फासले ऐसे भी होंगे...
आमचा ग्रॅफोलॉजीचा (हस्ताक्षर व सही याचा अभ्यास ) क्लास चालू होता . सरांनी आम्हाला प्रत्येकाला एक कोरा कागद दिला आणि काहीही मुक्तपणे लिहायला सांगितलं त्यावर आपलं नांव न टाकण्याचीही सूचना दिली . नंतर ते पेपर्स गोळा करून त्यांनी मधूनच कुठलाही पेपर काढून त्याचं अनालिसिस कसं करायच हे समजवायला सुरुवात केली. कागदावरच्या मजकुराचा आकार, मार्जिन आणि मग एक एक अक्षर घेऊन त्या व्यक्तीच व्यक्तिमत्व उलगडू लागले . एक दोन अनालिसिस झाल्यावर त्यांनी माझा कागद सगळ्यांसमोर पकडला ,मनात खूप उत्सुकता होती आज स्वतःबद्दल काय जाणून घ्यायला मिळणार ... सर सांगू लागले ही व्यक्ती तिच्या भूतकाळापासून दूर पळतेय , मनातल्या गोष्टी न बोलणे हा नवीन झालेला बदल नंतर 'आय' या अक्षरावर भिंगाने फोकस करून म्हणाले नीट बघा ह्या रेषा ,हे स्ट्रोक्स ही व्यक्ती आपल्या वडिलांपासून दुखावली गेली आहे,त्यांच्याशी निगडित कोणत्याही गोष्टीपासून ही व्यक्ती दूर राहते, भावना अव्यक्त ठेवणे हा त्याचाच परिणाम असू शकतो. मी स्तब्ध होऊन ऐकत होते डोळ्यातलं पाणी बाहेर न येऊ देण्याची काळजी घेत एक मोठ्ठा आवंढा गिळला आणि उरलेला क्लास सुन्न बसून काढला. घरी परतत असताना सरांच ते वाक्य मला सारखं आठवत होत… माझं मन कशातच लागत नव्हतं , माझ्यात झालेल्या बदलाच असं तटस्थ विवेचन ऐकून मी तर हे स्वतःशी मनातही बोललेच नव्हते हे जाणवलं . आईचा फोन आला कि अतिशय तार्किकपणे तिला समजावून सांगायची ,"जे झालं ते झालं आई आता आपण आपलं आयुष्य आनंदाने जगूया , काही फरक पडत नाही ग एवढा ,एखाद्याचा जोडीदार मरतो तेव्हा ती व्यक्ती एकटी आयुष्य जगतेच ना आता या विषयावर बोलणं बंद बर का". आज एका "आय " अक्षराने माझा समजूतदारपणाचा हा बुरखा फाडून टाकला होता. घरी आल्यावर मीच लिहिलेल्या त्या 'आय ' कडे बघत राहिले उभी रेषा आणि वरची छोटी आडवी रेषा यात पडलेली छोटीशी फट मनातले केवढे अंतर दाखवत होती ...
अगदी आठवायला लागलं तस बालपणीच जे वातावरण नेहमी आठवतं ते म्हणजे , स्वयंपाकघर आणि हॉलच्या बरोबर मध्यभागी एका कप्प्यात ठेवलेला एक भला मोठा टेपरेकॉर्डर आणि त्यावर मंद आवाजात सुरु असलेल्या गझल... मुन्नी बेगम , मेहदी हसन तर कधी रुना लैला ,गुलाम अली यांच्या तलम आवाजातल्या जीवाच्या ठाव घेणाऱ्या गझल. डायनिंग टेबलवर ठेवलेले शेंगदाणे ,तळलेला लसूण आणि अर्धवट संपलेलं बाबांचं ड्रिंक ... आमच्यासाठी हे रोजचंच वातावरण ...मी माझा भाऊ आणि आई तिथेच बाबांशी गप्पा मारत तिथेच आजूबाजूला बसलेलॊ साहित्य , जुनी हिंदी गाणी असे अभिजात विषय ...सोबत शेरोशायरी, कविता तर बाबांच्या मुखोद्गत, मध्येच लहर आली कि एखादी सुंदर कविता सगळे मिळून जोरजोरात म्हणत असू यात बोरकरांच्या कविता आघाडीवर "मंद मंद वाजत आली तुझी गो पैंजणा ","डाळिंबीची डहाळीशी नको वाऱ्यासवे झुलू" अशा अगदी मुखपाठ. बाबा स्वतः एक उत्तम लेखक ,कवी त्यामुळे ते सतत काहीतरी लिहीत वाचत असत. कविता लिहून झाली रे झाली की लगेच आम्हाला समोर बसवून त्यांच्या खास लकबीत वाचुन दाखवत. एखादा लेख किंवा कविता सुचत असेल तर बाबांच्या दोन खोल्यांमधल्या येरझाऱ्या खूप वाढायच्या आम्ही कंटाळून कधी काय हे बाबा? असं म्हटलं तर म्हणायचे ,"अरे माझ्या प्रसवकळा आहेत ह्या ". अमृता प्रीतम ,गुलजार ,कैफी आझमी अशी अनेक मोठी नाव आम्ही सतत आणि सहज ऐकत होतो . ड्रिंक्स घेणारे बाबा कधी त्रासदायक ,भयानक वागले नाहीत उलट ते अधिक तरल व्हायचे. तेव्हा कानावर पडलेल्या त्या गझल्स खूप खोल मनात रुजलेल्या आहेत, कधीकधी माझ्या स्वप्नात कोणतीही घटना घडत असो बॅकराउंडला एखादी गझल चालू असते.. " मेरे हमनफस मेरे हमनवा ", "रंजीश ही सही " घरात पुस्तकांचा अमाप संग्रह ,अतिशय दुर्मिळ, अभिजात आणि बाबांनी अट्टाहासाने जमा केलेली ८ ते १० हजार पुस्तकं . तुम्ही कुठलही पुस्तक, कुठलीही कविता, कुठलीही ओळ विचारा बाबा एका मिनिटात ते काढून द्यायचे . मी तर त्यांना एखाद्या परीक्षार्थी मुलासारखं रोज चार पाच तास लिहिताना वाचतांना पाहिलंय.
आमच घरही आईबाबांनी फार प्रेमाने बांधलेलं ,सजवलेलं .त्या घरात तीन रूम्स स्लॅबच्या होत्या आणि एक रूम मुद्दाम माळवदाची बनवलेली जुन्या घरांचा फील येण्यासाठी आणि एका रूमला पत्रे टाकले होते ,बाबा म्हणायचे पत्र्याच्या खोलीत पावसाचा अनुभव खूप छान येतो. घराच्या पश्चिमेला सगळी सुगंधी फुलाची झाडं लावलेली चमेली,जुई,जाई ,मोगरा, रातराणी कारण वारा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतो. या सर्व वेलींना मांडव घातलेले आणि त्यांच्याजवळ एक शिडी ठेवलेली माझ्यासाठी, "माझ्या सोन्याला कळ्या तोडायला सोप्प जावं म्हणून" घरासमोर चाफा ,पारिजात अशी फुलांचा सडा टाकणारी झाडं. त्यात भर बहाव्याची गेटच्या दोन्ही बाजूला दोन जणू स्वागतासाठी उभे .परसदारी सगळी फळझाडं सोबत केवडा, बकुळ, कदंब अशी शोधून आणलेली दुर्मिळ झाडं . गुलाबांच्या तर कितीतरी जाती .अंगणाच्या एका कोपऱ्यात मला आणि माझ्या भावाला खेळण्यासाठी केलेला वाळूचा मोठा चौकोन. हापशाजवळ लावलेला चमकोरा,पुदिना . घरासमोर केलेले लिलीचे ताटवे .कॅक्टसचंही खूप छान कलेक्शन आणि त्याला लावायला केलेली छोटी टेकडी . सुगंधाने भारावून टाकणारा मरवा . कृष्णकमळ ,मधुमालती अशा झाडांनी आमचं घर झाकून टाकलं होत. या सगळ्या झाडांशी आमचं स्पेशल नातं होत . बागेत एखाद्या पक्ष्याने घरटं केलं की आमच्या आनंदाला पारावार उरायचा नाही. दर रविवारी आई बाबा आम्हाला घेऊन बागकाम करायचे. प्रत्येक झाडाविषयी खूप माहिती ते आम्हाला सहजच सांगत असत. बाबांनी खूप ठिकाणाहून जमा केलेले दगड ,गारगोट्या आमच्या व्हरांडाभर पसरलेल्या होत्या. त्यात मला काष्ठशिल्पांचा नाद लागला आणि व्हरांड्यात त्यांचीही भर पडत गेली . काष्ठशिल्प शोधत आम्ही कधी लक्कडकोटला (लाकूड कापण्याचा कारखाना ) जायचो . बाबा तिथल्या माणसाला त्याच्याच भाषेत सांगायचे "कोई ऐसा वल्ली फल्ली लकडी दिखा ना तो रख दो हमारे लिये "
खाण्यापिण्यातली रसिकताही तशीच... कुठेही चांगला पदार्थ खाण्यात आला की आवर्जून आम्हाला तिथे नेऊन खाऊ घालायचे . त्यांच्या कॉलेजच्या कँटीनला कधी बटाटेवडा फक्कड जमून आला असेल तर लगेच पार्सल चपराश्यासोबत घरी पाठवून द्यायचे . प्रत्येक गोष्टीच प्रचंड सेलेब्रेशन असायचं. साधा क्षणही सुंदर बनवण्याची कला होती त्यांच्यात. सुट्टीच्या दिवशी तर बागकाम झालं कि दुसरा चहा पिण्याचे बहाणे ,त्यावर रचलेले गाणे जोरजोरात म्हणून आईला भंडावून सोडायचो. घरात वातावरण एकदम मस्त ,मनमोकळं. आम्ही चौघे एकमेकांचे चांगले मित्र होतो. कुठलीही प्रतिक्रिया, मतभेद बिनधास्त मांडून मोकळे व्हायचो. बाबा गमतीने म्हणायचे, आमच्या घरात चार वेगळे देश आणि त्याचे चार वेगळे झेंडे आहेत.मनात आलेली कुठलीही गोष्ट बोलायला आम्हाला कधी टेन्शन वाटायचं नाही. आम्ही एका छोट्या गावात राहत होतो ,तिथे बाहेर जेवायला जाण्यासारख्या, फिरण्यासारख्या जागा नव्हत्या तरी आम्ही कित्येक तासांचा प्रवास करून हॉटेलिंग,चांगले चित्रपट ,पर्यटन करायला जात असू . रसिकता आणि अभिजात आवडी निवडी यांचे संस्कार सहजतेने पण खोलवर होत गेले. आमच्या योग्य वयात आम्हाला कोणती पुस्तकं वाचायला द्यायला हवीत याबद्दल बाबा फार जागरूक होते. त्यांनी माझ्यासाठी आणलेलं पहिलं पुस्तक म्हणजे विंदाचं 'राणीचा बाग 'नंतर 'तोत्तोचान','एक होता कोर्व्हर ', प्रकाश संताचं 'वनवास ', 'पंखा 'असं उत्तम बालसाहित्यापासून ते 'वयात येतांना ' इ . पुस्तकं ते आवर्जून वाचायला लावत.
माझ्या अठराव्या वाढदिवसाला बाबा अगदी हळवे झाले होते .संध्याकाळी आईबाबा माझ्याशी बोलत बसले. त्यांच्या मनात ते खूप दिवसापासून काय बोलायचं याची तयारी करत असावेत . "सोन्या आज तुला अठरा वर्षे पूर्ण झाली. कायद्याने तू आता सज्ञान आहेस. आयुष्याचे सगळे निर्णय तू आता घेऊ शकतेस. तुझ्या मनाप्रमाणे जोडीदारही निवडू शकतेस. तुझ्या आयुष्यातल्या एका सुंदर पर्वाला सुरुवात झाली आहे आणि आता आपण मित्र आहोत. कधीही मनापासून कोणी आवडलं तर आम्हाला सांगायला संकोचू नकोस.त्याचा जात धर्म या कशाचाही विचार न करता आम्ही तुझ्या पाठीशी उभे राहू ".या बोलण्याने त्यांनी मला प्रगल्भ बनवलं होतं . मी माझं आयुष्य नेहमीच खूप उत्स्फूर्तपणे जगले. माझ्या आयुष्याची जबाबदारी आता माझीच आहे ही गोष्ट खूप आत्मविश्वास वाढवणारी होती. पुढे माझ्या भावाच्या लग्नाच्या वेळी कोणीतरी म्हणालं "कमाल आहे तुमची आंतरजातीय लग्न स्वीकारण्याची " तर बाबा म्हणाले "त्याचा आंतरजातीय नाही प्रेमविवाह आहे. "
आम्ही पुण्याला शिकायला गेलो तेव्हा आईबाबा आणि घराशिवाय दूर राहणं फार वेदनादायी होतं . तेव्हा S T D वर रात्री ८ ते ११ कमी पैसे लागायचे. मी रोज घरी फोन करायची . आईबाबांना सांगायच्या गोष्टींची यादी भलीमोठी असायची. दूर राहण्याचा सगळ्यात सुंदर परिणाम म्हणजे आम्ही एकमेकांना पत्र लिहू लागलो . पानच्या पान खरडली जायची पण विषय संपायचे नाहीत. मी इंग्लिश लिटरेचर स्पेशल घेतलं मग तर बाबाना साहित्याचं एक नवं दालनच उघडलं. साहित्याच्या वैश्विक भाषेशी ते सहजच जोडल्या गेले. पुढे मी लिहायला लागले तेव्हा बाबांच्या आनंदाला पारावार उरला नाही. एकदा माझा एक लेख पेपरात छापून येणार होता. तो केव्हा येईल हे निश्चित नव्हते. बाबा एका महत्वाच्या कामासाठी दुसऱ्या गावी निघाले होते. ट्रेनमध्ये पेपर वाचतांना त्यांनी माझा लेख पहिला. तेव्हा मोबाईल नव्हते .बाबा सरळ ट्रेनमधून उतरून मला तो लेख दाखवायला घरी आले तेव्हा मी थक्क झाले त्यांची excitement पाहून.
मी तेव्हा थर्ड इयरला होते. सुट्ट्यात घरी होते बाबांच्या कॉलेजमध्ये इंटरव्ह्यू सुरु होते. त्यासाठी एक मुलगी आली होती माझ्यापेक्षा काहीच वर्षांनी मोठी . तिची आई माझ्या बाबांना ओळखत असल्याने तिच्याजवळ त्यांनी बाबांसाठी एक पत्र दिलं होतं पत्रात “माझ्या मुलीचे तुम्ही लोकल गार्डियन व्हा आणि जमेल ती मदत करा "असं लिहिलं होतं. ही मुलगी आपल्या नवऱ्यापासून वेगळी झालेली होती आणि तिला एक छोटी मुलगी होती. आईबाबा कायम कोणाच्याही मदतीला तयार असत . पुढे तिचं नोकरीच काम झालं आणि ती कॉलेजमध्ये रुजू झाली. आई तिला घरी येत जा ,एकटं वाटू देऊ नकोस असं सांगायची.तिच्या छोट्या मुलींसाठी घरात नेहमी एक बरणीभर चॉकलेट्स असायचे. पुस्तकं वाचण्यासाठी ,संदर्भासाठी ती घरी येऊ लागली. मी तेव्हा एम.ए. करत होते. माझ्या वडिलांचे वडील माझे आजोबा वारले. आजी अगदी धक्क्यात होती. एवढ्या वर्षांच्या सहजीवनानंतर एकटं राहणं तिला सहन होत नव्हतं . मग आईने तिच्याजवळ जाऊन राहण्याचा निर्णय घेतला.मी आणि भाऊ पुण्यात असल्यामुळे बाबा आता एकटेच होते ते आई आणि आजीला भेटायला जात असत.
ती मुलगी नंतरही आमच्या घरी येतच होती पण सगळेच तिला ओळखत असल्याने काहीच वेगळं वाटलं नाही.नंतर एक दिवस आमच्या एका शेजाऱ्यांचा आईला फोन आला आमच्या घरात काही गैर गोष्टी चालू आहेत असं सांगितलं. आईने त्या फोनची दखल न घेता पुन्हा माझ्या नवऱ्याविषयी असं बोलू नका म्हणून सांगितलं. आई तिच्या नोकरीत आणि आजीला सांभाळण्यात व्यस्त होती. बाबा आणि ती मुलगी यांच्यात नॉर्मल संबंध नाहीत असं सांगणारे आता बरेच जण भेटायला लागले. मग आईने बाबांना सरळ विचारलं तर मी तिचा पालकच आहे अशी त्यांनी खात्री दिली. कॉलेजमध्येही त्या दोघांचं वागणं सगळ्यांना खटकत होत. आईला बरेच जणांनी घरी परत यायला सांगितलं. आई परत आली तोपर्यंत परिस्थिती फार बिघडली होती. आईचा तर विश्वासच बसेना. त्या मुलीलाही तिने सरळ जाब विचारला तर ती उद्धटपणे म्हणाली,"मी तुम्हाला स्वीकारू शकते तर तुम्ही मला का नाही ?"आईचा बी. पी. लो झाला, तिला ऍडमिट करावं लागलं. आम्ही सगळेच आता धक्क्यात होतो. आमच्या सुंदर चौकोनी कुटुंबाला ग्रहण लागलं होतं.एखाद्या पोरवयातल्या मुलाने वागावं तसं बाबांचं वागणं आमच्या मनातल्या त्यांच्या प्रतिमेला न शोभणार होत. आम्हा सगळ्यांची जराही पर्वा न करता ते तुफानासोबत वाहत चालले होते. सुरुवातीला आम्ही सगळे त्यांना बसून नीट समजावून पाहत होतो. ही गोष्ट किती दूरवर वाईट परिणाम करू शकते ,आम्हाला सगळ्यांना दुखावून तुम्ही कोणतं असं सुख मिळवणार, हे तात्पुरतं आकर्षण आहे यातून काही चांगलं होऊ शकत नाही असं सगळं त्यांना आम्ही समजावून सांगत होतो .ते मात्र काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.आईची अवस्था तर फार वाईट होती.तिच्या इतक्या वर्षांच्या सहजीवनानंतरचा विश्वास चक्काचूर झाला होता. इतक्या वर्षांनी एका निवांत आयुष्यात एक वादळ आलं होत. बाबा रिटायर्मेंटच्या वयात पोहचलेले होते आणि आमचे शिक्षण पूर्ण होत आले होते. एका छताखाली राहताना आईबाबांची कसरत होत होती. नात्यातली विश्वासाची गुंफण आता शिल्लक नव्हती.कॉलेजमध्येही या दोघांच्या वागण्याला कंटाळून त्या मुलीला काढून टाकण्याचा निर्णय कॉलेज कमिटीने घेतला. बाबांनी खूप त्रागा केला. आम्हाला थोडं हायस वाटलं पण हा काही शेवट नव्हता...
त्या मुलीचे आईवडीलही एका वयस्कर माणसासोबतच्या तिच्या नात्याच्या विरोधात होते. दोन्ही घरात कल्लोळ माजला होता.बाबांनी त्या मुलीला आपल्या ओळखीने दुसऱ्या एका गावी नोकरीला लावून दिले. आणि आता त्यांच्या तिकडे चकरा सुरु झाल्या . कुठल्याही विरोधाला ते जुमानत नव्हते. आई फार हतबल झाली होती. इतकी वर्षे आम्हाला शिकवलेल्या तत्वांना ते स्वतःच मुरड घालत होते. खोटं बोलणं तर इतकं वाढलं कि त्यांची सगळी विश्वासार्हता संपून गेली. आमच्यावर इतका जीव ओतणारे बाबा इतके परके वाटू लागले. बाबांचं पिणं आता खूप वाढलं होतं.एकटे रूममध्ये बसून ते ड्रिंक घेत. त्यांचं कधीही न पाहिलेलं भयंकर रूप आता बघायला मिळू लागलं. आईशी भांडण वाढली. दोघांमध्ये सारखे खटके उडू लागले. त्यात आम्ही दोघे तिथं नाही त्यामुळे खूप काळजी वाटायला लागली. परिस्थिती इतकी तणावग्रस्त होती की आईला मारहाण तर होणार नाही ना याची काळजी वाटायला लागली. रोज सकाळी उठताच मी आईला फोन करत असे ती ठीक आहे ना एवढच मला जाणून घ्यायचं असायचं.
बाबा रिटायर झाले आणि त्यांनी आपण आता नेहमीसाठी त्या मुलीकडे राहायला जाणार असं जाहीर केलं. सगळं माहित असूनही तो क्षण खूप कठीण होता. आत्तापर्यंत साम दाम दंड भेद सगळं वापरून झालं होत आमचं.आता आमच्या नात्याची शप्पथ घालून त्यांना थांबवणं शक्य नव्हतं. एक व्यक्ती म्हणून कुठलीही सक्ती करणं पटत नव्हतं, त्यांनी बाय चॉईस आम्हाला निवडायला हवं होत. मागील काही वर्षात आम्ही सगळे इतक्या तणावातून गेलो होतो की, कुठल्या टोकाला जाण्यापेक्षा शांतपणे वेगळं होऊन नात्याची पुढची विटंबना थांबवणं आवश्यक होतं . आनंदाच्या प्रसंगात एकमेकांविषयी वाटण खूप स्वाभाविक पण माझ्या आईने दाखवलेली प्रेमाची वेगळी छटा माझ्या कायम लक्षात राहील. आईचे नातेवाईक बाबांवर कायदेशीर कार्रवाही करावी असं सुचवत होते पण आई म्हणाली ,"ज्या माणसावर मी इतकं प्रेम केलं त्याला त्रास देऊ इच्छित नाही. "
बाबा खरचंच घर सोडून निघून गेले...
आमच्या सगळ्यांच्या डोळ्यांमधून कित्येक लिटर पाणी वाहील असेल. त्या दिवशीनंतर एकही दिवस आम्ही १०० टक्के आनंदी होऊ शकलो नाही. आयुष्यात कायम एक अपूर्णता राहिली. कित्येकदा स्वतःला बाबांच्या जागी ठेवून पाहते आणि विचार करते कोणती अशी गोष्ट आहे जी मला माझ्या कुटुंबाच्यापेक्षा मोलाची वाटेल? उत्तर एकच "कोणतीच नाही". ज्या बाबांशिवाय कधी जगू असं वाटत नव्हतं त्यांचं आज कित्येक वर्षांपासून तोंडही पाहिलेलं नाही.
सिल्विया प्लाथ या कवियत्रीची एक कविता आठवते -
Daddy, I have had to kill you,
you died before I had time
Marble heavy, a bag full of God,
Ghastly statue with one gray toe,
Big as a Frisco seal...
प्रेम आणि तिरस्काराची एक संमिश्र भावना. आपण काढून टाकतो एखाद्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातून आणि ती भेटत राहते आपल्याला आपल्याच सवयीतून ,बोलण्यातून,संवेदनेतून, आठवणीतून.... मन कित्येकदा पेटून उठत बाबा का केलत असं तुम्ही?
आयुष्याच्या इतक्या उशिरा त्यांनी उचललेल्या पावलाचा क्षणोक्षणी भोग भोगतोय आम्ही . आईसाठी तर काय लिहू एका दिव्यातून जातेय ती. उतारवयात माणसाला सोबतीची जास्त गरज असते म्हणतात . या वयात हे एकटेपण तिच्यावर लादलं गेलं. सार्वजनिक जीवनात अनेक प्रश्नांना, प्रसंगांना तिला सामोरं जावं लागतं. मी आणि माझ्या भावाने तिला आमच्याकडे निघून यायला सांगितलं तर तिने ते मान्य केलं नाही, ती म्हणते ज्या गावात मी सून म्हणून आले आमचा संसार थाटला एक विश्व उभं केलं तिथून मी पळून जाणार नाही. तिचं एकटेपण आम्ही काही केलं तरी भरून काढू शकत नाही. आईची काळजी करता करता कधी मी तिची आई झालेय असं मला वाटू लागलं मला कळलंही नाही . अतिशय समजूतदारपणा दाखवत मी तिला आता तुझं आयुष्य तू वेगळ्या स्पिरिटने जग असं सांगत असे. पण एक दिवस बाबांच्या एका मित्राकडून आम्हाला बाबांबद्दल कळालं की "त्यांना मुलगी झाली... "प्रचंड धक्का बसला मला एखाद्या मूर्तीसारखी कितीक वेळ मी बसून होते. डोळे कोरडे आणि डोकं सुन्न झालेलं . आज पहिल्यांदा मला आईची वेदना खऱ्या अर्थाने कळली होती. बाबांनी आधी आईच स्थान कोणाला तरी देऊ केलं होत. आज मात्र माझ्या स्थानाला धक्का लागला होता. बाबांची मी पुम्मूशी परी असा कित्येक वर्षांचा बाळगलेला अभिमान क्षणात तुटून पडला. नंतर कित्येक दिवस मी सारखी रडत होते. यानंतर त्यांचं कधीही ना घ्यायचं नाही असं ठरवलं. आता आयुष्यात मला कोणत्याच घटनेने एवढा धक्का बसत नाही . "मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही "यासारखं फोल वाक्य या पृथ्वीतलावर नाही. कुटुंब म्हणजे तेच जिथे एकाच्या कृतीने दुसऱ्याला प्रचंड फरक पडतो. बाबा कोणत्या सुखाच्या शोधात निघाले होते आणि त्यांना ते मिळालं का नाही हे त्यांचं त्यांनाच ठाऊक पण आमच्या मनातलं, समाजातलं आदराचं स्थान ते कायमच गमावून बसले आहेत. माझं हे दुःस्वप्न अजूनही चालू आहे आणि बॅकराउंडला एक गझल चालू आहे ...
फासले ऐसे भी होंगे ये कभी सोचा न था
सामने बैठा था मेरे और वो मेरा न था ।
वर्गीकरण
..
.........
अफाट लिहिलंय !
In reply to अफाट लिहिलंय ! by डॉ सुहास म्हात्रे
+1
.......
....
निशब्दः __/\__
प्रतिसाद देण्यासाठी शब्द
हम्म
निशब्द
लैखनशैली आवडली असं म्हणेन पण
रडवलत.
रडवलत.
खरंच अफाट लिहिलंय
माझं हे दुःस्वप्न अजूनही चालू आहे- यातून बाहेर पडणं खरंच अवघड आहे पण ते तुमच्याच हातात आहे. अगदी अश्याच नाही पण यासारख्या, म्हणजे ज्या व्यक्तीला आपण आदर्श मानतो त्याच अगदी जवळच्या व्यक्तीने मोठा विश्वासघात करावा, या प्रसंगातून मी गेलो आहे आणि आता त्यातून बाहेरही पडलो आहे. विसरून जाणे आणि क्षमा करणे या दोन गोष्टी आपल्याला मिळालेली वरदाने आहेत. हे अवघड आहे पण अशक्य नाही. तुमच्या आईची नीट काळजी घ्या आणि लिहीत रहा.प्रत्येक नाण्याची एक बाजू
सुन्न!
तुमच्या भावना अगदी जश्याच्या
ताई,
In reply to ताई, by जव्हेरगंज
शब्दशः सहमत _/\_
.
माणूस कधी अचानक psychopath
In reply to माणूस कधी अचानक psychopath by Ram ram
अनंत काळचा नर म्हणा वा ....
कृपया 'ग्रॅफोलॉजी' ह्या विषयावर तपशीलवार लिहा
In reply to कृपया 'ग्रॅफोलॉजी' ह्या विषयावर तपशीलवार लिहा by रविकिरण फडके
'ग्रॅफोलॉजी'... विज्ञान आणि कला यांचा संगम!
ओके
काय प्रतिसाद द्यावा सुचत
फार उत्कटतेने लिहिले आहे. असे
रडवलत.......... निशब्द
अदीमच्या याच गजलमधील
हि वस्तुस्थिती असेल तर अतिशय
In reply to हि वस्तुस्थिती असेल तर अतिशय by सुबोध खरे
हेच म्हणतो!
अत्यंत प्रतिभावान लिखाण. गणेश
घालमेलीच्या भावना उत्तमपणे
प्रतिक्रिया काय देऊ आठवत नाही
... खूपच भावपूर्वक आहे.
ही खरंच तुमची वास्तवातली कथा
काहीही झाल तरी आपल्या आई
सुन्न
नि:शब्द.
कसलेल्या लेखिका!!
तुझ्याशिवाय जगणे .... ? .... !
In reply to तुझ्याशिवाय जगणे .... ? .... ! by गामा पैलवान
+1
निशब्द करून टाकलत ताई तुम्ही.
....
परिणामकारक लेखन .
निशःब्द..
......
!
....
सुन्न झाले.
-
उत्कृष्ट लेखन
अपेक्षा
अप्रतिम लिहिलंय.
कथा आणि मांडणी खूपच आवडली.
.......
मिपाकरांचे खूप आभार !! तुम्ही
In reply to मिपाकरांचे खूप आभार !! तुम्ही by Naval
फसवा दिलासा
अनुभव
शब्द नाहित.
मनापासून लिहिले आहे....
असाच अनुभव सध्या घेत आहे
In reply to असाच अनुभव सध्या घेत आहे by सर टोबी
तुम्ही २ - ३ वर्षांपूर्वी
शैली उत्तम आहे, हा कल्पना
पुण्यात असेच एक प्राध्यापक
कलाकाराला "काहीही माफ" असते
...
आयुष्याच्या संध्याकाळी कधीतरी
In reply to आयुष्याच्या संध्याकाळी कधीतरी by श्रीगुरुजी
एकदम समर्पक प्रतिसाद
खूप आभार, मनापासून दिलेल्या
सुन्न झाले होते वाचून.
:(
नवरा कलाकार की कलाकार नवरा
In reply to नवरा कलाकार की कलाकार नवरा by गामा पैलवान
केक ठिकाणी नाही हं, एके ठिकाणी असं वाचा बरं. -गा.पै.
यात मुलीच्य बाबाची काही चूक
उत्तम लेख पण विदारक अनुभव!
विजुभाऊ बाबांना त्यांचा
काही बाजू निसटलेल्या
In reply to काही बाजू निसटलेल्या by माहितगार
तर्काच्या कसोट्या लावायला
In reply to तर्काच्या कसोट्या लावायला by पिलीयन रायडर
हा लेख काल्पनिक नाही हे समजून
In reply to हा लेख काल्पनिक नाही हे समजून by माहितगार
तुमची मर्जी! एकदा लेख टाकला
In reply to तुमची मर्जी! एकदा लेख टाकला by पिलीयन रायडर
पिरा लेखिकेला असत्य ठरवण्यात
In reply to पिरा लेखिकेला असत्य ठरवण्यात by माहितगार
हे असत्य नाही हो.. संपूर्ण
In reply to हे असत्य नाही हो.. संपूर्ण by पिलीयन रायडर
इथे त्यांना कुणाच्या
In reply to तर्काच्या कसोट्या लावायला by पिलीयन रायडर
सहमत !
माणूस ओळखण्याच्या कसोट्या ....
In reply to माणूस ओळखण्याच्या कसोट्या .... by Duishen
या व्यक्तीने घटस्फोट घेऊन
In reply to या व्यक्तीने घटस्फोट घेऊन by माहितगार
नीती, प्रेम आणि मूल्य समर्थन...
In reply to नीती, प्रेम आणि मूल्य समर्थन... by Duishen
पण प्रश्न असा आहे की जी गोष्ट
In reply to पण प्रश्न असा आहे की जी गोष्ट by माहितगार
म्हणजे नविन व्यक्तिला जिवनात समावेश देताना....