राधा …....२

चुकलामाकला's picture
चुकलामाकला in जनातलं, मनातलं
16 Apr 2015 - 8:07 am

राधा …....१

पहाटवाऱ्यानं सोबत आणलेल्या बासरीच्या सुरांनी राधेला उठवलं . राधेची लगबग चालू झाली . राधा जणू सोळा वर्षाची अल्लड युवती बनली. कितीप्रकारे नटली तरी तिचं समाधान होईना. शेवटी एकदाचा साजशृंगार आटपला आणि ती झपाझप शिवमंदिराच्या दिशेने चालू लागली . सूर्य नुकताच आकाशात डोकावत होता . मंदिरात पोचली तेव्हा तिथं कुणीच नव्हतं . कृष्णाची वाट पाहत ती आवारात बसून राहिली. हळूहळू लोक येऊ लागले. क्वचित कुणाच्या तोंडून त्यांच्या राजाची स्तुती ऐकू येई . आणि इकडे राधेचा उर अभिमानाने भरून जाई .
सूर्याची कोवळी कोवळी किरणं आता मंदिराच्या पायऱ्यांवर खेळू लागली. " अजून कसा नाही आला हा ? " असे म्हणेतो राधेला लांबवर एक रथ येताना दिसला. त्यावर राजध्वज दिमाखात फडकत होता. राधेचा आनंद गगनात मावेना ."कित्ती वर्षानंतर कृष्णा? या जन्मात तुझी भेट होईल याची आशाच सोडून दिली होती रे मी ! हे सुख सहन होईल मला ?" . तिनं डोळे घट्ट मिटून घेतले.
"देवी, आपण वृन्दावनाहून आलात ना ?" राधेनं चमकून डोळे उघडले .
"आपण राधा देवी ना ? मी श्रीकृष्णाचा सारथी . महाराजांनी आपणास महालात घेऊन येण्यासाठी रथ पाठवला आहे."
राधेला काय बोलावे ते सुचेना . "महाराज कुठे आहेत ?"
"काही कामामध्ये व्यस्त आहेत . म्हणूनच त्यांनी मला पाठवलय . " राधा गडबडून गेली पण क्षणभरच ! ती शांतपणे म्हणाली, "मी येणार नाही. हे कृष्णाला माहित आहे . त्याला म्हणावं, राधा मंदिरात तुझी वाट पाहील . सावकाश सर्व कामे झाली की ये. उशीर झाला तरी चालेल. मला वाट पहायची सवय आहे."
राधेने डोळे मिटून घेतले. सारथी थोडा वेळ चुळबुळत थांबला . पण राधेच्या त्या निर्वाणीच्या उत्तरानंतर त्याला पुढं काही बोलवेना . तो आल्या पावली निघून गेला .
सूर्य डोक्यावर आला होता. मंदिराच्या पुजाऱ्याचं तिच्याकडं लक्ष गेलं. त्यानं जवळ जाऊन विचारलं , "देवी खूप वेळ झाला, एकाच जागी बसून आहात , काही हवंय का तुम्हाला?." राधेनं मान डोलावली . "द्वारकेत आलेलं कुणीही रिकाम्या हाती परत जात नाही." राधेला हसू आले .
" कृष्णा, ऐकतोयस ना?"
" हं , राधे तुझीच इच्छा नाही बघ मला भेटायची , नाहीतर आली असतीस सारथ्याबरोबर ."
" कृष्णा, तुला सारं काही माहित आहे . नको अशी चेष्ठा करुस. लवकर ये बरं तू ."
दुपार उलटून गेली, उन्हं परतू लागली . राधेचे डोळे थकून गेले.
तिनं आर्तपणे कृष्णाला साद घातली, " कृष्णा, अजून किती वेळ ? "
" तेच म्हणतोय मी? एवढी द्वारकेपर्यंत आलीस तर माझ्या घरी यायला काय होते राधे? मीही वाट पाहतोय तुझी ."
राधेला कळेना, असा का वागतोय आपला कान्हा? राधा मंदिराबाहेर एका आम्रवृक्षाखाली बसली. तिला वृंदावनातील जुने दिवस आठवले . तेव्हा राधा घराबाहेर कधी पडतेय, याची कृष्ण वाट बघत बसे. त्याला बिलकुल धीर धरवत नसे . "किती उशीर केलास" म्हणून तक्रार करीत असे. राधेची स्तुती करायला त्याला शब्द अपुरे पडत. मग तो सुरांची मदत घेई. कृष्णाची बासरी ऐकत जागवलेल्या कित्येक रात्री तिच्या डोळ्यासमोर तरळून गेल्या. कधी शब्द कधी सूर तर कधी मौन! मग आताच काय झालं बरं ? "
विचारात गढून गेलेल्या राधेला तिच्या शेजारी रथ कधी येउन थांबला ते कळलेही नाही.
" केवढा हा हट्टीपणा राधे, घरी यायला काय झालं होतं ? "
राधेनं वर पाहिलं. आणि तिनं इथवर येण्यासाठी घेतलेले श्रम, वेदना सारं हल्लक होऊन गेलं. राजवस्त्रातील कृष्ण ती प्रथमच पाहत होती. गळ्यात रत्नांचे मोत्यांचे हार आणि त्याहूनही तेजस्वी तुळशीची माळ . कटी पितांबर, मावळतीच्या रविरंगाचा केशरी शेला ! राजबिंडा दिसतो आपला कृष्ण ! आणि हो मस्तकावर मुकुट असला तरी मोरपीस मात्र खोवायला विसरला नाही. तेच मिश्किल डोळे , रेखीव स्कंधावर रुळणारे केस ! राधेला वाटलं, त्याच्या त्या वेल्हाळ मउशार रेशमी केसात बोटं फिरवावीत , त्याच्या रुंद आश्वासक छातीवर मस्तक ठेवावं . एकदम घट्ट बिलगावं त्याला. मघापासून मनात आलेल्या साऱ्या शंकाकुशंका, अंतरे मिटवून टाकावीत , अगदी कायमची. पण आजूबाजूच्या लोकांसमोर हे शक्य नव्हतं . ती रथात चढली , रथ वेगानं धावू लागला.
"काय म्हणालास कृष्णा ? "
"शेवटी मलाच यायला लावलंस तू राधे, अजूनही तुझा हट्ट काही कमी झाला नाही ."
"हं "
तिला वाटलं आता विचारेल कान्हा, "कित्ती उशीर केलास इथं यायला राधे ?" आणि मग आपण चांगलाच खडसावू त्याला , "कृष्णा तिन्ही लोकांत फिरतोस म्हणे तू पण तुला कधी वृंदावनात येणं जमू नये ?माझ्यासाठी नाही निदान यशोदेसाठी ?"
" रुक्मिणीला का नाही भेटायचं राधे ?" ती भानावर आली. तिने कृष्णाकडं पाहिलं . रथ सारथ्यामध्ये तो गढून गेला होता . राधेकडं तर त्याचं बिलकुल लक्ष नव्हतं , नाहीतर एवढी सजलेली , त्याच्या आवडीच्या कुसुंबी रंगाची नववस्त्रे ल्यायलेली, त्याच्या स्पर्शाला उत्सुक, अधीर राधा त्याला जाणवलीच असती .
" रुक्मिणीला आवडलं असतं तुला भेटायला. "
राधेच्या मनात आलं , किती वेळा सांगितलं याला , की यावेळी मी फक्त तुझ्यासाठी आलेय म्हणून . तुला एकांतात भेटायला आलेय म्हणून . स्त्रियांना स्त्रियांची मनं पटकन ओळखू येतात . रुक्मिणीला राधेची इच्छा लगेच कळली असती. फार वाईट वाटलं असतं मग तिला , हे राधेलाही माहित होते . पण हे ती कृष्णाला कसं सांगणार ? आणि तिचं मन ओळखणारा कृष्ण तर हा नव्हताच . ती गप्प राहिली.
"कुठं उतरलीयस राधे ? सोडतो मी तुला तिथपर्यंत ."
"म्हणजे? तुला थांबता नाही येणार ?"
"नाही . मला काम आहे . घरी आली असतीस तर काढला असता वेळ ."
"एवढ्या संध्याकाळी कसलं आलंय रे काम? "
"एक खास काम आहे. "
"तुला माहित होतं न मी येणार आहे ते?'
"हो "
"मग?"
"मग काय राधे ? आता सांगतोच तुला , कालिंदीशी विवाह करतोय परवा , त्यामुळे सध्या तिच्या सेवेत आहे मी." कृष्ण मिश्किल हसत म्हणाला .
आता मात्र राधेच्या पायाखालची जमीन सरकली.
उसना धीर आणून ती म्हणाली " हे आधी कळलं असतं तर आलेच नसते मी कृष्णा! "
"तू यायचं ठरवलस. मी कोण सांगणारा नको येउस म्हणून?
"म्हणजे रे कृष्णा ? नको होतं का यायला ? "
"राधे तुझी इच्छा "
"कृष्णा …… ". तिच्या डोळ्यात हळूहळू कृष्णमेघ जमू लागले होते .
"उगा चिडू नकोस राधे , हे घे" तो तिला चिडवत म्हणाला आणि तिच्या ओंजळीत सोनचाफ्याची काही फुले दिली . ती हरखून गेली
"ही, ही माझ्यासाठी? "
" हं "
राधेनं त्या फुलांचा गंध हृदयात भरून घेतला ,तिला वाटलं , सकाळपासून कान्हा आपल्यासाठी ही फुलं घेऊन फिरतोय. बुडत्या हाती अचानक एखादी फांदी लागावी तसा त्या फुलांचा तिला आधार वाटला. राधेला काहीतरी आठवलं . " अरे तुझ्यासाठी चंदनाची बासरी आणलीय मी ! मंदिरातच राहिली बघ ."
"काय गरज होती बासरी आणायची? "
"गरज कसली ? तू तर द्वारकाधीश! माझी आपली वेडी इच्छा. पण वाजवशील ना बासरी ? "
काही क्षण शांततेत गेले . आजचं हे मौन राधेला अनोळखी होतं . काहीतरी चुकत होतं .
रथ पुन्हा मंदिरापाशी येउन थांबला होता . आकाशात चुकार चांदण्या दिसू लागल्या होत्या .
"कृष्णा थांब ना आज … " तिने शेवटचा प्रयत्न केला . नेहमी कृष्णाशी हक्कानं भांडणारी राधा आज त्याच्याकडे केविलवाणी याचना करत होती . तिला स्वत:चीच कीव आली .
"राधे नाही थांबता येणार आज . . . . "
"खरय. हरकत नाही . येते मी "
"अजूनही घरी नाही यायचं ?"
"नाही ."
"तुझी इच्छा राधे!"
राधेनं मोठ्या मुश्किलीनं चेहऱ्यावर निरोपाचं हसू आणलं. अखेरचं कृष्णाकडं पाहिलं. क्षणभरच ! रथातून उतरून ती मंदिराच्या दिशेने चालू लागली . जशी राधा मंदिरात पोचली तसा रथ निघून गेला. ही कृष्णाची जुनी सवय . राधा घरी सुखरूप पोचेपर्यंत तो बाहेर थांबून राहत असे. राधेला वाटले , कणभर का होईना आपला कृष्ण अजून तसाच आहे.
पण ही आत्ताची मलूल राधा आणि सकाळच्या अल्लड राधेत मात्र काहीच साम्य नव्हतं . मंदिराच्या ओसरीवर बसताच तिनं मनाला मुश्किलीनं घातलेला बांध कोसळला . राधा हमसून हमसून रडू लागली. जे काही घडलं ते खरं की स्वप्न ? पण तिच्या ओंजळीतील सोनचाफ्याची फुलं मात्र अजूनही आपला गंध जपून होती.
तिला कळेना नेमकं काय खुपतंय आपल्याला ? कृष्णाला आपल्यासाठी वेळ नसणं ? आपलं मन ओळखू न येणं ? की आपण इथं इतक्या लांब भेटायला आलो असताना त्यानं कुणा दुसरीला महत्त्व देणं ? की अजून काही? आपल्याला जशी कृष्णभेटीची ओढ होती तशी त्याला वाटली नाही . एकदाही म्हणाला नाही की तू कशी आहेस? राधेचे अश्रू थांबत नव्हते. कृष्णाची आठवण अनावर झाली की ती त्या फुलांना जवळ घेत होती. रडता रडता कधीतरी राधा झोपून गेली .
पहाटे तिला जाग आली तर सर्वत्र सोनचाफ्याचा मंद सुवास पसरला होता . राधेला वाटलं जणू कृष्णानं स्वरांऐवजी आज गंध पाठवलाय आपल्यासाठी . तिच्या मिटल्या मुठीत अजूनही कालची फुले होती . उघडून पाहते तर सगळी फुलं कोमेजली होती. मग हा गंध कुठला? राधा उठून बाहेर आली . बाहेर दोन स्त्रिया हातात सोनचाफ्याच्या फुलांनी भरलेल्या टोपल्या घेऊन आल्या होत्या . राधेचे डोळे चमकले . राधा उल्हसित होऊन म्हणाली, "राजवाड्यातून आलात का तुम्ही ?"
"नाही देवी , राजवाड्याकडे चाललोय आम्ही ".
"पण मग ही फुलं ?"
"तीच तर घेऊन चाललोय. कालिंदीदेवीना आवडतात म्हणून महाराज गेले काही दिवस रोज मागवतात "
राधेला पुढचं काही ऐकूच आले नाही .. तिच्या हातातली फुलं गळून पडली . तिला वाटलं आता इथं पळभर सुद्धा थांबू नये. तिनं आणलेली बासरी त्या दोघींच्या हाती दिली , "तुमच्या महाराजांना द्याल का ही?" असे म्हणून उत्तराची वाटही न पाहता ती चालू लागली . . . द्वारकेपासून दूर ….
तिला कृष्णाचे शब्द आठवत होते, "…… तू यायचं ठरवलंस. मी कोण सांगणारा नको येउस म्हणून? तुझी इच्छा राधे … "
तिला वाटलं , आपलं आणि कृष्णाचं नक्की नात कुठलं ? ज्या शब्दांनी आपण त्याच्याशी बांधले गेले होतो ते धागे इतके कच्चे होते? आपण समोरच्याला इतकं भरभरून द्यायला जावं आणि त्यानं पाठ फिरवावी असं काहीसं वाटलं तिला. का नाही समजून घेतलं कृष्णानं ? नकोच होतं यायला . इतके दिवस मनात जपलेल्या हळुवार नात्याची अशी कसोटी घ्यायला नको होती . काहीतरी कायमचं तुटून गेलंय . आता पुन्हा तसं हळवं काही फुलणं कठीण आहे .
पण यात कृष्णाची काय चूक ? त्यानं थोडंच बोलावलं होतं. गोकुळात असताना देखील तो माझ्या एकटीचा कधीच नव्हता , कृष्णावर तर साऱ्यांचाच हक्क . मग आत्ताच आपल्याला असं वाईट वाटायला काय झालं ? आपलंच काही चुकलं का ? कृष्णाला समजण्यात चूक झाली की दोघांमधल्या नात्याला ? वृंदावनातला कृष्ण खरा की आत्ताचा ? वृंदावनात जे काही घडलं किंवा आजवरचा आमचा संवाद फसवा का?
तिचं एक मन तिला समजावत होतं, वृंदावनातला राधेशाम जितका खरा तितकाच हा आजचा द्वारकाधीश. अगं येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा त्याने संपूर्ण आस्वाद घेतला, तो क्षण पूर्ण जगला आणि पुढच्या क्षणाच्या स्वागताला सिद्ध झाला . कुठं रेंगाळत थांबला नाही. पण तू मात्र साऱ्या जुन्या आठवणींच्या गुंत्यात अडकून पडलीस . एवढी की वर्तमानात जगणं, त्याचा आनंद घेणं विसरून गेलीस . राधे, कृष्ण वृंदावनातून केव्हाच पुढे निघून गेला नाहीतर इतक्या वर्षात तो एकदा तरी आला नसता का ? तू सुद्धा जुन्या ओझ्यातून मुक्त हो ! नको वाईट वाटून घेउस !
राधेला आत्ता अनय आठवला. अनयाला इतके दिवस काय वाटत असेल ते तिला आत्ता समजलं. तिच्या लक्षात आलं , कृष्णाप्रमाणेच अनयाला हे जीवनाचं सूत्र गवसलंय . बिचारा अनय नव्हे तर "बिचारे" आपणंच. तिला आत्ता अनय "कळला". अगदी लख्ख कळला .
पण तरी तिचे वेडे अश्रू काही थांबेनात . तिला मुलांची आठवण आली. या ,या अशा भेटीसाठी मी त्यांना टाकून आले. तिला अपार दु:ख झालं . तिला वाटलं अनयाच्या बाबतीत , मुलांच्या बाबतीत चुकलंच आपलं . एका दिवसात राधा खरच खूप बदलली ! तिल वाटलं , आता परत वृंदावनात जाणं आपल्याला जमेल का?. ती गोमतीच्या पाण्यात शिरली .…
खरंच असे काही घडलं का ? राधा परत आली का? तिचं पुढे काय झालं ? कारण असं घडलं असलं तरी राधेनं कुणाला सांगितलं असेल असं नाही. कारण काही दु:खं शब्दात बांधल्यानं वाढतात म्हणे.
कोण जाणे, हे सारं घडलंही नसेल . कुणी तर असंही म्हणतं की महाभारतात राधा नव्हतीच . खरं खोटं त्या कृष्णाला माहित .
लोक मात्र अजूनही राधा कृष्णाच्या प्रेमाची महती गातात .

कथाआस्वाद

प्रतिक्रिया

ब़जरबट्टू's picture

16 Apr 2015 - 9:35 am | ब़जरबट्टू

आवडली... विचार करतोय,,,

नेत्रेश's picture

16 Apr 2015 - 10:54 am | नेत्रेश

आवडली.

नेत्रेश's picture

16 Apr 2015 - 10:56 am | नेत्रेश

.

पदम's picture

16 Apr 2015 - 11:21 am | पदम

?

hitesh's picture

16 Apr 2015 - 12:06 pm | hitesh

...

बाबा पाटील's picture

16 Apr 2015 - 1:13 pm | बाबा पाटील

साला हा लव्ह इन रिलेशनशिप वाला कायदा त्या काळी असता तर जरा प्रकरण महागतच पडल असतना भौ.

चुकलामाकला's picture

16 Apr 2015 - 1:25 pm | चुकलामाकला

लिव्ह इन म्हणायचंय का भौ?
आणि द्विभार्या प्रतिबंधक राहिला की!

बाबा पाटील's picture

16 Apr 2015 - 1:26 pm | बाबा पाटील

काय झाल असत बर्,आपल्या समस्त देव मंडळींचा कार्यक्रमच लागला असताना भौ.

चुकलामाकला's picture

18 Apr 2015 - 9:16 am | चुकलामाकला

त्याला बुच लागणं म्हणतात का हो भौ?:)

hitesh's picture

16 Apr 2015 - 2:35 pm | hitesh

मी जरा काही लिहिलं की मी हिंदु देवांबद्दल वाटेल तसे लिहितो.म्हणुन बोम्बलणारंआंधळं पब्लिक आता गप्प का बसलय ?

… तू यायचं ठरवलंस. मी कोण सांगणारा नको येउस म्हणून? तुझी इच्छा

!!!!!!!

छान लिहिलं आहेस चुकलामाकला.स्त्रीया नेहेमीच प्रेमात जखडुन घेतात आणि पुरुष गुंतुनी गुंत्यात सारा रंग माझा वेगळा ठेवतात का असा प्रश्न पडलाय!!

चुकलामाकला's picture

17 Apr 2015 - 7:11 pm | चुकलामाकला

हं, कदाचित!

सूड's picture

16 Apr 2015 - 7:33 pm | सूड

आवडली कथा!!

जुइ's picture

16 Apr 2015 - 8:36 pm | जुइ

कथा आवडली!!

चुकलामाकला's picture

17 Apr 2015 - 10:53 am | चुकलामाकला

धन्यवाद!!!

एक कुणीतरी's picture

17 Apr 2015 - 5:15 pm | एक कुणीतरी

मला आवडली ही कथा....
अजया एकदम पटेश....

कपिलमुनी's picture

17 Apr 2015 - 5:37 pm | कपिलमुनी

खुप आवडली

सानिकास्वप्निल's picture

18 Apr 2015 - 11:19 am | सानिकास्वप्निल

कथा छान आहे, आवडली.

अत्रन्गि पाउस's picture

18 Apr 2015 - 3:00 pm | अत्रन्गि पाउस

अप्रतिम लिहिलंय ...
अतिशय गुंगवून ठेवलेत ...
वा बुवा

जेपी's picture

18 Apr 2015 - 3:18 pm | जेपी

आवडली कथा.

स्पंदना's picture

18 Apr 2015 - 5:33 pm | स्पंदना

...

चुकलामाकला's picture

18 Apr 2015 - 5:56 pm | चुकलामाकला

धन्यवाद!

विअर्ड विक्स's picture

18 Apr 2015 - 7:01 pm | विअर्ड विक्स

कथा आवडली…. कथेतील सोनचाफ्याच्या गंधाप्रमाणे आपली कथा सुद्धा मनात साठून राहील…

भाग्यश्री कुलकर्णी's picture

19 Apr 2015 - 8:02 am | भाग्यश्री कुलकर्णी

खुप आवडली कथा...

श्रीरंग_जोशी's picture

19 Apr 2015 - 8:06 am | श्रीरंग_जोशी

राधेचं भावविश्व एकदम ताकदीने उभं केलंय.

पुभाप्र.

चुकलामाकला's picture

19 Apr 2015 - 10:32 am | चुकलामाकला

धन्यवाद! पण राधेची कथा इथेच संपली. कदाचित इथून कृष्ण व्यथा सुरू होईल.:)

स्पंदना's picture

19 Apr 2015 - 10:46 am | स्पंदना

कसली व्यथा? तीन तीन जणी सांभाळण्याची?
मुक्त रानवार्‍यासारख किशोरवयीन प्रेम तोलायला राधा होती, तिला रुक्मिणी समोर नतम्स्तक व्हायला, तिचा राज्ञीपदाचा, भार्येचा तोरा राधेसमोर कशाला हवा त्याला दाखवायला? यायच होतं तर त्याच ओढीने, तो मान राखून, त्या भावनेने. नाहीतर न येणं ही सह्य!
(नतम्स्तक या शब्दावर आक्षेप येइल, पण राजा आणि राणी समोर नतम्स्तकच व्हावं लागत.)

ज्योति अळवणी's picture

20 Apr 2015 - 11:40 am | ज्योति अळवणी
ज्योति अळवणी's picture

20 Apr 2015 - 11:40 am | ज्योति अळवणी
ज्योति अळवणी's picture

20 Apr 2015 - 11:41 am | ज्योति अळवणी
चुकलामाकला's picture

20 Apr 2015 - 2:24 pm | चुकलामाकला

धन्यवाद!!!

रातराणी's picture

9 May 2015 - 2:27 am | रातराणी

सुरेख!

चुकलामाकला's picture

9 May 2015 - 7:18 am | चुकलामाकला

धन्यवाद!

एक एकटा एकटाच's picture

10 May 2015 - 9:15 am | एक एकटा एकटाच

छान लिहीलीय
राधा अगदी हळुवार उतरलीय या कथेत.

चुकलामाकला's picture

10 May 2015 - 5:38 pm | चुकलामाकला

सर्वांनी आपुलकीने वाचल्याबद्दल धन्यवाद!

नूतन सावंत's picture

10 May 2015 - 7:01 pm | नूतन सावंत

कथा आवडली.राधेला असाही कृष्ण भेटेल ही काल्पनाही आवडली.अनयाची व्यथा राधेची लक्षत येणे अजूनच आवडून गेले.