पिंपळ

शिवोऽहम्'s picture
शिवोऽहम् in जे न देखे रवी...
31 Oct 2018 - 10:14 am

त्या तीरावर आहे तो पिंपळ
पानांतुन ज्याच्या सळसळते ऋतुंची जाग
आणि नखांनी ओरबाडतात ज्याला
बिलंदर खारी ढोलीतल्या.

तळहातच जणू!
पिंपळपानं आहेत काही तांबुस कोवळी
रेषांतुन जीवन घेऊन ओलंकंच
लालसावलेलं, आभा ल्यालेलं प्रकाशाची.
जडमूढ मुळांनी धरली आहे माती घट्ट
पसरून आपली बोटं लांबचलांब
आपोष्णी करायला पृथ्वीच्या गाभ्यातुन!

फांद्यांचे बाहू फेकत अस्ताव्यस्त
निळावंतीच्या वाणीने सांगतो तो
घरट्यातल्या पिल्लांना आणि चोचीतल्या अळ्यांनाही,
जन्मजन्मांतरीच्या कर्मकहाण्या
वाऱ्यावर दहादिशा होणाऱ्या रुई-म्हाताऱ्यांच्या
नी शीळ वाजवणाऱ्या पक्षांच्या.

पांथस्थांच्या सावल्या टेकतात त्याच्या बुंध्याशी
सुखदु:खांच्या बोलांच्या नी यतींच्या गभीर पाठांच्या
सरी कोसळतात अन आदळतात त्याच्या निबर अंगावर
कधी वादळवाटांसारखी माणसं हलवतात त्याला गदगदा
पण हंसाच्या वृत्तीनं तो घेतो फक्त कहाण्यांचे अर्क
आणि त्यागतो नश्वर,
चिकट थेंब कर्मविपाकांचे.

नित्य उभा आहे कधीचाच
छिलल्या सालीचा पोत मातकट त्याच्या,
जीर्णफाटकं महावस्त्र पांघरून
जणू उभा असावा पुरातन जखमी
अश्वत्थामा!

कविता

प्रतिक्रिया

प्रमोद देर्देकर's picture

31 Oct 2018 - 8:41 pm | प्रमोद देर्देकर

Mast Kavita avadali.

अत्रुप्त आत्मा's picture

2 Nov 2018 - 5:35 pm | अत्रुप्त आत्मा

छान!

यशोधरा's picture

2 Nov 2018 - 5:46 pm | यशोधरा

सुर्रेख!

प्राची अश्विनी's picture

3 Nov 2018 - 8:36 am | प्राची अश्विनी

कविता आवडली.

पाषाणभेद's picture

5 Nov 2018 - 10:34 pm | पाषाणभेद

व्वा जबरदस्त

पिंट्याराव's picture

10 Dec 2018 - 7:16 pm | पिंट्याराव

.