'सर्चिंग' आणि '...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर'
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
काही दिवसांपूर्वी 'सर्चिंग' हा इंग्रजी सिनेमा पाहिला. बर्याच दिवसांनी एक चांगला, उत्कंठावर्धक रहस्यपट पाहिल्याचं समाधान मिळालं. अतिशय संयत हाताळणीमुळे 'सर्चिंग' एकाच मुख्य कथासूत्राभोवती प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो. मला या चित्रपटाबद्दल आवडलेली अजून एक गोष्ट म्हणजे कुठलाच इतर फापटपसारा या चित्रपटात नव्हता. समांतर असणारी उपकथानके नाहीत; विनाकारण वाढवून ठेवलेली गुंतागुंत नाही; प्रेक्षकांना भुलवण्यासाठी रचलेले फसवे भूलभुलैय्या नाहीत. एकच प्रश्न आणि त्याभोवती फिरणारे, खरे वाटणारे नाट्य! एका माणसाची एक टीनेज्ड मुलगी एक दिवशी अचानक गायब होते. अतिशय लाघवी, बोलकी, खूप मोठा मित्रपरिवार असणारी, मित्र-मैत्रीणींमध्ये लोकप्रिय असणारी, निरनिराळ्या गोष्टी करणारी एकुलती एक मुलगी गायब झाल्यानंतर तिच्या बापाच्या जीवाची घालमेल सुरू होते. बाप त्याच्या असंख्य व्यापांतून एका निवांत क्षणी आपल्या कुठल्याशा क्लासला गेलेल्या मुलीला मेसेज टाकतो. एरवी त्याच्या मेसेजेसला भराभर उत्तर देणारी त्याची मुलगी उत्तर देत नाही. बापाला हळूहळू टेंशन यायला लागतं. मुलीचा फोनदेखील बंद येतो. घाबरून तो सगळीकडे चौकशी करतो. तिचे फेसबुक वगैरे अकाऊंट्स कसेबसे उघडून तो तिच्या अॅक्टिव्हिटीज चेक करतो. सरतेशेवटी त्याला पोलिसांची मदत घ्यावी लागते. या सगळ्या पाठपुराव्यादरम्यान अनेक धक्कादायक बाबी उघड होतात. बाप हताश होतो. आपल्या मुलीला आपण कधी ओळखतच नव्हतो ही टोचणी त्याच्या मनाला लागून राहते. चित्रपट हळूहळू पुढे सरकतो आणि आपली उत्कंठा शिगेला पोहोचते. रहस्य उलगडल्यानंतर आपल्याला जबरदस्त धक्क बसतो आणि चित्रपट संपतो.
आजकाल प्रेक्षकांना थ्रिल किंवा बरं वाटावं म्हणून बरीच उपकथानके अशा रहस्यपटात घुसडण्यात येतात. प्रेम, नाचगाणी, संशयाचा परिघ वाढवण्यासाठी पेरलेली गुंतागुंत वगैरे. नुकत्याच येऊन गेलेल्या 'अंधाधून'मध्ये दुसर्या भागात अकारण गुंतागुंत वाढवून ठेवल्यासारखी वाटते. कथा कशी वळण घेईल याचा अंदाज न आल्याने मध्यांतरानंतरच्या भागात किडनी, दुबईचा शेख वगैरे खूपच अतार्किक उपकथानके ठिगळ लावल्यासारखी घुसडण्यात आली आणि त्यामुळे पहिल्या भागात जी मजा येते तशी मजा दुसर्या भागात येत नाही. 'अंधाधून' याचमुळे दुसर्या भागात जरा फसतो. 'सर्चिंग'मध्ये मात्र हा मोह कटाक्षाने टाळण्यात आलेला आहे. एकच कथासूत्र आणि त्याभोवती घट्ट विणलेली संशयाची आणि उत्सुकतेची जाळी, बस! अगदी हेच तंत्र 'तुंबाड'मध्ये देखील वापरण्यात आले आणि चित्रपट कमालीचा प्रभावी ठरला.
'सर्चिंग'ची अजून एक खासियत म्हणजे हा चित्रपट संपूर्णपणे निरनिराळ्या स्क्रीन विंडोजमध्ये घडतो. मेसेंजर विंडो, वेबसाईटचे पान, मोबाईलची व्हिडिओ स्क्रीन अशा स्क्रीन्समध्ये हा चित्रपट घडतो. या चित्रपटात कुठेही थेट कथानकातले प्रसंग घडतांना दाखवलेले नाहीत आणि तरीही हा चित्रपट उत्सुकता ताणून ठेवतो. मी तर असे म्हणेन की गोष्ट दाखवण्याच्या या अनोख्या पद्धतीमुळे चित्रपटाचा परिणाम अधिकच गहिरा होतो. सुरुवातीची कित्येक मिनिटे या चित्रपटात संवाद नाहीतच. चॅट विंडोमधून आपल्याला संभाषण दाखवले जाते आणि चित्रपट हळूहळू उलगडत जातो. एकदा नक्कीच बघावा असा सुंदर चित्रपट!
दोन-तीन दिवसांपूर्वी "...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर" पाहिला. घाणेकर १९८६ मध्ये गेले. मी त्यावेळेस जेमतेम १० वर्षांचा होतो. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल फारसं माहित नव्हतं. 'हा खेळ सावल्यांचा', 'मराठा तितुका मेळवावा' वगैरे चित्रपट माहित होते. ते कसलेले नट होते हे ही माहित होतं. आणि हो...अतिशय लफडेबाज नट म्हणून त्यांची ख्याती (?) होती असे ऐकून होतो. 'काशिनाथ' बघण्याचा माझा तसा काही खास प्लॅन नव्हता पण दोन वर्षांनी पहिल्यांदा मी बायकोला चित्रपट पहायला पाठवलं आणि मी घरी आमच्या बाळाला सांभाळत बसलो. मी तिला 'ठग्ज ऑफ हिंन्दोस्तान'ला पाठवलं. मी ठरवलं होतं की नंतर आपण (नेहमीप्रमाणे) एकट्याने हा चित्रपट बघायचा. संध्याकाळी पावणे-सात वाजता बायको तणफणतच घरी आली. तिचा अंदाज एकंदरित "मढं बशिवलं त्या मेल्या ठग्जचं" वगैरे असा होता. मी चक्रावलो. ये क्या हो गया भई? आमिर खानचा चित्रपट! एक क्षण वाटलं की ट्रॅफिकला वैतागून बायको चिडली असेल. पहिल्यांदाच बाळाला असं घरी इतका वेळ ठेवून ती पिक्चरला गेली होती. मला वाटलं एकूण चार तास लागले म्हणून चिडली असेल. पण नाही. मी विचारलं तर ठग्जला शिव्या घालण्यासाठी तिला शिव्या सापडत नव्हत्या इतकी ती नि:शब्द, हतबुद्ध, विद्ध वगैरे झाली होती. आपसूकच माझा प्लॅन बारगळला आणि म्हणून मी 'काशिनाथ'ला जायचं ठरवलं. पिक्चर तो देखनाईच पडता ना!
आमच्या नेहमीच्या यशस्वी नीलायमला गेलो तर बाल्कनी फुल्ल! एरवी मी बुकमायशोवर तिकिट काढल्याशिवाय अजिबात जात नाही पण त्यादिवशी टॉकिज मोकळं दिसलं म्हणून तडक गेलो तर पोहोचेपर्यंत बाल्कनी फुल झाली होती. असो. 'काशिनाथ' मला आवडला. एकच प्रॉब्लेम! चित्रपटाची लांबी! अगदी आरामात २० मिनिटे कमी करता आला असता. पण बाकी चित्रपट चांगला वाटला. सुबोध भावेने घाणेकरांचं बेअरिंग उत्तम पकडलं आहे. फक्त त्याचं पोट जरा रसभंग करत होतं. प्रसाद ओकने पणशीकर चांगले उभे केले आहेत. आनंद इंगळेचा वसंत कानेटकर मिश्कील आणि मस्त! कांचन झालेल्या वैदेही परशुरामीने छान काम केलं आहे. तिचं ते घाणेकरांवर भाळणं, मनातल्या मनात त्यांच्यावर प्रेम करणं, डोळ्यांमधून त्यांच्याविषयीचे प्रेम व्यक्त करणं वगैरे वैदेहीने छान दाखवले आहे. सोनाली कुळकर्णी (सुलोचना), मोहन जोशी (भालजी पेंढारकर), अमृता खानविलकर (संध्या), सुमित राघवन (डॉ. लागू) वगैरे छान! अमृता खानविलकर ३-४ मिनिटांच्या रोलमध्ये कमालीची सुंदर दिसली आहे. संध्याच्या तोंडाच्या आणि शरिराच्या विचित्र हालचाली तिने अप्रतिम दाखवल्या आहेत. ही एक गुणी अभिनेत्री आहे. 'कट्यार काळजात घुसली' आणि 'राजी' मध्ये हिचं काम छानच होतं. दुर्दैवाने मराठी चित्रपटात अभिनयाचं सोनं व्हावं अशा खूप कमी भूमिका असतात. कित्येक वर्षांत सचिनला एखादा 'कट्यार' मिळतो किंवा सुबोध भावेला 'बालगंधर्व' मिळतो. बाकी सगळा आनंदीआनंदच! कित्येक वर्षे तर मराठी चित्रपटसृष्टी 'धुमाकूळ', 'बंडलबाज', 'येडा का खुळा', 'गोंद्या मारतंय तंगडं' वगैरे नावांच्या रद्दड चित्रपटांच्या ओझ्याने वाकली होती. असो.
बाकी घाणेकरांचे प्रताप बघून त्यांच्याविषयी काही फार बरी प्रतिमा होत नाही. मला हा चित्रपट पाहतांना राहून-राहून 'संजू' आठवत होता. बेजबाबदारपणा, बेदरकार वृत्ती, लोकांची अजिबातच कदर नसणं, व्यसनाधीनता, चारित्र्यावर संशय घ्यावा असं वागणं, कुठलाही विधिनिषेध न बाळगणं, इतरांचा द्वेष करणं, स्वतःला सर्वश्रेष्ठ आणि सर्वोत्तम समजणं, इतरांना अत्यंत हीन लेखणं, जिकडे तिकडे फक्त आणि फक्त स्वतःच्या सुखासाठी धडपडणं, काहीतरी वेगळं करण्याच्या नादात लोकांना त्रास होईल असं वागणं वगैरे सगळे कॉमन धागे दोन्ही चित्रपटात होते. डॉ. लागूंना घाणेकर अतिशय तुच्छ समजत असतात. या दोघांमध्ये इतकं वैर होतं हे मला माहित नव्हतं. मी लागूंना नेहमीच वृद्ध समजत आलो आणि घाणेकरांना तरुण! दोघांमध्ये खरं म्हणजे फक्त तीन वर्षांचं अंतर होतं. दोघांनाही पुरेपूर संधी देण्याची क्षमता मराठी रंगभूमीमध्ये खचितच होती पण दोघांचेही अहंगंड मराठी रंगभूमीच्या व्याप्तीपेक्षा बरेच मोठे होते असंच म्हणावं लागेल.
घाणेकर नट म्हणून श्रेष्ठ होते की नाही हे मला माहिती नाही पण एक माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून त्यांच्याविषयी आदर वाटत नाही हे खरे. त्यांच्या प्रथम पत्नीने जे सहन केले ते बघून मला खरं म्हणजे घाणेकरांची चिडच येत होती. १९८६ मध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने हा कलावंत आपले अहंगंड, आपले डॉ. लागूंसोबतचे शतृत्व, आणि आपला विक्षिप्तपणा मागे सोडून वयाच्या फक्त छप्पन्नाव्या वर्षी खूप पुढच्या प्रवासाला निघून गेला. तोपर्यंत त्यांची नट म्हणून कारकीर्द संपलेली होती. त्यांची व्यसनाधीनता आणि बेजबाबदार वृत्ती त्यांच्या कारकीर्दीचा घास घेऊन गेली. चित्रपट संपल्यानंतर एक हूरहूर मात्र मनात राहून जाते. एका गुणी कलावंताची अशी अखेर व्हावी हे खूपच दुर्दैवी आहे.
आयुष्यात कसे असू नये, कसे वागू नये, आणि कसे दिसू नये हे बघायचे आणि जाणायचे असेल तर 'संजू' आणि '...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' अवश्य पहावेत!
प्रतिक्रिया
दोन्ही चित्रपटांची ओळख आवडली.
सर्चिंग बघण्याची इच्छा आहे.
'सर्चिंग'
'सर्चिंग' टॉकिजला पाहिला...
'सर्चिंग' ची भन्नाट ओळख आवडली
धन्यवाद!
डॉ. घाणेकर बेदरकार होतेच पण
तुलना नाही...
मावैम
बरोबर...संजय दत्तविषयीचे 'घरभेदी' हे मत कसे बनवले?
तो टेररिस्ट नव्हता हे
वरील माहितीदेखील तशी ऐकीवच
वरील माहिती
ही माहितीदेखील ऐकीवच.
( आपल्याला रस असेल तर अन्यथा
डॉ काशिनाथ घाणेकर हे कलंदर,
बरोबर...
अतिशय पटण्यासारखा
हा प्रतिसाद डॉक ह्यांना होता
सिनेमे चांगलेच
खरं सांगायचं तर, डॉकाघा
"दोघांनाही पुरेपूर संधी
"दोघांनाही पुरेपूर संधी
पटले
एकदम कडक सिनेमा... आवडला म्हणजे आवडलाच...
मि हि पाहिला हा शो
सर्चिंग...जबरदस्त....
सुंदर ओळख..
धन्यवाद!
शोभा देते का ?
मुंबईमधले एक नावाजलेले
छान ओळख.
मी