✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

परवाचीच गोष्ट ... दोन भूभूंची

य
युयुत्सु यांनी
Sat, 05/24/2025 - 21:42  ·  लेख
लेख
परवाचीच गोष्ट ... दोन भूभूंची (काही सत्य घटनांवर आधारीत) पूर्वप्रसिद्धी - https://www.misalpav.com/node/8447 शेवटी एकदाचा मॉन्सुन येऊन ठेपला आणि मला विद्यापीठात चालायला जायची हूक्की आली. गाडी काढली आणि विद्यापीठ गाठले. छत्रपतींच्या पुतळ्याजवळ गाडी पार्क करून बाहेर पडलो आणि बारीक तुषार अंगावर येण्यास सुरुवात झाली होती. तोंडाने मल्हारच्या सुरांचे नोम-तोम आळवत चालायला सुरुवात केली. पुणे विद्यापीठाविषयी मला तसे काही फारसे प्रेम किंवा अभिमान नाही, पण शुद्धहवेची हमी देणार्‍या ज्या काही थोड्याफार पुण्यात जागा आहेत त्यातली एक जागा एवढेच माझ्यादृष्टीने त्या परिसराचे महत्त्व. चालता चालता मुख्य-इमारतीपाशी येऊन पोचलो आणि पुढे आयुका पर्यंत जावे आणि आकाशगंगेतले तारे मोजून परत फिरावे असा विचार केला. मल्हार गुणगुणत चालता चालता काही वर्षापूर्वी म्हणजे १९९१ साली घडलेला एक किस्सा आठवला. तोंडाने चालू असलेला मल्हार बंद पडला आणि एकदम हसू फुटले. असेच पावसाचे दिवस होते. मी तेव्हा संगणकशास्त्र विभागात नोकरी करत होतो. दुपारी जेवायला एमबीए कॅन्टीन किंवा ओल्ड कॅन्टीनला जायचे असा नेम होता. तेवढ्यात समोरून एक मोठा ट्रक बांधकामाचे साहित्य घेउन हळूहळू चालला होता. विद्यापीठातील विद्येच्या उजेडाने त्या बिचार्‍या ट्रकवाल्याचे डोळे दिपले असावेत आणि त्यामुळे तो रस्ता चुकला असावा. मी विरुद्ध दिशेने येत असल्याचे बघून तो ट्रक माझ्यापाशी येऊन थांबला आणि जागेवरूनच ड्रायव्हरने विचारले, "साब, यहाँ होटल किदर है?" "होटल? कौनसा होटल? यहाँ तो कोई होटल नही हैं". मी उत्तरलो. त्यावर त्याने खिशातून एक कागद काढला आणि हात बाहेर काढून माझ्यासमोर धरला. त्या कागदावर लिहिलेला पत्ता वाचून मी खोखो हसायला लागलो. तो पत्ता असा होता- होटल आयुका पुना युनिव्हर्सिटी कॅंपस मेन बिल्डींग के आगे पिन ४११००७ मी का हसत होतो ते त्या ट्र्कवाल्याला काही कळणे शक्य नव्हते. आकाशगंगेतल्या समस्त ता‍र्‍याना मात्र ते कळले असावे कारण ते काही क्षण चमकायचे थांबले असा मला भास झाला. मी त्याला हॉटेल आयुकाची दिशा सांगितली आणि पोटपुजेसाठी भरभर पावले उचलायला सुरुवात केली. हळु हळु दिवस जात होते. 'होटल आयुका' धीम्या गतीने उभे राहत होते. मी वरील प्रसंग विसरून गेलो होतो. एक दिवस माझ्या आयायटीतल्या एका मित्राचा मला अचानक फोन आला. आम्ही दोघे एकाच होस्टेल आणि डिपार्टमेंट्चे. फक्त मी त्याला बराच सीनियर होतो. मित्राने मला सांगितले की तो कसल्याशा सिम्पोझियमसाठी तो 'आयुका'त आला होता. त्याला थोडा वेळ होता म्हणून त्याने मला फोन करून बोलावले होते. मी हातातलं काम टाकून आयुकाच्या दिशेने निघालो. बर्‍याच वर्षानी भेटत असल्यामुळे सुरुवातीच्या गप्पाटप्पा होस्टेलच्या आठवणीभोवती रंगल्या. मी हळुच त्याला प्रश्न विचारला. "तू, या सिम्पोझियममध्ये काय करतोय" "काही नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत वचवच ऐकायची" "आणि मग?" - मी "Some lucky souls find here their scientific husbands and scientific wives" "what next?" "here you 'mate'(!) with your scientific husbands or scientific wives and have fun... " "इथेच?" - मी चक्रावून विचारले "हो तर. देन वी प्रोड्युस न्यु थिअरीज" मला 'होटल आयुका' शोधणार्‍या ट्रक ड्रायव्हरची आठवण झाली. मी तो किस्सा मित्राला सांगितला तेव्हा तो पण खळखळून हसला. यावर आम्ही एकमेकांचा निरोप घेतला आणि निघालो. पावसाची रिपरिप वाढली तशी माझी पावले भरभर पडायला सुरुवात झाली. आयुकाच्या अभेद्य तटबंदीजवळ मी येउन पोचलो होतो. तिथे आडोशाला दोन कुत्री उभी होती. पाउस कमी झाल्यावर पुढे चालावे असा विचार करून मीपण चंद्र्शेखर ऑडिटोरियमजवळ आसरा शोधला आणि पाउस कमी व्हायची वाट बघत उभा राहीलो. आजुबाजुला फारसे कोणी नव्हते. तेवढ्यात ती दोन कुत्री माझ्या दिशेने आली आणि जोरजोरात भूंकू लागली. सुरुवातीला मी दूर्लक्ष केले, पण त्यांचे भूंकणे काही थांबेना म्हणून जवळ पडलेला दगड मी त्यांना मारण्यासाठी भिरकावणार एवढ्यात लांबून एक वॉचमन ओरडला - "साब! उनको पत्थर मत मारो!" "क्यूं. काटेंगे तो आपके साब दवा पानी करेंगे क्या?" मी चिडून विचारले. एकाच वेळेला वॉचमन आणि ती कुत्री भूंकत माझ्याकडे यायला सुरुवात झाली. वॉचमन जवळ आला आणि माझ्या कपाळावरच्या आठ्या बघून मला म्हणाला, "साहेब, रागवू नका पण एक विचारू का? मी मानेनेच हो म्हटले. "तुम्ही ज्योतिषी आहात का?" कुत्री अचानक भूंकायची थांबली. "हो! का?" "काही नाही. इथली कुत्री ज्योतिषांवर खूप खवळतात." "का? काय झालं" "मागे इथल्या काही साहेब लोकांनी ज्योतिषाची टेस्ट घेतली आणि त्यात ज्योतिषी फेल झाल्याच त्यांनी एकतर्फी जाहिर केलं तेव्हापासून इथल्या कुत्र्यांना ज्योतिषांचा जरा देखिल वास लागला तरी ती खवळतात." ते ऐकून मी पण चिडलो. "ज्योतिषांची टेस्ट घ्यायला तुमचे साहेब कोण लागून गेले" - मी पण आता खवळलो होतो. कुत्री जोरजोरात भूंकायला लागली. "आंतरराष्ट्रीयकीर्तीचे शास्त्रज्ञ". वॉचमनने भाषांतर केले... "मग मी पण सांगेन ती टेस्ट करणार का" कुत्र्यांनी प्रश्नार्थक शेपूट हलवली. "तुमच्याच लायब्ररीमधली गेल्या दहा वर्षात प्रसिद्ध झालेली कोणतीही १०० पुस्तके डोळे मिटून उचला आणि किती पुस्तकात तुमच्या साहेबांचे नाव सापडते ते नीट मोजून सांगा" आता वॉचमन प्रश्नार्थक नजरेने कुत्र्यांकडे बघू लागला. कुत्र्यांना माझा प्रयोग पटला की नाही ते माहित नाही पण शेपूट पायात घालून त्या सारमेयांनी घूमजाव केले. पाउस थांबला होता. मी पण घराच्या दिशेने चालायला सुरुवात केली...
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
1378 वाचन

💬 प्रतिसाद (1)

प्रतिक्रिया

फारशी काही कळली नाही पण

nutanm
Sun, 05/25/2025 - 03:39 नवीन
फारशी काही कळली नाही पण सांगायचे मुद्दे तथ्य फार थोडेच वाटले, खास काही वाटत नाही . स्पष्टवक्ते पणाबद्दल क्षमस्व.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा