शवविच्छेदन...... भाग - ४

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
3 Jan 2019 - 6:59 am

शवविच्छेदन...... भाग - १
शवविच्छेदन...... भाग - २
शवविच्छेदन...... भाग - ३

....जी साठ वर्षाची म्हातारी मेली होती ती एका बाटलेल्या जमिनदाराची बायको होती. अर्थात त्या गावातील जमिनदाराची ! म्हणजे फार काही श्रीमंत नव्हती पण ते कुटुंब खाऊनपिऊन सुखी होते. घरी गाई म्हशी होत्या आणि ती शरीराने चांगली सुदृढ होती. तिने आयुष्यभर विजापूरला जाऊन गोलघुमट पाहण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते पण तेही तिला शक्य झाले नव्हते. विजापुरला जाण्याचे तिचे स्वप्न आता मेल्यानंतर का होईना अशा प्रकारे पुरे होणार होते. तिला आता मध्यरात्री थडग्यातून बाहेर काढून नग्नावस्थेत विजापुरला नेण्यात येणार होते आणि तिच्या शरिराचे तुकडे डॉक्टरांचे कुतुहल शमविण्यासाठी वापरण्यात येणार होते...

एक दोन दिवसांनतर जोडगोळी कामासाठी बाहेर पडली. त्यांनी उबदार कपडे घातले व एक बाटलीही बरोबर घेतली. सोसाट्याचा वारा सुटला होता आणि कधी नव्हे ते अवकाळी पाऊस पडत होता. गरम झालेल्या जमिनीवर पाणी पडताच त्याची वाफ होत होती आणि ती धुक्यासारखी सगळीकडे पसरली होती. जाताना त्यांनी जरा लांबचा उलटा रस्ता घेतला. मधे एका ठिकाणी त्यांनी मुक्काम ठोकला व दुसऱ्या दिवसाच्या कामगिरीसाठी रात्री पेल्याला पेला भिडवला. त्या अगोदर त्यांनी त्यांची हत्यारे रस्त्यावर एके ठिकाणी लपविली जी ते जाताना घेऊन जाणार होते. त्या छोट्य गावातील हॉटेल मालकांना मानकामेंनी अगदी खुष करुन टाकले. (मानकामे नेहमीच अगोदर बक्षिसी देत असत. त्यामुळे पुढे उत्कृष्ट सेवा मिळते असा त्याचा विश्वास होता) जेवणही त्यामुळे उत्कृष्ट झाले. प्रत्येक पेल्यानंतर दोघेही अगदी एकमेकांच्या गळ्यात गळे घालू लागले. शेवटी मानकाम्याने खिशातून एक थैली काढली. त्याचे तोंड मोकळे केले. आतून चांदीचे रुपये खळखळले.

‘‘ माझ्या तर्फे छोटीशी भेट !’’ मानकामे म्हणाला.
डिसुझाने ती भेट खिशात घातली व आपल्या साहेबाचे आभार मानले.

‘‘ मी सांगतो डॉ. तूला म्हणजे एक तत्वज्ञानीच म्हणायला हवं. मनापासून सांगतो, तुला भेटेपर्यंत मी खरोखरंच गाढव होतो. म्हणजे तुला आणि प्रो. ना भेटेपर्यंत. पण मला खातरी आहे तुझ्या संगतीत मी सिंह होणार हे निश्चित.’’

‘‘सिंह ? मी सांगतो तुला त्या दिवशी सकाळी मला तुझ्यासारख्याच माणसाची गरज होती. ते माझ्या गाडीतील प्रेत पाहिल्यावर भल्याभल्यांची बोबडी वळली असती पण तू शांत डोक्याने सगळी परिस्थिती हाताळलीस. मी पहात होतो तुला...’’

‘‘ हं ऽऽऽ माझ्याच भल्यासाठी ! एका बाजूला कटकटी होत्या तर दुसऱ्या बाजूला तुझ्या सारखा उदार मित्र!.’’
असे म्हणून डिसुझाने खिशातील थैलीवर हाताने थोपटले. प्रतिसाद म्हणून त्याच्या खिशातून नाण्यांचा आवाज झाला. तो ऐकून दोघेही हसले पण...
मानकामेच्या डोक्यात ‘ कटकट ’ ही शब्द ऐकून शंकेची पाल चुकचुकली. त्याला क्षणभर वाटले की त्याची निवड चुकली की काय. त्याला काहीतरी बोलायचे होते पण तेवढ्यात डिसुझाची बडबड सुरु झाली,

‘‘ मी सांगतो तुला, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भीती काही कामाची नाही. तुला म्हणून सांगतो, मला तुझ्यापासून काही लपवायचे नाही. जन्मापासूनच सगळे माझा द्वेष करत आले आहेत. पाप-पुण्य, चांगले वाईट, बरोबर चूक, या सगळ्या गोष्टींना मुले घाबरु शकतात पण आपल्यासारख्या माणसांवर त्यांचा काय परिणाम होणार?.... चल एक पेला पाटलाच्या आठवणीदाखल भर....!’’ डिसुझाला बहुतके दारु चढली असावी.

संध्याकाळ झाली. अंधार दाटू लागला. मानकाम्यांनी गाडी हॉटेलच्या दरवाजात आणली. मानकामेने डिसुझाला हॉटेलचे बिल चुकते करायला सांगितले. मॅनेजरने कुठे जाणार म्हणून विचारल्यावर डिसुझाने भल्त्याच गावाचे नाव सांगितले. गाडीत बसल्यावर त्यांनी गाडी त्या भलत्याच गावाच्या रस्त्यावर घेतली. थोड्यावेळाने जेव्हा गाव मागे पडले तेव्हा त्यांनी ती गाडी परत आपल्या इप्सित स्थळाच्या रस्त्यावर वळवली व गाडीचे दिवे बंद केले. थोड्याच वेळात हत्यारे ज्या जागी लपवली होती तेथे ते पोहोचले. त्यांच्या गाडीच्या आवाजाशिवाय दुसरा कुठलाही आवाज येत नव्हता आणि डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाही एवढा काळाकुट्ट अंधार पसरला होता. धडपडत त्यांनी हत्यारे गोळा केली आणि त्यांनी कटकनहल्लीचा रस्ता पकडला.

चिंचांच्या झाडाखाली पोहोचल्यावर त्यांना काहीच दिसेना. त्यांनी मग कंदील पेटवले. रात्रीच्या त्या अंधारात कुठून तरी कुत्र्याचा भेसूर रडण्याचा आवाज आल्यावर या दोन निर्ढावलेल्या माणसांचाही क्षणभर थरकाप उडाला खरा. त्यांनी कंदील पेटवायलाच नको होता. त्याच्या पिवळ्या प्रकाशात वातावरण अधिकच भयप्रद झाले. चिंचेच्या झाडांची सळसळणारी पाने व मधेच वारा आल्यावर खाली पडणारी पाने, त्यांच्यावर डुलणाऱ्या त्यांच्या महाकाय सावल्या असा सगळा माहोल झाला. पण आपल्या जोडगोळीला त्याचे काय वाटणार ? ते अशा वातावरणाला चांगलेच सरावलेले होते. शेवटी ते त्या थडग्यापाशी पोहोचले....

त्यांचा या बाबतीत अनुभव दांडगा होता. कुदळी, फावडी ते अगदी सराईतासारखे चालवत. आलटून पालटून खणल्यावर थोड्याच वेळात त्यांच्या कुदळीला काहीतरी लागले. शवपेटीचे झाकण असावे बहुधा. ते पाहताना मानकामे दबक्या आवाजात किंचाळला. त्याच्या हाताला डिसुझाची कुदळ लागली असावी कारण डिसुझा करवदला, ‘‘ कशाल मरायला मधे हात घालतोस!’’ थडग्यात आता ते जवळजवळ खांद्यापर्यंत बुडाले. कंदील झाडाच्या एका फांदीला मंद पिवळट प्रकाश टाकत लटकत होता. तेवढ्यात वाऱ्याने फांदी हलली आणि तो कंदील जागेवरुन सटकला. खळ्कन् आवाज झाला आणि त्याच बरोबर जेथे तो पडला तेथे भडका उडाला. पण पुढच्याच क्षणी तेथे काळोख पसरला. क्षणभर त्यांना काहीच दिसेना. वाऱ्याच्या घोंगावणाऱ्या आवाजात त्यांची कुजबुज एकमेकास ऐकू येईना आणि मोठ्याने बोलण्याचा प्रश्र्नच नव्हता.

काम आता जवळजवळ संपत आले होते आणि त्यांना वाटले फटफटण्यापूर्वी मुडदा हाती येईल. शेवटी शवपेटी वर खेचण्यात त्यांना यश आले. त्यांनी निर्विकारपणे ती पेटी फोडली आणि आतील प्रेत पोत्यात भरले. दोघांनी ते पोते गाडीपाशी आणून आत टाकले. सुस्कारे टाकत त्यांनी गाडी मुख्य रस्त्यावर आणली. ज्या गावात त्यांनी मुक्काम ठोकला होता त्या गावातील मिणमिणते दिवे दिसल्यावर त्यांना हायसे वाटले आणि मग त्यांनी न थांबता तशीच विजापूरला गाडी दामटली.

त्यांचे कपडे घामाने ओलेगिच्च झाले होते आणि त्या दुर्दशा झालेल्या रस्त्यावर गाडीला इतके हादरे बसत होते की ते पोते अस्ताव्यस्त हिंदकळत होते. मधेच त्या पोत्यातून एक हात बाहेर आला आणि डिसुझा घाबरला. मानकामेने गाडी थांबवली व डिसुझाला मागे ते पोते धरुन बसण्यास फर्मावले. डिसुझा अनिच्छेनेच मागे गेला. गाडी सुरु झाली पण थोड्याच वेळात त्यांच्या मागे कुत्री लागली व भुंकू लागली. थोड्याच वेळात त्यांच्या भुंकण्याचे रडण्यात रुपांतर झाले आणि निर्ढावलेल्या डिसुझाचीही टरकली. कुत्र्यांना अभद्र गोष्टींचा वास लागतो की काय कोणास ठावूक. त्याची ती अवस्था पाहून डॉ. मानकामेंना हसू आवरेना. इकडे मागे प्रत्येक धक्क्याला ते पोते डिसुझाच्या अंगाला घासत होते आणि तेवढ्यात त्याला त्याचा आकार वाढल्याचा भास झाला. डिसुझाच्या घशातून शब्द उमटेना आणि गाडीत जिवघेणी शांतता पसरली. तेवढ्यात कोणीतरी खांद्यावर डोके ठेवावे तसे ते पोते डिसुझाच्या खांद्यावर रेलले. डिसुझाच्या अंगावर सरसरुन काटा आला. तो किंचाळला, ‘‘ अरे थांबव गाडी जरा ! आणि कंदील पेटव..’’ मानकामेलाही काहीतरी अशुभ शंका आली असावी.. त्याने काही उत्तर दिले नाही पण गाडी थांबवली, अजून त्यांनी रेल्वेचे फाटकाही पार केले नव्हते. तो मागे आला आणि त्याने कंदील पेटवला. वारा सुटला होता. दोन तिनदा प्रयत्न केल्यावर तो एकदाचा पेटला. मानकामेने कंदील हातात उंच धरला आणि पोत्याची गाठ सोडली. काही क्षण मानकामे स्तब्ध झाला. प्रेतावर नीट नजर टाकल्यावर त्याचे शरीर थरथरु लागले. हातपाय थंड पडले. कापऱ्या आवाजात तो कुजबुजला,

‘‘ हे प्रेत बाईचे नाही...’’

‘‘ आपण पोत्यात भरले तेव्हा तर ते स्त्रीचेच शव होते. मी खात्रीने सांगतो डॉ....’’

‘‘ जर कंदीलाची वात मोठी कर आणि जरा जवळ ने बरं.. मला तिचा चेहेरा पाहू देत.’’

‘‘ थांब मी पोत्यातून ते प्रेत बाहेरच काढतो..’’ असे म्हणून मानकामेने पोत्याला बांधलेली दोरी सोडली. कंदीलाचा प्रकाश त्या शवावर पडला आणि डिसुझा किंचाळला. त्याने गाडीतून जिवाच्या आकांताने बाहेर उडी मारली व धूम ठोकली. कंदील पडला आणि रॉकेलचा भडका उडाला. त्या प्रकाशात गाडीत एकटाच राहिलेल्या मानकामेला ते शव कोणाचे आहे ते नीट दिसले... शवविच्छेदन झालेल्या रवि पाटलाचे.

ते पाहताच मानकामे जागेवरच बेशूद्ध पडला असावा कारण दुसऱ्या दिवशी गावातील लोकांना फक्त गाडी, मानकामे सापडले.... आणि डिसुझा तेथून पळून गेला तो आम्हाला भेटेपर्यंत कोणाच्याच नजरेस पडला नाही....

समाप्त.
अनुवाद : जयंत कुलकर्णी.

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

3 Jan 2019 - 8:10 am | आनन्दा

मस्त आहे

टर्मीनेटर's picture

3 Jan 2019 - 1:23 pm | टर्मीनेटर

छान अनुवाद केला आहे तुम्ही कुलकर्णी साहेब. कथा थोडी अपुर्ण वाटली, अर्थात मुळ कथाच अशी आणि एवढीच असेल तर नाईलाजच आहे म्हणा. तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीने ह्या कथेचा आणखीन विस्तार करावा अशी नम्र विनंती.

मस्त आहे कथा पण अपुर्ण वाटली .

भटक्य आणि उनाड's picture

4 Jan 2019 - 9:08 am | भटक्य आणि उनाड

मस्त जमलाय अनुवाद....

प्रचेतस's picture

4 Jan 2019 - 9:18 am | प्रचेतस

उत्कृष्ट कथा. अर्थात टर्मिनेटर म्हणतात तसे कथा काहीशी अपूर्ण वाटली. शेवट वाचकांच्या कल्पनाशक्तीवर सोडून दिल्यासारखा वाटला.
शव पळवून आणणं आणि शवविच्छेदनं ह्यावरुन मेरी शेलीची अभिजात 'फ्रॅन्केनस्टाइन' आठवली.

सुहासवन's picture

6 Jan 2019 - 3:22 pm | सुहासवन