राजयोग - १२

रातराणी's picture
रातराणी in जनातलं, मनातलं
11 Jun 2018 - 5:30 pm

पहारेकऱ्यांनी निर्वासनासाठी तयार रघुपतीला विचारलं, "ठाकूर, कोणत्या दिशेला जाणार?"

रघुपती म्हणाला, "पश्चिम दिशेला.."

नऊ दिवस पश्चिम दिशेला प्रवास केल्यानंतर पहारेकरी रघुपतीला घेऊन ढाका शहराच्या जवळपास पोचले. रघुपतीला तिथे सोडून ते परतीच्या प्रवासाला लागले.

रघुपती मनातल्या मनात म्हणाला, "कलियुगात ब्राह्मणाचा शाप फळणार नाही. आता बुद्धीनेच काम करायला हवं. बघूया तरी गोविंदमाणिकय काय चीज आहे आणि मी काय चीज!"

त्रिपुराच्या सीमेलगत एका छोट्या कोपऱ्यात असलेल्या त्या मंदिरात मुघल साम्राज्याच्या बातम्या काही पोचत नसत. त्यामुळे ढाका पोचल्यावर रघुपतीला मुघलांची राज्यनिती, त्यांचे रितीरिवाज याबद्दल कुतुहल वाटू लागले.

तेव्हा मुघल सम्राट शाहजहानचं राज्य होतं. त्याचा तिसरा मुलगा औरंगजेब दक्षिणेला विजापूरकडे आक्रमण करायला नियुक्त केला होता. दुसरा मुलगा शुजा बंगालचा राजा होता. त्याची राजधानी राजमहल हे शहर होती. सगळ्यात लहान मुलगा शहजादा मुराद गुजरातमध्ये राज्य करत होता तर सगळ्यात मोठा मुलगा दारा राजधानी दिल्लीतच रहात होता. सम्राटाचं वय अडुसष्ट वर्षे आहे. वयोमानानुसार सुरू झालेल्या प्रकृतीच्या तक्रारींमुळे राज्यकारभाराची सगळी जबाबदारी आता दाराच्या खांद्यांवर पडली आहे.

काही दिवस ढाक्यात राहून रघुपतीने उर्दू शिकून घेतले. नंतर राजमहलच्या (शुजाची राजधानी) दिशेने चालू लागला.

तो राजमहलला पोचेपर्यंत संपूर्ण भारतदेशात खळबळ माजली होती. सगळीकडे बातमी पसरली की शाहजहान अंथरुणाला खिळला आहे, आता त्याचे फार दिवस शिल्लक नाही. ही बातमी कळताच शुजा सेनेला घेऊन दिल्लीकडे रवाना झाला. शहाजहानच्या चारही मुलांमध्ये सम्राटाचा मुकुट मिळवण्यासाठी एकच चढाओढ सुरू झाली.

राजमहलमध्ये शुजाच्या अनुपस्थतीत अंदाधुंदी माजली. रघुपती तातडीने शुजाच्या मागे जाऊ लागला. त्याचे काही सेवक, वाहक होते त्या सर्वांना त्याने परत पाठवले. बरोबर असलेले दोन लक्ष रुपये एका निर्जन ठिकाणी पुरून ठेवले आणि त्या जागेवर खूण करून ठेवली. जवळ थोडेसेच पैसे ठेवले. जळलेल्या झोपड्या, ओसाड पडलेली गावं, नासधूस केलेली शेतं पहात रघुपती न थांबता चालत राहिला. त्यानं संन्याशाचा वेष धारण केला. पण तरीही त्याचं कुणाकडे आदरातिथ्य होणं कठीण आहे कारण, ज्या रस्त्याने सैनिक गेले आहेत, तिथे सगळीकडे फक्त वैराण जमीन आहे. घोडे आणि हत्तीना चारण्यासाठी सैनिकांनी अर्धवट तयार झालेली पिके कापून नेली आहेत. मागे एक दाणाही शिल्लक ठेवलेला नाही. चहूकडे फक्त लुटमारीचे अवशेष शिल्लक राहिलेत. गावंच्या गावं ओसाड पडली आहेत, नशिबाने कुठे एक दोन माणसं दिसली तर त्यांच्याही चेहऱ्यावर हसू नाही. घाबरलेल्या हरिणासारखे ते सतत सतर्क आहेत. ना त्यांना कुणाची दया येते, ना कुणावर विश्वास ठेवतात. सुनसान रस्त्यांवर झाडांखाली दोनचार लोक काठ्या घेऊन उभे राहतात, कुणी वाटसरू सापडला तर त्याला लुटतात. धूमकेतूच्या मागे मागे जसा उल्का वर्षाव होतो तसे हे लुटारू, सैनिक गावे लुटून गेल्यानंतर जे काही सापडेल ते, शिल्लक असेल ते लुटून नेतात. कधीकधी तर भटक्या कुत्र्यांप्रमाणे प्रेतांवरूनही सैनिक आणि दरोडेखोरांच्या टोळ्यांमध्ये भांडणं जुंपतात. निष्ठुरता हा सैनिकांचा खेळ झालाय. रस्त्यात उदासपणे चाललेल्या कुणा वाटसरूच्या पोटात खपकरून तलवार चालवणे, किंवा त्याच्या डोक्यावरून पगडीबरोबर थोडंस डोकं उडवणे म्हणजे त्यांना किरकोळ मजेच्या गोष्टी वाटतात. लोकांना आपल्याला घाबरलेलं पाहून त्यांना अजूनच चेव चढतो. गाव लुटून झाल्यावर तिथल्या लोकांना त्रास देण्यात त्यांना कोण आनंद होतो. कधी दोन ब्राह्मणांना पाठीला पाठ लावून एकत्र बांधून त्यांच्या नाकात वेसण घालतात. कधी दोन घोड्यांच्या पाठीवर एका माणसाला बसवून, दोन्ही घोड्याना चाबूक मारतात. घोडे वेगवेगळ्या दिशेला उधळले की मधल्यामध्ये माणूस खाली पडून त्याचे हातपाय तुटतात. सैनिक रोजच लोकांच्या जीवाशी काहीतरी नवीन खेळ खेळतात. गावांना विनाकारण आग लावून म्हणतात, बादशहाच्या स्वागताला रोषणाई करतोय. सैनिक जातील त्या रस्त्यांवर, गावांवर केवळ अत्याचाराच्या खुणा शिल्लक राहिल्या आहेत. इथे कोण रघुपतीची सरबराई करणार? कधी उपाशी राहून तर कधी अर्धवटपोटी राहून तो कसेबसे दिवस ढकलत होता. रात्री अंधारात एका मोडकळीस आलेल्या झोपडीत थकून भागून झोपला होता, सकाळी उठून पाहिलं तर एका शीर नसलेल्या धडाची उशी करून पूर्ण रात्र झोपला होता. एकदा दुपारी भूक लागल्यावर एका झोपडीत शिरला, तिथे एक माणूस तुटलेली संदुक पोटाशी कवटाळून बसला होता. रघुपतीला वाटलं आपलं धन लुटून नेलं म्हणून दुःख करत असेल. जवळ जाऊन त्याला हात लावला तर तो अगदी सहज खाली पडला. केवळ मृतदेह!

एका रात्री रघुपती एका झोपडीत झोपला होता. झोपडीचा दरवाजा हळूहळू किलकिला झाला. चांदण्यांच्या प्रकाशाबरोबर काही सावल्याही आत आल्या. खुसरफुसर आवाज आले. रघुपती घाबरून उठून बसला. त्याला तिथे बघून बायकांचे "अगं बाई!", "अरे देवा!" असे आवाज आले. एक पुरुष पुढे होऊन म्हणाला, "कोणय रे तिथे?"

रघुपती म्हणाला, "मी एक ब्राह्मण आहे, वाटसरू. तुम्ही लोक कोण आहात?"

"हे आमचं घर आहे. आम्ही घर सोडून पळून गेलो होतो, आता मुघल सैनिक निघून गेले असं ऐकल्यावर परत आलोय."

रघुपतीने विचारलं, "कुठल्या दिशेला गेले सैनिक?"

"विजयगढच्या दिशेने, आतापर्यंत तर विजयगढच्या जंगलात प्रवेश केला असेल."

अजून जास्त काही बोलत न बसता त्याच क्षणी रघुपतीने पुढचा प्रवास सुरु केला.

***

विजयगढचं विस्तीर्ण जंगल ठगांचा अड्डा आहे. जंगलातून गेलेल्या रस्त्यावर कितीतरी माणसांचे सांगाडे अर्धवट गाडले गेले आहेत, त्यावर जंगली फुलं उमलली आहेत. जंगलात वडाची, बाभळीची, कडुनिंबाची झाडे आहेत, कितीतरी प्रकारच्या वेली आणि झुडपं वाढली आहेत. ठिकठिकाणी छोटी छोटी तळी आहेत. सतत झाडांची पाने पडून त्यांचं पाणी हिरवंगार झालं आहे. छोट्या छोट्या पायवाटा सापांप्रमाणे इकडून तिकडे, तिकडून इकडे पसरल्या आहेत. झाडांच्या फांद्याफांद्यावर माकडे आहेत. वडाच्या झाडाच्या शेकडो पारंब्याबरोबर माकडांच्या शेपट्या झुलत आहेत. भग्न मंदिराच्या अंगणावर मोगऱ्याच्या फुलांचं आणि माकडांच्या पांढऱ्याशुभ्र दातांचं आच्छादन आहे. संध्याकाळी आभाळभर पसरलेल्या झाडांच्या फांद्यांवर पोपटांचे थवेच्या थवे येऊन बसतात. त्यांनी केलेल्या गोंगाटानी जंगलातल्या त्या घनदाट, किर्र अंधारावरही चरे उमटतात. या विशाल जंगलात आज जवळजवळ वीस हजार सैनिकांनी प्रवेश केला आहे. झाडा, पानाफुलांनी बहरलेले हे जंगल आज फक्त तीक्ष्ण नख्यांच्या, दातांच्या सैनिकांचं घरटं झालं आहे. सैनिकांचे जमाव बघून असंख्य कावळ्यांचे थवे आकाशात उडत आहेत, त्यांचीही झाडांवर येऊन बसण्याची हिंमत होत नाही. सेनापतीने सैनिकांना कोणत्याही प्रकारे दंगा करण्यास मनाई केली आहे. वाळलेली लाकडे गोळा करून, ती पेटवून, हळूहळू बोलत ते जेवण तयार करत आहेत. त्यांच्या बोलण्याच्या आवाजाने सगळं जंगल गुन गुन करत आहे, रातकिड्यांचा आवाजही नाही. झाडांना बांधलेले घोडे खुरांनी धूळ उडवत मधेच खिंकाळत आहेत, त्या आवाजाने जंगल दचकत आहे. भग्न मंदिराच्या जवळ एका मोकळ्या जागेत शाहशुजाचा डेरा लावला आहे. बाकी सगळ्यांची व्यवस्था झाडांखालीच आहे.

एक अख्खा दिवस कुठेही विश्रांती न घेता चालल्यावर रघुपतीने जंगलात प्रवेश केला. रात्र झाली होती. खूपसे सैनिक झोपले होते, काही शांतपणे पहारा देत होते. अधेमधे कुठेतरी शेकोट्यांमध्ये थोडी थोडी आग अजूनही जळत होती. अंधाराने जणूकाही खूप कष्टाने आपले लालबुंद डोळे उघडले असावेत असं त्या आगीच्या गोळ्यांना पाहून वाटतं होतं. जंगलात पाऊल ठेवताच रघुपतीला वीस हजार सैनिकांच्या श्वासोश्वासाबरोबर त्यांच्या तिथल्या अस्तित्वाची जाणीव झाली. हजारो झाडांच्या उंच उंच पसरलेल्या फांद्या त्यांच्यावर लक्ष ठेऊन होत्या. करड्या डोक्याचं वटवाघूळ जसं आपल्या नवजात पिलावर पंख पसरून बसतं, तसंच जंगलाच्या बाहेरची विराट रात्र, जंगलाच्या आतल्या काळ्याकभिन्न रात्रीला आपल्या पंखाखाली दाबून चिडीचूप बसली आहे. जंगलाच्या आतली रात्र तोंड खुपसून झोपलिये तर बाहेरची रात्र पापणीही न हलवता जागी आहे. त्या रात्री रघुपती जंगलाच्या अगदी किनाऱ्यावर एका कोपऱ्यात झोपला.

सकाळी चार दोन लाथाबुक्क्या मिळाल्यावर तो गडबडून जागा झाला. बघितलं तर भरगच्च दाढ्या असलेले, डोक्यावर पगड्या बांधलेले काही सैनिक अगम्य भाषेत बडबड करीत होते. रघुपतीने अंदाज लावला हे शिव्या देत असावेत. त्यानेही मग बंगालीमध्ये मनात येतील त्या शिव्या दिल्या. रघुपतीबरोबर ते ओढाताण करू लागले.

"काय गंमत आहे का?" असे म्हणत रघुपती ओरडू लागला. पण त्यांच्या वागण्यातून ते गंमत करत असावेत असं काही वाटलं नाही. काहीही दयामाया न दाखवता, निर्विकारपणे ते त्याला ओढत जंगलात नेऊ लागले.

रघुपती नाराजीने ओरडत म्हणाला, "ओढताय कशाला? मी स्वतःच येतो, इतक्या दूर कशाला पायपीट करत आलोय मग?"

सैनिक हसू लागले, त्याच्या बंगाली बोलण्याची नक्कल करू लागले. हळूहळू त्याच्या चारी बाजूला सैनिकांचा मोठा जमाव तयार झाला. भरपूर गोंधळ सुरू झाला. त्रास देण्याची मर्यादा तर केव्हाच पार झाली. एका सैनिकाने शेपटीला पकडून एक खार आणली आणि रघुपतीच्या मुंडन केलेल्या डोक्यावर सोडून दिली, त्याला पाहायचं होतं खार त्याचं डोकं फळ समजून खाते की नाही. एक सैनिक त्याच्या नाकासमोर वेताची मोठी काठी वाकवून त्याच्याबरोबर चालू लागला, चुकून जर ती काठी निसटली असती तर रघुपतीच्या नाकाचा शेंडा वरच्यावर खुडला गेला असता. सैनिकांच्या खिदळण्याचा
आवाज सगळ्या जंगलात घुमू लागला. आज दुपारी त्यांना युद्धावर रवाना व्हायचंय, त्यामुळं सकाळी आयत्याच सापडलेल्या रघुपतीची ते भरपूर मजा घेऊ लागले. त्याचा मनसोक्त छळ करून झाल्यावर ते त्याला शाहशुजाकडे घेऊन गेले.

रघुपतीने शुजाला पाहिल्यावर खाली वाकून त्याचं अभिवादन नाही केलं. एक देव आणि स्वधर्मिय सोडले तर रघुपती कुणाला नमस्कार करीत नाही. ताठ मानेने त्याच्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला, "शहेनशाहचा विजय असो!"

शुजा आपल्या सरदारांबरोबर मद्यपान करीत बसला होता. जडावलेल्या डोळ्यांनी त्यानं विचारलं, "काय? काय गोंधळ चाललाय?"

सैनिक म्हणाले, "जनाब, शत्रूचा हेर लपूनछपून आपल्या सैन्याची बातमी काढायला आला आहे. आम्ही त्याला पकडून आणलं आहे."

शुजा म्हणाला, "बरं बरं! बिचारा पहायलाच तर आलाय ना? मग त्याला नीट सगळं दाखवून सोडून द्या. परत गेल्यावर सांगायला गोष्ट नको का? "

रघुपतीने त्याला मोडक्यातोडक्या हिंदीमध्ये सांगितलं, "मी सरकारांकडे कामाची प्रार्थना करतो."

शुजाने अत्यंत आळशीपणे हात हलवून त्याला लगेच निघून जायचा इशारा केला. म्हणाला, "गरम!" पंख्याने वारं घालणारा मागचा सेवक दुप्पट वेगाने वारं घालू लागला.

दाराने आपला मुलगा सुलेमानला राजा जयसिंहाच्या नेतृत्वाखाली शुजाच्या आक्रमणाचा बंदोबस्त करायला पाठवलं आहे. त्याची विशाल सेना जवळ आली असल्याची खबर शुजाला मिळाली आहे. त्यामुळेच तो विजयगढचा किल्ला काबीज करून तिथं आपली सेना एकत्र करायला उतावीळ झाला आहे. किल्ला आणि सरकारी खजिना ताब्यात देण्याची सूचना घेऊन दूत विजयगढचे महाराज विक्रमसिंहाकडे गेला, पण महाराजांनी त्याच दूताला उलटपावली परत पाठवून उत्तर दिले, "मी फक्त दिल्लीपती शहेनशाह शाहजहान आणि जगनियंता ईश्वराला जाणतो. शुजा कोण? कोणा शुजाबीजाला मी ओळखत नाही."

मद्याच्या धुंदीत जड झालेल्या आवाजाने शुजा म्हणाला, "एवढी गुर्मी? आता पुन्हा युद्ध करावं लागणार. नसता उपद्व्याप आहे!"

रघुपतीने तिथे चालू असलेलं सगळं बोलणं टिपलं. सैनिकांच्या हातून सुटताच तो विजयगढच्या दिशेने जाऊ लागला.

कथा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

11 Jun 2018 - 7:34 pm | प्रचेतस

पूर्णपणे अनपेक्षित.
एकदम म्हणजे एकदमच वेगळं वळण लागलंय कथेला.

एस's picture

11 Jun 2018 - 8:35 pm | एस

+१.

राजाभाउ's picture

12 Jun 2018 - 10:48 am | राजाभाउ

+११

लेखमाला खूप छान चाललीये.

कठीण आहे. ज्या रस्त्याने सैनिक जात आहेत,

असं का लिहिलंय काही विशेष कारण?

ज्ञानोबाचे पैजार's picture

12 Jun 2018 - 12:58 pm | ज्ञानोबाचे पैजार

आज कथेने एकदम अनपेक्षीत वळण घेतले
पुभाप्र
पैजारबुवा,

प्रीत-मोहर's picture

12 Jun 2018 - 2:46 pm | प्रीत-मोहर

रातराणी सगळे भाग वाचलेत.
छान लिहिताय!!

हे लिहू का नको अश्या विचारात होतो, पण मागील भागांपेक्षा हा १२ वा भाग डावा वाटला. हा भाग घाईत लिहिला, भाषा / वाक्यरचनेकडे थोडे दुर्लक्ष झाले असे वाटले.

आगाऊ प्रतिक्रियेबद्दल माफी असावी.

पु भा प्र

सिरुसेरि's picture

13 Jun 2018 - 2:01 pm | सिरुसेरि

पुभाप्र

विजुभाऊ's picture

19 Jun 2018 - 9:09 pm | विजुभाऊ

छान प्रवाही कथानक.
आवडतय

शिव कन्या's picture

30 Jun 2018 - 10:35 am | शिव कन्या

वाचिंग वाचिंग