हळूच बोल, राजसा

बहुगुणी's picture
बहुगुणी in जनातलं, मनातलं
1 Feb 2016 - 10:18 am

आवडलेल्या इंग्लिश गीतांच्या मराठी रुपांतराचा सिलसिला पुढे सुरू ठेवतोय.

आज सुटी सत्कारणी लावावी म्हणून फिनिक्स हा जर्मन चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहिला. आवडला. चित्रपटाच्या अखेरीस असलेलं निना हॉस या कथानायिकेने गायलेलं "Speak low when you speak, love" हे गाणं म्हणजे चित्रपटाचा परमोच्चबिंदू वाटावा इतकं आवडलं. थोडा शोध घेतला तर कळलं की ऑग्डेन नॅश याने लिहिलेलं आणि कर्ट वाईल याने संगीतबद्ध केलेलं हे गीत या आधीही बऱ्याच गायिकांनी (आणि गायकांनीही) गायलेलं आहे. चित्रपटातलं नीना रॉसच्या आवाजातलं गीत इथे पहाता येईल.

बार्ब्रा स्ट्रायसँडचं ध्वनिमुद्रणही ऐकलं, तिच्या आवाजात धार आहे :

पण मला वाटलं की टोनी बेनेट आणि पंडित रविशंकर यांची कन्या नोरा जोन्स यांच्या आवाजातल्या या गाण्याने या गीताचा मूड परफेक्ट पकडला आहे.

गीत आवडलं म्हणून त्याच्या भाव-रुपांतराच्या प्रयत्नात हे मुक्तक (मूळ गीताचे शब्द अखेरीस आहेतच, मूळ काव्यच सुंदर असलं की इतरांनाही प्रेरणा मिळते हे या आधी दिसलंच आहे, तेंव्हा याही वेळी प्रतिसादांतून भर पडेल अशी अपेक्षा आहे) :

हळूच बोल, राजसा, तू मजशी भेटता

ग्रीष्मातील दिन ढळला, अति त्वरे, अति त्वरे

क्षण अपुले, किती अपुरे, नौकांनी ज्यापरी

विलगावे सागरी, अति त्वरे, अति त्वरे

हळूच बोल, प्रियकरा, अनंग एक स्फुल्लिंग,

हरवितसे अंधारी, अति त्वरे, अति त्वरे

मी जावे ज्या स्थानी, उद्या येई आज झणी,

दिवस कसे सरले रे, अति त्वरे, अति त्वरे

विशाल काल तरी कसे, सुवर्ण क्षण इवलेसे

समय चोर हा कराल, करी लगबग अति त्वरे

उशीर होई रे सखया, अंतर्पट उतरले

सर्व नाट्य संपले, अति त्वरे, अति त्वरे

विरहीणी मी, अजुनही, प्रतीक्षेत, अजुनही

प्रेमाने अलगद तू, बोल आज सत्वरे


मूळ गीतः

Speak low when you speak, love
Our summer day withers away too soon, too soon

Speak low when you speak, love
Our moment is swift, like ships adrift,
we´re swept apart, too soon

Speak low, darling, speak low
Love is a spark, lost in the dark too soon, too soon

I feel wherever I go that tomorrow is Near,
tomorrow is here and always too soon

Time is so old and love so brief Love is pure gold and time a thief
We´re late, darling, we´re late The curtain descends, everything ends
too soon, too soon

I wait, darling, I wait
Will you speak low to me, speak love to me and soon

मुक्तकआस्वाद

प्रतिक्रिया

विजय पुरोहित's picture

1 Feb 2016 - 10:28 am | विजय पुरोहित

वाह! काय सुंदर रोमॅण्टिक काव्य आहे. अनुवाद देखील अप्रतिम...
हृदयातील एकदम हळवे कोपरे जागृत करणारे काव्य...