भविष्याचे भूत...
अंगावर भयचकिताचा सरसरीत काटा येणे म्हणजे काय ते आज अक्षरश: अनुभवास आले. रोजच्या राजकारण आणि भक्तरुग्ण वादाची झिंग एका झटक्यात उतरली, आणि मन भानावर आलं. असं काही झालं, की आपोआप सहावे इंद्रिय जागे होते, आणि भविष्य जणू भेसूर होऊन वर्तमानाच्या रूपाने विक्राळपणे समोर येते. भविष्याचे भय भेडसावू लागते, आणि कितीही अश्रद्ध, नास्तिक असलो, तरीही, हे असे भविष्य कधीच आकारू नये यासाठी मन नकळत प्रार्थनाही करते...
तो, जो कोणी अज्ञात नियंता-निसर्ग आहे, तो ती प्रार्थना नक्की ऐकेल अशी आशा आपोआप बळावते अन् अंगावर उमटलेला शहार हळुहळू मिटू लागतो...
तरीही भविष्यभयाची चाहूल देणारे भयाण वर्तमान मनाचा कब्जा घेऊन बसलेलेच असते...
ठाण मांडून !!
भविष्यात पाण्यासाठी युद्धे भडकतील असा इशारा काही दशकांपूर्वी कधीतरी पहिल्यांदा कुणीतरी दिला, तेव्हा त्याची नक्कीच खिल्ली उडविली गेली असणार! कारण, या इशाऱ्यानंतरही पाण्याचे मोल जाणण्यात माणूस कमीच पडला. तो निसर्ग आपल्या ठरल्या वेळी भरभरून बरसणार आणि पाण्याच्या झोळ्या पुरेपूर भरूनच परतणार अशा वेडगळ समजुतीत आपण राहिलो.
आता त्याची फळे भोगण्याची वेळ आली आहे.
पाण्यासाठीच्या संघर्षाचे भविष्य उंबरठ्यावर उभे ठाकले आहे.
गेल्या चारसहा महिन्यांपासून भीषण पाणीसंघर्षाच्या शेकडो कथा आपण ऐकत, वाचत आलो.
या मालिकेतील आजच्या कथेने त्या सर्वांवर कडी केली, आणि ते भविष्य खरे ठरणार या भयाची जाणीव मनाचा थरकाप उडवून गेली!
मध्य प्रदेशातील एका जंगलात, पाणी न मिळाल्याने तहानेने तडफडणाऱ्या१५ माकडांचा उष्माघाताने मृत्यू झाला, ही ती भविष्यभयाची जाणीव करून देणारी बातमी... पण याचा गाभा आणखीनच भयाण आहे. हे मृत्यू केवळ तहानेने तडफडल्यामुळे झालेले नाहीत. पाण्यासाठीच्या संघर्षाचे हे पंधरा बळी आहेत. माकडांच्या दुसऱ्या टोळीने पाणवठ्यावर येण्यास मज्जाव केल्याने एका टोळीतील ही तहानलेली माकडे मरण पावली. या वेळी नक्कीच दोन टोळ्यांमध्ये संघर्ष झालाच असणार! या दुसऱ्या टोळीने आसपासच्या पाणवठ्यांवर आपला कब्जा प्रस्थापित केला होता.
पाण्यासाठीचा संघर्ष!! पाण्यावरच्या हक्काचा संघर्ष!!
बहुधा, ‘त्या’ भविष्यवाणीतील हे पहिले युद्ध असू शकते.
अन्य माकडांवर अशी वेळ येऊ नये म्हणून वन खात्याला आता जाग आली आहे. त्यांच्यासाठी पर्यायी जलस्रोत कुठून उभे करायचे यासाठी शोध सुरू झाला आहे.
मनाचा थरकाप उडविणारी, शहारा आणणारी भविष्यभयाची जाणीव ती हीच!
मध्य प्रदेशातील जंगलातले हे वास्तव माणसाला जागे करणार का, हा नवा प्रश्न त्या भयाच्या हातात हात घालून आता समोर थयथयाट करणार!!
ही बातमी वाचत असतानाच माझ्या बहीणीचा फोन आला.
कोकणातून. रत्नागिरीहून.
अजूनही रत्नागिरीत पावसाचे टिपूस पहायला मिळालेले नाही.
अंगणातली विहीर, कोरडीठाक पडलीय.
कोपऱ्यातल्या एका खड्ड्यात दिवसभरानंतर थेंबाथेंबाने साचणाऱ्या ओंजळभर पाण्यात विहिरीतले मासे तग धरण्यापुरती जिवाची शिकस्त करतायत.
ही विहीर बांधल्यावर मोठ्या हौसेने बहिणीने तीत काही मासे आणून सोडले. दिसामासागणिक वाढणारी आणि पाण्यात बागडणारी त्यांची पिलावळ न्याहाळताना तिच्या डोळ्यात आनंदाची कारंजी फुलायची, आणि ती ते फोनवर सांगताना आम्हाला ती जाणवायची...
आज त्याच माशांची केविलवाणी कहाणी ऐकवताना तिला फुटलेला हुंदका थेट मन चिरत घुसला...
त्या माशांना जगवण्यासाठी आता तिने चंग बांधलाय.
दर दिवसाआड, त्या विहिरीत चार बादल्या पाणी ओतायला तिने सुरुवात केली.
पहिल्या दिवशी तिने विहिरीत पाणी ओतले, तेव्हा ते मासे आनंदाने अक्षरश: उसळ्या मारत होते.
आज पाणी आटले आणि पुन्हा ते केविलवाणे झाले!
ज्या विहिरीतून पाणी काढले जायचे, त्याच विहिरीत वरून पाणी ओतायची वेळ आली!
हीदेखील त्या भयाची एक जाणीवच!
ती शोकाकुल माकडीण...
निसर्गाला नक्कीच पाझर फुटेल!
त्यासाठी, नास्तिकतेचा सारा ताठा बाजूला ठेवून विनम्र प्रार्थना!!
https://www.indiatoday.in/india/story/15-monkey-die-heat-stroke-water-scarcity-madhya-pradesh-1544774-2019-06-08
प्रतिक्रिया
तहान लागल्यावर विहीर खोदायचा
बापरे! वास्तव दर्शन...
जुना पाहिलेला व्हिडियो आठवला
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Gulabi Aankhen | Sanamकोकणात उदा० रत्नागिरी जवळून
पाणी ही अशी गोष्ट आहे ना की
भयाण भविष्याची चाहूल!
लेख आवडला पण खरं सांगू का ते
माणसाची बेफिकीर वृत्ती आणि अतिशय स्वार्धी वृत्ती.
आपण सर्वच जबाबदार
आपण सर्वच जबाबदार
माणूस अजुन सुद्धा सुधारला
He mee kahi diwasapurvi lihile hote
ह्या मधील काहीच बहुसंख्य लोकांना जमणार नाही
ह्या मधील काहीच बहुसंख्य लोकांना जमणार नाही
पाण्यासाठीच्या संघर्षाचे
यावर कोणताही ‘उपाय’ नाही
माणूस हा हुशार आहे असे सिद्ध च होत नाही .