पहाटेच्या धुक्याने जणु अंजिरी रंगाचं पांघरून घेतलं आहे व बांधावरील साखरझोपेची ग्लानी सरून जंगलाला जाग येऊ लागलीय. अशा कातरवेळी का कुणास ठाऊक पण दूर चुटिया पहाडीच्या बाजूने जोडीदाराला साद घालणाऱ्या एकाकी वाघिणीची अस्वस्थ गुरगुर ऐकत मी 'मनोलीत' अगदी एकटा उभा आहे. बांधाच्या काठावर वसलेल्या 'मनोली'तून बांधाचा विस्तीर्ण असा पाणपसारा नजरेत मावत नाहीये. पाण्याच्या पातळीच्यावर काही फुट उंचीपर्यंत दाट धुक्याच्या चादरीचे पदर लांबचं-लांब पसरलेले दिसताहेत. जंगलातील दलदलीत देवधान फुललं आहे, सोनेरी रंगाचे धानाचे तूस साऱ्या वनाची शोभा वाढवतंय. तिथल्या देवभातात एक अडई आपल्या दहाबारा पिलांनीशी चरतीये. रानकोंबड्या आणि पानकावळेही काही लांब नाहीयेत. बगळे ही एव्हाना पाण्यावर उतरू लागलेत. परसदारच्या कुंपणापलीकडे दुरवर उभ्या, भल्या मोठ्या चिंचेच्या झाडाच्या शेंड्याला, पार टोकावर "मीनखायी" घारीने तिचा 'गोदा' केलाय. गोदयात तिची पिल्लंही आहेत व मीनखायी नर बांधावरून उडत जात चारा आणुन त्यांना भरवतोय तर मादी शेजारच्या फांदीवर बसुन पिल्लांवर लक्ष ठेवून आहे. चिंचेच्या शेजारी असलेल्या जांभळीच्या जमिनीला समांतर वाढलेल्या एका फांदीवर नुकताच एक बिबट्या येऊन आरामात बसलाय. त्याची नजर बहुदा झिलाणीच्या समोर टेकडीवर गवतात चरणाऱ्या कृष्णमृगाच्या छोट्या कळपावर आहे. कृष्णमृगांना सावध करण्यासाठी माकडांची लगबग सुरू आहे.
बांधाला मिळणाऱ्या एका ओढ्याचं वळणही इथून स्पष्ट दिसतंय, तिथं पाणी खडकातून गिरक्या घेत वेगाने वाहतंय. डोहात कळंबाच्या बुंध्याचं स्वच्छ प्रतिबिंब पडलेलं आहे. पाण्यातील माशांना जाग येऊन त्यांची रोजची लगबग सुरूही झालीय. ओढ्याच्या कडेने कुणी ढिवर आपली धुटी सांभाळत बांधाकडे निघाला आहे. बांधाकडेच्या झिलाणीत हुदाळ्याची जोडी दोन पाय वर करून कसलासा अदमास घेत सावधगिरीने भक्ष्य शोधतीये. झुपकेदार शेपटीवाला एक कोल्हा त्यांच्यावर नजर ठेवून आहे. हळु-हळु तांबडं फुटू लागलंय, बांधाकडे पाहिलं की एक अलौकिक गंधर्वनगरी जणु नजरेपुढे साकारू लागलीय. जलाशयाच्या एका हाताला दूरवर गिधाड पहाडीचा डोंगर तर दुसऱ्या हाताला चिंधादेवीचा पहाड उभा आहे. कडेने सगळीकडे, दुरदूरपर्यंत झिलाण पसरलीय. झिलाणीच्या पलीकडे गोपुरासारखी वाढलेली सालाई, सावर, मोवाईची उंच झाडं दिसताहेत. एक छोट्या चणीचं भुरं अस्वल त्या झाडांवर लटकणाऱ्या मधाच्या पोळ्यांकडे अधाशी नजरेने पाहतंय. त्या झाडांच्या मधूनच कुठूनतरी टाहो फोडून पावसाची आराधना करणाऱ्या पावशा पक्ष्याचा आवाज ऐकू येतोय. जोडीला "मोरनाची"कडून मोरांचा केकाराव ही सुरू आहे. त्या झाडांच्या खूप वरून एक भलेमोठे राजगिधाड त्याच्या गिधाड पहाडावरील घरट्याकडे उडत जाताना दिसतेय.
'मनोली' तुन जंगलाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला किंजळाची झाडं लाल फुलांनी बहरली आहेत. येरुणीला ही फळं धरलीयेत. त्यावर, टिबुकली, बुलबुल, धनचिडीया, हरिद्र असे पिटुकले पक्षी मनसोक्त चरताहेत, पुढच्या कुंपणापासून थोडा दूर एक पळस आहे. त्यावर बेचक्यात, ढोलीसदृश्य जागेत पिंगळ्याच्या जोडीने घरटं केलंय. जुन्या रोपवनातील निलगिरीची उंच वनराईही दूरवरून ओळखु येतेय. बांबूची हिरवी-पिवळी बेटं ही चांगलीचं माजलीत. पलीकडे रानडुकरांच्या जंगलातून बांधाकडे यायच्या रोजच्या रस्त्याची पाळ खाली झिलाणीत उतरलीय, त्याचं पाळीवरून मुंगुस त्याच्या पिलावळीसह वस्तीला निघालेला दिसतोय, शेजारच्या आंब्याच्या ढोलीतून काळ्या केसाचं उदमांजर त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवून आहे. पाळीच्या पलीकडील चिखलात सांबराचं लोटण दिसतंय तर लोटणापलीकडेचं रानगव्यांची पाण्यावर यायची मळलेली वाट आहे. वाटेच्या अलीकडे पुरुषभर उंचीच्या वारुळावर भलामोठा "टेकराज" निवांत पहुडलाय.
पंखावर जांभळी आभा असलेला चांदीकवडीचा थवा बांधावरून उडत जंगलाकडे चाललाय, सारंगागारातून उडालेले सारंगांचे थवेच्या थवे बांधाकडेच्या दलदलीत हळुवार उतरताहेत, त्यांच्या नारंगी-केशरी अग्निपंखानी दलदलीत जणु वणवा पेटल्याचा आभास होतोय. बदकाच्या आकाराचे नाकेर पक्षी ही त्यांच अस्तित्व दाखवून देताहेत. घनवरांचे तर गोदेचं झिलाणीच्या कडेने असलेल्या गादाच्या आडोशाने आहेत. या सर्वांवर एक भलेमोठे हुमा घुबड पाळत ठेवून आहे. खंड्याचा एका पांढऱ्या सालीच्या अर्जुन वृक्षाच्या खोडावर चोचीने घाव घालायचा उद्योग सुरूचं आहे तर धनेशांची जोडी दलदलीत चरायला उतरण्याआधी सावधपणे अदमास घेतेय.
मी अचंबित होऊन हे सर्व अनुभवत आता परसदाराकडून "मनोली"च्या पडवीत आलोय, पडवीच्या आखूड आढ्यावर बसलेल्या दुर्मिळ अशा "तणमोराने" अंगणाच्या दिशेने सूचक इशारा केला. तिथं, "मनोली"च्या अंगणात टेबल खुर्चीची एक चौकट आहे, त्या चौकटीत खुर्चीवर कायम लिहिता-वाचताना दिसणारा व नेहमी, "ज्यांना वाटतं की विचारी बनावं, भावनांतील पावित्र्य जपावं तर त्यांनी, 'जंगलात', 'पर्वतावर' आणि 'समुद्रकिनारी' जा".... हा संदेश देणारा अवलिया आज मला त्या चौकटीत दिसत नाहीये. मी अस्वस्थ होतो. चौकटीतील रिकामी खुर्ची अंगावर येते.
नीट पाहिल्यावर, चौकटीतील टेबलावर निळावंतीची पोथी उघडून मांडलेली दिसते, पोथीच्या बाजूला एक "माळ, परडी आणि पोत" पडलेली आहे. ते पाहिल्यावर, निळावंती ज्याला येते त्याच्या वंशाचा दिवा लागत नाही हे वाक्य आठवून मी अजुनच अस्वस्थ होतो.
लहानपणी, रेल्वेतून खंडाळ्याच्या घाटामधून जाताना लागणारे अक्राळविक्राळ पर्वत नजरेला दिसू नयेत म्हणून संपुर्ण घाटात डोळे घट्ट मिटून बसणारा मी, कुणीतरी समुद्रात मगरी असतात आणि त्या पाय ओढून आत नेतात हे डोक्यात भरवल्याने समुद्राला घाबरणारा मी, जंगलातला वाघ हा आपल्याला खाण्यासाठीचं जन्माला आलाय असा दृढ समज करून घेऊन सर्व जंगलं नष्ट करून टाकावी अशा ठाम मताचा मी...
उणीपुरी दोन दशकं वा जास्तचं कदाचित उलटून गेलीत, वर्तमानपत्रांच्या शनिवार-रविवार पुरवण्यांमधून दर आठवड्याला येणाऱ्या लेखांमधून चितमपल्ली नावाच्या लोकोत्तर अवलिया अरण्य-निसर्ग ऋषीची ओळख झाली. त्यांच्या लेखांनी मनावर गारुडचं केलं होतं. जंगलांबद्दलच्या अनावर आकर्षणाला गूढ वलयामध्ये लपेटून कागदावर उतरवणाऱ्या त्यांच्या अनोख्या लेखनशैलीमधुन हा वरचाचं संदेश वेगवेगळ्या स्वरूपात त्यांच्या प्रत्येक लेखामध्ये अदृश्य स्वरूपात सतत डोकावत राहतो. त्याबद्दल विचार करायला प्रवृत्त करत राहतो आणि केलेला विचार अंमलात आणायला ही प्रेरणा देत राहतो. पुढे त्यांच्या सर्वचं पुस्तकांची "पारायणे" झाली आणि विचारांना, जगण्याला नवे आयाम मिळाले.
आज भीती मागे सोडुन, देशपरदेशातील किनारपट्टीची वाळू पायाला लावून झालीय, सह्याद्रीची भटकंती सतत चालू आहे. जंगलांच्या वाऱ्याही सुरू आहेत, अथांग समुद्र, प्रचंड पसरलेली जंगलं ढगांच्या वरून पाहिलीत. चारीही बाजूनी नजर जाईल तिकडे समुद्राने वेढलेल्या ऑफशोअर प्लॅटफॉर्मवर दिवस काढलाय. गडकिल्ल्यांच्या बुरुजांमधून रात्री जागवल्यात.....हा बदल काही एकाएकी घडला नाही. या बदलाचं बव्हंशी श्रेय मी चितमपल्लींच्या वर्तमानपत्रांतील लेखमालांना आणि परिस्थिती नसताना ही केवळ माझ्या वाचनाच्या वेडापायी घरी वर्तमानपत्र घेणाऱ्या व त्यातून मला चितमपल्लींची ओळख करून देण्यास कारणीभूत ठरलेल्या माझ्या वडिलांना जातं. एखाद्या लेखकाचा, त्याच्या पुस्तकांचा, लेखांचा एखाद्याच्या आयुष्यावर कसा प्रभाव पडतो त्याचं हे एक छोटंसं उदाहरण ठराव.
आयुष्यभर पाखरांच्या मागावर राहिलेला हा "वनवासी" अवलिया त्याच्या आवडत्या "मनोली"तील ती चौकट रिकामी टाकून त्याची वाट पाहत थांबलेले जिवाभावाचे सवंगडी असलेले माधवराव पाटील, दल्लू गोंड, मंगरू गोंड, झोलबा ढिवर, सदा गोंड, माधो गोंड व निगरू गोंड यांच्याकडे जंगलातील कायमच्या भटकंतीसाठी निघून गेलाय. त्याने मागे सोडलेली "माळ, परडी आणि पोत" एकवेळ बेवारस होईल बहुदा पण निळावंतीच्या पोथीच्या शापावर मात्र त्याने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर उ:शाप मिळवलाय, भले रक्ताचा वारसा नसेल कुणाकडे पण चितमपल्लींनी दाखवलेल्या मार्गावर चालणारे असंख्य अनुयायी मानसपुत्र त्यांच्या लेखणीने घडवलेत हे नक्की. अशी ऋषितुल्य माणसं स्वतः झिजत, आपल्या कामातून दुसऱ्यांची आयुष्य अगदी नकळत सुंदर बनवत असतात.
असो.... विचारी बनण्याचा, भावनांमधील पावित्र्य जपण्याचा प्रवास अविरत सुरू राहील....
प्रतिक्रिया
6 Jul 2025 - 1:12 pm | चौथा कोनाडा
अ ति शय सुंदर ....
चित्रदर्शी लेखन !
चित्रही समर्पक !.... कृष्णधवल परिणामकारक !
❤️
येऊ द्यात असे आणखी काही !
6 Jul 2025 - 2:33 pm | कंजूस
वाट पाहतेय नीळावंती.
6 Jul 2025 - 4:19 pm | रीडर
वर्णनातून चित्र डोळ्यांसमोर उभे राहिले
चित्रं ही सुंदर
6 Jul 2025 - 5:02 pm | अनन्त्_यात्री
मागे ठेवून जाणारी चौकट रिकामी कशी असेल?
सुंदर लेखन व चित्रे!
10 Jul 2025 - 12:22 pm | श्वेता व्यास
आपल्याला गुरुतुल्य वाटणाऱ्या व्यक्तीबद्दल मनापासून लिहिलेलं, वाचताना तितकंच मनाला भिडलं.
उत्तम चित्रे आणि लेखन.
10 Jul 2025 - 4:01 pm | स्वराजित
खुप छान लेख