आवडते असं म्हणतात. तसे मनावर संस्कार लहान पणापासूनच बिंबवलेले असते. मुलीनी भातुकली खेळायची, खेळात खोटा खोटा स्वैपाक करायचा. बाहुलीचे केस विंचरायचे, तीला खोटा खोटा साखरभात भरवायचा. हे असले गुडीगुडी खेळ मी खेळलेच नाही.दाद्या माझ्यापेक्षा दोन वर्षानीमोठा त्याचेच खेळ खेळायचे, बॅट बॉल गोट्या , भवरा असलेच. बाबाला ट्रेकिंगची आवड दाद्यालाही. त्यामुळे दर शनिवार रवीवारी नाही पण महिन्यातुन दोनदातरी कुठल्याना कुठल्या आडवाटेवर किल्यावर डोंगरावर भटकंती असायची. कधी कधी रॅपलिंग वगैरेही करायचो. मस्त दोर लावून रॉक क्लाईंबींग पण करायचो. राजमाची, तुंग तिकोना, जंगली जयगड काही म्हणून सोडलं नाही. एकदा तर कळसूबाई ट्रेक पण केला होता.
एकदा सिंहगडावर तानाजी चढला होता त्या कड्यावरून दोर लावून वर चढताना वर गेल्यावर ब मो पुरंदरे भेटले होते. बाबाची आणि त्यांची ओळख असावी बहुतेक. त्यांनी तानाजी शेलारमामा सूर्याजी, आणि उदेभान याम्च्याबद्दल बोलायला सुरवात केली. दोन तास न थकता अखंड बोलत होते. सिंहगडावरचा तो युद्ध प्रसंग आमच्या समोर घडत होता. मावळे कुठून लपत छपत आले किल्ल्यावर टेहाळणी कुठे कुठे होत होती, गडावर दोर कसे लावले गेले, एक एक मावळा वर कसा गेला, सिंहगडाच्या कुठल्या दरवाजात कोण कुठे लढले किल्लेदार उदेभान कुठून आला, तरवारीचे वार कसे झाले , तानाजी कुठे लढला, सूर्याजीने कड्यावरचे दोर कसे कापले, शेलारमामांनी तुटलेल्या ढालीने वार कसे झेलले आणि शेवटी गड जिंकल्याची खूण म्हणून गवताची गम्ज कुठे पेटवली….सगळं जणून आमच्या समोर घडत होतं.दोन तास आम्ही श्वास रोखून ऐकत होतो.
तो आख्खा दिवसच काय पण त्या नंतरचे कित्येक दिवस ते गारूड मनावरून उतरलेच नाही. कॉलेजात स्कूटरवरून जातानाही घोड्यावर बसून जातोय असे वाटायचे.
त्या महीन्यात आईलासुद्धा उगाच मॉसाहेब म्हणत होतो.
ही असली गारुडं अंतरा अंतरानं बदलत गेली. कधी नारायणगावची जी एम आर टी दुर्बीण पाहिल्यावर, तर कधी वरोड्याच्या आनंदवन भेटीच्या निमीत्ताने. कधी तेंडुलकरनं मुसळधार बॅटिंग करत वन डे मधे केलेल्या डबल सेंच्यूरीच्या निमित्ताने.
या सगळ्यात नटणं मुरडणं , मुलीच्या जातीला म्हणून केलं जाणारं ते टिपीकल वागणं याला कुठे वावच नव्हता. कॉलेज संपलं तेंव्हा कॅपस ,अधूनच जॉब मिळाला. पहिलंच ऑनसाईट साऊथ आफ्रीकेला. जोहान्स बर्ग ला. साऊथ अफ्रीकेला कस्म जायचं म्हणून बाकीचे कलीग्ज घाबरत होते. आपण स्वतः होऊनच तयारी दाखवली. एअरपोर्टवर विमानात बसताना उगीचच नव्या जगाच्या शोधात निघालोय असे वाटत होते. थोडी धाकधूकही होती. पण जोबुर्ग ला गेल्यावर माझ्यातला बिंधास्तपणा , रोपट्याला खतपाणी मिळून ते जोमाने तरारून यावं तसा वाढतच गेला. काय म्हणून नाही केलं त्या दोन वर्षात! क्रूगर नॅशनल पार्क मधली नाईट सफारी, वेस्टर्न केप मधली बलून राईड, स्काय डायव्हिंग, बंजी जंपिंग, रिव्हर राफ्टिंग , सगळे थरार अनुभवले.
स्वयंपाक करायला शिकले ते तिथेच. पिठलं भात करता येत होताच. ट्रेकला गेल्यावर करता येण्यासारखा सर्वात सोप्पापदार्थ. जोबुर्गला सलग दहा दिवस पिठल भात खाऊन वैतागले. मग काय! यू ट्यूब झिंदाबाद. मुगाच्या डाळीच्या खिचडीपासून ते थेट पुरणपोळी विथ कटाची आमटी पर्यंत सगळं करून पाहिलं. सहा महिन्यात मस्त शेफ झाले. आख्ख्या टीमसाठी बनवलं होत्म एकदा. जोबुर्ग सोडताना डोळ्यातलं पाणी कसंबसं आवरलं होतं.
ऑनसाईट असाईनमेंटमुळे एक होतं तुमच्या एक वेगळा आत्मविश्वास येतो. या जगात आपण इंडीपेंडंटली राहू शकतो आपल्या अडचणी आपण एकते सोडवू शकतो ही जाणीव आप्ल्यात एक अमूलाग्र बदल घडवून आणते.
ऑनसाईतमुळे आणखी एक गोष्ट होते. पटकन मैत्री कला अवगत होते. माझ्या बाबतीत तो प्रश्न नव्हताच पण वाईट माणसातही काही चांगले गुण असतात. थोडे टॉलरेट केलं तर ते मैत्रीचे धागे जुळवतात,
लाइफ पार्टनर वगैरे त्या पुढचा टप्पा लग्न ठरलेल्या झालेल्या काही कलीग्ज ना त्याम्च्या नवर्‍याशी , मित्राशी फोनवर बोलताना पाहीलं , पहिल्याम्दा तर हसूच आलं. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यम्त सगळं इत्यंभूत साम्गायच्या त्या फोनवर. बाय म्हणत फोन ठेवताना बहुतेकींचे डोळे आभाळ भरून यावं तसे भरून आलेले असायचे.कोणी पहातय का याची फिकीर न कराता.
तेंव्हा कधीतरी आपण कधी असे कोणाशीतरी इतक्या असोशीने बोलणार असा विचार येवुन गेला होता. फिस्सकन हसले होते मी त्यावर. असे काय लोक प्रेमात पडत असतील याचं कुतूहल वाटायचं. एकदा गूगलवर सर्च करताना फॉलिंग इन थ्री स्टेप्स " हे जेनीफर काफ्काचे पुस्तक सापदले. आधासारखे वाचून काढले. पण त्यातले सगळे नुस्खे हे मुलाने मुलीला प्रेमात कसे पाडायचे याचेच होते. जणू मुलीना हे असलं काही ज्ञान लागतंच नाही मुळी. पुस्तक वाचताना सगळे हिंदी पिक्चर्स आठवले. सगळ्म काही इन्स्टंट मिळणार्‍या या जमान्यात आयुष्याचा जोडीदार इन्स्टंट कसा मिळवायचा हे इन्स्टन्ट ज्ञान देणारं इन्स्टंटली कोणीच नव्हतं.
इकडे आल्यानंतर तिकडे काय पाहीलं, कसं राहीले वगैरे कौतूक ऐकून झाल्यावर चहा पिताना आईचा पहिला प्रश्न अगोदर आडून आडून मग थेट. " अगं काय करायचं ठरवलं आहेस" लोक विचारायला लागलेत. लेकीचं कधी करताय म्हणून. मी काय उत्तर देते या कडे बाबाचं न ऐकल्यासारखं दाखवत लक्ष्य.
मी अगोदर आईला उडवूनच लावलं. म्हंटलं ' हे तू म्हणते आहेस का लोक म्हणताहेत ते अगोदर सांग"
" परवा शाली मावशीला तीची नणंद विचारत होती.तीच्या दिराच्या मुलासाथी"
"कोण !पराग? तो झिपर्‍या शेंबडा? " लहानपणी त्याच्या नाकाखाली कायम हिरवी रेघ असायची . खेळताना दोन्ही मनगटानी पुसायचा. त्यामुळे जोडीसाखळी खेळताना त्याच्या बरोबर कोणीच जोड यायचे नाही. जोडी जमली नाही म्हणून एकवेळ औट झाले तर चालेल पण हा नको.
अगं लहानपणीच्म लहानपणी. आता तो बँकेत मॅनेजर आहे.
"बरं मग"
त्याच्याबद्दल विचारत होत्या.

त्या माझ्याबद्दल विचारत होत्या की त्याच्याबद्दल
तुझ्याबद्दलच पण त्याच्यासाठी तसं बोलायची पद्धत आहे.
मग सांग अजून थाम्बा पाचसहा वर्ष तरी.
अग्म असं काय करतेस. सरळ नाही म्हनतेस. ते कसे थांबतील इतकं!
मग दुसरी पहा.
एक साम्ग तुला लग्न करायचं आहे की नाही.
करायचं आहे पण आत्ता नाही.
मग कधी.
दाद्याचं झाल्यावर बघेन.
तो म्हणतोय तुझं झाल्याशिवाय करणार नाही.
आयला हा म्हणजे सॉफ्टवेअर प्रोग्राम लिहीताना इफ देन स्टेटमेंटचा रीकर्सीव लूप लिहील्यासारखं झालं. माझं झाल्याशिवाय त्याचं नाही,,,आणि त्याच्म झाल्याशिवाय माझं नाही. रीयल लाईफ मधे पण असा बग येवू शकतो?
तो जाऊन बसलाय जर्मनीला. तू जाउन बस अफ्रीका अन अमेरीका करत. आम्ही काय करायचं" मातोश्रीना तो इफ देन स्टेटमेंटचा रीकर्सीव लूप काहिही करून तोडायचाच आहे.
मी अजून अमेरीकेला गेलेली नाहिय्ये. पण तुझ्या तोंडात साखर पडो. मला नेक्स्ट असाईनमेंट यू एस ची मिळो.
तू विषय टाळते आहेस.
तसेही समर्थ रामदा म्हणून गेलेत" विषय सर्वथा नावडो" म्हणून
"मी हात टेकले तुझ्यापुढे. अहो तुम्ही विचाराना तीला" मातोश्रीनी बाबाला पुढे केला. बाबा काय म्हणणार हे मला माहीत होतं. मी डोळ्यांच्या कोपर्‍यातून बाबाकडे पाहिले.
"अगं सांगेल ती जेंव्हा करायचं असेल तेंव्हा आपल्याला स्वतः होऊन" बाबानं मला हवं होतं तेच सांगितले.
त्या दिवशी तो विषय तिथेच थाम्बला. त्या दिवसापुरता तरी . पण सम्पला नाही. आईच्या डोक्यात इन्फायनाईट लूप खारखा कायम मुक्कामाला राहीला.
मी पुन्हा नव्या प्रोजेक्ट मधे बिझी झाले
प्रोजेक्ट प्रेपरेशन , डॉक्युमेंटेशन , प्रेझेंटेशन, मिटींग्स, रीयलायझेशन टेस्टिंग, डीप्लॉयमेंट हे हिवाळा उन्हाळा पुन्हा पावसाळा सारखम चक्र सुरूच राहीलं एका नंतर दुसरा ,दुसर्‍या नंतर तिसरा . प्रत्येक प्रोजेक्टचा क्लायंट निराळा. प्रत्येकाचं निराळं ऑनसाईट
घरी फोन केला की काय कशी आहेस? काय जेवलीस? या नेहमीच्या प्रश्नां च्या जोडीला आईचं तेअमूक अमूक विचारत होते. अमूक अमूक या ऐवजी आडनाव बदल असायचा. घाणेकर , फणसळकर , पाटणकर अमुककर तमूककर. फोनचा समारोप सुद्धा माझ्य अकिंवा आईच्या चिडण्यानेच व्हायचा.
मधेच एकदा दाद्याने जर्मनीलाच रहायचं नक्की केलं.ताचे आणि साहीराचे फोटो पाठवले. आई बाबा जर्मनीला त्याच्या लग्नाला जाउन आले. प्रोजेक्टच्या टाईम लाइनमुळे मला जाणे शक्यच झाले नाही. व्हॉट्सॅपवर व्हीडीओ वल लग्न लाईव्ह पहाणं इतकंच जमलं.
दाद्याच्या लग्नामुले एक झालं आईच्या प्रोग्राममधला तो इन्फायनाईट रीकर्सीव लूप सम्पला. प्रोजेक्ट लाईव्ह करायची वेळ येते तशा प्रोजेक्टच्या टाईमलाईन्स टाईट होत जातात. डिलीव्हरेबल्स ची लीस्ट रात्रंदिवस डोळ्यासमोर नाचत असते. इतर विचार जाऊ देत पण स्वतःचाही विचार करायला वेळ मिळत नाही. यात पुन्हा क्वालीटी गेत चेक , स्टीयरकॉम मिटींग्ज या असल्या गोष्टी कंप्लायन्सच्या नावाखाली समोर उभ्या असतातच. टेक्नीकल गोष्टींकडे लक्ष्य द्यायचं की कम्प्लायन्स कडे तेच कळत नाही. एक करायला जावं तर दुसरं हातातून निसटते अशी गत असते.
आता हे सगळं आईला कसं सांगणार? तीला फक्त माझी चिडचीड दिसते. प्रोजेक्ट गो लाईव्ह झालं की हायपर केअर सपोर्ट समोर उभा असतोच.
पण या वेळेस क्लायंट ने सरप्राईझ पार्टी म्हणून सगळ्या तीमला लेक तेकापो ची दोन दिवसांची टूर दिली.
प्रोजेक्ट टीम मधले सगळेच जण न्यूझीलंड च्या रमणीय निसर्गात एकदम रीलॅक्स झाले. रोजचा औपचारीकपणा जाऊन एकदम पर्सनल गप्पा निघाल्या
लेक टेकापोचे ते नीळंशार पाणी आम्हा सगळ्यांनाच थेट आतपर्यंत भिडलं. रुआब आणि स्मिथ न त्यांची पहिली भेट कशी झाली ती सांगितलं.डस्टीन नं त्याच्या बायकोबद्दलचे आक्षेप अगदी खेळकर पणे सांगितले. स्मिताने अमर आणि तीचे भावनीक बंध एका अपघाताने कसे बदलले ते सांगीतले, त्या सगल्या वातावरणात आम्ही तीघे जणच वेगळे होतो. जेनीफरचा बॉयफ्रेंड अफगाणीस्थानात पीस किपींग मोहीमेवर होता. तीला त्याची काळजी वाटत होती. त्याची आठवणही तीला कावरं बावरं करत होती. लीऑचा डिवोर्स झाला होता. नवरा बायको या नात्यावर तो फक्त कडवटपणे पहायचा आणि व्हिस्कीचा एक पेग घशाखाली ढकलायचा. नवरा बॉयफ्रेंड या नात्यांचा मला अनुभवच नव्हता. हे मला अचानक जाणवलं. आपल्या आयुष्यातलं पहिलं क्रश कोणत्म हे मी आथवत राहीले. सातवीत असताना वंदनामामीच्या बरोबर समीर आला होता. त्याचे ते मऊशार केस आपल्याला खूप आवडले होते. त्यानं आपल्याशीच बोलत रहावं वाटत होतं त्या दोनचार दिवसात. तो जाताना त्याला आपण मागे खोडरबर असलेली गुलाबी पेन्सील भेट दिली होती. त्याला आवडायचं म्हणून तो गेल्यावर कपीलदेवचे खूप फोटो जमवले होते. पुढच्या सुट्टीत तो यावा म्हणून दाराच्या मागे कडीला पळी अडकवून ठेवली होती. आता हसू येतंय त्या वेडेपणाचं. बारावीत असताना अनीताच्या घरी गेलो होतो. तीच्या भावाबद्दल असंच काहीसं वाटल होतं. नम्तर कॉलेजमधे असताना आपल्याकडे कोणी तक लावून पहातंय अस्म जाणवलं की उगीचंच महाराणी असल्या सारखं वाटायचं.
आपण जॉब जॉईन केल्यावर चिन्मय आपल्या मागे होता. सारखा आसपास घुटमळत असायचा. पण दिव्याला तो खूप आवडायचा म्हंटल्यावर पुढे जायचा प्रश्नच नव्हता.
पण आपण कधी प्रेमात पडलो नाही. का ? ते माहीत नाही. पण पडलो नाही हे खरे.
सिनेमातही नायक नायीका प्रेमात पडतात हे पहाताना ते प्रेमात पडतात या पेक्षाही ते पुढे नंतर काय करणार हाच विचार मनात यायचा.
इतक्या मारामार्‍या उचापती करून ट्रॉफी मिळवावी तशी मिळवलेल्या त्या हीरॉईनला पुढे कणीक मळा, केर काढा, धुणी धुवा, मुलांची शी शू काढा ही असलीच कामे करायला लावनार ना! त्या हीरोच्या कानाला पकडून म्हणावसं वाटायचं अरे बाबा एवढा अट्टाहास कशासाठी. त्या पेक्षा सैन्यात जा , पोलीसात जा अगदीच नाही जमलं तर फायरब्रिगेड नाहीतर होमगार्ड मधे भरती हो. तिथे दाखव जे काय शौर्य दाखवायचं ते.
ट्रेकच्या ग्रूपमधले , ऑफीसमधले मित्र खूप होते पण त्यांच्या हजबंड मटीरीयल आहे असं कोणी जाणवलंच नाही. हजबंड मटेरीयल.... काय विचार करतोय आपण. हजबंड मटेरीयल हा शब्द कुणी बनवला कोण जाणे पण भारी वाटतोय या क्षणी तरी.
हजबंड मटेरीयल असं काही या जगात असेल तर एलेक्ट्रॉनला काउंटर बॅलन्स करणारा प्रोटॉन असतो ना तसा हजबंड मटेरीयलला बॅलन्स म्हणून वाईफमटेरीयलसुद्धा असायलाच हवं. आपल्यात आहे का असं काही वाईफ मटेरीयल? ...संस्कारी.. सुशील, सोज्वळ, हसतमुख नाजूक लाजाळू लाघवी वगैरे वगैरे प्रॉपरटीज दाखवणारं. असलं तर ,ऑफिसचे प्रोजेक्ट टाईट टाईम लाईन्स वगैरे गडबडीला घाबरून नक्कीच कुठेतरी अडगळीत जाऊन बसलं असेल.
इतर बायका काय म्हणून हजबंड मटेरीयल पहात असतील. घरी धुणं भांडी करायला येणारी रौशन बी कुठलही काम धाम न करणार्‍या मारकुट्या नवर्‍याला पोसणारी. , ती काय पहात असेल तीच्या मटेरीयलकडे. बोलताना काचा फुटाव्या तशी खळखळून हसणारी कुंदा आत्या त्या ढेरपोट्या टकल्या काळ्याढूस काकांमधे काय हजबंड मटेरीयल पहात असेल? कदाचित तीने त्यांना ज्यावेळेस पहिल्यांदा पाहिलं असेल त्यावेळेस दिसलं असेल.
कुणाचं तरी एक वाक्य वाचलं होतं "एक क्षण भाळण्याचा.. बाकी सारे सांभाळण्याचे" हे असली विजोड नाती पाहिल्यावर ते वाक्य " एक क्षण भाळण्याचा , बाकी सगळे त्यांना टाळण्याचे" असं बदलावसं वाटतं.
गेल्या महिन्याभरात लग्नाबद्दल आईने सोनू मामाने बरंच बौद्धीक घेतलंय. लग्न हे माणसाला स्थैर्य देतं आपल्या परीपूर्ण बनवतं. म्हातारपणी एकमेकाम्ना सोबत जगता येतं वगैरे वगैरे.
मी पूर्वीची असते ना तर प्रत्येक मुद्द्याचं विच्छेदन केलं असतं या वेळेस का कोण जाणे तसं करावसं वाटलं नाही. कदाचित त्यांचे मुद्दे पटले असावेत. कदाचित मी बॉर्डर्वर उभी असेन.
लग्न , त्यातनं नंतर कराव्या लागणार्‍या तडजोडी, लग्नाची परीणीती म्हणून अभवीतपणे होणारी मुलं त्यांचे टॅन्टर्न्स साम्भाळणे वगैरे.... इथं क्लायंटशी पटले नाही तर प्रोजेक्ट सम्पेपर्यंत एक वर्ष सहा महिने जमवून घ्यायचं त्या नंतर पुन्हा कशाला तोंड पहायचंय. लग्न म्हणजे आयुष्यभराचा प्रोजेक्ट. जन्मभर तोच तो एकमेव क्लायंट. शिवाय पुन्हा सासरचे नातेवाईक वगैरे स्टेकहोल्डर्स आहेतच कायमचे डोक्यावर. शिवाय टेस्टिंग एन्व्हायरमेंट हे असले काही नाहीच. जे काय करायचं ते थेट एकदम रीयल लाईफ सर्व्हर मधे रीयल टाईम मधे.
हॅ:.... आपण लग्न आणि प्रोजेक्ट यांच्या अ‍ॅनालॉजी शोधतोय. मागे व्हॉट्सॅपवर कोणीतरी बायको आणि मोबाईल मधे असलेल्या साम्याबद्दल विनोदी फोर्वर्ड मेसेज पाठवला होता.हे त्संच जाहीसं. आईनं हे ऐकलं ना तर पाठीत धपाटाच घालेल. आणि सोनुमामा कपाळाला हात लावून बसेल. हद्द झाली पोरीची म्हणत.
मला हल्ली आईची दया येते. ती बिचारी बोलत रहाते. आपण ऐकत रहातो. हार नाही मानत दोघीही. पण या वेळी तीने चंग बांधलाय. माझं लग्न करायचंच या वर्षी म्हणुन. गेले चार महिने ती कधी कुणाचं नाव सुचवते तर कधी कोणाचा फोटो दाखवतेय.
तीला वाटतं मला लग्न करा यचे नाहिय्ये. तसे थेट विचारूनही झालेय एकदा. मुलीच्या जातीला हे चांगले नाही. लग्न म्हणजे आयुष्याच्या विशेषतःआयुष्याच्या उत्तरार्धासाठी सिक्यूरीटी असतेआपली काळजी घेणारं कोणीतरी आपलं असावं वगैरे वगैरे... ऐकवूनही झालंय. ही रेकॉर्ड पाठ झालेये मला.पण ती ब्रेक व्हायला तयार नाही. या रेकॉर्डचा शेवट होतो तो पण मग तू लग्नाला नाही का म्हणते आहेस? हो का म्हणत नाहीस? या प्रशानीच.
"कसं म्हणणार? लग्न करावं असं आतून वाटलं पाहीजे ना. !" माझा गुगली बॉल.
" प्रेमात पड मग आपोआप वाटेल"... आईने तर एकदम षटकारच ठोकला. चेंडू टाकल्या टाकल्या थेट कव्हर्स च्या डोक्यावरून सीमापार. मी हसते. कारण या पेक्षा दुसरं करण्याजोगं काहीच नसतं माझ्याकडे.
"प्रेमात पडून बघ एकदा. जग सगळं बदलतं. प्रेमात पडल्याचे दाखले आहेत पुराणातही. रुक्मीणीनं श्रीकृष्णाला लिहीलं होतं प्रेमपत्र. वाच कधी ते." अईसाहेब ऐकायला तयार नव्हत्या.
मी पुन्हा हसते. दुसरा पर्यायच नसतो. मुलीला प्रेमात पड असे सांगणारी आई आणि तसे ऐकणारी मुलगी हे बहुतेक भारतीय इतिहासातलं एकमेव उदाहरण असेल.
"प्रेमात पडल्यावर दोषसुद्धा डाग न वाटता हनुवटीच्या तीळासारखे सौंदर्य वाड्।अवणारे वाटतात. ज्याला तू नावे ठेवतेस ते चांगले वाटू शकतात." तीन मुलांचे सॉरी टू बी व्हेरी करेक्ट ,स्थळांचे फोटो मी पहाताक्षणीच थेवून दिले होते. त्याचा संदर्भ होता आईच्या वाक्याला." अशाने लोक स्थळं सुचवायचं बंद करतील. सगळी
स्थळं नाकारायची. अन कारणं काय द्यायची तर म्हणे नाव चांगलं नाही.
गेल्या महिन्यात एक स्थळ नाकारलं होतं नावासाठी. मुलाचं नाव होतं अक्षय आणि त्याच्या वडीलांचं होतं जीवन. अक्षय जीवन. एल आय सी ची टर्म पॉलीसी घेतल्यासारखं वाटत होतं.
या वेळेला काय करणार आहेस? आईने एक फोटो माझ्या पुढ्यात ठेवत विचारलं
फोटो अगदी साधाच होता. प्रसन्न , हसतमुख असलं कसलंच विशेषण लागू पडलं नसतं मेंगळट असाही नाही पण डोळ्यात कसलेतरी घाबरल्याचे भाव असावेत असा. एक्झॅक्ट साम्गायचं तर आधार कार्डावर असतो ना तसा फोटो होता.
"अगं पण फोटो पाहून आपल्याला क्लीक व्हायला नको का" माझा तुटपुंजा बचावात्मक चेंडू.
"आमच्या वेळेस जे काय क्लीक व्हायचे ते वरमाळ गळ्यात पडताना फोटोग्राफरने कॅमेरा क्लीक केल्या नंतर." मातोश्री ऐकायला तयार नाहीत. हा ही चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह करत सीमापार धाडलाय.
"अगं मुलाला भेट. बोला दोघे. कसं वाटतंय ते फील करा मग पुढे पाहू काय करायचं ते." गांगरलेल्या बॉलरला कॅप्टनने येवून पाठीवर हात ठेवत दिलासा द्यावा तस्सा बाबाने मला दिलासा दिला. "तु भेट एकदा श्री ला .भेटेल ग ती " बाबाने आईला परस्परच सांगुन टाकले. बाबाल अनाही म्हणणं अवघड जातं. पक्का सेल्स्मन आहे.
निदान भेटीसाठी तरी मी तयार झाले या आनंदात आईने चहात तिसर्‍यांदा साखर घातली आणि तोंड गोड करा म्हणून तो कप बाबापुढे ठेवला.

क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

18 Sep 2019 - 9:07 am | जॉनविक्क

मजा आली. पुभाप्र.

रातराणी's picture

18 Sep 2019 - 9:57 am | रातराणी

मस्त!! पुभाप्र..

पद्मावति's picture

18 Sep 2019 - 2:14 pm | पद्मावति

वाह...मस्तंच. पु. भा.प्र.

प्रचेतस's picture

19 Sep 2019 - 8:52 am | प्रचेतस

हल्ली मिपावर कथांचा तसा दुष्काळच आहे. आपल्या लेखनाद्वारे तुम्ही तो दूर करत आहात.
सुरुवात अतिशय आवडली. पुढचे भाग लवकर येऊ द्यात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Sep 2019 - 10:15 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असेच म्हणतो.

वाचकांनीही आवर्जून प्रतिसाद लिहिले पाहिजेत.

-दिलीप बिरुटे

झेन's picture

19 Sep 2019 - 8:17 pm | झेन

लिहिण्याची शैली आवडली.

विजुभाऊ's picture

20 Sep 2019 - 8:19 am | विजुभाऊ

_/\_

संजय पाटिल's picture

20 Sep 2019 - 5:16 pm | संजय पाटिल

वा! फार दिवसांनी मस्त वाचायला मिळालं....
पु.भा.प्र.