✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अलविदा हिट्मॅन

क
कपिलमुनी यांनी
गुरुवार, 05/08/2025 - 18:00  ·  लेख
लेख
सकाळी, हातात चहाचा कप आणि समोर मोबाईल. नेहमीसारखं क्रिकबझ उघडलं आणि डोळ्यांवर विश्वासच बसेना — “रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून निवृत्त.” hitman थांबा जरा. रोहित शर्मा? हिटमॅन? ज्याच्या बॅटमधून चौकार-षटकारांचा पाऊस पडायचा, तो आता कसोटीच्या पांढऱ्या जर्सीला रामराम करतोय? क्रिकेटच्या मैदानावर फलंदाजी ही कला आहे, आणि रोहित म्हणजे त्या कलेचा एक लाडका चित्रकार. त्याचा तो शांत चेहरा, थोडा ढिल वाटणारं चालणं, आणि अचानक बॉलला भेटणारा तो ‘हूक’ किंवा ‘पुल’ शॉट — जणू कवीच्या कवितेतलं एखादं सुंदर वळण! आणि आता हा चित्रकार आपल्या तीन रंगापैकी दुसर्या रंगाला विश्रांती देतोय. वनडेत तो अजून खेळणार, पण कसोटीच्या मैदानावर "गार्डन मे घूम रहा है क्या" चे बंबैया हिंदी पुन्हा ऐकायला मिळणार नाही.. रोहितचा जन्म नागपूरचा, पण त्याचं खरं बस्तान बसलं मुंबईच्या वांद्र्याच्या गल्ल्यांमध्ये. आपण म्हणतो ना, “मुंबई ही स्वप्नांची नगरी.” पण त्या स्वप्नांना पंख लावायला थोडी मेहनत, थोडं नशीब आणि बरंच कष्ट लागतं. रोहितच्या घरची परिस्थिती तशी बेताची. आई-वडील दोघंही नोकरी करायचे, आणि रोहित आजी-आजोबांकडे राहायचा. पण या मुलाच्या रक्तात क्रिकेटचं वेड होतं. एकदा कोणीतरी सांगितलं, “बोरिवलीला एक क्रिकेट कॅम्प आहे, जा तिथं.” आणि तिथंच रोहितला भेटले त्याचे गुरू — दिनेश लाड. लाड सरांनी या मुलाच्या डोळ्यांतली चमक ओळखली. “हा पोरगा काहीतरी करेल,” असं म्हणत त्यांनी रोहितला स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिष्यवृत्ती मिळवून दिली. आता इथं गंमत आहे. रोहित सुरुवातीला फलंदाज नव्हता, तर ऑफस्पिनर! खर तर फास्ट बोलिन्ग आवडायची पण कष्ट जास्त म्हणून स्पिन टाकायचा ! पण एकदा लाड सरांनी त्याला सलामीला पाठवलं, आणि बस्स! त्या दिवशी त्यानं ठोकलं शतक. हॅरिस शिल्ड, जाइल्स शिल्ड — या सगळ्या स्पर्धांत त्याची बॅट बोलू लागली. “हा मुलगा काहीतरी वेगळा आहे. त्याच्या खेळात एक सहजता आहे,” असं लाड सर एकदा म्हणाले होते. आणि खरंच, ती सहजता पुढे जगभर गाजली. रोहितनं २००७ मध्ये आयर्लंडविरुद्ध वनडेत पदार्पण केलं. त्याच वर्षी तो टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघात होता. पण सुरुवातीची काही वर्षं म्हणजे जणू एखाद्या नवख्या नटाची नाटकातली छोटी भूमिका! टॅलेण्ट होता पण वाट सापडत नव्हती . अजून मुख्य नायक व्हायचं बाकी होते.. क्रिकेट पंडित त्याला “टॅलेंट आहे, पण सातत्य नाही” असं म्हणायचे. अर्थात टी २० मधल्या काही इनिंग नी भविष्यची पायाभरणी केलि होती.. गेल, ए बी डी , हेडन यांच्या हातोडा पिढीत लारा - इंझी सारखा lazy elegance असलेला प्लेयर खूप वर्शांनी दिसला होता. पण पुढची काही वर्षे रोहित साठी अवघड गेली .. २०११ चया वर्ल्ड कप मधून त्याला ड्रोप करणे हा त्याच्यासाठी धक्का होता आणि क्रि़केट ला गृहीत धरायचे नाही ही वॉर्निन्ग सुद्धा ! पन त्याने कमबॅक केला २०१३ मध्ये एक चमत्कार घडला. सचिन नंतर महेंद्रसिंग धोनीनं रोहितला वनडेत सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला. आणि मग जे झालं, ते क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलं. २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०९ धावा. आणि मग २०१४ मध्ये कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर श्रीलंकेविरुद्ध २६४! एकट्या माणसानं दोन संघांच्या धावांना मात दिली. १७३ चेंडूत ३३ चौकार, ९ षटकार. प्रेक्षक टाळ्या वाजवून थकले, पण रोहितची बॅट थांबलीच नाही. सचिन ला एका कार्यक्रमात विचारले होते , तुझ्या नंतर भारताची बॅटिंग ची धुरा कोण सांभाळणार ? तुझे रेकोर्ड कोण मोडेल? तेव्हा त्याने रोहीत आणि विराट ची नावे घेतली होती.. रोहितची कसोटीतली सुरुवात उशिरा २०१३ मधे झाली. तेव्हाही तो आपल्याला माहीत होता – एकदिवसीयचा सुपरस्टार, ज्याचा "pull shot" बघताना TV remote स्वतः थांबतो. पण कसोटी? पांढरे कपडे, सात-सात तास खेळणं, एकच बॉल बघून सहा ओव्हर शांत बसणं – ह्या प्रकारात रोहित फिट बसेल का ?? अशी एक शंका अनेकांच्या मनात होती. आणि त्यानेच काय सुरुवात केली? १७७ धावा! ते पण कोलकात्यासारख्या मैदानावर, आणि सचिन तेंडुलकरच्या फेअरवेल सिरीजमध्ये! जणू तो म्हणाला – "मी आलोय. आणि माझं हे कसोटी स्किल आहे आणि मी परीपूर्ण बॅट्समॅन आहे ." २०१३ ते २०१९ – दरम्यान त्याला कसोटी संघात ‘गेस्ट अपीअरन्स’ दिलं जायचं. मधे १०-१२ टेस्ट्स मिळाल्या, पण काहीतरी मिसिंग वाटत राहिलं. टेस्ट टीममध्ये त्याची भूमिका स्पष्ट नव्हती. पण मग २०१९ मध्ये पुन्हा एकदा नियतीने संधी दिली – "साउथ आफ्रिकेविरुद्ध भारतात सलामी फलंदाज हवा आहे. रोहित?" आणि बास! २०८ धावा (176 + 127) दोन इनिंगमध्ये – विशाखापट्टणममध्ये मारल्या आणि रोहीत चा टेस्ट मध्ये पुनर्जन्म झाला. रोहित शर्माने कसोटी सामन्यात १२ शतके ठोकली , प्रत्येक शतक केले तेव्हा भारताला विजय मिळाला आहे . २०२२ मध्ये रोहितकडे सर्व फॉर्मॅटचं कर्णधारपद आलं. थोडंसं उशिरा, पण अगदी योग्य वेळी. त्याच्या नेतृत्वात भारतानं दोन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या — २०२४ चा टी-२० विश्वचषक आणि २०२५ ची चॅम्पियन्स ट्रॉफी. १०४ सामन्यांत विजय मिळवणारा हा कर्णधार म्हणजे जणू मैदानावरचा मुंबैकर भाई ! त्याचं ते ‘कूल’ असणं म्हणजे भारतीय क्रिकेटसाठी एक वरदान ठरले. युवा खेळाडूंसाठी तो फादर फिगर आहे . आयपीएलमध्ये तर रोहित म्हणजे मुंबई इंडियन्सचा सम्राट. पाच वेळा आयपीएल ट्रॉफी (२०१३, २०१५, २०१७, २०१९, २०२०) आणि २००९ मध्ये डेक्कन चार्जर्ससाठी एक विजेतेपद. त्याच्या स्ट्रॅटेजी आणि संयमाची तारीफ तर धोनीचे चाहतेही करतात! आणि हो, स्टंप मायक्रोफोनवरचा रोहित तर एकदम मुंबईकर. “अरे यार, क्या कर रहा है ? सीधा डाल!” किंवा “गार्डन मे घूम रहा है क्या ?” — या ओळी म्हणजे जणू मैदानावरची लोकल ट्रेनमधली मस्ती! निवृत्ती आणि पुढचा प्रवास रोहितनं कसोटी आणि टी-२० मधून निवृत्ती घेतली, पण वनडेत तो अजून भारताचं नेतृत्व करणार आहे. २०२७ च्या वनडे विश्वचषकासाठी तो नव्या पिढीला तयार करेल, असा विश्वास आहे. आयपीएलमध्ये कदाचित तो मेंटॉर किंवा स्ट्रॅटेजी बॉस म्हणून परतेल. पण एक गोष्ट नक्की — त्याच्या त्या ‘पुल शॉट’चा आवाज आणि स्टंप मायक्रोफोनवरची मस्ती आपण कधीच विसरणार नाही. बोरिवलीच्या गल्लीतून सुरू झालेला हा प्रवास इडन गार्डन्सपासून जगभरातल्या मैदानांपर्यंत पोहोचला. रोहित म्हणजे मुंबईचा राजा ! निवृत्ती आली खरी, पण रोहितच्या खेळींचा ‘रिप्ले’ आपण पुन्हा पुन्हा बघणार. त्याच्या संयमातून, स्ट्रॅटेजीतून आणि स्टाईलमधून नव्या पिढीला शिकायला मिळेल. रोहीत चे आकडे कदाचित त्याच्या क्षमते एवढे नाहीयेत , पण बॅटींग बघावी तर रोहीतचीच ! कलात्मकता आणि सहजता आताशा दुर्मिळ झाली आहे . तुमचं रोहितचं आवडतं क्षण कोणतं? एक कमेंट करा हिटमॅन साठी!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
व्यक्तिचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
2535 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

उत्तम आढावा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 05/08/2025 - 19:02 नवीन
काल रोहीटच्या निवृत्तीची बातमी दिसली आणि मग कळलं 'कसोटी क्रिकेट मधून' निवृत्त होतोय. आपण चांगला आढावा घेतला आहे, रोहीतची फलंदाजी बघायला मजा येते. आयपीएल मधेही रोहीत खेळला की चांगल्या धावा होतील आणि सामना जिंकू असे वाटत असतेल. रोहिटची कसोटी कारकिर्द आठवत राहील. एक म्हणून लक्षात नाही, त्याचं खेळणं, त्याची शैली त्याचे ड्राइव्ह, सगळंच वेगळं आणि हवंहवंसं. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

छान लेख.

सौंदाळा
गुरुवार, 05/08/2025 - 19:51 नवीन
छान लेख. जोरात न मारता केवळ टाईमिंगवर खेळणार्‍या काही निवडक फलंदाजांमधील अप्रतिम फलंदाज. आता असे फलंदाज कमीच राहीले आहेत. सगळे हार्डहिटर. माझ्या मते रोहीत कसोटी फलंदाज म्हणून सामान्य होता पण ट२० आणि एकदिवसीय सामन्यात केवळ लाजवाब. आगामी एकदिवसीय विश्वचषक खेळण्याचा रोहीतचा निर्धार आहे असे वाटत आहे. तो असला तर मज्जा येणार बघायला.
निवृत्ती आणि पुढचा प्रवास
पासून पुढच्या ओळी नॉस्टेलजिक करुन गेल्या.
  • Log in or register to post comments

समयोचित लेख. काल बातमी ऐकली

गवि
Sat, 05/10/2025 - 09:34 नवीन
समयोचित लेख. काल बातमी ऐकली होती. पण युद्धवार्ता, चर्चा वगैरेच्या धामधुमीत ती बातमी आणि हा धागा काहीसा दुर्लक्षित राहणार असे वाटते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये अजूनही त्याची कारकीर्द बाकी आहे ही समाधानाची गोष्ट.
  • Log in or register to post comments

रो गेला नि को पण जायच्या

विअर्ड विक्स
Mon, 05/12/2025 - 11:19 नवीन
रो गेला नि को पण जायच्या मार्गावर आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर निवृत्ती स्वीकारली असती तर समायोचक ठरले असते. को पण निवृत्त होईल अशी दाट शक्यता आहे. एक दिवसीय सामने तसेही आता कमी झाले आहेत , त्यामुळे उगाच रेंगाळण्यात अर्थ नाही कदाचित uncapped रुल साठी असेल. त्याचे भारतीय क्रिकेट मधील योगदान निश्चितच दखलपात्र आहे .
  • Log in or register to post comments

आज कोहली ने निवृती जाहीर केलि

कपिलमुनी
Mon, 05/12/2025 - 12:17 नवीन
आज कोहली ने निवृती जाहीर केलि
  • Log in or register to post comments

ओह

सौंदाळा
Mon, 05/12/2025 - 15:21 नवीन
ओह आता हा प्रतिसाद बघूनच याबद्दल समजले. कसोटी संघात तरुण यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल यांची जबाबदारी वाढणार. चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करेल? अय्यर, सर्फराज, ध्रुव जुरेल की अजून कोण ? या लगोपाठच्या दोन निवृत्यांमुळे भारतात कसोटी क्रिकेट उतरणीला लागू नये एवढीच इच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

बदल

विअर्ड विक्स
Mon, 05/12/2025 - 16:00 नवीन
बदल हि काळाची गरज आहे . तसेही दोघे कसोटी क्रिकेट मध्ये सध्याच्या काळात पुरेशी चमक दाखवत नव्हते. अय्यर, सर्फराज, ध्रुव जुरेल , रेड्डी नि नायर कोणी ना कोणी जागा भरून काढेल. सद्य IPL मोसमानंतर धोनी ने निवृत्ती जाहीर केली ती वेळ या दोघांनी स्वतःवर येऊ दिली नाही हे विशेष.
  • Log in or register to post comments

आवडला लेख

फारएन्ड
Sun, 05/18/2025 - 02:17 नवीन
छान लिहीले आहे. मागच्या दशकातील बिग-५ च्या निवृत्तीनंतर पुढच्या लोकांचा बराच खेळ मी पाहिलेला आहे पण इतकी डिटेल माहिती नाही. यातल्या कित्येक गोष्टी लक्षात नव्ह्त्या, तर कित्येक माहीतच नव्हत्या. आवडले वाचायला. मला इतक्यात बघितलेल्या दोन आठवणी आहेत - २०२३ च्या वर्ल्ड कप फायनल नंतरची निराशा आणि मागच्या वर्षी अमेरिकेत टी-२० जिंकल्यावरचा आनंद. रोहित शर्माबद्दल मला एक पॅटर्न कायम लक्षात राहिलेला आहे - तो जेव्हा विचित्र, आउट ऑफ कॅरेक्टर शॉट मारायला जातो तेव्हा तो फॉर्म मधे नाही हे जाणवते. कारण एरव्ही त्याचा "लेझी एलिगन्स" सहज दिसतो. नजीकच्या काळातील त्याचे बरेच षटकार हे मिड ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग या आर्क मधले आहेत. पण जेव्हा त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्ध २०९ मारले होते, तेव्हा त्यातील १६ षटकार हे चौफेर होते. ते फार छान आहेत पाहायला. कसोटीत मात्र मला तो फारसा लक्षात नाही. या लेखातील उल्लेख पाहून आता शोधायला हव्या त्या क्लिप्स. आता कोहलीवरही येउ दे लेख. सचिन, दादा वगैरेंचा पूर्ण प्रवास जसा एकेकाळी ट्रॅक केला आहे तसा या नंतरच्या खेळाडूंचा केलेला नाही. त्यामुळे वाचण्यात इंटरेस्ट आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा