✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

अथ:वांगे पुराण

व
विवेकपटाईत यांनी
गुरुवार, 03/20/2014 - 10:59  ·  लेख
लेख
अथ: वांगे पुराण ७-८ वर्षांपूर्वी मामे बहिणीच्या लग्नात भंडाऱ्याला गेलो होतो. सीमांतपूजेच्या दिवशी रात्री भरपूर तेल असलेलीजहाल वांग्याची भाजी ताटात होती. एवढा जबरदस्त झणका होता कि जीभे बरोबर मेंदू ही सी सी करू लागला. नंतर कळले पाहुणे मंडळी पुणे, मुंबई, दिल्लीची असल्यामुळे तिखट थोड कमीच टाकल होत. वांग्यांना हिंदीत ‘थालीचे बैंगन ही म्हणतात वांग्याच्या भाजी शिवाय कुठलीही थाली पूर्ण होत नाही. वांगे ही एकाच भाजी आहे जिच्या डोक्यावर छत्र अर्थात मुकुट असते म्हणून वांग्यांना वांग्यांना भाजीचा राजा ही म्हणतात. वांगे विकत घेताना: वांगे काळसर, जांभळे, हिरवे आणि विदर्भात पांढऱ्या रंगाचे ही मिळतात. वांगे मोटे-ताजे गोल-मटोल, लहान-लहान किंवा लांब आणि पातळ स्वरूपात मिळतात. वांग्यात बिया जास्त असेल तर वांगे स्वादिष्ट लागणार नाही. शिवाय ढाब्यात वांग्याच्या भाजीत किंवा भरत्यात नॉनव्हेज हे मुफ्त मिळणारच त्या मुळे मी ढाब्यात वांग्याची भाजी खायचो टाळतोच. वांगे विकत घेणे ही एक कला असते. आमची सौ. या बाबतीत तरबेज आहे. तिने सर्वांनाच भाज्या कश्या निवडाव्या ह्याचे उत्तम प्रशिक्षण अर्थात मलाच दिले आहे. प्रथम वांगे ताजे दिसत आहे कि नाही पाहावे. वांग्यांना चमक देण्यासाठी तेल तर नाही लावले हे ही पाहावे लागते. मग छिद्र तर नाहीना हे बघावे. जास्ती वजन म्हणजे जास्त बिया. त्या साठी दोन वांग्यांना वेगवेळ्या हातात घ्यावे. हलके वांगे निवडावे. बाजारात जर वांग्यांना २० रु आणि २५ रु. भाव असेल पण एका किलोत चार एवजी सहा वांगे मिळत असेल तर २५ रु. मोजणे फायद्याचाच सौदा ठरेल. सर्व प्रकारचे वांगे याच पद्धतीने निवडावे. तशी ही पद्धत बिया असलेल्या सर्व भाज्या विकत घेताना सोयीची ठरते. ढोबळी मिरची तशीच महाग असते. ह्या पद्धतीने निवडल्यास जास्त मिरच्या हाती येतील. अर्थात दुकानदार तुमच्या कडे वाकड्या नजरेने पाहिल हे ठरलेलेच. सौ. वांग्याची भाजी चिरत असतात, आमची स्वारी जर घरी असेल अर्थात या ना त्या (?) कारणाने स्वैपाकघरात डोकवणारच. एखाद्या वांग्याच्या पातळ चकत्या कापून तेलावर परतून त्यात चाट-मसाला नाजूक हाताने भरविल्यास हा! हा! हा! काय स्वादिष्ट लागतात, सांगणे न वेगळे. आमची आई ही वांग्याच्या रायता मस्त बनवायची. शेगडीवर वांग्याला तेल लाऊन मस्त भाजायची. गोड दही (दिल्लीत दही गोडच मिळते) किंवा गोड न मिळाल्यास थोडी साखर टाकून, फेटून घायचे. मग आई भाजलेले वांगे सोलून चार भाग करायची. मध्ये असलेल्या बिया मोठ्या सफाईने चमच्याने अलगद काढायची. असे बिया नसलेले वांग कुस्करून आधीच फेटून ठेवलेल्या दह्यात घालायची. त्यात कांदे- टामोटो बारीक चिरून भरपूर कोथिंबीर सहित टाकायची. मग मोहरी, हिंग व हिर्व्यामिर्चीची फोडणी त्यात घालायची. मस्त आणि स्वादिष्ट असा रायता आम्ही मिटक्या मारून खायचो. वांग्यान वरून आठवले, लहान असतात आम्ही सुट्टीत नागपूरला जात असो, तेंव्हा आजी एक गोष्ट नेहमीच सांगायची, आता पूर्ण आठवत नाही तरीही एका राजाला चार बोबड्या राजकन्या होत्या. एकदा त्याने प्रधानाला घरी जेवायला बोलविले. राजकन्यांना सक्त ताकीद दिली. कुणीही तोंड उघडायचे नाही. जेवताना प्रधानाच्या लक्षात आले, सर राजकन्या चिडीचूप आहे. त्याला वाटले या मागे काहीतरी काळबेर नक्की असावं. बायकांना त्यांची स्तुती आवडते. प्रधानाने वांग्याच्या भाजीची स्तुती करत म्हंटले आमच्या हिला तर वांग्याची भाजी करताच येत नाही अहाहा एवढी स्वादिष्ट भाजी कशी केली. एका राजकन्येला राहवले नाही तिने म्हंटले ‘हिंग गुय घालीया तो वांग चांग होईया’ राजकन्यांचे बिंग फुटले. (पूर्ण गोष्ट लक्षात नाही आहे. कुणाला माहित असेल तर पूर्ण गोष्ट पुन्हा वाचायला मजाच येईल. [कदाचित! ही लोककथा विदर्भातील असावी]). पण एक मात्र खरं, वांग्याच्या भाजीला काही ही लागत नाही. भरपूर तेल, हिंग, गुळ, हिरवी मिरची आणि गोडामसाला किंवा गरम मसाला टाकले तरी स्वादिष्ट भाजी तैयार होते. बाकी भरलेले वांगे बहुतेक सर्वांनाच आवडतात. कुठल्या ही पदार्थाची शोभा वांग्या मुळे वाढतेच. तसं सर्वांनाच अनुभव असेल नेहमी बनविताना वांग्याच्या भाजीत बटाटे बायका टाकतातच. अर्थात बटाटे पोर खातात आणि वांगे मोठ्यांच्या नशिबी येतात. विदर्भात वांगे भात हा प्रकार ही प्रसिद्ध आहे. उन्हाळ्याच्या दिवसात,संभार मध्ये केवळ वान्गेच आढळण्याची शक्यता जास्त. पावभाजीत ही वांगे टाकल्यास, भाजीचा स्वाद हा वाढतोच. काही लहान मुलांना वांगे आवडत नाही. यात जास्त करून मुंबई- पुण्यातले नखरेल पोर असतात. अशीच एक मुंबईकर चिमुकली उन्हाळ्यात घरी आली होती. वांगे पाहतात म्हणाली, मावशी मला वांगे आवडत नाही. आमची सौ. काही कमी नाही. सकाळी पाहटे नाश्त्यात वांग्याचे धिरडे बनविले. वांग्याचे साल काढून वांग किसून बेसन व कणकीच्या पिठात (२:१) मिसळले त्यात बारीक कापलेले, - कांदे- टामाटो, हिरवी मिरची व नेहमी प्रमाणे भरपूर कोथिंबीर टाकली. पतंजलीच्या टमाटो सॅास बरोबर तिने मिटक्या मारत धिरडे खाल्ले. (वांग्याला भाजून ही धीरड्याच्या पिठात मिसळता येत) अर्थातच पुढे वांग्याची भाजी खायला ही ती शिकली. शेवटी आपल्या देशात प्रत्येक प्रांततल्या थाळीत, वांग्याचा एखाद पदार्थ असतोच. ‘थालीचे बैंगन’ एका थाळीतून दुसऱ्या थाळीत बेशर्मीने (लाज-लज्जा सोडून) लुढकत राहतात. आजकाल तर अश्या वांग्यांचा भाव वधारला आहे. महाराष्ट्रात तर कळतंच नाही कुठला बैंगन कुठल्या थाळीतून लुढकून कुठल्या थाळीत जाणार आहे. खरंच म्हंटले आहे, ताज एक तर बादशाहच्या डोक्यावर असतो किंवा वांग्याच्या डोक्यावर. ताजसाठीच वांगे एका थाळीतून लुढकून कुठल्या थाळीत जातात.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
15627 वाचन

💬 प्रतिसाद (60)

प्रतिक्रिया

वांग-मय

सुनील
गुरुवार, 03/20/2014 - 11:19 नवीन
वरील वांग-मय आवडले!
  • Log in or register to post comments

या प्रतिसादासाठी

वेल्लाभट
Fri, 03/21/2014 - 16:51 नवीन
या प्रतिसादासाठी +१११११११११११११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

कृष्णा काठच्या चवदार

प्रचेतस
गुरुवार, 03/20/2014 - 11:20 नवीन
कृष्णा काठच्या चवदार वांग्यांचा उल्लेखही नसल्याने तुमचा निषेध.
  • Log in or register to post comments

+११११११११११११११११११११११११११११

बॅटमॅन
गुरुवार, 03/20/2014 - 13:49 नवीन
+११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११. पूर्ण सहमत!!!!!!! खच्चून निषेध केल्या गेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मिसळपाव वर कृष्ण खोर्यातल्या

विवेकपटाईत
गुरुवार, 03/20/2014 - 19:55 नवीन
मिसळपाव वर कृष्ण खोर्यातल्या वांग्याची एखादी कृती टाका, वाचून खाण्याचा आनंद घेऊन कृतार्थ होईल. किंवा वांग्यांचे पार्सिल घरी पोचते करा,करून बघेन. निषेध दूर करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

+२^८० निषेध, कृष्णाकाठची

चावटमेला
Fri, 03/21/2014 - 11:31 नवीन
+२^८० निषेध, कृष्णाकाठची वांगी हवीच :) लेख आवडला हेवेसांनल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

‘हिंग गुय घालीया तो वांग चांग होईया’

रामदास
गुरुवार, 03/20/2014 - 11:33 नवीन
तीन राजकन्येंची गोष्ट मला पण आठवतेय. धपकन पयी त मी काय कयी ‘हिंग गुय घालीया तो वांग चांग होईया’ त्या दोघी बोया पण मी नाइ बोयी.
  • Log in or register to post comments

मला वाटते हीच गोष्ट मी ऐकलेली

विवेकपटाईत
गुरुवार, 03/20/2014 - 19:47 नवीन
मला वाटते हीच गोष्ट मी ऐकलेली आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

मस्त....

मुक्त विहारि
गुरुवार, 03/20/2014 - 12:47 नवीन
भाजीत भाजी , वांग्याची. ह्या भाजीत तेल्,तिखट आणि मसाले थोडे सढळ हातानेच घालावेत.
  • Log in or register to post comments

वांगीपुराण आवडले. मी पण

पिंगू
गुरुवार, 03/20/2014 - 13:08 नवीन
वांगीपुराण आवडले. मी पण वांग्याचा फॅन हाय..
  • Log in or register to post comments

यप्प... म्या पण मोठ्या पातीचा

सुहास झेले
Fri, 03/21/2014 - 12:37 नवीन
यप्प... म्या पण मोठ्या पातीचा गरागरा फिरणारा पंखा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू

ह्म्म्म...

गणपा
गुरुवार, 03/20/2014 - 13:40 नवीन
आज एखाद्या वांग्याचा बळी द्यावाच लागणारसं दिसतय.
  • Log in or register to post comments

हाहाहा

शुचि
Tue, 04/08/2014 - 01:44 नवीन
हाहाहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

आवडलं वांगी पुराण !

अजया
गुरुवार, 03/20/2014 - 13:57 नवीन
आज रात्री वांग्याचे भरीत करुन लेखाला दाद दिली जाईल !
  • Log in or register to post comments

खा...

मुक्त विहारि
गुरुवार, 03/20/2014 - 14:01 नवीन
वांग्याचे भरीत खा, बाजरीची तीळ लावलेली भाकरी खा. मग त्याचे फोटो काढा अन मग इथे टाका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

लेख आवडला. पण हे काही कळल

संपत
गुरुवार, 03/20/2014 - 14:27 नवीन
लेख आवडला. पण हे काही कळल नाही..
ढाब्यात वांग्याच्या भाजीत किंवा भरत्यात नॉनव्हेज हे मुफ्त मिळणारच
  • Log in or register to post comments

ढाबे वाले रात्री उरलेली

विवेकपटाईत
गुरुवार, 03/20/2014 - 19:50 नवीन
ढाबे वाले रात्री उरलेली सुरलेली भाजी स्वस्तात विकत घेतात. वांग्यात किडे असले तरी काहीही फरक पडत नाही. भरपूर मसाले टाकल्यावर भाजी स्वादिष्ट बनेलच. बाकी ढाब्यांवर वांगे चिरताना बघा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संपत

अच्छा, हे माहिती नव्हते.

संपत
गुरुवार, 03/20/2014 - 21:33 नवीन
अच्छा, हे माहिती नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

बहुतेक वेळेस वांग्याच्या आत

उगा काहितरीच
Fri, 03/21/2014 - 20:25 नवीन
बहुतेक वेळेस वांग्याच्या आत बारीक अळ्या वगैरे असतात. त्यामुळे असेल बहुतेक
ढाब्यात वांग्याच्या भाजीत किंवा भरत्यात नॉनव्हेज हे मुफ्त मिळणारच
पण मेस मध्ये किंवा ढाब्यावर भाजी खाताना एकदा man vs wild चा कोनताही भाग आठवायचा आणि हाणायची भाजी मग "नॉनव्हेज" नि नाही फरक पडत. ;) ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संपत

वांगे पुराण मस्तच आहे..:)

स्मिता चौगुले
गुरुवार, 03/20/2014 - 14:43 नवीन
माझी आजी पण अशा बोबड्या मुलीची गोष्ट सांगायची, पण ती गोष्ट थोडी वेगळी होती.एका व्यक्तिला एक बोबडी मुलगी असते. एकदा त्या मुलीला पहायला पाहूणे येतात.तिला सक्त ताकीद दिलेली असते कि तोंड उघडायचे नाही. पाह्ण्याचा कार्यक्रम होतो पण मुलगी काहीच बोलत नाही, विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे पण परस्पर आई-बाबाच देत असतात तेव्हा त्या पाहुण्याना थोडी शन्का येते पण जेवणाचा आग्रह झाल्यावर ते जेवायला बसतात. जेवणात कढी केलेली असते, ती कढी पीताना मुलीला राहावत नाही आणि पट्कण ती शेजारी बसलेल्या तिच्या आईला म्हणते ‘हिंग जिडे मिडे, कडी मुडि गोड लागे.." आणि तिचे बिंग फुटते.
  • Log in or register to post comments

मंगला गोडबोलेंनी कुठल्याश्या

सूड
गुरुवार, 03/20/2014 - 15:24 नवीन
मंगला गोडबोलेंनी कुठल्याश्या कार्यक्रमात नारळाच्या दुधातलं वांग्यांचं भरीत सांगितलं होतं. त्याची रेशिपी कोणाला माहीत असेल तर डकवा.
  • Log in or register to post comments

वांग्याचा लूक

रमेश आठवले
गुरुवार, 03/20/2014 - 18:38 नवीन
"ढाब्यात वांग्याच्या भाजीत किंवा भरत्यात नॉनव्हेज हे मुफ्त मिळणारच"--- बरीच जैन मंडळी वांग्यांच्या या लूक मुळे वांगी खात नाहीत. एरवी त्याना भाज्यांमध्ये फक्त कंदमुळेच वर्ज्य असतात. मी बेंगाल मध्ये कामाला गेलो असताना एक दोन ठिकाणी स्थानिक लोकांकडे जेवावयास बोलवले होते. दोन्ही ठिकाणी वांग्याचे उभे आणि लांब काप भाजी साठी वापरले गेले. बंगाल्यांच्या मत्स्य आहाराच्या प्रेमामुळे आणि ही एकच भाजी तत्सम दिसत असल्यामुळे आलेल्या शाकाहारी पाहुण्यांसाठी यजमानीण बाईंनी खास बनवली असेल असे भाजी खाताना वाटले होते.
  • Log in or register to post comments

वांगपुराण आवडले. वांग्याचा

सखी
गुरुवार, 03/20/2014 - 18:46 नवीन
वांगपुराण आवडले. वांग्याचा रायता कधी खाण्यात आला नाही, करुन बघायला पाहीजे. यानिमित्ताने वाग्यांच्या काही हटके पाकृ मिळतील अशी आशा - दक्षिण भारतातील वांगेभातपण मस्त लागतो, महाराष्ट्रीय वांगेभातापेक्षा बराच वेगळा आणि तिखट, मसालेदार असतो. पावभाजीत ही वांगे टाकल्यास, भाजीचा स्वाद हा वाढतोच --- फक्त हे पटेलस वाटत नाही.
  • Log in or register to post comments

आवड प्रत्येकाची.

प्रभाकर पेठकर
Fri, 03/21/2014 - 01:19 नवीन
व्यावसायिकतेच्या चुकीच्या कल्पनेतून भाजीचे आणि फायद्याचे 'आकारमान' वाढविण्यासाठी कांही उपहारगृह चालक्/मालक पावभाजीत स्वस्तातले वांगे वापरतात. पण ते चुकीचे आहे. त्याने पावभाजीची चव बिघडते. वांगं हा प्रकार ज्याला आवडतो त्याला भयंकर आवडतो ज्याला आवडत नाही त्याला अजिब्बात आवडत नाही. आवडतो त्याला कशातही वांगं चालतं. त्यात वाईट कांहीच नाही. प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. ज्यांना आवडत असेल त्यांनी पावभाजीत वांगे वापरावे. पण, व्यावसायिक पातळीवर वांगे वापरू नये. परवा, पॅरीसला 'वांगी-पित्झा' खाल्ला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखी

एगप्लांट पिझ्झा मला भयंकर

रेवती
Fri, 03/21/2014 - 05:28 नवीन
एगप्लांट पिझ्झा मला भयंकर आवडतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

शाप

llपुण्याचे पेशवेll
Tue, 04/01/2014 - 17:57 नवीन
मला वांग्याची भाजी आवडत नसल्याने आई नेहेमी म्हणायची बाहेर बघ तुला वांगं खायची वेळ नक्की येईल. आणि असा प्रसंग अनेक वेळा गुदरला. शाकाहारी पिझ्झ्यामधे चीज पिझ्झाला पर्याय म्हणजे असलेल्या व्हेजी पिझ्झा मधे एगप्लांट हटकून असायचं. त्यावेळी आईची आठवण काढत काढत पिझ्झा खात असे. ही गोष्ट आईला सांगितल्यावर तिलाही 'जे जे कथिले तैसेची जाहले' अशा ब्रम्होक्तीची उद्गाती झाल्यामुळे आनंद झाला तो निराळाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

एग्प्लान्ट पर्मेसन

रमेश आठवले
गुरुवार, 04/03/2014 - 14:46 नवीन
अमेरिकेत ईटालिअन रेस्टोरन्ट मध्ये एग्प्लान्ट पर्मेसन नावाचा एक पदार्थ मिळतो. त्यात वांग्याचे लांब काप करून त्या वर वितळलेले पर्मेसन नावाचे चीज ओतून हा प्रकार करतात. शाकाहार्यांना पोटभरीच्या दृष्टीने हा एक बरा प्रकार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

सौ. पाव भाजीत वांग्याचे साल

विवेकपटाईत
गुरुवार, 03/20/2014 - 19:52 नवीन
सौ. पाव भाजीत वांग्याचे साल काढून वांगे वापरते. करून बघा स्वाद वाढेलच. ..
  • Log in or register to post comments

वांग्याची भाजी आवडत असल्याने

रेवती
गुरुवार, 03/20/2014 - 21:17 नवीन
वांग्याची भाजी आवडत असल्याने लेखही आवडला. @सूड, नारळाचे दूध, गूळ, चिंचकोळ थोडा असे भा़जलेल्या वांग्यात घालून वरून फोडणी. चवीसाठी मीठ व मिरच्या वाटून घालणे. कच्चे पोहे जरा कोरडेच परतून त्यात घालावेत. त्याला वांग्याचे कोळाचे भरीत म्हणतात. एकदाच खाल्ले होते. छान लागते चवीत बदल म्हणून!
  • Log in or register to post comments

धन्यवाद !!

सूड
गुरुवार, 03/20/2014 - 22:11 नवीन
धन्यवाद !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

nemake aatach jhanjhanit

vrushali n
गुरुवार, 03/20/2014 - 21:48 नवीन
nemake aatach jhanjhanit bharit khalle ni ha lekh vachnyat aalay,vangyala shambhar varsha aayushya:)majhi saglyat aavdati bhaji
  • Log in or register to post comments

जमला आहे, पहीला प्यारेग्राफ

लॉरी टांगटूंगकर
Fri, 03/21/2014 - 00:00 नवीन
जमला आहे, पहीला प्यारेग्राफ वाचल्यानंतर फोटोंसाठी स्क्रोलवून पाहीला, अन् मग नाईलाजास्तवे पूर्ण वाचला :D . मजा आली. आपली आवडती वांगी जळगावाकडची, त्या बरोबर कळणीची भाकरी म्हणजे स्वर्गच हो!!
  • Log in or register to post comments

मस्त लेख, वाचनखूण साठवली आहे!

बहुगुणी
Fri, 03/21/2014 - 01:58 नवीन
प्रकाशचित्रे असती तर आणखीन मजा आली असती. वांग्याची भाजी दाण्याचे कूट घालूनही बरेच प्रकारे केली जाते. @ रमेश आठवले: माझा बंगाली रूममेट होता, त्याच्याकडून कळलं की वांग्याचे उभे पातळ काप मसाला भुरभुरून 'शॅलो फ्राय' करून मधलं खाणं/ तोंडी लावणं म्हणून बंगालात बरेचदा केलं जातं. तो हे कायम करायचा आणि मस्त लागायचं.
  • Log in or register to post comments

पुराणांतील वांगी पुराणात राहू द्या

रमेश आठवले
Fri, 03/21/2014 - 02:52 नवीन
पुराणांतील वांगी पुराणात राहू द्या---- या वाक्य प्रचारात एखदी गोष्ट किंवा वस्तू यांच्या साठी वांगी हाच शब्द का आणि कसा आला हे कोणी सांगू शकेल काय ?
  • Log in or register to post comments

वानगी.

प्रभाकर पेठकर
Fri, 03/21/2014 - 03:24 नवीन
तो शब्द 'वांगी' असा नसून 'वानगी' असा आहे. 'वानगी' म्हणजे उदाहरण. पुराणातील एखाद्या घटनेचा 'उदाहरण' म्हणून वापर आजच्या युगात अप्रस्तुत असतो तेंव्हा 'पुराणातील वानगी (उदाहरण) पुराणातच राहू द्या' असे म्हणतात. उच्चार साधर्म्यामुळे 'वानगी' चे 'वांगी' असे झाले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले

+१

बॅटमॅन
Fri, 03/21/2014 - 12:27 नवीन
सहमत. मलाही अगोदर तेच वाटायचे, पण नंतर उलगडा झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

वांगी! वांगी!

स्पंदना
Fri, 03/21/2014 - 03:20 नवीन
वांगी! वांगी! आता जाऊन आणलीच पाहिजेत. आमच्याकडे बी वाली वांगीच मिळतात. :(
  • Log in or register to post comments

आता परत वांगी करावीच लागतील .

आरोही
Fri, 03/21/2014 - 10:32 नवीन
आता परत वांगी करावीच लागतील ......
  • Log in or register to post comments

मस्तच लेख

मृत्युन्जय
Fri, 03/21/2014 - 11:13 नवीन
मस्तच लेख
  • Log in or register to post comments

एखाद्या वांग्याच्या पातळ

शिद
Fri, 03/21/2014 - 16:38 नवीन
एखाद्या वांग्याच्या पातळ चकत्या कापून तेलावर परतून
काल संकष्टीचा उपवास असल्यामुळे रात्री जेवायला मस्त वांग्याच्या खरपूस काचर्‍या केल्या होत्या. माझा मुलगा बाकीच्या भाज्या खात नाही पण बटाटा/वांगी च्या काचर्‍या मात्र आवडीने खातो.
  • Log in or register to post comments

या प्रतिसादासाठी

वेल्लाभट
Fri, 03/21/2014 - 16:50 नवीन
या प्रतिसादासाठी +११११११११११११११११
  • Log in or register to post comments

वांग्याचे आपण जबर फॅन आहोत...

वेल्लाभट
Fri, 03/21/2014 - 16:51 नवीन
वांग्याचे आपण जबर फॅन आहोत.........
  • Log in or register to post comments

उत्तम लेख..

विटेकर
Fri, 03/21/2014 - 17:09 नवीन
वरती उल्लेख आलाच आहे .. कृष्णाकाठच्या वांग्याचे सर कश्शा कश्शाला नाही. जणू स्वर्ग ताटात उतरतो. मळीच्या वांग्याला अंगभूत तेल सुटते .. मस्तच ! नरसोबाच्या वाडीची वांगीही विशेष प्रसिद्ध आहेत. मी गेलो की न चुकता आणतो.तिथे मसाल्याचा माज नाही वांग्याची स्वतःची चवच अफलातून असते. पच्चिम माराष्ट्रात नोन्-वेज फिस्ट असेल तर " न खाणार्‍यांसाठी'हटकून वांग्याची भाजी असते. दक्षिणेत मिळ्तात ती वांगी भाजीचा चिखल करतात . बंगळूरात कामत / पै मध्ये ( नॉर्थ कॅनरा ष्टाईल) नक्की हा चिखल शेंगदाण्याच्या कुटात मिसळून वाढतात. तिथे फक्त ज्वारीचे ( जोल्डा) फुलके खायला जावे. बंगळूरात मिळतात ती वांग्याची भजी.. ती अफलातून लागतात. इंटेरियर तामिळ्नाडू ( बहुधा- दिंडिकल) मध्ये ही वांग्याची भजी खाल्ली आहेत.
  • Log in or register to post comments

भाजीत भाजी वांग्याची,

बॅटमॅन
Fri, 03/21/2014 - 17:31 नवीन
भाजीत भाजी वांग्याची, तृप्ती अंगाअंगाची!!!!
  • Log in or register to post comments

अरे वा!! नाव उखाण्यात घेतलंस!

सूड
Fri, 03/21/2014 - 19:21 नवीन
अरे वा!! नाव उखाण्यात घेतलंस!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ऑ?? तृप्ती नाव आहे?

स्पंदना
Sun, 03/23/2014 - 11:59 नवीन
ऑ?? तृप्ती नाव आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

लै उशिरा बघिटलो.

बॅटमॅन
गुरुवार, 03/27/2014 - 17:12 नवीन
लै उशिरा बघिटलो. उगा अफवा पसरवणार्‍या सुडक्याचा कचकून निषेध असो!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

हे वांगमय आणि प्रतिसादांचे

कंजूस
Fri, 03/21/2014 - 19:29 नवीन
हे वांगमय आणि प्रतिसादांचे भरते पाहून मी असा ठराव मांडतो की पुढील कट्टा जळगावला व्हावा आणि येणाऱ्या प्रत्येकाने वांग्याचा एक पदार्थ आणावा .
  • Log in or register to post comments

१)पोतृगिजांनी बटाटा ,मिरची

कंजूस
Fri, 03/21/2014 - 20:15 नवीन
१)पोतृगिजांनी बटाटा ,मिरची ,रताळे ,फ्लावर ,कोबी ,गाजर टामेटा आणले .वांगीपण आणली का ? २)नद्या पावसाळ्यात दुथडी वाहातात आणि दिवाळीनंतर पाणी ओसरल्यावर गाळात वांगी ,कलिंगड लावतात त्यांना गर जास्ती धरतो आणि चविष्ट लागतात .म्हणून कृष्णाकाठची वांगी . परंतु कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही .(गदिमा) . ३)पावभाजीचं जाउदे पण वांगी केवळ ज्यासाठी वाढवतात त्या उंधियोला कसं विसरणार ? ४)फ्रेंच आणि जपानी पाकू तीत मोठ्या तुकड्यांना ऑलिव ऑईल लावून अवनमध्ये भाजतांना दाखवतात । ५)कोणी हैदराबादकराने तिळ शेंगदाणे कुटाच्या रश्शाची भलामण केली कशी नाही ?
  • Log in or register to post comments

मी अजुन लहान मुलगा आहे ;-)

श्रीरंग_जोशी
Fri, 03/21/2014 - 20:38 नवीन
>> काही लहान मुलांना वांगे आवडत नाही. मला लहानपणीपासून वांग्यांच्या भाजीतली वांगी खायला आवडत नाहीत. पण त्याच भाजीतला रस्सा मात्र चवीने खातो. ती चव इतर रश्श्याच्या भाज्यांमध्ये मिळत नाहीत. वांग्यांचे भरीत मात्र जीव की प्राण आहे. खायलाही आवडते व बनवायलाही. आजकाल बहुतांश वेळा भरताच्या वांग्यांत खूप बिया निघतात अन माझा पुन्हा पुन्हा हिरमोड होतो. लेख मनापासून आवडला. थोडी चित्रे हवी होती. अवांतर - मी लहान असताना घरच्या बागेत पांढर्‍या वांग्यांचे रोप होते. बहुतांश वेळी त्याची वांगी शेजार्‍यांना व घरी कामाला येणार्‍या मोलकरिणींनाच वाटली जायची.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा