फाशी आणि प्रसिद्धी माध्यमांचा विपर्यास - एक विश्लेषण

विकास's picture
विकास in काथ्याकूट
30 Jul 2015 - 9:27 pm
गाभा: 

खालील लेख माध्यमे माहिती कशी वापरू शकतात या संदर्भात आहे, जरी त्याचे आत्ताचे कारण आणि संदर्भ याकूबची फाशी असली तरी. आधी याकूबवरील चर्चेत प्रतिसाद म्हणून देणार होतो पण विश्लेषण असल्याने येथे वेगळा काथ्याकूट टाकत आहे. त्यामुळे चर्चा करताना केवळ याकूब सोडून विस्तॄत मुद्दयावर चर्चा होऊदेत अशी विनंती.

मी उठसूठ फाशीच्या शिक्षेच्या बाजूने नाही. मात्र भारतीय घटनेत सांगितलेल्या "रेअरेस्ट ऑफ दी रेअर" म्हणून दिल्या जाणारी शिक्षा गरज पडल्यास असली पाहीजे अशा मताचा नक्की आहे. २००० सालापासून ते ३० जुलै २०१५ पर्यंत भारतात ४ जणांना फाशी दिली गेली आहे. त्यातील एक मुंबई हल्ल्यातला कसाब आणि दुसरा संसद हल्ल्यातील अफझल गुरू हे राष्ट्रविघातक / दहशतवादी कारवायात पकडले गेलेले आणि आरोप सिद्ध झालेले गुन्हेगार होते. तिसरा अर्थातच याकूब. चौथा होता तो प. बंगाल मधील धनंजोय चॅटर्जी ज्याने १९९० साली १४ वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग करून खून केला. त्याला २००४ साली फाशी झाली.

बाकी आता सुप्रिम कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावल्यावर, दयेचा अर्ज निकालात काढण्यास आणि पुढे अंमलबजावणी करण्यास खूप वेळ घेतला तर शिक्षा जन्मठेपेवर आणण्याचे बंधन घातले आहे. त्यामुळे ज्या दिवशी पहाटे सुप्रिम कोर्टाने याकूबच्या शिक्षा अंमलबजावणीवर अंतिम मोहर उठवली, त्याच दिवशी राजीव हत्येसंदर्भात सरकारचा फाशीची शिक्षा रहावी हा अर्ज फेटाळून, उशीर केल्यामुळे ती जन्मठेपेत रुपांतरीत केली गेली. कुठेतरी अशी शक्यता असेल की याच भितीमुळे टाडा कोर्टाने तात्काळ पाऊले उचलून याकूबच्या फाशीच्या अंमलबजावणीचा निर्णय जाहीर केला आणि आता अंमलात आणला.

आता प्रसिद्धी माध्यमांच्या संदर्भात - जो गदारोळ उठला त्याचे विश्लेषण...

या गदारोळाचे मूळ आहे ते माजी रॉ प्रमुख स्व. बी रामन यांचा रिडीफ.कॉम मधे प्रकाशीत झालेला लेख... त्यात त्यांचे म्हणणे त्यांच्याच शब्दात, "There is not an iota of doubt about the involvement of Yakub and other members of the family in the conspiracy and their cooperation with the ISI till July 1994. In normal circumstances, Yakub would have deserved the death penalty if one only took into consideration his conduct and role before July 1994."

आता वरील विधानाचा (आणि नंतरच्या त्यांच्या लेखातील समारोपाच्या विधानाचा) अर्थ समजून घेण्याआधी काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेणे गरजेचे आहे.

  • रामन यांनी हा लेख २००७ मधे लिहून रिडीफच्या शीला भट्टना दिला. पण नंतर सांगितले की असा लेख त्यांच्या नावाने प्रसिद्ध झाल्यास या खटल्यातील इतर गुन्हेगार-आरोपींना कोर्ट सोडून देऊ शकेल. त्यामुळे तो प्रकाशीत करू नका. त्यातील मुद्दे मांडले तरी हरकत नाही. तसे भट्ट यांनी २००७ साली त्यांच्या लेखात मांडले.
  • नंतर २०१३ साली रामन यांचे निधन झाले.
  • टाडा कोर्टाने वर सांगितल्याप्रमाणे फाशीच्या अंमलबजावणीची तारीख जाहीर केल्यावर रिडीफने रामन यांच्या भावाकडून परवानगी घेऊन तो लेख प्रकाशीत केला. आणि सगळा गदारोळ सुरू झाला.

आता लेखा संदर्भात लिहीण्याआधी काही प्रश्न पडले ते:

  • असेच जर उद्या अजून कुठल्या संदर्भात सामना ने केले अथवा ऑर्गनायजर ने केले - म्हणजे जी व्यक्ती हयात नाही त्या व्यक्तीच्या नावाचा authenticच पण वादग्रस्त लेख छापला तर तो मान्य केला जाईल का?
  • दुसरा महत्वाचा भाग असा की रामन यांनी त्यात जे काही लिहीले आहे त्याला कुठलाही संदर्भ नाही. "मी" केले, "मी" मुख्य होतो वगैरे असेच म्हणलेले आहे. त्यामुळे पुरावा नसताना, शिवाय ती व्यक्ती हयात नसताना जे काही लेखात लिहीले आहे ते १००% खरे मानता येईल का?

वरील प्रश्न पडले तरी, तो लेख जसाच्या तसा छापला आहे, रामन यांनीच लिहीला आहे आणि त्यात जे काही आहे ते पूर्ण सत्यच आहे असे समजूनच काही प्रश्न पडतातः

  • रामन यांनी या लेखात म्हणले आहे की नेपाळच्या पोलीसांनी याकूबचा संशय आला म्हणून तो परत पाकीस्तानात जाण्याआधी पकडले आणि नंतर भारतीय अधिकार्‍यांच्या स्वाधीन केले. ("Before he could board the flight to Karachi, he was picked up by the Nepal police on suspicion, identified and rapidly moved to India.") यालाच ते इतरत्र याकूबला इन्फॉर्मली पकडले असे म्हणतात.
  • या ऑपरेशनचे सूत्रधार स्वत: रामन होते असे देखील ते म्हणतात. ("The entire operation was coordinated by me."). पण त्यात असे कुठे देखील म्हणत नाहीत की त्यावेळेस त्याच्याबरोबर काही वाटाघाटी झाल्या आणि त्याला शब्द दिला गेला. मात्र पुढे असे म्हणतात की याकूबने नंतर सहकार्य केले. का केले? - अधिकार्‍यांनी दिलेल्या शब्दामुळे का मिळत असलेल्या "इन्फॉर्मल पोलीसी कृतींमुळे" याबद्दल काहीच लिहीत नाहीत. तो अर्थ ज्याचा त्याने काढावा.... (एखादा अतिरेकी, जो मुंबईच्या शेअर मार्केट सकट बारा ठिकाणी बाँब उडवण्यास जबाबदार आहे, त्याच्याशी कुठलाही पोलीस केवळ चहापाणी घेत गप्पा मारत माहीती काढेल/काढू शकेल असे वाटत नाही.)
  • नंतर रामन म्हणतात की याकूबच्या सहकार्यामुळे त्याचे टायगर मेमन सोडून इतर कुटूंबिय दुबई मार्गे भारतात परतले. पण त्यासंदर्भात ते कसे आले ते त्यांना माहीत नाही कारण ते या ऑपरेशन मधे सहभागी नव्हते. ("The Dubai part of the operation was coordinated by a senior officer of the IB, who was then on deputation to the ministry of external affairs. Neither the R&AW nor I had any role in the Dubai part of the operation.")
  • पुढे ते वर म्हणल्याप्रमाणे हे देखील म्हणतात की तो नि:संशय गुन्हेगार आहे. एरवी त्याला त्याच्या जुलै १९९४ च्या आधीच्या वर्तणुकीसाठी (म्हणजे १२ मार्च १९९३ नंतर देखील) फाशीच द्यायला हवी. पण जुलै १९९४ नंतरच्या त्याने केलेल्या सहकार्यामुळे त्याला शिक्षा करताना विचार करायला हवा. ("Yakub would have deserved the death penalty if one only took into consideration his conduct and role before July 1994.") पण त्याने असे नक्की काय केले हे मात्र रामन यांच्या लेखात कुठेच दिसत नाही.

आता त्यांच्या या लेखाचा त्यांनी सांगितल्याप्रमाणे वापर करत शीला भट्ट यांनी २००७ साली काय लिहीले आहे ते बघूयात

  • "While there is conclusive evidence of the Memons' involvement in this act of terrorism at the instigation of Pakistan's ISI, the fact that Yakub repented his involvement and cooperated with the Indian security agencies should not have been overlooked." - यातील "repented" हा शब्द पहा... रामन यांनी कुठेही त्याला पश्चाताप झाला होता असे लिहीलेले नाही. आता याकूबला झाला होता का नव्हता हा वेगळा मुद्दा आहे. पण पत्रकार दिलेली माहीती वापरताना स्वतःचे शब्द घालून वेगळेच वजन कसे देतात हे या निमित्ताने समजते.
  • "Had Yakub not agreed to surrender, the CBI could not have tried any of the Memons." - जर रामन त्यांच्या लेखात म्हणतात की याकूबला नेपाळ पोलीसांनी पाकीस्तानला जाण्याआधी संशयामुळे पकडले तर त्याने स्वतःस भारतीय अधिकार्‍यांच्या ताब्यात स्वाधीन केले (surrender) केले हे कसे काय?
  • "The defendant didn't bring to the notice of the court the cooperation extended by him in persuading other members of his family to escape the ISI's clutches and face trial in India. He probably thought he would get jail for some years and be able to lead a life as a free Indian citizen after serving his jail term." - याला काही अर्थ आहे का? हे चालले असताना जेठमलानी - भूषण काय झोपा काढत होते का खलीस्तान्यांची उरलीसुरली खरकटी काढत बसले होते? जर त्याने सहकार्य दिले होते तर त्याने ते कोर्टात सांगितले का नाही? बरं त्यावेळेस यंत्रणेवर विश्वास वाटला म्हणून असेल पण ते २००७ साली... मग दिवंगत रामन यांचा त्यांनी छापू नका असे सांगितलेला तो लेख फाशीच्या आधी पाच दिवस प्रकाशीत होई पर्यंत म्हणजे आठ वर्षे गप्प का बसले होते सगळेजण?

अर्थात याचे उत्तर माध्यमांकडून प्रश्न विचारले तरी मिळेल अशी अपेक्षा नाही. असल्या लेखाचा सुप्रिम कोर्टात उपयोग होणे शक्यच नव्हते आणि तसा झाला देखील नाही. बरं, रामन यांनीदेखील त्यांच्या हयातीतील अप्रकाशीत लेखात मान्य केल्याप्रमाणे, त्याला त्यांच्या लेखी देखील फाशीची योग्यच होती... तो काही निरपराध नव्हता. उरला प्रश्न तो केवळ कथीत सहकार्यामुळे अशी शिक्षा केल्यास त्याचा परीणाम परत असे कोणी पकडले गेले तर कसा घडू शकेल याचा. त्याला उत्तर आहे, अबू सलेम - त्याला पकडून फाशीची शिक्षा टाळता आलीच. त्याने तर सहकार्य देखील केले आहे असे वाटत नाही! पुढेही घडू शकेलच.

पण त्यातून आपण मतितार्थ काढणे गरजेचे आहे. माझ्या लेखी मतितार्थ इतकाच - अफवा केवळ सामान्यच पसरवू शकतात असे नसते तर बर्‍याचदा प्रसिद्धी माध्यमांचा वापर करत तथाकथीत बुद्धीवादी, तथाकथीत मानवतावादी देखील जनतेची दिशाभूल करणार्‍या अफवाच पसरवू शकतात. आपण झापडे लावून वाचायचे का डोळे आणि डोके उघडे ठेवून विचार करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न.

प्रतिक्रिया

रामपुरी's picture

30 Jul 2015 - 9:35 pm | रामपुरी

सहमत आहे

पाटीलअमित's picture

30 Jul 2015 - 9:37 pm | पाटीलअमित

अत्यंत वाचनीय लेख

विकास's picture

30 Jul 2015 - 9:39 pm | विकास

आत्ताच प्रशांत भूषण यांचे वक्तव्य वाचले...

पहील्यांदा ते म्हणतातः He cooperated fully with the investigative agencies.
नंतर म्हणतातः the case against Memon was mounted entirely on the basis of "confessional statements" made to the police by his co-accused

जर केस ही दुसर्‍या कोणीतरी दिलेल्या "confessional statements" वर चालू होती तर याकूबने नक्की सहकार्य काय केले? पण पब्लीकचा मानसीक गोंधळ उडवून देयचा झालं!

श्रीरंग_जोशी's picture

30 Jul 2015 - 9:40 pm | श्रीरंग_जोशी

लेखाच्या आशयाशी सहमत.

ऐन फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीची तारिख जवळ आल्यावर असले आक्षेप घेतले जाणे अजिबात पटत नाही.

सर्वप्रथम न्यायालयात आरोपपत्र जेव्हाही दाखल झाले असेल (९० च्या दशकात) तेव्हा अन खटला सुरु असताना असे मुद्दे पुराव्यांसकट न्यायालयात मांडायला हवे होते.

विशेष टाडा न्यायालय, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय इथे जे सिद्ध करता आले नाही ते माध्यमांमध्ये अतिरंजितपणे मांडून धुराळा उडवण्याखेरीज काहीच हाती लागणार नव्हते.

विकास's picture

30 Jul 2015 - 9:42 pm | विकास

मला आधी रामन यांचे विधान जेंव्हा ऐकले (वाचले नव्हते) तेंव्हा असेच वाटले की जर वाटाघाटी झाल्या असल्या तर त्याला फाशी देता कामा नये. पण वाचल्यानंतर समजले की आशय वेगळाच होता आणि त्याचा (गैर)अर्थ काढत माध्यामांची बडबड झाली ती वेगळीच. म्हणूनच नंतर तुम्ही म्हणता तसा नुसता धुराळा उडाला.

श्रीरंग_जोशी's picture

30 Jul 2015 - 9:51 pm | श्रीरंग_जोशी

याकूब मेमनला फाशी वा इतर कुठली मोठी शिक्षा न होण्यासाठी त्याने यापैकी काही करणे आवश्यक होते

  • बॉम्बस्फोटांचा कट अंमलात येण्यापूर्वी निनावीपणे पोलिसांना कळवणे.
  • हे ही न जमल्यास बॉम्बस्फोट घडल्यावर न्यायालयात स्वतःहून शरण जाणे (येथे त्याचा पोलिस यंत्रणे वर विश्वास नसणे) अध्याहृत आहे.
  • तो मुंबईचा रहिवासी असल्याने बॉम्बस्फोटांनंतरही मुंबईतच राहिला असता तरी न्यायालयात स्वतःचे निर्दोषत्व सिद्ध करण्यास आणखी एक मुद्दा मिळाला असता.

त्याने केव्हाही पोलिसांना सहकार्य केले असते तर टायगर मेमन वा दाऊद इब्राहिम यांनी त्याला जीवंत सोडले नसते.

बोका-ए-आझम's picture

31 Jul 2015 - 9:07 am | बोका-ए-आझम

माफीचा साक्षीदार होणे पण मला वाटतं तसं झालं असतं तर त्याची तुरूंगातच हत्या घडवून आणण्यात आली असती कारण दाऊदचे बरेच पित्ते (पक्षी: निष्ठावंत) पोलिसांत आहेत. (संदर्भ: Dongri to Dubai & Black Friday by S.Hussain Zaidi)
याकूबने खरोखरच जर शरणागती पत्करली असती तर त्याच्या शिक्षेत काही सूट द्यावी अशी मागणी त्याच्या वकिलांनी टाडा कोर्टासमोर केली असती.

श्रीरंग_जोशी's picture

31 Jul 2015 - 9:18 am | श्रीरंग_जोशी

पण बहुधा माफीचा साक्षीदार आणखी एक आरोपी याकूबच्या अटकेअगोदरपासूनच बनला होता. त्याची साक्षच याकुबला दोषी सिद्ध करण्यास पुरेशी ठरली. ज्या बातमीत हे वाचलं ती आता लगेच सापडत नाहीये.

उघडपणे माफीचा साक्षीदार न बनण्याचे तुम्ही म्हणता ते कारण तर आहेच.

प्रभाकर पेठकर's picture

31 Jul 2015 - 10:34 am | प्रभाकर पेठकर

माजी न्यायाधीश श्री. प्रमोद कोदे एका मुलाखतीत म्हणाले होते की 'माफिचा साक्षीदार कोणाला करता येते ह्याचे कांही निकष आहेत. मुख्य आरोपींपैकी कोणाला माफीचा साक्षीदार होता येत नाही. दुय्यम आरोपीला ती संधी मिळते. उद्या दाऊद इब्राहीमला पकडून भारतात आणून खटला चालवला तरी त्याला 'माफिचा साक्षिदार' होता येणार नाही. तो मुख्य आरोपींपैकी आहे.' बॉम्ब स्फोटाच्या घटनेत याकूब मेमन, टायगर मेमन आणि दाऊद इब्राहीम हे तिघेही मुख्य आरोपी आहेत.

जोशी-अभ्यंकर खटल्यातही जक्कल, सुतार ( आणखिन कोणीतरी एक) हे मुख्य आरोपी होते तर मुन्नावर शहा हा दुय्यम आरोपी होता. त्यामुळे त्याला माफीचा साक्षीदार होण्याची संधी मिळाली. माफीच्या साक्षीदाराला निर्दोष मुक्त केले जात नाही तर त्याची शिक्षा, पोलीस तपासात, पुरावे गोळा करण्यात आणि केस सोडविण्यात मदत केल्याने, सौम्य होते

श्रीगुरुजी's picture

31 Jul 2015 - 2:28 pm | श्रीगुरुजी

>>> शी-अभ्यंकर खटल्यातही जक्कल, सुतार ( आणखिन कोणीतरी एक) हे मुख्य आरोपी होते

या प्रकरणात राजेंद्र जक्कल, सुतार, जगताप व मुनव्वर शाह हे मुख्य आरोपी होते. या चौघांनाही फाशी दिली होती.

>>> तर मुन्नावर शहा हा दुय्यम आरोपी होता. त्यामुळे त्याला माफीचा साक्षीदार होण्याची संधी मिळाली. माफीच्या साक्षीदाराला निर्दोष मुक्त केले जात नाही तर त्याची शिक्षा, पोलीस तपासात, पुरावे गोळा करण्यात आणि केस सोडविण्यात मदत केल्याने, सौम्य होते

मुनव्वर शाह मासा नसून सुहास चांडक हा माफीचा साक्षीदार होता. मासा असल्याने त्याला शिक्षा झाली नाही. नंतर तो व्यावसायिक चित्रकार झाला. खटल्यानंतर अनेक वर्षे अनेक मराठी दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठाचे चित्र हे सुहास चांडकचे असायचे.

सतीश गोरे हा अजून एक दुय्यम आरोपी/साक्षीदार होता. त्याला माफीचा साक्षीदार केले होते का हे आठवत नाही, परंतु त्याची साक्ष खूपच महत्त्वाची होती.

श्रीरंग_जोशी's picture

31 Jul 2015 - 9:34 pm | श्रीरंग_जोशी

याकूब माफीचा साक्षीदार बनणे ही शक्यता केवळ फॉर द सेक ऑफ आर्ग्युमेंट म्हणून व्यक्त केली होती.

विकास's picture

31 Jul 2015 - 9:41 pm | विकास

माफीचा साक्षिदार कोर्ट ठरवते, सरकार/फिर्यादी ठरवू शकत नाही.

माम्लेदारचा पन्खा's picture

30 Jul 2015 - 9:45 pm | माम्लेदारचा पन्खा


भारतीय घटनेत सांगितलेल्या "रेअरेस्ट ऑफ दी रेअर" म्हणून दिल्या जाणारी शिक्षा गरज पडल्यास असली पाहीजे अशा मताचा नक्की आहे

भीती उरलीये कुठे त्याची? २० वर्षांनी खटला...त्यातूनही दोषी असल्यास अपील.... दया याचिका...

आणि मुळातच जो जिहादी आहे त्याला मारुन कसली भीती घालणार देश ?

विकास's picture

31 Jul 2015 - 4:33 am | विकास

प्रश्न फक्त एका याकूबचा नाही अथवा केवळ जिहादींचा नाही... निर्भयाचे प्राण घेणारे पण त्यात येतातच. त्यामुळे एकाला जरी भिती बसली आणि दुष्कृत्यांपासून लांब राहीला तरी कुणाचे तरी भले होऊ शकते - हे ही (अजिबातच) नसे थोडके!

मंदार कात्रे's picture

30 Jul 2015 - 9:48 pm | मंदार कात्रे

उडन खटोला |
मुरारी देशपांडे Via -Facebook
सर्वोच्च न्यायालयापेक्षा माध्यमे मोठी नाहीत असे माझे आजवर मिळवलेले ज्ञान मला सांगते .
माध्यमांचे अलीकडच्या काळातील वागणे देशहिताला बाधक ठरू शकेल कि काय असे वाटावे
इतके दर्जाहीन आणि बेजबाबदार होत चालले आहे . त्यांना सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी
जबाबदारीचे भान वेळीच न आल्यास लोक त्यांना नजीकच्या काळात भानावर आणतील
असे मला खात्रीने वाटते . ती वेळ येऊ न देणे माध्यमांच्याच हातात आहे .
------------------------------------------------------------------------------
न्यायसंस्थेवर प्रगाढ विश्वास असणारा भारतीय नागरिक ----------मुरारी

WhatsApp वरुन आलेली पोस्ट

दळभद्री मिडीयावाले आत्ता याकुब मेमनच्या घरच्यांच्या अशा मुलाखती दाखवतायत.. जसं काय तो याकुब देशभक्तीसाठीच फासावर जातोय. लेनिनचं एक वाक्य आहे. "क्रांति यशस्वी करायची असेल तर यादी काढुन पहिले पत्रकार मारा..! " खरंच मनापासून पटतंय आता. एका तरी वाहिनीवर स्फोटांमधे चिंधड्या होवुन मेलेल्या निरपराध मुंबईकरांच्या घरच्यांची मुलाखत दाखवली का..?

भाटगिरीची एक हद्द असते राव. सगळे पत्रकार टायटॅनिक सारखे जहाजामधे बसवुन समुद्रात पार लांब नेऊन बुडवले पाहीजेत.

सन्दर्भ- माबो

बोका-ए-आझम's picture

31 Jul 2015 - 9:17 am | बोका-ए-आझम

काय बोलताय राव? मान्य आहे की प्रसारमाध्यमं कधीकधी (आणि सध्या बरेच वेळा) बेजबाबदार, बेमुर्वत आणि बेताल वागतात पण म्हणून त्यांना समुद्रात नेऊन बुडवा? पुढची पायरी म्हणजे या देशात हुकूमशाही आणा आणि लोकांच्या उच्चारस्वातंत्र्यावर गदा आणा.
लोकशाहीमध्ये प्रसारमाध्यमं अनिवार्य आहेत. आणि लेनीनचा संदर्भ तर एकदम चुकीचा आहे कारण त्याला सोविएत रशियामध्ये कामगारांची हुकूमशाहीच प्रस्थापित करायची होती. त्यामुळे कोणताही विरोध त्याला नको होता पण असं म्हणायचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे, आणि त्यामागे प्रसारमाध्यमांनी केलेलं काम आहे (विशेषतः आणीबाणीच्या काळात)हे विसरू नका.

पाटीलअमित's picture

30 Jul 2015 - 11:00 pm | पाटीलअमित

whatsapp वर एक नोंद फिरत आहे जशी च्या तशी भाषांतर करून देत आहे ,पदरचे काही नाही

कसाबला बाळासाहेब घेऊन गेले
याकुब ला कलाम
आता फक्त दावूद ला परत आण
पवार साहेब वाट पहात आहे

तसेच माझे ह्या घडा मोडी वरचे लेखन नक्की बघाच

माम्लेदारचा पन्खा's picture

30 Jul 2015 - 11:27 pm | माम्लेदारचा पन्खा

दर्जेदार लिखाण नक्कीच बघितलं जातं.......

सोन्याला पाटीत ठेवून विकलं तरी घेणारे घेतातच !!

पाटीलअमित's picture

31 Jul 2015 - 12:05 am | पाटीलअमित

बर्र साहेब

नाखु's picture

31 Jul 2015 - 9:16 am | नाखु

विश्लेषण. एकूण मिडीयाला प्र्त्येक घटनेचा टीआर्पी च्या बाजूनेच विचार करायचा आहे असे दिसते.

प्राधान्यक्रम असा.

सनसनाटी-अतर्क्य-सनसनाटी-विनातपशील-सनसनाटी-एकांगी-सनसनाटी-सोयीस्कर मौन-सनसनाटी आणि सगळ्यात शेवटी जमले तरच (आणि तरी मुद्दा चर्चेत राहिला तरच) छटाक भर वास्तव.

फक्त दूरदर्शन बातम्या प्रेमी नाखु

प्रभाकर पेठकर's picture

31 Jul 2015 - 10:40 am | प्रभाकर पेठकर

टिआरपीच्या हव्यासातून (आणि त्यातून मिळणार्‍या जाहिरातींच्या आर्थिक गणितामुळे) ओवेसीची याकूब मेमनच्य फाशी संदर्भातील मुलाखत प्रसिद्ध झाली. काय होतं त्यात? ओवेसीचे हिंदूंविरोधातील ओरडणे, काँग्रेस आणि बिजेपी (त्यांचे राजकारणातील मुख्य प्रतिस्पार्धी) हयांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणे, 'मुसलमानांना ह्या देशात संरक्षण नाही, सूडबुद्धीने वागविले जाते आणि मी त्यांचा एकमेव मसिहा आहे' हा संदेश त्या वाहिनीच्या माध्यमातून (फुकटात आणि प्रभावीपणे) सर्वदूर भारतीय मुसलमानांमध्ये पसरविणे आणि आपली राजकिय पोळी भाजून घेणे. मुळात त्याच्या प्रदिर्घ मुलाखतीची गरजच काय होती?

भाते's picture

31 Jul 2015 - 11:02 am | भाते

२६/११ च्या वेळी मिडीयाने आपला आचरटपणा आधीच सिध्द केला होता. त्यावेळी न्यायालयाने सुध्दा मिडीयाला फटकारले होते. नेपाळ भुकंपाच्या वेळी मिडियाने आपला आचरटपणा पुन्हा एकदा सिध्द केला. भिक नको पण कुत्रं आवर अशी त्यावेळी अवस्था होती. भारताकडुन आम्हाला काही मदत नको पण आधी या मिडीयाला हाकला असे नेपाळमध्ये म्हणत होते.
काल तर त्यांनी अगदी कहरचं केला. कलाम आणि याकुब, (खरंतर हे दोन शब्द एकमेकांच्या बाजुला लिहायला लाज वाटते आहे.) एक भारतरत्न तर दुसरा दहशतवादी. कलामांच्या अंत्यविधीपेक्षा मिडियाला याकुबची फाशी महत्वाची वाटली हे देशाचे दुर्दैव. पण काल मिडीयाने सबंध दिवस याकुबचा जो उदोउदो चालवला होता तो पाहुन अतिशय चिड आली. तो एखादा सेलिब्रेटी असल्यासारखे त्याची प्रत्येक बातमी दाखवत होते. या यड*व्यांना कशाचेही भान उरलेले नाही आहे. प्रशासनाला देखिल याची कल्पना होती. याकुबचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी तिन रूग्‍णवाहिका वापराव्या लागल्या.
आता, मिडियावर अंकुश ठेवायची वेळ आली आहे. सर्वोच्च न्यायालय किंवा संसद यापैकी कोणीतरी पुढाकार घेऊन मिडीयासाठी काटेकोर नियमावली बनवायची गरज आहे.

पैसा's picture

31 Jul 2015 - 2:01 pm | पैसा

या संदर्भात ओवैसी, थरूर आदि नालायकांना एवढे फूटेज का दिले जात आहे हे कळण्याच्या पलिकडे आहे.

मदनबाण's picture

31 Jul 2015 - 2:18 pm | मदनबाण

विश्लेषण आवडले !
हिंदूस्थानी मिडीयाने आत्मचिंतन करायची हीच वेळ आहे ! मिडीया हे "अमोघ" अस्त्र आहे आणि ते आपल्यावर उलटु नये याची समज त्यांना आता तरी यावयास हवी !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Chandan Sa Badan... :- Saraswatichandra

पूर्वाविवेक's picture

31 Jul 2015 - 2:57 pm | पूर्वाविवेक

विश्लेषण फारच मार्मिक.
फेसबुकवर पाहिलेल्या एका पोस्टवरील कॉमेंटने माझ लक्ष वेधलं.......
" दुर्देवाने एक महामानव 'अब्दुल कलाम' आणि याकुब यांचा अंत्यविधी एकाच दिवशी होता. मिडीयाने याकुबाला जास्त फुटेज दिले. माझ्या मनात उगाचच नसत्या शंकेने घर केल आहे. बाहेरचे देश भारताला अजूनही साधू-गारुड्यांचा देश समजतात. इतकी प्रगती करूनही आपल्याला मागास समजतात. त्यांचे आपल्या देशाबद्दलचे अज्ञान अगाध आहे. अश्यावेळी जर त्यांच्या मिडीयाने अशी बातमी दिली तर नवल वाटू नये........ 'याकुब कलाम हे शास्त्रज्ञ होते नंतर ते राष्ट्रपती झाले पण त्यांचा मुंबई धमाक्यात हात होता हे सिद्ध झाल्याने त्यांना काल फाशी देण्यात आली.'
नोट- या मध्ये 'अब्दुल कलाम' यांची मानहानी करण्याचा अजिबात उद्देश नाही. ते माझ्यासाठी फारच आदरणीय होते. काल मिडीयाने जो याकुबचा तमाशा केला त्याचे गैसमज असेही होऊ शकतात असे मला म्हणायचे आहे. "

पाटीलअमित's picture

31 Jul 2015 - 4:36 pm | पाटीलअमित

हो
त्यावर मी रावणाचे उदात्तीकरण म्हणून धागा पण टाकलाय

==================================================\

आजची स्वाक्षरी

रावणाचे उदाती कारण

माम्लेदारचा पन्खा's picture

31 Jul 2015 - 4:49 pm | माम्लेदारचा पन्खा

आप महान है |

पाटीलअमित's picture

31 Jul 2015 - 6:09 pm | पाटीलअमित

I know

======================

आजची स्वाक्षरी

बाहुबली बघा व्यवस्थापन नीती शिका

gogglya's picture

31 Jul 2015 - 3:33 pm | gogglya

फक्त मेडियाने SMS Poll घेऊन आरोपी निर्दोष ठरवणे ए॑वढेच उरले आहे!

चिरोटा's picture

31 Jul 2015 - 6:47 pm | चिरोटा

निखिल वागळेंना पोल घ्यायला सांगा. न्यायाधीशांनाच फाशी होईल.

सुबोध खरे's picture

31 Jul 2015 - 9:26 pm | सुबोध खरे

न्यायाधीशांनाच फाशी होईल.
हा हा हा
ह ह पु वा

मी कुठल्याही बुवाबाबाच्या फंदात पडत नाही! त्यामुळे असारामबापूंचे जे काही बाहेर आले, पितळ उघडे पडले त्यामुळे मला आश्चर्य वगैरे काही वाटले नाही. त्यांना जबरी शिक्षा मिळायला हवी असे देखील मी म्हणेन. हे आधी स्पष्ट करू इच्छीतो.

पण गेल्या एक-दोन दिवसांपूर्वी किमान इंग्रजी माध्यमात एक मथळा झळाळत होता: Asaram shown as great 'saint' in Rajasthan textbooks आता हा मथळा वाचून असे वाटले की राजस्थानात झाले, शाळेत झाले म्हणजे हे नक्कीच भाजपाच्या सरकारकडून झाले म्हणून... इंडीया टूडे मधे तर नीट सांगितलेले पण नाही... पण नंतर पाहीले तर लक्षात आले की टाईम्सच्या बातमीत (मथळा असाच दिशाभूल करणारा) खाली कुठेतरी एक वाक्य आहे, "The book has been supplied by a Delhi-based publisher Gurukul Education Books. " म्हणजे हे खाजगी पुस्तक आहे. नंतर हिंदू वर्तमानपत्रातील बातमी वाचल्यावर लक्षात आले की त्या कंपनीने पण म्हणले आहे की ते पुस्तक त्यांना अटक होण्याआधी प्रकाशीत झाले होते आणि आता नवीन प्रतीत ती माहीती काढून टाकण्यात येईल म्हणून...

पण आता इतके वाचत कोण बसणार? त्यापेक्षा माध्यमांचे मथळे वाचून आपण निष्कर्ष काढून मोकळे होऊ! :(

बाळ सप्रे's picture

4 Aug 2015 - 12:47 pm | बाळ सप्रे

विपर्यास हा कळत नकळत होउ शकतो किंवा हेतुपुरस्सरदेखिल केला जातो.. शाब्दीक गुंतागुंतीच्या प्रकारात नकळत विपर्यास होउ शकतो.. पण आजकाल प्रसिद्धीमाध्यम असोत वा सोशल मिडियावर वावरणारे सामन्य लोक असोत, एखादा भलताच फोटो विपर्यस्त मचकुरासह हेतुपुरस्सर प्रसिद्ध करणे वगैरे प्रकार प्रचंड प्रमाणावर होताहेत. आणि लोक बिनधास्तपणे काही खात्री न करता पसरवतात..

अशा प्रकारांमुळे प्रसिद्धी माध्यमे व सोशल मिडीयावरील कुठलीही सनसनाटी बातमी यांची क्रेडिबिलिटी खूपच कमी झाली आहे हे मात्र खरे आहे..

तुडतुडी's picture

12 Aug 2015 - 3:30 pm | तुडतुडी

सगळ्यात जास्त दळभद्रिपणा ABP माझा वाल्यांनी केला . ओवेसीची मुलाखत काय दाखवली . त्यानंतर मी तरी हा च्यानेल बघणं बंद केलंय . सर्व मी पा करांनी सुधा करावं . त्याशिवाय ह्या लोकांना समजणार नाही