पिंजारी - ३

श्रावण मोडक's picture
श्रावण मोडक in जनातलं, मनातलं
9 Feb 2009 - 8:44 pm

होळीचे दिवस, फॅक्स...
"पेवलीत बंधारा होतोय. विस्थापन शून्य..."

पेवलीची शेती संपूर्णपणे पावसावर अवलंबून होती. गेल्या काही वर्षातील पावसाची स्थिती पाहता पाण्याची काही कायमस्वरूपी सोय आवश्यक होती आणि जलसंधारणाचं काम संस्थेच्या मार्फत, गावकऱ्यांच्या श्रमदानातूनच करण्यापर्यंतचा विचार होत आला होता. होळीच्या आधी धान्य बँकेद्वारे धान्य वाटपाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी पत्रकारांसमवेत गावकऱ्यांचा संवाद सुरू होता. गावाचा महत्त्वाचा प्रश्न कोणता, या पत्रकारांच्या प्रश्नावर 'पाणी' हे उत्तर प्रश्न म्हणून पुढं येणार होतं आणि तेच आलं.
"गावच्या बंधाऱ्याचं काय झालं?" 'लोकमानस'च्या गोपीचंदचा प्रश्न.
बंधारा? रजनीला काहीही कळेना. पण गोपीचंद उगाच काही विचारणार नाही. तिला वाटून गेलं क्षणभर की, हाही बंधारा कागदोपत्री पूर्ण झालाय की काय? पण नाही. खुलासेवार बोलणं झालं तेव्हा गोपीचंदच म्हणाला, "प्रशासकीय मंजुरी मिळाली होती, पुढचं पाहून घे तू एकदा. बहुदा अर्थसंकल्पीय मंजुरी झालेली नसावी आत्तापर्यंत. कारण कोणी फॉलोअप केला नसणार."
"पुनर्वसन..." रजनी बोलू लागली, पण तिला अर्ध्यावर तोडत गोपीचंदच म्हणाला, "नाही. पुनर्वसन नाही. साधा बंधारा आहे. या गावापुरता विचार केलेला. दरबारसिंग आमदार होते तेव्हाचा."
रजनीनं मान डोलावतानाच ठरवून टाकलं, हा बंधारा प्रत्यक्ष आणायचा.
जिल्हा परिषद, पाटबंधारे खाते, जलसंधारण महामंडळ असं करत रजनी मंत्रालय स्तरापर्यंत जाऊन पोचली तेव्हा काही गोष्टी स्पष्ट झाल्या. गोपीचंद म्हणाला होता त्याप्रमाणे या बंधाऱ्याला अर्थसंकल्पीय मंजुरी मिळाली नव्हतीच. पण बंधाऱ्याची बाकी रूपरेषा पक्की झालेली होती. पेवलीच्या गरजेपुरतं पाणी त्यातून येणार होतं. त्या भागांतील वेगवेगळ्या गावांसाठी असे बंधारे घेण्याची कल्पना दरबारसिंग नाईक यांनी मांडली होती. त्यापैकी एकाही बंधाऱ्यात बुडित होणार नाही आणि गावाचा पाण्याचा प्रश्न सुटेल अशी ती योजना. ती प्रत्यक्षात आलीच नव्हती, यात काहीही नवल नव्हतं. त्याच योजनेत पेवलीला हा बंधारा मिळाला होता. रजनीला हे काहीच ठाऊक नव्हतं. इतक्या वर्षांतील कामादरम्यानही कुणी बोललं नव्हतं. पण ती योजना उचलून धरायची आणि आरंभ पेवलीतून करायचा हे तिनं मनाशी पक्कं केलं.
पण... पेवली या गावाला हा शब्द एरवीही नवा नव्हता.
"मी तपास सुरू केला आणि चाकं फिरली. दरबारसिंग यांच्या या योजनेत एकाही गावात विस्थापन न होता सिंचनाची सोय होणार होती. म्हणून आम्ही त्या योजनेच्या प्रेमात पडलो होतो. दरबारसिंग यांचा काळ वेगळा, आजचा वेगळा..." रजनी सांगायची.
बंधाऱ्याविषयीच्या हालचालींना वेग आला तशा गावकऱ्यांच्या आशा पालवू लागल्या. गेल्या काही वर्षांपासून तहानलेली शेतं पाणी पिण्याची शक्यता त्यांना दिसू लागली. काही गावकरी तर असे वेडे की, त्यांनी स्वप्नंही पाहणं सुरू केलं होतं. पिंजारीही त्यापैकीच. आपल्या शेतात पाणी आलंय, शेत पिकलंय हे तिचं नेहमीचं स्वप्न.
एक पेवलीच नव्हे तर परिसरातील काही गावंही या हालचालींसाठी एकत्र आली. धरणे, मोर्चा, सभा, पदयात्रा यांच्या जोडीनंच पिकलेल्या शेताची स्वप्नं पाहण्यात दंग होऊन गेली.
---
वर्षानंतरचा उन्हाळा, दूरध्वनीवरून...
"पेवलीचा बंधारा रद्द, पुढं मोठं धरण. पुन्हा मरण. कारण पुनर्वसनाचा प्लॅनच नाही..."

दरबारसिंग नाईक यांनी मांडलेल्या योजनेची चर्चा जोरात सुरू झाली आणि रजनीच्या संघटनेमागं लोकांची ताकद उभी राहू लागली.
"योजनेसाठी आम्ही पेवलीतून सुरवात केली. नेहमीप्रमाणे आधी निवेदन, आपल्या समर्थक आमदारांकडून विधिमंडळात प्रश्न हे उपाय झाले आणि शेवटी संघर्षाचा पवित्रा घेतला. पण तो पेवलीपुरताच मर्यादित न ठेवता असे बंधारे होणाऱ्या इतर गावांनाही जोडून घेतलं..."
मांडणगावात रजनीच्या पुढाकारानं निघालेल्या मोर्चात सुमारे पाच हजार गावकरी होते. मोर्चातून रजनीच्या संघटनेची ताकद दिसून आली आणि हालचालींना वेग आला.
"पालकमंत्र्यांनी या योजनेचा विचार करू असं आश्वासन दिलं आणि पाटबंधारे खात्यालाच योजनेवर टिपण देण्यास सांगितलं. तिथंच सारं फसलं. या छोट्या बावीस बंधाऱ्यांची योजना दरबारसिंगांनी मांडली होती. त्या बंधाऱ्यांना येणाऱ्या खर्चाचा अंदाज खात्यानं काढला. मग सुरू झाली लाभ-हानीची आकडेमोड.
"पालकमंत्र्यांचा या योजनेला विरोध होताच. कारण त्याचं श्रेय नायकांना गेलं असतं आणि त्यांच्या आता मृतवत झालेल्या पक्षानं कदाचित उचल खाल्ली असती ही भीती त्यांना होती. त्याहीपलीकडं एक मोठी भीती होती. असे बंधारे झाले तर त्या भागातील वंचित जगण्यातून लोक बाहेर पडतील आणि तसं झालं तर आपली राजकीय पकड ढिली होईल ही खरी भीती. पेवली आणि परिसरातून आम्हाला मिळणारा पाठिंबा त्यांच्या डोळ्यांत भरला होताच..."
पुढं काय घडलं हे खरं तर रजनीनं सांगण्याचीही आवश्यकता नव्हती. तो अंदाज कुणीही बांधू शकतो. दरबारसिंग नाईकांची योजना रेंगाळत गेली. रजनीच्या संघटनेची संघर्षाची ताकद शासनापुढं मर्यादितच होती.
"लाभ-हानीच्या आकडेमोडीतून मग ही कल्पना पुढं आली. पेवली आणि इतर गावांच्या बंधाऱ्यांऐवजी पेवलीच्या खाली धरणच बांधायचं. कारण ते दरबारसिंगांच्या योजनेवर येणाऱ्या खर्चापेक्षा कितीतरी कमी खर्चात पुनर्वसनासह बसत होतं, असं पाटबंधारे खात्यानं लिहून टाकलं..."
विषय धरणाचा आणि इतक्या झटपट, हा कोणाच्याही मनात उमटणारा साधा प्रश्न.
"इथंच तर मेख आहे. दरबारसिंगांनी ती योजना सांगण्याच्या आधी या धरणाचा विचार सुरू झाला होता. ती कागदपत्रं मस्तपैकी उकरून काढण्यात आली. त्या आधारावर आराखडा आणि बाकी गोष्टी कागदावर मांडायला किती वेळ लागतो? अर्थातच सगळ्या हालचाली झटपट झाल्या..."
आणि ओहोळावरचा बंधारा रद्द झाला. तो ओहोळ पुढं ज्या नदीला मिळतो त्या नदीवर थोडं खाली मोठं धरण बांधण्याचं ठरलं. पण इथून प्रश्न नव्यानं सुरू झाला. धरणात काही गावं बुडत होती आणि त्यात पेवली होतं. 'इथून उठून दुसरीकडं जावं लागेल तुम्हाला,' सरकारचा कागद आला एक दिवस आणि गावात लगबग उठली.
गाव उठायचं म्हणजे, जायचं कुठं, तिथं काय असणार वगैरे प्रश्नांचा भुंगा सुरू झाला आणि तो गावासाठी स्वाभाविकच जीवनमरणाचा ठरला. पण तसं फारसं काही वावगं वाटलं नाही. कोणालाही. कारण आधीही एवीतेवी मरणाशीच लढाई सुरू होती दोनेक पिढ्या. त्यात ही भर. त्यामुळं गाव उठायला तयारच होतं. जिथं जायचं आहे तिथं काही तरी इथल्यापेक्षा बरं मिळेल ही आशा होती. आणि तसं काही मिळणार असेल तर ते हवंही होतं.
"आधी आमच्याकडं पाणी नव्हतं, पाणी येणार म्हणून भांडलो तर गावातून उठवायचं ठरवलं. गावातून उठायला तयार आहो, पण जायचं कुठं?" पिंजारीचा रोखठोक सवाल.
पाचेकशे बायकांच्या एका सभेपुढं पिंजारी बोलते आहे असं छायाचित्र आणि त्याखाली तिच्याच या सवालाचं शीर्षक केलेली बातमी वाचकाशी बोलत असायची.
"मी पेवलीत भाषण केलं, मांडणगावात केलं. पेवलीच्या आजूबाजूच्या सगळ्या गावांत जाऊन मी बायकांशी बोलले. प्रत्येक गावात सभा झाली. सगळ्या बायका गोळा झाल्या. आम्ही मांडणगावला जाऊन घेराव घातला इंजिनियरला... रामपूरच्या मोर्चावेळी लाठ्या खाल्ल्या आम्ही बायकांनीपण.." भेटली की मग पिंजारी जोशात सांगू लागायची. नेतृत्त्वाच्या नवेपणापेक्षा आपला संघर्ष सांगण्याची ओढच त्यात अधिक.
वैयक्तिक संघर्षही सुरूच असायचा. त्याविषयीही ती बोलायची. तो संघर्ष नवा नव्हे, जुनाच. संदर्भाची चौकट आता नवीन असायची. संघर्ष जुना म्हणजे वंचित जगण्याचा. तोकडी शेती, त्यावर आधारलेलं जगणं. आता नवी संदर्भचौकट म्हणजे या आंदोलनामुळं पायाला लागलेली भिंगरी. त्या जगण्यात या भिंगरीतून कशा एकेक गोष्टी अधिक पेचदार होत गेल्या त्याची ही कहाणी. हे सारं का? तर पुढं मागं तरी चांगलं आयुष्य मिळेल, आपल्याला नाही तर पुढच्या पिढ्यांना तरी.
"तुझ्यासारखं व्हावं असं इथल्या मुलीला वाटत नसेल का? वाटतंच की. मांडणगावात शाळेसमोरून मोर्चा जात होता तर आपल्या मुली कितीतरी वेळ तिथं मैदानात खेळणाऱ्या मुलींकडंच पहात उभ्या राहिल्या होत्या. एकेकीला ओढून पुढं न्यावं लागलं..." मोहाची फुलं निवडता-निवडता पिंजारी सहज बोलून जायची.
"कुठं वेळ असतो त्यांच्याकडं. इथं शेत म्हणून नाही, जंगल म्हणून नाही. कामंच कामं. पोटाला मिळायचं कसं त्याशिवाय? रजनीताई सांगते ते बरोबरच असतं. म्हणून हा झगडा."
एक-दोन तुटक वाक्यातून आपल्या जगण्याचं सार मांडून पिंजारी पुढं सरकायची.
(क्रमशः)
याआधी पिंजारी - १, पिंजारी - २

वाङ्मयकथासमाजजीवनमानअनुभवप्रतिभा

प्रतिक्रिया

प्राजु's picture

9 Feb 2009 - 9:36 pm | प्राजु

सविस्तर प्रतिक्रिया संपूर्ण कथानक वाचल्यावर देइन.
पुढचा भाग लवकर टाका.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सहज's picture

10 Feb 2009 - 6:29 am | सहज

हाही भाग ग्रामीण जीवन, मतलबी राजकारण याची आधीक ओळख करुन देणारा.

वाचतो आहे.

धनंजय's picture

10 Feb 2009 - 10:28 pm | धनंजय

माझ्या सोयीसाठी येथे पाचही भागांचे दुवे देत आहे :
पिंजारी - १, पिंजारी - २, पिंजारी - ३, पिंजारी - ४, पिंजारी - ५
-