होमिओपॅथी : उपचार की फसवेगिरी ?
आपल्या आजूबाजूला बरेच लोक ॲलोपॅथी ऐवजी होमिओपॅथी नावाची उपचारपद्धती अवलंबताना दिसतात आणि बरेच लोक या पद्धतीचे समर्थन देखील करताना दिसतात. या करिताच हा लेखाचा प्रपंच. तुम्ही जरी होमिओपॅथीचे समर्थक असाल तरी हा लेख पूर्ण वाचावा अशी विनंती आहे.
इ.स. १७९६ साली सॅम्युअल हानेमन (Samuel Hahnemann) या जर्मन व्यक्तीने होमिओपॅथीची सुरुवात केली. एखाद्या निरोगी व्यक्तीमध्ये जर एक विशिष्ट घटक (उदा. एखादे रसायन) व्याधी तयार करत असेल तर तोच घटक ती व्याधी झालेल्या व्यक्तिला निरोगी बनवू शकते अशी (अजब!) होमिओपॅथीची पहिली समजूत आहे. थोडक्यात "क्ष" या घटकामुळे ताप येत असेल, तर तापावर ऊपचार म्हणूनही "क्ष"हाच घटक वापरायचा. हानेमनने ही समजूत कोणताही वैज्ञानिक पद्धती न वापरता स्वत:च्या लहानश्या अनुभवावरून ठरवली होती, आणि त्यानंतरही आजतोपावेतो कोणालाही ही समजूत वैज्ञानिक साच्यात बसेल अशा पद्धतीने सिद्ध करता आलेली नाही. मात्र बऱ्याच लोकांचा याला प्रचंड पाठींबा आहे असे आम्हाला दिसून आले आहे. काट्याने काटा निघतो किंवा विषच विषाला बरे करते असा सरळधोपट तर्क हे लोक मांडतात. हा न्याय जर सगळ्या बाबतीत सत्य आहे असे मानायचे असेल तर मग विष प्यायलेल्या व्यक्तिला अजून विष पाजून बरे करता यायला हवे! विज्ञान अशा विचित्र कल्पनांवर चालत नाही. एवढे मोठे जहाज पाण्यात बुडत नाही तर मग एखादा छोटा दगड कशाला बुडेल हा तर्क जितका हास्यास्पद आहे तेवढाच हास्यास्पद होमिओपॅथीचा हा दावा आहे (जहाज बुडत नाही आणि दगड बुडतो याचे कारण सुद्धा विज्ञानातील सखोल आणि संख्यात्मक विवेचन करून द्यावे लागते. केवळ गुणात्मक (Qualitative) तर्कवादाला विज्ञानात जवळपास काहीही किंमत नाही.)
आधुनिक वैद्यकशास्त्रात काही प्रकारच्या सूक्ष्मजीवाणुंमुळे (Bacteria) होणाऱ्या आजारांवर औषध म्हणून प्रतीजैविके (Anti-biotics) वापरली जातात, ज्यामध्ये रक्तातील पांढऱ्या पेशींचे प्रमाण वाढवण्यासाठी मृतप्राय झालेले सूक्ष्मजीवाणूच औषध म्हणून वापरले जातात. तसेच लहान मुलांना पोलिओ किंवा देवीच्या लसी दिल्या जातात त्यामध्येही लहान वयातच रोगांविरुद्ध प्रतिकारशक्ती तयार व्हावी म्हणून त्याच (किंवा त्याच्या सारख्या) रोगांच्या मृतप्राय जंतूचे जैविक द्रावण लस म्हणून दिले जाते (शाळेत ऐकलेली एडवर्ड जेन्नरची कथा आपल्याला आठवत असेलच). अर्थातच आधुनिक वैद्यकशास्त्रातील या दोन्ही गोष्टी विज्ञानातील सर्व प्रकारच्या काटेकोर कसोट्यांवर तपासल्या गेलेल्या आहेत, आणि जे आजार सूक्ष्मजीवाणुंमुळे होत नाहीत त्यासाठी या पद्धती औषध म्हणून चालतही नाहीत. होमिओपॅथीमध्ये मात्र मूतखड्यापासून ते मधुमेहा पर्यंत सर्वच आजारांवर बेधडकपणे "काट्याने काटा काढावा" ही विक्षिप्त समजूत वापरली जाते. होमिओपॅथीचे व्यावसाईक त्यांच्या समर्थनार्थ सतत आधुनिक विज्ञानातील लसीकरणाचा आणि प्रतिजैविकांचा हवाला देत असतात. एवढेच नव्हे तर पाश्चात्य देशांतील बरेच होमिओपॅथीचे व्यावसाईक लसीकरणाला विरोधही करतात! आता होमिओपॅथीसारख्या थोतांडावर विश्वास ठेवून आपल्या मुलांचा बळी द्यायचा की नाही हे ज्याचे त्याने ठरवावे. परंतू खरी गमतीची बाब अशी, की "लसीकरणाची कार्यपद्धती" ही एकमेव वैज्ञानिक गोष्ट थोडीफार होमिओपॅथीच्या समजुतीच्या जवळ जाते, आणि तीला सुद्धा बऱ्याच पाश्चात्य होमिओपॅथी व्यावसाइकांचा विरोध आहे. स्वत:च्या हाताने स्वत:च्याच पायावर धोंडा मारून घेण्याचे यापेक्षा चांगले उदाहरण कोठे मिळेल?
पोटेन्सी म्हणजे काय?
मात्र होमिओपॅथीची दुसरी समजूत याहीपेक्षा कितीतरी पटीने विचित्र आहे. ही समजूत बनवण्या पाठीमागे सुद्धा हानेमानची एक मजेशीर अंधश्रद्धा होती, परंतू या लेखापुरती आपण ती बाजूला ठेऊयात आणि ती समजूत काय आहे यावर लक्ष केंद्रित करूयात. या समजूतीनुसार, होमिओपॅथीचे औषध जसेच्या तसे दिले तर त्याचा परिणाम होत नाही किंवा उलट परिणाम होतो आणि त्यामुळे हे औषध नेहमी विरल करून, म्हणजे पाण्यात किंवा अल्कोहोलमध्ये अत्यंत कमी प्रमाणात टाकून दिले जावे. जेवढे औषध जास्त विरल तेवढा त्याचा परिणाम अधिक अशी महाअजब समजूत असल्यामुळे होमिओपॅथीचे कोणतेही औषध अत्यंत सौम्य करून मगच रूग्णाला देण्याची पद्धत आहे. या विरलीकरणाचीही एक विशिष्ट पद्धत आहे. यामध्ये मूळ औषधाचा अतिशय छोटासा अंश बऱ्याच जास्त पाण्यात (किंवा अल्कोहोलमध्ये) टाकला जातो, आणि व्यवस्थित ढवळून ते औषध साबुदाण्यांसारख्या दिसणाऱ्या साखरेच्या गोळ्यांवर टाकून रुग्णाला दिले जाते.
होमिओपॅथीची औषधे किती विरल असतात हे समजण्याकरिता आपण, जेम्स रॅंडी नावाच्या विज्ञानअभ्यासकाने केलेली एक सोपी आकडेमोड समजाऊन घेऊ. होमिओपॅथीच्या औषधांच्या बाटल्यांवरती १००C, २००C अश्या संख्या लिहिलेल्या असतात. या संख्या त्या औषधाची पोटेन्सी म्हणजेच परिणामकारकता दर्शवतात. आता ठराविक पोटेन्सीचे होमिओपॅथीचे औषध तयार करण्याची पद्धत साधारणपणे अशी आहे :
एक भाग औषधी घटक घ्यायचा आणि तो ९९ (नव्व्याण्णव) भाग पाण्यात (किंवा अल्कोहोलमध्ये) टाकायचा आणि नीट ढवळायचा. हे झालं फक्त १C चं औषध. म्हणजे १C च्या औषधा मध्ये प्रत्यक्षात औषधाचे प्रमाण असते १:१०० (शंभरात एक भाग). म्हणजेच होमिओपॅथीच्या, १C पोटेन्सीच्या १०० साखर-गोळ्या खाल्या की पोटात गेलेले एकून औषध फक्त एका गोळी एवढे असेल !
आता या १C औषधाचा एक भाग घ्यायचा आणि तो ९९ भाग पाण्यात टाकायचा, की तयार झालं केवळ २C चं औषध. यात औषधाचे प्रमाण असेल १:१०००० (एक भाग औषध नऊ हजार नऊशे नव्व्याण्णव भाग पाणी किंवा अल्कोहोल).
अश्याच पद्धतीने तयार केलेल्या २२C च्या औषधात औषधाचे प्रमाण असेल १:१०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००० !. म्हणजेच साधारण १ थेंब औषध आणि "एकावर चव्वेचाळीस शून्ये" एवढे थेंब पाणी किंवा अल्कोहोल ! हे प्रमाण किती कमी आहे हे समजण्यासाठी एक सोपी तुलना करू:
पृथ्वीवरच्या सर्व समुद्रांत आणि महासागरांत मिळून पाणी आहे साधारण १०००००००००००००००००० (एकावर अठरा शून्ये) इतके लिटर. म्हणजे पृथ्वीवरील पाण्यामध्ये एकूण रेणू (पाण्याचा रेणू म्हणजे पाणी ज्या कणांचे बनलेले आहे तो कण) आहेत जवळपास १०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००० (एकावर चव्वेचाळीस शून्ये). एका पाण्याच्या थेंबात साधारण १०००००००००००००००००००० (एकावर २० शुन्ये) इतके रेणू असतात. याचा अर्थ असा होतो की जर आपण जर पृथ्वीवरील संपूर्ण समुद्रात मिळून औषधाचा एक थेंब (हो फक्त एक थेंब!) टाकला आणि सगळे समुद्र व्यवस्थित ढवळून घेतले आणि मग त्यातली एक बाटली पाणी घेतले तरी होमिओपॅथीच्या मते हे अतिशय तीव्र औषध (२२C पोटेन्सीच्या १०००००००००००००००००००० पट तीव्र!) असेल आणि याला अजून बरेच विरल केल्याशिवाय घेता येणार नाही! म्हणजेच २२C चे होमिओपॅथीच्या औषध इतके विरल असते की औषधाचा फक्त एक रेणू पोटात जाण्यासाठी अगस्ती ऋषींच्या आख्यायिकेप्रमाणे सर्वच समुद्रांचे पाणी पिऊन टाकावे लागेल. साध्या नळाचे पाणी जरी एक पेला भरून प्यायले तरी यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात रसायने व क्षार पोटात जातात.
आता हीच पद्धती आणखी पुढे नेऊन ४०C चे औषध तयार केल्यास औषधाचे प्रमाण किती असेल? तर ते असेल एक भाग औषधाला १०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००० (एकावर ऐंशी शून्ये) एवढे भाग पाणी! या संख्येच्या प्रचंडपणाचा अंदाज येण्यासाठी, हा प्रश्न विचारतो, सबंध विश्वातल्या अणूंची संख्या किती आहे? तर तीही आहे "एकावर ऐंशी शून्ये". ४०C मध्येच औषधाचे प्रमाण इतके कमी असेल तर हाच तर्क पुढे नेला की हेही सहज लक्षात येयील की १००C, २००C च्या गोळ्यांमध्ये औषध असण्याची काहीच शक्यता नाही.
म्हणजेच १C, २C च्या गोळ्या खाल्या तर पोटात औषध जाण्याचा थोडा तरी संभव आहे पण १०C, १२C च्या पुढच्या गोळ्यांत तर कोणतेही औषध नसेल. या ऊलट होमिओपॅथीचे व्यावसाईक तर असा दावा करतात की जेवढी पोटेन्सी जास्त तेवढा औषधाचा परिणाम जास्त. एवढेच नव्हे तर त्यांची जवळपास सर्वच औषधे ३०C पेक्षा जास्तच पोटेन्सीची असतात (हानेमान स्वत:ही "३०C पेक्षा कमी पोटेन्सीची औषधे देऊ नयेत" असे सांगत असे :) ) होमिओपॅथी मध्ये फ्लू वरील उपचारांसाठी सर्रास वापरले जाणारे ऑसिलोकोसिनियम नावाचे औषध तर चक्क २००C चे असते.
विरलपणा वाढवला की परिणामकारकता वाढते हाच तर्क लावायचा ठरल्यास आजिबात औषध न घेणारा रुग्णच औषधाच्या अतितिव्रतेने दगावायला हवा !
काही जण असाही दावा करतात की "आपल्या शरीरातील संप्रेरकांचं (Hormones) प्रमाण कितीतरी कमी असतं.. आणि तरीही ती (संप्रेरके) किती परिणामकारक असतात... हे होमिओपॅथीचे विरोधक कधीही विचारात घेत नाहीत!". परंतू खरी गोष्ट अशी आहे, की होमिओपॅथीच्या औषधांशी तुलना करायची असेल तर शरिरातील संप्रेरकांची तीव्रता महाप्रचंडच म्हणायला पाहीजे. आम्हाला माहीत असलेल्या संप्रेरकांमध्ये सर्वांत कमी प्रमाणात आढळणारे संप्रेरक घेतले तरी रक्ताच्या एका थेंबात त्याचे १०००००००००००० रेणू आढळतात. याउलट एक थेंब तर सोडा पण अगदी पृथ्वीवरील सर्व पाण्याइतके जरी होमिओपॅथीचे औषध घेतले तरी त्यात औषधाचा एक रेणू मिळण्याची शक्यतासुद्धा जवळपास शून्य असते. त्यामुळे "काट्याने काटा निघतो" हे होमिओपॅथीचे खरेतर चूक असणारे तत्त्व थोडावेळ बरोबर आहे असे गृहीत धरले, तरीपण आपल्याला माहीत असणाऱ्या भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र यांच्या सामान्य कसोटीवर सुद्धा होमिओपॅथीची विरलनाची प्रक्रिया अजिबात टिकाव धरत नाही. आम्हाला बरेच लोक (आणि बऱ्याचदा होमिओपॅथीचे "डॉक्टरही!") असे सांगत असतात की, या औषाधांचा परिणाम का होतो हे जरी माहीत नसले तरी परिणाम होतो हे नक्की आहे. तर्कसंगत बोलायचे झाल्यास असे म्हणावे लागेल की जेव्हा जेव्हा असा परिणाम दिसतो तेव्हा तो एकतर मानसिक असतो किंवा मग बऱ्याचदा डोकेदुखी जशी आपोआप बरी होते तसा असतो.
एवढे सगळे स्पष्ट असूनदेखिल जगातील कित्येक लोक आम्ही वर सांगितलेल्या गोष्टी माहीत नसल्याने सर्रास होमिओपॅथीचा उपयोग करतात आणि स्वत:चा आणि कुटुंबाचा जीव धोक्यात घालतात. ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इंग्लंड, बेल्जियम, स्वित्झरलॅंड आणि जर्मनीसारख्या देशांमध्ये होमिओपॅथीवर अत्यंत कडक निर्बंध असले तरी इतर बऱ्याच देशांमध्ये होमिओपॅथीच्या औषधांचा अब्जावधी रुपयांचा व्यवसाय उभा आहे (यात आपला भारत देश आघाडीवर आहे), आणि सर्वसामान्य लोकांना फसवण्याचा हा धंदा बिनदिक्कत चालू आहे. महाराष्ट्रात तर बऱ्याच आमदारांनी मिळून होमिओपॅथी डॉक्टरांना; ॲलोपॅथीची औषधे रुग्णांना देता येतील असा कायदा नुकताच विधिमंडळात संमत केला आहे ! यामागे या होमिओपॅथीच्या धंदेवाईकांनी विकत घेतलेल्या राजकारण्यांचा स्वार्थ उघड असला, तरी त्यातल्या त्यात समाधानाची बाब ही की होमिओपॅथी डॉक्टरांकडे जाणाऱ्या रुग्णांना आता नुसत्या पाण्याऐवजी किमान खरे औषध तरी मिळू शकेल. मात्र ज्यावेळी विज्ञानात स्वत: काम करणारी मंडळी होमिओपॅथीचे जोरदार समर्थन करताना दिसतात त्यावेळी हसावे की रडावे हेच कळत नाही.
======================================================
तळटीप
होमिओपॅथीचे समर्थन करण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न आजपर्यंत झालेले आहेत. अनेक शास्त्रज्ञांनी आटोकाट प्रयत्न करूनही त्यांना थोडेही यश मिळालेले नाही. परंतु यातला एक उल्लेखणिय प्रयोग केला होता तो "जॅकस बेन्वेनीस्त" (Jacques Benveniste) नावाच्या एका फ्रेंच शास्त्रज्ञाने इ.स. १९८८ मध्ये. बेन्वेनीस्तचा (अर्थातच चुकीचा) दावा असा होता की होमिऑपॅथीच्या औषधांइतक्या प्रचंड विरल केलेल्या द्रावणामध्ये सुद्धा विरघळवलेल्या पदार्थाचे गुणधर्म शिल्लक राहतात. जसे काही ते पाणी, त्यामध्ये पूर्वी विरघळवलेल्या (आणि अतिषय विरल केलेल्या) पदार्थांना लक्षात ठेवते. या गुणधर्माला बेन्वेनीस्तने "वॉटर मेमरी" म्हणजेच पाण्याची स्मरणशक्ती असे नाव दिले. बेन्वेनीस्तचा दाखला देऊन होमिओपॅथीचे व्यावसायिक असं सांगू लागले, की होमिओपॅथीच्या औषधांचा परिणामही वॉटर मेमरी मुळेच होतो. परंतु हा प्रयोग बेन्वेनीस्तला परत करून दाखवायला सांगितला असता त्याला तो अर्थातच जमला नाही. नंतर असेही समोर आले की बेन्वेनीस्तच्या गटामधल्या काही शास्त्रज्ञांना होमिओपॅथीच्या व्यावसायिकांनीच लाच दिली होती. वॉटर मेमरी तपासण्याचे अनेक प्रयत्न त्यानंतर झाले, परंतु असा कोणताही गुणधर्म अस्तित्वात नाही हेच वारंवार सिद्ध झाले. "वॉटर मेमरी" हा शब्दही विज्ञानाच्या क्षेत्रात आजकाल फक्त एक चेष्टेचा विषय म्हणून शिल्लक राहिला आहे
======================================================
इतर नोंदी:
(१) हा लेख मी आणि स्नेहल शेकटकर यांनी एकत्र मिळून लिहिला आहे. स्नेहलचे अनेक आभार.
(२) हा लेख ब्लॉग वर पूर्वीच प्रकाशित केलेला आहे.
(३) हा लेख ज्यावेळी लिहीला होता त्यावेळी महाराष्ट्राच्या विधीमंडळात होमिओपॅथ्स ना अॅलोपॅथीची औषधे देता येतील असा कायदा संमत केला होता, त्यामुळेच या लेखात "नुकताच" असा उल्लेख आलेला आहे.
(४) हा लेख लिहील्यानंतर काही महिण्यात, भारत सरकारने; १९९५ पासून कुटुंबकल्याण विभागाच्या अंतर्गत असलेल्या "आयुष" या विभागाला स्वतंत्र मिनिस्ट्रीचा दर्जा प्रदान केला. आयुषमध्ये आयुर्वेद, युनानी सारख्या प्रणालींसोबत होमिओपॅथीचा ही समावेष आहे.
(६) साधारण त्याच वेळी ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय आरोग्य परिषदेने जुन्या आजारंवर आणि गंभिर आजारांवर होमिओपॅथीचा ईलाज करू नये असा सल्ला दिला.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
होमिओपॅथी : उपचार की फसवेगिरी
माझा होमिओपॅथीशी संबंध "म्हैशींना चालते का हो तुमची होमिओपदी?"
महाराष्ट्रात तर बऱ्याच
माझी मैत्रीण BHMS डॉक्टर आहे.
तिने तुम्हाला missguide केले आहे.
प्रथम एक सांगावेसे वाटते की
Snehal Shektkar from
मागील धागा
लिंक मिपाच्या घरी जातेय.
ती लिन्क आता दुरुस्त केली आहे
डॉक्टरी-'अॅलोपॅथी' क्षेत्रातील धंदेवाईक लुटारूंच्या टोळ्या
माझे २ पैसे
हा प्रश्न फक्त होमिओपॅथिशी
मी मात्र होमिओपॅथी उपचारांचा
या विषयाची ek बाजू मी माझ्या
मला पण होमियोपदीचा चांगला अनुभव आला आहे.
अजून एक
नाही
प्लासीबो
प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या
सिद्ध होणे नेमके कुणाला आणि कश्यासाठी हवे आहे
माझा एक पैसा
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा
करून पाहिले
बऱ्याच दिवसांनी
मनोशाररीक परीणाम
१. अलोपाथी सोडून अन्य काही
सध्या रुग्णांनाही आणि
अत्यंत आभारी आहे या विषयावर लेख काढल्याबद्दल !!
नायटा अथवा fungal infection
रोग प्रतिकार शक्ती
हा थोडासा देव आहे की नाही,
+१ नंबर बोललात आनंदा साहेब
एकंदरीत निष्कर्ष म्हणजे
पुढे काय होणार, अन्न मिळणार
"चरबी वाढणे" हे लक्षण शरीरात
:)
हहपुवा.... मस्त उपाय. पेटंट
कोणत्याही पॅथीवर (उपचारपद्धती
डॉक्टर साहेब, कळकळ पोचतेय, पण
छान!
उत्तम प्रतिसाद.
डॉक्टर खरे सर.
अतिशय उत्तम प्रतिसाद डॉक आणि
गवि साहेब
:-D अगदी अगदी..
ओवर द काउंटर मिळणारी
रानटी भरमसाठ उगवणाऱ्या
एक छोटीशी दुरुस्ती...
नक्की काय किळसवाणी म्हणजे ?