Skip to main content

अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत निरंजन घाटे यांचे विचार

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी बुधवार, 17/07/2019 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
एक जुना किस्सा आठवतो. अंनिसच्या मिटींग मध्ये आमच्या एका कार्यकर्ता मित्राला निरंजन घाटे हे शनिपाराला तेल घेउन जाताना दिसले. त्याने लगेच मिटींगमध्ये टीकेची झोड उठवली . " निरंजन घाटे तुम्ही सुद्धा?" स्टाईलने. मग स्यूडो सायंटिस्ट, भंपक विज्ञानवादी अशी विशेषणे लावायला सुरुवात केली. थोडक्यात सगळ्यांनी त्यांना वाळीत टाकले. मी खालील मुद्दे मांडले १) निरंजन घाटे हा ही माणूसच आहे २) त्यांची त्या मागील भूमिका विचारुन न घेताच टीका करणे वैज्ञानिक दृष्टिकोनात बसत नाही व ते मला योग्य वाटत नाही. ३) एवढ्या एका कारणामुळे त्यांनी मराठी विज्ञान साहित्यात दिलेले योगदान लगेच विसरलात काय? ४) कुटुंबातील कुणाच्या तरी वतीने ते प्रतिनिधी या नात्याने पण आले असतील तर? परिणामी मी निरंजन घाट्यांची वकिली करतो म्हणून मलाच वाळीत टाकायला सुरुवात केली. त्यानंतर बर्‍याच वर्षांनी मी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यावर एकदा निरंजन घाट्यांकडे भेटायला गेलो.गप्पांमधे त्यांना हा किस्सा सांगितला. मला त्यांचे मत जाणून घ्यायचे होते.त्यांचे लहानपण त्या भागात गेले होते. अनेक सुख दु:खाच्या स्मृती तिथल्या गोष्टींशी निगडीत होत्या. त्याच मनोव्यापाराचा भाग म्हणून ते शनिपाराला जात असत. हाच तो सर्वसामान्य माणूस असल्याचा भाग होता. नंतर एकदा पुस्तक पेठेत ते भेटले होते. त्यावेळी ही गप्पात अंधश्रद्धा निर्मूलन हा विषय निघाला त्यावेळी ते म्हणाले कि.समाज बदलायला पुरेसा वेळ दिला पाहिजे. मी त्यावर लिहिल आहे. वाचत सुटलो त्याची गोष्ट या पुस्तकात ते म्हणतात," गार्डनर चे पुस्तक आणि जॉन ग्रँट च ‘ बोगस सायन्स ऑर व्हाय पिपल रियली बिलीव्ह दीज थिंग्ज ‘ हे पुस्तक वाचताना मला नरेंद्र दाभोळकर आणि श्याम मानव यांच्या पुस्तकांची आठवण झाली. मी या दोघांचीही बरीच पुस्तके वाचली आहेत. श्याम मानव यांची आणि माझी 1978 च्या सुमारास नागपूर मध्ये ओळख झाली. त्यांच्या कार्याचे महत्व मी जाणतो. नरेंद्र दाभोळकरांची आणि माझी ही ओळख होती. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे व्रत प्राणपणाने घेतलं होतं आणि त्यातच त्यांचा बळी गेला. पहिल्या अंधश्रद्धा निर्मूलन संमेलनात त्यांची माझी भेट झाली तीच शेवटची. त्यानंतर महिन्याभरातच त्यांचा मृत्यू झाला. संमेलनातल्या माझ्या भाषणातील मुद्दे आणि त्यांचे विचार जुळणारे नव्हते, तरी त्यांच्या कार्याबद्दल मला आदर होता. त्यांनी माझे विचार ऐकून घेतले. त्यावेळी त्यांनी निरोप देताना ‘आपले विचार एकाच प्रकारचे आहेत,पण आपले मार्ग भिन्न आहेत’ असे म्हटले होते. कुठलीही चळवळ पुढे रेटायची तर नेता आक्रमक असावा लागतो, तरच चळवळ पुढे जाते. मात्र बऱ्याचदा या आक्रमकपणाला, क्रियेला तितकीच आक्रमक प्रतिक्रिया अशा स्वरूपाचं उत्तर मिळतं. दोन्हीही पक्ष अधिक कडवे होत जातात. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीने पुढे देवाला विरोध करायचे सोडले आणि बुवाबाजीला विरोध सुरू केला. मग अनेक बुवा उघड केले . पण बुवांकडे जशी अमाप संपत्ती जमली होती तशी चळवळीकडे नव्हती हे एक, आणि या चळवळीच्या नेत्यांच्या पुस्तकांची भाषा अगदी कोरडी होती. त्यात एक प्रकारची भावना शून्यता असे. तुलनेने मला मार्टिन गार्डनर , जॉन ग्रँट यांची पुस्तके आदर्श वाटतात.ती वाचकाला आपलं करतात. अंधश्रद्धेबाबत माझ म्हणण थोडं वेगळं आहे.ती गेली कित्येक शतकं समाजात रूढ आहे.ती एका दिवसात जाणार नाही. अशाश्वत जीवन, दारिद्र्य आणि सततची चिंता यामुळे अंधश्रद्धा वाढीस लागते.’ गप्पी मासे पाळा आणि मलेरिया पळवा’अशी घोषणा देता येते. अंधश्रद्धा पळवणारे गप्पी मासे मिळत नाहीत. त्यापेक्षा हळूहळू अंधश्रद्धेच्या पाईकांना फितूर करता आले तर आपोआपच अंधश्रद्धेला म्हणजे मूलतः बुवाबाजीला भगदाड पडतील असे मला वाटते. अंधश्रद्धेचा आणि विज्ञानाचा तसा जवळचा संबंध नाही. अंधश्रद्धा हा मानसशास्त्राचा भाग आहे. ती दूर करायची तर त्यासाठी भक्तांची मनोधारणा बदलणं महत्त्वाचं ठरतं. माझे हे विचार मी स्पष्टपणे मांडत आलोय आणि हळूहळू अंधश्रद्धेवर सतत सौम्य हल्ले चढवत आलोय. मी भू शास्त्राचा विद्यार्थी असल्याने वाहतं पाणी खडकांवर कसा कसा परिणाम करते याची मला कल्पना आहे. विज्ञान लेखन हेच काम करतं .श्रद्धा मानवी जीवनाला घातक असती तर ती उत्क्रांतीत कधीच नष्ट झाली असती.पण ती टिकली. मात्र, ‘अति सर्वत्र वर्ज्ययेत’ या न्यायाने श्रद्धेचा अतिरेक होण्यापासून समाजाला वाचवण हे महत्त्वाचं ठरतं . मार्टिन गार्डनर आणि जॉन ग्रँट यांनी हे काम लेखणीद्वारे कसं करावं याचा आदर्शच घालून दिला आहे ."

वाचने 57238
प्रतिक्रिया 119

प्रतिक्रिया

In reply to by जॉनविक्क

पण सदरील pdf हि तक्रारीची pdf आहे यावर न्यायालय व अनिसचे काय म्हणने/निकाल/स्पष्टीकरण आहे ते कुठे आहे ?

एकच धर्मावर आक्रमक टीका करणाऱ्या व्यक्ती चा हेतू हा सुपारी घेतलेल्या गुंड लोकांसारख असतो . ज्याला मारायचे आहे त्या व्यक्ती शी काही संबंध नसतो .

आमचे घाटपांडे काका वस्ताद आहेत. इतक्या वर्षांत इतक्या लेखांनंतही ते नेमके कुठल्या बाजूने आहेत याची मला तरी दाद लागत नाही. ;-) बाकी निरंजन घाटे यांचे सर्व म्हणणे एरवी पटले असते जर ते वाहायला सोबत तेल घेऊन गेले नसते. जागेविषयी नॉस्टॅल्जिया किंवा अटॅचमेंट यामध्ये आणि अतार्किक वागण्यामध्ये फरक या गोष्टींमुळे वाटतो. तेही जर घाटे स्वतः आपण विज्ञानवादी असल्याचा दावा सार्वजनिकरित्या करत असते तर. ते तसे करत होते का याबद्दल माहिती नाही.

In reply to by गवि

आमचे घाटपांडे काका वस्ताद आहेत. इतक्या वर्षांत इतक्या लेखांनंतही ते नेमके कुठल्या बाजूने आहेत याची मला तरी दाद लागत नाही. ;-)
+१०००००००० मला काल अनेक स्वप्नापैकी एक लघु स्वप्न पडलं. कोणीतरी शनिपाराला तेल घेऊन चाललंय असं दिसलं. स्वप्नात चेहरा खुप झूम करुन पाहिला, पण चेहरा स्पष्ट लक्षात आला नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by गवि

त्यांच्या अनेक सुख दु:खाच्या स्मृती तिथल्या गोष्टींशी निगडीत होत्या. त्याच मनोव्यापाराचा भाग म्हणून ते शनिपाराला जात असत. हे त्यांच्याशी बोलण्यावरुन मला झालेले आकलन मी मांडले आहे. तेल हा महत्वाचा मुद्दा नाही. तेल व हार घेउन उभे होते का नुसते उभे होते हे गौण आहे. जनरली भाविक लोक तिथे तेल व हार घेउन उभे असतात. ते शनिपारावर दर्शनाच्या लाइनीत दिसले ना? मग फाउल. विज्ञानकथा लेखक म्हणुन आपल्या मनात काही प्रतिमा असते त्याला या दृष्याने छेद दिला हा तो मुद्दा. एखादा राजकीय पक्ष, संघटना, कल्ट, बिरादरी वगैरे यात तुम्ही जरा काही वेगळे बोललात की तुम्ही नेमके कोणाच्या बाजूचे? असा प्रश्न तुम्हाला त्या समूहातून प्रत्यक्श अप्रत्यक्षपणे विचारला जातो. अशा या आपण आणि ते या कृष्ण धवल द्वैतात विचार करणार्‍या लोकांना मधाला ग्रे एरिया दिसत नाही. किंवा असही म्हणता येईल कि त्यांना रंगीत दिसत नाही फक्त कृष्ण धवल दिसते. समूह विचार वर्तनाच्या उन्मादात त्यांचा मेंदु स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता गमावून बसतो. गल्लत गफलत गहजब या राजीव सान्यांच्या पुस्तकात अशा अनेक सामाजिक दृष्टीकोनांचा विचार केलेला आहे.तस म्हणल तर प्रत्येक श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते.अंधश्रद्धा या शब्दाला काळी किनार आहे. चिकित्सेशिवाय ठेवलेला विश्वास म्हणजे श्रद्धा. कधी कधी तो समजूत, धारणा,भावना अशा अर्थानेही वापरला जातो जेव्हा तुमचे प्रतिसाद गोंधळात टाकतात असे जेव्हा कुणी म्हणत तेव्हा मला फार बर वाटत. याचा अर्थ समोरच्याची विचारप्रक्रिया चालू झाली आहे असे मी समजतो.

In reply to by प्रकाश घाटपांडे

तेल हा महत्वाचा मुद्दा नाही. तेल व हार घेउन उभे होते का नुसते उभे होते हे गौण आहे
मुद्दा महत्वाचा आहे गौण नाही. प्रतीकांनीच सगळा फरक पडतो. पुन्हा एकदा: यात घाटे हे स्वतःला तर्कनिष्ठ आणि विज्ञानवादी म्हणवत असल्यास आणि त्याविषयी ते सार्वजनिकरित्या आग्रही असल्यास आणि असल्यासच यात काही मिसमॅच आहे असं म्हणता येईल. ते केवळ उपजीविका आणि छंद म्हणून विज्ञानआधारित कथा लिहीत असते तर हे सर्व पूर्ण गैरलागू. अगदी शुद्ध भाविक भक्त असण्याला कोणाचीही हरकत अथवा फाऊल नसावा. सार्वजनिक भूमिका आणि वर्तणूक यात सुसंगती शोधत असलात तर मात्र मुद्दा पटत नाही.

In reply to by गवि

तर्कनिष्ठ आणि विज्ञानवादी म्हणजे देव वगैरे न मानणारा असे आपल्याला सरळसोट म्हणायचे नाही, हे गृहित धरतो. एखाद्या गोष्टीचा कार्यकारणभाव न समजता ती अनुकरणे वा कोणी सांगतो म्हणून करणे, यात वैज्ञानिक दृष्टीकोन नाही. पण हे फक्त देवभोळ्या कल्पनांसाठीच लागू पडत नाही. सगळ्याच बाबतीत पडते. श्रद्धा असण्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही. पण ती श्रद्धा ठेवण्यामागे कारण / हेतू काय ते महत्त्वाचे. हेतू बरोबर नसेल तर ती डळमळीत होण्याचीच शक्यता जास्त असते. तसेच एखाद्या व्यक्तीचे स्वतःचे एखादे मत बदलले तर तेही का बदलले? ते समजून न घेता उगाच टिका करणेही वैज्ञानिक दृष्टीकोनाला धरून नाही. होऊ शकते की दुसरे मत त्या व्यक्तीला पटायला लागले असेल. किंवा अगदी कुणाचे मन राखावे म्हणूनही ती व्यक्ती एखादी गोष्ट स्वतःच्या मनाविरुद्ध असलेली गोष्ट करू शकते. शक्यता अनेक आहेत. आततायीपणाने सरळ टिका करावी असे काही मला पटत नाही. राघव.

In reply to by गवि

मला पुस्तकातून जेव्हढे घाटे उलगडले तेव्हढे ते अज्ञेयवादी होते. त्यांनी एकाच वेळेस बऱ्याच लोकांचे संशोधन अभ्यासले होते, आणि त्यातून त्यांनी कोणताही ठाम निष्कर्ष काढायचे टाळले होते असा माझा तरी अंदाज आहे. ते एकाच वेळेस देवाचे अस्तित्व भावनिक गरजांसाठी आहे असेही म्हणतात आणि त्याच वेळेस त्याच प्रामाणिकपणे पुनर्जन्माच्या घटनांचे पुरावे देखील मांडतात. थोडासा irrational वाटावा असा माणूस, पण स्वतःशी प्रामाणिक असावेत. अन्यथा सार्वजनिक रीत्या इतक्या विरोधाभासी भूमिका घेणे सोपे नाही.

In reply to by गवि

तेल हा महत्वाचा मुद्दा नाही. तेल व हार घेउन उभे होते का नुसते उभे होते हे गौण आहे
मुद्दा महत्वाचा आहे शंभर टक्के सहमत.
प्रतीकांनीच सगळा फरक पडतो.
खरंय...! -दिलीप बिरुटे

In reply to by गवि

मुद्दा महत्वाचा आहे>>>>>म्हणजे नुसतेच लाईनीत उभे असतील तर कमी अंधश्रद्ध, हार घेउन उभे असतील तर त्यापेक्षा अधिक अंधश्रद्ध, हार व तेल दोन्ही घेउन उभे असतील त्याही पेक्षा अधिक अंधश्रद्ध,आणि साष्टांग नमस्कार घालत असतील तर ठार अंधश्रद्ध अशी प्रतवारी करता येईल. :)

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्लिज कन्फ्युजन क्रिएट करू नकोया का विनाकारण? तुमच्या मूळ लेखातली वाक्यरचना पहा:
अंनिसच्या मिटींग मध्ये आमच्या एका कार्यकर्ता मित्राला निरंजन घाटे हे शनिपाराला तेल घेउन जाताना दिसले.
नुसते एखाद्या धार्मिक ठिकाणी "जाणे" हे बालपणीच्या आठवणी, अटॅचमेंट वगैरे यांमुळे असू शकतं. तिथे तेल वाहतात ते घेऊन जाणं हे खास विधीसाठी जाणं ठरतं. त्यालाही हरकत एरवी नसावीच. पण कोणी जर तार्किक विज्ञाननिष्ठ विचारसरणीचा प्रसार सर्वत्र करत असेल तर ती विसंगती ठरते. मूळ वाक्यात फक्त "शनिपाराला तेल घेऊन जाणे" एवढंच म्हटलं आहे. त्यानुसार प्रतिक्रिया येणार. ते रांगेत उभे होते, वगैरे हे नंतर स्पेसिफाय केलं गेलं. तसं असेल तर मग मूळ वाक्यच तसं का नाही लिहिलं? अगदी रांगेत उभे असले (म्हणजे आपल्या आठवणीतलं ठिकाण दृष्टीस पडण्यासाठी रांग लावणं भाग असेल तर) तरीही थेट कर्मकांडाचं पालन म्हणता येणार नाही. पण तेल वाहणे हाही नॉस्टॅल्जियाचा भाग असू शकतो असं म्हटलं तर मग विसंगतीबद्दलची चर्चाच खुंटते. मग काय काहीही विधी करावेत आणि त्यात माझ्या बालपणीच्या रम्य दिवसांची आठवण म्हणून करतो असं म्हणावं. परंपरा नाहीतरी अशाच कॅरी फॉरवर्ड होत असतात. असो. आता उगीच शाब्दिक कसरत होतेय.

In reply to by गवि

मी फक्त प्रतवारीचा मुद्दा माण्डला.प्रत्येक श्रद्धा ही अन्धच अस्ते.बाकि आप्ल्या मताचे स्वागतच आहे.असो

In reply to by कंजूस

ती व्यक्ती सार्वजनिक भूमिकेत "ठराविक पायच प्रथम बाहेर टाकणे ही सवय तर्कदुष्ट आहे, ती अंधश्रद्धा आहे आणि तसे वागणे टाळावे, त्यात विवेक नाही" अशा आशयाचे म्हणणे मांडत नसल्यास कोणतीही विसंगती नाही. हरकत तर कोणत्याही परिस्थितीत नसावी. पुन्हा एकदा : घाटे यांची "शनिपारावर तेल वाहायला किंवा अन्यत्र देवपूजेस विरोध दर्शवणारी किंवा त्याला योग्य न मानणारी अशी काही सार्वजनिक प्रबोधनात्मक जाहीर भूमिका होती का हे मला ठाऊक नाही.

काही श्रद्धेमुळे इतरांना त्रास नुकसान होऊ लागले की म्हणावेसे वाटते थांबव. किंवा बरेच जण तीच गोष्ट करू लागले की डोंगराएवढे रूप धारण करते.

श्रद्धाळु लोकांना एकमेकांचे हात धरून रिंगण करून नाचायला आवडतं. नसलेल्यांना रिंगणात अडकवतात, सुटू देत नाहीत. ( लहानपणीचा खेळ आठवा.) आतला खेळाडु मग काय करतो? रिंगणातल्यांना गोष्टी सांगून गुंगवतो आणि पटकन निसटतो. हेच ते घाटे टेक्निक. निरंतर श्रद्धाळुंपासून सुटकेचा मार्ग. तामलीत तेल घेऊन पार गाठणे.

राघव,
हेतू बरोबर नसेल तर ती डळमळीत होण्याचीच शक्यता जास्त असते.
लाखमोलाचं विधान! एकदम पटलं. श्रद्धेमागचा हेतू बरोबर नसेल तर ती श्रद्धाच नव्हे. श्रद्धा नेहमी दृढ म्हणजे न डळमळणारी असते. ऐकलेलं वा अनुभवलेलं ते श्रत्. ते धारण करायची मनाची क्षमता असते ती श्रद्धा झाली. श्रद्धा ही मनाची कपॅसिटी आहे. ती दृढंच हवी. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

ते धारण करायची मनाची क्षमता असते ती श्रद्धा झाली. खरंय. मन जेव्हा एखादी गोष्ट संपूर्णपणे मानतं/ अ‍ॅक्सेप्ट करतं तेव्हाच ती श्रद्धा टिकते. पण यात एक गोम आहे. जर मोकळं मन नसेल तर हेकेखोरपणाकडे ही वृत्ती जाते. मग समोरचा कितीही का बरोबर वा संयुक्तिक का सांगेना.. मी एखाद्या गोष्टीवर श्रद्धा का ठेवतो हे मला ठामपणे माहित पाहिजे. पण त्या कारणाहून योग्य असं कारण असल्यास ते मान्य करण्याची तयारीही हवी, अगदी विरुद्ध मतासाठी असल्यास देखील. एखाद्या गोष्टीवर माझी श्रद्धा आहे असं आपल्या विचारांशी प्रामाणिक राहून म्हणणं आणि आचरणं, हे फार नाजुक अन् कठीण कर्म आहे.

In reply to by गामा पैलवान

न डळमणाऱ्या श्रध्देला “निष्ठा” म्हणतात. “श्रध्दा” नव्हे. निदान अध्यात्मात तरी अशीच व्याख्या करतात.

4-year-old boy in Australia claims to be reincarnation of Princess Diana “Billy (aged two at this time) pointed and said, ‘Look! It’s me when I was a princess’,” when he spotted Diana on a card, says his father

त्यांचे लहानपण त्या भागात गेले होते. अनेक सुख दु:खाच्या स्मृती तिथल्या गोष्टींशी निगडीत होत्या. त्याच मनोव्यापाराचा भाग म्हणून ते शनिपाराला जात असत तेल हा महत्वाचा मुद्दा नाही. तेल व हार घेउन उभे होते का नुसते उभे होते हे गौण आहे. अनेक सुख दु:खाच्या स्मृती (नॉस्टॅल्जिया) त्याच्याशी निगडित होत्या तर ते शनिपाराशी (नुसते० गेले त्यात गैर नाही. पण ते तेल घेऊन गेले या बद्दल लोकांचा आक्षेप असेल तर तो समजण्यासारखा आहे. तुझे आहे तुजपाशी मध्ये काकाजी म्हणतात तसे -- कुणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु जर तुम्ही सार्वजनिक न्यासावरुन लोकांना एखादी गोष्ट चूक आहे/ अंधश्रद्धा आहे सांगत असला तर ती तुम्ही स्वतः करणे हे समाजाला मान्य होणार नाही.

In reply to by सुबोध खरे

लाईनीत उभे होते ना? मग झाल. तेल हार असो नसो. असा तो मुख्य मुद्दा आहे. वाचत सुटलो त्याची गोष्ट हे पुस्तक मूळातुनच विकत घेउन वाचण्यासारखे आहे.त्यात त्यांच्या अजून काही भुमिका समजत जातात. तसेच विचारातील बदल ही चर्चिले आहेत.

In reply to by सुबोध खरे

परंतु जर तुम्ही सार्वजनिक न्यासावरुन लोकांना एखादी गोष्ट चूक आहे/ अंधश्रद्धा आहे सांगत असला तर ती तुम्ही स्वतः करणे हे समाजाला मान्य होणार नाही.
समाजाला मान्य होणार नाही हे अगदी बरोबर आहे. कारण समाजाचा अपेक्षाभंग होत असतो. विज्ञान या विषयावर लेखन करणार्‍या लोकांची वाचकांमधे एक प्रतिमा असते. ती अर्थातच त्यांच्या साहित्यातून निर्माण झालेली असते. एखाद्या लेखकाविषयी आपण जे मत बनवतो ते त्याच्या लेखनातून. विज्ञानविषयक सातत्याने दीर्घकाळ लेखन करणारा माणूस हा अश्रद्ध, संशयवादी, बुद्धीप्रामाण्यवादी, विवेकी,नास्तिक, विचारवंत असा असला पाहिजे ही आपण आपल्या मनात प्रतिमा तयार करतो. मग त्या प्रतिमेला छेद देणारे एखादे दृष्य दिसते त्यावेळी आपला भ्रमनिरास होतो. क्रिकेट, सिनेमा, राजकारण यातील लोकप्रिय व्यक्तिमत्व जेव्हा आपल्या मनातील त्यांच्या प्रतिमेशी सुसंगत वागत असतात तो पर्यंत आपण त्यांना डोक्यावर घेउन नाचतो. जेव्हा आपल्या अपेक्षेपेक्षा विसंगत वर्तन त्यांच्याकडून व्हायला लागते त्यावेळी आपण त्यांना पायदळी तुडवायला सुरवात करतो.त्याही व्यक्ती प्रथम प्राणि आहेत नंतर माणूस (होमो सेपीयन) आहेत व नंतर यशस्वी प्रथितयश लोकप्रिय वगैरे व्यक्तिमत्व आहेत हे आपण विसरुन जातो. निरंजन घाटे जेव्हा मित्राला शनिपाराच्या लाईनीत दिसले त्यावेळी त्याच्या मनातील निरंजन घाट्यांच्या प्रतिमेचे भंजन झाले. हा जसा एक भाग आहे तसा माणसांच्या दीर्घ आयुष्यात सुरवातीच्या टप्प्यात असलेली मते नंतरच्या टप्प्यात असतीलच असे नाही. मतांच्या छटा बदलत जातात. तोही प्रगल्भ होत असतो. वयाच्या विसाव्या वर्षी असलेल्या श्रद्धा अंधश्रद्धा या संकल्पना वेगळ्या असतील वयाच्या चाळीस पन्नासाव्या साठाव्या वर्षी त्या वेगळ्या असू शकतात. आपल्या ज्ञानात अनुभवात काही भर पडत असतेच ना! सुरवातीच्या काळात गॉड इज ट्र्थ असे म्हणणारे गांधीजी उत्तरार्धात ट्रुथ इज गॉड असे म्हणू लागले. आपले अलिकडेल मत ग्राह्य मानावे असेही त्यांनी लिहून ठेवले आहे. हे अर्थात प्रत्येकासाठी खरे आहे. थोरामोठ्यांची सिलेक्टिव्ह कोटेशन ही आपापल्या सोयीने घेणारे अनेक असतात. एकाच व्यक्तीची आपल्या सोयीची कोटेशन विरुद्ध विचारश्रेणीचे लोक घेत असतात. ती खरीही असतात. पण ही वक्त्व्ये कोणत्या परिस्थितीत कोणत्या कालखंडातील कोणत्या प्रसंगातील आहेत हे ते विसरतात किंवा माहित नसते. त्यामुळे अनेक महापुरुष देखील असे वेठीस धरले जातात. समाजकारणात, राजकारणात या गोष्टी चालूच असतात. कधी बुद्धीभेदासाठी तर कधी प्रबोधनासाठी याचा चातुर्यांने वापर केला जातो. प्रबोधन काही वेळा आंजारुन गोंजारुन करावे लागते तर काही वेळा काही लोक प्रहार करुन.प्रबोधन करतात. ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी.... प्रश्नोत्तरातून सुसंवाद या पुस्तकाच्या परिक्षणात जयंत नारळीकर म्हणतात," 'फलज्योतिष ही एक अंधश्रद्धा आहे' हे समजावून सांगायला लागणे आणि तेही निरक्षरांना नव्हे तर डिग्री विभूषितांना, उच्चपद्स्थांना, समाजधुरिणांनादेखील, इथेच खरी शोकांतिका आहे. अशा वेळी तुम्ही अंधश्रद्ध आहात, फसव्या विचारसरणी मागे धावून आपले हसे करुन घेत आहात.' वगैरे आक्रमक प्रचार योग्य ठरत नाही. लहानपणी सूर्य आणि वार्‍याच्य़ा चढाओढीची गोष्ट वाचली होती, त्याचा प्रत्यय येथे येतो. वारा आणि सूर्य दोघांपैकी कोण एका पादचार्‍याचा कोट त्याच्या अंगावरुन काढून दाखवेल, अशी स्पर्धा होती. वारा वेगाने वाहू लागला, तसे पादचा-याने कोट आवळून धरला. अखेर वाराच थकला. मग सूर्य पुढे आला. त्याने संथपणे प्रकाशणे चालू ठेवले आणि काही वेळाने पादचार्‍याने फार उकडायला लागले, म्हणून कोट काढला.आक्रमक प्रचाराने अंधश्रद्धेचा कोट आणखी आवळुन धरला जातो. पण त्या व्यक्तिला सौम्य शब्दात पटवून दिले आणि त्याने स्वत:हून तो कोट काढून फेकून दिला तर ते जास्त प्रभावी ठरणार नाही का? घाटपांडे यांचा मार्ग वार्‍याचा नसुन सूर्याचा आहे."

In reply to by प्रकाश घाटपांडे

सबब घाटपांडे यांचा मार्ग वार्‍याचा नसुन सूर्याचा आहे हे विधान दिशाभूल करणारे आहे.

भारतात तथा कथित पुरोगामी,नास्तिक,पर धर्मीय हे फक्त हिंदू धर्मात ज्या काही अंध श्रद्धा आहेत त्या वरच चर्चा करत असतात .बाकी धर्माच्या अंध श्रधेवर कधीच चर्चा होवून देत नाहीत . काय अंध श्रद्धा फक्त हिंदू धर्मात च आहेत ? हिंदू धर्म हाच खरा विज्ञान वादी धर्म आहे . विमानाची कल्पना हिंदू धर्मातच आहे . ब्रह्मास्त्र ची कल्पना हिंदू धर्मातच आहे काम शास्त्र वरचा ग्रंथ फक्त हिंदू धर्मात च आहे . आरोग्य वर ग्रंथ फक्त हिंदू धर्मात च आहे . कसे जीवन जगावे ह्याचे उत्तम मार्ग दर्शन हिंदू धर्मच करतो ( गीता आणि महाभारत) हे सर्व प्रकारचे विचार दुसरा कोणताच धर्म करत नाही तरी काही . हिंदू व्यतिरिक्त बाकी कोणत्याच धर्मातील अंध श्रद्धा न वर हे तथाकथित पुरोगामी टीका करताना कधीच दिसणार नाहीत

जॉनविक्क, पण सदरील pdf हि तक्रारीची pdf आहे यावर न्यायालय व अनिसचे काय म्हणने/निकाल/स्पष्टीकरण आहे ते कुठे आहे ? न्यायालयात खटला सरकारने दाखल करायला हवा (बहुतेक). कारण सरकारी कायद्यांचा भंग झाला आहे. मात्र तिथनं अशी काही हालचाल दिसून येत नाही. अनिसचं यावर काही मत असेलसं वाटंत नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

न्यायालयात खटला सरकारने दाखल करायला हवा (बहुतेक). (बहुतेक) आपणही जनहित याचिका दाखल करू शकता. कारण सरकारी कायद्यांचा भंग झाला आहे. मात्र तिथनं अशी काही हालचाल दिसून येत नाही. सर्व कायदे सरकारीच असतात, खाजगी कायदा हा प्रकारही सरकारच्या कायद्याशिवाय बेकायदेशीरच. सबब आपण हे करू शकता. अनिसचं यावर काही मत असेलसं वाटंत नाही त्यांना स्टॅन्ड तर घ्यावाच लागेल. बाकी तज्ञ बोलतीलच तो पर्यंत आरोप ठेवले जाणं म्हणजे गुन्हा सिद्ध होणं न्हवे असं समजून सत्य जनते समोर येईलच व आलेच पाहिजे याची खात्री बाळगूया.

In reply to by जॉनविक्क

जॉनविक्क, संजीव पुन्हाळेकरांनी तड लावायचा प्रयत्न केला तर त्यांनाच उलट फालतू कारण सांगून अटक केली. अर्थात न्यायालयाकडनं जामीन लगेच मिळाला. सरकार कोणाचं आहे हे कळून येतं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

चर्चेतून काहीच नवीन काहीच साध्य नाही, विषय आता इथेच सोडून देऊ. - सश्रध्द जॉनविक्क

श्रद्धा मानवी जीवनाला घातक असती तर ती उत्क्रांतीत कधीच नष्ट झाली असती.
ह्या वाक्याला आधार काय? कदाचित ती मानवी जिवाला घातक असल्याने भविष्यात नष्ट होणार असेल. उत्क्रांती ही लक्षावधी वर्षे चालणारी प्रक्रिया आहे. व्यवस्थापित धर्म व अनुषंगिक श्रद्धा यांचे आयुष्य केवळ काही हजार वर्षांचे आहे.

सर्वोच्च न्यायालयात माझा सरकार विरुद्ध खटला चालू असताना मी पुण्याच्या कमांड रुग्णालयात कामाला होतो. तेथे दिल्लीवरून एक सांध्याच्या रोगांचे तज्ज्ञ कर्नल चतुर्वेदी हे आले होते. त्यांच्या बरोबर भोजन करत असताना ते म्हणाले कि तु न्यायालयात कशाला गेलास? मी त्यांना म्हणालो न्यायालयात न्याय मिळेल अशी माझी (faith) श्रद्धा आहे. विश्वास( belief) आणि श्रद्धा(faith) यात सूक्ष्म फरक आहे त्यावर ते म्हणाले कि श्रद्धा असल्याने कोणताही फायदा होत नाही. मी त्यांना शांत पणे म्हणालो सर तुमची बायको तुमच्याशी एकनिष्ठ आहे हि तुमची श्रद्धा/ विश्वास आहे. म्हणून तुम्ही माझ्याबरोबर सुखाने जेवत आहात. जर आता तुम्हाला कळलं कि दिल्लीत तुमच्या बायकोचं लफडं आहे तर तुम्हाला हेच जेवण गोड लागणार नाही. ते दोन मिनिटं विचार करून म्हणाले तू म्हणतोस ते बरोबर आहे. आपण लोकांचं भलं करतो आहोत त्यामुळे आपलंही चांगलंच होईल हि सामान्य माणसाची श्रद्धा (/विश्वास) असते. अशा श्रद्धेला खोटं ठरवून नक्की काय निष्पन्न होतं ? पराकोटीचे नास्तिक बुद्धिप्रामाण्यवादी स्वतःच्या खाजगी जीवनात अनेक श्रद्धा बाळगून असतात. पण ती केवळ धर्मावर आधारित नसल्याने तिला श्रद्धा म्हणायचे नाही. कम्युनिस्ट माओवादी इ लोकांनी केलेले अमानुष शिरकाण हे कोणत्या विचारसरणीने होते? ती बुडत चाललेल्या कम्युनिस्ट विचारसरणीवर असलेल्या (अंध) श्रद्धेवरच आधारित असते. मानवी मन हे अत्यंत जटील अशी प्रणाली आहे आणि ती जोवर ती पूर्णपणे समजत नाही तोवर दुसऱ्याच्या मानसिक जडणघडणीवर कठोर टीका करणे चूक आहे असे मी मानतो. श्रद्धा हि घड्याळासारखी असते आणि प्रत्येकाला आपलेच घड्याळ बरोबर आहे अशी ठाम श्रद्धा असते

In reply to by सुबोध खरे

खरे डॉक्टर, घड्याळाचं उदाहरण एकदम चपखल आहे. मुंबईत बरीच वर्षं काढल्याने आयुष्य घड्याळाला बांधलेलं असणं चांगलंच अनुभवलंय. माझं घड्याळ मी नेहमीच बरोबर धरायलाच पाहिजे. भले ते इतरांशी जुळंत नसलं तरीही. आ.न., -गा.पै.

In reply to by सुबोध खरे

मानवी मन हे अत्यंत जटील अशी प्रणाली आहे आणि ती जोवर ती पूर्णपणे समजत नाही तोवर दुसऱ्याच्या मानसिक जडणघडणीवर कठोर टीका करणे चूक आहे असे मी मानतो.>>>>>>म्हणून मवाळ भुमिका मला आवडते

माई साहेब मोड ऑन "सगळ्यात सुंदर श्रद्धा हि कपूरांची, बाकी सब झूठ असे आमच्या ह्यांचे ठाम मत आह !" माई साहेब मोड ऑफ

In reply to by महासंग्राम

"सगळ्यात सुंदर श्रद्धा हि कपूरांची, बाकी सब झूठ असे आमच्या ह्यांचे ठाम मत आह !" हे मत म्हणजे, ही माई मोडमध्ये गेल्यावर असणारी, तुमची श्रद्धाच आहे. ;)

In reply to by महासंग्राम

हे पटले. कुठ श्रद्धा अंधश्रद्धाच्या भानगडीत पडता. आपल्याला मनाला आनंद देईल ते करावे.मग त्याला कुणी श्रद्धा म्हणा अंधश्रद्धा म्हणा किंवा अश्रद्धा म्हणा.

तिसरी गोष्ट म्हणजे आमच्याच कॉलेजमधला एक शिपाई , त्याची गोष्ट : आपल्याला भूत - पिशाच्च या प्रकारात गती आहे असं तो म्हणे . गावाबाहेर बारा बावड्यांची , दगडांत बांधलेली एक अप्रतिम विहीर आहे . तिथं नेमक्या दिवशी , नेमक्या वेळी , विहीरभर पणत्या पेटल्याची गोष्ट तो सांगे . त्या नेमक्या वेळी मीही एकदा त्याच्या बरोबर गेलो . पण पणत्या राइच द्या , एखादा काजवाही चमकला नाही . शेजारच्या घरात एक बाई बाळंत झाली होती . तिचा नवरा माझ्या परिचयाचा होता . काही दिवसांत बाळंतिणीच्या तक्रारी येऊ लागल्या : तिला बाजेवरून सारखं उचलून कोणी खाली ठेवतंय असं वाटे : बाळंतपणात अशक्तपणा आला तर डोकं हलकं होतं , त्यातला हा प्रकार असावा , असं तिच्या नव-याला प्रथम वाटलं . औषधोपचारानं बरं वाटेना . तक्रारी वाढतच गेल्या . तसं पाहता ती बाळंतीण एरवी व्यवस्थित वागे . वेडाचं वारं लागलं असंही दिसेना . अचानक एक दिवस कॉलेजातील तो शिपाई माझ्या घरी आला . त्याला पाहताच मला एक कल्पना सुचली : जर काही बाधा वगैरे असली तर , हा नेहमी म्हणतो ते खरं आहे की नाही ते कळेल . दुसरं , असलंच तर ती गरीब स्त्री यातून मुक्त होईल . तिसरं , या जगात खरंच अदृश्य शक्ती आहेत की नाहीत याची मीमांसा , माझ्यापुरती , होईल . मी त्याला तिथं सहज घेऊन गेलो . घराच्या पाय - या चढून जाईपर्यंत त्याला कल्पना नव्हती की आपण कुठं , कुणाला भेटायला जात आहोत , पाय-या चढून गेल्यावर लागणाच्या पडवीला बांबूच्या काठ्यांचा एक झापा , ऊनवार्यासाठी लावलेला होता . तिथंच एक बाकडं ठेवलेलं होतं . शिपाई मला म्हणाला , ' या घरात काही बाधा आहे . ' मी आश्चर्यानं बघतच राहिलो . तो म्हणाला , “ ह्या घरमालकाला बोलवा . ' तो आल्यावर शिपायानं विचारलं , “ हा झापा कोणाकडून करवून घेतला ? 'कोणी बुरूड नदीपाशी राहतो , त्याने केला . पण का ? ' त्यातली आधाराची एक पांढरी काठी त्यानं उपसली आणि म्हणाला , “ ही काठी स्मशानातून आली आहे . म्हणून घरात त्रास सुरू झालाय , ती परत स्मशानात गेली पाहिजे." मला परत आश्चर्य वाटलं . पण खात्रीसाठी बुरुडाला बोलावून घेतलं . त्यानंही सा-यांसमोर कबूल केलं की , काठी त्यानं स्मशानातूनच आणली होती . शिपाई काठी घेऊन गेला आणि बाळंतिणीचा त्रासही हळूहळू संपला . मला प्रश्न पडले : या शिपायाला या घरात त्रास आहे हे कसं कळलं ? मी त्याला तिथं नेईपर्यंत त्यांचा काहीही परिचय नव्हता . दुसरं म्हणजे काठी स्मशानातून आणली हे समजणं . ते बुरुडानं कबूल करणं . आणि त्यानंतर त्या बाईचा त्रास कमी होणं . बाईचा त्रास मानसिक असेल असं म्हटलं तरी पहिल्या दोन्ही गोष्टींची उत्तरं मिळत नाहीत . " मी जीएंना विचारले , " तुमचा विश्वास आहे काय ? " काही गुंते सुटत नाहीत . त्यात अंधविश्वासापेक्षा , मला त्यांचं आकर्षण मात्र जास्त वाटतं ! ” ते म्हणाले . जी ए : एक पोट्रेट या सुभाष अवचट यांच्या पुस्तकातून

In reply to by महासंग्राम

म्हणजे यातला मी हा जीए आहे का? जीएंना गुढाविषयी आकर्षण होते. खर तर जीए हेच एक गूढ आहे. पण अशा कथेत पूर्ण चिकित्सा केली तर बर्‍याचदा त्यातल वास्तव काही वेगळच निघत.गुढाविषयी आकर्षणातून अंधश्रद्धा निर्माण होतात हे मात्र खर.