✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कौतुक? चुकून कधीतरी !

ह
हेमंतकुमार यांनी
गुरुवार, 07/18/2019 - 11:14  ·  लेख
लेख
मानवी मन हा फार गूढ प्रकार आहे. कितीही समजून घ्यायचा प्रयत्न केला तरी त्याचा थांगपत्ता लागणे कठीणच. त्याचे अनेक पैलू आपल्याला समाजव्यवहारात दिसून येतात. अनेकांबरोबरच्या संवादातून आपल्याला अनेक स्वभाववैशिष्ट्ये दिसतात तसेच स्वतःच्या वैशिष्टयांची देखील जाणीव होते. अशा एका वैशिष्ट्याकडे या लेखात लक्ष वेधत आहे. शीर्षकात लिहिल्याप्रमाणे ते आहे - ‘दुसऱ्याचे कौतुक न करणे’ किंवा अगदी केलेच तर ते हात राखून करणे.प्रथम हे लक्षात घेऊ की ही अगदी मूलभूत मानवी प्रवृत्ती आहे. त्यामुळे ती आपल्या सर्वांत अस्तित्वात आहे. फक्त तिचे दृश्य परिणाम मात्र कमीअधिक स्वरूपात व्यक्त होतात. आता या गुणधर्माची बीजे लहान वयातच कशी रोवली जातात याचा एक अनुभव सांगतो. मराठी माध्यमात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांने पूर्व-माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट यश मिळवले होते. या घटनेवर त्यांच्याच संकुलात राहणाऱ्या, इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या आणि ते यश प्राप्त न करू शकलेल्या एका मुलाची प्रतिक्रिया होती, ’’मराठीतून काय सोपं असतं रे’’. अभिनंदनाच्या चार शब्दांऐवजी त्याने दिलेल्या या कडवट प्रतिक्रियेतून कौतुक न करण्याची रोगट मनोवृत्ती किती स्पष्ट दिसते. मग जसे आपले वय वाढते तशी ही वृत्ती आपल्यात घट्ट मुरत जाते. अशा या कौतुक न करण्याच्या गुणधर्माने अनेकांना अनेक पातळ्यांवर पछाडलेले आहे . जरा त्यांची यादी करूयात का? विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, पती-पत्नी, जवळचे नातेवाईक, एका संकुलातील रहिवासी, साहित्यिक, खेळाडू, नेते, अभिनेते ....बास! यादी तशी संपणारच नाही. एखाद्याने त्याच्या क्षेत्रात छोटे-मोठे यश संपादले असल्यास त्याबद्दल चार कौतुकाचे शब्द मनापासून बोलायला आपल्याला किती जड जाते! मनापासून कौतुक न करण्याची कला दोन प्रकारे प्रकट होते. पहिल्या प्रकारात संबंधित व्यक्तीच्या प्रत्यक्ष भेटीत किंचित कौतुकाचा औपचारिकपणा उरकला जातो पण, त्या व्यक्तीच्या पाठीमागे मात्र तिच्याबद्दल चांगले बोलणे हे जाणीवपूर्वक टाळले जाते. तर, दुसऱ्या प्रकारात त्या व्यक्तीच्या पाठीमागे तिच्यातील कौतुकपात्र गुणांची नाईलाजाने कबुली दिली जाते पण, तिच्या प्रत्यक्ष भेटीत मात्र कौतुकाचा विषय टाळून निव्वळ हवापाण्यावर बोलले जाते. अर्थातच खोटे कौतुक करावे असे बिलकूल नाही. विधायक टीकाही योग्यच. पण, एखाद्याच्या छोट्यामोठ्या यशाला निदान 'अरे वा' अशी सहज दाद द्यायला हरकत नसावी. परीक्षा व स्पर्धांतील यश, कलाकौशल्य, नोकरीतील बढती, व्यवसायातील थक्क करणारी प्रगती, सार्वजनिक जीवनातील सन्मान अशा कितीतरी प्रसंगी यशस्वीतांवर कौतुकाचा वर्षाव ( निदान दखल घेणे) संबंधितांकडून अपेक्षित असते. त्यासाठी प्रत्यक्ष भेट, फोन वा संदेशवहनाची आधुनिक साधने अशी माध्यमे उपलब्ध असतात. प्रश्न असतो तो आपल्या अंतरंगातून दिलखुलास दाद देण्याचा. पण, तिथेच तर गाडे अडते. आता हा एक अनुभव सामाजिक पातळीवरील. भारताच्या एका पंतप्रधानांच्या शपथविधी समारंभात पुढच्या रांगेत बसलेले एक माजी पंतप्रधान ( बाकी सारे टाळ्या वाजवत असताना) हाताची घडी घालून व मख्ख चेहरा करून बसल्याचे दृश्य आपण दूरदर्शनवर काही वर्षांपूर्वी पाहिले. एवढ्या उच्च पातळीवर देखील कौतुकाचा कंजूषपणा आणि शिष्टाचाराचा अभाव प्रदर्शित व्हावा याचे सखेद आश्चर्य वाटते. दुसऱ्याच्या गुणांचे कौतुक केल्याने आपल्याला कोणताही कमीपणा येत नाही. उलट, त्या कृतीतून आपण निरोगी मनोवृत्ती दाखवतो आणि कौतुकाच्या परतफेडीची संधीही निर्माण करून ठेवतो. कौतुक केल्याने आपल्याच मनाचा मोठेपणा सिद्ध होत असतो. तरीसुद्धा आपल्या अंतरंगातून प्रशंसेचे उद्गार पटकन बाहेर येत नाहीत खरे. याउलट एखाद्याची छोटीशी चूक सुद्धा आपण किती तत्परतेने दाखवून देतो! वर म्हटल्याप्रमाणे आपणा सर्वांच्याच अंगी असलेला हा गुणधर्म आहे. जरा प्रयत्नपूर्वक त्याच्यावर मात करूयात का? हळूहळू जमायला हरकत नसावी. रच्याकने............. आपल्या या संस्थळावर मात्र आपण एकमेकाचे बरेच कौतुक करतो बुवा !! ☺️
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
43964 वाचन

💬 प्रतिसाद (89)

प्रतिक्रिया

पुलंचे प्रा.येरकुंठवार आठवले.

प्रकाश घाटपांडे
Fri, 07/19/2019 - 11:54 नवीन
पुलंचे प्रा.येरकुंठवार आठवले.
  • Log in or register to post comments

प्रकाश,

हेमंतकुमार
Fri, 07/19/2019 - 12:15 नवीन
प्रकाश, सुभाषित छान ! ** पुलंचे प्रा.येरकुंठवार>>> याबद्दल आठवत नाही. थोडं सांगता का ?
  • Log in or register to post comments

तुम्हाला कोण व्हायचय? पुणेकर

प्रकाश घाटपांडे
Fri, 07/19/2019 - 12:56 नवीन
तुम्हाला कोण व्हायचय? पुणेकर मुंबईकर कि नागपुरकर या पुलंच्य कार्यक्रमात पहा 10.46 पासून https://youtu.be/FVWdAx1a0y0
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

धन्यवाद,

हेमंतकुमार
Fri, 07/19/2019 - 13:25 नवीन
धन्यवाद, सवडीने पाहतो आता. त्यातले या ३ शहरांबद्दलचे हे वाक्य आठवतंय : " महाराष्ट्रात शहरे जरी अनेक असली तरी ज्यांच्यापुढे कर जोडावेत अशी मात्र ही तीनच…"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

दुसऱ्यांचे चांगल्या कामांचे

बाप्पू
Fri, 07/19/2019 - 12:23 नवीन
दुसऱ्यांचे चांगल्या कामांचे कौतुक न करण्यामागे फक्त एकच कारण असतें ते म्हणजे एखाद्याने केलेली अचिव्हमेंट खुल्या मनाने ना स्वीकारणे. त्याने किंवा तिने ती गोष्ट मिळवलीच कशी हा प्रश्न त्यांना आतून खात असतो. पण बहुतांश वेळेला ती अचिव्हमेंट स्वतः मिळवण्यासाठी जे कष्ट घ्यावे लागतात ते घेण्याची तयारी पण त्यांच्याकडे नसते.
  • Log in or register to post comments

स्वतःच कौतुक कधीच करू नये

Rajesh188
Fri, 07/19/2019 - 14:03 नवीन
स्वतःच कौतुक स्वतः कधीच दुसऱ्या समोर करू नये कोणही तुमच्या वर विश्वास ठेवत नाही . आणि त्याचा खूप तोटा होता . पण दुसऱ्याचे कौतुक वेळ पाहून करावे फायदाच फायदा होतो . स्तुती चा जो परिणाम होतो तसाच रागाचं पण होतो स्तुती ऐकून आणि द्वेशात माणूस विचार शक्ती हरवून बसतो आणि आपल्याला हवी तीच चूक करतो
  • Log in or register to post comments

वेगळ्या विषयावरचा छान लेख आणि

चंद्र.शेखर
Fri, 07/19/2019 - 15:19 नवीन
वेगळ्या विषयावरचा छान लेख आणि प्रतिसाद सुद्धा. कधी कधी जवळच्या/आवडणाऱ्या व्यक्तीच्या काही बाबींंवर कौतुक करण्याचं हेतुपुरस्कर टाळलं जातं, हिशेब चुकता करायचा हेतू सुद्धा असतो बरेच वेळा. 'कौतुक न करणं' हे हत्यार जाणीवपूर्वक वापरलं जातय. आता आठवण करून दिलीत तर बघू काही बदल करता येतोय का
  • Log in or register to post comments

समतोल चर्चा

हेमंतकुमार
Fri, 07/19/2019 - 15:35 नवीन
सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार ! हे मुद्दे विशेष भावले :
* वाटतं ते बिनधास्त बोलायचं. कौतुकच करु वाटलं तरी दिलखुलास करायचं. * कौतुक न करण्यामागे फक्त एकच कारण असतें ते म्हणजे एखाद्याने केलेली अचिव्हमेंट खुल्या मनाने ना स्वीकारणे * कौतुक करण्याचं हेतुपुरस्कर टाळलं जातं, हिशेब चुकता करायचा हेतू सुद्धा असतो बरेच वेळा. 'कौतुक न करणं' हे हत्यार जाणीवपूर्वक वापरलं जातय.
  • Log in or register to post comments

.

वकील साहेब
Sat, 07/20/2019 - 08:19 नवीन
मानवी मन, त्याचा स्वभाव आणि त्याची कौतुक या विषयाप्रसंगी येणारी स्वाभाविक प्रतिक्रिया यावरील लेख आणि प्रतिक्रिया फारच सुरेख आहेत. यावरूनच एक आठवण महाराष्ट्राचे दिवंगत नेते आर. आर. पाटील हे या मानवी स्वभाव वैशिष्ठ्यांचा राजकारणासाठी फार सुरेख वापर करत. म्हणजे असे की, त्यांना अ ची खरी खबरबात काढायची आहे. तर ते त्या बाबत सरळ अ ला नाही विचारणार. ब हा जो अ चा प्रतिस्पर्धी आहे त्याच्या पुढे अ ची मुद्दामहून स्तुती करणार. जसे की, "अ ला झेडपी च्या इलेक्शन मध्ये चांगलं यश मिळालं ना?" तर ब म्हणणार "कसलं काय साहेब, त्या इलेक्शन मधी तर.........." अशा प्रकारे पाटील साहेबांना हवी ती माहिती आपसूक मिळून जायची.
  • Log in or register to post comments

...

हेमंतकुमार
Sat, 07/20/2019 - 09:09 नवीन
वकीलसाहेब, धन्यवाद ! वरील प्रतिसादाच्या निमित्ताने तुम्ही एका दिलखुलास व्यक्तीची आठवण करून दिलीत. त्यांची राजकीय वाटचाल कौतुकास्पद होती.
  • Log in or register to post comments

लेख - चर्चा दोन्ही कौतुकास्पद :-))

अनिंद्य
Sat, 07/20/2019 - 10:47 नवीन
@कुमार, लेख - चर्चा दोन्ही कौतुकास्पद :-) योग्य कौतुक करणे आणि दुसऱ्यांनी केलेल्या कौतुकाचा ग्रेसफुली स्वीकार करणे दोन्ही गोष्टी 'शिकाव्या' लागतात असे माझे मत. प्रयत्नांनी जमते. कौतुक खरे की खोटे, मनापासून की तोंडदेखले, कौतुकच की चापलुसी हे समजायलाही फार वेळ लागत नाही, ते उघड कळून येते. problem is we see and hear what we want to ! स्वतःपुरते एक करतो - खोटी स्तुती करत नाही आणि सरसकट वाहवा टाळतो. म्हणजे 'तू आहेचस हुश्शार' असे न म्हणता 'ह्या कामात छानच हुशारी दाखवलीस, वा !' अशा कौतुकाचा मी पुरस्कर्ता आहे. कौतुक करण्यात स्वतः थोडा कृपण असल्याची भावना आहे. माझे सहकारी, मित्र, घरची मंडळी माझ्या कौतुकाच्या बावन्नकशीपणाबद्दल आश्वस्त असतात (आडून आडून स्वतःचे कौतुक कसे करावे हे समजले ना :-))) ह्याच्या विपरीत - चांगले म्हणण्यासारखे - कौतुक करण्यासारखे काही नसेल तर गप्प बसावे, निंदा करू नये असा अलिखित नियम घरात लहानपणापासून बघितला आहे, तो आपसूकच पाळल्या जातो. अनिंद्य
  • Log in or register to post comments

...

हेमंतकुमार
Sat, 07/20/2019 - 11:24 नवीन
अनिंद्य, धन्यवाद व सहमती.
कौतुक करण्यासारखे काही नसेल तर गप्प बसावे, निंदा करू नये असा अलिखित नियम घरात लहानपणापासून बघितला आहे, तो आपसूकच पाळल्या जातो. >>>>
याला शंभर टक्के सहमती, छान !
  • Log in or register to post comments

नमस्कार

अभ्या..
Sat, 07/20/2019 - 11:34 नवीन
कौतुकाचे नियम संसारात वेगळे असतात एवढे बोलून मी माझे पाच शब्द संपवतो. जयहिंद जयमहाराष्ट्र. . सुखी संसारी अभ्या..
  • Log in or register to post comments

उत्कृष्ट लेख

खिलजि
Sat, 07/20/2019 - 15:56 नवीन
मी काही सांगू इच्छितो .. मला वाटत , याची बीजे आपल्या घरातच रोवली जातात कदाचित येनकेनप्रकारे .. जरी मुले त्यांच्या आईबापाला सामान असली तरी त्यातील जो कुणी उजवा असतो त्याचेच गोडवे गायले जातात .. अर्थात त्यामागे कदाचित हेतू दुसर्र्या मुलाला दुखावण्याचा नसतो तर जो नाव काढतोय त्याला कौतुक सोहळा प्रदान करण्याचा असतो .. पण नकळत त्याच्या कौतुकाचे दुसऱ्यावर वाईट परिणाम होत असतात .. तो सतत स्वतःला कमी लेखत जातो आणि नकळतपणे दुसर्याबद्दल द्वेष वाढीला लागतो . हा द्वेष जर आईबापच कमी करू शकले तर ते शक्य आहे .. माझ्या घरात घडलेले मी उदाहरण समोर ठेवतो .. मला दोन मुले आहेत , सोहम ( वय ११ ) आणि अंशुमान ( वय ५ ) .. सोहम थोडासा वेंधळा आणि धसमुसळा आहे .. अभ्यासात ठीक प्रगती आहे .. माझ्या कधीच जास्त अपेक्षा नव्हत्या आणि पुढेही नसतील . इनफॅक्ट मी ते दोघांनाही तसे सांगतो .. अभ्यासाचे टेन्शन बिलकुल घ्यायचे नाही .. बोर्डात नाही आलात तरी चालेल , चांगले मार्क्स नाही पडले तरी चालतील पण कधी नापास होऊ नका ..पोटापुरते मार्क्स मिळवा. बायको एकदम विरुध्ध .. तिला तिच्या दोन्ही मुलांनी अभ्यासात चांगलं असावं असं मनोमन वाटत .. तिच्या बर्याचश्या पॆक्षा अंशुमान पूर्ण करतो .. नेहेमी सतार घेऊन येणे , काहीतरी चांगले रिमार्क असे सतत काहिनाखाई चालू असते .. या सर्व घडामोडीमध्ये आम्ही सोहमला बऱ्याच क्षेत्रात मदत करून बघितली .. उदा , पहिले गिटार क्लासेस , नंतर क्षत्रिय गायनाचे क्लासेस , आणि आता सध्या साहेब गायन आणि फ़ुटबाँलमध्ये स्थिरावले आहेत असे वाटतेय .. पण अंशुमान हा मात्र हिरा आहे .. त्याला अजूनपर्यंत कुठेही आम्ही शिकायला घातलेले नाही तरी पठ्ठ्या शाळेत गाणी , नाच आणि अभ्यास यामध्ये चमकतोय .. बायको आता वैतागून सोहमला सतत त्याचे उदाहरण देत असते .. सध्या तो त्याचा भरपूर राग करतो .. यामध्ये माझी मात्र कुचंबणा होतेय . कारण सोहमला , मी त्याचे लाड केलेलं बिलकुल आवडत नाहीत .. मी सध्या त्याला त्यामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय पण कितपत यश येईल ते माहित नाही .. अंशुमान आपल्या हातावर मिळालेले सतार मी लॅबमधून येईपर्यंत असेच हातावर ठेऊन देतो , का तर मला दाखवायचे आहेत म्हणून .. मी ते बघतो पण सोहम असेलत तर थोडेसे गुणगान करून त्याला दादालाही दाखवायला सांगतो .. सध्या तरी सोहम यातून थोडा बाहेर पडतोय .. त्याला मी सांगतो ते समजते पण अजून अमलात आणायचे बाकी आहे . पूर्णपणे जेव्हा अमलात आणेल तेव्हाच तो या षड्रिपूवर मात करू शकेल ...
  • Log in or register to post comments

तुमचा स्वतःचा दृष्टीकोण जास्त

इरामयी
Sun, 07/21/2019 - 15:15 नवीन
तुमचा स्वतःचा दृष्टीकोण जास्त मोकळा आहे असं जाणवतंय. तुमच्या मुलाला तुमचा एकट्याचा सहवास जास्तीत जास्त लाभेल असं पहा. त्याची मानसिक ओढाताण आपोआप कमी होत जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि

" सतार" स्टार वाचा "काहिनाखाई

खिलजि
Sat, 07/20/2019 - 15:59 नवीन
" सतार" स्टार वाचा "काहिनाखाई " काहीनाकाही "क्षत्रिय" शास्त्रीय
  • Log in or register to post comments

खिलजी, धन्यवाद

हेमंतकुमार
Sat, 07/20/2019 - 16:25 नवीन
खिलजी, धन्यवाद तुम्ही मोकळेपणाने कौटुंबिक वस्तुस्थिती लिहिलीत हे विशेष.
त्यातील जो कुणी उजवा असतो त्याचेच गोडवे गायले जातात
. .>>>> अगदी अगदी. बऱ्याच कुटुंबांत हे पाहिले आहे. बाकी ते 'सतारी' चे स्पष्टीकरण आवश्यकच होते. ☺️
  • Log in or register to post comments

कौतुक

Chandu
Sat, 07/20/2019 - 17:51 नवीन
कौतुक आणि स्तुती या दोन वेगळ्या गोष्टी आहेत .कौतुक हे व्यक्तीचे केले जाते. त्यावेळेस त्या व्यक्तीने काहीतरी अचीवमेंट केलेली असते स्तुती ही थोडी वेगळी गोष्ट आहे .स्तुती करणारा आणि करून घेणारा यांच्या परस्पर संबंधावर स्तुती चे प्रमाण अवलंबून असते .कौतुक ही भावना आहे तर स्तुती ही कृती आहे .आई-वडिलांना मुलाचे, पती-पत्नीला एकमेकांचे कौतुक असते ,परंतु ते वारंवार एकमेकांची समोर किंवा पश्चात स्तुती करत नाहीत . मला वाटते धागा लेखका ला कौतुक म्हणजेappreciation म्हणावयाचे असावे .हे त्याच क्षणी तोंडावर केले म्हणजे केले आहे त्यालाachievment ची पोचपावती मिळाल्यासारखे वाटते .अशी पोच किंवा दाद देणे हे चांगल्या रिवा जा चे लक्षण होय .असे न करणे योग्य संस्काराचा अभाव ,असे मला वाटते. शेवटी कौतुक करणे हा अभिव्यक्तीचा भाग आहे. बऱ्याच जणांना अभिव्यक्ती व्यवस्थित करता येत नाही, याचा अर्थ त्यांना कौतुक नसते असा नाही
  • Log in or register to post comments

चंदू, छान मुद्दा

हेमंतकुमार
Sat, 07/20/2019 - 18:03 नवीन
*
कौतुक आणि स्तुती या दोन वेगळ्या गोष्टी आहेत * मला वाटते धागा लेखका ला कौतुक म्हणजेappreciation म्हणावयाचे असावे .
>>>> अगदी बरोबर. कौतुकाची पहिली पायरी म्हणजे 'दखल घेणे'. निदान एवढे केले तरी ती चांगली कृती ठरते. समर्पक प्रतिसाद, आवडला.
  • Log in or register to post comments

मला

नाखु
Sat, 07/20/2019 - 21:28 नवीन
आमच्या सारख्या विडंबकांच्या अदखलपात्र कविता आठवल्या,पै बुवांच्या दुःखात सहभागी असलेला सहप्रवासी वाचकांची पत्रेवाला नाखु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

एखादा कौतुकाटाक्ष मिळायची देखील मारामार

चामुंडराय
Sat, 07/20/2019 - 23:27 नवीन
अगदी अगदी नाखु काका एव्हढ्या विडम्बविता केल्या परंतु एखादा कौतुकाटाक्ष मिळायची देखील मारामार !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

कौतुक केले तर "कळतात बरं मला टोमणे" असा अभिप्राय मिळाला

चामुंडराय
Sat, 07/20/2019 - 23:32 नवीन
डॉ. साहेब, तुमच्या ह्या लेखावरून प्रेर्ना घेऊन मी घरी अर्धबरीचे कौतुक केले तर कळतात बरं मला टोमणे असा अभिप्राय मिळाला. आता काय करावे?
  • Log in or register to post comments

दर्दभरी कहाणी

आनन्दा
Sun, 07/21/2019 - 12:15 नवीन
दर्दभरी कहाणी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चामुंडराय

सार्वजनिक व्यास पिठावर चांगले बोलणे हे कौतुक

Rajesh188
Sat, 07/20/2019 - 23:52 नवीन
सार्वजनिक व्यासपीठ,ठिकाण,ह्या ठिकाणी एकध्या व्यक्तीच्या कार्याविषयी चांगले बोलणे हे कौतुक असे मला वाटत आणि अशा ठिकाणी मर्यादित शब्दांचा रीत म्हणून वापर केला जातो . अती कौतुक झाले तर बाकी मंडळी दुरवण्याची भीती असते . खासगी मध्ये जे समोरच्या व्यक्ती समोर बोलले जाते ह्याला स्तुती म्हणता येईल आणि इथे अमर्याद चांगले शब्द वापरले जातात
  • Log in or register to post comments

चामुंडराय,

हेमंतकुमार
Sun, 07/21/2019 - 06:37 नवीन
चामुंडराय, अर्धबरी >>> हे ' अर्धांगिनी' असे हवे ना ? या नात्यातील संवाद हा एक वेगळाच प्रांत आहे राव ! ☺️ राजेश, + १
  • Log in or register to post comments

अहो

जेम्स वांड
Sun, 07/21/2019 - 09:14 नवीन
अर्धबरी = बेटर हाफ Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

असं होय,

हेमंतकुमार
Sun, 07/21/2019 - 09:18 नवीन
मग एकदम चिकनं भाषांतर, कौतुक स्वीकारावे ! ☺️
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

तुमचा टोमणा त्यांना समजला

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 07/21/2019 - 11:54 नवीन
तुमचा (कौतुकभरा) टोमणा त्यांना समजला (असावा). =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

त्यांनी

नाखु
Sun, 07/21/2019 - 18:22 नवीन
परिस्थिती"बरी" नसताना हा कौतुक सोहळा केला असेल तर अर्धा काय पूर्ण च संशयास्पद वर्तन !!! तस्मात् हा एक उपाय परिस्थिती आणि व्यक्तिसापेक्ष आहे खुलाशातील खलाशी पांढरपेशा मध्यमवर्गीय नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

दोन निरीक्षणे .....

सुधीर कांदळकर
Sun, 07/21/2019 - 08:04 नवीन
१. आमच्या काळातल्या स्त्रिया मुली यात सौ. पण आली - अभिनेत्र्या हेलनचा आणि रेखाचा भरपूर द्वेष करीत. त्याच स्त्रियांना आता या दोघींचेही कौतुक वाटते. २. मुंबईत मालाड पश्चिम, ठाण्याला स्टेशनजवळ असे काही मजूर बाजार आहेत. तिथे इमारत बांधकामावरील गवंडी, बिगारी, प्लॅस्टरकार, सुतार, इ. विविध प्रकारचे मजूर सकाळपासून उभे असतात. लोक येतात आणि हवे ते मजूर घेऊन जातात. काहींना काम मिळते काहींना नाही. बेकारांपैकी काही गुत्त्यावर जातात तर काही सिनेमा थिएटरमध्ये. एकदा असाच एका गचाळ बकाल विभागात कश्मीर की कली पाहायला गेलो होतो. गाणे सुरू झाले की लोक कौतुकाने नाणी फेकत. सिनेमा संपल्यावर डोअरकीपर्स ते )कौतुकाने?) उचलून घेत. हे नाणी फेकणारे लोक बेकार मजूर होते. तेव्हा पाचसात रुपयांचे तिकीट घेऊन आलेले हे लोक आठ आणे रुपया फेकीत.
  • Log in or register to post comments

...

हेमंतकुमार
Sun, 07/21/2019 - 09:29 नवीन
सुधीर, तुमच्या पहिल्या निरीक्षणातून मला असे वाटते: १. जसे आपले वय वाढते तशा आपल्या मनातील 'कौतुकमूर्ती' देखील बदलत असाव्यात. २. तरुणपणी काही प्रकारच्या माणसांचे जास्त करून (आपल्या मते) दोषच आपण बघत असतो. मध्यम वयानंतर याची तीव्रता कमी होते आणि आपण त्यांच्याकडे तटस्थपणे पाहू लागतो. किंवा, एखाद्यात काहीतरी चांगले गुण असल्याशिवाय तो यशस्वी होत नाही, हे आपल्याला पटते.
  • Log in or register to post comments

.

वकील साहेब
Sun, 07/21/2019 - 17:42 नवीन
एकाच कॅनव्हासवर अनेक रंगांच्या अनेक रेषा असतात. त्यापैकी कोणत्याही एका रंगाची एखादी रेष तशाच रंगाच्या अन्य रेषेशी मनातल्या मनात स्पर्धा करत असते. मात्र त्याच कॅनव्हासवरील अन्य रंगांच्या रेषेशी तिची स्पर्धा अजिबात नसते. मग होत काय की, अन्य रंगांच्या रेषेची लांबी वाढली तरी या रेषेला त्याने काहीही फरक पडत नाही. पण तिच्याच रंगाच्या दुसऱ्या रेषेशी लांबी वाढली की, आपोआपच या रेषेशी लांबी कमी भासते. ते या रेषेला रुचत नाही. पण म्हणून त्यासाठी दुसऱ्या रेषेची लांबी कमी करावी हेही मनाला पटत नाही. शक्य झालंच तर आपली लांबी वाढवावी ही मनाची उदारता तिच्या अंगी असते. पण म्हणून प्रतिस्पर्धी रेषेचे कौतुक आपणच करावे हे ही काही तिच्या मनाला पटत नाही. म्हणून ती प्रतिस्पर्धी रेषेचं कौतुक करायचं आवर्जून टाळते. तेच दुसऱ्या रंगाच्या रेषेची लांबी वाढली जरी तरी त्याने या रेषेची लांबी काही कमी भासणार नसते. म्हणून ती त्या रेषेचं मात्र मुक्त हस्ते कौतुक करते.
  • Log in or register to post comments

समारोप

हेमंतकुमार
Mon, 07/22/2019 - 08:37 नवीन
सर्व सहभागींचे निकोप, समतोल चर्चेबद्दल आभार ! चर्चेत विषयाच्या विविध पैलूंना स्पर्श झाला. एखाद्याच्या चांगल्या कृतीस दाद द्यावी यावर एकमत झाले. असे करताना दखल, अभिप्राय, वाहवा, कौतुक आणि स्तुती अशा चढत्या श्रेणीचे मार्ग आहेत. त्यापैकी अवाजवी कौतुक आणि स्तुती हे नकोच. जमेल तेव्हा दिलखुलास दाद नक्की देत राहू !
  • Log in or register to post comments

माझ्य्मी लहान असताना काही

दिगोचि
Mon, 07/22/2019 - 08:51 नवीन
माझ्य्मी लहान असताना काही उत्तम काम केले की सान्गत स्तुती करावी परमेश्वराची करु नये व्यर्थ कधी जनाची. या म्हणीमुळे कधीहि चान्गले शब्द ऐकलेच नव्हते. असो. हे ६५-७० वर्षापूर्वीचे आहे. काही वाईट झलेले नाही.
  • Log in or register to post comments

65-70 वर्षाचे कोणी सध्या लहान असेल असे वाटत नाही

जॉनविक्क
Mon, 07/22/2019 - 08:59 नवीन
त्यामुळे त्याकाळातील नियम आता लागू होणे अशक्य नसले तरी कठीण नक्कीच वाटते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिगोचि

विषय चांगला निवडलाय पण

तेजस आठवले
Mon, 07/22/2019 - 21:52 नवीन
विषय चांगला निवडलाय पण तुमच्या लेखाचे कौतुक मी मुळीच करणार नाहीये. केले तर ती धागाविषयाशी प्रतारणा ठरेल.
  • Log in or register to post comments

तेजस,

हेमंतकुमार
Tue, 07/23/2019 - 05:56 नवीन
धागाविषयाशी इमान राखल्याबद्दल आभार ! सर्व नवीन प्रतिसादकांचेही आभार .
  • Log in or register to post comments

अशा या कौतुक न करण्याच्या

टर्मीनेटर
Wed, 07/24/2019 - 11:06 नवीन
अशा या कौतुक न करण्याच्या गुणधर्माने अनेकांना अनेक पातळ्यांवर पछाडलेले आहे . जरा त्यांची यादी करूयात का? विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, पती-पत्नी, जवळचे नातेवाईक, एका संकुलातील रहिवासी, साहित्यिक, खेळाडू, नेते, अभिनेते ....बास!
कौतुक न करण्याच्या गुणधर्माने मलादेखील पछाडलेले आहे असे आमच्या सौभाग्यवतींचे ठाम मत आहे :-) पण तिचे कौतुक मी तिच्या तोंडावर न करता तिच्या अपरोक्ष इतरांकडे कडे करतो याची खात्री तिला पटवून देण्यात यशस्वी झाल्याने आता टोमणे ऐकावे लागत नाहीत :-) वेगळ्या विषयावरचा हा लेख आणि त्यावरचे झकास प्रतिसाद, दोन्ही आवडले!
  • Log in or register to post comments

कौतुक नावाची भावनाच नैसर्गिक नाही

जॉनविक्क
Wed, 07/24/2019 - 23:02 नवीन
अप्रूप नैसर्गिक असू शकते तिचे कौतुक बनवावे लागते आणि बनवताना जी मिळावट करावी लागते त्यात तिची नैसर्गिकता कधीच विरली गेलेली असते म्हणून निखळ कौतुक हा प्रकार फारच कठीण...
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा