Skip to main content

हाटेल साठी नावे सुचवा

लेखक निशांत_खाडे यांनी मंगळवार, 21/05/2019 01:12 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांना नमस्कार! मी औरंगाबादेत २०-२५ ची सीटिंग असणारे एक नाश्ता व ज्यूस सेंटर सुरु करत आहे. दुकानाची जागा अंदाजे २८० स्क्वेअर फीट आहे. लोकेशन कॉलेज आणि शिकवण्याच्या परिसरात असल्याने कमीत कमी किमतीत पोटभर(Filling) आणि उत्तम दर्जाचे पदार्थ ठेवण्याचा विचार आहे. चहा, पोहे-जलेबी, शिरा, उपमा, उसळ, मिसळ पाव, बटाटे वडा,समोसे, पालक वडा, दही धपाटे, दोन तीन प्रकारचे पराठे, छोले भटुरे, पुरी भाजी, मसाले भात, पुलाव, डाळ खिचडी, राजमा चावल, छोले चावल व चार-पाच प्रकारचे ताज्या फळांचे ज्युसेस आणि शेक्स, लस्सी, ताक, रबडी, बासुंदी, होममेड श्रीखंड, होम मेड कुल्फी, असा मेन्यू करण्याचा विचार आहे. माझ्या या छोटेखानी उपक्रमासाठी नावे सुचवावेत तसेच काही सल्ला किंवा आयडीयाज असतील तर त्याही शेयर करावयात. या धाग्यास प्रतिसाद देणाऱ्या प्रत्येक मिपाकराला आभार म्हणून आपल्या हॉटेल चे एक कुपन व्य.नि. द्वारे दिले जाईल. तसेच जर हॉटेलचे नाव या धाग्यावर सुचवलेल्या पैकी ठेवले गेले तर ते नाव सुचवणाऱ्या मिपाकराला आमच्याकडून भेट म्हणून ३० कुपन दिले जातील. औरंगाबादकर मिपाकरांनी जरूर व्य.नि. करा तसेच वेळ काढून भेटायला या. हॉटेल आपलेच आहे. प्रतिसादांच्या प्रतीक्षेत!

वाचने 113254
प्रतिक्रिया 116

प्रतिक्रिया

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उस्मानपुऱ्यात, उत्सव मंगल कार्यालयाच्या समोर. आयसीडी, बंसोड्स, सायन्स अकादमी, गायकवाड, गुरुकुल असे सर्वच क्लासेस २०० मीटर च्या आत आहेत. तुमचे कॉलेज एक-सव्वा किलोमीटर असेल.

#ZeroPeriod BreakPeChai FoodForThought #HungryKya Hunger-Games ChaiPeCharcha Chit Chat

सर्वांचे आभार, प्रतिसाद येत राहूद्या. सर्वच नावे एक से बढकर एक आहेत. अजून हॉटेल चे काम चालू आहे, उदघाटनाची तारीख नक्की झाली कि सर्वांना व्य.नि द्वारे कुपन्स पाठवतो.

१)उदरभरण 2)Headquarter ( काँलेज जवळ असल्याने codeword मध्ये बोलायला सोपे )

जोश

Healthy n' Spicy असे काहीतरी नाव देऊन तुमचे पदार्थ चटपटीत असूनही आरोग्यासाठी उत्तम आहेत, असे वाटू द्या आणि प्रत्यक्षातही असू द्या. विविध प्रकारच्या Smoothies अवश्य ठेवा. https://www.indiatimes.com/health/recipes/14-smoothie-recipes-for-a-qui… https://www.vegrecipesofindia.com/smoothie-recipes/ .

चांगल्या हॉटेल ची काही लक्षणे १) स्वच्छता-- हॉटेलची टेबले वारंवार स्वच्छ कपड्याने साफ ठेवणे हे फार महत्त्वाचे आहे. हॉटेलातील कपडा पार कळकट होईस्तोवर बरेच हॉटेल मालक बदलत नाहीत. हि बाब मुलींना विशेषतः खटकते त्यामुळे अशा हॉटेल वर त्या नाक मुरडतात. दर आठवड्याला नवीन नॅपकिन विकत आणणे ही स्वच्छतेच्या दृष्टीने उत्तम गुंतवणूक आहे. याच खर्च आठवड्याला २० ते ३० रुपयांपेक्षा जास्त नाही. २) बहुसंख्य हॉटेलात मेनुकार्डे कमी असतात आणि असली तरी वेटरना ती उचलण्याची घाई का असते हे समजत नाही. प्रत्येक टेबल वर २ मेनुकार्डे कायम स्वरूपी ठेवावी. १०० ग्राहकांपैकी एकाने जरी एक पदार्थ जास्त मागवला तरी त्या अतिरिक्त मेनूकार्डाचे पैसे वसूल होतात. मेनू कार्ड कुतूहलाने पाहिली असताना त्यातील एखादा पदार्थ आपण घ्यावा अशी साहजिक इच्छा ज्याचे पोट पूर्ण भरलेले नाही त्याची होते. ३) हॉटेलातील प्रत्येक कोपऱ्यात पंख्याची/वातानुकूलित यंत्राची हवा व्यवस्थित येईल हि काळजी घेणे. हॉटेलात बसणे आरामशीर असले तर नकळत ग्राहक तेथे परत येतो. ४) हॉटेलचा दर्शनी भाग प्रसन्न असावा. येणार ग्राहक बाहेरूनच "नको जायला" म्हणाला तर धंदा बसलाच समजा. ५) एखाद्या ग्राहकाने एखाद्या पदार्थाबद्दल तक्रार केली तर तो लगेच बदलून द्यावा. हॉटेलच्या धंद्यात अन्नपदार्थाची किंमत हि सर्वात कमी म्हणजे १०-२० % च्या वर जात नाही. चटणीला वास येतो आहे असे म्हटल्यावर आपल्याला येत नसेल तरी त्याजागी पर्यायि पदार्थ /केचप द्यावा. कारण मला वास येत नाही असे सांगितले तर ग्राहक मनात (किंवा उघडपणे) "आम्ही काय खोटे बोलतो आहोत का" असे म्हणतो आणि परत हॉटेलची पायरी चढत नाही. ६) श्री. पेठकर यांच्यासारख्या या व्यवसायातील अनुभवी आणि यशस्वी माणसांचा सल्ला जरूर घ्यावा आणि वेळोवेळी घेत राहावा. औरंगाबादला आलो तर आपल्या हॉटेलला जरूर भेट देईन (आणि बिल संपूर्णपणे भरेन) बाकी आपल्या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा

In reply to by सुबोध खरे

सुरेख प्रतिसाद! सगळे मुद्दे अगदी चोख आहेत. खूप प्रेमाने जरी नाही तरी अदबीने बोलणारे वेटर्स असतील तर ग्राहकाला चांगले वाटते. मी तर नेहमीच म्हणतो, हॉटेलच्या व्यवसायात तुम्ही काही हुकुमी गोष्टींची काळजी घ्या; ग्राहक अगदी चव बेताची आणि किंमती थोड्या चढ्या असल्या तरी पुन्हा पुन्हा येतात. स्वच्छता, प्रसन्न वातावरण, आरामदायी व्यवस्था, अदबशीर वेटर्स, माहितीपूर्ण मेनू कार्ड, तत्पर सेवा (हे खूप मह्त्वाचे; एका चांगल्या चवीच्या हॉटेलमध्ये केवळ सेवा ढिसाळ असल्याने लोकं जात नाहीत हे माझ्या पाहण्यातले उदाहरण आहे), ऐसपैस टेबले, वगैरे घटक असतील तर ग्राहक चवीकडे थोडे दुर्लक्ष करू शकतात. कुठल्याही व्यवसायात जर एकंदर अनुभव चांगला, विनाकटकटीचा, पटकन काम करून देणारा, तत्पर सेवा देणारा, ग्राहकाला आदराने वागवणारा, माहिती देणारा, निर्णय घेण्यात मदत करणारा, योग्य पर्याय सुचवणारा, ग्राहकाला बोलण्यातून आपलेसे करून घेणारा असेल तर माझ्यासारखा ग्राहक फार चिकित्सा न करता, अधिक पर्याय न तपासता, आणि किंमतीचा फार विचार न करता निर्णय घेतो असे निरीक्षण आहे. अर्थात, काहीच वस्तू किंवा सेवांच्या बाबतीत असे होते. कपडे, छोट्या-मोठ्या वस्तू, ईलेक्ट्रिक, प्लंबिंग सेवा, भाज्या, किराणा, क्वचित लागणार्‍या वस्तू, वगैरे मी वरील प्रकारचा अनुभव आल्यास पटकन घेऊन मोकळा होतो. ही कामे फारशी आवड नसल्याने ती पटकन कशी संपतील याकडे माझा कल असतो. थोड्या फार फरकाने या वस्तूंचा किंवा सेवांचा दर्जा सारखाच असतो; त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता खूप कमी असते.

In reply to by सुबोध खरे

बहुसंख्य हॉटेलात मेनुकार्डे कमी असतात आणि असली तरी वेटरना ती उचलण्याची घाई का असते हे समजत नाही.
माय ग्यान- १. टेबलावर मेनू कार्ड असणं म्हणजे ऑर्डर अजून दिली नाही हे ओळखायची खूण असू शकते, किंवा उलट. २. मेनूकार्ड पाण्याने किंवा अन्नपदार्थाने खराव होउ नये म्हणून, असंही असू शकतं....

कमाल झाली भौ त्यांनी हाटेल साठी नावे सुचवाला सांगितले आणि इथले लोक्स त्यांना धंदा कसा करावा कि करू नये यावर लेक्चर देऊन राहिले. आता हाटेल उघडून राहिले म्हंजी काहीतरी अनुभव असलच कि गाठीला. कि ते तुम्हाला हाटेल कसे चालवायचे असे विचारून राहिलेत? नाव सुचवा एवढाच त्येंचा प्रश्न आहे. बाकी जाऊ देत निशांत खाडे साहेब तुम्ही हाटेलाच नाव TTMM -तेरा तू मेरा मै असंच ठेवा. उधारी का धंदा खोटा हे लक्षात राहूद्या. आणी एक, हाटेलात प्रत्येक भिंतीवर घड्याळ लावा. पोराटोरांनी निवांत बसने वग्रे धंद्यासाठी मारक आहे 'आता उठा असे सांगायला लाऊ नका' अशा पाट्या लावायला हरकत नाही. बाब्बो बाकीचे प्रतिसाद वाचून मि पण अनाहूत सल्ले देऊन राहिलो कि :-)) माफी असावी.

In reply to by गड्डा झब्बू

आपण हे वाचले का?
माझ्या या छोटेखानी उपक्रमासाठी नावे सुचवावेत तसेच काही सल्ला किंवा आयडीयाज असतील तर त्याही शेयर करावयात.

In reply to by शब्दानुज

अरारारा ते वाचायचे राहूनच गेले कि. निशांत भाऊ मि पण सल्ल्या साठी जी माफी मागीतली ति परत घेतो. ते TTMM चा लक्षात राहूद्या, कुपन नाही पाठवला तरी चालेल. मुंबईसून संभाजीनगर येण्या जाण्याच्या खर्चाचा हिशेब केला तर मला इकडेच १० १५ दिवस नाष्टा केलेला परवडेल :-))

कॉलेजात आताशा वाचनाची आवड राहिली आहे की नाही ? आहे तर मराठी पुस्तके वाचतात की इंग्रजी ? असे असेल तर एखाद्या प्रसिद्ध पुस्तकाचे नाव पण देऊ शकता. उदा. "रारंगढांग" "कोसला" फा ईव्ह पॉईंट समवन" इ. इ. नवीन प्रयोग आहे, जर मला कधी हॉटेल टाकता आले तर मी नक्कीच पुस्तकाच्या नावांचा वापर करेन. राजकारणाची आवड असेल तर "चाय पे चर्चा" "कॉफी आणि बरच काही..." "निंबूज विथ निशांत" असे काही प्रयोग करता येईल.

भारी धागा आणि खत्रा प्रतिसाद. गवि, अभ्या, खरे वगैरेंना संचालक मंडळ म्हणून घेउन एखादं कुठेही हाटील सुरू केलं तर नक्कीच चालेल. ;) बाकी, कुपन्साठी एक-दोन नावं सुचवतोय. १. बघतोस काय? नाश्ता कर. २. किंवा सरळ नाश्ताचं भाषांतरीत नाव चालून जाइल. उदा. इंबीस (जर्मन), बोकादिलो (स्पॅनिश), कोलात्सिओन (फ्रेंच).

आपल्या आसपासच्या सर्व यशस्वी खाद्यदुकानांची नावे तपासा. पुण्यातलं एक उदाहरण द्यायचं बावधन मधलं पीटर मोमो सेंटर. याचं "मोमोलिशियस, नॉर्थ-इस्टर्न मॅजिक, इशान्य वडा-लसूण" असलं काहीही भंपक असतं तर मी त्या दुकानात बिचकूनच पाय ठेवला नसता. मी आधी राहत होतो तेथे "चस्का चवीचा: एक भन्नाट मिसळ" की काय असलं नाव होतं.हॉटेल एव्हाना बंद पडलं असेल. बाणेरात "रॉनीज कोल्हापुरी कॅफे बिस्त्रो" नावाचं एक हॉटेल होतं. तेही बंदच पडलं. बावधनलाच आता "दि वडापाव कॅफे" असल्या नावांचे हाय-फाय कॉफी-वडापाव सेंटर आहे. थोड्याच अवधीत त्यांना गाशा गुंडाळावा लागेल यावर मी पैज लावायला तयार आहे. माझ्या थियरीनुसार नाव हे अतिसामान्य आणि कालानुषंगाने आधीच्या फॅशनचं असावं. तुमचं आडनाव अथवा भागाचं नाव अथवा गावाचं नाव. बास्स्. अजून एक उदाहरण द्यायचं तर बेंगलोरचं मावल्ली टिफिन सेंटर. बेळगावची स्वामी बेकरी. कोल्हापुरची खेमराज बेकरी. पुण्याचे मिलन, आवारे इत्यादी. यांच्यात कुठेही फॅन्सीपणा नाही. याचं कारण असं की अतिसामान्य नाव जूनपणाचे द्योतक आहे. नंतर तुम्ही किती निष्ठेने उत्तम दर्जाचे अन्न देता त्यावर तुमची पुढची मदार आहे. त्यामुळे तुमच्या भागाचे, तुमचे आडनाव/नाव दुकानाचे नाव म्हणून वापरा. पुढे ज्यूस सेंटर किंवा नाश्ता सेंटर असू द्या. उदा. "क्ष्क्षक्ष ज्यूस सेंटर". आता हे पटलं नसेल तर मी इतरत्र कुठेतरी दिलेली नावांची लिस्ट पाहा. आवडेल ते घ्या. खादाडी, मुदपाकखाना, खवय्या, बोटचाट, जिभल्याचाट, अरभाट, तर्री, वशाट, विळती, वदनी-कवळ-घेता, पोटभर, रांधण, पंगत, तडस, आग्रह, रस्सा, तोंडाला-पाणी, ढेकर, हुरडा, फोडणी, सरबराई, चव, गोग्रास, तीन दगड, आर, कालवण, फस्त, फराळ, न्याहारी, भूकलाडू-तहानलाडू, दशमी, शिदोरी, सांजोरी, आरोगण/ आरोगणा (लीळाचरित्रात खूपदा आढळतो , अर्थ: जेवण करणे) ओदन, कचक, चित्राहुती, हंडीबाग, अळका, गालदोडी, ताटशिंगार, जोग, तुंबडी, भुरका, खाणोरा, जावईजेवण

In reply to by हणमंतअण्णा शंक…

बाकी, तरुणाईला फॅन्सी नावं आवडतात असं म्हणणाऱ्यांसाठी सांगावेसे वाटते, 'पीटर मोमो सेंटर' येथे रोज शेकड्याने मोमोज फस्त केले जातात आणि खाणाऱ्यांचे सरासरी वय २५ असते. तरुणाई (फार घंताडा शब्द आहे) साठी परवडेबल असणं तरीही चवीला/दर्जाला/नगांमध्ये कोणतीही तडजोड नसणं एवढ्याच गोष्टी आकर्षित करतात.

"सेल्फी " पुण्यात "आम्ही पोहेकर" असे पोह्यांच्या प्रकाराचे हाॅटेल चालू झाले आहे.

छान. नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा प्रतिसाद वाचनीय आहेत. निशांत नाव चांगलं आहे तेच वापरा. निशांत कॅफे किंवा निशांत स्नॅक्स असं काहीतरी. वर आलेल्या सुचवणींपैकी कॉलेज कट्टा आणि झुंबड देखील आवडली.

आमच्या कॉलेज जवळ केस्टी'ज (आडनाव होतं मालकाचं त्यावरुन ठेवलं होतं.) म्हणून मिसळचं दुकान होतं. तसं तुम्ही खाडे'ज करु शकता (यात दोन अर्थ आहेत. ). बाकी खरंच कॅफे निशांत असं काहीसं साधंच नाव ठेवा फार काही वेगळं ठेवायला जाउ नका. वर कोठेतरी पुण्यातल्या ज्ञानप्रबोधिनिच्या समोरच्या गल्लीतील सुजन फूड्सचा उल्लेख आला आहे. मी तीथे सलग 4 वर्ष न चुकता नाश्ता केला आहे. हे एक छोटेसे दुकान आहे. हे पूर्णपणे महिलांद्वारे चालविले जाते. पोहे,उपमा, इडली, मेथी व आलू पराठा तसेच भाजणीचं व उपवासाचं थालीपीठ, यासोबत चटणी फुकट पण दही हवं असेल तर चार्जेस. पण चव, घटक पदार्थांचा दर्जा (तेल.इ. ) व स्वच्छता इतकी अप्रतीम व गरम गरम वाढणे असते, त्यामुळे पैसे जास्त गेले तरी तिथेच जायचे. लोकं बाहेर उभे असताता. दुपारी लिमिटेड लंच थाळी असते तसेच सकाळपासून पोळीभाजी तयार असते. ताक सदैव मिळते. तिथला चहा देखील दुधाचा (आलं किंवा वेलचीचा फ्लेवर नसलेला) घरातल्यासारखा मिळतो. माझ्यासारखेच वर्षानुवर्षे तिथलं गिऱ्हाईक होतं. सांगायचा मुद्दा हाच की पदार्थाची चव व स्वच्छताच मुख्य बाकी सगळे गौण आहे.

१. गीळ भिकारड्या २. पैसे दे नाहीतर भांडी घास ३. वसवसाट ४. बापाची कॄपा ५. पटपट खा ६. मुकाट गीळा ७. नम्रतेने वागा ८. ऑर्डर कॅन्सल होणार नाही ९. टाईमपास घरी करावा १०. आमचा दर्जा आमची काळजी ११. रानटी १२. भस्म्या १३. खाई त्याला खवखवे १४. आईच्या रेसीपीला बायकोची चव १५. उपकार (वर कोणीतरी म्हणाले नावात काय आहे? ते पटले म्हणून मग जरा वेगळी नावे सुचवली) अजून सुचली तर कळवतो. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

हा हा हा ...... लै भारी नावं पैजारबुवा ! यातलं कुठलाही नाव ठेवलं तर माझ्या तर्फे ९० मिली !

अरे बघा की राव तुमच्या हाटेलाच्या बारश्याकडे, १०० च्या वर प्रतिसाद आले, कमीतकमी चारपाचशे तरी नावे सजेस्ट झालीत, इतके बहुमोलाचे ;) सल्ले मिळालेत. निशांतमालक गप्पच. कुठले नाव आवडले ते सांगीनात, सुमडीत हॉटेल चालू करुन गल्ला सुरु केले की काय? कुपनाचे राहुद्या हो पण काय नाव फायनल केलाव ते तरी सांगा.

नाव काहीही ठेवा , गल्ल्यावर बसणाऱ्याचे टोपणनाव आण्णा पाहिजे. कारण नंतर कॉलेज ची मुले नाश्ता नेशन , चीजी बाईट , पोटभर वगैरे मध्ये ना जाता आण्णा कडे जातात . किंवा अण्णाकडे भेटतात, वाट बघतात . उधाऱ्या करतात आणि माया पण करतात

अथवा ब्रँडिंग वगैरे वगैरे करायचे नसेल तर "हॉटेल PUBG" हे त्या लोकेशनला उत्कृष्ट नाव आहे.

अंतिमतः -खाडे आहार भुवन -खाडे क्षुधाशांति भुवन -खाडे उपाहारगृह खाडे स्नॅक सेंटर (पुढे पूर्ण जेवण , थाळी सुरु करायचा बेत नसल्यास) -खाडे आरोग्य भुवन -खाडे विश्रांती भुवन -खाडे हॉटेल -खाडे फूड कॉर्नर -खाडे कॅन्टीन यांपैकी नाव उत्तम ठरेल. फॅन्सी नावांपेक्षा क्वालिटी आणि चव यांवरच पुढे भारी ब्रँड बनेल हे असंख्य उदाहरणं आठवून पटतं आहे. उलट नावावरच फार श्रम घेतलेत आणि चव सपक असं मत होऊ नये म्हणून साधं नाव असावं आणि पूर्ण फोकस चवीवर असावा (जी काळजी आपण घेतलीच असणार).

In reply to by गवि

सरळ मग 'खा-डे' असच ठेवा की खा मराठीत, डे विन्ग्लिशात. . ट्याग लाईन टाकायची "एव्हरीडे खा डे" . फक्त साप्ताहिक सुट्टी घेऊ नकात म्हनजे झालं. ;)

निशांत आरोग्यभुवन निशांत उपहारगृह फुडशेल्फ फुडीटेबल