✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

असा हा पूर्वांचल

व
विश्वास कल्याणकर यांनी
Wed, 03/23/2011 - 11:27  ·  लेख
लेख
पूर्वांचल छात्र शिबीर २०१०, नांदेडच्या निमित्ताने प्रकाशित झालेली 'सांकव' ही स्मरणिका माझ्या वाचनात नुकतिच आली. पूर्वांचलातील बांधवांच्या प्रती आपल्या मनातील एकात्मतेचे हृदयबंध बळकट व्हावेत. सीमाप्रश्न सदोदित चघळणारे आम्ही अंतर्गत यादवी मात्र उघड्या डोळ्यांनी बघत असतो. अनुपम सौंदर्याने नटलेला, निसर्ग संपत्तिची उधळण असलेला निसर्गाची उपासना करणार्‍या विभिन्न जनजातीय बांधवांनी व्यापलेला हा सीमावर्ती भूभाग आज फुटीरता, उग्रवाद, यांनी कलंकित झाला आहे. भारताचा अविभाज्य भाग असलेल्या या पूवांचलातील काही भागात भारतीयांना प्रवेश करण्यासाठी प्रवेशपत्र लागते. या विध्वंसक कृत्यांना पायबंद घालण्यासाठी समस्त भारतियांच्या मनाचं उन्नयन होवून मनामनाचे बंध घट्ट् करणारा बंधुत्वाचा सेतू अर्थात 'सांकव' साधला जावा यासाठी गेल्या पन्नास वर्षाहुन अधिक कालापासुन विविध सेवा संस्थां आपल्या कार्याद्वारे पूर्वाचलांत कार्यरत आहेत्. एखाद्या ठिकाणचे प्रश्न समरस झाल्याशिवाय समजून घेता येत नाहीत आणि समरसतेला आत्मीयतेची बैठक हवी. आभाळ फाटलय म्हणून हतबल होण्यापेक्षा आपल्या कुवतीनी दोन टाके घालायचे! केव्हातरी ते नक्कीच शिवले जाईल. निदान फाटल्याची लांबी तरी कमी होईल याच दृष्टीनी पूर्वांचलातील विद्यार्थी-विद्यार्थीनींना आपल्याकडे आणून शिक्षण दिले जाते. महाराष्ट्रात या विद्यार्थ्यांचे एकूण तेरा छात्रावास चालतात. या छात्रावासातून शिक्षण घेणारे विद्यार्थी उद्याच्या शांत. एकात्म, संपन्न पूर्वांचलाचे प्रवक्ते बनतील ही अपेक्षा आहे. महाराष्ट्रात चालणार्‍या या सर्व छात्रावासांचे एकत्रीकरण दरवर्षी पूर्वांचल छात्र शिबीरातून होते. सैनिकसंत गुरुगोविंदसिहजींच्या पावन पदस्पर्शाने पुनित झालेल्या गोदाकाठी वसलेल्या नंदीग्राम नगरीत यावर्षीचे शिबीर संपन्न झाले. त्यानिमित्ताने सर्व सामान्यापर्यंत हा विषय पोहचावा, त्यावर चिंतन व्हावं आणि कृतीतुन एकात्मतेचं, सामाजिक संवेदनेचं दर्शन घडावं, या उद्देशाने स्मरणिकेची निर्मीती. यातील लेख माहिती पुर्ण तर आहेतच पण तेथील संस्कृती व इतिहास याची ओळ्ख सर्वसामान्यांना व्हावी या उद्देशाने डॉ. शरद हेबाळकर यांनी लिहिलेला एक लेख साभार, उपक्रमींसाठी देत आहे. कामरुप आणि भगवान शिव सार्‍याच देवता अत्यंत सामर्थ्यवान. प्रत्येक देवाच्या शक्तीचं वेगळं वैशिष्ट्य-सारेच महाविनाशकारी अस्त्रांनी संपन्न होते. तरीही दुष्टांचा संहार करतांना देवेंन्द्राचंही कुशल नेतृत्व कमी पडत होतं. आणि ही समस्या सुटण्याचा एकच मार्ग होता. भगवान शिव आणि जगज्जननी उमा यांना संतती झाली तरच अद्वितीय नेतृत्व देणार्‍या महान योध्द्याची प्राप्ती होऊ शकत होती. योगीराज शिवांना समाधी अवस्थेतुन बाहेर आणायचं आणि शिवपार्वति मिलन घडवून आणायचं हे तर कर्मकठीण कार्य. पण दुसरा उपाय नव्हता. अखेर देवेंन्द्रानं ते साहस केलं. शिवांना समाधी स्थितीतून बाहेर काढून त्यांच्यात कामवासनेचा संचार व्हावा ही कामगीरी कामदेवांवर सोपविण्यात आली. देवेन्द्राची आज्ञा आणि सगळ्या देवांची विनवणी यामुळे या कामाच्या भयंकर परिणामाची कल्पना असूनही कामदेव आपल्या कामगिरीवर निघाला. आपले धनुष्य सरसावून पहिला अरविंद हा कामबाण कामदेव 'मदनाने' भगवान शिवाच्या दिशेने सोडला. त्याचा काही परिणाम झाला नाही. अशोक आणि आम्र हे आणखी दोन बाण सोडले. शेवटी नवमल्लिका आणि निलोत्पळ हे प्रभावी बाण सोडले. भगवान शंकर ताडकन उठले. थरथर कापत उभ्या असलेल्या कामदेवाकडे पाहून त्यांनी संतापून आपला तिसरा नेत्र उघडला. क्षणार्धात कामदेव अग्निजाळांनी लपेटला गेला. उरला एक राखेचा ढिगारा. कामदेव मदनाची पत्नी रती अक्षरशः वेडी झाली. तिचा आक्रोश भगवान शंकरानाही पाहवेना. रती त्यांच्या पायावर कोसळली. भगवान शिवांनी तिला उठवून म्हटले. विलाप करु नकोस, कामदेवाची रक्षा घेउन प्रगज्योतिषपुरला जा, आणि आश्चर्य घडले. शिवकृपा झाली. कामदेव मदनाला तिथे नवीन रुप प्राप्त झाले. कामदेव आणि रती तिथेच राहून शिवार्चनेत मग्न झाले. हे प्रागज्योतिषपुर म्हणजेच आजचे गुवाहाटी आणि आजचा पुर्वांचल म्हणजे कामदेव आणि रतीच्या वास्तव्यामुळे यथोचित नाव प्राप्त झालेला कामरुप. वर्तमान अरुणाचल, नागालैंड, मिझोराम, मेघालय, त्रिपुरा मणिपुर आणि आसाम हा सारा भुप्रदेश कामरुप मध्येच होता.फार फार वर्षांपुर्वी पूर्व बिहारमधील पूर्णिष्ठा आणि बांगला देशातिल रंगपुर व मैमनसिंह जिल्हे कामरुपचेच भूभाग होते. हा कामरुप रत्नपीठ,कामपीठ, स्वर्णपीठ आणि सीदार पीठ असा चार पीठात विभागलेला होता. योगिनीतंत्रात त्याचे वर्णन आहे. कामरुप हे नाव तर प्राचीन आहे. कालिकापुराणात त्याचा उल्लेख आहे. "हाम्भुनेत्राळीनिर्दग्धः कामशम्मोर्नुग्रहात् म्हणुन हा कामरुप - भारतमातेच्या पूर्वाचल-उगवत्या सूर्याचे पहिले सोनेरी किरण इथे पडतात. किरातांची भूमी कामरुप ही किरातांची भुमी आहे. सारे किरात शिवोपासक आहेत. बोझे, कछारि, दिमासा, कोच, ळाळुंग, गारो, राभा, पहाडीतील खासि, जयंतिया, कार्बी, नागा, मिझो, मिकीर सार्‍या जनजाती किरात आहेत. किरात हा वंश नाही ते या सार्‍यांचे गौरवास्पद विशेषनाम आहे. कामरुप किरातांचा आहे. आणि या सार्‍या जनजाती कुठल्या ना कुठल्या रुपात शिवपार्वतीच्याच उपासक राहिल्या आहेत. बायौ बुढा हा बोडोंचा शिव तर शयौ बुढी ही पार्वती. बा म्हणजे पाच यौ म्हणजे तत्व. सिनू वृक्ष म्हणजे पंचत्वाचे प्रतीक. त्याच्या पाच शाखा असतात. डिमासा तर महान नदीचे पुत्र. धनशिरी नदीचे डिमासा भाषेतील नाव डिसा आहे. डि म्हणजे पाणी मा म्हणजे महान आणि सा म्हणजे संतान. त्यांचे मूळ पुरुष डिलोओब्रा आणि सांग्रीबा नद्यांच्या संगमस्थानी रहात होते. सार्‍या जनजातींच्या आपल्या सुंदर श्रुती आहेत. खासी जनजाती तर अधिकच भाग्यवान आहे. मेघालयातील सोपेसेवंश पर्वतावर एक सुंदर वेल होती. इतकी उंच की धरतीमध्ये तिचे मूळ होते तर वरचे टोक थेट आकाशात गेले होते. आकाशातील देवता त्या वेलीवरुन धरतीवर यायच्या. विहार करायच्या आणि परत जायच्या. एका देवाच्या मनात स्वार्थी विचार आला. आपण राजा बनण्याच्या इच्छेने त्याने वेलच कापून टाकली. आकाशातून येणार्‍या जाणार्‍यांचा मार्ग बंद झाला. झिलय देवाला हे पसंत पडले नाही. त्याने दापाहशिन्यु या दैवी कन्येला धरतीवर पाठविले. खासी जन तिचीच संतान आहेत. खासी मध्ये एक म्हण आहे. "लौंगयेङ ना का दिंथेर" म्हणजे स्त्री पासुन ही (खासी) जनजाती निर्माण झाली. खासी आणि पूर्वांचलातील अन्य अनेक जनजातीत स्त्रीचा सन्मान आहे. या जनजाती मातृसताक आहेत. कामरुपची धारणा किरातांनी दिली. किरातांचा धर्म तो कामरसाचा धर्म. दिसंतांची संस्कृती भारतिय म्हणूनच कामरुपची म्हणजेच पूर्वांचलाची संस्कृती भारतीय. योगिनीतंत्रात किरातांच्या जीवन पध्दतीचे वर्णन आले आहे. किरातांमध्ये संन्यासविधी नाही. दीर्घकालीन व्रते नाहीत. संसर्ग दोष नाही. म्हणजे जातीभेद नाही. मत्स्यमांस निषेध नाही. हंस, कबुतर, कासव, सुवर इत्यादी सर्व प्राणी भक्ष्य आहेत. तरीही बहुतेक सार्‍या जनजाती एकादशी, पौर्णिमा, व पवित्र तिथीला मांस मच्छ खात नाहीत. किरात मुळातच अत्यंत अतिरुपशील आहेत. सत्यवादी आणि प्रामाणिक आहेत. कष्टाळू आणि दीर्घोद्योगी आहेत. शूर आणि स्वातंत्र्यपिय आहेत. पूर्वांचलाच्या सार्‍या जनजातीत हे गुण आहेत. पहाडी प्रदेशातील मनू - मिझो मिझोचा प्रदेशही पर्वतीय आहे. उत्तर दक्षिण पसरलेल्या समांतर अशा पर्वतांच्या रांगा आणि त्यातील खोल दर्‍या-उंच बांबूची दाट वने, मिझोचा अर्थच पहाडी प्रदेशातील मनू. 'मि' म्हणजे मनुष्य आणि 'जो' म्हणजे पहाडी प्रदेश. लुशाई आणि हमार या त्यांच्या जनजाती. लुसाई ज्या टेकड्यातून रहातात त्या डोंगराचे नाव पण लुशाईच. त्यांची पांशिअन हा देव सृष्टिचा निर्माता. त्याच्या अंकित असलेला खुआबांग हा देव त्याच्या भक्तांच्या अंगात येतो अशी त्यांची श्रध्दा आहे. भटके लुसाइ मणिपुरच्या प्रदेशात आहेत. आज बहुसंख्य मिजो ख्रिश्चन शाळेत पण त्यांची स्वतःची एक परंपरा आहे. भाषा आहे. शूर आणि बुध्दिमान नाग नाग ही एकच जनजाती नाही. अंगामी, आअ, कुबई, कचा, लेंगमी, कोन्याक, रेंगमा, जेलियांग अशा सार्‍या किरातांची 'नाग' ही सामान्य संज्ञा आहे. नाग हे त्यांचे कुलचिन्ह आहे. या प्रामाणिक , बुध्दिमान आणि शूर जनजातीचा प्रमुख देव सूर्य, पण प्रत्येक जनजातीचे देव आहेत. अंगामी नागांचा देव उकपेनुअकाई- तर आअंचा देव पाषाण स्वरुप आणि तोच त्यांचा मूळ पुरुष . रैंगमाच्या दृष्टीने सूर्य पुरुष आहे तर चंद्र हा देवी आहे. नागकन्यांचे आकर्षण रामायण काळातही होते. श्रीरामाचा पुत्र कुशाचा विवाह नागकन्येशी झाला होता. रावणाचा पराक्रमी पुत्र मेघनाद हा नागभुमीचा जावई होता. परशुराम आणि अरुणाचल अरुणाचल देखील हिमालयाच्या पर्वतशृंखलेतच आहे. कुण्डिल आणि विदर्भ ही अरुणाचल मधील प्राचीन राज्यांची नावे. परशुरामकुण्ड अरुणाचलात आहे. पिता जमदग्नी यांच्या आज्ञेने परशुरामांनी परशुने त्याच्या मातेचा वध केला. प्रसन्न झालेल्या जमदग्नी ऋषींनी त्याला वर मागायला सांगितले. परशुरामाने आईला जिवंत करण्याचा वर मागितला. परशुरामांची माता जिवंत झाली. पण आपण मातृहत्या केली याचे शल्य कायमच होते. परशुराम अस्वस्थ होते. आपले पाप धुवून काढण्यासाठी अखेर ते लोहित मध्ये आले. तेथील कुंडात स्नान करुन पापमुक्त झाले. आजही मकरसंक्रांतीला हजारो भाविक परशुराम कुण्डात स्नान करण्यासाठी येतात. महाभारतकालीन प्रसिध्द भीष्मकनगर ही लोहीत जिल्ह्यातच आहे. अरुणाचलमधील जनजाती सामान्यपणे नम्र आणि सरळ आहेत. काही बौध्द धर्मीय आहेत. लुंगचांग, योगली, सोसांग, रोनरोग, खेमसिंग, मोकलुंग, लोंगकी, लुंग्री इत्यादी जनजाती तांगसा आहेत. सिकिया, आ किंवा रांग काड हवा हा त्याचा सर्वश्रेष्ठ देव आहे. ते सूर्याची पण पूजा करतात. मातृशक्ती आणी पौरुषाचं प्रतिक धान कामरुपाच्या लोकपरंपरेचं अभिन्न अंग म्हणजे धान. ते मातृशक्ती आणि पौरुष दोन्हीचं प्रतिक आहे. धानाच्या गर्भातूनच तांदुळ बाहेर येतो. यासंदर्भात एक सुंदर जनश्रुती आहे. पूर्वी तांदळावर आवरण नव्हते. एकदा एक हावरट ब्राम्हण झाडाचे नांदूळ तसेच ओरबाडून खाऊ लागला. लक्ष्मी देवीने ते पाहिले. तिला ते सहन होईना. तिने त्यामुळे तांदळावर त्वचा चढवली. तेव्हापासून तांदूळ हातसडिने मोकळा करुन त्याचा उपयोग करु लागले. तांदूळ साठवायच्या कोठीघरात दिवा लावून ठेवतात. कोठीतुन प्रथम धान बाहेर काढतात तेव्हा एक शराईत (विशिष्ठ थाळीत) लक्ष्मीदेवीसाठी गुळ, केळी यांचा नैवेद्य ठेवतात. तांबूल ठेवतात. तांबूल कच्चा सुपारीचा असतो. कामरुपच्या स्त्रियांना तांबूल फारच प्रिय असतो. रत्नभुमी मणिपुर मणिपुरचा प्रदेशही मूळ किरातांचाच. कमाल, लुआंग, मोइरंग आणि मेईयेई या मूळ जनजाती मेईमेई म्हणुनच ओळखल्या जातात. तंगखुळ, काबुई, कोईराव, मारिंग या नागजनजाती या शिवाय कुकी आहेत, फुंगनाई आहेत. पाखेंबा हा सर्वश्रेष्ठ देव. तो विश्वपिता आहे. प्रत्येक गावाची एक रक्षक देवता असतेच. या ग्रामदेवतेला लासनई म्हणतात. उमंगलाई ही वनदेवता तर इमुंगळाई ही गृहदेवता. याशिवाय पानथोयबी, नौंगशाबू, युमथाईलाई अशा अनेक देवता आहेत. धार्मिक सण , उत्सव, रथयात्रा या बाबतीत तर मणिपुरी खुपच उत्साही आहेत. माड शांग (होळी) उत्सव म्हणजे तर आनंदाची पर्वणीच. मणिपुरी नृत्य ही तर मानवी सृष्टीला मिळालेली कलेची अपूर्व देण्गी आहे. महाभारत कालात अर्जुन मणिपुरला आला होता. मणिपुर्च्या राजकन्येशी, चित्रांगदेशी त्याचा विवाह झाला. बभ्रुवाहन हा त्यांचा पुत्र. माता, पिता दोघांकडुनही त्याला शौर्य, साहस, आणि बुध्दिमत्तेची देण्गी मिळाली होती. रुक्मिणीहरण सारा पुर्वांचल प्राचीन ऐतिहासीक घटना पौराणिक कथा, आध्यात्मिक जनश्रुती आणि सांस्कृतिक परंपरा या दृष्टीने भारतिय संस्कृतीचा अभिन्न अंग आहे. कामरुप ही जशी किरातभूमी, नागभुमी तशी असुर भुमी पण होती. असूर शुर होते , देखणे आणी सुंदर ही होते. भगवान शिवांचे उपासकही होते. पण महत्वाकांक्षी आणि विलासता यामुळे समाजाला त्रासदायक ठरत असत. महाभारताच्या काळापुर्वी महिरंग दानवाचा वंश कामरुपच्या राज्यावर होता. त्याच्यानंतर इटकासुर, शंबरासुर, रत्नसुर आणि घटकासुर हे राजे झाले. भुमीपुत्र नरक घटकासुराला ठार मारुन राज्यावर आला. मिथिलेच्या जनकाने त्याचे पालन केले होते. तो विष्णुभक्त होता. विदर्भ राजकन्या मायादेवी ही त्याची पत्नी. तिच्यापासुन भगदत्त हा मुलगा झाला. युधिष्टिराने राजसूय यज्ञ केला त्यावेळी भगदत्त हस्तिदंत, गेंड्याच्या कातडीच्या ढाली, विविध आकाराची वस्त्रे इत्यादी घेउन इंद्रप्रस्थास गेला होता. त्याच वेळी त्रिपुरा नरेश चित्रयुध्द पण इंद्रप्रस्थास गेला होता. युधिष्ठिराने चित्रासुरास सन्मानदर्शक श्वेतछत्र दिले होते. त्रिपुराच्या राजघराण्यात त्या श्वेतछत्राची पुजा होत होती. नरकाचे दुसरे नाव भौमासुर. तो नंतर इतका दुष्ट प्रवृत्तीचा झाला की अखेर श्रीकृष्णांना स्वतःला त्याच्यावर स्वरी करुन त्याला ठार मारावे लागले. श्रीकृष्णांनी भगदत्ताला प्रागज्योतिष्च्या सिंहासनावर बसविले. नरकासुराने हजारो राजवंशी कन्यांना बंदी केले होते. त्यांना मुक्त करुन कृष्णाने प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली व त्यांचे पुनर्वसन केले. श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणी पूर्वांचल कन्या मानली जाते लोहित जिल्ह्यात कुण्डिल नदीच्या काठी भिष्माकाची राजधानी भीष्मकनगर होती. तेथून द्हा कि.मी वर राम्रेश्वरीचे मंदिर आहे. रुक्मिणीहरणाची घटना तिथे घडली. रुक्मीला-रुक्मीणीच्या भावाला ते पसंत नवहते. त्याने कृष्णाला अडवले. युध्दात तो पराजित झाला. श्रीकृष्णानी त्याला जिवदान दिले पण त्याचे मुण्डन करुन सोडुन दिले. या भुप्रदेशात इंदुनिशनी ही जनजाती आहे. ही जनजाती रुक्मिणीशी आपला संबंध जोडते. इंदुमिशनी आपल्या डोक्यावरचे मागचे केस काढतात. पुढच्या केसाचा बुचडा बांधून त्या त एक लाकडाचा तुकडा खोचतात. या क्षेत्रातील पुटिया राज्याचे वंशज आजही स्वत्;ला भीष्मकाची संतान म्हणवतात. अनिरुध्द उषाचा प्रणय दुर्योधन प्रागज्योतिषच्या भगदत्ताचा जावई. भानुमति ही त्याची पत्नी भगदत्ताची मुलगी होती. कौरव पांडवाच्या युध्दात भगदत्ताने दुर्योधन चा पक्ष घेतला. श्रीकृष्णांनी त्याच्या पित्याचा वध केलेला होता. या युध्दात भगदत्त मारला गेला. दुर्योधनाचा आणखी एक विवाह ब्रम्हपुत्रेच्या उत्तर किनार्‍यावरील कुरुबा येथील राजकन्या 'लक्ष्मणा' हिच्याशी झाला होता. श्रीकृष्णाचा पुत्र प्रद्युन्म याचा विवाह मामाच्या मुलीशी म्हणजे रुक्मीची कन्या रुक्मावति हिच्याशी झाला होता. अनिरुध्द हा प्रद्युन्म आणि रुक्मावतिचा पुत्र. वर्तमान तेजपुर हे त्या काळातील शोणितपुर. बाणासुर हा तिथला राजा होता. तो शिवभक्त होता. बाणासुरची कन्या 'उषा' अनिरुध्दावर प्रेम करीत होती. उषाची चित्रलेखा नावाची सखी होति. बाणासुराचा अमात्य कुमांड याची ती मुलगी. चित्रलेखाला मायावी विद्या अवगत होती. तिने अनिरुध्दला शोणीतपुरला आणले. अनिरुध्द व उषाचा गांधर्व विवाह झाला. बाणासुराला हे समजले तेव्हा तो संतापला. त्याने अनिरुध्दाला कारागृहात डंबले. आपल्या नातवाला सोडविण्यासाठी श्रीकृष्णाना यावे लागले. बाणासुर शिवभक्त होता. कृष्णाना प्रत्यक्ष शिवाशी युध्द करण्याचा प्रसंग आला. या सार्‍या घटनांशी संबंधित स्थाने आजही तेजपुरमध्ये दाखविली जातात. कामरुपच्या इतिहासाची अखण्डता महाभारत काळापासुन कामरुपच्या इतिहासाची अखण्डता लक्षात येते. भौमासुर( नरकासुर) पासून १८ पिढ्याम्ची माहिती मिळते. त्यानंतरची माहिती उपलब्ध नसली तरी एका सुबाहू नामक राजाला ठार मारुन त्याचा मंत्री सुपवी हा राजा झाला. त्याने 'बर्मा' राजवंशाची स्थापना केली. सातव्या शतकातील प्रसिध्द राजा भाल्करबसी त्याचा वंशज होता. डिमापुर येथील हैडम्ब वंशाची १८० पिढ्यांची वंशावाळ उपलब्ध आहे. भीमाने हिडिम्ब या असुराशी युध्द करुन त्याचा वध केला. त्याची बहीण् हिडिंबा शूर होती. सदगुणी आणी सुंदर होती. भीम आणी हिंडींबा यांचा मुलगा घटोत्कच याच्यापासुन हैडम्ब वंश सुरु झाला. घटोत्कचाचा पुत्र बर्बरिक हाही अत्यंत शुर होता. श्रीकृष्णांनी नरकासुराशी युध्द केले त्यावेळी त्याचा अमात्य मूर यालाही मारले. मूरची कन्या मौर्वी पण शूर होति. तिचे दुसरे नाव होते कामकण्टकटा. आपल्या पित्याच्या वधाचा सुड घेण्यासाठी ती स्वतः रणांगणात उतरली. अखेर कामाख्या देवीच्या मध्यस्थीने युधद थांबले. देवीच्या साक्षीने भीम पुत्र घटोत्कच आणि मौर्वी यांचा विवाह झाला. बर्बरिक मध्ये या दोघांचेही शौर्य एकवटले होते. भारतिय युध्दाचे वेळी त्याने म्हटले होते. "जो पक्ष पराजित होताना दिसेल त्याच्याकडुन मी लढेन व एकच दिवसात युध्द जिंकून देईन. अखेर श्रीकृष्णांनी भेदनीतीचा अवलंब करुन त्याचा नाश केला. पूर्वांचलाचा जावई - अर्जुन अर्जुनाच्या तर तीन पत्नी पूर्वांचल कन्या होत्या. मणिपुरची राजकन्या चित्रांगदा हिच्याशी त्याचा विवाह झाला होता. तिच्यापासुन बभ्रुवाहन हा मुलगा झाला. दुसरी पत्नी होती उत्खुषी ती नागकन्या होती. तिचा पुत्र इरावान. जयंतीया हे स्त्री राज्य होते. अर्जुनाशी जयंतीयाची शूर राजकन्या प्रमिला हिने युधद् केले. त्या प्रसंगातून त्यांचा विवाह झाला. पूर्वांचलातील हे सारे संबंध कुरु वंशाशी संबंधित आहेत.सार्‍या जनजातींचे क्षत्रियत्व, शौर्य, स्वतंत्र वृत्ती यांचाच तो इतिहास आहे. स्वतंत्र पूर्वांचल त्यामुळेच मुस्लीम आक्रमकांशी शेकडो वर्षे संघर्ष करुन पूर्वांचल स्वतंत्र राहिला. बंगालपर्यंत धडक देणार्‍या बाख्तियार खिलजीचा सर्वनाश ब्रम्हपुत्रेच्या तीरावरच झाला. ब्रम्हपुत्रेच्या उत्तरेस 'कानाइ बरसी बोरा' येथील १३ व्या शतकातील शिलालेख त्यांची साक्ष देतो. या शिलालेखात म्हटले आहे. शके तुरग युक्मेशे मधुमास त्रयोदशे - कामरुपे समागत्य तुरस्कः क्षयमाणयु: (शके ११२७(सन १२०६)मध्ये चैत्र त्रयोदशीला तुरुष्कांचा विनाश झाला.) सतराव्या शतकापर्यंत हे संघर्ष चालू होते. अहोम वंशी राज्यांचाही यात महत्वाचा वाटा होता. १६८२ मध्ये झालेल्या संघर्षात प्राप्त झालेल्या तोफेवर असाच एक महत्वपुर्ण लेख आहे. त्यात म्हटले आहे. "श्री श्री स्वर्गनारायणदेव गदाधरसिंन यवनं जिला गुवाकहृद्यामिदम् प्राप्तं शके १६०४ ((१६०४ म्हणजे सन १६८२ मध्ये यवनांना (मुस्लिमांना) जिंकून ही तोफ प्राप्त केली) ब्रिटीशांबरोबर पूर्वाचलातील जनजातीच्या राज्यांनी आणी वनवासी बंधुंनी केलेला संघर्ष हेही भारताच्या इतिहासातील एक सुवर्णपानच आहे. (सौजन्य- 'सांकव स्मरणिकेतील डॉ. शरद हेबाळकर यांचा लेख

Book traversal links for असा हा पूर्वांचल

  • ‹ ईशान्य भारतातील जनजातींचे पुनरुत्थान
  • Up
  • ईशान्य भारत व उदासीन भारत ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
7813 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

चांगले लिहिले आहे.

मृत्युन्जय
Wed, 03/23/2011 - 11:53 नवीन
चांगले लिहिले आहे. महाभारतातील संदर्भ बहुधा जैमिनी भारतातुन किंवा स्थानिक आख्यायिकाआमधुन घेतले आहेत. लेख माहितीपुर्ण.
  • Log in or register to post comments

लेख आवडला. वाचनखूण साठवली

यशोधरा
Wed, 03/23/2011 - 11:59 नवीन
लेख आवडला. वाचनखूण साठवली आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

लेख खूप आवडला.

तर्री
Wed, 03/23/2011 - 12:12 नवीन
नविन चांगली महिती. त्या प्रदेशा विषयीची एक भीती मनात होती. बरेच पूर्वग्रह ह्या लेखमुळे नाहिसे झाले.
  • Log in or register to post comments

निवांत

कच्ची कैरी
Wed, 03/23/2011 - 12:46 नवीन
वेळ मिळाल्यावर निवांतपणे वाचेल आणि मग प्रतिक्रिया देईल .
  • Log in or register to post comments

मी अगदी निवांत वाचला.

स्पंदना
Wed, 03/23/2011 - 13:59 नवीन
मी अगदी निवांत वाचला. किराताचा उल्लेख महाभारतात वाचला होताच, अन युधिष्ठीर अन द्रौपदीच्या एकांतात व्यत्यय आणल्याच्या पश्चातापाचे निमित्त करुन अर्जुन कामरुप देशी निघुन गेल्याचे ही उल्लेख माहिता आहेतच, पण एकुणच अतिशय रोचक अन मुद्देसुद लिहिता आहात तुम्ही.
  • Log in or register to post comments

वाह वा. फारच छान माहिती.

चिंतामणी
Wed, 03/23/2011 - 18:14 नवीन
तुम्ही पुर्वांचलाचा जो अभ्यास केला आहे तो तुमच्या लिखाणातुन दिसत आहे. अजून लेख येउ द्यात.
  • Log in or register to post comments

परशुराम आणी रुक्मिणी..

प्रशु
Wed, 03/23/2011 - 20:41 नवीन
लेख छान पण परशुराम आणी रुक्मिणी बद्दल माहितीत काहितरी गोंधळ आहे कारण रुक्मीणी चा माहेर आपल्या महाराष्ट्रातील विदर्भ आहे आणी रेणुकेच्या शिरछेदाची कहाणी बहुतेक माहुर परीसरात घडल्याचे सांगीतले जाते...
  • Log in or register to post comments

प्रतिसाद

विश्वास कल्याणकर
Fri, 03/25/2011 - 17:41 नवीन
मी स्वतः विदर्भातील आहे. त्यामुळे मी देखील याच संभ्रमात अनेक वर्षे होतो. ईशान्य भारतात विदर्भ एक मोठे राज्य होते हे तिथे कळले तसेच त्या संदर्भात सुसंगत अनेक गोष्टी कळल्या. त्यामुळे वरिल भागच सत्य आहे हे निर्विवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशु

बापरे!!! प्रचंड ऐतिहासिक

प्राजु
Wed, 03/23/2011 - 21:36 नवीन
बापरे!!! प्रचंड ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे पूर्वाचल ला. लेख पुन्हा पुन्हा वाचावा असा आहे.. अप्रतिम!! वाचनखुण साठवली आहे.
  • Log in or register to post comments

अप्रतिम

निनाद
गुरुवार, 03/24/2011 - 06:25 नवीन
अप्रतिम (आणि भरपूर पौराणिकही) माहिती. लेख आवडला. असे अजून येऊ देत.
  • Log in or register to post comments

हे

निनाद
गुरुवार, 03/24/2011 - 06:30 नवीन
आभाळ फाटलय म्हणून हतबल होण्यापेक्षा आपल्या कुवतीनी दोन टाके घालायचे! केव्हातरी ते नक्कीच शिवले जाईल. निदान फाटल्याची लांबी तरी कमी होईल हे वाक्य फार आवडले!
  • Log in or register to post comments

अगदी अगदी! हेच लिहायला आले

रेवती
गुरुवार, 03/24/2011 - 08:58 नवीन
अगदी अगदी! हेच लिहायला आले होते. साध्या शब्दात सांगितलेलं तत्वज्ञानच म्हणायला हवं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

लेख आवडला

विटेकर
गुरुवार, 03/24/2011 - 11:57 नवीन
पूर्वांचलातील देश- विघातक करवायांबद्द्ल काही लिहिता येईल का? श्री. सुनील जी देव धर यांच्या ध्वनिफितींच्या माध्यमातून बरीच माहिती मिळाली होती. लेख छान आहे. पूर्वांचलातील निसर्गाचे काही फोटो टाकता येतील का? - विटेकर
  • Log in or register to post comments

प्रतिसाद

विश्वास कल्याणकर
Fri, 03/25/2011 - 17:43 नवीन
माझ्या प्रवास वर्णात मी फोटो अवश्य टाकीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

उत्तम लेख

प्रचेतस
गुरुवार, 03/24/2011 - 12:15 नवीन
वाचनीय व मुद्देसूद.
  • Log in or register to post comments

लेख अतिशय आवड्ला, आपण

पुष्करिणी
Fri, 03/25/2011 - 18:15 नवीन
लेख अतिशय आवड्ला, आपण लिहिलेल्या बर्‍याच गोष्टी अजिबात माहिती नव्हत्या. धन्यवाद
  • Log in or register to post comments

खूप आवडला लेख.

पैसा
Sun, 03/27/2011 - 11:09 नवीन
निवांत वाचण्यासाठी ठेवून दिला होता. सार्थक झालं. वाचनखूण साठवली आहे.
  • Log in or register to post comments

»

विश्वास कल्याणकर
Mon, 03/28/2011 - 16:39 नवीन
»
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा