✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दिवस तुझे ते ऐकायचे....

ह
हेमंतकुमार यांनी
Wed, 02/13/2019 - 07:25  ·  लेख
लेख
नमस्कार ! आज १३ फेब्रुवारी. आज एक विशेष ‘जागतिक दिन’ आहे. काय चमकलात ना? किंवा तुम्हाला असेही वाटले असेल, की हा माणूस लिहिताना एका दिवसाची चूक करतोय. कारण उद्याचा, म्हणजेच १४ फेब्रुवारीचा ‘प्रेमदिन’ बहुतेकांच्या परिचयाचा असतो. पण वाचकहो, मी चुकलेलो नाही. मी तुम्हाला आजच्या काहीशा अपरिचित दिनाचीच ओळख करून देत आहे. तर १३ फेब्रुवारी हा ‘जागतिक रेडीओ दिन’ म्हणून साजरा केला जातो. pict टीव्हीच्या आगमनापूर्वी रेडीओ या श्राव्य माध्यमाने आपल्यावर अधिराज्य केले होते. किंबहुना तो आपला जीवनसाथी होता. त्या काळात आपल्यातील अनेकांचे संपूर्ण शालेय जीवन हे रेडीओच्याच संगतीने पार पडले आहे. तेव्हा त्यावरील शांत बातम्या, माहिती, निवेदने, करमणुकीचे विविध कार्यक्रम आणि सुमधुर जाहिराती ऐकण्यासाठी आपले कान आसुसलेले असायचे. कुटुंबातील अनेकांच्या सकाळच्या आवरायच्या वेळा या रेडीओवरील कार्यक्रमांशी घट्ट निगडीत होत्या. घरातील ज्येष्ठ मंडळी त्यावरील पहाटेचा पहिला कार्यक्रम चुकवत नसत. तर कित्येक तरुण कुटुंबे ही विविध भारतीचा ‘बेला के फूल’ हा रात्रीचा शेवटचा गाण्यांचा कार्यक्रम ऐकल्यावरच झोपी जात. क्रिकेट आणि अन्य काही खेळांचे धावते समालोचन त्यावर ऐकणे हे रोमांचक व थरारक असे. घरातील वा मनगटावरील घड्याळांच्या अचूक वेळा या ‘रेडिओ-टाइम’नुसार लावल्या जात ! अनेक व्यावसायिकांना वा गृहिणींना आपले काम करता करता रेडीओची साथसोबत मोलाची वाटत असे; किंबहुना आजही वाटते. त्याकाळी एखाद्या कलाकाराची ओळख समाजात ‘रेडीओस्टार’ म्हणून करून देत असत आणि त्या व्यक्तीलाही त्याचे भूषण वाटे. माध्यमांच्या इतिहासात डोकावता रेडिओने दीर्घकाळ आपले ‘युग’ गाजवले. त्यानंतर टीव्ही, संगणक आणि आंतरजाल अशी दृक्श्राव्य माध्यमांची प्रगती झाली आणि ती आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग होऊन बसली. तरीसुद्धा आजही रेडीओवर प्रेम करणारे शौकीन बरेच आहेत. डोळ्यांना ताण नाही आणि आपले काम करतानाही तो ऐकता येणे ही त्याची वैशिष्ट्ये अबाधित आहेत. आजच्या टीव्हीवरच्या झगमगाटाशी तुलना करता तर रेडीओची ‘शांत’ प्रवृत्ती अधिकच भावते. किंबहुना गेल्या दोन दशकांत रेडीओने देखील कात टाकून श्रोत्यांना अधिक आपलेसे केले आहे. तर असे हे सुश्राव्य माध्यम विस्मरणात जाऊ नये म्हणूनच या जागतिक दिनाची संकल्पना पुढे आली. प्रथम ती २०११च्या ‘युनेस्को’च्या बैठकीत मांडली गेली. त्यानंतर २०१२ पासून दरवर्षी हा जागतिक दिन साजरा केला जातो. आता १३ फेब्रुवारी हाच दिनांक म्हणून का निवडला गेला? तर १३/२/१९४६ला संयुक्त राष्ट्रसंघाने (UN) आपली रेडीओ सेवा चालू केली होती, त्याची आठवण म्हणून. तर अशा या आजच्या दिनी सार्वजनिक स्तरावर काही कार्यक्रम साजरे होतीलच. माझा हा धागा काढण्याचा उद्देश आता सांगतो. आपल्या गतायुष्यातील रेडीओच्या कार्यक्रमांच्या अनेक आठवणी आपल्याजवळ असतील. त्यांची इथे उजळणी आपण करूयात. आजही आपल्यातील काहीजण दिवसाचे काही तास रेडीओ ऐकत असतील. पण आपण जरा पूर्वीच्या काळाचे स्मरणरंजन करूयात. विशेषतः तो काळ, जेव्हा ‘सरकारी रेडीओ’ हेच श्राव्य माध्यम लोकांसाठी उपलब्ध होते. त्याच्या जोडीला आजच्या सरकारी आणि खाजगी रेडीओ वाहिन्यांबद्दलही लिहायला हरकत नाही. आता थोडे ‘रेडीओ’ उपकरणांबद्दल. पूर्वी भला मोठा रेडीओ, मग ट्रांझिस्टर, खिशात मावणारा रेडीओ आणि आता मोबाईलमधले रेडीओ- अ‍ॅप अशी स्थित्यंतरे आपण पाहिली असतील. त्याच्या गमतीजमती देखील लिहा. कोणे एके काळी रेडीओ ऐकण्यासाठी सशुल्क सरकारी परवाना काढावा लागत असे. तसेच त्याचे वार्षिक नूतनीकरणही पोस्टात जाऊन करावे लागे. हे ऐकून आताच्या तरुणांना चक्क हसू येईल ! माझ्या आठवणीनुसार तो परवाना प्रकार १९८० –८२ दरम्यान मा. वसंत साठे हे केंद्रीय नभोवाणी मंत्री असताना रद्द करण्यात आला होता (चू भू दे घे). त्यानंतर खऱ्या अर्थाने रेडीओ-सेवा ही जनतेसाठी ‘फुकट’ उपलब्ध झाली. .... रेडीओ दिनानिमित्त सुरवातीस एक विचार मनात आला होता. तो म्हणजे १९७०-९० दरम्यानच्या माझ्या काही रेडीओच्या आठवणींचा एक लेख लिहावा. परंतु, नंतर लक्षात आले की त्याचा आवाका मोठा आहे आणि वैयक्तिक स्मरणशक्तीला मर्यादा आहेत. तेव्हा हा विषय माझ्या एकट्याच्याने पेलणे अवघड आहे. त्याऐवजी आपण सर्व इच्छुकांनी मिळून इथे स्मरणरंजन करावे हे उत्तम. .... तर असा आहे या धाग्याचा उद्देश. याचबरोबर या ‘आकाशवाणी’वरील माझे निवेदन संपले ! आता तुमच्या प्रतिसादांचे स्वागत. ********************************************* चित्र जालावरुन साभार.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
52123 वाचन

💬 प्रतिसाद (90)

प्रतिक्रिया

नाखु,

हेमंतकुमार
गुरुवार, 02/21/2019 - 09:45 नवीन
मनमोकळ्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! या धाग्याच्या निमित्ताने अनेक रेडीओप्रेमी लिहिते झाले आणि सर्वांचेच छान स्मरणरंजन झाले.
  • Log in or register to post comments

आकाशवाणी आणि बातम्या ..

वन
गुरुवार, 02/21/2019 - 10:15 नवीन
हिंदी बातम्यांचे अनभिषिक्त ‘दादा’ निवेदक होते देवकीनन्दन पान्डेय ! बघा हे आठवून.... "यह आकाशवाणी है अब आप देवकीनन्दन पान्डेय से समाचार सुनिये" त्यांनी तब्बल ४५ वर्षे बातम्या वाचल्या. तर इंग्लिश बातम्यांची ‘राणी’ म्हणजे लुतिका रत्नम. त्यांच्या खास इंग्लिश उच्चारांमुळे त्यांचे नाव नीट कळायला मला बराच काळ लागला. .... कुमारभाऊ, आठवणी संपायची चिन्हे नाहीत....
  • Log in or register to post comments

मला तर संस्कृत भाषेतील

नाखु
गुरुवार, 02/21/2019 - 12:02 नवीन
वार्तापत्र लख्ख आठवते. आकाशवाणी संप्रतित वार्ता शुयरतांन,प्रवाचक बलदेवा,आणि शेवटी इति वार्ता: असं काहीसं असायचं
  • Log in or register to post comments

बलदेवानंद सागरः

समीरसूर
Mon, 02/25/2019 - 11:15 नवीन
बलदेवानंद सागरः :-) "प्रधानमंत्री ने कहा हैं की हम देश की अखंडता बरकरार रखने के लिए हर कदम उठायेंगे..." "निकटतम प्रतिद्वंद्वी" हा निवडणूक असतांना नेहमी ऐकायला येणारा प्रकार होता. सुधा नरवणे स्टार होत्या त्या काळात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

खपल्या म्हणू नका हो ...

सुधीर कांदळकर
Sat, 02/23/2019 - 20:40 नवीन
आठवणींच्या आकर्षक रंगीबेरंगी कॅलिडोस्कोपची दुनिया उघडून दिली आहेत आपण. सूर्यजित सेन इंग्रजी बातम्या द्यायचे. १९७२च्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत त्यांनी इंग्रजीत आणि जसदेवसिंगनी वेगवान आणि बहारदार समालोचन केले होते. क्रिकेट न कळणार्‍या, अनाकर्षक वाक्यरचना करणार्‍या सुरेश सरय्यांनी मात्र अतीच पिळले. नंतर ते कमी झाले म्हणून की काय ते दूरदर्शनवरही आले. सेटलवाड, डिकी रत्नागर मात्र मजा आणत. नंतर त्याम्च्या जोडीला पिअर्सन सुरीता आले. बीबीसीवरचे ब्रायन जॉन्स्टन आणि जॉन आर्लोट. एबीसीवरचा ख्रिस्तोफर मार्टीन जेन्किन्स, पहिल्या टाय टेस्ट्चा साक्षीदार जॉन आर्लोटच होता. सॉलोमनचे थ्रो आणि आर्लॉटचे समालोचन, वाहवा! रविवारचे क्रिकेट विथ विजय मर्चन्ट, त्यांचे कॉलिन्ग अरूवा, त्यानंतरचे इन्स्पेक्टर ईगल, त्यामधले जबरदस्त साउंड इफेक्ट्स, सॅन्टोजिन की महफिलमधल्या आवाजांची वैशिष्ट्यपूर्ण जातकुळी आणि लकब, सारेच आठवावे. मुंबई ब आकशवाणीवरील शुक्रतारा गाणे भावसरगम मध्ये प्रथम सुधा मलहोत्रा आणि अरुण दातेंनी म्हटले होते. या कार्यक्रमात कवी स्वतः प्रथम गीताची ओळख करून देत असे. पाडगांवकरांचे शुक्रतारा गीत ओळख करून देणेही बहारदार होते. विंदांचे ’मागू नको सख्या, जे माझे न राहिले रे' मस्त होते. किती आठवू आणि किती नको असे झाले आहे. बहारदार लेखाबद्दल धन्यवाद. ता.क. सखी सहेली अजूनही चालू आहे. त्यातली ममता सिंगही अजून आहे.
  • Log in or register to post comments

बहारदार प्रतिसाद हो !

हेमंतकुमार
Sat, 02/23/2019 - 21:54 नवीन
सुधीर, धन्यवाद. तुम्ही बी बी सी च्या आठवणी सांगितल्या हे लै बेश. मी ते कधी ऐकले नव्हते. बांगला देश जेव्हा प्रथम आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू लागले तेव्हाचे समालोचन आठवते. त्यांचे आपल्याबरोबरचे पाहिले काही कसोटी सामने हे ‘अनधिकृत’ धरले जायचे. त्यात आपण त्यांचा धुव्वा उडवत असू. तेव्हाच्या शालेय वयात आम्हाला त्याचे काय कौतुक वाटायचे.
  • Log in or register to post comments

झुमरीतलैयासे ... फरमाईश....

वन
Sat, 02/23/2019 - 22:17 नवीन
आपकी फरमाइशमध्ये आपण कधी न ऐकलेल्या काही गावांची नावे चित्रविचित्र असायची. “खरंच, अशी गावे असतात का” असाही प्रश्न तेव्हा पडे. आज या धाग्याच्या निमित्ताने त्यातील दोन गावे मी जालावरून खात्री करून घेतली ! ती अशी: झुमरीतलैया (झारखंड). भाटापारा (छत्तीसगड) तेव्हा मी एकदा माझ्या मोठ्या बहिणीला विचारले होते की या कार्यक्रमात पुणे, मुंबई, बंगलोर अशा शहरांतून कोणीच फरमाइश पाठवत नसते का? त्यावर तिने असे स्पष्टीकरण दिले होते. मोठ्या शहरांत आपली आवडती गाणी ऐकण्यासाठी रेडीओ व्यतिरिक्त टेपरेकॉर्डर वगैरेच्या सोयी उपलब्ध असतात. पण अगदी लहान गावांत लोक गाणी ऐकण्यासाठी केवळ रेडीओवरच अवलंबून असतात.
  • Log in or register to post comments

आकाशवाणी .. संकीर्ण

चौकटराजा
Sun, 02/24/2019 - 09:57 नवीन
आकाशवाणी ...दत्ता कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे....... ललिता नेने , कुसुम रानडे , सदाशिव दीक्षित , सुधा नरवणे , शरद चव्हाण , गोपाळ मिरीकर, विजया जोशी ई ई दिस इज ऑल इंडिया रेडिओ ..द न्यूज रेड बाय .. बरून हालदार, पामेला सिंग, सुशील झवेरी , एम के धर्मराज , बी एम चक्रपाणी ,लतिका रत्नम ई ई सांप्रति वार्ता श्रुयंनतां .. प्रवाचक: बलदेवा आनंद सागर: ,,, विजयश्री ई ई . मराठीच विश्व .. जयराम कुलकर्णी , शोभा चितळे , उषा अरगडे , विजया जोशी , नीलम प्रभू , बाळ कुरतडकर, प्रभाकर जोशी , परशराम सामंत , नाना , हरबा, ताई, बंडा जोशी ई ई क्रिकेट क्रिकेट , -- विजय मर्चंट , फतेसिंग गायकवाड , अनंत सेटलवाड , केकी तारापोर, राजू भारतन , सुशील चतुर्वेदी , नरोत्तम पुरी , बाळ पंडित , सुरेशचंद्र नाडकर्णी , जसदेव सिंग ई ई कार्यक्रम -, आमचे आम्ही, बालोद्यान , संगीत सरिता, हवामहल, बेला के फूल , बिनाका.,कामगार सभा , आमची माती आमची माणसे , गुलदस्ता , प्रपंच , भूल बिसरे गीत, दो रंग दो पहलू दो गीत ,बाजार भाव,, मंगल प्रभात जयमाला , मन चाहे गीत . ई ई काही गावे .. झुमरी तालैय्या , राजानंदगाव ,करीम नगर, रतलाम , भाटा पारा , बल्लारशाह काही जाहिराती .. गं मग माक्याच तेल का लावत नाहीस ? ,,, लोमा टाइम ,,,,, डारकंस हेअर इफेक्टीव्हली , वॊशिंग पावडर निर्मा ,,, कालनिर्णय घ्याना ..... ई ई काही अविस्मरणीय सिग्नेचर ट्यून्स , शेतकरी मंडळ पुणे, गृहिणी मुंबई , बालोद्यान पुणे, हवामहाल दिल्ली , आपली आवड पुणे , आकाशवाणी ची सकाळ सुरुवातीची धुन . विविध भारतीची पहिली जाहिरात .. स्वीटेक्स
  • Log in or register to post comments

मस्त प्रतिसाद !

हेमंतकुमार
Sun, 02/24/2019 - 10:10 नवीन
@ वन, पण अगदी लहान गावांत लोक गाणी ऐकण्यासाठी केवळ रेडीओवरच अवलंबून असतात. >>>> बरोबर, आणि ३०-४० वर्षांपूर्वी तसेच असावे. सैनिकांसाठी जो ‘जयमाला’ कार्यक्रम सुरु झाला, त्याकाळी हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यांत पोचणारे रेडीओ हेच माध्यम असावे. @ चौरा, तुम्ही सुंदर ‘रेडीओपट’च उलगडला आहे. छान !
  • Log in or register to post comments

क्रिकेट क्रिकेट , -- विजय

ऋतुराज चित्रे
Sun, 02/24/2019 - 12:44 नवीन
क्रिकेट क्रिकेट , -- विजय मर्चंट , फतेसिंग गायकवाड , अनंत सेटलवाड , केकी तारापोर, राजू भारतन , सुशील चतुर्वेदी , नरोत्तम पुरी , बाळ पंडित , सुरेशचंद्र नाडकर्णी , जसदेव सिंग ई ई पहिले हिंदी क्रिकेट कॉमेंटेटर सुशील दोषींना विसरून कसे चालेल ? ... साफ आसमान, खुली हुई धूप, रह रह तक चलती हवा। ... गेंदने बल्लेका भीतरी किनारा लीया और ... बाल बाल बचे
  • Log in or register to post comments

मला वाटते ..

चौकटराजा
Sun, 02/24/2019 - 21:26 नवीन
माळा वाटते मला सुशील दोशीच म्हणायचे होते .......गेंद लुढकती अंडर की तराफा कट होती हुई ... पूरी तरहा चूके वाले तेच ना ,,,,,, ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋतुराज चित्रे

सुशील दोशी आणि रवि चतुर्वेदी.

अमेरिकन त्रिशंकू
Sat, 08/10/2019 - 00:57 नवीन
सुशील दोशी आणि रवि चतुर्वेदी. लाला अमरनाथ पण एक्स्पर्ट कॉमेंटरी करायचा. रॉजर बिन्नी ला रॉजस बिन्नी म्हणायचा. आणि सारखं मोहिन्दर आणि सुरिन्दर अमरनाथचं कौतुक करायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

+१

वन
Sun, 02/24/2019 - 13:03 नवीन
सुशील दोशी>>>> अरे, अगदी मस्त आठवण काढलीत !एकदम सही. बाकी ते विंग्रजी समालोचन चालू असताना मध्ये मध्ये ‘expert comments by…’ असा व्यत्यय असायचा. त्यातले काही तज्ञ बरे असायचे. पण, लाला अमरनाथ मात्र बोअर मारायचे. मला तो छान चाललेल्या समालोचनातील रटाळ व्यत्यय वाटायचा.
  • Log in or register to post comments

सुशील दोशी>>>> अजुन एक आठवण.

मराठी_माणूस
Sun, 02/24/2019 - 14:35 नवीन
सुशील दोशी>>>> अजुन एक आठवण. दिवसाच्या शेवटी हमखास येणारे एक वाक्य "सुरज ढलता हुआ और लंबी होती हुई खिलाडीयोंकी परछाईंया"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वन

वाचकांच्या आठवणींचा

हेमंतकुमार
Sun, 02/24/2019 - 14:27 नवीन
पट उलगडतोच आहे तर अजून एक सांगण्याचा मोह होतोय. आठवण आहे १९७१च्या भारत-पाक युद्धादरम्यानची. आम्ही मुले शालेय वयात. तेव्हा रेडीओवर युद्धाची वार्तापत्रे प्रसारित होत. त्यातली काही हिंदी तर काही इंग्लिशमधून. त्याचे प्रसारण सुरु झाले की घरतील सर्व वडीलधारे रेडीओपुढे जमत आणि अगदी कान लावून ऐकत. माझ्या आजोबांना हिंदी थोडे तर इंग्रजी बिलकुल समजायचे नाही. मग ते वार्तापत्र संपले की माझे काका आजोबांना त्याचा गोषवारा नीट मराठीत सांगत. मग ते अगदी समाधानी दिसत. आम्हा मुलांना मात्र त्या वयात युद्धाचे गांभीर्य तितकेसे समजत नव्हते.
  • Log in or register to post comments

आणखी एक ,,,,,

चौकटराजा
Sun, 02/24/2019 - 21:27 नवीन
बॉबी तल्यार खान !!
  • Log in or register to post comments

काही अविस्मरणीय सिग्नेचर

ऋतुराज चित्रे
Mon, 02/25/2019 - 07:52 नवीन
काही अविस्मरणीय सिग्नेचर ट्यून्स कामगार विश्वची सिग्नेचर ट्यून हुरहूर लावायची, शाळेत निघायची तयारी करावी लागायची. सुरवातीला दूरचित्रवाणी आकाशवाणीचा लोगो आणि सिग्नेचर ट्यून वापरायचे. विविध भारतीची पहिली जाहिरात .. स्वीटेक्स स्वीटेक्स? साल सांगू शकाल का ? अवांतर : दरदर्शनची पहिली दृष्य-श्राव्य जाहिरात .. पॉइंट डिर्टजन पावडर .
  • Log in or register to post comments

रेडीओची एरिअल

हेमंतकुमार
Mon, 02/25/2019 - 08:06 नवीन
आठवतेय का कुणाला? व्हाल्वच्या रेडीओच्या काळात ही असायची. पावसाळ्यात रेडीओ-प्रसारण नीट ऐकू येत नसे. मग रेडीओपासून एक धातूची तार जोडून पुढे ती गच्चीवर नेली जाई. तिथे त्याला जाळीसारखे काहीतरी जोडलेले असे. कधी वादळ व जोराच्या पावसात तेही तुटून जाई. मग ते दुरुस्त करत बसा. पुढे ट्रांझिस्टर आल्यावर त्याचीच अंगभूत एरिअल आली आणि हे सगळे प्रकार संपले.
  • Log in or register to post comments

आठवतंय की , रेडिओची पीन उलटी

ऋतुराज चित्रे
Mon, 02/25/2019 - 08:17 नवीन
आठवतंय की , रेडिओची पीन उलटी ( टू पिन ) लागल्यास त्या पितळी जाळीला शॉक बसायचा. जाळी खराब झाल्यास आम्ही तांब्याच्या भांड्यात मिठाचे पाणी घालून त्यात एरियल ची तार बुडवून ठेवायचो,त्यामुळे रेडिओ सिग्नल व्यवस्थीत पकडायचा. रेडिओ मॉस्को तर बीबीसी सारखं खणखणीत ऐकू यायचे.
  • Log in or register to post comments

सापाच्या कातीसारखी असायची ती

ऋतुराज चित्रे
Mon, 02/25/2019 - 08:19 नवीन
सापाच्या कातीसारखी असायची ती रेडियोची लांब जाळी.
  • Log in or register to post comments

MW, SW-१ &२..

वन
Mon, 02/25/2019 - 09:41 नवीन
@ ऋतुराज, आम्ही तांब्याच्या भांड्यात मिठाचे पाणी घालून त्यात एरियल ची तार बुडवून ठेवायचो >>>>> हे प्रकार भारीच आहेत! माहिती नव्हते. एरियलचा प्रयोग आम्ही होस्टेलला असताना केलेला आहे. जवळ छोटा ट्रांझिस्टर असायचा. बरेचदा त्याला खरखर व्हायची. मग लांब वायर आणून हा उद्योग करायचा. रेडीओमधील स्टेशन्स ३ bands मध्ये विभागली असायची: MW, SW-१ &२. साधारण गृहिणी व मुले यांचे काम MW (पुणे, मुंबई – अ व ब, विविध भारती इ.) यात भागायचे. संध्याकाळी वडील, काका ही मंडळी band बदलून SW वर जायची .तिथे मग BBC आणि इतर विदेशी स्टेशन्स लागत. Band बदलण्यासाठी रेडीओच्या बाजूस एक चक्राकार खटका असायचा. त्याला मुलांनी हात लावायचा नाही, अशी सक्त ताकीद असायची.
  • Log in or register to post comments

छान लेख आणि आठवणी!

शब्दबम्बाळ
Mon, 02/25/2019 - 11:27 नवीन
छान लेख आणि आठवणी! धागा शीर्षक वाचून, आधी वाटलं मन कि बात वगैरे आहे कि काय?! ;) तिकडे पण नुसतं ऐकायलाच लागतं... सारेगम कारवा हा रेडिओ कम म्युसिक प्लेयर आहे आत्ता, छान दिसतो पण महाग आहे जरा. Image removed.
  • Log in or register to post comments

मस्तच !

हेमंतकुमार
Mon, 02/25/2019 - 11:44 नवीन
शब्दबम्बाळ, धन्यवाद. एकदम कडक फोटू आहे राव ! मस्त. मन कि बात वगैरे आहे कि काय?! ;) तिकडे पण नुसतं ऐकायलाच लागतं...>>>> अहो, या धाग्यावरचे ‘ऐकणे’ एकदम सुमधुर आहे !
  • Log in or register to post comments

वॉव

अभ्या..
Mon, 02/25/2019 - 11:53 नवीन
आकाशवाणी भारीच, विशेषतः सोलापूर मिरज सारख्या भागात आकाशवाणी गुलबर्गा वगैरे ऐकायचे. सांगली आकाशवाणी गाण्यांच्या कार्यक्रमासाठी छान होती. त्यांच्या अ‍ॅडस पण छान असायच्या. राधिकाची वस्त्रे छान, रतीमदनाची शान, सपट आणि डीएस चहा, शिवाय खडे बाजार बेळगावच्या काही रेडीमेडच्या जाहिराती सतत असायच्या. सोलापूर आकाशवाणीचे फोन फर्माईश वगैरे तर इतके फेमस होते की नकलाकार दीपक देशपांडेंनी त्याचा वापर कार्यक्रमातील किश्श्यांसाठी केला आहे. सोलापूरच्या आकाशवाणीने तयार केलेल्या "अय्या मंजू हा लग्नातला शालू व्ही आर पवारकडून घेतलेला का?" अशा जाहिराती अजुनही एफेमचॅनलवर आणि एसटी श्टँडवर वाजवल्या जातात. पुणे आकाशवाणीचे शेतिविषयक कार्यक्रमातील टिपिकल बोजड शब्द आणि कृत्रिम भाषा मजेदार असायची. त्यानंतरचे बाजारभाव "पुणेकृषिउत्पन्नबाजारसमितीकडूनआलेलेआजचेशेतीमालाचेभाव" ऐकायला मज्जा यायची. कांदा लासलगाव, निफाड, तूर बार्शी, नारळ कुंभकोणम असले शब्द रेग्युलर रिपिट असायचे. त्यातच फुलांचे पण भाव साम्गितले जात. दिवाळीत पहाटे हमखास किर्तन असायचे. कधितरी बटने फिरवून पाहायच्या प्रयोगात रेडीओ मास्को वगैरे स्टेशने सापडलेली होती. एका पॉप स्टेशनावरचे "पास द डॉचा पॉला" हे गाणे बरीच वर्षे डोक्यात राह्यलेले होते. ते नंतर दुसरीकडे कुठेही इअकायला मिळाले नाही. डायरेक्ट यु ट्युबवरच ऐकायला मिळाले. एफेमच्या स्पर्धेत खरेतर आकाशवाणीला फुल्ल वाव होता, नेटवर्क आणि माणसे होती, सरकारी ग्यारंटी होती. अनुभव होता. (बर्‍याचशा एफेम चॅनलचे रिसिव्हर अजुन आकाशवाणीच्या सेटपवरच आहेत) पण प्रायव्हेट एफेमसारखा कंटीन्युअस टकळी चालवायचा धंदा सरकारी आकाशवाणीला नीटसा जमला नाही हेही तितकेच खरे.
  • Log in or register to post comments

छान आठवणी . सांगली

सिरुसेरि
Mon, 02/25/2019 - 21:40 नवीन
छान आठवणी . सांगली आकाशवाणीवर बुधवारी रात्री आवडत्या मराठी गीतांचा "आपली आवड" हा कार्यक्रम असे . यामधे बरेचदा माननीय बकुल पंडीत यांनी गायलेले "उगवला चंद्र पुनवेचा" हे सुरेल नाट्यगीत लागत असे . रात्रीच्या शांत , धीरगंभीर वातावरणात हे सुमधुर गाणे ऐकण्यात वेगळीच जादु असे .
  • Log in or register to post comments

समारोप

हेमंतकुमार
Tue, 02/26/2019 - 12:41 नवीन
जागतिक रेडीओ दिनाच्या निमित्ताने केलेल्या या धाग्यातील आवाहनास आपण सर्वांनी मनमोकळे प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार ! टीव्हीपूर्व काळातील रेडीओ-कार्यक्रम, बातम्या, निवेदक, गायक, क्रीडा समालोचक, जाहिराती आणि विविध केंद्रांची खास वैशिष्ट्ये या सगळ्यांचा छान उहापोह झाला. रेडीओ-उपकरणातील स्थित्यंतरे, परवाना व त्याचे नूतनीकरण, एरीअल व त्याचे प्रयोग आणि रेडीओच्या संगतीत केलेला अभ्यास आणि त्याच्याशी निगडीत दिवसाचे वेळापत्रक याही गोष्टींच्या आठवणी सुखद होत्या. आजही आपल्यातील काही जण टीव्हीपेक्षा रेडीओचेच शौकीन आहेत; तो त्यांना मोलाचा सोबती वाटतो. सर्व रेडीओप्रेमींना त्याचे श्रवणसुख असेच मिळत राहो, या सदिच्छेसह आपला निरोप घेतो.
  • Log in or register to post comments

क्या बात! सुंदर विषय आणि तितकेच सुंदर प्रतिसाद

टर्मीनेटर
Wed, 02/27/2019 - 18:47 नवीन
क्या बात! सुंदर विषय आणि तितकेच सुंदर प्रतिसाद... प्रत्येक प्रतिसाद वाचायला जी मजा आली ती शब्दातीत आहे.
  • Log in or register to post comments

टर्मिनेटर,

हेमंतकुमार
Wed, 02/27/2019 - 19:50 नवीन
टर्मिनेटर, तुमचा प्रतिसादही सुंदर ! त्यामुळे आता हा धागा सुफळ संपूर्ण झाला असे म्हणतो.
  • Log in or register to post comments

आकाशवाणी वरील

हेमंतकुमार
गुरुवार, 07/11/2019 - 10:48 नवीन
प्रसिद्ध माजी इंग्रजी वृत्तनिवेदक बरुण हालदार यांचे नुकतेच निधन झाले. रेडिओ वर इंग्रजी बातम्या वाचण्यात त्यांचा हातखंडा होता. भाषेच्या शुद्धतेविषयी ते आग्रही असत. अनेक सहकाऱ्यांना त्यांनी त्यांच्या तालमीत तयार केले. श्रद्धांजली !
  • Log in or register to post comments

आकाशवाणी वरील

हेमंतकुमार
Fri, 08/09/2019 - 21:51 नवीन
माजी क्रिकेट समालोचक श्री. अनंत सेटलवाड यांचे नुकतेच निधन झाले. इंग्रजीवर विलक्षण प्रभुत्व आणि शब्दांचा अफाट संग्रह ही त्यांची खासियत होती. श्रद्धांजली !
  • Log in or register to post comments

माझ्या लहानपणी एक खिशात मावेल

बाप्पू
Sat, 08/10/2019 - 11:50 नवीन
माझ्या लहानपणी एक खिशात मावेल इतका रेडिओ ट्रान्सिस्टर मिळायचा फक्त 100 रुपयांमध्ये. त्याला छोटा अँटेना देखील असायचा. त्यामध्ये मग विविध भारती वरील कार्यक्रम, आणि लोकल आकाशवाणी वरील कार्यक्रम ऐकायचो. विशेष करून हॅलो फर्माईश आणि आपली आवड हे दोन कार्यक्रम कधी चुकवत नसे. आज कोणतेही गाणे किंवा कार्यक्रम एक सेकंदात शोधून ऐकता व पाहता येतो पण त्यावेळेला एक गाणे लागले मग ते कोणतेही असो, सर्व कामे सोडून ते ऐकत बसायचो. त्यात जी मजा होती ते मी आत्ता शब्दात सांगू शकत नाही. तो रेडिओ छोट्या सेल वर चालायचा. 10 रुपयाला 4 सेल मिळायचे आणि एकदा बदलले कि मग 5-6 दिवस तरी चालायचे. त्या वेळी लोक सेल ला "मसाला" असे म्हणायचे. सेल संपले कि आम्ही ते फेकून न देता घराच्या छतावर ठेवायचो, उन्हाने तापले कि मग पुन्हा के काही वेळ चालायचे. रेडिओ खराब झाला कि मग त्याला नीट करने देखील हळू हळू जमू लागले. पण तो नीट होण्याच्या पलीकडे गेला असेल तर मग त्याचे पार्ट जसे कि अँटेना, साऊंड, लोहचुंबक इ. काढून जमा करून ठेवायचे. सायकल आणि रेडिओ यांचेदेखील अतूट नाते होते. सायकल ला तो छोटासा रेडिओ ट्रान्सिस्टर तारेने बांधून फुल्ल आवाज करून आपल्या सायकल वर देखील म्युजिक सिस्टिम असल्याचा फील आम्ही घ्यायचो. आज कार मध्ये हजारो रुपयांची म्युजिक सिस्स्टम आहे पण लहानपणीच्या सायकल + रेडिओ कॉम्बिनेशन ला जी मजा आणि आनंद होता तो आज नाही...
  • Log in or register to post comments

आकाशवाणी म्हणावी तितकी कधी ऐकलीच नाही. :(

हर्मायनी
Sat, 08/10/2019 - 12:00 नवीन
जगात जरा उशिरा पदार्पण केल्यामुळे आकाशवाणी म्हणावी तितकी कधी ऐकलीच नाही. :( पण इतकं आठवतंय कि लाइट गेले कि बाबा कॉमेंटरी रेडिओवर ऐकायचे. बाकी आजी आणि बाबांकडूनच रेडिओच्या गोष्टी ऐकल्या आहेत. आणि आता मोठं झाल्यावर FM च ऐकत आलो. हे सगळं वाचून काहीतरी मोठं मिस झाल्यासारखं वाटतंय.. :(
  • Log in or register to post comments

मस्त !

हेमंतकुमार
Sat, 08/10/2019 - 12:20 नवीन
बाप्पू आणि हर्मायनी, प्रतिसाद आवडले.
* तर मग त्याचे पार्ट जसे कि अँटेना, साऊंड, लोहचुंबक इ. काढून जमा करून ठेवायचे. * आज कार मध्ये हजारो रुपयांची म्युजिक सिस्स्टम आहे पण लहानपणीच्या सायकल + रेडिओ कॉम्बिनेशन ला जी मजा आणि आनंद होता तो आज नाही...
+ १११११
  • Log in or register to post comments

निधन...

हेमंतकुमार
गुरुवार, 05/28/2020 - 07:50 नवीन
विविध भारतीवरील माजी लोकप्रिय उद्घोषक गोपाल शर्मा यांचे नुकतेच निधन झाले. एकेकाळी त्यांचा ‘आवाज की दुनिया के दोस्तों’ हा कार्यक्रम रेडिओ सिलोन’वर गाजला होता. आदरांजली !
  • Log in or register to post comments

आणीबाणी...

हेमंतकुमार
गुरुवार, 06/25/2020 - 08:13 नवीन
आज पेपर चाळताना पंचेचाळीस वर्षांपूर्वीची एक आठवण एकदम ताजी झाली. रात्री आठच्या बातम्या रेडीओवर ऐकत होतो. त्यात तत्कालीन राष्ट्रपतींनी देशात आणीबाणी जाहीर केल्याचे सांगितले. त्याचबरोबर इंदिरा गांधींची निवड अलाहाबाद उच्च न्यायालयाने रद्द ठरवली, अशी पण एक बातमी होती. त्या शाळकरी वयात “आणीबाणी’, “अवैध” या शब्दांचे अर्थ ही फारसे समजत नव्हते. ते पावसाळ्याचे दिवस. त्यामुळे रेडीओ वर खरखर पण खूप होती. पण घरातील सगळे अगदी कान लावून ते ती बातमी ऐकत होते.
  • Log in or register to post comments

वा मस्त..

गणेशा
गुरुवार, 06/25/2020 - 13:32 नवीन
वा मस्त.. गेल्या वर्षीच. मी नविन रेडिओ आणला.. मस्त जुन्या आठवणी.. --- शाळेत जाताना नेहमी 11 वाजता गाणे लागायचे.. अगं मैना, तुला जोडीनं <गावाचे नाव > फिरवीन.. सकाळच्या 7 च्या बातम्या मध्ये -- अरे रामय्या घराला आणि गोठ्याला कुठले छप्पर.. आणि फिनोलेक्स ने आणले पाणी.. क्रिकेट समालोचन जबरदस्त.. भुले बिसरे गीत.. जयमाला क्या कहना.. बुधवारी मला वाटते संध्याकाळी कीर्तन लागायचे.. आवडायचे मला.. नंतर नंतर, फोन करून फर्माईश मध्ये बहुतेक कमल शर्मा होते का.. गाण्या ऐवजी ते जे लोकांशी बोलायचे तेच आवडायचे.. त्याच बरोबर.. आपकी फर्माईश मध्ये, पंजाबसे रोशन फलाना ऐकून मज्जा यायची.. मस्त दिवस...
  • Log in or register to post comments

काय आठवण काढलीस गणेशा...

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 06/25/2020 - 14:50 नवीन
कसला विचार करतोस रामय्या? घराला आणि गोठ्याला कुठले छप्पर लावावे तेच कळत नाही. अरे चार मिनार अ‍ॅसबेस्टॉस सिमेंटचे पत्रे विकत घे, माझ्या अजोबांनी घराला बसवलेले हे पत्रे अजूनही शाबूत आहेत अरे खरच की, मी ही चार मिनार अ‍ॅसबेस्टॉस सिमेंटचे पत्रे घेउन येतो चारमिनारचे पत्रे टिकाऊपणा आणि उत्तम दर्जासाठी प्रसिद्ध आहेत. घर, शाळा आणि गोदामासाठी चारमिनारचे पत्रे वापरा प्रत्येक शहरात चारमिनारचे विक्रेते आहेत. चार मिनार भारतातील सर्वाधिक विक्री असलेलं अ‍ॅसबेस्टॉस सिमेंट उत्पादन ... झुळझुळ वाणी, खेळवा पाणी, आणायच कूणी? सांगतो राणी... रीजिड पिव्हीसी फिनोलेक्स पाईप अजोड अमोल दर्जेदार मळे बहरतिल हिरवे गार शास्त्र नको, शास्त्री नको इंजिनियर मिस्त्री नको फिनोलेक्स पाईप जोडावे खळखळ पाणी सोडावे फिनोलेक्स, फिनोलेक्स ने आणले पाणी शेत पिकली सोन्यावाणी फिनोलेक्स पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

होय ,

हेमंतकुमार
गुरुवार, 06/25/2020 - 13:58 नवीन
बहुतेक कमल शर्मा होते का..>>> बरोबर तेच ते ! श्रवण शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

युद्ध वार्तांकन

हेमंतकुमार
गुरुवार, 12/09/2021 - 13:23 नवीन
टीव्हीपूर्व काळामध्ये आकाशवाणीच्या युद्ध वार्तांकनाला खूप महत्त्व होते. 1971च्या भारत-पाक युद्धामध्ये आकाशवाणीच्या परदेश विभागातील एक संचालक यु एल बरुवा यांनी त्या युद्धाचे सुरेख रेडीओ वार्तांकन केले होते. त्या सर्व वृत्ताचे संकलन करून एक इंग्लिश पुस्तक आता प्रकाशित झालेले आहे: A Bangladesh war commentary : 1971 radio dispatches U L Baruah
  • Log in or register to post comments

अमीन सायानी : नाबाद ९० !

हेमंतकुमार
Tue, 12/20/2022 - 11:51 नवीन
प्रख्यात निवेदक अमीन सायानी उद्या, २१ डिसेंबर २०२२ रोजी ९०व्या वर्षात पदार्पण करताहेत. त्या निमित्ताने त्यांच्यावरील विशेष लेख सुरुवातीला सायानी रेडिओच्या हिंदी निवेदकाच्या परीक्षेत चक्क अनुत्तीर्ण झाले होते! कारण त्यांची वाचनाची शैली चांगली होती, पण हिंदी उच्चारणात गुजराती आणि इंग्रजी भाषांचा प्रभाव होता. त्यांना शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा