ब्रम्हास्त्र बघा आणि निगेटिव्ह रिव्ह्यूचे भ्रमास्त्र तोडा!

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
11 Sep 2022 - 12:12 pm

ब्रम्हास्त्र (पार्ट 1: शिवा) ह्या 9 सप्टेंबर 22 ला रिलीज झालेल्या चित्रपटाचे हे परीक्षण आहे. मी हा चित्रपट 3D मध्ये बघितला. हा चित्रपट ट्रायोलॉजी असणार आहे म्हणजे या चित्रपटाचे अजून दोन भाग येतील. पहिल्या भागाच्या शेवटी दुसऱ्या भागाचे नाव अनाउन्स देखील झाले आहे, त्याचे नाव असणार आहे ब्रह्मास्त्र (पार्ट 2: देव). हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन थ्रीडीमध्येच बघणे योग्य आहे. हा लेख लांबणार आहे पण माझी विनंती आहे की हा लेख शेवटपर्यंत पूर्ण वाचावा कारण यात फक्त परीक्षणच नाही तर या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक मुद्द्यांचा उहापोह केला आहे त्यातून तुम्हाला अनेक गोष्टींची माहिती मिळेल. आतापर्यंत भारतात सुपरहिरो असलेले अनेक चित्रपट येऊन गेले जसे भावेश जोशी, क्रिश, रा वन, फ्लाईंग जट्ट वगैरे. मुकेश खन्ना पण आता शक्तिमानला भव्य दिव्य स्वरूपात मोठ्या पडद्यावर आणणार आहेत.

सुरुवात करण्याआधी सांगू इच्छितो की, ब्रह्मास्त्र आणि इतर अनेक बॉलिवूड चित्रपटांबद्दल सध्या सुरू असलेल्या वादग्रस्त मुद्द्यांचे पूर्वग्रह बाजूला सारून (जसे आलिया भट्ट कोणत्यातरी एका मुलाखतीत काय म्हणाली होती, ती कोणाची मुलगी आहे, तिचे वडील स्वभावाने कसे आहेत, आणि अमका कलाकार काय म्हणाला होता आणि तमक्या कलाकाराने अमक्या वर्षांपूर्वी काय केले होते, या चित्रपटाचा प्रोड्युसर कोण आहे, त्याचा स्वभाव कसा आहे वगैरे) तसेच सध्या प्रत्येक चित्रपटांत घुसलेले राजकारण हे सगळे बाजूला ठेऊन मी हा रिव्ह्यू केला आहे. एक सिनेमा प्रेक्षक आणि रसिक या एकमेव नात्याने मी हा चित्रपट पहिला आणि त्याच नात्याने या चित्रपटाचे परीक्षण करत आहे आणि जे लोक फक्त एक कलाकृती म्हणून सिनेमा बघायला जातात त्यांच्यासाठी हा रिव्ह्यू! प्रत्येक चित्रपटाचे विनाकारण राजकारण करायचे असे ठरवून तो जर पाहिला तर त्यातील ठरवून काही ना काही बारीक सारीक गोष्टी आणि कलाकार यांचा यांचा राजकारणाशी संबंध जोडता येतो.

हां, मात्र ती गोष्ट वेगळी असते जेव्हा चित्रपटाची कथाच मुळात एखाद्या घडून गेलेल्या राजकीय घटनेवर आधारित असते त्यात राजकारण कथेद्वारे आधीच घुसलेले असते. (उदाहरणार्थ धर्मवीर) तेव्हा राजकारण करत बसायला चांगला वाव असतो. त्यावेळेस चित्रपटाचे पूर्णपणे राजकारण झालेले असते.

सध्या बॉलीवूड वर टीका होते आहे की बॉलीवूड फक्त रिमेक बनवत आहे (दो बारा, विक्रम वेधा, कट्टपुत्तली, मुळशी पॅटर्नचा रिमेक अंतिम वगैरे) परंतु जेव्हा ओरिजनल बनवले जाते तेव्हा सुद्धा टीका होते हे समजण्यापलीकडचे आहे. हॉलीवूडच्या अवेंजर्स सीरीज मधल्या सगळ्या चित्रपटात विज्ञानाच्या नावाखाली अनेक अशक्य (अक्षरशः जादू वाटणाऱ्या) गोष्टी दाखवल्या जातात आणि त्या आपण सहजपणे वैज्ञानिक वैज्ञानिक म्हणून खपवून घेतो. आणि इथे भारतात जेव्हा ओरिजिनल काहीतरी कोणीतरी बनवायला जातं तेव्हा त्यात सतराशे साठ चुका काढतो. हे बरोबर नाही. हॉलिवूड अवेंजर्स चे सगळे 27 भाग असलेले चित्रपट भारतीय लोक बघतात परंतु भारतात एखादा चांगला नवीन ओरिजिनल प्रयोग सुरू झाला आहे त्यावर मात्र विनाकारण टीका करतो.

तर ब्रम्हास्त्र हा अस्सल भारतीय सुपरहिरो फॅन्टसी अँक्शन थ्रिलर चित्रपट आहे. यात जागतिक दर्जाचे हॉलिवुडच्या तोडीचे VFX (स्पेशल इफेक्ट्स) आहेत. याची कथा पूर्ण ओरिजिनल आहे. काहीजण लगेच याची तुलना हॉलिवुड अवेंजर्सशी करायला लागले, त्यांचे कन्सेप्ट कॉपी केले असे म्हणायला लागले आहेत पण तसे नाही आहे. खरे पाहिले तर ते लोक पण आपल्या (आणि ग्रीक, रोमन गॉड) पौराणिक कथांवरून प्रेरणा घेऊन चित्रपट बनवत असतात. जसे हनुमानाची गदा आणि थॉरचा हातोडा, आपला उडणारा हनुमान आणि त्यांचा उडणारा सुपरमॅन, लहान आणि मोठा आकार धारण करू शकणारा हनुमान आणि याचीच कॉपी असलेला राग आल्यावर आकार मोठा होणारा हल्क अशी अनेक उदाहरणे देता येतील.

पण काय झाले की, त्यांच्या कथा कल्पनांना पडद्यावर मूर्त रूप देण्यासाठी जे VFX तंत्रज्ञान लागते ते त्यांच्याकडे आधी आले आणि आपल्याकडे फार उशिरा आले. (क्रिश1 ने परदेशी तंत्रज्ञ वापरले होते मात्र क्रिश3 आणि रा वन ला शाहरुखच्या भारतीय कंपनीने स्पेशल इफेक्ट दिले होते. रा वन मधला मुंबई लोकल ट्रेनचा थरारक सिन ज्यात CST स्टेशन इमारत ढासळतांना दाखवली आहे तसेच क्रिश3 मध्ये शेवटी मुंबईतील इमारती कोसळत असताना स्ट्रॉलरमधल्या लहान बाळाला क्रिश कसे वाचवतो ते आठवा!)

ब्रम्हास्रला ऑस्कर विजेत्या टीम ने VFX दिले आहेत. यातही असाच एक लहान मुलाचा थरारक सिन आहे जो इंटरव्हल नंतर लगेच येतो त्या पण त्याबद्दल जास्त काही सांगता येणार नाही कारण चित्रपटातील अनेक पैकी एक रहस्य उलगडले जाईल जे चित्रपट बघायला जाण्याआधी माहिती असणे योग्य नाही. (जसे गुप्त मध्ये काजोल खुनी आहे हे आधीच माहीत पडले तर चित्रपट बघण्यात अर्थ रहात नाही)

ब्रह्मास्त्रची स्टोरी अयान मुखर्जीने लिहिली आहे. चित्रपटात एकूण नऊ अस्त्रांचा यांचा उल्लेख आहे. सर्व अस्त्रांची प्रमुख देवता म्हणजे ब्रह्मास्त्र. प्राचीन काळापासून ब्रह्मास्त्रचे रक्षण करणारी एक टीम आहे ज्यांना ब्रह्मांश म्हणतात. चित्रपटाची कथा सध्याच्या काळात घडते.

सध्या त्या ब्रह्मास्त्रचे तीन तुकडे झाले आहेत. ते तुकडे का झालेत याची एक मोठी कथा आहे ती इथे सांगत नाही. त्या कथेचा संबंध रणवीर कपूरच्या म्हणजे शिवाच्या आईवडिलांशी आहे, ती कथा अमिताभ (ब्रह्मांशचा गुरु) आपल्याला थोडक्यात सांगतो परंतु या चित्रपटाच्या पुढच्या भागात कदाचित शिवाच्या आई वडिलांची पूर्ण कथा सांगण्यात येईल. रणबिर कपूर स्वतः सुद्धा एक अस्त्र आहे अग्निअस्त्र. मात्र त्याची पूर्ण शक्ती वापरण्यासाठी त्याच्या जीवनात आलिया भट यावी लागते. ब्रह्मास्त्रचे दोन तुकडे दोन जणांकडे सुरक्षित आहेत. एक तुकडा मुंबईत राहणाऱ्या सायंटिस्ट मोहन भार्गव (शाहरुख खान) यांच्याकडे आहे. चित्रपटाच्या अगदी सुरुवातीलाच मोहन यांचेकडून जुनून नावाची एक विलन आपल्या दोन साथीदारांसह (जोश आणि रफ्तार) तो तुकडा चोरते आणि इतर दोन तुकडे कुठे आहेत तसेच ब्रह्मांश टीम चा आश्रम कुठे आहे याबद्दल मोहन यांना बंदी बनवून विचारते. ते पूर्ण माहिती सांगत नाहीत आणि इमारतीचे टेरेसवरून उडी मारतात. दुसरा तुकडा असतो नागार्जुन म्हणजे एक आर्टिस्ट जे वाराणसीत राहत असतात त्यांच्याकडे! तिसरा तुकडा कुणाकडे असतो हे सुज्ञ वाचक येथे ओळखू शकतात पण तो ज्याच्याकडे असतो त्याला ते माहिती नसते, त्याला ते कसे माहिती पडते आणि तो तुकडा कशाच्या स्वरूपात असतो ते बघणे खूप मनोरंजक आहे.

शाहरुखच्या घरी घडलेले सगळे रणवीरला आपोआप स्वप्नात दिसत राहते. जुनून (मौनी रॉय) आणि तिची दोन साथीदार वाराणसीत नागार्जुनच्या मागे लागतात त्यांना वाचवण्यासाठी रणवीर आणि आलिया भट वाराणसी पोहोचतात. मोहन यांच्याकडे वानर अस्त्र असते तर नागार्जुन याच्याकडे नंदी अस्त्र असते. या चित्रपटात हे अस्त्र जेव्हा जागृत होतात तेव्हा ते फक्त मूळ व्यक्तीच्या पाठीमागे अंधुक स्वरूपात दिसत राहतात मूळ व्यक्ती त्या अस्त्राच्या रूपात ट्रान्सफॉर्म होत नाही. हा एक युनिक कन्सेप्ट आहे आणि ओरिजनल आहे. बरेच जण म्हणतात की हा नुसता लेझर शो आहे परंतु ते खरे नाही. चित्रपट आणि त्यामागचा कन्सेप्ट पूर्णपणे नीट समजून न घेता अनेक लोक या चित्रपटावर टीका करत सुटले आहेत. परंतु गेल्या दोन दिवसांचे कलेक्शन बघता हा चित्रपट प्रेक्षकांना आवडल्याचे दिसत आहे. असो.

जेव्हा जेव्हा ते अस्त्र जागृत होतात तेव्हा पडद्यावर भव्य दिव्य स्पेशल इफेक्ट आपले डोळे दिपवून टाकतात. तसेच हिमाचल प्रदेशातील पहाडी रस्त्यांवर कारचा थरारक पाठलाग असलेला जो सिन आहे तो तर हॉलीवुडच्याही कुठल्या चित्रपटाला लाजवेल असा आहे. तसेच वाराणसीतील शिव मंदिरातील जूनून टीम आणि रणबीर आलिया नागार्जुन यांच्यातील भव्य दिव्य फाईट सीन, बाप रे! हे तर फक्त इंटरवल पर्यंत झाले.

चित्रपट मोठा आहे. जवळपास तीन तासांचां.

सेकंड हाफ मध्ये ब्रह्मांशचे रक्षक असलेली टीम जिथे राहते तो आश्रम दाखवला गेलेला आहे. त्याबद्दल वापरलेली कल्पनाशक्ती सुद्धा वाखाणण्याजोगी आहे. सेकंड हाफ मध्ये अमिताभची एन्ट्री होते. त्यानंतर ही बरीच कथा बाकी आहे आणि खूप गोष्टी घडतात. खूप नवी रहस्ये कळतात. चित्रपटाच्या शेवटी तर भरपूर अग्नी म्हणजे आगीने भरलेले VFX आहेत. नंतर अनेक अस्त्रांची ओळख होते जसे धनुष नाग अस्त्र, बर्फ अस्त्र, पवन अस्त्र, जल अस्त्र, प्रभा अस्त्र (प्रकाश असलेले अस्त्र) आहेत. अर्थात या सगळ्याच अस्त्रांचे धारक आणि त्यांचे उपयोग या पहिल्या चित्रपटात दाखवलेले नाहीत ते कदाचित पुढच्या दोन चित्रपटांमध्ये नीट दिसून येतील.

रणवीर कपूर आणि आलिया भट चे आणि अमिताभचे थोडेफार सीन वगळता संपूर्ण चित्रपटच स्पेशल इफेक्ट ने भरलेला आहे. यातील तीन गाणी चांगली आहेत. चित्रपटाची प्रत्येक फ्रेम प्रेक्षणीय झाली आहे. जेव्हा विजुअल इफेक्ट्स नसतात तेव्हा भारतातील विविध शहरातील भव्य दिव्य पद्धतीने साजरे होणारे सण (दसरा, दुर्गापूजा, दिवाळी वगैरे) आपल्याला रणबीर आलियाच्या प्रेमकथेत बॅकग्राऊंडला दिसत राहतात ते बघायला खूपच छान वाटते. थ्रीडी मध्ये तर आणखी तिथे प्रत्यक्ष गेल्यासारखे वाटते. या चित्रपटातील बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा खूपच छान आहे. कार पाठलाग सिन च्या वेळेस असलेले बॅकग्राऊंड म्युझिक आणखी थ्रिलिंग एलिमेंट ऍड करते.

या चित्रपटातील शेवटी आपल्याला पुढील भागाची कथा काय असेल याचा अंदाज दिग्दर्शक देतो. एकूणच एक भव्य दिव्य डोळे दिपवून टाकणारा एक वेगळा अनुभव घ्यायचा असेल तर हा चित्रपट बघायलाच हवा. आणि कोणताही पूर्वग्रहदूषित चष्मा न लावता थ्रीडी वाला चष्मा लावून हा चित्रपट बघायला हवा.
- निमिष सोनार, पुणे

चित्रपटसमीक्षा

प्रतिक्रिया

अनुस्वार's picture

11 Sep 2022 - 12:39 pm | अनुस्वार

चित्रपट उत्तरार्धात बराच भरकटला आहे अशी परीक्षणं वाचनात आली आहेत. त्याबद्दल जरा सांगा. आणि 'गुप्त'चं गुपित गुप्तच ठेवायला हवं होतं.

कपिलमुनी's picture

11 Sep 2022 - 12:55 pm | कपिलमुनी

डायरेक्ट रिव्ह्यू ?
एवढं धाडस ? आता तुमच्यावर बहिष्कार घालणार, वाळीत टाकणार.
तुमच्या धाग्यावर प्रतिसाद देणार नाहीत. तुमच्या बाकी पोस्ट वर पण बहिष्कार घालणार...

धर्मराजमुटके's picture

11 Sep 2022 - 1:06 pm | धर्मराजमुटके

दुर्दैवाने चित्रपट पहा आणि मग त्याबद्द्ल चांगले वाईट बोला असे बोलून फारसे काही हाती लागत नाही. कारण खिशातून पैसे गेलेलेच असतात. चित्रपट बनविण्यार्‍यांचे खिसे भरले जातात आणि पदरी मात्र निराशा येते. कोणी चित्रपट बघायला स्पॉन्सर करणार असेल तर कदाचित चित्रपट बघीतला जाईल. काल युटूब वर दुवा आला होता पण अगोदरच चित्रपटाचे ट्रेलर बघून त्यात बघण्यासारखे काही आहे असे वाटत नाही. राहता राहिली गोष्ट परदेशी चित्रपटांची. ते देखील मला आवडत नाहीत. बहुसंख्य परदेशी चित्रपटांत लक्ख सुर्यप्रकाश असा नसतोच. कायमच पडद्यावर निळा / काळा रंग व्यापून राहिलेला असतो. अवेंजर्स म्हणा किंवा अजून कोणतेही व्हीएफएक्स वापरलेले चित्रपट म्हणा, एकंदरीत लेझर शो ची आताशबाजी मला स्वतःला झेपतच नाही. (दुसर्‍यांना आवडत असेल त्यांना मी बहिष्कार घाला असे सांगणार नाही).
त्यामानाने संथ मल्यालळ चित्रपट बघायला छान वाटतात.

थ्री डी चष्म्यांबद्द्ल देखील थोडेसे : चित्रपट गृहांत पुरविले जाणारे थ्री डी भंगार दर्जाचे असतात. त्यातून बराच वेळ चित्रपट पाहिला की डोळे दुखायला लागतात. शिवाय तंत्रज्ञानाच्या नावाखाली काही दृष्ये इतकी वेगवान असतात की काय घडले याचे मेंदूला नीट आकलन होत नाही.

बाकी बॉयकॉटास्त्राचा संबंध धर्माशी नाही तर बॉलीवूड स्टार्सना जमीनीवर आणण्यासाठी आहे. याची सुरुवात कोविड काळापासून झाली. बॉलीवूडकरांचे पीआर सांभाळणार्‍या अनेक संस्थांनी त्यांना एअरपोर्ट चे फोटो टाकू नका, पार्ट्यांचे फोटो टाकू नका अशा सुचना केल्या होत्या. काही कलाकारांनी ऐकले काहींनी नाही. यातूनच जनतेत रोषाची सुरुवात झाली आहे असे वाटते. (चुकभूल माफ असावी). कोरोना काळात सोनू सुद ची लोकप्रियता इतकी वाढली की दक्षिणेच्या एका कलाकाराने त्याला चित्रपटात मारहाण करण्याचे दृष्य चित्रीत करण्यास नकार दिला होता. जनतेत त्यामुळे वाईट संदेश जाईल अशी त्याला भिती वाटत होती. त्या अर्थाने इथून पुढे सोनू सूद ला खलनायकाच्या भुमिका रंगविणे अवघडच जाणार असे दिसते. त्याला नायकाची भुमिका देऊन एखाद्याने चित्रपट काढला तर तो चित्रपट अफाट पैसा आणी प्रसिद्धी कमवेल असे वाटते.

अवांतर : ब्रह्मास्त्र वर आधारीत ही एक चित्रफित युट्यूब वर पाहण्यात आली. एकंदरीत सादरीकरण छान वाटले. भाषेचा बिहारी टोन मस्त आहे.

भुजंग पाटील's picture

14 Sep 2022 - 6:52 am | भुजंग पाटील

मागच्या २-३ दिवसात "चित्रपट पहा आणि मग त्याबद्द्ल चांगले वाईट बोला" हा नवीन प्रचारमुद्दा काही युटूब (पेड?) रिव्ह्युवर्स कडून ऐकण्यात येतोय.

चौथा कोनाडा's picture

21 Sep 2022 - 12:58 pm | चौथा कोनाडा
चौथा कोनाडा's picture

21 Sep 2022 - 1:01 pm | चौथा कोनाडा

"चित्रपट पहा आणि मग त्याबद्द्ल चांगले वाईट बोला"

हा ... हा ... हा ...

मला जर पैसे मिळाले तर मी ही असा लेख लिहिन.... ते ही सिनेमा बघता !

ब्रह्मास्त्र वर आधारीत ही एक चित्रफित युट्यूब - हा दुवा

प्रसाद_१९८२'s picture

11 Sep 2022 - 2:24 pm | प्रसाद_१९८२

पाहिलाय हा चित्रपट. अगदीच भिकार आहे.
जरुरीपेक्षा जास्त VFX चा मारा, कर्कश्य BGM व नको तिथे सुरु होणारी गाणी याने अक्षरशः डोके दुखत होते. चित्रपटाची सुरुवात 'सुपर हिरो' टाईप होते व शेवट तोच टिपीकल बॉलीवुड रोमांसने.

बॉयकॉट वगैरे गेला खड्ड्यात.
मात्र हा चित्रपट पाहून, तीन तास करमणूक होईल या उद्देशाने पाहायला गेलात तर पदरी निराशाच येईल.

उन्मेष दिक्षीत's picture

11 Sep 2022 - 5:41 pm | उन्मेष दिक्षीत

पिक्चर आहे. VFX-अस्त्र इतकं आहे की बाकी सग़ळ्याची गरज काय असं वाटतं. आणि रिव्यु लिहायच्या नादात सुरुवातीचा सर्प्राइज cameo appearance लिहून टाकलात !

बोलघेवडा's picture

11 Sep 2022 - 7:45 pm | बोलघेवडा

आत्ताच बघून आलो.

काही मारक मुद्दे
1. सतत बॅकग्राउंड म्युझिकचा वापर.
2. ढिसाळ पटकथा. शो अँड टेल चा अभाव. उदाहरणार्थ जर एखाद पात्र तुम्हाला शिकारी म्हणून दाखवायचं असेल तर हे खूप मोठे शिकारी आहेत असं नुसतं सांगून उपयोग नसतो. तर त्याच्या धाडशी शिकारीचे शॉट्स दाखवून ते इस्टेब्लिश करावं लागतं. त्याचा संपूर्ण अभाव असल्याने पात्र खोलवर रुजत नाहीत. बराचसा वेळ फालतू गोष्टी दाखवण्यात घालवला आहे.
3. अचानक घाई गडबडीचे प्रसंग सुरू होतात. टेम्पो (लय) वर खाली होत राहतो.
4. फँटसी प्रकारात मोडत असला तरी अश्या चित्रपटात सुद्धा कोण काय करू शकत काय नाही याच एक लॉजिक असत. ते नक्की इथे समजत नाही.

आता काही तारक मुद्दे
1. भव्य दिव्य सफाईतदार VFX. थरारक साहसदृष्ये. 3Dमध्येच बघणे.
2.हिंदू धर्म चे सण आणि शुभ प्रतीकांचा सढळ हस्ते वापर आणि गौरव (ग्लोरिफिकेशन) हा ठळक बदल दिसून आला.
3. केसरिया गाणे ;)
4. पुढचा भाग अजून चांगला समजण्यासाठी

माझ्याकडून 3 स्टार्स 5 पैकी. थिएटर मध्ये जाऊन एकदा अनुभव घेण्यास हरकत नसावी असे वाटले.

मुक्त विहारि's picture

11 Sep 2022 - 8:09 pm | मुक्त विहारि

ओटीटी वर आला तर बघीन ...

आजची सही .... मी स्वकष्टाचे पैसे, हिंदी चित्रपट बघण्यासाठी खर्च करत नाही...

धर्मराजमुटके's picture

11 Sep 2022 - 8:21 pm | धर्मराजमुटके

सिनेमा घरांत बाहेरील खाद्यपदार्थ नेऊ शकतो असा एक कायदा मध्यंतरी महाराष्ट्र सरकारने मंजूर केला होता.त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होताना दिसत नाही. अजूनही बाहेरील पदार्थ न्यायला बंदी आहेच. मिपाकरांचे याबद्द्ल काय अनुभव आहेत ? जालावर शोधले असता किमान पुण्यात याविरुद्ध तक्रार नोंदविण्यासाठी
1800- 222-365 हा नंबर उपलब्ध आहे असे दिसते. इतर ठिकाणच्या बद्द्ल कोणाचे काय अनुभव आहेत ?

अजूनही बाहेरील पदार्थ न्यायला बंदी आहेच. मिपाकरांचे याबद्द्ल काय अनुभव आहेत ?

पिंपरी-चिंचवडमध्ये तरी नेवू शकतो. आता बॅग्ज तपासणेही बंद केले

मुक्त विहारि's picture

12 Sep 2022 - 9:15 am | मुक्त विहारि

देव आनंदच्या पडेल सिनेमांची स्तूती, काही पत्रकार करत असत ...

गोल्डीच्या मुलाखतीत वाचले होते ....

Kangana Ranaut : म्हणे, 70 टक्के आकडे फेक...; कंगना राणौतने पुन्हा उडवली ‘ब्रह्मास्त्र’ची खिल्ली

https://www.lokmat.com/bollywood/brahmastras-box-office-numbers-are-60-7...

---------
‘काही ट्रेड अ‍ॅनालिस्ट ब्रह्मास्त्रच्या बॉक्स ऑफिसचे आकड्यांची छेडछाड करून ते सादर करत आहेत. बॉक्स ऑफिस आकड्या खेळ करणाऱ्या या लोकांना यासाठी मोठी रक्कम दिली जाते. ही आकड्यांची हेराफेरी भारतातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी हेराफेरी म्हटली जाऊ शकले. यात 50-70 टक्के आकडे फेक आहेत, असं ट्विट निर्माता-लेखक एरे मृदुला कॅथर यांनी केलं आहे. कंगनाने हे ट्विट रिशेअर करत, ‘ब्रह्मास्त्र’ची मजा घेतली आहे. ‘वाह, हा नवा निच्चांक आहे, 70 टक्के,’ अशा शब्दांत कंगनाने ‘ब्रह्मास्त्र’च्या मेकर्सला जोरदार टोला लगावला आहे.
--------

‘ब्रह्मास्त्र’चे शोज आता ‘या’ वेळेतही? प्रेक्षकांच्या मागणीला जोर

https://www.loksatta.com/manoranjan/brahmastra-special-shows-screening-a...

कॉमी's picture

12 Sep 2022 - 10:06 am | कॉमी

कंगना राणावत दुसऱ्यांच्या बॉक्स ऑफिस वर हसते म्हणजे मोठा जोक म्हणायचा.
कंगणाच्या शेवटी आलेल्या सिनेमाचे लाईफटाईम कलेक्शन आहे ३.७७ करोड, बजेट होते ८५ करोड. आठव्या दिवशी तब्बल २० तिकिटे विकून रेकॉर्ड ब्रेकिंग ४४२० रु. निव्वळ मिळवले.

५०-७०% आकडे फेक म्हणे. अगदी ९०% फेक म्हणले तरी ७.५ कोटी एका दिवसात कमावले आहेत, कंगणाबाईंच्या सिनेमाच्या पूर्ण कालावधीच्या कलेक्शनच्या जवळपास दुप्पट.

त्यामुळे कंगणाबाईंनी "आपण हसे लोकांना, शेंबूड आपल्या नाकाला" ह्याचे मस्त उदाहरण दिले आहे.

चौथा कोनाडा's picture

12 Sep 2022 - 5:33 pm | चौथा कोनाडा

चांगले रसग्रहण केले आहे, वाचून सिनेमा पाहायला उद्युक्त होईल असे....
पण एकंदरीत, विषय आणि लांबी, पसरटपणा, मुख्य विषय सोडून मधूनच प्रेमकथा दाखवणे हे पाहता मी ब्रम्हअस्त्र पाहीन असं वाटत नाही!

अनन्त अवधुत's picture

12 Sep 2022 - 7:13 pm | अनन्त अवधुत

असे ठरवले होते. सुपर हीरो चित्रपट आवडतात, त्यामुळे हा आवडेल असे वाटत होते.
पण

रणवीर कपूर आणि आलिया भट चे आणि अमिताभचे थोडेफार सीन वगळता संपूर्ण चित्रपटच स्पेशल इफेक्ट ने भरलेला आहे. यातील तीन गाणी चांगली आहेत. चित्रपटाची प्रत्येक फ्रेम प्रेक्षणीय झाली आहे. जेव्हा विजुअल इफेक्ट्स नसतात तेव्हा भारतातील विविध शहरातील भव्य दिव्य पद्धतीने साजरे होणारे सण (दसरा, दुर्गापूजा, दिवाळी वगैरे) आपल्याला रणबीर आलियाच्या प्रेमकथेत बॅकग्राऊंडला दिसत राहतात ते बघायला खूपच छान वाटते.

हा चित्रपट सुद्धा इतर हिंदी चित्रपटांप्रमाणे गाणी आणि प्रेमकथाच असेल तर आपला पास.

कॉमी's picture

13 Sep 2022 - 7:10 am | कॉमी

सिनेमाचा सगळ्यात प्रसिद्ध सेलिंग पॉईंट व्हिएफएक्स आहे, पण व्यक्तिष: मला त्यात सुद्धा काही ग्राऊंडब्रेकिंग आढळले नाही. उगाच झगमगीत रंगीबेरंगी लहरी पुन्हा पुन्हा पाहायच्या. काही विशेष वाटले नाही. मारामारीचे प्रसंग प्रचंड बोर झाले.

संवाद लेखन तद्दन बकवास आहे. इतके ऑकवर्ड आणि अनैसर्गिक संवाद बऱ्याच दिवसांनी सिनेमात पाहिले. रोशनी काय, बटन काय आणि काय. खासकरून शिवा-ईशा संवाद तर सपशेल गंडले आहेत. शिवा तीस वर्षाचा असतो असे दाखवलंय. पण चार दिवसांत हा आणि ईशा प्रेमाच्या आणाभाका काय घेतात, तूच माझं जीवन टाईप बाता काय मारतात, काही मोठे गुपित उघड केल्यासारखे "आय लव्ह यू" काय म्हणतात- १४ वर्षांचा पोरांनी लिहिल्यासारखे वाटतात संवाद.

पटकथेचे सुद्धा थोड्या फार प्रमाणात तसेच आहे. व्हिलनला त्याचे उद्दिष्ट साध्य करून मिळणार काय समजत नाही. शिवा-ईशा सोडून कोणत्याही पात्राला डेव्हलप करण्याची तसदी घेतली नाहीये. अमिताभ बच्चनच्या पत्राबद्दल तो गुरु आहे इतकेच काय ते समजते. मग गुरु असण्यासोबत बाकी जे काही पात्रवैशिष्ठे आहेत ती सिनेमात दिणार नाहीत, प्रेक्षकांनीच यापूर्वी आलेल्या भारी गुरु पात्रांवरून ते गुण अमिताभ मध्ये भरून घ्यावेत (ओबी वॅन,डम्बलडोअर, गॅनडॉल्फ इत्यादी.) शिवाचे दोन मित्र दाखवलेत सुरुवातीला, ते गल्ली भाषेत बा भाई करत असतात- त्यांची साधी नावं सुद्धा आपल्याला समजत नाहीत, आणि ते पुढे कुठे येत पण नाहीत. स्क्रिप्ट मध्ये बहुदा "शिवा कूल आहे दाखवण्यासाठी त्याच्यासोबत दोन हँडसम मित्र दाखवा" इतकेच लिहिलेले.

सिनेमातला एक मोठा गेस्ट स्टार सुद्धा फार एक्साईट करू शकला नाही.

केसरिया आणि देवा हि दोन्ही गाणी सिनेमात छान वाटतात. पहिलं गाणं "डान्सका भूत चढेया" भंपक वाटलं.

सरतशेवटी, खुद्द शिवा आणि ईशा हि प्रमुख पात्रे सुद्धा आजिबात चांगल्या रंगवली नाहीयेत. "ते एकमेकांवर किनई खूप खप प्लेम कलतात" हे पुरेसे मोटिव्हेशन नाहीये. खासकरून ते एकमेकांना काही दिवसांपेक्षा जास्त ओळखत नाहीत असे असताना.

सिनेमातली चांगली गोष्ट- रणबीर आलिया दोघेही सुप्रीम चिकने दिसतात. खासकरून आलिया. फार नेत्रसुखद आहे ती ह्या सिनेमात.

एकूण, सिनेमा फडतूस आहे असे माझे मत झाले. पण, अस्त्राव्हर्स हि कल्पना, व्हिएफएक्स चे बजेट संवाद पटकथा लेखनाकडे वळल्यास अतिशय जबरदस्त होऊ शकते असे वाटते. This has me intrigued.

चौथा कोनाडा's picture

13 Sep 2022 - 11:48 am | चौथा कोनाडा

हो... अगदी भंपक आहे ते डान्स का भूत वालं गाणं.

विविध भारतीवर ब्रम्हास्त्रचा गाण्याचा रतीब लावलाय. अतिशय सामान्य गाणी आहेत. अरजित सिंग केसरिया गाण्यात रेकतो... सर्दाळलेल्या कुमार सानूसारखी वाटचाल सुरू आहे त्याची.

आता पर्यंतच्या आंजा वरील चर्चेवरून एकंदरीत ब्रम्हास्त्रला लोकांनी नाकारलेले आहे असं दिसतंय!

हे म्हणजे असे झाले कि एखादा रोज उठून तुमच्या विषयी खोंटेंनाटे पसरवून तुमची बदनामी करतोय आणि करत राहील तरीपण तुम्ही जाऊद्याहो त्यांच्याकडे कार्यक्रम आहे चला जाऊयात म्हणून उपदेश देता आहात.
जो पर्यंत हे लोक केलेल्या चुकांची माफी मागून प्रामाणिकपणे पुढे असे काही करणार नाही ह्याची ग्वाही देत नाहीत तो पर्यंत असेच चालू राहिले पाहिजे.
इथे कुणीही रस्त्यावर उतरून किंव्हा तोडफोड करून पिक्चर बघू नका म्हणून जबरदस्ती करत नाही आहे, फक्त आवाहन करत आहेत.
पिक्चर थेटरात जऊन , स्वतःच्या पैशाने , फुकटात कुणी तिकीट काढले म्हणून किव्हा फुकट कुठे मिळतोय म्हणून बघणे ह्याला कुणी अडवू शकत नाही

प्रसाद_१९८२'s picture

13 Sep 2022 - 4:29 pm | प्रसाद_१९८२

1

नुकत्याच प्रसारमाध्यंमांमध्ये फिरत असलेल्या ब्रम्हास्त्र चित्रपटाच्या काही क्लिप्स बघितल्या. त्यात २ गोष्टी प्रकर्षाने खटकल्या

१. रणबिर आणि आलिया यांचा फालतु मुद्राभिनय.
२. अगदी निरर्थक, पाणचट आणि थुकरट डॉयलोग ऐकायला मिळाले.
जसे "लाईट उस रोशनी का नाम है जो अन्धेरो से बडी है" ...
हात तिज्यायला आम्हाला माहितच नव्हतं व्हय की लाईट काय असतंय ते..

लोकांनी इतरत्र उडवल्याप्रमाणे लवकरच असे डॉयलॉग पण ऐकु येतिल
"वाटर उस पानी का नाम है जो प्यास से बडी है"
"फायर उस आग का नाम है जो ठंड भगाती है"
"स्पेस उस आकाश का नाम है जो उपर रहता है"
" अर्थ उस धरती का नाम है जिसपे हम रहते है "

असाच एक इतर ..
"शिवा ! वो देखो लाईट आ गयी " ... हा हा हा कै च्या कै.
अरे काय मजाक चाललय का .. कोणितरी सोम्या गोम्या (हुसैन दलाल) उठतं आणि प्रसवतंय थुकरट डायलॉग .

म्हणे या बंडल चित्रपटा साठी दिग्दर्शकाने १० वर्षे लावली.

अजुन एक म्हणजे दसरा सणाच्या वेळेस वाजणारे एक गाणे. गाण्याचे बोल काय तर म्हणे "डांस का भुत " , "सुफियाना सी पार्टिया" .. अरे सण काय आणि तु नाचतोय कसा आणि गाण्याचे बोल काय , काहीही घुसवाल. दसर्याला कोणत्या सुफियाना सी पार्टिया होतात म्हणे, याला ऊर्दुचे अतिक्रमण नाही म्हणायचे का?

या सर्व आणि इतरही बरयाच कारणांनी जसे की कलाकारांची मग्रुरी, हे चित्रपट बघण्याची इच्छा होत नाही.

राहिला प्रश्न ,प्रेक्षक नसताना सुद्धा कोटी च्या कोटी उड्डाणे घेणारी आकडवारी दाखवली जातेय त्यांच ऑडिट कसं होत? यावर कोणी जाणकार प्रकाश टाकु शकतं का?

बॉयकॉट गॅंग

वरिल प्रतिक्रिया अर्धवट्च प्रकाशित झाली.

बॉयकॉट गॅंग विरुद्ध इतर असा प्रसारमाध्यमांवर चित्र आहे.
बॉयकॉट गॅंग चित्रपटाचा विरोध करत आहेत व इतर बाकीचे चित्रपट कीती चांगला आहे , किती कमावले , जरुर बघा हे हिरीरीने सांगत आहेत जसा चित्रपटाकडुन मिळालेला नफा या समर्थन करणार्यांना मिळणार आहे.

मुळात चित्रपट सुमार असल्याने बॉयकॉट गॅंग ला करण्यासारखे काही असेल असे वाटत नाही.

चौथा कोनाडा's picture

13 Sep 2022 - 5:17 pm | चौथा कोनाडा

यश राज ,.. हा हा हहा सही हैं

😄

मुळात चित्रपट सुमार असल्याने बॉयकॉट गॅंग ला करण्यासारखे काही असेल असे वाटत नाही.

म्हणूनच चेव चढाललाय !

सौंदाळा's picture

13 Sep 2022 - 6:00 pm | सौंदाळा

मल्टी स्टारर, बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्याची प्रोडक्शन कॉस्ट बर्‍याच प्रमाणात वसूल झालेली असते असे वाचले / ऐकले होते.
गाण्यांचे हक्क, सॅटेलाईट राईट्स, मिडीया पार्टनर्स वगैरेंकडून कोट्यावधी रुपये पहिल्या दिवसाआधीच मिळालेले असतात. त्यामुळे शक्यतो निर्मात तोट्यात जातच नाही. (हल्ली ही समीकरणे बदलली आहेत का ठाऊक नाही.)

सलग फ्लॉप दिले तर आताचा नाही, पण पुढचा चित्रपट तितके पैसे देणार नाही..

डाम्बिस बोका's picture

14 Sep 2022 - 11:14 pm | डाम्बिस बोका

बॉयकॉट गॅंग ला माझे मुळीच समर्थन नाही. तुम्हाला सर्वात विरोधी घेतली म्हणजे तुम्ही देशद्रोही असले युक्तिवाद मला पटत नाहीत.
असो......

तुमचे निरीक्षण मात्र चांगले आहे. चित्रपट पाहून पूर्ण भ्रमनिरास झाला.
१. रणबिर आणि आलिया यांचा फालतु मुद्राभिनय.. बत्तड चेहरा काय असतो हे कळते. कुठे भीती, प्रेम, आश्चर्य नाही. expressions नाहीत. अभिनयात नापास झालेले starkids
२. अगदी निरर्थक, पाणचट आणि थुकरट डॉयलोग ऐकायला मिळाले.
खरंच वात आणणारे dialogues. कुठे सवादफेख नाही. एका ओळीपेखा मोठे वाक्य नाही. कदाचित पाठांतर जमत नसेल. "अग्निअस्त्र प्रकटम " हे ह्यांचे संस्कृत चे ज्ञान!!!!!!!!!.. काही अभ्यास केला नाही. भूमिका वाचली नाही....समजली नाही किंव्हा समजण्याची लायकी आणि पात्रता नाही.
३. प्रसंगाला न शोभणारी गाणी..... नाच ........कुठेही काहीपण अचानय होते

थोडक्यात काय........प्रेक्षकांना गृहीत धरायचे........आम्ही स्टार ....काही पण दाखवू तुम्ही बघणार हा माज. .........खरोखर चांगल्या संकल्पने ची चिरफाड केली आहे.

डाम्बिस बोका's picture

14 Sep 2022 - 11:03 pm | डाम्बिस बोका

चित्रपट पाहून भ्रमनिरास झाला. MARVEL STYLE काहीतरी बघायला मिळेल अशी थोडी महाफात अपेक्षा होती. पण शेवटी भिकार बॉलीवूड style कचरा बगाव लागला.

रणवीर, आलिया पूर्ण एकाच आणि मक्ख चेहरा घेऊन वावरतात. राग, लोभ, भीती, आश्चर्य असे कोणतेच भाव चेहर्यावर बघायला मिळत नाही. प्रत्येक frame मध्ये आलिया च्या चेहऱ्यावर फॅन ठेवून केस उडवले आहेत. ती पूर्ण movie एकाच चेहरा दाखवते. कुठे ताळमेळ नाही. भंपक dialogues काय .....अर्रर्र डोक्याचा भुगा. ढिसाळ पटकथा, अजब दिग्दर्शन. तोच तोच बॉलीवूड मसाला आणी कोंबडी पण बदलत नाही.

माझ्याकडून १ स्टार्स 5 पैकी.

ब्रम्हास्त्र म्हणजे स्पिडरमॅन, क्स-मन, फास्ट अँड furious, गमे ऑफ थ्रोवन याची शिळी खिचडी.

उन्मेष दिक्षीत's picture

21 Sep 2022 - 1:40 am | उन्मेष दिक्षीत

हॅरि पॉटर आणि टर्मिनेटर-२ सुद्धा !