।। श्रावणसरी ।।
भिजून गेल्या फांद्यांवरती, बसूनी सहजच गाती पक्षी,
अलगद जाई वाऱ्यावरती, सप्तसुरांची मोहक नक्षी ।
सुईसारख्या चोचींमधुनी, दशदिशांना निरोप जाती
साद घालती कोणा कळेना, दूरदूरची ओवून नाती ।
फुलांफुलांचे श्वास टिपुनी, दूरदूर हे वायू वाहती,
परागमोहित किटक येऊनी, मकरंदाची गाणी गाती ।
वसुंधरा ही नटुनीसजुनी, पशुपक्ष्यांना ठेवी भुलवुनी,
भेट घेण्या तिच्या नायका, सकलसृष्टीला जाई घेऊनी ।
त्यांस मिळाले निरोप नकळत, तरी अजुनी दर्शन नाही,
एका सरीचीच मिठी देऊनी, पुन्हा पुन्हा तो निघून जाई।
त्याच मिठीने शहारते ती, गर्भधारणी हरितमोहिनी,
क्षणाक्षणांची प्रसवशालिनी, स्वर्गसुंदरी ओजमानिनी ।
ऐश्वर्यवतीचे हास्य खुलुनी, बिंबित होई नभांत धरती,
धीर कसा मग त्यास असावा, बरसत येई प्रियेवरती।
चरांचरांच्या विश्रब्धाला, मानवातली संस्कृती दिसते,
घराघरांला लहानमोठ्या, सणासणांतूनी ऊर्जा मिळते।
ह्या सगळ्याचा अबोल कर्ता, शिलेदार तो कर्तृत्वाचा,
वसुंधरेचा ओजस भर्ता, श्रावण माळे हार सुखाचा ।
- अभिजीत
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4565
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त लिहिली आहे
11+ वर्षे सदस्यकाल ?
In reply to मस्त लिहिली आहे by गणेशा
वाह आधूनिक बालकवी....
खूप छान!
छान.
आभार
खुपच सुरेख
धन्यवाद
In reply to खुपच सुरेख by ज्ञानोबाचे पैजार
नमस्कार मायमराठी,
मस्त