कॅंडी नंतर आमचा आजचा पुढचा बेत होता नुवारा एलीया किंवा नुवा एलीया हे थंड हवेचे ठिकाण बघणे आणि तिथेच मुक्काम करणे.शिवाय जाताना वाटेत बॉटनिकल गार्डन चहाचे मळे स्ट्रॉबेरी गार्डन रॅम्बोडा फॉल्स हनुमान मंदिर हे सर्व बघत जायचे होते.
सकाळी भरपेट नाश्ता करून दिवसाची सुरुवात तर मस्त झाली. हॉटेलचा निरोप घेऊन आम्ही बाहेर पडलो आणि गाडी पुन्हा वळणावळणाच्या रस्त्याने धावून लागली.आता बाहेरचे दृश्य अजूनच सुंदर आणि हिरवेगार होते. १०-१०.३०चा सुमार असूनही डोळ्याला ऊन जाणवत नव्हते. लवकरच गाडी कॅंडीच्या बॉटनिकल गार्डनपाशी येऊन थांबली.महावेळी नदीच्या काठी वसलेले आणि सुमारे १५० एकर जागेत पसरलेले हे अवाढव्य उद्यान आहे.तिकीट वगैरे काढून आम्ही सर्वजण आत शिरलो. पण एव्हढे प्रचंड उद्यान बघणे काही सोपे काम नव्हते. त्यामुळे वेळेच्या दृष्टीने आणि श्रमाच्या हिशोबाने ( तेव्हढे चालणे जीवावर आले होते. म्हणून) आम्ही विद्युत वाहनाचा पर्याय स्वीकारला.ड्रायव्हरने सफाईदारपणे गाडी चालवत आम्हाला उद्यानाची सफर घडवला सुरुवात केली.
तऱ्हेतऱ्हेची पाम ट्री , जोड नारळाचे झाड , तोफगोळ्यासारखी फळे असलेले झाड,नागचाफा आणि विशेष म्हणजे शेकडो वर्ष जुने आफ्रिकन बांबूची बेटे बघता बघता आम्ही ऑर्किडची फुले असलेल्या विभागात आलो.
आणि विविधरंगी ऑर्किड बघून अक्षरश: वेड लागायची पाळी आली. किती फोटो काढू आणि किती नको असे होऊन गेले.
अनेकरंगी अनेकढंगी ऑर्किडची नाजुक फुले मनाला अक्षरशः भुरळ पाडत होती.
शेवटी वेळेअभावी हि सुंदर सफर आम्ही संपवली आणि उद्यानाचा निरोप घेऊन गाडीत बसून पुढचा प्रवास सुरु केला.गाडी शहरा बाहेर पडली आणि आता घाट रस्ता लागला आणि चहाचे मळे दिसायला सुरुवात झाली.दामरो ग्रुपच्या पाट्या ठिकठिकाणी दिसत होत्या त्यावरून ही श्रीलन्केची एक महत्वाची चहा उत्पादन करणारी कंपनी असावी. एका चहाच्या मळ्यात /कारखान्यात आम्ही थांबलो आणि चहा खुडण्यापासून ते वाळवून त्याची प्रतवारी करून पॅक करेपर्यंतची प्रक्रिया बघितली.
निघताना थोडा चहा आठवण म्हणून विकत घेतला (पुन्हा एक गाढवपणा जो सगळे पर्यटक करतात ) आणि यापेक्षा आपल्या वाण्याकडे मिळणारा टाटा किंवा रेड लेबल बरा असेल असे म्हणत आपल्याच मूर्खपणावर हसत पुढच्या प्रवासाला लागलो.
पुढचा टप्पा होता भक्त हनुमान मंदिर , म्हणजे लक्ष्मणाला संजीवनी आणताना जिथे हनुमान विश्रांतीसाठी थांबला होता ती जागा.इथे स्वामी चिन्मयानंद ट्रस्टने भोजनाची सशुल्क व्यवस्था केली आहे.
भर दुपारच्या वेळी आम्ही तिथे पोचलो होतो त्यामुळे देऊळ मात्र बंद होते.बाहेरूनच दर्शन शेरून आणि जेवून आम्ही पुढे निघालो.वाटेत रॅम्बोडा फॉल्स बघून आणि स्ट्रॉबेरीच्या मळ्याला बगल देऊन आम्ही सरळ नुवा एलियामध्ये दाखल झालो.
नुवा एलीया हे ब्रिटिश लोकांनी विकसित केलेले थंड हवेचे ठिकाण आहे आणि त्यामध्ये मुख्य आकर्षण म्हणजे ग्रेगरी तलाव ज्या बोटिंग आणि इतर जलक्रीडा उपलब्ध आहेत.
विशेष म्हणजे इथे आमचा मुक्काम एका ब्रिटिश कालीन बंगल्यात होता जो मुळात एका एअर फोर्सच्या अधिकाऱ्याने बांधला आहे. बंगल्याच्या दारातून किंवा गॅलरीतून समोरच हा ग्रेगरी तलाव दिसत होता.
बऱ्याच दिवसांनी चहाचा कप हातात घेऊन तलावाकडे बघत गप्पा मारत बसण्याचे सुख अनुभवले. सायंकाळी तलावाभोवती एक चक्कर मारली आणि बोटिंगचाही आनंद लुटला.
आता हळूहळू अंधार पडू लागला होता आणि दिवसभर उन्हात फिरून थकायला झाले होते. त्यामुळे आजचा कार्यक्रम आटोपता घेऊन हॉटेलवर परत आलो आणि फायरप्लेसभोवती बसून गरमागरम जेवणाचा आस्वाद घेऊन गाढ झोपी गेलो.
वाचने
9476
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
अजून तपशील चालला असता
काही काही फोटो दिसत नाहीत.
फोटो सुधारले आहेत
फोटो दिसत आहेत, धन्यवाद.
In reply to फोटो सुधारले आहेत by राजेंद्र मेहेंदळे
सविस्तर प्रतिसादासाठी धन्यवाद
In reply to फोटो सुधारले आहेत by राजेंद्र मेहेंदळे
छान चालू आहे
खर्च
In reply to छान चालू आहे by गतीशील
धन्यवाद
In reply to खर्च by राजेंद्र मेहेंदळे
मस्तं चालली आहे सफर. फोटो नीट
धन्यवाद
In reply to मस्तं चालली आहे सफर. फोटो नीट by डॉ सुहास म्हात्रे
छान माहिती.