पळवाट - भाग १
बेडवर पडल्या पडल्या शरूनं इतका वेळ आणलेला खंबीरपणाचा उसना आव गळून पडला. झोपायला म्हणून गेलेलं कुणीही झोपलं नव्हतं. सगळेच भूतकाळाची वर्तमानाशी सांगड घालायचा प्रयत्न करत होते. पण असं झालेल्या चुका दुरुस्त करून पुन्हा मनमोकळं जगता येत असतं तर आणखी काय हवं जगायला?
"काकू, आज मी जरा एका मैत्रिणीकडे जाऊन येणार आहे. दुपारपर्यंत येईन. माझी वाट बघू नको जेवायला."
दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आवरता आवरता शरुनं काकूला सांगितलं.
आपण घर सोडून आलोय या गोष्टीचं शरूच्या चेहऱ्यावर जराही वैषम्य दिसत नाही. काकूंना जरा आश्चर्यच वाटलं, पण ते चेहऱ्यावर न दाखवता त्या म्हणाल्या,
"अगं शरू कालच आलीयेस. आराम कर जरा. असं काय महत्वाचं काम आहे मैत्रिणीकडे?"
"मला तिच्या ऑफिसमध्ये अर्ज द्यायचाय नोकरीसाठी." शरूनं तितक्याच शांतपणे उत्तर दिलं.
ते ऐकल्यावर मात्र काकूंना धक्का बसला. हातात चहासाठी आधण ठेवायला काढलेलं पातेलं तसंच ओट्यावर ठेवून त्या तिच्या जवळ गेल्या.
"शरू जरा धीरानं घे बाळा. असं तडकाफडकी निर्णय घेऊन कसं चालेल. जावईबापूंशी एकदा बोलून बघ.."
"मी खूप विचार करून निर्णय घेतलाय. आता मी परत जाणार नाही."
"अगं पण सांगशील का तरी असं काय झालंय? इतकी चांगली माणसं आहेत...कशासाठी हा अविचार?"
"तुला नाही कळायचं ते काकू.."
हताश सुरात शेवटी काकू तात्यांना म्हणाल्या,
"अहो तुम्ही तरी समजून सांगा तिला.. "
पेपर वाचत बसलेल्या तात्यांनी पेपरमधून मानही वर न काढता सांगितलं,
"मी कुणालाही काहीही सांगणार नाही. माझं कुणी काही ऐकत का? मनमानी करायची सवयच लागलीये त्याला काय इलाज?"
"अहो तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे...आतातरी असं काही बोलू नका.."
"राहू दे काकू..तात्यांनी दखल घेण्याएवढे मोठे नाहीत माझे प्रश्न. माझं मी निस्तरीन. निघते मी आता.." खांद्याला पर्स अडकवत शरू घराबाहेर पडली.
"अगं खाऊन तरी जा.." काकू दाराजवळ पोचेपर्यंत शरू गेटबाहेर पडली होती.
"मी काय म्हणते, आपणचं एकदा फोन करूयात का जावईबापुंना.." आत येऊन तात्यांच्याजवळ बसत काकू म्हणाल्या.
त्यांच्या आर्जवी स्वरांनी तात्यांनी काकूंकडे पाहिलं. आताशा जरा थकल्यासारखी दिसतेय नाही, त्यांच्या मनात आलं. गेल्या काही वर्षांत आपण फारच दुर्लक्ष केलंय सुलुकडे. भरल्या डोळ्यांनी काकूंचा हात हातात घेत तात्या समजुतीच्या सुरात म्हणाले,
"हे पहा, शरून आपल्याला काही सांगितलं नाही अजून. नवरा बायकोच्या भांडणात आपण असं एकदम बोलणं बरं नाही. झाले असतील काही मतभेद. एवढं ताणायला नको हे पटतंय मला.. पण थोडा वेळ देऊन बघूया तिला.."
तात्यांच्या इतक्या आपुलकीच्या शब्दांनी काकूंना गहिवरून आलं. दोघे काही न बोलता बसून राहिले. जरा वेळाने काकूच म्हणाल्या,
"खरं सांगू का आता खूप थकायला झालं हो. आता हा असा ताण नाही सहन होत. काकू शरूचे लाड करते, आम्हाला नीट पहात नाही असं कुणी म्हणू नये म्हणून आईबापाची माया दिली मुलांना. कधी वाटतं शरू झाल्या झाल्याचं ज्याला त्याला आपआपल्या घरी पाठवलं असत तर शरू आज आपल्याशी अशी त्रयस्थासारखी वागली नसती..कधी वाटतं देवानी तरी का घातलं असावं तिला आपल्या पोटी? आईबाप म्हणून तिनी आपल्याकडे कधी पाहिलंच नाही... "
"जाऊ द्या आता, किती विचार करणार त्याच त्याच गोष्टींचा. मी तर म्हणतो शरूचाही फार विचार करु नका. आहे जरा आक्रस्ताळी स्वभाव पण पोर विचारी आहे. तिला काय करायचं आहे हे ठाम समजल्याशिवाय नाही ती एवढा टोकाचा निर्णय घ्यायची."
आज चक्क तात्यांच्या तोंडून शरूचं कौतुक ऐकून काकूंना त्याही परिस्थितीत हसू आवरलं नाही.
"तिच्या मागे एवढं चांगलं बोलताय, त्यापेक्षा तिलाच सांगितलं तर .. माझी मधल्यामधे फरफट कशाला?"
"काय करणार? नमतं घ्यायची सवय नाही कुणापुढे!"
"शोभता अगदी बापलेक."
"बरं मी जरा एक चक्कर मारून येतो बाहेर." असं म्हणून तात्या बाहेर पडले.
तात्यांच्या तेवढया बोलण्यानेही काकूंना हुरूप आला. संसाराच्या रहाटगाडग्यात दोघे कधी असं मोकळेपणानं बोलले नव्हते. जेव्हा तरुण होते, एकमेकांविषयी आकर्षण होतं तेव्हा घरात सतत माणसांचा राबता आणि जेव्हा घर रिकाम झालं तेव्हा परिस्थितीने दोघांना जवळ आणण्याऐवजी दूर केलं.
विचारात हरवलेल्या काकू भानावर आल्या त्या फोनच्या रिंगने.
"काकू मला यायला संध्याकाळ होईल. महत्वाचं काम आहे." शरूनं घाईघाईत सांगितलं.
"शरू अगं काय चाललंय तुझं?प्रसंग काय आपण वागतोय काय जरातरी भान ठेव. का असा त्रास देतीयेस? आताच्या आता घरी ये बघू तू."
"काकू मी नाही येऊ शकत आता, मी वकीलांकडे आलीये."
वकीलांकडे काम म्हणल्यावर काकूंच्या पायाखालची जमीन सरकली. होता नव्हता तो धीर एकवटून त्या म्हणाल्या,
"शरू अगं बाळा एकदा बोल तरी आमच्याशी..आम्ही कुणी नाही का तुझे?"
शरूला खूप काही बोलायचं होतं पण ती बोलू नाही शकली. घशात आलेला आवंढा तसाच मागे ढकलत तिने काकूला आल्यापासून जे उत्तर दिलं होतं तेच आताही दिलं.
"बोलू नंतर."
काकूंनी फोन ठेवला आणि तशाच वाहत्या डोळ्यांनी देवघरातला गणपती काढून पाण्यात ठेवला. डोळ्यातलं पाणी पुसत आता तूच बघ काय ते असं म्हणून त्या पुन्हा नव्या उमेदीने उभ्या राहिल्या. कुठून हे असं बळ येत असावं? याला कारण देवावरची आंधळी श्रद्धा आहे म्हणावं का आपल्या माणसानं प्रेमानं, समजुतीन बोललेले चार शब्द?
आयुष्यातला इतका महत्वाचा निर्णय घेऊनही शरू डळमळली नव्हती, पण कोर्टात वकिलांच्यापुढे बसल्यावर तिला का कोण जाणे अवघडल्यासारखं वाटू लागलं. वकीलांशी बोलताना हातापायाला घाम सुटला. एकदा नोटीस पाठवली आणि दोघांच्या सह्या झाल्या की संपलं सगळं. मग पुन्हा मागे नाही फिरता येणार. नवं आयुष्य, नवी सुरुवात हे सगळं जगाला सांगायला, पण मनाचं काय? मनाला नाही झटकून टाकता येत हे असे ओरखडे. आपण चूक तर करत नाहीये ना? आज कितीतरी दिवसांनी शरूला कुणाच्यातरी आधाराची गरज वाटत होती. तिच्यामागे ठामपणे उभे राहिल, तुझा निर्णय पेलण्याची शक्ती तुझ्यात आहे असं सांगू शकेल अस कुणीतरी जवळ हवं होतं.
वकिलांना मी परत येते असं सांगून शरू तिथून बाहेर पडली. ऑफिसबाहेर ठेवलेल्या बेंचवर जवळ जवळ कोसळत तिनं एवढा वेळ आत दाबून ठेवलेल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली. तेवढ्यात एक ओळखीचा आवाज कानावर पडला.
"शरयू?"
त्याला तिथे पाहून शरू दचकली.
"तू इथे?"
"माझं सोड, मी पडीक असतो इकडे.. पण तू? आणि चक्क रडत? बापरे आजचा दिवस इतिहासात वगैरे जमा व्हायला पाहिजे..."
शरूचा एकेकाळचा मित्र, प्रियकर तिच्यापुढे उभा होता. प्रत्येक गोष्ट लाइटली घेणारा!
रडता रडता हसत शरू म्हणाली,
"अजूनही तसाच आहेस."
*****
क्रमश:
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4352
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान टर्न घेतलांय कथेनं
खुप छान
खुप छान
गुड. वाचतोय. पुभाप्र.
वाचतेय..
हा भागही आवडला. पुभाप्र!
ज्यांचं लेखन आवर्जून वाचावसं
अप्रतिम अन प्रवाही लेखन.
छान लिहिताय
खुप छान
भारी.
रारा, पुढचा भाग ?
मस्तच. वाचतेय.
सर्व वाचक आणि प्रतिसादकांची
रारा,
In reply to सर्व वाचक आणि प्रतिसादकांची by रातराणी
आ.रारा पुढे काय झाल?
पुढे काय झाले
उत्सुकता वाढलिय. पुभाप्र