प्राचिन ऋद्धि-सिद्धि विनायक मंदिर

जागु's picture
जागु in जनातलं, मनातलं
6 Sep 2019 - 2:55 pm

निसर्गाच्या सानिध्यात असणार अस आमचं छोटंसं उरण हे मूर्ती लहान पण कीर्ती महान प्रमाणेच माझ्या ऋदयात घर करून आहे. आमच्या उरणमध्ये मोरा बंदर, करंजा बंदर व पिरवाडी -दांडा या निसर्गसंपन्न समुद्रकिनार्‍यांची झालर आहे. पिरवाडीचा समुद्रकिनारा हा आम्हा रहिवाशांसाठी मनःशांती, करमणुकीचे मोठे स्रोत आहे. सुट्टीच्या दिवसांत अनेक पर्यटक ह्या समुद्रकिनारी भेट देऊन मनात आनंद घेऊन जातात. उरणमध्ये पूर्वी खूप खाड्या होत्या, मिठागरे होती. परंतू आता औद्योगिककरणामुळे त्यांचे प्रमाण कमी आहे. तरीही काही खाड्या शाबूत आहेत. त्यातील पाणज्याची खाडी ही विदेशी रोहीत पक्षांच्या दर्शनासाठी प्रसिद्ध आहे. रोहीत पक्षांबरोबर इतर अनेक पक्षी ह्या खाडीच्या परिसरात आपली गुजराण करतात. इथल्या करंजा गावातील द्रोणागिरी पर्वताबद्दल एक आख्यायिका आहे. मारुतीने लक्ष्मणाला संजीवनी वनस्पतीसाठी पर्वत उचलून नेत असताना त्या पर्वताचा एक तुकडा उरणच्या करंजा गावी पडला. तो डोंगर द्रोणागिरी डोंगर म्हणून प्रसिद्ध आहे. ह्या डोंगराच्या एका भागात द्रोणागिरी देवीचे सुंदर मंदिर आहे. मंदिर टेकडीवर असून करंजा जेट्टीचे, समुद्र किनार्‍याचे, तिथल्या होड्यांचे विहंगम दृश्य ह्या टेकडीवरून होते. द्रोणागिरीच्या डोंगरावर एक इतिहासकालीन पडका किल्ला आहे. किल्ल्याच्या बाहेर एक हौद आहे. हे नैसर्गिक थंडगार पाणी आम्ही पूर्वी डोंगरावर गेल्यावर प्राशन करायचो. आमच्या उरणात अजूनही तांदळाची शेती पिकते. तांदळाच्या शेतीनंतर काही ठिकाणे भाजीचे मळे फुलतात. आमच्या ह्या उरण तालुक्यातील घारापुरी ही लेणी पर्यटनस्थळ म्हणून जगप्रसिद्ध आहे. आमच्या उरणातली जनताही जितकी प्रेमळ तितकीच जिगरबाज आहे. अनेक ऐतिहासिक लढे उरण तालुक्यात गाजले. त्यात चिरनेरचा जंगल सत्याग्रह, शेतकरी आंदोलन यांचा समावेश आहे. सत्याग्रहाबरोबर जमिनींच्या आंदोलनातही अनेक हुतात्मे शहीद झाले आहेत व त्यांची हुतात्मा स्मारके ही आता बलिदानाची साक्ष देत आहेत. भारताच्या नकाश्यावर उरणचे नाव गाजवणारे आशिया खंडातील दोन नंबरचे जवाहरलाल नेहरू बंदर (जे. एन. पी. टी. ), ओ. एन. जी. सी., बि. पी. सी. एल सारखे प्रकल्प उरणच्या छत्रछायेत प्रगतिपथावर आहेत. आमच्या उरणात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. चिरनेरचा महागणपतीच्या देवळावर जंगल सत्याग्रहाच्या खुणा देखील आहेत. उरणच्या बाजारपेठेत उरणावती देवीचे मंदिर आहे. ह्याच देवीला शितळादेवी असेही म्हणतात. ह्याच देवळाच्या आजूबाजूला एका ओळीत शंकर, विठोबा, तिरूपती, दत्तगुरू या देवतांची पूर्वीपासून मंदिरे आहेत. ह्या भागाला देवळांवरून देउळवाडी संबोधण्यात येते. त्याच्याच पुढे नाक्यावर, मारुती, गणपती व लक्ष्मीनारायण यांची पूर्वापार मंदिरे आहेत. देऊळवाडीच्या मागच्या अंगाला मोठे विमला तलाव आहे वयोवृद्धापासून ते लहान बालकांसाठी हे विरंगुळ्याचे स्थान आहे. केगांव ह्या गावी माणकेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. त्यातच आमच्या उरण तालुक्यात पूर्वीचे रानवड गावी असलेले ऋद्धि सिद्धि विनायकाचे जागृत देवस्थान आहे.

हिंदू धर्मात बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नहर्ता मानला जाणारा देव म्हणजे गणपती. गणपतीची अनेक नावे आहेत. त्यातील विनायक म्हणजे विशिष्ट रूपाने नायक किंवा नेता. ऋद्धि सिद्धि विनायका वरून सदर गाव हे विनायक ह्या नावाने ओळखले जाते. विनायक गावातील परिसर हिरवागार आहे. इथे आल्यावर नक्कीच कोकणची सफर घडल्यासारखे वाटते. प्रत्येक घराच्या समोर छोटीशी फुललेली बाग, बागेत अबोली, गावठी गुलाब, जास्वंद, चाफा अशा प्रकारची टवटवीत फुले व त्यांचा सुगंध, त्यात आंबा, फणस, नारळांसारख्या महावृक्षांची शीतल सावली, विविध पक्षांचे गुंजन, तोर्‍यात चालणार्‍या वाटा, खेळता वारा असे सुंदर श्री ऋद्धि सिद्धि विनायकाच्या आशिर्वादाच्या छायेत असणारे विनायक हे गाव.

ऋद्धि सिद्धि विनायक हे प्राचीन मंदिर ६५४ वर्षापासूनचे आहे. हे मंदिर शके १२८७ म्हणजे इसवीसन १३६५ मधील हम्बीराज कालीन आहे. हम्बीराज हा देवगिरी येथील यादव राजवटीतला सरदार होता व त्याच्या आधिपत्याखाली कोंकण भूमीचा भाग होता. त्यानेच हे मंदिर बांधलेले आहे असे रानवड व अलिबाग - नागाव येथे सापडलेल्या प्राचीन शिलालेखात उल्लेखीलेले आहे. सध्या हे शिलालेख मुंबई येथील प्रिंस ऑफ वेल्स या म्युझियम मध्ये आहेत.

मंदिरातील गणेशाची मूर्ती ही दगडी कोरीव असून अतिशय सुंदर व विलोभनीय आहे. एकाच पाषाणावर गणपती व त्याच्या दोन बाजूला ऋद्धि व सिद्धि उभ्या आहेत हे ह्या मूर्तीचे वैशिष्ट्य आहे. कारण अन्य कोणत्याही देवळामध्ये एकाच पाषाणावर गणपतीसह ऋद्धि व सिद्धि असलेली अशी मूर्ती आढळून येत नाही. ही मूर्ती काळ्या पाषाणात असून पाषाण साडेतीन फूट उंचीचा आहे तर अडीच फूट रुंद व आठ इंच जाडी असलेला आहे. विनायकाची मूर्ती साडेतीन फूट उंच असून ऋध्दि सिद्धि दोन फूट उंचिच्या आहेत. श्री विनायकाने आपले दोन्ही पाय मांडी घालण्यासाठी दुमडलेले आहेत. श्री गजाननाने पितांबर धारण केलेले आहे तसेच माथ्यावर सुंदर नक्षी असलेले मुकुट आहे. श्री गणेशाच्या हातात परशू, अंकुश आहेत आणि मांडीवर ठेवलेल्या हातात मोदक लाडू आहे. ऋद्धि सिद्धिंच्या हातात चवऱ्या आहेत. मुर्तीचा गोलाकार गाभारा दगडी आहे.

मुस्लिमांनी सदर मुर्तीचा विध्वंस करू नये म्हणून मंदिराचा कळस मशीदींच्या आकारासारखा ठेवला होता. त्यामुळे १२ व्या शतकात ही मूर्ती टिकून राहिली. ह्या मंदिराच्या गाभार्‍यातून कळसाचे दर्शन होते हे देखील ह्या देवळाचे अजून एक वैशिष्ट्य आहे.

Code

गेली कित्येक वर्षे रोज सकाळी सूर्यनारायण ह्या प्रथम पूज्य, विघ्नहर्त्याचे चरण स्पर्श करण्यासाठी मंदिरात किरणरूपी नमस्कार घालतात. नियमित सकाळी सव्वासातला सूर्यकिरणांचे आगमन मूर्तीवर होते.

देवळाच्या बाजूला एक हिरवेगार तळे आहे. देवळाचा परिसर टापटीप व स्वच्छ आहे. ह्या परिसरात एक विहीर आहे त्यातून पाण्याच्या टाकीची सोय केलेली आहे. १९३३ साली देवळाच्या समोर बुद्धी बरोबर शक्तीचे दैवत म्हणून मारुतीच्या देवळाची स्थापना केली होती परंतू बुद्धीची देवता व शक्तीची देवता समोरासमोर नसावी अशा जाणकारांच्या सूचना आल्याने मारुतीचे मंदिर ऋद्धि सिद्धि विनायकाच्या उजव्या बाजूला दक्षिणाभूमुखी करण्यात आलेले आहे.

मूर्तीच्या पाठीमागे सव्वातीन फूट उंचीचा प्राकृत भाषेमध्ये शिलालेख आहे. शिलालेखाच्या वर सूर्य, चंद्र व कलश यांच्या आकृती आहेत तसेच खालच्या बाजूला गध्देगल म्हणजे वस्तूचा व जमिनीचा अपहार करणार्‍यास दहशत घालणारे गदर्भ चित्र आहे. हा शिलालेख अनेक शतकांपासून एक गूढ होते, ह्या गूढ शिलालेखाचा उलगडा सन १९४० मध्ये सेंट झेवियर कॉलेज, मुंबई च्या हिस्टॉरिकल ग्रुपने केला हे आलिकडच्या काळात जुन्या कागदपत्रांचा शोध घेताना सापडले. ह्या शिला लेखाचा मराठी अनुवाद नांदेड येथील इतिहास संशोधक श्री प्रभाकर देव यांनी केलेला आहे.

सदर देवस्थानाची मालकी गेल्या नऊ पिढ्यांपासून घरत कुटुंबीयांकडे आहे. ह्या देवळात श्रीमंत नानासाहेब पेशव्यांचे येणे-जाणे होते. श्रीमंत पेशव्यांनी सन्मानाने घरत कुटुंबीयांना फजनदार हा किताब बहाल केला व आजूबाजूच्या शेतजमिनी इनाम म्हणून या देवस्थानाला देण्यात आल्या. सन १८६७ मध्ये ब्रिटिश सरकारने पांडूरंग दामाजी घरत (खोत) यांच्या नावे सनद दिली. पूर्वी या देवस्थानाची पूजा अर्चा उपाध्ये कुटुंबाकडे होती. १९३२ पर्यंत ही मूर्ती आकारात आहे ह्याची माहिती नव्हती. शतकानुशतके लावल्या जाणाऱ्या शेंदुरामुळे मूळ मुर्तिचे स्वरूप झाकले गेले होते. पण गणपती बाप्पानेच लीला केली आणि वैद्यकीय व्यावसायिक कै. वामन गणेश उपाध्ये यांच्या स्वप्नात वारंवार येऊन मला मोकळे कर असे बाप्पा सांगत असे. एक दिवस कै. श्री उपाध्ये मंदिरात ध्यान लावून बसलेले असताना त्यांना शेंदुरजडीत एक खपली पडल्याचे दिसले. त्यांना स्वप्नाचा उलगडा झाला. श्री उपाध्ये यांनी तातडीने त्यावेळचे फजनदार स्वर्गीय श्री. रघुनाथ दादाजी घरत यांना या अभूतपूर्व घटनेची कल्पना दिली. श्री रघुनाथ घरत यांनी राघो मेस्त्री, जुवेकर कुटुंब व गावकर्‍यांच्या मदतीने रातोरात त्या मूर्तीचा शेंदूर काढला व तो बाजूलाच असलेल्या तलावात विसर्जन केले. विनायकाचे हे नवीनं रूप पाहून सगळ्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. काळ्या पाषाणात अत्यंत रेखीव, प्रसन्न अशी मूर्ती पाहून सगळ्यांचे भान हरपले होते. दुसर्‍या दिवशी ह्या चमत्काराची बातमी उरणभर पसरली व उरणमधील सगळ्या भाविकांनी देवळात हजेरी लावून विनायकाच्या मूळ सुंदर रूपाचे दर्शन घेतले.

सन १९९३ पासून ह्या देवळाचे व्यवस्थापकीय विश्वस्त - फजनदार हे श्री सदानंद रघुनाथ घरत आहेत. हे मंदिर घरत घराण्याच्या मालकीचे असले तरी ते सगळ्यांसाठी खुले आहे व हे विनायक गावातले मंदिर म्हणूनच प्रसिद्ध आहे. श्री घरत यांनी मंदिरात व मंदिराच्या परिसरात अनेक सोयी-सुधारणा केल्या. श्री सदानंद घरत यांच्या पुढाकारातून कौलारू व मोडकळीस आलेल्या जुन्या देवळाचे १९१० साली नूतनीकरण करून प्रशस्त व सुबक सभागृह असलेले मंदिर उभारण्यात आले . मंदिराचे नूतनीकरण केले असले तरी मंदिराचा मूळ गाभारा व घुमट जाणीवपूर्वक तसाच ठेवला आहे. तसेच सभागृहात असलेल्या प्राचीन काचेच्या हंड्या अजून काळजीपूर्वक जतन करून ठेवल्या आहेत व देवळाच्या प्रत्येक उत्सवाला व संकष्टी चतुर्थीला हंडीमध्ये काकडा प्रज्वलित करून मंदिराचे सभागृह मंगलमय व प्रकाशमय केले जाते. श्री सदानंद घरत यांच्या वडिलांच्या नावाने देवळात नंदादीपाची ज्योत अखंड तेवत आहे. सभागृहात दोन बाजूला दोन लाकडी जीने असून लाकडी खांबाची किनार असलेला माळा आहे. सभागृहाच्या भिंतीवर वरच्या बाजूला चारही दिशेला हत्तीची रांग व त्यावर कलाकुसर असलेल्या नक्षीची पट्टी आहे जी सभागृहाच्या शोभेत वाढ आणते. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला मूर्तिरूपी हत्ती भाविकांचे स्वागत करतात. देवळाच्या आजूबाजूचा परिसरही हिरवागार आहे. मंदिर जवळच एक तुळशीवृंदावन आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला असलेल्या मारुती मंदिरातील शक्तिशाली मारुतीचे दर्शन घेतल्याने मनातील भय निघून जाऊन मन शांत होते. मंदिराच्या आवारातील रंगरंगोटी व कुंड्यांमधली हिरव्यागार झाडे व फुलांमुळे परिसर सुशोभित दिसतो. काही दानी भक्तांनी दान म्हणून दिलेले बाकडेही मंदिराबाहेरच्या आवारात विश्रांतीसाठी ठेवले आहेत. देवळाच्या परिसरात भाविक यात्रेकरूंसाठी निवासस्थान उभारले आहे. ह्या मंदिराची साफसफाई व नीटनेटकेपणा तिथे प्रवेश करताक्षणीच डोळ्यांना सुखावतो. परिसरात प्रवेश करायचा मुख्य दरवाजाही सुंदर मोराच्या नक्षीने सुशोभित केलेला आहे. मंदिरालगत असलेले तळे पाहून मन उल्हसित होते. ह्या तळ्यात पूर्वी गावकरी मनमुराद पोहण्याचा आनंद लुटत असत.

ऋद्धि सिद्धि विनायकाचे दर्शन घेताच मन प्रसन्न होते. विनायकाचे हे गोजिरे रूप डोळे भरून पाहतच राहावेसे वाटते. सभागृहात क्षणभर विसावल्यानेही मन शांत होते. या मंदिरात संकष्टी चतुर्थी, माघी गणेशोत्सव, भाद्रपदातील गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात. गावातील व लांबून येणारे अनेक भाविक या ऋद्धि सिद्धि विनायकाच्या दर्शनासाठी मनोभावे येतात व श्रद्धेने विनायकाचे दर्शन घेतात. हा गणपती नवसाला पावतो अशी त्याची ख्याती आहे. भाविक आपल्या मनातील अनेक सुख-दु:खे विघ्नहर्त्यापाशी मोकळे करतात व त्यातून तारून जाण्यासाठी प्रार्थना करतात तसेच नवस करतात. विशेषतः दर संकष्टीला मोरा व करंजा येथील कोळी भाविक मोठ्या श्रद्धेने चालत अनवाणी दर्शनासाठी येतात. अनेक भक्तांचे संकट निरसन या विनायकाने केलेले आहे. पूर्ण झालेले नवस भक्त हर्षभराने फेडतात. काही दानी भक्तांनि देवळाला दानही दिलेले आहे. अनेक मोठ मोठ्या राजकीय नेत्यांनीही ह्या विनायकाच्या दर्शनाचा लाभ घेतला आहे.

गावकरी कोणतेही नवीनं कार्य करण्यापूर्वी विनायकाचे दर्शन घेतात व कार्य निर्विध्न पार पडण्यासाठी प्रार्थना करतात. अनेक गावकरी व इतर भाविकांना विनायक गावातील हा ऋद्धि सिद्धि विनायक पावलेला आहे. त्यांच्या अनेक आख्यायिका आहेत. अनेकांच्या दु:खाचे निरसन झाले आहे. गावकर्‍यांना ह्या ऋद्धि सिद्धि विनायकाचे अनेक दृष्टांत घडलेले आहेत. उपाध्ये कुटुंबीयांनाही बाप्पांचे अनेक दृष्टांत झाले आहेत. त्यांना एकटे चालत असताना मनात भय निर्माण झाले असताना या विनायकाने रूप पालटून साथ दिलेली आहे . श्री सदानंद घरत यांच्या घराण्यालाही विनायकाचे दृष्टांत झाले आहेत. त्यांच्या मुलाचा जन्मही अनंत चतुर्थीच्या दिवशी झाला हे ते आनंदाने सांगतात. ह्या ऋद्धि सिद्धि विनायकाची सेवा आपल्या ९ पिढ्यांपासून होऊन आपल्यालाही सेवा करण्याची संधी मिळतेय ह्यासाठी ते स्वतःला भाग्यवान समजतात. सन २००३ साली या मंदिराचा द्विशतकोत्तर सुवर्णमोहोत्सव साजरा झाला. या द्विशतकोत्तर सुवर्णमोहोत्सवाच्या निमित्ताने ऋद्धि-सिद्धि विनायकाने नाणे काढण्यात आले. या नाण्याच्या छपाईचे काम उरण येथील रहिवाशी मिंट टाकसाळ मधील प्रोफेशनल कलाकार श्री वसंत गावंड यांनी केले आहे. मूळ मूर्ती ही अत्यंत दुर्मिळ व पुरातन असून ती हल्लीच्या भेसळयुक्त शेंदूर व तेलामुळे मुर्तीची हानी होऊ नये या उद्देशाने पुरातत्त्व खाते व इतिहास संशोधक यांच्या सुचने नुसार श्री वसंत गावंड यांनी ऋद्धि-सिद्धि विनायकाची हुबेहूब छोटी प्रतिकृती तयार केली आहे व ती भक्तांच्या पूजनासाठी सभागृहाच्या कोनाड्यात विराजमान केली आहे.

मुंबईहून ऋद्धी सिद्धी विनायकाच्या देवळात येण्यासाठी भाऊचा धक्का ते मोरा बंदर असा ४५ मिनीटांचा लाँचचा प्रवास करून मोरा बंदर गाठता येते. मोरा बंदरावर रिक्शांची सोय आहे रिक्शांतून विनायक गावात जाता येते तसेच दादर व वाशी वरून थेट उरण बसेस ची सुविधा आहे. एस.टि. स्टँड वरून रिक्शाने ऋद्धि सिद्धि देवळाची वाट धरता येते. सध्या ट्रेनचे कामही चालू आहे. अंदाजे दोन वर्षात भाविकांना ट्रेनचा लाभ घेता येणार आहे.

तर अशा आमच्या या उरणच्या ऋद्धि सिद्धि विनायकाला प्रार्थना की त्याच्या सगळ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होऊन सगळ्यांना सद्बुद्धी दे व सुख समाधान लाभूदे.

हा लेख. ३१ आॅगस्ट २०१९ रोजीच्या लोकसत्ता वास्तुरंग पुरवणीत प्रकाशित झाला आहे.

ब्लाॅग पहाण्यासाठी https://prajaktamhatretarangmaniche.blogspot.com/2019/08/blog-post_30.ht...

संस्कृतीलेख

प्रतिक्रिया

खिलजि's picture

6 Sep 2019 - 3:31 pm | खिलजि

सुंदर लिवलंय ओ .. जायला पाहिजे नाही म्हणजे जास्त लांब नाही काही माझ्या कामापासून .. नक्कीच जाऊ शकतो .. अजून काही आहे का तिथे बघण्यासारखे .. जर संपूर्ण कुटुंबकबिला घेऊन जायचा असेल तर कुठे आणि कसे जावे याचे मार्गदर्शन मिळावे ..

धन्यवाद खिलजी. समुद्रकिनारा आहे अजून.

सुधीर कांदळकर's picture

6 Sep 2019 - 7:39 pm | सुधीर कांदळकर

सुरेख फोटो. नैसर्गिक तळे देखणे.


सभागृहाच्या भिंतीवर वरच्या बाजूला चारही दिशेला हत्तीची रांग व त्यावर कलाकुसर असलेल्या नक्षीची पट्टी आहे जी सभागृहाच्या शोभेत वाढ आणते. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला मूर्तिरूपी हत्ती भाविकांचे स्वागत करतात.

आणि


रिसरात प्रवेश करायचा मुख्य दरवाजाही सुंदर मोराच्या नक्षीने सुशोभित केलेला आहे.

असे दोन फोटो असतील तर टाका ही नम्र विनंती.

सुधीरजी तुमच्या विनंतीनुसार मी फोटो अॅड करत होते पण इथे मला पुन्हा एडीट करायला जमत नाहीये. प्लिज ब्लाॅग उघडून पहा. लेखाच्या खाली लिंक दिली आहे त्यात मी आता अजून काही फोटो अॅड केले आहेत. मोराच्या गेटचा राहिलाय काढायचा तो पुढच्यावेळेस जाईन तेव्हा नक्की काढून आणेन. धन्यवाद.