फरसाणाची भाजी

योगेश कुळकर्णी's picture
योगेश कुळकर्णी in पाककृती
25 Sep 2018 - 8:46 pm

फरसाण किती आहे त्यानुसार जरा प्रमाणं बदलतील. तरी एक परिमाण म्हणून...
- दोन-अडीच मुठी भरून कुठलंही फरसाण
- दोन टोमॅटो
- दोन कांदे
- लाल तिखट
- मीठ
- तेल
- जिरे
- चिमटीभर साखर
- कोथिंबीर वरून घ्यायला

साधारणपणे पावसाळ्याच्या दिवसांत फरसाणादी प्रकार सादळतात आणि मग ते कुणी खात नाही. एकदिवस हा प्रकार करून आणि खाऊन पाहीला; अफलातून चव जमली होती; म्हणून इथे देतोय.

लोखंडी कढई सणसणून तापवून त्यात जरा तेल तापवावं आणि जिरं चांगलं फुलवावं; तसं ते फुललं की मगच बारीक चिरलेला कांदा, कडा लालसर तांबूस होईतो परतून घ्यावा.
यात आता बारीक चिरलेला टोमॅटो घालून मसाला तेल सोडेस्तोवर परतावं. यात चवीनुसार मीठ, तिखट घालावं आणि त्याचा कच्चटपणा जाईतो अजून एखादमिनिट परतावं.
नंतर हातानीच जरा कुस्करून फरसाण यात घालावं आणि भाजी छान हलवून घ्यावी. फारच कोरडं वाटत असेल तर जरासा पाण्याचा शिपका देऊन एक दणदणीत वाफ आणावी.
चव पाहावी आधी आणि गरज पडली तरच मीठ आणि टोमॅटो ने फारच आंबटसर झालेली असेल तर पाव चमचा साखर घालून सिजनिंग अ‍ॅडजस्ट करावं. वर कोथींबीर घालून गरमगरम भाजी, पोळी, फुलके यांसोबत खावी.

- तिखट, मीठ आणि साखर घालतांना जरा जपून. फरसाणात या तीनही गोष्टी असतातच.
- हवे असतील तर यात थोडे फ्रोजन मटार, मके थॉ करून घालता येतील
- ताज्या फरसाणाचीही अशी भाजी जमेल आणि त्यात कुरकुरीत पणा हवा असेल तर राखता येईल
- ही भाजी जरा चढ्या चवीचीच सुरेख लागेल सो त्यानुसार तिखटाचं प्रमाण ठरवा
- भाकरी, पोळी ऐवजी या भाजीकरता फुलका जास्त चांगला लागतो

प्रतिक्रिया

सस्नेह's picture

25 Sep 2018 - 10:16 pm | सस्नेह

झटपट भाजी वेळेला उपयुक्त.

प्रचेतस's picture

26 Sep 2018 - 8:22 am | प्रचेतस

भारी पाकृ आहे.

II श्रीमंत पेशवे II's picture

26 Sep 2018 - 9:32 am | II श्रीमंत पेशवे II

भारी लागेल यात काही शंका नाही ........

II श्रीमंत पेशवे II's picture

26 Sep 2018 - 9:33 am | II श्रीमंत पेशवे II

फोटू असेल तर टाका

तुषार काळभोर's picture

26 Sep 2018 - 10:54 am | तुषार काळभोर

आमच्या घरी अधूनमधून होतो. पाकृ माहिती नाही, पण अशीच असावी.
रच्याकने, आमच्याकडे कुरड्यांची भाजी सुद्धा केली जाते.

कुरडयांची भाजी लै जबरी लागते चवीला.

सस्नेह's picture

26 Sep 2018 - 8:29 pm | सस्नेह

कशी करतात ?

अवघड प्रश्न आहे. घरी करतात पण आमचे काम फक्त खायचे.
तरी जितके पाहिले आहे त्यावरून कुरडया भिजत घालायच्या, कढईत कांदा वगैरे परतून तिखट मीठ , फोडणी घालून भिजवलेल्या कुरडया पाणी निथळवून परतायच्या. (कुरडया अगदी थोड्याच वेळ पाण्यात भिजवायच्या नाहीतर लगदा होतो.)

अशीच आहे पाकृ. लगदा झालेला कधी अनुभव नाही आला पण.. उलट मी त्या कुरडया जरा कोमट पाण्यात भिजवते. बाकी कृती अशीच.
जबरी लागते याच्याशी सहमत :)

कधीतरी पाकृ टाकेन म्हणून फोटो काढून ठेवला होता. फार खास आला नाही, पण देते इथेच ;)

k

तुषार काळभोर's picture

27 Sep 2018 - 7:08 am | तुषार काळभोर

हो, प्रचेतसने सांगितल्यासारखीच.

अवांतर: आणि हा 'फार खास न आलेला' फोटो आहे???!!!

फार खास नव्हता. गूगल फोटोच्या मदतीने सुधरवला :)

भारी आहे. शेवई उपमा सदृश दिसतंय.

अभ्या..'s picture

29 Sep 2018 - 8:33 am | अभ्या..

हा, शवीगे उप्पीट कर्नाटक बाऊंडरीचे.

मस्तय फोटो. मला ते शेवयांचं उप्पीटच वाटतंय.

श्वेता२४'s picture

26 Sep 2018 - 11:01 am | श्वेता२४

पुण्यात असताना मेसमध्यल्या आजी ही भाजी कधीतरी संध्याकाळी असायची . बहुदा अशीच करत असाव्यात. मस्त लागायची. तो ठरलेला मेनू असायचा. फरसाण भाजी, कांदा टोमॅटो कोशिंबीर व साधा वरण-भात त्यामुळे ही भाजी असली की मी जाम खूष व्हायचे. त्यानंतर कधी खाल्ली नाही. तुमच्या रेसिपिच्या निमित्ताने आता करुन बघणार

लौंगी मिरची's picture

26 Sep 2018 - 8:39 pm | लौंगी मिरची

फोटो असता तर आणखी मजा आली असती .

छान .

पियुशा's picture

26 Sep 2018 - 8:50 pm | पियुशा

सहि .....मी आताच केलेली माझी फेव्रेट आहे :)

रुपी's picture

26 Sep 2018 - 11:52 pm | रुपी

छान!

फरसाणाची भाजी खाल्ली नाही कधी. कल्पना छान आहे!
गुजराती लोक भावनगरी, तिखट शेव यांची भाजी करतात ती खाल्लीये बर्‍याचदा. मस्त लागतात त्याही. कांदा, टोमॅटो घातलेली खाल्ली नाही पण कधी. फक्त आधण करतात आणि अगदी जेवताना शेव/ भावनगरी घालून २ मिनिटे शिजवतात. तेवढी वरुन कोथिंबीर घालतात काहीजण.

भाजी करून बघितली. छान लागते.
पाणी न टाकलेले उत्तम. लगदा होतो पाण्यामुळे..
कांदा-टमाट्याचे प्रमाण योग्य असावे.

प्रिय योगेश जी
तुम्ही आमचीच रेशीपी चोरलीत राव.
आमच्या रेशिपी चं नाव हंग्री बर्ड,पण आमच्या भाजी ला एव्हडा साज शृंगार नसतो.
आता डायरेक ट्रेलर सुरु करतो....
ती गावाला गेलेली...मी,उशिरा कधीतरी आळोखे पिळोखे देत उठतो...पोळ्याच्या डब्यात काल रात्रीच्या करून ठेवलेल्या तीन चार पोळ्या उदासपणे झोपलेल्या असतात.....गॅस वर तवा तसाच आळस देत पडलेला असतो....आळस हि शोधाची जननी आहे...काय करून खावं बरं ?... कपाट उघडतो....युरेका !.... राजलक्ष्मी फरसाण चा पुडा...पटकन तवा पाण्याखाली विसळून घेतो...गॅस लावतो...तवा ठेवतो...काव काव...काव काव...कावळ्यांचा आवाज?...बाहेर बघतो...कौवा किधर है भाई?...ते बिचारे पोटातले कावळे...तव्यावर पाण्याचा शिपका....चुर्रर्रर्र... थोडंसं तेल... मोहरी...जिरे... तडतडतड..बस होगया...अर्धा कप पाणी...मिठाळ्यात बचकन हात घालून तिखट मीठ त्या पाण्यात टाकतो...(मनातल्या मनात जीभ चावतो ,प्रत्येक पॉट मध्ये छोटे चमचे असताना हे असं...ईट्स बिग क्राईम... ऊसका बस चले तो वो मेरी ऊंगलीया तोड देती )... ईकडे त्या पाण्याला ऊकळी येत असते ....भसाभस दोन मुठी फरसाण त्यात टाकतो....पोळ्याच्या भाण्डयातल्या पोळ्या काढून ते भांड तावयावर उपडं ठेवतो.....भुकेल्यापोटी दोन मिनिट सुद्धा दोन तासा सारखे वाटतात....ते उपडं भांडं बाजूला करतो.....भाजी चमच्याने सावडून मध्ये घेतो.....आणि उभ्या उभ्या ती तावयातली भाजी खायला सुरु करतो....अप्रतिम , अमेझींग , आऊट ऑफ धिस वल्ड....भुकेला कोंडा आणी निजेला धोंडा