नाचणाऱ्या गाणाऱ्यांचा देश

सर टोबी's picture
सर टोबी in जनातलं, मनातलं
7 Sep 2019 - 10:11 am

एक समाज म्हणून आपण बरीच प्रगती केली आहे. मुलांवर संस्कार करताना छडी लगे छमछम असा सब घोडे बारटक्के पासून सुरु झालेला प्रवास आता मुलांचा कल बघून ऐच्छिक विषय शिकविण्यापर्यंत येऊन ठेपला आहे. आता मुलांना 'मोठेपणी कोण होणार' हा प्रश्न विचारणे शिष्टसंम्मत राहिलेला नाही. मुलांना पॉकेटमनी देणे थोडेफार सर्वमान्य झाले असावे. 'आम्ही म्युनिसिपालिटीच्या दिव्याखाली अभ्यास केला, जुनी पुस्तकं वापरली, सायकलवर शाळा कॉलेजचे शिक्षण घेतले' असे सुनावणे बंद झाले असावे. शैक्षणिक प्रगती हेच एकमेव आयुष्यातील यशस्वी होण्याचे मापदंड आहे हि बाब अजूनही महत्व राखून आहे याचे कारण कला आणि खेळ यामध्ये यश मिळाले नाही तर जगण्याचा प्रवास अतिशय खडतर होऊ शकतो.

अशा या मोकळ्या ढाकळ्यापणाचे काही दृश्य परिणाम आता जाणवायला लागले आहेत.आता गणित किंवा इंग्लिशमध्ये विशेष प्राविण्य मिळवणे, स्कॉलरशिपची परीक्षा देणे यांचे फारसे पूर्वीइतके स्तोम राहिले नसावे. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार वगैरे गोष्टी होतात पण त्याला दुर्मिळतेमुळे असणारी आदराची झालर कमी झालेली दिसते. अमक्या वडापाववाल्याचे किंवा चहाची टपरी चालविणाऱ्याचे दोन-तीन फ्लॅट्स आहेत अशा किश्शानमुळे 'विद्वान सर्वत्र पुजत्ये' हे केवळ भिंतीवर लिहिण्याचे वाक्य झाले आहे.

सहसा मुलांचे ऐच्छिक विषय आजकाल काय असतात याचा विचार केला तर नृत्य प्रकार बराच लोकप्रिय व्हायला लागला आहे असे दिसते. मध्यंतरी आमच्याजवळच्या शाळेमध्ये एक ऑडिशनचा कार्यक्रम झाला तर जवळपास तीनशे मीटरपर्यंत रांग लागली होती. डिसेंबर जानेवारीमध्ये शाळांच्या स्नेहसंमेलनामध्ये तर लोकप्रिय गाण्यांवर होणारे लहान मुलांचे नाच हाच बहुदा एकमेव कार्यक्रम असतो. सोसायट्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, नवीन उत्पादनाचे अवतरण, कार्यालयातील सहली आणि सहभोजन, विकेंड आणि इतर निमित्ताने होणाऱ्या पार्टीजमध्ये देखील नृत्य हि एकमेव गोष्ट झाली आहे. पूर्वी वक्तृत्व कलेचे जे महत्व होते ते आता नृत्यकलेला आले आहे. मराठी लग्नामध्ये देखील संगीत आणि मेहेंदी हि संस्कृती रुजायला लागली आहे.

फार वर्षांपूर्वी मराठीमध्ये कोळीगीतांचा इतका सुळसुळाट झाला होता कि अनंत काणेकरांनी गमतीने म्हटले होते कि जर कोणी महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तर मासेमारी हा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय आहे असे त्यात लिहिले जाईल. आज नृत्याच्या लोकप्रियतेने नुसत्या महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण भारतालाच नाचणाऱ्या - गाणाऱ्यांचा देश अशी ओळख दिली आहे आणि ती फारशी आदरयुक्त भावनेने दिलेली नसून उद्वेगाने दिलेली आहे. कलाकारांना मिळणारी राजमान्यता, लोकप्रियता आणि पैसा आणि समाजातील इतर घटक यांना मिळणारी मान्यता यातील तफावत इतकी मोठी आहे कि त्यातून हि उद्विग्नता जन्माला आली आहे. अशीच गोष्ट खेळाडूंच्या बाबतीतही होते. मोठी स्पर्धा जिंकल्यानंतर मिळणारे कोट्यवधींची बक्षिसे, घरं यांचा सरकार आणि पुरस्कर्ते वर्षाव करतात. तर शास्त्रज्ञ आणि संशोधनावर काम करणाऱ्यांना निधी आणि उपकरणे यांच्या कमतरतेशी झगडावे लागते.

लेखक, विचारवंत, शास्त्रज्ञ हे भारतीयांना ललामभूत असण्याचा काळ आता मागे पडला आहे. ज्यावर्षी सचिनला भारतरत्न मिळाले त्यावर्षीच्या पदमपुरस्कारांच्या पहिल्या पायरीवर डॉ. मायदेव हि व्यक्ती होती. सुकाणू नसलेल्या जहाजासारखी हि समाजाची अवस्था आहे.

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

सुधीर कांदळकर's picture

7 Sep 2019 - 11:33 am | सुधीर कांदळकर

लेखांतल्या शब्दांमधे आणि ओळीमध्ये न लिहिलेला उद्वेग दिसतो आहे. लेखातल्या मजकुराशी मी पूर्ण सहमत आहे. काणेकरांचे उद्गार छान उदाहरण दिले आहे. हे उद्गार मला ठाऊक नव्हते.

माझ्या मते ही लाट आहे. वेडेवाकडे हिडीस नाच दिसतात आहे. परंतु दुसरीही बाजू आहे. आज नवेनवे गायक स्पर्धांतून छान गातांना दिसताहेत. सुकन्या काळणसारख्या काही असामान्य नर्तिका पुढे येताहेत. खासकरून संगीताचे शिक्षण न घेतलेले तरीही असामान्य प्रतिभेचे गायक्/गायिका दिसताहेत. असामान्य सुंदर असे विरळाच, बाकी सारे सामान्य असते हा निसर्गनियम आहेच.

गायकात स्वरसौंदर्याचा अभाव असलेल्याने गाणार्‍याला कोणी नावे ठेवीत नाही. परंतु नाच जर सौंदर्यपूर्ण नसेल तर आपण (मी सुद्धा) नावे ठेवतोच. चित्रवाणी संचाचा रिमोट, आपल्या डोळ्यावरच्या पापण्या त्यासाठीच तर आहेत. लाट कधीतरी ओसरेलशी आशा करूयात.

विचारप्रवर्तक लेखाबद्दल धन्यवाद.

जालिम लोशन's picture

7 Sep 2019 - 12:55 pm | जालिम लोशन

विचार करायला लावणारा लेख.

जॉनविक्क's picture

7 Sep 2019 - 1:26 pm | जॉनविक्क

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Sep 2019 - 1:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

लेखातले चित्र सद्य समाजाचे प्रतिबिंब आहे. जेव्हा आणि जसा समाज बदलेल तसेच ते सुद्धा बदलेल.

एक सर्वसामान्य जीवनातली कसोटी लावून पाहिली तर... जेव्हा सर्वसामान्याच्या हातातला टिव्ही रिमोट केवळ मनोरंजनावर न थांबता बराच काळ शस्त्रिय कार्यक्रमांवर स्थिरावेल (पक्षी : जेव्हा समाज ही कसोटी पूर्ण करेल), तेव्हा तुम्हाला अपेक्षित असलेला बदल घडलेला असेल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Sep 2019 - 2:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

अजून थोडे...

दुसरा दृष्टिकोन : (अ) संधी आणि (आ) आर्थिक फायदा, हे दोन घटक कोणत्याही गोष्टीला पटकन लोकप्रिय करतात.

खेळ :

एक-दोन दशकापूर्वी क्रिकेटचा दबदबा असला तरी, खेळाडूना फारसे पैसे मिलत नसत... फारतर, खूप प्रसिद्धी झालेल्या मोजक्या खेळाडूंना बँक, वगैरे बर्‍या पगाराच्या नोकर्‍या देत असत. त्याविरुद्ध, हल्ली आयपीएल/देशाच्या क्रिकेट टीममध्ये ५ ते १० वर्षे जम बसवलेल्या खेळाडूची आर्थिक स्थिती उत्तम होण्याइतके उत्पन्न मिळते. यात जाहिरातींपासून मिळणारे उत्पन्न धरले तर, अजून जास्त आर्थिक स्थैर्य मिळते.

याशिवाय, एवढ्या प्रचंड लोकसंखेतून जर फक्त १२-१५ लोकांना संधी मिळणार असली (जी अवस्था जेव्हा फक्त टेस्ट क्रिकेट मॅचेस आस्तित्वात होत्या), तर त्या स्पर्धेपासून अनेक जण दूर राहणेच पसंत करतात. जे इतर कठीण स्पर्धापरिक्षांच्या (उदा : आयआयटी, आयआयएम, आयएएस, सीए, इ) बाबतीत आहे, तेच इतर कठीण स्पर्धा असलेल्या सर्व गोष्टींनाही लागू होते/आहे/असेल. :)

हे चित्र, आयपीएलने बदलले आहे. १०-१२ संघांत, प्रत्येकी १२-१५ जागा असल्याने, निवडीची १०-१५ पटींने वाढली आहे. त्यामुळे, लहानमोठ्या शहरांतील तरूणांनाही, "मेरा भी नंबर आ सकता है।" असे वाटून प्रयत्न करायला हुरुप येत आहे... महेंद्रसिंह धोनी याचे उत्तम उदाहरण आहे.

या स्तराची संधी किंवा आर्थिक स्थैर्य, महिला क्रिकेट देत नसल्याने, अनेकदा जगज्जेतेपद मिळवूनही, क्रिकेटपटू व्हावे ही महत्वाकांक्षा फार कमी तरुणींमध्ये दिसते.

गेल्या काही वर्षांपासून, क्रिकेटव्यतिरिक्त, टेनिस व बॅडमिंटन सारखे इतर खेळही (क्रिकेट इतके नसले तरिही बर्‍यापैकी) जीवनाचे धेय/व्यवसाय म्हणून पुढे येत आहेत, याची मुख्य कारणे, (अ) मुख्यतः आर्थिक स्थैर्य आणि (आ) बर्‍याच प्रमाणात वाढलेल्या संधी, हीच आहेत.

कला :

एक-दोन दशकापूर्वी कलेच्या क्षेत्रातही मोजकीच नावे दिसत असत. १०० कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशात, १९०० ते २००० सालाच्या कालखंडामध्ये गायन, वादन, चित्रकला, नृत्य, इत्यादी कलांमध्ये नाव आणि पैसा कमावलेली नावे लिहायला दोन-तीन फुलस्केप पाने पुरतील, ही वस्तूस्थिती काय सांगते?

त्यावेळी, चित्रपट सृष्टीत जम बसवणे हाच एक नाव आणि पैसा मिळविण्याचा तुलनेने सोपा राजमार्ग होता... पण त्या मार्गावर पाय ठेवायला मिळणे किती कर्मकठीण होते, हे सांगायला नकोच !

त्याविरुध्द, हल्ली गायन व नृत्यांचे रिअ‍ॅलिटी शो पावसाळ्यात उगवणार्‍या आळींब्यांसारखे प्रत्येक टिव्ही वाहीनीवर उगवत आहेत. ते केवळ मनोरंजन न राहता, छोट्या मोठ्या शहर-गावातल्या कलाकारांना आपली कला सादर करण्याचे एक फार महत्वाचे व्यासपीठ बनले आहेत. पूर्वी लोकांच्या नजरेआड राहून कोमेजले जात असणार्‍या अनेक कलाकारांना, या कार्यक्रमांमुळे आपली कला लोकांसमोर सादर करण्याची आणि कलेव्दारे मिळणारे आर्थिक स्थैर्य मिळविण्याची संधी मिळत आहे, हे विसरून चालणार नाही.

शास्त्र :

शास्त्रज्ञाला आपल्या देशात अजून हवा तेवढा सन्मान मिळत नाही. याचे मुख्य कारण, शास्त्र या विषयाकडे आपण केवळ मोठ्या पगाराची नोकरी मिळविण्याचा मार्ग, याच दृष्टीने पाहतो. (अ) स्वतःची कंपनी सुरू करायची आहे आणि किंवा (आ) एखाद्या नामवंत विद्यापिठात/संस्थेत संशोधन करायचे आहे, अश्या कारणासाठी शास्त्र विषयाचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे?

याचीही मुख्य कारणे (अ) संधी आणि (आ) आर्थिक स्थैर्य, यांची भारतातील वानवा हीच आहेत. त्याविरुद्ध, विकसित पाश्चिमात्य देशांत हे दोन घटक विपुल प्रमाणात आहेत, त्यामुळे त्या देशांत, शास्त्रिय संशोधन आणि त्यावर आधारलेले धंदा व व्यवसाय या आकर्षक गोष्टी आहेत.

एकंदरीत...

मानवी व्यवहार, (फायद्याचा) लोभ आणि (नुकसानीची) भिती या दोन मुख्य तत्वांवर चालतो.

अर्थातच, (अ) संधी आणि (आ) आर्थिक फायदा, या दोन गोष्टी असल्याशिवाय किंवा निर्माण केल्याशिवाय कोणत्याही गोष्टीकडे लोक मोठ्या प्रमाणात आकर्षित होत नाहीत... हे दोन घटक निर्माण झाले/केले की लोकांचे मतपरिवर्तन आपोआप होते... फक्त हळहळ किंवा तात्विक चर्चेने फारसे काही साध्य होत नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Sep 2019 - 2:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

अजून एक निरिक्षण...

माझ्या अनुभवात, नाचणे-गाणे सर्वसामान्य शहरी भारतिय माणसाच्या टिव्हीवर जास्त आणि जीवनात फार कमी प्रमाणात आहे. किंबहुना, धड नाचणारी आणि/किंवा गाणारी व्यक्ती, तुलनेने फार विरळ आहे. उत्तरेकडे सर्वसामान्य व्यक्तीने नाचणे-गाणे जरा प्रमाणात तरी आहे, जसजसे दक्षिणेकडे सरकू लागतो, तसतसे ते प्रमाण कमी कमी होऊ लागते.

त्याविरुद्ध, तालबद्ध नाचणे/गाणे शिकणे आणि लोकांसमोर त्याचे अभिमानाने सादरीकरण करणे, यात पाश्चिमात्यांसह इतर अनेक देशांतील सर्वसामान्य व्यक्तींना फारसे अवघडल्यासारखे वाटत नाही... प्रेक्षकही त्या गोष्टीचे मनमोकळेपणे कौतूक करतात... नाक मुरडत नाहीत किंवा कुत्सितपणा दाखवत नाहीत.

'टीव्हीवर किती प्रमाणात नाचगाणे दाखवले जाते' यापेक्षा जास्त, 'सर्वसामान्य लोक नाच-गाण्यात भाग घेऊन त्याचा आनंद किती सहजपणे उपभोगू शकतात' यावर "नाचणाऱ्या गाणाऱ्यांचा देश" हे नाव पडायला हवे... आणि ते (ग्रॉस डोमेस्टिक हॅपिनेसमध्ये वाढ दर्शविणारे) बिरुद खात्रीने अभिमानाने बाळगण्याजोगे असेल ! :)

इतर कोणत्याही गोष्टींइतकेच, शास्त्र आणि कला यांच्याबाबतीतले संतुलन जीवनात फार महत्वाचे आहे... त्यात वर-खाली काहीच नाही, प्रत्येकाचे आपले महत्वाचे स्थान आहे.

श्वेता२४'s picture

8 Sep 2019 - 9:28 am | श्वेता२४

इतर कोणत्याही गोष्टींइतकेच, शास्त्र आणि कला यांच्याबाबतीतले संतुलन जीवनात फार महत्वाचे आहे... त्यात वर-खाली काहीच नाही, प्रत्येकाचे आपले महत्वाचे स्थान आहे./code>

+१

चांद्र यानाने पाठवलेल्या फोटोतील चंद्रावरील खड्डे पाहणारे अन् रोज खड्डेमय रस्त्यातुन प्रवास करणारे हिंदुस्थानी नागरिक !

[ चंद्र प्रेमी ]
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- त्रिपक्षीय नौसैनिक सरावाने चीनला संदेश-भारत-पाकिस्तान सैनिकी संघर्ष भडकल्यास चीनसाठी भारताचे "मलाक्का औषध"

सहसा असे वाटू शकते कि धागा लेखकाला नाचगाण्याविषयी नापसंती अथवा घृणा आहे. तर ते तसे नाही. प्रश्न आहे तो प्राथमिकतेचा. यावर कलासक्त लोकांचे म्हणणे असू शकते कि आमच्या दृष्टीने जीवन जगण्याचे साधन आणि कला या एकाच पातळीवर आहे. खरं तर असे असते असं वाटत नाही. जीवनाचा संघर्ष थोडासा मागे पडल्यानंतरच सहसा कोणीही कलेचा विचार करू शकतो. पण तरी वादापुरतं असेच आहे (म्हणजे जीवन जगण्याचे साधन आणि कला एकाच पातळीवर आहेत) असे मानले तरी मी मांडला तोच मुद्दा सिद्ध होतो. माझा मुद्दा आहे कि सामाजिक स्थान, संपत्ती, आणि सन्मान यामध्ये कलाकारांना झुकते माप मिळते. त्या दृष्टीने मी सरकारीपातळीवर दिल्या जाणाऱ्या सन्मानांचा उल्लेख केला. आता १९५४ ते २०१९ पर्यंतच्या भारतरत्न पुरस्काराचे उदाहरण घ्या. यामध्ये ९ वेळा कला क्षेत्रातील व्यक्तींना हा पुरस्कार मिळाला तर सहाच वेळेला विज्ञान, स्थापत्य, अर्थशास्त्र, आणि शेती या क्षेत्रातील व्यक्तींना हा सन्मान मिळाला. त्यातील डॉ. अब्दुल कलाम यांचा सन्मान होण्यामध्ये ते राष्ट्रपती होते या वस्तुस्थितीचा आणि अमर्त्य सेन यांच्या बाबतीत त्यांचा नोबेल पुरस्काराने झालेला सन्मान जास्त कारणीभूत होते असे समजायला जास्त वाव आहे.

कुमार१'s picture

11 Sep 2019 - 8:46 am | कुमार१

यावर मी एक लेख वाचला होता. त्यातला सारांश:

पुरस्कार समितीत संपूर्ण भारतातील सभासद असतात. आता त्यांच्यापुढे जी नावे सादर केली जातात त्यातल्या हिंदी चित्रपट कलाकारांची नावे बहुतेक सर्व सभासदांनी 'ऐकलेली' असतात. पण एखाद्या वैज्ञानिक वा समाजसेवकाचे नाव सुद्धा त्यांना माहितीच नसते.

त्यामुळे कलाकाराचे घोडे कायम पुढे राहते.