युरिआ व क्रिअॅटिनीन : मूत्रविकारांचे प्रगतीपुस्तक
लेखनप्रकार
अनुक्रमणिका | इन्सुलिनचा शोध : वैद्यकातील नवलकथा | मोबाईल फोन आणि कर्करोग : वादग्रस्त गृहितक | कोलेस्टेरॉल : एक लाडावलेला वलयांकित पदार्थ ! | हिमोग्लोबिन : आपल्याला जगवणारे प्रोटीन | रसायनांचा धुमाकूळ आणि कर्करोगाचा भस्मासुर | बिलिरूबिन : काविळीतला पिवळा डँबिस | युरिआ व क्रिअॅटिनीन : मूत्रविकारांचे प्रगतीपुस्तक | ट्रोपोनिन : ‘हार्ट अॅटॅक’ वर शिक्कामोर्तब
नववर्षाच्या शुभेच्छांसह सादर करीत आहे : आरोग्य लेखमालेतला ७ वा भाग...........
******************************************
'युरिआ’ हा शब्द उच्चारताच बहुतेकांच्या डोळ्यासमोर शेतीतले ‘युरिआ खत’ येते. साहजिकच आहे, कारण त्याच्या जाहिराती आपण विविध माध्यमांत बघत असतो. हेच युरिआ आपण आपल्या शरीरातही तयार करतो आणि रोज लघवीवाटे उत्सर्जित करतो.
‘क्रिअॅटिनीन’ हा युरिआसारखाच एक नायट्रोजनयुक्त पदार्थ. आपण तो शरीरात तयार करतो आणि तोही लघवीवाटे उत्सर्जित होतो. थोडक्यात हे दोन्ही नायट्रोजनयुक्त पदार्थ एकाच जातकुळीतले आहेत. दोन्हीही आपल्या रक्तात असतात आणि लघवीतून बाहेर पडतात. त्यांच्या रक्तातील पातळीचा आणि मूत्रपिंडाच्या कार्याचा जवळचा संबंध आहे. मूत्रविकाराने ग्रासलेल्या रुग्णांच्या ज्या रक्तचाचण्या नियमित होतात त्यामध्ये हे दोन्ही घटक अग्रस्थानी असतात.
या लेखात आपण या दोघांची मूलभूत माहिती, त्यांच्या वैद्यकीय उपयुक्ततेतील फरक आणि संबंधित मूत्रविकारांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.
युरिआ
याचे विवेचन चार भागात करतो :
१. शरीरातील उत्पादन
२. शरीरातून उत्सर्जन
३. आजारांमध्ये वाढलेली युरिआची रक्तातील पातळी, आणि
४. इतर रोचक माहिती
शरीरातील उत्पादन
आपण आहारातून प्रथिने घेतो. त्यांचे पचन होऊन अमिनो आम्ले तयार होतात. ही आम्ले प्रथम शरीरातील प्रथिने तयार करण्यासाठी वापरली जातात. यातून जी बाजूला उरतात त्यांचे पेशींमध्ये विघटन होते आणि त्यातून CO2 आणि अमोनिया बाहेर पडतात. हा अमोनिया रक्तात साठू देणे इष्ट नसते कारण तो मेंदूसाठी खूप घातक असतो. म्हणून अमोनियाचे रुपांतर युरिआ या निरुपद्रवी रसायनात करण्याची जबाबदारी आपले यकृत घेते. अशा तऱ्हेने युरिआ हा न वापरलेल्या नायट्रोजनचा उत्सर्जनीय पदार्थ आहे.
अन्य एका प्रकारेही युरिआची निर्मिती शरीरात होत असते. आपल्या पेशींमध्ये रोज ‘उलाढाल’ चालू असते. त्यात सतत काही प्रथिनांचे विघटन होत असते. त्यांच्या अपचयातून (catabolism) सुद्धा युरिआ तयार होतो.
शरीरातून उत्सर्जन
यकृतात युरिआ तयार झाल्यावर तो रक्तात येतो. आपले सगळे रक्त हे ‘शुद्धीकरणा’साठी मूत्रपिंडात येते. मूत्रपिंड ही एक प्रकारे चाळणी आहे. जेव्हा रक्त त्यातून जाते तेव्हा ‘टाकाऊ’ पदार्थ हे मूत्रमार्गात पाठवले जातात, तर उपयुक्त पदार्थ हे रक्तातच टिकवले जातात. त्यानुसार बराचसा युरिआ हा लघवीत जातो आणि काही प्रमाणात रक्तात उरतो.
मनुष्याच्या शरीरातील नायट्रोजनयुक्त पदार्थांचे पूर्णपणे विघटन झाल्यावर युरिआ हा प्रमुख अंतिम पदार्थ आहे, हे आपण पाहिले. या संदर्भात निसर्गातील अन्य जीवांशी आपली तुलना करण्याचा मोह होतो. मासा हा तर जलचर. तो त्याच्या नायट्रोजनचा शेवट अमोनियात करतो आणि हा पदार्थ भसाभस पाण्यात सोडून देतो, जे त्याच्या भवती मुबलक असते. त्यामुळे त्याला अमोनियाचे युरिआत रुपांतर करण्याची तसदी घ्यावी लागत नाही.
याउलट पक्ष्याचे बघा. तो पडला हवाई प्राणी. त्याच्याकडे पाण्याचे जाम दुर्भिक्ष. त्यामुळे त्याच्या नायट्रोजनचे रुपांतर तो ‘युरीक अॅसिड’ मध्ये करतो. हे रसायन उत्सर्जित करायला पाण्याची फारशी गरज भासत नाही. त्यामुळेच पक्षाची लघवी ही खऱ्या अर्थाने ‘शू’ नसून ‘शी’च असते!
आजारांमध्ये वाढलेली युरिआची रक्तातील पातळी
अशा आजारांचे आपण तीन गटात वर्गीकरण करूया:
१. मूत्रपिंडाचे आजार : जर कोणत्याही कारणाने इथली ‘चाळणी’ यंत्रणा (glomerulus) बिघडली तर मग युरिआ आणि अन्य टाकाऊ पदार्थ रक्तात साठू लागतात.
२. मूत्रमार्गातील अडथळे : यात मूत्राशय व मूत्रनलिकांच्या आजारांचा समावेश होतो. उदा. मूतखडे, प्रोस्टेटची मोठी वाढ, गर्भाशयमुखाचा कर्करोग.
मूतखडे हे मूत्रमार्गातले अंतर्गत अडथळे असतात तर बाकीच्या आजारांनी मूत्रमार्गावर बाहेरून दाब पडतो. अशा अडथळ्यांमुळे मूत्रपिंडाच्या चाळणी यंत्रणेवर ‘उलटा दाब’ (back pressure) येतो आणि चाळणी प्रक्रिया कमी होते.
३. युरिआचे वाढलेले उत्पादन : याची दोन प्रकारची कारणे आहेत :
(अ) उच्च प्रथिनयुक्त भरपूर आहार : समजा एखाद्याने एखादे दिवशी मस्तपैकी एक ‘चिकन हंडी’ फस्त केली, तर पुढचे काही तास युरिआची पातळी बऱ्यापैकी वाढते! आपल्या रोजच्या आहारातील प्रथिनाच्या प्रमाणानुसार युरिआची पातळी बदलती असते.
(आ) जेव्हा कोणत्याही कारणाने पेशींमधला अपचय वाढतो तेव्हा. उदा. उपोषण, मोठा जंतूसंसर्ग इ.
इतर रोचक माहिती
युरिआचे विवेचन संपवण्यापूर्वी आपल्या सार्वजनिक जीवनातील एक प्रसंग सांगतो. समजा, आपण एखाद्या अपरिचित ठिकाणी समारंभास गेलो आहोत. तिथे आपल्याला बराच वेळ काढायचा आहे. काही वेळाने आपल्याला लघवीची जाणीव होते आणि मग आपण ‘ते’ ठिकाण शोधू लागतो. कोणीतरी आपल्याला हातवारे करून ते कुठे आहे ते सांगतो. जसे आपण त्या मूत्रालयाच्या जवळ येतो तसे आपले ‘स्वागत’ होते त्या ‘परिचित’ वासाने !
हा भरून राहिलेला वास असतो अमोनियाचा. अनेक लोक जेव्हा एखाद्या लहान जागेत लघवी करत असतात तेव्हा त्यातील युरिआचे अंश हे त्या मूत्रभांड्यांमध्ये पसरून राहतात. हळूहळू त्या युरिआचे नैसर्गिक विघटन होऊन अमोनिया वायुरूपात पसरू लागतो. तेव्हा आपल्याकडे सार्वजनिक मूत्रालय शोधताना दिशादर्शक पाटीपेक्षा वासाचाच अधिक उपयोग होतो !
जे युरिआ आपल्या शरीरात तयार होते तेच आपण कृत्रिमरीत्या प्रयोगशाळेतही करू शकतो. विज्ञान संशोधनातील हा एक महत्वाचा टप्पा मानला जातो. आज युरिआचे मोठ्या प्रमाणात औद्योगिक उत्पादन केले जाते. या युरिआचा वापर हा शेती, रासायनिक उद्योग आणि वैद्यकातील औषध म्हणून केला जातो.
* * * *
क्रिअॅटिनीन
हा शब्द युरिआ इतका परिचित नाही याची कल्पना आहे. तो युरिआचा ‘भाउबंद’ आहे हे आपण वर पाहिले. म्हणजेच लघवीतून उत्सर्जित होणारा एक नायट्रोजनयुक्त पदार्थ. रक्तातील त्याची नेहमीची पातळी तर खूप कमी – युरिआच्या साधारण एक तीसांश. नेहमीप्रमाणे त्याचेही विवेचन तीन भागात करतो:
१. शरीरातील उत्पादन
२. उत्सर्जन आणि
३. आजारांमध्ये वाढलेली त्याची रक्तातील पातळी
शरीरातील उत्पादन
आपल्या हाडांवरचे जे स्नायू असतात (skeletal muscle) त्यांच्यात क्रिअॅटिन-पी नावाचे एक उच्च उर्जायुक्त संयुग साठवलेले असते. स्नायुंच्या कार्यादरम्यान त्यातील उर्जा वापरली जाते. मग बाकी उरते ते क्रिअॅटिन. आता यातून पाण्याचा एक रेणू आपोआप निघून जातो आणि तयार होते क्रिअॅटिनीन.
प्रत्येक व्यक्तीमधील स्नायूंचे आकारमान (mass) स्थिर असते. त्या प्रमाणात त्यांच्यात ठराविक क्रिअॅटिन-पी असते. दररोज त्यातील ठराविक क्रिअॅटिनचे क्रिअॅटिनीनमध्ये रुपांतर होते. त्यामुळे क्रिअॅटिनीनची रोजची रक्तपातळी ही युरिआच्या तुलनेत बऱ्यापैकी स्थिर असते. या बाबतीत लिंगभेद मात्र महत्वाचा आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या स्नायूंचे आकारमान कमी असल्याने त्यांची क्रिअॅटिनीनची रक्तपातळी कमी असते.
उत्सर्जन
युरिआप्रमाणेच रक्तातले क्रिअॅटिनीन हे मूत्रपिंडाच्या चाळणी प्रक्रियेतून जाते आणि त्यातले बरेचसे लघवीवाटे बाहेर पडते. त्यामुळे त्याची रक्तपातळी कमी राहते.
आजारांमध्ये वाढलेली त्याची रक्तातील पातळी
वर युरिआच्या विवेचनात मूत्रपिंडाचे आजार आणि मूत्रमार्गातील अडथळे यांचा उल्लेख आला आहे. या दोन्हींमध्ये क्रिअॅटिनीनची रक्तपातळी अर्थातच वाढते. जेव्हा मूत्रपिंडाच्या चाळणी- प्रक्रियेत दोष निर्माण होतो तेव्हा युरिआची रक्तपातळी ही क्रिअॅटिनीनपेक्षा अधिक वेगाने आणि खूप जास्त वाढते.
आता युरिआ व क्रिअॅटिनीनच्या रक्तपातळी संदर्भात एक फरक ध्यानात घेतला पाहिजे. जेव्हा कोणत्याही कारणाने पेशींमधला अपचय वाढतो, तेव्हा फक्त युरिआच वाढते; क्रिअॅटिनीन नाही. जेव्हा क्रिअॅटिनीन वाढते तेव्हा मूत्र-यंत्रणेत नक्कीच कुठेतरी गडबड झालेली असते. त्यामुळे मूत्रपिंड आणि मूत्रमार्गांच्या आजारांमध्ये क्रिअॅटिनीन हा युरिआपेक्षा अधिक संवेदनशील निर्देशांक मानला जातो.
प्रयोगशाळेत आपण जेव्हा युरिआ व क्रिअॅटिनीनच्या रक्तपातळी मोजतो तेव्हा युरिआची चाचणी ही बरीच सरळसोट आहे, तर क्रिअॅटिनीनच्या चाचणीत काही तांत्रिक समस्या आहेत आणि युरिआच्या तुलनेत अचूकता कमी आहे. या कारणासाठी मूत्रविकारांसाठी जेव्हा चाचण्यांची गरज लागते, तेव्हा युरिआ व क्रिअॅटिनीन हे दोन्ही जोडीने मोजले जातात. मूत्र- रुग्णांच्या रिपोर्टस मध्ये हे दोघे अगदी नवराबायकोसारखे वावरत असतात !
युरिआ व क्रिअॅटिनीनच्या मर्यादा
या दोघांची रक्तपातळी मोजणे ही मूत्रविकारांच्या निदानातील प्राथमिक पायरी आहे. याबाबतीत त्यांच्या उपयुक्ततेबरोबरच त्यांच्या काही मर्यादाही लक्षात घ्याव्यात. मूत्रपिंडाच्या अगदी सुरवातीच्या बिघाडाचे निदान करण्यासाठी त्यांचा तसा उपयोग नसतो. जेव्हा चाळणी-यंत्रणेचे काम कमी होत होत निम्म्यावर येते तेव्हाच क्रिअॅटिनीनची रक्तपातळी बऱ्यापैकी वाढते. म्हणजेच क्रिअॅटिनीनची पातळी ‘नॉर्मल’ असली तरी याचा अर्थ ‘मूत्रपिंडाचे कार्य छान चाललेले आहे’, असे नेहमीच म्हणता येणार नाही.
तरीसुद्धा रुग्णाचे थोडेसे रक्त घेऊन करता येणाऱ्या या दोन्ही सुटसुटीत चाचण्या आहेत. त्यामुळेच एक शतकाहून अधिक काळ त्यांनी मूत्र-चाचण्यांच्या यादीत आपले अग्रस्थान टिकवले आहे.
मूत्रपिंडाच्या आजाराची अनेक कारणे असतात. त्यामध्ये दीर्घकालीन मधुमेह आणि उच्च-रक्तदाब ही प्रमुख कारणे आहेत. अशा बऱ्याच रुग्णांच्या बाबतीत त्यांना मूत्रपिंड-विकार जडला की तो दीर्घकालीन (chronic) होण्याची शक्यता असते. अशा रुग्णांची देखभाल करताना अनेक चाचण्या नियमित कराव्या लागतात. त्यामध्ये अर्थातच युरिआ व क्रिअॅटिनीनचा समावेश असतो. त्यांच्या पातळीतील चढउतारावरून आजार कितपत नियंत्रणात आहे ते कळते. त्यांचे क्रमशः रिपोर्टस् हे एक प्रकारे रुग्णाचे प्रगतीपुस्तकच असते. त्यानुसार रुग्णाच्या भावी उपचारांची दिशा ठरवता येते.
समारोप
शरीरातील नायट्रोजनयुक्त पदार्थांचे विघटन पूर्ण झाल्यावर युरिआ तयार होतो. यकृतात तयार झालेला युरिआ हा नंतर मूत्रपिंडाद्वारे लघवीत उत्सर्जित होतो.
आपल्या स्नायूंमधल्या क्रिअॅटिनपासून रोज ठराविक क्रिअॅटिनीन तयार होते आणि तेही लघवीत उत्सर्जित होते. मूत्रविकारांच्या निदानामध्ये युरिया व क्रिअॅटिनीनची रक्तपातळी मोजणे या प्राथमिक चाचण्या आहेत. त्यांच्या उपयुक्तता आणि मर्यादा आपल्याला या लेखातून समजल्या असतील अशी आशा करतो.
या लेखाच्या निमित्ताने आपणा सर्वांना आयुष्यभर उत्तम मूत्र-आरोग्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त करून थांबतो.
*****************************************************************************
वाचने
51246
वाचनखूण
प्रतिक्रिया
71
दीर्घ उपोषणाने क्रिअॅटिनीनची
In reply to दीर्घ उपोषणाने क्रिअॅटिनीनची by एस
कुमार१ यांचे पुर्वीचे
In reply to कुमार१ यांचे पुर्वीचे by कंजूस
कंजूस, मनापासून आभार !
दीर्घ उपोषणाने शक्य आहे
प्रोटीन सप्लिमेंटमुळे पण
प्रोटीन सप्लिमेंटमुळे पण
उपयुक्त लेख
In reply to उपयुक्त लेख by तिमा
+१
In reply to उपयुक्त लेख by तिमा
++११
In reply to ++११ by पुंबा
पुंबा, आभार
तिमा, तुमच्या उत्साहवर्धक
क्रिअॅटिनीनची पातळी आणि
In reply to क्रिअॅटिनीनची पातळी आणि by पिंगू
पिंगू, उत्तम प्रश्न. तुमच्या
In reply to पिंगू, उत्तम प्रश्न. तुमच्या by हेमंतकुमार
एक राहिले...
In reply to एक राहिले... by हेमंतकुमार
धन्यवाद. फारच छान माहिती
In reply to पिंगू, उत्तम प्रश्न. तुमच्या by हेमंतकुमार
अनुभव
In reply to अनुभव by चौकटराजा
अनुभव लिहिल्याबद्दल आभार.
खूपच छान
प्रोस्टेटची मोठी वाढ
In reply to प्रोस्टेटची मोठी वाढ by हेमंतकुमार
_/\_
या आधी शरीरशास्त्रा विषयी
सर्वांचे मनापासून आभार.
एक विनंती आहे, तुम्ही पहिले
आनंदा, आभार.
In reply to आनंदा, आभार. by हेमंतकुमार
सा सं कडून होणे शक्य नसेल तर
In reply to सा सं कडून होणे शक्य नसेल तर by आनन्दा
धन्यवाद, तसेच करेन
In reply to आनंदा, आभार. by हेमंतकुमार
नमस्कार कुमार. अनुक्रमणिका
In reply to नमस्कार कुमार. अनुक्रमणिका by आदूबाळ
आबा, सहकार्याबद्दल आभारी आहे
In reply to आबा, सहकार्याबद्दल आभारी आहे by हेमंतकुमार
@आदूबाळ
In reply to @आदूबाळ by हेमंतकुमार
ही अनुक्रमणिका झाली की नाही
In reply to ही अनुक्रमणिका झाली की नाही by चौथा कोनाडा
नाही
किडनी स्टोन होऊ नये या साठी
मूतखडे : बहुचर्चित विषय !
In reply to मूतखडे : बहुचर्चित विषय ! by हेमंतकुमार
आपल्या ताजमहालाला माझी एक
In reply to आपल्या ताजमहालाला माझी एक by सुबोध खरे
मूतखडे आणि मतभेद !
In reply to मूतखडे आणि मतभेद ! by हेमंतकुमार
पाण्याचा मुद्दा सर्वांनी
In reply to पाण्याचा मुद्दा सर्वांनी by सुबोध खरे
साध्या पाण्यापेक्षा शहाळ्याचे
In reply to साध्या पाण्यापेक्षा शहाळ्याचे by महेश हतोळकर
शहाळ्याचे पाणी
In reply to शहाळ्याचे पाणी by हेमंतकुमार
धन्यवाद
In reply to मूतखडे : बहुचर्चित विषय ! by हेमंतकुमार
धन्स kumar जी आणि खरे डॉक
In reply to धन्स kumar जी आणि खरे डॉक by उपेक्षित
उपेक्षित, आभार.
In reply to मूतखडे : बहुचर्चित विषय ! by हेमंतकुमार
४. जर ‘युरीक असिड’ ची
In reply to ४. जर ‘युरीक असिड’ ची by माझीही शॅम्पेन
@ मा शांपेन,
In reply to @ मा शांपेन, by हेमंतकुमार
धन्यवाद डॉक्टर साहेब , खूप
In reply to धन्यवाद डॉक्टर साहेब , खूप by माझीही शॅम्पेन
आहार व गाउट
धन्यवाद, तुमच्या मालिकेमुले
सानवी, आभार
धन्यवाद आणि आभार. पुलेशु
अतिशय महत्वपूर्ण आणि उपयुक्त अशी लेखमाला
In reply to अतिशय महत्वपूर्ण आणि उपयुक्त अशी लेखमाला by urenamashi
उरेनामाशी, आभारी आहे.
@ कुमार१,
In reply to @ कुमार१, by अनिंद्य
अनिंद्य, मनापासून आभार !
समारोप
कुमारजी, सोप्या शब्दात ही
ओबामा 80, आभारी आहे.
मूतखडे व प्रतिजैविकांचा गैरवापर
पिण्याच्या पाण्यातील रसायने
धन्यवाद
मि पा योगेश,
In reply to मि पा योगेश, by हेमंतकुमार
आरोग्य लेखन कधीही वाचावे,
नक्की आठवत नाही
* जॉन, अभिप्रायाबद्दल धन्यवाद
तळपायावर व गालावर येणारी सुज
जा लो,
आदरांजली !
मूत्रपिंड गरज : महाराष्ट्रातील वास्तव..
दोन मूत्रपिंडांचे प्रत्यारोपण
अत्यंत महतीपूर्ण लेख
In reply to अत्यंत महतीपूर्ण लेख by नगरी
निधन
आपले लेखन वाचतांना मनांत उभ्या राहिलेल्या शंकांचे .....
सुटसुटीत युरोलिफ्ट