घरच्या घरी कचरा व्यवस्थापन

रम्या's picture
रम्या in जनातलं, मनातलं
7 Feb 2016 - 1:00 am

      बरेच दिवस मिपावर read only मोड मध्ये राहिल्यावर आज काही तरी टाइपायचा योग आला. तर आजचा विषय "घरच्या घरी कचरा व्यवस्थापन". या विषयावर ढीगभर माहीती जालावर उपलब्ध आहे. पण मराठीतून तशी कमीच. पुस्तकेही बरीच उपलब्ध असतील पण त्यामधे सर्वसाधारण पणे हे असं करा, तसं करू नका अशा स्वरुपाचे लिखाण पहायला मला मिळालं. पण काय करायचं? आम्ही पडलो संशयी! लोकांच्या कपाळावर जसं गंध असतो तसा आमच्या डोक्यावर कायमचं प्रश्नचिन्ह असतं! आम्हाला कायम "का?" हा प्रश्न पडलेला असतो. त्यामुळे सल्ल्यांनी भरलेलं पुस्तक सहसा माझ्या डोक्यात शिरतच नाही. मग स्वतः जालावर काही प्रश्नांची उत्तर शोधून आणि ती साध्या प्रयोगांनी पडताळून पाहीली. आणि मगच मनाचं काही प्रमाणात समाधान झालं. यातून जे काही थोडबहूत ज्ञान मिळालं ते इतरांपर्यंत पोहोचावं म्हणून हा लेख.

      तर घरच्या कचर्‍याचं व्यवस्थापन करायचं म्हणजे काय करायच? तर घरी तयार होणार्‍या जास्तीत जास्त कचर्‍याची घरच्या घरीच विल्हेवाट लावायची. ती कशी तर एक छोटासा खत प्रकल्प तयार करून.
आता प्रकल्प म्हटल्यावर जागा खुप लागणार का? शहरातल्या लोकांसाठी दोन बादल्या राहतील अशी ग्रिल मधील जागा पुरेशी आहे. एखादा टेरेस फ्लॅट असेल तर उत्तमच.

घरात साधारणपणे तयार होणारा कचरा साधारण पणे दोन भागात विभागता येऊ शकतो,

  1. ओला कचरा (पालेभाज्यांची देठं, खराब झालेली पानं, केळ्यांची साल वगैरे)
  2. सुका कचरा (वाळलेला पालापाचोळा, जुनी वर्तमान पत्रे, प्लॅस्टीच्या पिशव्या, बाटल्या, जुन्या इले़क्ट्रॉनिक वस्तू वगैरे)
  • एरोबिक - ऑक्सिजनच्या उपस्थितीत होणारे विघटन
  • अनएरोबिक - ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत होणारे विघटन.
  • हे विघटन करणार्‍या जिवाणूंनाही एरोबिक आणि अनएरोबिक जिवाणू असंच म्हणतात.

          यामधील अनएरोबिक विघटन होताना त्यातून सल्फर डाय ऑक्साईड सारखे दुर्गंधी असणारे वायू तयार होतात. त्यामुळे तुमच्या खताच्या भांड्यातून जर दुर्गंध येत असेल तर त्यामध्ये अनएरोबिक विघटन सुरु झालं असं समजावं. आणि म्हणुनच घरच्या खत प्रकल्पासाठी आवश्यक असतं ते एरोबिक विघटन, ज्यामधून दुर्गंधी येत नाहि. वास्तविक त्यामधून सुगंध येतो. हो, मी "सुगंध"च म्हणालो. पहिल्या पावसात मातीतून जो सुगंध येतो अगदी तसाच सुगंध एरोबिक विघटनातून येतो.
    तर घरच्या कचर्‍याच एरोबिक विघटन कस करायचं ते पाहू.

          आपल्याला माहीत आहे हवेमध्ये ऑक्सिजन असतो. कचर्‍याला पुष्कळ हवा मिळत असेल, तर सहाजिकच त्यामध्ये नैसर्गीक पणे एरोबिक जिवाणूंची वाढ होईल. म्हणूनच जो डबा तुम्ही खत प्रकल्पासाठी वापराल त्याला पुष्कळ छिद्र असतील हे पहा. मी या कामासाठी जाळीदार प्लॅस्टीकचा ट्रे किंवा डबा वापरतो.

          आता आपल्याला कचर्‍यामध्ये जास्तीत जास्त एरोबिक जिवाणू तयार होतील हे पहायचं आहे जेणेकरून कचरा लवकरात लवकर कुजून जाऊ शकेल. जिवाणूंची संख्या वाढवायची म्हणजे त्यांच्या साठी पोषक वातावरण निर्माण करावं लागेल. जिवाणूंच्या वाढी साठी मुख्यतः कार्बन आणि नायट्रोजन या मुलद्रव्यांची आवश्यकता असते. कार्बन हा उर्जेचा स्त्रोत म्हणून वापरला जातो तर नायट्रोजन हा जिवाणूंच्या शरीर बांधणीसाठी आवश्यक असतो. मानवाला नाही का उर्जेसाठी कार्बोदके आणी शरीर बांधणी साठी प्रोटीन हवे असतात अगदी तसेच.

          सर्व प्रकारच्या कचर्‍यामध्ये मुलत: कार्बन आणि नायट्रोजन असतातच पण त्याचं प्रमाण (C:N ratio) हे कचर्‍या नुसार बदल रहातं. उदा. टाकाऊ हिरव्या भाजीपाल्यामध्ये हे प्रमाण १५:१ एवढं, तर वाळलेल्या पानांमध्ये हेच प्रमाण ५०:१ हे असतं. थोडक्यात हिरव्या पदार्थात तुलनेने नायट्रोजन जास्त असतो तर सुक्या पदर्थात कार्बन जास्त असतो. जिवाणूंच्या आदर्श वाढीसाठी हे प्रमाण ३०:१ असावे लागते.
    CN Ration Chart
          तुमच्या खत प्रकल्पात जास्त नायट्रोजन असणारे पदार्थ (म्हणजे हिरवा कचरा) असतील तर जिवाणूंसाठी प्रोटीन भरपूर असेल पण त्यांना उर्जेसाठी कार्बनची कमतरता भासेल. अशा वेळेस पुर्ण नायट्रोजन सुद्धा वापरला जाउ शकत नाही कारण जिवाणूंची संख्या पुरेशी नसेल. अशा वेळी जास्तीचा नायट्रोजन अमोनिआच्या स्वरूपात बाहेर टाकला जातो आणि तुमच्या खत प्रकल्पाला आंबट, अमोनिआ सारखा वास येईल. हे टाळायचं असेल ओल्या कचर्‍याबरोबर सुका कचराही वापरणं आवश्यक आहे.

    पण किती ओला कचरा आणि किती सुका कचरा वापरायचा जेणे करून एकून कार्बन आणि नायट्रोजनचं प्रमाण आवश्यक एवढं म्हणजे ३०:१ येईल? याचं एक साधं उत्तर शोधूया.

          हे बघा वर म्हटल्याप्रमाणे हिरवा कचरा जास्त झाला तर अमोनिआ निर्माण होइल जे आपल्याला नको आहे. पण जस्त सुका कचरा झाला तर काहीच फरक पडणार नाही. जो पर्यंत हिरवा कचरा उपलब्ध आसेल तो पर्यंत जिवाणूंची संख्या वाढेल आणी त्यासाठी काही प्रमाणात सुका कचरा उर्जेसाठी वापरला जाईल. हिरवा कचरा संपला की सुका कचरा फार तर पडून राहील. सुका कचर्‍याचं सुद्धा विघटन होईल पण त्यामधून दुर्गंध येणार नाही कारण सुक्या कचर्‍यात तुलनेने फार कमी नायट्रोन असतो आणि तो वापरण्यासाठी त्यामध्येच पुरेसा कर्बन सुद्धा असतो.

    चला आता प्रत्यक्षात आपण आपला खत प्रकल्प कसा करायचा ते पाहू.

          एक जाळीदार डबा घ्यायचा. बाजारात दिवसभराचा कचरा साठवण्यासाठी जाळीदार स्टीलचे डबे मिळतात ते चालतील. किंवा जाळीदार प्लॅस्टीकचे ट्रे सुद्धा चालतील. अशा डब्याला तळाला सुद्धा छिद्र असतील हे पहावं. कचर्‍याचं विघटन होताना जास्तीचं पाणी निघून जाण्यासाठी याची आवश्यकता असते. डब्याच्या तळाशी तयार शेणखत, गांडूळ खत किंवा कंपोस्ट खताचा बोटभर जाडीचा थर द्यावा. या खतामध्ये आवश्यक जिवाणूंची सुरवातीची बॅच हजर असते. यांच्याच पुढच्या पिढ्या तुमचा खत प्रकल्प चालवतील. ओला किंवा हिरवा कचरा रोज तुमच्या स्वयंपाक घरात तयार होतोच. सुका कचरा म्हणून एखाद्या जवळच्या बागेमधून वाळलेली पान गोळा करून आणावीत. (मी या बाबतीत सुखी आहे. आमच्या नवी मुंबईत पुष़्कळ उद्यानं आहेत. मी अधून मधून आमच्या घरा जवळच्या बागेमधून एक बॅग भरून सुकी पानं आणून तयार ठेवतो)
          आपल्या स्वयंपाक घरात तयार होणारा ओला कचरा म्हणजे, पालेभाज्यांचे देठ, केळ्यांची साले, कोबीचा उरलेला भाग, भेंडीची कापलेली देठे इत्यादि इत्यादी रोजच्या रोज आपल्या खताच्या डब्यात टाकाव्यात. पण त्याच बरोबर साधारण पणे तितक्याच किंवा थोड्या जास्तच आकारमानाएवढी सुकलेली पानं सुद्धा ओल्या कचर्‍यात मिसळून टाकावीत. त्यावर थोडे पाणी शिंपडावे. हो विघटना साठी कार्बन आणि नायट्रोजन बरोबरच पाण्याची सुद्धा आवाश्यकता असते. पण माझ्या अनुभवानुसार ओल्या कचर्‍यात पुरेसं पाणी असते. त्यामुळे अगदी थोडेसेच पाणी पुरेसे असते. पाण्याचं प्रमाण जास्त झाल्यास हवेचा पुरवठा रोखला जाउन अनएरोबिक जिवाणूंची वाढ होण्यास सुरवात होईल. हा विघटन होणारा कचरा दर तीन किंवा चार दिवसांनी थोडा हलवावा जेणे करून पुन्हा एकदा हवेचा पुरवठा होऊन एरोबिक जिवाणूंना पुरक हवामान मिळेल. कचरा हलवताना घाण वास आला कि समजावं अन एरोबिक विघटन सुरू झालेलं आहे. याला साध उपाय म्हणजे सुका कचरा वाढवावा नि हवेचा पुरवठा वाढवण्यासाठी कचरा हलवावा.

          कचरा हलवताना मातीचा सुगंध आला कि समजावं तुमचा प्रकल्प योग्य मार्गाने जात आहे. जसा जसा पुर्वी टाकलेल्या कचर्‍याचं विघटन होत जाईल तसा तसा त्याचे आकारमान कमी होऊन तो खाली बसेल. अशा प्रकारच्या एका बादलीचा आकाराचा डबा एका कुटूंबाचा काही महिन्यांच्या किंवा वर्षाचा सुद्धा कचरा सामावून घेऊ शकेल.
          डबा भरत आला असं वाटलं कि तो काही दिवसांसाठी असाच ठेवून द्यावा आणी दुसरा डबा अशाच प्रकारे वापरण्यास सुरवात करावी. पहिल्या डब्यातील अर्धवट तयार झालेल्या खतामध्ये मात्र नियमित पाणी टाकून ओलसर पणा ठेवावा नि हलवावं.

    या शेवटच्या टप्प्याला खाताचं क्युरींग प्रकिया असं म्हटलं जातं. ज्यावेळेस डब्यामधील कचर्‍यामध्ये कोणताच ओळखण्याजोगा कचर्‍याचा अंश रहात नाही त्यावेळेस क्युरींग प्रक्रिया पुर्ण झाली असं समजावं. पुर्ण तयार झालेलं खत हे काळसर तपकिरि रंगाचं आणी वासरहीत असते. हे तयार झालेलं कंपोस्ट खत आपल्या बागेमध्ये किंवा कुंड्यांमध्ये वापरावे.

    काही लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

    1. तुमच्या खताच्या डब्यात कोणतेही शिजवलेले, प्रक्रिया केलेले पदार्थ, दुधापासून तयार केलेले पदार्थ, मांसाहारी पदार्थ अजीबात टाकु नयेत. अन्यथा अळ्या, उंदीर यांचा उपद्रव होईल.
    2. शक्यतो फळांचे टाकाऊ पदार्थ वापरू नयेत. त्यातील गोड चवीमुळे मुंग्यांचा आणि विशिष्ट प्रकारच्या फ्रूट फ्लाईज यांचा त्रास होऊ शकतो. मला साध्या केळ्यांच्या साली मुळे सुद्धा फ्रूट फ्लाई़़जचा त्रास झाला.
    3. भाजीपाल्यांचा वापर उत्तम.
    4. सगळा कचरा बारीक कापून टाकल्यास फार लवकर कुजतो. नंतर कचरा हलवण्यासाही सोईचे होते.
    5. रोज टाकलेला ओला कचरा नेहमी सुक्या कचर्‍याने झाका. माश्यांचा त्रास होणार नाही.
    6. डबा झाकुनच ठेवा. माश्यांचा त्रास होणार नाही.
    7. सुका कचरा म्हणून काही जण वर्तमान पत्राचा कागद, किंवा पुठ्ठ्यांचे तुकडे वापरायचा सल्ला देतात. पण मी सहसा वापरत नाही कारण अशा कागदा मध्ये इतर अनेक रसायनं असू शकतात. शिवाय अशा कागदांमुळे कुत्र्याच्या छत्र्या खुप उगवतात.
    8. हा उपद्याप करताना "बायको" या प्राण्याचा प्रचंड त्रास होतो हा माझा अनुभव. कारण हा प्राणि ओला कचरा आणि सुका कचरा अजिबात वेगळा ठेवत नाही. तो वेगळा करण्यासाठी आपण स्वयंपाक घरात गेल्यास चिडचिडीचा सामना करावा लागतो. टाकाऊ भाजीपाला बारीक कापण्यासाठी तुम्ही सुरी घेतलीत तर या प्राण्याला त्याची त्याच क्षणी प्रचंड निकड असल्याचं जाणवतं. "या कामाला बरं नेहमी वेळ मिळतो, घरातली इतर कामं करू नका", असे टोमणे वरचेवर ऐकावे लागतात. कार्बन-नायट्रोजन प्रमाण आदर्श ठेवून एरोबिक विघटन करण्यासाठी आटोकाट प्रयत्न जरी केलेत तरी या प्राण्याला नेहमी तुमच्या खत प्रकल्पामधून घाण वास येतो. यावरचा उपाय मला आजून सापडलेला नाही.
    विज्ञानअनुभवमाहिती

    प्रतिक्रिया

    रामदास's picture

    7 Feb 2016 - 1:12 am | रामदास

    असे काही करतात वाचा http://www.iamin.in/en/thane/news/thanekar-spreads-awareness-about-bio-c...

    रामदास's picture

    7 Feb 2016 - 1:18 am | रामदास

    कचरा व्यवस्थापनाच्या तिघांच्या पध्दती वेगवेगळ्या आहेत.

    रामदास, माहीती दिल्याबद्दल धन्यवाद.

    एस's picture

    7 Feb 2016 - 1:22 am | एस

    वाखुसाआ.

    पॉइंट नं. आठमध्ये पॉइंट आहे. पण असो! ;-)

    चाणक्य's picture

    7 Feb 2016 - 7:18 am | चाणक्य

    धागा. छान माहिती दिलीत. प्रयोग करायचं डोक्यात होतंच. आता तुमच्या धाग्यामुळे काय करावं वा करू नये ते समजायला मदत झाली. धन्यवाद.

    फार उपयोगी धागा.आजच सुरुवात करते आहे.

    भंकस बाबा's picture

    7 Feb 2016 - 8:39 am | भंकस बाबा

    मी गेली ५ वर्षे हां प्रयोग करत आहे. साधारण २० लीटरची बादली चार माणसाच्या कुटुंबात महिन्याभरात भरते. त्यापेक्षा जो भाजीपाल्याचा ओला कचरा असतो तो तुम्ही कांद्याची जाळी येते त्यात भरून गच्चीवर वाळवला तर काम सोप्पे होते. हा ओला कचरा दोन दिवसात कड़कड़ित वाळतो. घाण अजिबात येत नाही. या कचर्याला जर तुम्ही पूर्ण कुजलेल्या शेंणखताच्या थराने झाकलेत तर खत बणन्याची प्रक्रिया लवकर होते. घरी असलेल्या ओल्या कचर्यात ८०ते ९०% पाणी असते. हां कचरा जर तुम्ही कड़कड़ित वाळवला तर जेमतेम १५ते २०% पाणी उरते. हां कचरा जर तुम्ही प्रक्रिया न करता जरी फेकलात तरी पर्यावरणाचे रक्षण तुम्ही आधीच केलेले असते. नंतर अजुन टंकिन.

    संदीप डांगे's picture

    7 Feb 2016 - 10:35 am | संदीप डांगे

    लेख तर छान पण भंकसबाबा, तुमचा अनुभव व सल्लाही उपयोगी आहे. सुकविणे प्रक्रिया मस्तच.

    भाजीपाल्याचा ओला कचरा असतो तो तुम्ही कांद्याची जाळी येते त्यात भरून गच्चीवर वाळवला तर काम सोप्पे होते.
    प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद.
    पण मला वाटतं काही तरी गल्लत होते आहे. ओला कचरा वाळल्यावर त्यातील बराचसा नायट्रोजन हवेत निघून जातो आणि शिल्ल्क राहतो बराचसा कार्बन. पण वर सांगितल्या प्रमाणे ऊपयुक्त जिवाणूंच्या वाढीसाठी ओला कचरासुद्धा तेवढाच आवश्यक आहे. असा वाळवलेला कचरा विघटनासाठी जास्त वेळ घेईल. पण ओला कचर्‍याचा अगदीच त्रास होत असेल आणि खत वापरण्याची घाई नसेल तर हा उपाय करायला सुद्धा हरकत नाही.

    भंकस बाबा's picture

    7 Feb 2016 - 11:42 pm | भंकस बाबा

    तुम्ही सांगितलेली पद्धत योग्य आहे पण माझा अनुभव असा आहे की ओला कचरा वाळवला की त्याचे आकारमान कमी होते त्यामुळे तो कमी जागेत राहतो. मुम्बईसारख्या जागेत जिथे जागा इंच इंच लढवली जाते तिथे नुसता ओला कचरा वापरणे थोड़े कठिन वाटते. मुळ उद्देश् कचऱ्याचे व्यवस्थापन असले पाहिजे त्याचे खत बनवने नाही.
    मुंबईतील फ़क्त एक टक्का लोकांनी हां उपक्रम राबवला तर मुम्बईच्या कचर्याच्या समस्या थोड्याफार प्रमाणात कमी होतील. १ टक्का लोक म्हणजे धोबळमानाने दोन लाख, ८००ग्राम कचरा दिवशी या प्रमाणे दोन लाख कुटुंबाचा कचरा जवळ जवळ १६० टन, कचरयाची एक गाडी जवळ जवळ ३० ते ४० टन एक फेरीत नेते. म्हणजे विचार करा तुम्ही ३ फेऱ्या दिवसाला वाचवत आहात. ( कचरा सुकवल्यानंतर १/४ वजनाचा होतो म्हणजे तसाच फेकला तरी आपण पर्यावरण वाचवतो) ह्यातील थोड़ा जरी ख़त म्हणुन वापरला तर मोठे उद्दिष्ट साध्य होईल.

    संदीप डांगे's picture

    8 Feb 2016 - 12:35 am | संदीप डांगे

    सहमत. कचरा व्यवस्थापन म्हणजे खतंच बनविणे असा काहीसा सर्वसामान्य समज झाला आहे. ह्यात कायम ओला कचरा वेगळा काढा, त्याचे खत करा ह्याच प्रोसेसवर भर दिला जातो. सुका कचरा, त्याचे वर्गिकरण, त्याचा पुनर्वापर, सुका कचरा होण्याची कारणे अधिकाअधिक कमी करणे, इत्यादी बाबी कचरा व्यवस्थापनामध्ये समाविष्ट आहेत. मुळात कचराच कमी होईल ह्याला प्राधान्य असणे हे कचरा व्यवस्थापनात महत्त्वाचे. बाकी सर्व त्यानंतर.

    भंकस बाबा, तुमचा विचार आणि मुळ हेतू पटला. रोजच्या रोज सर्व घरांतून २५% कमी कचरा जरी बाहेर पडला तरी पर्यावरणाचे तर सोडाच नागरिक म्हणून आपलेच बरेच नुकसान वाचेल. इट्स प्योर कॅश. अडचण फक्त एक म्हणजे एकच. हे सगळे सर्वांनी करायला हवे. एका चळवळीसारखे. एकट्या दुकट्याने, दोनचार बिल्डिंगांनी, दहा बारा सोसायट्यांनी करुन उपयोग होत नाही. कंपल्सरी सर्वांनीच केले तर फायदा. अन्यथा फॅड.

    ह्याबद्दल सर्वंकष एक लेख लिहायचा मानस आहे. जमेल तसा लवकर टाकतो. नाशिकच्या घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया केंद्राबद्दल थोडा अभ्यास केला आहे.

    भंकस बाबा's picture

    8 Feb 2016 - 12:52 am | भंकस बाबा

    तुम्ही सुस्पष्ट मांडले, लेख येउद्या, मी भर टाकिनच.

    भंकस बाबा's picture

    7 Feb 2016 - 11:52 pm | भंकस बाबा

    कांद्याची जाळी वापरण्याचे कारण हा कचरा सुकल्यावर इथेतिथे उडून जात नाही. घरातला प्राणी थोडा दम मारला की गप्प बसतो पण सोसायटीत जे विघ्नसंतोषी प्राणी असतात ते क्षुल्लकश्या कारणावरुन खुसपट काढ़तात व् अशा वेळी 'घरका भेदी लंका ढाइ' होते.

    कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

    7 Feb 2016 - 8:51 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

    चांगली माहिती. माझी आई एक थर (१") शेणखताचा मग त्याच्यावर एक थर (२"-२.५") घरच्या पालेभाज्यांची देठं वगैरेंचा त्याच्यावर सुकलेल्या पानांचा थर आणि मग त्याच्यावर थोडं पाणी शिंपडुन कोरड्या मातीचा पातळ थर पसरते. कोरडी माती पसरल्याने आतमधे उबदार वातावर निर्माण होउन खतनिर्मितीला सहाय्य होतं असं तिचं निरिक्षण आहे.

    रम्या's picture

    7 Feb 2016 - 9:09 pm | रम्या

    परफेक्ट!!

    भुमी's picture

    7 Feb 2016 - 9:13 am | भुमी

    सहजसोप्या भाषेत समजावून सांगितले आहे. वा खू सा आ.

    ज्ञानोबाचे पैजार's picture

    7 Feb 2016 - 2:11 pm | ज्ञानोबाचे पैजार

    लेख आवडला,
    आमच्या सोसायटी मध्ये पण ओला कचरा विघटनाचा प्रकल्प आहे पण त्या मध्ये वाळकी पाने न वापरता लाकडाचा भुसा आणि कोणती तरी पावडर टाकली जाते. ( असे का ते शोधतो) सोसाटॆ मध्ये भरपुर झाडे आहेत आणि त्यांची भरपूर वाळकी पाने जमतात जी दर आठवड्याला जाळली जातात. त्यांचा वापर विघटनासाठि केला जात नाही (ह्याचेही कारण शोधतो)
    पण घरी हा प्रयोग नक्की करुन बघण्यात येईल.

    पैजारबुवा,

    लाकडाच्या भुश्यात कार्बन भरपुर असतो त्यामुळे ओल्या कचर्‍या बरोबर तो वापरणे केव्हाही चांगलेच.
    पण सुकी पानं तर जरूर वापरावीत. ती जाळणे म्हणजे तर पर्यावरणाला हानी पोहोचवणे.
    प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

    पैसा's picture

    7 Feb 2016 - 2:17 pm | पैसा

    सर्वांनीच उपयोगात आणावी अशी उत्तम माहिती.

    भंकस बाबा's picture

    7 Feb 2016 - 6:20 pm | भंकस बाबा

    आपले उष्टे ताट विसळून ते पाणी जर प्लास्टिकच्या बरणीत भरून तीन दिवसांनी वापरले तर ते उत्तम ख़त बनण्यास मदत करते. वाणसामानाच्या दुकानात गोळ्याच्या बरण्या पाच दहा रूपयाना मिळतात. ह्यात पाणी तर वाचतेच पण आपल्या कुंडयाना खत देखिल मिळते.
    ज्यांच्या घरी शोभिवंत मस्त्यालय आहे ते लोक साइफन करुन आलेले पाणी कुंडयात वापरु शकतात पण काही लोक त्यात माशांना रोग होउ नए म्हणुन मीठ वापरतात. असे पाणी वापरु नये.

    उगा काहितरीच's picture

    8 Feb 2016 - 12:06 am | उगा काहितरीच

    छान माहीती. जमल्यास करून पाहीन .

    मोग्याम्बो's picture

    9 Feb 2016 - 3:30 pm | मोग्याम्बो

    कुठल्याही प्रकारचं पोतं खत प्रकल्पासाठी उत्तम आहे. पोत्याला अत्यंत बारीक छिद्रे असतात. ती ह्या एरोबिक विघटनास अत्यंत उपयुक्त ठरतात.