अनामिक ( Unknown)
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
तुझा नंबर unknown म्हणून सेव्ह केलाय.
तू स्त्री की पुरुष काहीच माहीत नाही मला. वय माहित नाही, कुठे मुक्काम माहित नाही. काम काय करतोस/ करतेस ते माहीत नाही. तू म्हणावं की तुम्ही? माहीत नाही. आणि एकदम extreme बोलायचं झालं तर तू जिवंत आहेस नाहीस, हेही माहीत नाही.
गेल्या आठ वर्षांत किती मोबाईल बदलले, किती नंबर डिलिट केले. किती माणसांना आयुष्यातून वजा केलं. पण तुझा नंबर अजूनही आहे. कधी हिंमत केली नाही मेसेज किंवा फोन करायची. आणि केला फोन तर काय सांगणार? आपण कधीच भेटलो नाही, एकमेकांना ओळखत नाही असं?
पहिल्या वाक्याला फोन कट होईल. कारण मी कोण आणि तुझा नंबर माझ्याकडे कसा हे इतकं वेडेपणाचं आहे. की कुणी विश्र्वास नाही ठेवणार. सीडीएम चे कनेक्शन जीएसेम करताना लागणा-या मधल्या काळासाठी एक तात्पुरता सेकंड हॅंड फोन घेतला. कार्ड टाकले आणि चेक केले तर sent messages च्या फोल्डरमध्ये काही मेसेजेस . एकाच नंबरवर पाठवलेले . तुझ्या..
आधी डिलीट करायचंच ठरवलेलं. असं दुस-या चे मेसेज वाचणे बरोबर नाही वगैरे... पण मग धीर करून पहिला मेसेज उघडला...
"घर आवरायला घेतलं. आणि लक्षात आलं तिने किती व्यवस्थित ठेवलेलं सगळं"
पुन्हा वाचला ...
कुणी लिहिलाय हा मेसेज? वडिलांनी मुलीला किंवा मुलाला? नव-याने मित्र किंवा मैत्रिणीला? आई गेल्यानंतर मुलीने पाठवलाय हा मेसेज??
किती possibilities आहेत. कोण कुणाला म्हणाले हा शाळेतला प्रश्न आठवला. बाळबोध. कोण कुणाला म्हणाले हा प्रश्न कधी नसतोच. "का" म्हणाले हाच खरा प्रश्न. आणि "कसे" म्हणाले यावरून त्याचं उत्तर शोधावं. ज्याला हे between the lines वाचता ऐकता येते तो शहाणा.
वेड्यासारखी त्या मेसेज मध्ये गुंतले मी.
कोण ती? बायको? आई? मुलगी? प्रेयसी?
बायको असण्याची शक्यता जास्त..
आणि आवरायला का घेतलं घर? मुद्दाम मेसेज करून कळवल़य म्हणजे हे नेहमीचं आवरणं नाही.. काय घडलंय? "ती" कुठे गेलीय?? कायमची?? म्हणजे घर सोडून निघून गेली की काही अघटीत??
...
आणि इतके दिवस किंवा वर्षे हा व्यवस्थितपणा लक्षात आला नव्हता???? का???आपण माणसाला इतकं गृहीत धरतो? त्याचं असणं, त्याचा स्वभाव, त्याच्या सवयी? की ते जाणवण्यासाठी त्या व्यक्तीचं जाणं कारण ठरावं??
खूप पूर्वी टीव्हीवर एक सिरीयल पाहिली होती, दरार. एक दोनच भाग पाहिले खरंतर ... Title song जगजीतच्या आवाजात होतं... रिश्तों मे दरार आयी. लहान होते , जगजीतशी , गझलंशी, त्यातल्या दर्दशी काहीच ओळख नव्हती अजून. पण ते शब्द , त्यातला भाव, त्या न कळत्या वयातही आत कुठेतरी हलवून गेले.
एक प्रसिद्ध गायक, स्वत:च्या विश्वात मग्न, त्याची असंतुष्ट पत्नी. तिचं त्याच्या तबलजीवर प्रेम आहे, आणि ती त्याच्याबरोबर घर सोडून निघून जाणार आहे. पण अजून पहिलं नातं पूर्णपणे तुटलं नाहीय. सोडून जावं की नाही हा निर्णय सुद्धा अजून १०० टक्के होतं नाहीय. काही तरी मागे खेचतंय.. जायच्या आदल्या रात्री ती, नव-याने लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला घेतलेली साडी नेसते. फुलं माळते, छान तयार होते. त्याच्या आवडीचा स्वयंपाक करते आणि त्याची वाट पाहत बसते. तो येतो. जेवायला बसतो. जेवण सुरु करतो.. ती अधीरपणे त्याच्याकडे बघतेय ,तो काही बोलेल याची वाट बघतेय.
... शेवटी न राहवून ती विचारते, "कसा झालाय स्वयंपाक?" " छान!"
" मी कशी दिसतेय? " तो वरती न बघता उत्तर देतो..." छान"
आणि त्याक्षणी तिचा निर्णय होतो..
मनात जे काही येतं ते तेव्हाच का नाही व्यक्त करत आपण? समोरच्यानं समजून घ्यावं ही अपेक्षा का? की कालांतराने समजणे, सांगणे अशक्य अशी दरी निर्माण होते?
संवादाने तरी नात्यातील ही दरी बुजते का? की दोघांमधली ही दरी म्हणजेच नातं? हवं तेव्हा एकमेकांकडे जाता येण्यासारखी सोपी वाट जपावी बस! त्या वाटेवर काटेकुटे, संशयाची झुडपं उगवू देऊ नये.. आणि वाट जर पायाखालची असली, सतत ये जा असली की तण माजंतही नाही. स्वच्छ झाडलेल्या वाटेसारखंच स्वच्छ आवरलेलं नातं!!
ही आवरण्याची जबाबदारी दोघांपैकी कुणीतरी न बोलता घेतं. अणि ती व्यक्ती निघून गेल्यावर हे अनावर आठवतं. " किती व्यवस्थित ठेवलेलं सगळं."
"Started badminton today."
हा दुसरा मेसेज. सुमारे महिन्याभरानंतरचा.
मध्ये काय बोलणं झालं? फोनवर की फक्त मेसेज मध्ये? ते सगळे मेसेज डिलिट झाले?
पूर्वी खेळायचे का ते? आपण मोठं होतो तसतसं खेळणं का थांबवतो?
कधी "तिच्या"बरोबर खेळले होते ते?
तू सुचवलेलंस का पुन्हा खेळायला? तेवढंच मन रमेल एक रुटीन चालू राहील म्हणून? आणि म्हणून त्यांनी तत्परतेनं कळवलं तुला.
रुटीन. विस्कटलेली घडी पुन्हा बसवायला खूप उपयोगी असतं हे. एकदा का रुटीन बसलं की वरवर तरी सगळं normal वाटायला लागतं. आणि काळ उलटला ना की आतसुद्धा सगळं निवळतं. सगळा कचरा खाली बसतो. पाणी मन नितळ बनतं.
तसंच झालं का?
आणि नंतर तिसरा आणि शेवटचा मेसेज.
"Kids are here. They are adjusting pretty well."
हं.
मुलं? की नातवंड? मधला महिना दीड महिना कुठं राहिली असतील? की सुट्टीला आलीयेत नेहमीप्रमाणे?
आणि मुलं रुळावतात. निदान वरवर तरी. मोठं झाल्यावर कधीकधी आई-वडिलांना माफसुद्धा करतात.
पण जड गेले का ते दिवस?? कसं निभावून नेलं?
इतके साधे सहज हळवे मेसेज ... मनमोकळं sharing. बस! पण त्यातूनच बळ मिळालं का जगण्याचं? तुम्हा दोघांनाही?
किती सुंदर नातं असेल तुम्हा दोघांचं!! कुठलं हे विचारायचा दरिद्रीपणा नाही करणार.
यानंतर मेसेज नाहीत.
मग फोन बदलला का? कारण तेवढ्यातच स्मार्टफोन आले होते. आधीचा exchange करून नवा घेतला का? याहून दुस-या possibilities चा विचार करवत नाही.
Did his life come back to normalcy?
नवीन फोन आला आणि तो मेसेज वाला फोन मी दुकानात परत दिला. तुझा नंबर मात्र ठेवला save करून. आणि हे तीन मेसेज ते तर मनात घर करून राहिले.
वर्षं उलटली ह्याला. मुलगी आताच परदेशी गेली. तिचं दूर जाणं अजून अंगवळणी पडलं नाहीय. बावीस वर्षांची सवय. अशी मोडेल थोडीच!ती एकेक सुचवत असते. आई आता free आहेस तर हे कर ते कर.
आज badminton खेळले.
आणि ..
तुला आठवतात हे मेसेज?
Are you two still in touch?
प्रतिक्रिया
_/\_
आनन्दा, धन्यवाद!__/\__
अद्भुत!!
हे लय भारी! :)
_/\_ !!
रारा , तुझ्या लिखाणाची वाट
विषय रेशीमलडीसारखा सहजपणे आणि
प्रतिसाद आवडला. :)
व्वा ! काय सुरेख, तरल लिहिलयं
धन्यवाद!;)
शेवट जबरा.
धन्यवाद आवर्जून
काय सुरेख लिहिलंय...खास
:) धन्स!!
__/\__ मस्त!
धन्यवाद!;)
एकदम भारी
धन्यवाद प्रतिसादाबद्दल..
तरल
:)
+1
धन्यवाद!;)
अलवार, नितळ असा अनुभव आणि
राघवाss धन्यवाद!:)
अदभुत
धन्यवाद..
रोचक
.
या विधानावर विश्वास का ठेवावा ?
माबोवरपण पोस्ट करा तिथे इथल्यापेक्षा चांगले वाचक आहेत.
अनामिकांसाठी मिपा आणि माबोच्या मुल्यांची तुलना अशक्य
जालीय
त्याचं काय आहे, once a मिपाकर
काय जबरा लिहिलय...
मस्त लिहिलंय!
सुंदर तरल आणि मुलायम लेखन,
कित्ती सुंदर आणि तरल!
मनात जे काही येतं ते तेव्हाच का नाही व्यक्त करत आपण? समोरच्यानं समजून घ्यावं ही अपेक्षा का? की कालांतराने समजणे, सांगणे अशक्य अशी दरी निर्माण होते? संवादाने तरी नात्यातील ही दरी बुजते का? की दोघांमधली ही दरी म्हणजेच नातं? हवं तेव्हा एकमेकांकडे जाता येण्यासारखी सोपी वाट जपावी बस! त्या वाटेवर काटेकुटे, संशयाची झुडपं उगवू देऊ नये.. आणि वाट जर पायाखालची असली, सतत ये जा असली की तण माजंतही नाही. स्वच्छ झाडलेल्या वाटेसारखंच स्वच्छ आवरलेलं नातं!! ही आवरण्याची जबाबदारी दोघांपैकी कुणीतरी न बोलता घेतं. अणि ती व्यक्ती निघून गेल्यावर हे अनावर आठवतं. " किती व्यवस्थित ठेवलेलं सगळं."यासाठी तुम्हाला __/\__सगळ्यांना धन्यवाद!!