Skip to main content

५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी व निकाल

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 09/03/2017 20:28 या दिवशी प्रकाशित केले.
५ राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी ११ मार्च रोजी आहेत. मतमोजणी व निकालांसाठी हा धागा आहे. तत्पूर्वी आज वेगवेगळ्या वृत्तसंस्थांनी केलेल्या मतदानोत्तर चाचणीचे निष्कर्ष जाहीर होत आहेत. प्रत्यक्ष निकाल व मतदानोत्तर चाचणीचे निष्कर्ष यांची तुलना करण्यासाठी धाग्यातच वेगवेगळ्या वृत्तसंस्थांनी केलेल्या मतदानोत्तर चाचणीचे निष्कर्ष देत आहे. ________________________________________________________________________________________________

१) उत्तर प्रदेश

अ) एनडीटीव्ही, इंडिया न्यूज, एमआरसी भाजप+ (१८५), सप+काँग्रेस (१२०), बसप (९०) ब) टाईम्स नाऊ भाजप+ (१९०-२१०), सप+काँग्रेस (११०-१३०), बसप (५७-७४) क) एबीपी न्यूज भाजप+ (१६४-१७६), सप+काँग्रेस (१५६-१६९), बसप (६०-७२) ड) सीएनएन-न्यूज १८ भाजप+ (१६४), सप+काँग्रेस (१२०-१४७), बसप (८१) ई) इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस भाजप+ (२५१-२७९), सप+काँग्रेस (८८-११२), बसप (२८-४२) ________________________________________________________________________________________________

२) उत्तराखंड

अ) इंडीया टीव्ही-सी व्होटर भाजप+ (२९-३५), काँग्रेस (२९-३५) ब) एनडीटीव्ही, इंडिया न्यूज, एमआरसी भाजप+ (३८), काँग्रेस (३०) क) न्यूज-२४ भाजप+ (४६-६०), काँग्रेस (८-२२) ड) इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस भाजप+ (४६-५३), काँग्रेस (१२-२१) ई) टुडेज चाणक्य भाजप+ (५३), काँग्रेस (१५) फ) सीएनएन-न्यूज १८ भाजप+ (३८), काँग्रेस (२६) ________________________________________________________________________________________________

३) पंजाब

अ) इंडीया टुडे-अ‍ॅक्सिस अकाली दल+भाजप (४-७), काँग्रेस (६२-७१), आआप (४२-५१) ब) एनडीटीव्ही, इंडिया न्यूज, एमआरसी अकाली दल+भाजप (७), काँग्रेस (५५), आआप (५५) क) न्यूज-२४ अकाली दल+भाजप (४-१४), काँग्रेस (४५-६३), आआप (४५-६३) ड) इंडिया टीव्ही-सी व्होटर अकाली दल+भाजप (५-७), काँग्रेस (४१-४९), आआप (५९-६७) ई) सीएनएन-न्यूज १८ अकाली दल+भाजप (७), काँग्रेस (५३), आआप (५७), इतर (१) ________________________________________________________________________________________________

४) गोवा

अ) इंडिया टीव्ही-सी व्होटर भाजप (१५-२१), काँग्रेस (१२-१८), आआप (०-४) ब) इंडिया न्यूज- एमआरसी भाजप (१५), काँग्रेस (१०), आआप (७), इतर (८) क) इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस भाजप (१८-२२), काँग्रेस (९-१३), आआप (०-२), इतर (४-९) ड) सीएनएन-न्यूज १८ भाजप (१९), काँग्रेस (१४), आआप (६), इतर (१)

५) मणिपूर

अ) इंडिया टीव्ही-सी व्होटर भाजप (२५-३१), काँग्रेस (१७-२३), इतर (९-१५) ब) इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस भाजप (१६-३२), काँग्रेस (३०-३६), इतर (३-५) ________________________________________________________________________________________________ इंडियन एक्स्प्रेसचे सुरजित भल्ला यांनी स्वतःचा वेगळा अंदाज दिला आहे. २०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत भल्ला यांनी भाजप+ (६०) व संजद+ (१७५) असा अंदाज दिला होता. तो अत्यंत अचूक ठरला होता. त्यांच्या अंदाजानुसार खालील चित्र असेल. http://indianexpress.com/article/opinion/columns/uttar-pradesh-assembly…

वाचने 30053
प्रतिक्रिया 158

प्रतिक्रिया

उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष याक्षणी ५८ जागांवर आघाडीवर आहे. पक्षाचा हा फार मोठा पराभव झाला आहे. यापूर्वी सपा एकदाच १०० पेक्षा खाली गेला होता-- २००७ मध्ये ९७ जागा. त्यापेक्षाही प्रचंड मोठा पराभव झालेला दिसत आहे. ल्युटिन्स दिल्लीमधील मिडियामध्ये अखिलेख यादव कसे 'विकासपुरूष' आहेत, कसे लोकप्रिय आहेत इत्यादी इत्यादी लिहिले जात होते. आणि कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही तर सपा-काँग्रेस युती पहिल्या क्रमांकावर असेल असे वातावरण निर्माण केले जात होते. या मिडियाचा लोकांबरोबरचा कनेक्ट किती तुटला आहे हेच या निमित्ताने समजून येत आहे. भाजप ३०० ते ३१० च्या मध्ये स्थिरावेल असे दिसते. दुपारी १२ नंतर आकड्यांमध्ये बहुतेक वेळा फार बदल होत नाहीत. हा अभूतपूर्व विजय आहे, त्सुनामी आहे वगैरे म्हणणेही अंडरस्टेटमेन्ट ठरेल.

उत्तर प्रदेशात काँग्रेसला किती आणि सपला किती जागा मिळाल्या?

वेलिंगकरांमुळे गोव्यात भाजपचा पराभव होतोय. त्यांना मगोप व शिवसेनेने साथ दिली. शिवसेना या सापाला कितीही दूध पाजलं तरी तो भाजपला डसणारच हे भाजपच्या अजूनही लक्षात आलेलं दिसत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

गोव्यातले गणित वेगळे आहे. मगो आणि भाजपाची युती तुटली तेव्हाच काँग्रेस फायद्यात असणार हे स्पष्ट झाले होते. त्यातच ८०% हून जास्त मतदान होते तेव्हा ते प्रस्थापित सरकारच्या बहुधा विरोधात जाते. गोव्यात भाजपाची पीछेहाट होण्याची आणखी काही कारणे म्हणजे पार्सेकर हे पर्रीकरांसारखे अजिबात लोकप्रिय नाहीत. एखादेवीळी श्रीपाद नाईकांचे नाव पुढे आले असते तरी चित्र वेगळे दिसले असते. माध्यम प्रश्नावरून भाजपाला वेगळा निर्णय घेणे शक्य नव्हते मात्र त्या निर्णयाचा जोरदार फटका भाजपाला बसला आहे. आणि यापुढच्या सर्व सरकाराना हा प्रश्न सतावणार आहे. आताचे आकडे आणि नावे पाहता भाजपा अजूनही कडबोळे बांधून सरकार बनवू शकेल असे वाटते आहे. मात्र ते सरकार खूप अस्थिर असेल आणि इतर लहान पक्षांच्या ब्लॅकमेलला किती प्रमाणात तोंड देऊ शकेल सांगता येणार नाही. कदाचित ५ वर्षात पाच पन्नास सरकारेही बघायला मिळतील! =))

In reply to by पैसा

एखादेवीळी श्रीपाद नाईकांचे नाव पुढे आले असते तरी चित्र वेगळे दिसले असते.
हो ना. जर मिपावरील माझा हा प्रतिसाद भाजपच्या नेतृत्वाने वाचला असता तर आज ही वेळ आली नसती :) :) :) जोक्स अपार्ट. मला वाटले होते की आआप भाजपविरोधी मतांमध्ये फूट पाडेल आणि भाजपला निवडणुक त्यामानाने सोपी जाईल. अन्यथा या निवडणुका भाजपसाठी हरायच्याच निवडणुका ठरल्या असत्या. पण आआपने भाजपविरोधी मते फार खाल्लेली दिसत नाहीत.
कदाचित ५ वर्षात पाच पन्नास सरकारेही बघायला मिळतील! =))
१९९० च्या दशकात गोव्यात जी प्रचंड राजकीय अस्थिरता होती त्याची पुनरावृत्ती बघायला मिळणार का? :(

In reply to by गॅरी ट्रुमन

पर्रीकर गोव्यात परत यावेत असे मात्र मला अजिबात वाटत नव्हते. कदाचित एखादे वर्ष दिले असेल. नंतर पुन्हा निवडणुका होतील. बघू.

ट्रुमन साहेब - काँग्रेस करता प्रशांत किशोर पण चालले नाही म्हणावे काय ? पण पंजाबात तर चाललेले दिसतात यूपी मधे मात्र सफाया.

In reply to by मोहन

ट्रुमन साहेब - काँग्रेस करता प्रशांत किशोर पण चालले नाही म्हणावे काय ? पण पंजाबात तर चाललेले दिसतात यूपी मधे मात्र सफाया.
याचे कारण या पूर्वी प्रशांत किशोरने मुळातली चांगली प्रॉडक्ट मार्केट केली होती-- २०१४ मध्ये मोदी आणि २०१५ मध्ये नितीश कुमार. त्यामुळे अनेकांना प्रशांत किशोरमुळे मोदींनी आणि नितीश कुमारांनी निवडणुक जिंकली असे वाटू लागले होते. अर्थातच सत्य परिस्थिती नक्कीच तशी नव्हती. असे वाटणार्‍यांना मी नेहमीच म्हटले होते-- २०१४ मध्ये मोदी लाट होती. ती प्रशांत किशोर लाट नव्हती. त्यामुळे प्रशांत किशोर या फॅक्टरला प्रमाणाबाहेर महत्व दिले जाऊ नये. चांगले प्रॉडक्ट कोणीही मार्केट करू शकेल. खरे आव्हान होते राहुल गांधी हे प्रॉडक्ट कसे मार्केट करायचे हे. त्यातल्या त्यात पंजाबमध्ये अमरिंदरसिंग लोकप्रिय होतेच. २०१४ मध्ये त्यांनी मोदीलाटेत अरूण जेटलींचा स्वतःच्या पारंपारीक नसलेल्या मतदारसंघातून (अमृतसर) पराभव केला होता. त्यामुळे प्रशांत किशोरचा उपयोग पंजाबात झाला. पण मुळातले प्रॉडक्टच बोगस असेल तर त्याचा काही उपयोग होणार नाही :) त्यामुळे उत्तर प्रदेशात मार खावा लागला.

गोव्यात कासवाच्या गतीने निकाल/कल येत आहेत. आता २८ जागांचे निकाल/कल उपलब्ध आहेत. त्यापैकी काँग्रेस १३ जागांवर तर भाजप ९ जागांवर पुढे आहे. इतर ६ जागांवर पुढे आहेत. या चार इतरांमध्ये बाणावलीमधून चर्चिल आलेमाव (यावेळी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणुक लढवत आहे) चा समावेश आहे. उत्तर गोव्यातील बरेच कल आले आहेत तर दक्षिण गोव्यातील बरेच कल यायचे आहेत. त्यातच माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत (मडगाव) यांच्या जागेचाही समावेश आहे. एकूणच भाजपला दक्षिण गोव्यात फार अपेक्षा ठेवता येणार नाहीत. तेव्हा गोव्यात काँग्रेस जिंकणार असे वाटते. आआपने नेहमीप्रमाणे फेसबुक आणि ट्विटरवर जोरदार आघाडी उघडली होती. नुसते तेवढे फॉलो केले तर कोणाला वाटू शकेल की आआपमध्ये गोव्याची लाट होती. अर्थातच तसे काही नव्हते. नेहमीप्रमाणे मोदींच्या सभेला रिकाम्या खुर्च्या कशा आहेत हे दाखवून द्यायला सभा सुरू होण्यापूर्वी २-४ तास आधीचे फोटो ट्विटरवर पोस्टही करून झाले. पण अर्थातच अशा गोष्टींचा प्रभाव मतदारांवर पडत नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

नुसते तेवढे फॉलो केले तर कोणाला वाटू शकेल की आआपमध्ये गोव्याची लाट होती.
हे गोव्यामध्ये आआपची लाट होती असे एखाद्याला वाटेल असे वाचावे. गलतीसे मिश्टेक हो गया.

निवडणूक लढवली नसती तर पंजाब मध्ये फार फरक पडला असता भाजप ला . उत्तर प्रदेश मध्ये निवडणूक जिंकणं खायचं काम नाही आहे . अनेक जातीय समीकरण जुळवावी लागतात . कारणं काहीही असो पण आज क्लीन स्वाईप भाजप कडून . तेही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित न करता . हे महत्वाचं (व्यक्तिशः मला आज मणिपूर मध्ये भाजप जिंकावी असे वाटत आहे . )

याक्षणी पंजाबमध्ये आआप २५ जागांवर आघाडीवर आहे. या पराभवानंतर तरी केजरीवालांचे विमान जमिनीवर येईल का हा पण प्रश्नच आहे. दिल्लीत अभूतपूर्व विजय मिळाल्यानंतर सगळीकडे आपल्याला तसाच विजय मिळेल अशी अपेक्षा केजरीवालांची असावी. पण अर्थातच तसे काही झालेले नाही. एन.डी.टि.व्ही वर थोड्या वेळापूर्वी आआपच्या एका नेत्याने म्हटले: "Virat Kohli can't hit a double century in every match he plays. If he fails to hit a double century, that doesn't mean that he is a bad batsman." त्यावर विक्रम चंद्राने म्हटले: "If someone hits a century in one match , we can't really call him Virat Kohli" त्यावर त्या आआपच्या नेत्याचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. ल्युटिन्स दिल्लीमधील मिडिया अशी 'विटी' वक्तव्ये हजरजबाबीपणे देऊ शकतो :) केजरीवालांपुढे आता पंजाबात पक्ष एकत्र ठेवायचे आव्हान आहे. इतकेच नाही तर पुढच्या महिन्यात दिल्ली महापालिकांच्या निवडणुकांचे मोठे आव्हान आहे. दिल्ली महापालिकांमध्ये भाजप गेल्या १० वर्षांपासून सत्तेत आहे आणि इतर कुठल्याही महापालिकेप्रमाणे दिल्लीतील महापालिकांचा कारभारही अकार्यक्षम आणि भ्रष्ट आहे. काँग्रेसची अवस्था दयनीयच आहे. अशा परिस्थितीत या तिनही महापालिका जिंकायची चांगली संधी आहे. या निवडणुका २०१५ प्रमाणे आआपने स्वीप केल्या नाहीत (आणि थोडक्यात विजय मिळवला) तरी तो एका अर्थी आआपचा पराभवच समजला जाईल. आणि समजा आआपला या निवडणुका जिंकता आल्या नाहीत तर मात्र तो फारच मोठा धक्का असेल. एकूणच २०१५ नंतर केजरीवालांचे विमान उंचच उंच उडत होते. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचे काम सोडून इतर सगळ्या गोष्टींमध्ये विनाकारण नाक खुपसणे त्यांनी सतत चालूच ठेवले होते. कधी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे माग, कधी पंतप्रधान मोदींना सायकोपाथ म्हण, सतत मोदीनामाचा जप कर हे प्रकार केजरीवालांचे चालूच होते. कधीकधी वाटते की मोदीजी हे जर कुठल्या धर्मात देवाचे नाव असते तर तो देव सगळे कामधंदे सोडून केजरीवालांना दर्शन द्यायला धावत आला असता इतके मोदीजी या नावाचे नामस्मरण केजरीवालांनी केले असेल!! परवा महिलादिना निमित्तही ट्विटरवर शुभेच्छा देताना "मोदींनी स्त्रियांना आदर न देणार्‍या सगळ्यांना ट्विटरवर अनफॉलो करावे" असा अनाहूत सल्ला देऊन टाकला. अरे लेका, तुला कोणी विचारले आहे? तुझे काम सोडून इतर गोष्टींमध्ये कशाला नाक खुपसायला जातोस? मतदारांना हे सगळे समजत नव्हते असे अजिबात नाही. त्यामुळे आपण विश्वासार्ह नाही हे चित्र स्वतः केजरीवालांनीच उभे करायला मदत केली. पंजाबच्या मतदारांनी त्याला अनुसरूनच मत दिलेले दिसते. यातून केजरीवाल काही धडा घेतात का हेच बघायचे.

गोव्यात आता ३१ जागांचे कल आले आहेत. काँग्रेस आणि भाजप दोघेही प्रत्येकी १२ जागांवर पुढे आहेत. तर अपक्ष आणि इतर ७ जागांवर पुढे आहेत. काँग्रेसचे गोव्यातील मोमेन्टम थोडे कमी झालेले दिसते. पोरिएममधून माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे, वाळपोईमधून त्यांचे पुत्र विश्वजित राणे, फोंड्यामधून माजी मुख्यमंत्री रवी नाईक, मडगावमधून माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत हे सगळे काँग्रेसचे नेते आघाडीवर आहेत किंवा विजयी झाले आहेत.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांनी दोन जागांवरून निवडणुक लढवली होती आणि दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झाला आहे.

पार्सेकर हरल्याने दिल गार्डन गार्डन हो गयेला हय. खांग्रेस गोवा फोरवर्ड आणि अपक्ष मिळून सरकार स्थापन करू शकतात मगो उड्या मारण्यात एक्षपर्ट आहे

In reply to by प्रीत-मोहर

दिल गार्डन गार्डन हो गयेला हय.
वा वाक्प्रचार आवडला. वापरायला पाहिजे कधीतरी :)

सध्या ९ ठिकाणी भाजप ९ ठिकाणी खांग्रेस १ मगो ३ गोवा फोरवर्ड जिंकलेत. बाकी काउंटिंग जारी हय

मायावतीने, स्वत:च्या पराभवाचे खापर EVM मशीन वर फोडले आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे EVM वरिल कोणतेही बटन दाबले तरी मत भाजपाला जात होते.

In reply to by प्रसाद_१९८२

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल आल्यानंतरही असे आरोप झाले आहेत. फेसबुकवर पुरोगाम्यांनी ते शेअरही केले होते. कसे असते की दिल्लीमध्ये, बिहारमध्ये भाजपचा सपाटून पराभव झाला तर ई.व्ही.एम एकदम परफेक्ट असतात.महाराष्ट्रातही ठाण्यातील ई.व्ही.एम परफेक्ट असतात. पण उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपने जोरदार विजय मिळवला तर मात्र मशीनमध्ये काहीतरी झोल असतो. ठाणे सोडून इतर शहरांमधील मशीनमध्येही झोल असतो. याला म्हणतात गिरा तो भी टांग उपर.

In reply to by गॅरी ट्रुमन

>>> महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल आल्यानंतरही असे आरोप झाले आहेत. फेसबुकवर पुरोगाम्यांनी ते शेअरही केले होते. मिपावरही असले आरोप तिथूनच आले असावेत, पुरावे मागितल्यावर मात्र "चौकशी सुरु आहे" छाप उत्तरे मिळाली.

(निकालापुर्वी) पंजाबात आपची सत्ता आल्यास केजरीवाल, उप्र मध्ये अमित शहा मुख्यमंत्री होऊ शकतील असे वाचण्यात आले. एका राज्याचा रहिवासी असलेला नागरीक दुसर्‍या राज्याचा मुख्यमंत्री होण्याची प्रोसेस काय असते?

In reply to by वामन देशमुख

एका राज्याचा रहिवासी असलेला नागरीक दुसर्‍या राज्याचा मुख्यमंत्री होण्याची प्रोसेस काय असते?
भारतात नागरिकत्व केवळ देशाचे नागरिकत्व असते. राज्यांचे नागरिकत्व नसते. त्यामुळे कोणीही २५ वर्षापेक्षा जास्त वय असणे वगैरे अटी पूर्ण करणारा भारतीय नागरिक कुठूनही निवडणुक लढवू शकतो. दुसर्‍या राज्यातून विधानसभेत निवडून गेल्यास इतर कोणत्याही आमदाराप्रमाणे मुख्यमंत्री/मंत्री व्हायचा अधिकार अशा आमदारांनाही असतो. आणि समजा मुख्यमंत्री होताना आमदार नसल्यास सहा महिन्यात निवडून यावे लागते. सुषमा स्वराज १९७७ आणि १९८७ मध्ये हरियाणात देवीलाल यांच्या मंत्रीमंडळात मंत्री होत्या. त्या १९९८ मध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या. एकेकाळी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री असलेल्या उमा भारतींनी २०१२ मध्ये उत्तर प्रदेशातील चरखारी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवून उत्तर प्रदेश विधानसभेत प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांना भाजपने मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून जाहिर केले होते. १९९३ मध्ये हरियाणात माजी मंत्री असलेल्या एकाचा विजय राजस्थान विधानसभेवर झाला होता (त्या विजयी उमेदवाराचे नाव आणि मतदारसंघ विसरलो). याव्यतिरिक्त इतर उदाहरणेही असतील ही शक्यता आहेच पण मला ती माहित नाहीत.

गोव्यात आता ३६ जागांचे कल आले आहेत. त्यात १६ जागांवर काँग्रेस, १२ जागांवर भाजप आणि ८ जागांवर इतर आघाडीवर/विजयी झाले आहेत. या ८ मध्ये विजय सरदेसाई यांचा गोवा फॉरवर्ड पक्ष ३, भाजपने पाठिंबा दिलेला अपक्ष १ , राष्ट्रवादी काँग्रेस १ (चर्चिल आलेमावची बाणावली) तर ३ जागांवर म.गो.पक्ष पुढे आहे. गोव्यात परत एकदा घोडेबाजाराचा काळ येणार असे दिसते. भाजपला १ अपक्षाचा पाठिंबा मिळेल तसेच गोवा फॉरवर्ड पक्षाच्या ३ आमदारांचा पाठिंबा मिळाला तर हा आकडा १६ वर जाईल. तर राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन काँग्रेस १७ वर जाईल. म.गो.पक्ष कुठल्या बाजूला जातो हे बघायचे. मणीपूरमध्ये आता ५७ जागांपैकी भाजप २५ वर, काँग्रेस २४ वर तर इतर ८ जागांवर पुढे आहे. भाजपने काँग्रेसला मणीपूरमध्ये मागे टाकले आहे असे आताचे चित्र आहे.

उत्तर प्रदेश मध्ये 'राष्ट्रीय' पक्ष असलेल्या कॉंग्रेजची अवस्था, गठबधंन करुनही अतिशय दारुण आहे, १०० + जागा लढवून हि अवघ्या ७ जागा निवडणुन आल्यात त्यांच्या. कॉंग्रेजच्या ह्या पराभवाने एक गोष्ट सिध्द झाली की कॉंग्रेज ज्याही पार्टी बरोबर जाईल ती पार्टी बुडतेच.

पण पक्षाचा खरा अंदाज पाहायचा असेल तर आज मणिपूर मध्ये भाजप जिंकावी . काहीच नसताना अंदाज असा होता कि भाजप जिंकेल .

In reply to by वरुण मोहिते

हो ना मणीपूर जिंकण्यात अपयश आले आहे. त्यामुळे मोदींची लाट वगैरे असे काहीच नाही आणि ती लाट केवळ मिडियामध्ये आणि कॉर्पोरेटमध्ये आलेली आहे हे त्यातून सिध्द होत आहे.

पंजाबमध्ये आता काँग्रेस ७६, आआप २३ आणि अकाली दल-भाजप १८ अशी स्थिती आहे. बहुतेक सर्व सर्वक्षणांनी अकाली दल-भाजप युतीला जास्तीत जास्त ७ जागांचा अंदाज दिला होता. परंतु प्रत्यक्षात या युतीला थोड्याशा जास्त जागा आहेत. एका वृत्तसंस्थेने काँग्रेस व आआप यांना प्रत्येकी ५५ व दुसर्‍या वृत्तसंस्थेने दोन्ही पक्षांना प्रत्येकी ५४ जागा मिळतील असा अंदाज दिला होता. सुरजित भल्लांनी काँग्रेस ५६ व आआप ४८ असा अंदाज दिला होता. अजून काही अंदाजानुसार काँग्रेस (६२-७१) व आआप (४२-५१) आणि काँग्रेस (४१-४९) व आआप (५९-६७) असे अंदाज होते. हे सर्व अंदाज बर्‍याच प्रमाणात चुकले. काँगेसला अंदाजापेक्षा बर्‍याच जास्त जागा मिळत आहेत तर आआपला खूपच कमी जागा मिळत आहेत. आपल्याला किमान ९०-१०० जागा मिळतील असा प्रचार मागील वर्षभर केजरीवाल करीत होते. गोव्यात सुद्धा आपल्या पक्षाला किमान ३० जागा मिळतील असा त्यांचा दावा होता. गोव्यासाठी अत्यंत जातीयवादी भूमिका घेऊन त्यांनी मुद्दाम जाहीररित्या आपण ख्रिश्चन मुख्यमंत्री देत आहोत असे सांगितले होते. दिल्लीचे मुख्यमंत्री असताना सुद्धा विशेषतः मागील ७-८ महिन्यात ते फार थोडा काळ दिल्लीत होते. त्यांनी पंजाब, गोवा व गुजरात मध्ये बरेच दौरे केले. सुवर्णमंदीरात पहाटे ४ वाजता जाऊन आधीच घासून ठेवलेली ताटे विसळण्याची नौटंकी केली. पंजाबला नशामुक्त करण्याचे आश्वासन देताना भगवंत मान सारख्या दारूड्याला प्रमुख प्रचारक म्हणून नेमले याच्यात त्यांना काहीही विसंगती वाटली नाही. रोज ट्विटरच्या माध्यमातून मोदींवर व्यक्तिगत हल्ले करणे, सिनेमांबद्दल अभिप्राय लिहिणे, मोदींचे कपडे मोजणे, पुराव्याशिवाय वाटेल ते बेछूट आरोप करणे, मोदींनी आपल्या पत्नीला व आईला आपल्या घरी आणून ठेवावे असे अनाहूत व्यक्तिगत सल्ले देणे आणि हे करताना दिल्लीकडे पूर्ण दुर्लक्ष करणे अशा त्यांच्या उचापत्या सुरू होत्या. आपल्या पक्षाला एखाद्या टॅब्लॉईडच्या पातळीला त्यांनी आणले आहे. जेटलींविरूद्ध भ्रष्टाचाराचे आरोप (अर्थातच बिनबुडाचे) केल्यानंतर जेटलींनी बदनामीचा खटला दाखल केल्यानंतर केजरीवालांनी न्यायालयात आधी भूमिका घेतली की जेटली निवडणुक हरल्यामुळे त्यांना सामाजिक प्रतिष्ठाच नाही आणि त्यामुळे माझ्या आरोपांमुळे त्यांची बदनामी होऊच शकत नाही. इतका विचित्र बचाव आजवर कोणीही केल्याचे ऐकिवात नाही. हा बचाव न्यायालयात चालत नाही हे समजल्यावर त्यांनी एक नवीनच मागणी केली. जेटलींनी १९९९ पासून आजतगायत भरलेले आयकर रिटर्न्स, त्यांच्या सर्व बँक खात्याची माहिती व त्यात किती शिल्लक आहे ही माहिती, त्यांनी बॅक खात्यातून केलेल्या मागील १५ वर्षातील सर्व व्यवहारांची माहिती मला हवी आहे अशी मागणी त्यांनी सत्र न्यायालयात केली. ही माहिती अत्यंत व्यक्तिगत असून ती तुम्हाला मिळणार नाही हे सांगतानाच 'तुम्ही मुद्दाम वेळकाढूपणा करून खटल्याला विलंब करीत आहात' असा न्यायालयाने शेरा मारला. या निर्णयाविरूद्ध केजरीवाल उच्च न्यायालयात गेल्यावर उच्च न्यायालयाने देखील ही मागणी नाकारली. आता ते बहुतेक सर्वोच्च न्यायालयात जातील व खटल्याला अजून विलंब करण्याचा प्रयत्न करतील. ज्या आधारावर तुम्ही जेटलींवर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते आधी पुढे आणा ना. परंतु अत्यंत सडकी मनोवृत्ती आणि जन्मजात नौटंकी अंगात असलेला हा माणूस या जन्मात सुधारेल असे वाटत नाही. अशा माणसाच्या पक्षाचा पंजाब व गोवा या दोन्ही ठिकाणी पराभव होत आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. पंजाबमध्ये आआपला बहुमत मिळाले तर केजरीवाल दिल्लीच्या गादीवर मनीष सिसोदियांना बसवून आपल्याला पंजाब मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवतील असे देखील बोलले जात होते. पंजाबी लोकांना शीख नसलेला मुख्यमंत्री अजिबात मान्य झाला नसता. पंजाब व हरयानामध्ये सतलज-यमुना कालवा पाणीवाटप हा अत्यंत वादाचा मुद्दा आहे. केजरीवाल पंजाबमध्ये जाऊन पंजाबची हरयानाला पाणी न देण्याची भूमिका योग्य आहे असे प्रमाणपत्र द्यायचे तर हरयानात जाऊन कालव्याचे पाणी हरयानाला मिळालेच पाहिजे अशी पूर्णपणे विरूद्ध भूमिका घ्यायचे. यांच्या या परस्परविरोधी भूमिका जनता पाहत होती. आआपला ज्या २३ जागांवर आघाडी आहे त्यातील २१ जागा माळव्यातील आहेत. पंजाबमधील ११७ जागांपैकी माळव्यात ६९ जागा असून उर्वरीत दोन भागात ४८ जागा आहेत. उर्वरीत ४८ जागांपैकी फक्त २ जागांवर आआपला आघाडी आहे. म्हणजे माळवा वगळता पंजाबमध्ये आआपला स्थान मिळालेले नाही.

In reply to by श्रीगुरुजी

तसेच राम जेठमलानी अरूण जेटलींना कसे प्रश्न विचारत आहेत हे केजरीवाल आणि राघव चढ्ढासारखे फालतू लोक ट्विटरवर पोस्ट करत होतेच पण आआपचे समर्थकही शेअर करत होते. गंमत म्हणजे राम जेठमलानीसारखा माणूस एकेकाळी भाजपमध्ये असताना असा माणूस भाजपला कसा चालतो हे विचारणारेच लोक राम जेठमलानी कसा केजरीवालांचा बचाव करत आहेत याचे गुणगान करत आहेत. म्हणजे असे करण्यात काही विसंगती आहे हे त्यांच्या गावीही नसते.

ताजी स्थिती - १) गोवा - काँग्रेस १६, भाजप १५, मगोप+ ३, इतर ४ २) मणिपूर - काँग्रेस २३, भाजप २२, इतर ८ ३) पंजाब - कॉंग्रेस ७८, अकाली दल १४ + भाजप ३, आआप २० ४) उत्तराखंड - कॉंग्रेस ११, भाजप ५७ ५) उत्तर प्रदेश - भाजप ३२२, सप + कॉंग्रेस ५५, बसप २१

काँग्रेस १०५ जागा लढवून फक्त ६ जागांवर पुढे आहे. २०१२ मध्ये सर्व ४०३ जागा लढवून काँग्रेसला २८ जागा मिळाल्या होत्या. २००७ मध्ये २२ तर २००२ मध्ये २५ जागांवर काँगेसला विजय मिळाला होता. एकंदरीत उ. प्र. मध्ये काँगेस संपल्यातच जमा आहे. सपने काँगेसला लायकीपेक्षा खूप जास्त जागा दिल्या हे आता स्पष्ट झाले आहे. काँग्रेसची लायकी जास्तीत जास्त ४०-५० जागांची असताना अखिलेशने तब्बल १०५ जागा देऊन घोडचूक केली होती. उ.प्र. च्या इतिहासात ३००+ जागा कोणत्याही पक्षाला मिळाल्या असतील का याविषयी शंका आहे.

In reply to by श्रीगुरुजी

घ्या तुमच्या शंकेचे निरसन करा ............ ३०० च्या वर जागा मिळालेल्या आहेत की नाहीत आजवर कोणाला . source : आजचा दि.११ मार्च दै. लोकमत

गोव्यात आता काँग्रेस १७, भाजप १४, मगोप+ ३ व इतर ४ अशी स्थिती आहे. भाजपने हे राज्य गमावले आहे असे चित्र आहे. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व मगोपचे तगडे नेत दीपक ढवळीकर पराभूत झाले. सुभाष वेलिंगकरांनी कॉन्व्हेंट शाळांना दिल्या जाणार्‍या अनुदानाच्या विरूद्ध भूमिका घेऊन रा. स्व. संघ व भाजपविरूद्ध बंड करून स्वतःचा वेगळा पक्ष निर्माण करून त्यात मगोप व शिवसेनेला सामील करून भाजपची मतपेटी फोडण्याचे काम केले. यात त्यांना पराभव पत्करावा लागलाच पण भाजपचाही पराभव करण्यात ते यशस्वी झाले. आता भाजपऐवजी काँग्रेस सत्तेवर आली तरी हे अनुदान बंद होण्याची सुतराम शक्यता नाही. उलट ख्रिश्चन मतदारांना चुचकारण्यासाथी ख्रिश्चन मतदारांना अजून जास्त प्रलोभने दाखविली जातील. भाजपविरूद्ध बंड करून वेलिंगकरांनी काय मिळविले याचा आता त्यांनी विचार करावा. केजरीवालांप्रमाणे उधोजींना मोदी जळीस्थळीकाष्ठीपाषाणी दिसतात. त्यामुळे त्यांनी लगेच गोव्यात उडी घेऊन भाजपविरूद्ध निवडणुक लढविली. २०१५ मध्ये बिहारमध्येही सेनेने ५० उमेदवार उभे केले होते. शिवसेना हा शरद पवारांप्रमाणेच अत्यंत विश्वासघातकी पक्ष आहे. या निवडणुकीच्या अनुभवावरून निदान आता तरी भाजपने महाराष्ट्रात शिवसेनेची व पंजाबात अकाली दलाची साथ पूर्ण सोडून स्वबळावर वाटचाल करावी.

भाजपाचे अभिनंदन. चांगलीच बाजी मारली म्हणायची.

ब्रेकिंग न्यूज : 105 पैकि 63 प्रतिसाद देवून गॅरी ट्रुमन यांचा दणदणीत विजय,गुरूजींच्या बालेकिल्याला खिंडार!

In reply to by निष्पक्ष सदस्य

:))

पाच राज्यांपैकि तीन राज्यांत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे,पंजाबमध्ये स्पष्ट बहुमत तर गोवा आणि मणिपूर मध्ये सरकार बनवण्याची संधी आहे. पण उत्तर प्रदेश ही सर्वात मोठी विधानसभा असल्याने आणि तिथे भाजपने तीनशेच्या पार मजल मारल्याने इतर ठिकाणचे काँग्रेसचे यश झाकोळले गेले आहे.

गॅरी ट्रुमन यांचे हार्दिक आभार! टीव्हीवरच्या आकड्यांपेक्षा फास्ट तुमचे आकडे अपडेट होत होते! उत्तरप्रदेशच्या निर्णयाने एक गोष्ट स्पष्ट आहे, यापुढे कुठल्याही निवडणूकीत पक्षांनी मतदारांना गृहीत धरू नये. पंजाबमध्ये आआपचा उडालेला धुव्वा आवडल्या गेलेला आहे. उत्तराखंडात अपेक्षित निकाल! गोवा - तुला न मला घाल काँग्रेसला असा प्रकार! मणिपूर, अजून थोडा जोर लावला असता तर भाजपला जमलं असतं पण बहुदा ऊत्तरप्रदेशवर लक्ष केंद्रित केल्यामुळे असेल. असो भाजपचं आणि काँग्रेसचं अभिनंदन!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

अहं, गोव्यातही मतदारांना गृहीत धरू नये हेच सांगितले लोकांनी :) (गोवन) प्रीमो

त्सुनामि नाहि हो हे त्यापेक्षा जबरदस्त काहि तरी आहे,. आज ईतनि मयस्सर भि नहि मयखाने मे.....जितनि हम छोड दिया करते थे पैमाने मे.... १०५ जागा काँग्रेस साठि सोडुनहि सपा + काँग्रेस ६० चा आकडा पार नाहि करु शकले. प्रतिक्रिया तर बहनजी ह्यांचि पाहण्यासारखि होति..... अखिलेश ने त्यामानाने बरिच परिपक्वता दाखवली पत्रकार परिषदेत.
पण आस्मादिकास आज सगळ्यात जास्त आनंद दिला तो पंजाब विधान सभा निकालाने. १) पुर्ण बहुमताच सरकार तयार होतय आणि २) युगपुरुष आणि मंडळिना पंजाबि जनतेने ठेंगा दाखवुन जबरदस्त तोंडघशी पाडलय. आसुरी आनंद म्हणा हव तर... पण बेक्कार हलकलानछाप्पु केलय आपटार्ड ना. ह्या सुरक्षेच्या द्रुष्टिने संवेदनशिल राज्यात जर युगपुरुष आणि मंडळिं सारखे थोर विचारवंत (जंत ?) आले असते तर ह्यानि काय धिंगाणा घातला असता कल्पनाही करवत नाहि.
लोकशाहित जसे कठिण निर्णय घ्यायला सरकार कडे डिसिजिव्ह मेजॉरिटि आवश्यक असते तसाच एक सक्षम विरोधि पक्ष हि आवश्यक असतो पण सध्यातरी असा कोणि दावेदार दिसत नाहि आहे. काँग्रेस आपल्या रा.रा. राहुल प्रेमामुळे ते पोटेंशियल कधिच गमावुन बसलिय, आणि आज जसे काँग्रेस चे थोर विचारवंत श्रियुत दिग्विजय सिंग म्हणाले कि आता राहुल गांधि ह्यांनि पक्षाचे अध्यक्षपद स्विकारुन पक्षाला दिशा दाखवावि तेव्हा NDTV वर रविश आणि ते पाहताना आणि ऐकताना मि फक्त बेशुध्द व्हायच बाकि होतो. रा.रा. राहुल गांधि म्हणजे लिमिट है यार ...माणसाने किति हस करुन घ्याव ह्याला काहि मर्यादा असतात :))

In reply to by सचु कुळकर्णी

पण आस्मादिकास आज सगळ्यात जास्त आनंद दिला तो पंजाब विधान सभा निकालाने.
पूर्ण सहमत आहे. मलाही उत्तर प्रदेशइतकाच पंजाबचाही आनंद झाला आहे. मिपावर दोनेक महिन्यांपूर्वीच पंजाबमध्ये काँग्रेसचा विजय व्हावा असे मला वाटते असे लिहिले होते. माझ्यासारखे वाटणारे कित्येक लोक होते/आहेत. या सगळ्यांवरच आपटर्ड्स टिका करायला लागले आहेत. कसे असते, बिहारमध्ये भाजपचा पराभव झाला याचा या पुरोगाम्यांना आणि आपटर्ड्सना आनंद झाला नव्हता का? लालूसारख्या तद्दन फालतू माणसाला यांच्याच युगपुरूषांनी जाहिरपणे मिठी मारली होती त्याचे काय? मग यांचीच दवा यांना कोणीतरी कधीतरी खिलवणारच. मग तक्रार करून चालायची नाही. पंजाबमध्ये आपचा पराभव का झाला यामागे आपल्यासारखे वाटणारे अनेक लोक सामील आहेत. अकाली दलाचा विजय होणे जवळपास अशक्य होते हे पंजाबी हिंदू मतदारांना समजले नव्हते असे नक्कीच नाही.अशावेळी काँग्रेस आणि आआप हे दोन पर्याय यापूर्वी भाजपला मते देणार्‍या पंजाबी हिंदू मतदारांपुढे होते. केजरीवाल कट्टर खलिस्तानवाद्यांविषयी सहानुभूती बाळगून आहेत असे चित्र उभे राहिलेच होते. प्रचारादरम्यान एका खलिस्तानी दहशतवाद्याच्या घरी त्यांनी रात्रभर मुक्काम ठोकला होता हे पण सगळ्यांना समजले. तसेच मतदानाच्या ४-५ दिवस आधी बठिंडाजवळ बॉम्बस्फोट झाला. १९८० च्या दशकात खलिस्तानी दहशतवादाचे चटके पंजाबी हिंदूंनीच सोसले होते. त्यामुळे तसे काही परत व्हायची थोडीशीही शक्यता निर्माण झाली आहे हे बघता पंजाबी हिंदूंनी मोठ्या प्रमाणावर काँग्रेसला मते दिली आहेत.

आणि हो लवकरच युगपुरुष "बद्रिनाथ कि दुल्हनिया" ह्यावर आपले अमुल्य समिक्षण ....ओके ओके रसग्रहण म्हणा हव तर...तेच ते देणारा आहेत :))

कॉंग्रेसचा अमेठीतील सर्व ५ जागांवर व रायबरेलीतील ५ पैकी ३ जागांवर पराभव. १० पैकी ६ भाजपने, २ जागा कॉंग्रेसने व २ सप ने जिंकल्या.

मायवतींची राज्यसभा टर्म संपतिये फुडल्या वर्षी. परत निवडून येण्याइतके आमदार नाहीत त्यांच्याकडे.

गोव्यात काँग्रेस मोठा पक्ष ठरून पण भाजप सत्तेत येईल असं दिसतंय. पर्रीकर गोव्यात परत येणार आणि त्यांना मगोप / फॉरवर्ड आदी पक्ष पाठिंबा देणार. माझ्या मते भाजपने काही काळ तरी विरोधात बसायला हवे होते. काँग्रेस कडे पण स्पष्ट बहुमत नाही आणि अंतर्गत गटबाजी आहे तेव्हा काँग्रेस ने सरकार बनवले असते तरी ते ५ वर्ष टिकेल याची शाश्वती नव्हतीच. केंद्रात सरंक्षण मंत्री (कॅबिनेट) हे केव्हाही गोव्या सारख्या लहान राज्याच्या मुख्यमंत्री पदापेक्षा मोठे पद आहे मात्र खुद्द पर्रीकरच गोव्यात परंतु इच्छितात तर कोण काय करणार ? त्यांना परत आमदार होणे हेही आलेच. २०१४ मध्ये मोदी सरकार आल्यावर बरेच दिवस फुल टाइम सरंक्षण मंत्री नव्हता (जेटलींकडे अतिरिक्त पदभार होता). आता पर्रीकर गेले तर लवकर नवीन मंत्री नेमावा.

In reply to by दुश्यन्त

लहान पक्ष पर्रीकरांच्या नावावर अडून बसले असणार हे एक. आणि हे सरकार पाच वर्षे रहाणार नाही. लोकसभेसोबत गोव्यात पुन्हा विधानसभा निवडणुका घेतल्या जातील. ही तात्पुरती व्यवस्था वाटते आहे. या लोकांनी पुन्हा निवडणुका होईपर्यंत सरकार भाजपचे असावे हा विचार केलेला असणार.

In reply to by पैसा

हे जे लहान पक्ष आहेत ते लोकसभेबरोबर निवडणूक घ्यायला तयार होतील का? समजा बीजेपीने २०१९ ला राजीनामा दिला तर हे पक्ष काँग्रेसला पाठिंबा देऊन नवीन सरकार कशावरून आणणार नाहीत? आता काही ठिकाणी पर्रीकरांनी अजून राजीनामा दिलाच नाही अशी पण बातमी आहे. भाजपने उत्तराखंड /अरुणाचल मध्ये केली तशी घाई इथे करू नये. ४० आमदार असणाऱ्या सभागृहात कधी कुठले सरकार येईल हे खरे नसते. गोव्याला तर मोठा इतिहास आहे अल्पावधी सरकारांचा !

In reply to by दुश्यन्त

आतातरी येणार्‍या बातम्यांवरून हा माझा प्राथमिक अंदाज आहे. अजून एक शक्यता म्हणजे काँग्रेसच्या निवडून आलेल्या मंडळीत किती माजी मुख्यमंत्री आहेत याचा विचार केला तर काँग्रेसमधल्याच काहीजणांना सरकार बनवण्यात किंवा टिकवण्यात स्वारस्य नसावे अशी शंका येत आहे. कारण कोणा एकाला मुख्यमंत्री केले तर दुसरे कोणीतरी पक्ष फोडतील ही शक्यता काँग्रेसच्या बाबतीतही आहे. त्यामुळे हा सगळ्यांनाच सोयीचा पर्याय दिसतो आहे.

In reply to by दुश्यन्त

गोव्यातील मतदारांनी स्पष्टपणे भाजपच्या विरूद्ध कौल दिलेला आहे. मतदारांनी भाजपच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांबरोबर इतर ४ मंत्री व एकूण ८ आमदारांना घरी पाठविले आहे. जरी काँग्रेसच्या बाजूने स्पष्ट कौल नसला तरी भाजपच्या विरूद्ध स्पष्ट कौल आहे. त्यामुळे गोव्यात भाजपने विरोधी पक्षातच बसणे योग्य ठरेल. सत्तेसाठी धडपड करणे ही चूक ठरेलच, परंतु मुख्यमंत्रीपदासाठी पर्रीरकरांना केंद्रातून परत बोलाविणे ही घोडचूक ठरेल. पर्रीकर संरक्षण मंत्रीपदावर चांगले काम करीत आहेत (फक्त त्यांनी आपले तोंड बंद ठेवायला हवे कारण गेल्या काही महिन्यात ते अनेक वादग्रस्त विधाने करीत आहेत). जॉर्ज फर्नांडिस यांच्या नंतर तब्बल १० वर्षांच्या कालावधीनंतर भारताला एक कार्यक्षम संरक्षणमंत्री लाभला आहे. मोदी सरकारमध्ये जे काही मोजके कार्यक्षम मंत्री आहेत त्यात पर्रीकरांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांना केंद्रातून परत पाठवून गोव्यासारख्या अत्यंत लहान राज्यात सीमित करणे योग्य होणार नाही. गोव्याप्रमाणे मणिपूरमध्ये देखील भाजपने विरोधी पक्षातच बसणे योग्य ठरेल.

In reply to by श्रीगुरुजी

गोव्याप्रमाणे मणिपूरमध्ये देखील भाजपने विरोधी पक्षातच बसणे योग्य ठरेल.+१ सहमत. बाकी पर्रीकर खूप धडाडीचे नेते आहेत ,आयआयटीयन आहेत पण काही वेळेस नाही ते बरळून टीकेचे धनी झाले आहेत. त्यांनी गडकरींचा आदर्श ठेवावा ते पण बोलायला मोकळे ढाकळे आहेत पण केंद्रात गेल्यापासून तोंडावर कंट्रोल आहे आणि कामाला वाघ तर आधीपासूनच आहेत. कदाचित पर्रीकरांना कुणाच्या हाताखाली काम करायला नको वाटत असेल.पण जोडतोड सरकारमध्ये त्यांना मागच्या टर्म सारखे स्वातंत्र्य असणार नाही. मुळात देशाचा सरंक्षण मंत्री ते २०-२२ आमदार घेऊन मुख्यमंत्री ही पदावनतीच आहे.

गोव्यात भाजपला ४० पैकी फक्त १३ जागा मिळाल्या तर काँग्रेसला १७ मिळाल्या. परंतु काँग्रेसला एकूण मतांपैकी २८.४% मते मिळाली असून भाजपला काँग्रेसपेक्षा तब्बल ४.१% जास्त मते मिळाली आहेत (३२.५%). तरीसुद्धा भाजपला काँग्रेसपेक्षा ४ जागा का कमी मिळाल्या हे समजत नाही. २०१२ च्या तुलनेत काँग्रेसने २.४% मते गमाविली तर भाजपने २.२% मते गमाविली. मगोपने २०१२ मध्ये ६.७% मते मिळविली होती, परंतु २०१७ मध्ये ११.३% मते मिळविली. परंतु २०१२ प्रमाणे २०१७ मध्ये सुद्धा मगोपचे फक्त ३ आमदार निवडून आले. वेलिंगकरांचा गोवा सुरक्षा मंच व शिवसेना यांच्याबरोबर युती असूनसुद्धा व मतांमध्ये ४.६% वाढ करूनसुद्धा मगोपला आपल्या आमदारांच्या संख्येत अजिबात वाढ करता आली नाही. एका बातमीनुसार शिवसेनेने ४ जागा लढवून एकूण ७०० पेक्षा कमी मते मिळविली. हे जर खरे असेल तर शिवसेनेने विनाकारण गोव्यात भाजपच्या विरूद्ध लढून काय मिळविले हे समजत नाही. सुभाष वेलिंगकरांनी मुद्दाम गोवा सुरक्षा मंच स्थापन करून भाजपविरूद्ध निवडणुक लढवून भाजपला पाडण्याचे काम केले. त्यांचा स्वतःचा एकही आमदार निवडून आला नाही. आता तर त्यांनी आपला पक्ष विसर्जित केल्याचे वाचले. मग इतका अट्टाहास करून काय मिळविले? इंग्लिश माध्यमांच्या शाळांना दिले जाणारे अनुदान थांबवावे या मागणीसाठी त्यांनी संघातून बाहेर पडून भाजपविरूद्ध निवडणुक लढवून 'न तुला न मला घाल काँग्रेसला' अशी स्थिती निर्माण केली. नवीन येणारे सरकार काँग्रेसचे असले तरी त्यांची मागणी मान्य होण्याची सुतराम शक्यता नाही. एकंदरीत सुभाष वेलिंगकर, मगोप आणि महाराष्ट्राचे केजरीवाल/पप्पू यांनी गोव्यात भाजपचे पाय ओढण्यातच धन्यता मानली.

In reply to by श्रीगुरुजी

शिवसेना ही भाजपाची एमायएम आहे. एमायएम काँग्रेस/सपाची मुस्लिम मतं फोडते असा समज आहे. सेना तेच काम भाजपाविरुद्ध करते. उत्तर प्रदेशातपण सेनेने निवडणुका लढवल्या आहेत. एका ठिकाणी हजारहून जास्तं मतं घेतली हे पाहिलय.

In reply to by अनुप ढेरे

बरोबर. बिहारमध्येही सेनेने ५० जागा लढवून एका जागेवर दुसर्‍या क्रमांकाची मते मिळवून भाजप उमेदवाराच्या पराभवाला हातभार लावला होता. भाजपने महाराष्ट्रात शिवसेना व पंजाबमध्ये अकाली दलाच्या जोखडातून मान सोडवून घेऊन पूर्णपणे स्वतंत्र उभे राहिले पाहिजे. शिवसेना जुलै २०१७ मधील राष्ट्रपती व उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपबरोबर दगाबाजी करून भाजपविरोधी उमेदवाराला मते देणार हे निश्चित आहे. २०१९ मध्ये सुद्धा लोकसभा व विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढणार हे नक्की. दरम्यानच्या काळात महाराष्ट्राचे पप्पू व केजरीवाल (उधोजी आणि राऊत) 'सामना'तून भाजपविरूद्ध विखारी प्रचार सुरू ठेवणार हे नक्की. काँगेस व राष्ट्रवादीचा बाहेरून पाठिंबा घेऊन शिवसेना महाराष्ट्रात स्वत:चे सरकार स्थापन करण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही कारण या तीनही पक्षांचे एकत्रित १४६ आमदार आहेत. अशा पक्षाला तातडीने ठोकर मारून गरज पडल्यास महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकीला सामोरे जायची तयारी भाजपने ठेवली पाहिजे.

In reply to by श्रीगुरुजी

महाराष्ट्रात सेनेला बरोबर घेणे हि भाजपची मजबुरी आहे. सेनेला वगळून सुरुवातीला सरकार चालवून पाहिले पण लोकांच्या रोषाला सामोरे गेल्यावर फडावणीसांनी सेनेला सरकारमध्ये घेणे गरजेचे आहे हे दिल्लीला पटवून दिले. आतापण सेनेला जास्त डिवचायला नको म्हणून मुंबई मधून भाजपने माघार कशासाठी घेतली ? मध्यावधी लागल्या तर भाजपला पण सोप्या नाहीत. नगरपालिका महानगरपालिका वगैरे मध्ये सत्तारूढ पक्षाला अनुकूल मतदान झाले पण झेडपी मध्ये काँग्रेस -एनसीपीची कामगिरी इतकी पण वाईट नाही. २०१४ ला भाजप एनसीपीच्या सेटिंग मुळे सगळे वेगळे लढले आता काँग्रेस -एनसीपी एकत्र लढतील तर भाजप (+ छोटे पक्ष) आणि शिवसेना (कदाचित सेना मनसे ) वेगवेगळे लढतील यात भाजपला आहे त्या जागा राखणे अवघड होईल . सरकार मध्ये परत भाजप सेनाच येईल.भाजप एवढी रिस्क घेणार नाही . दुसरीकडे सेनेला खरेतर विरोधी पक्षात राहणे जास्त फायद्याचे होते मात्र सलग १५ वर्ष सरकार बाहेर आणि आमदार एकजूट ठेवण्यासाठी उद्धवना सरकारमध्ये जावे लागले. एकत्र राहणे भाजप आणि शिवसेनेची मजबुरी आहे.

In reply to by कपिलमुनी

काय मुनी.. असे एकदम ठरवून दिल्यासारखे का प्रतिसाद येत आहेत..? मोघम आरोप करण्याची पद्धत जुनी झाली आता. विखारी प्रचाराची व्याख्या काय..? गुरुजी कोणत्याही परिस्थीतीमध्ये भाजपाचे समर्थन करत असले तरी त्यांनी पातळी सोडली आहे किंवा शिवीगाळ केली आहे असे दिसून आले आहे का..? वाट्टेल ते लॉजिक लाऊन निष्कर्ष काढणे, त्याच लॉजिकने निघालेले पण स्वतःला अडचणीत असणारे निष्कर्ष नाकारणे, शिवीगाळ करणे, खोटी माहिती देवून मुद्दाम दिशाभूल करणे वगैरे प्रकार मिपावर झाले आहेत. स्वत:ला न आवडणारी पार्टी जिंकल्यावर हवेत आरोप करायचे आणि पुरावे मागितले की वैयक्तीक हल्ले करून पळून जायचे असलेही प्रकार झाले आहेत. हे तुमच्यालेखी विखारी प्रचारात येत नाहीत का..?

In reply to by मोदक

मागे एका धाग्यात केजरीवालांचे जोरदार समर्थन करताना त्यांनी किमान १०-१२ वेगवेगळ्या प्रतिसादात माझा "खोटारडा" असा सातत्याने उल्लेख केला होता. मला कावीळ झाली आहे असादेखील त्यांनी निष्कर्ष काढला होता. अर्थातच त्यांच्या दृष्टीने यात विखारी काहीही नसावे.

In reply to by श्रीगुरुजी

गोव्यात भाजपला ४० पैकी फक्त १३ जागा मिळाल्या तर काँग्रेसला १७ मिळाल्या. परंतु काँग्रेसला एकूण मतांपैकी २८.४% मते मिळाली असून भाजपला काँग्रेसपेक्षा तब्बल ४.१% जास्त मते मिळाली आहेत (३२.५%). तरीसुद्धा भाजपला काँग्रेसपेक्षा ४ जागा का कमी मिळाल्या हे समजत नाही.
सर्वात जास्त मते मिळणारा उमेदवार विजयी होतो या पध्दतीमध्ये अनेकदा हे बघायला मिळते. एखाद्या पक्षाची मते थोड्या प्रदेशात एकत्रित झाली असतील तर त्या पक्षाला कमी मते मिळूनही जास्त जागा मिळू शकतात. पण त्याउलटे मते अधिक प्रमाणात विखुरलेल्या पक्षाला जास्त मते मिळूनही कमी जागा मिळू शकतात. २००९ मध्ये लोकसभेत भाजपला देशात १८% मते पण जागा ११६ पण २०१४ मध्ये काँग्रेसला देशात १९% मते तरी जागा ४४ च मिळाल्या. याचे कारण भाजपची मते काही राज्यांमध्ये एकवटली आहेत तर काँग्रेसची मते बर्‍याच राज्यांमध्ये विखुरलेली आहेत. उत्तर प्रदेशातही सपा पेक्षा बसपाला एक टक्का मते जास्त आहेत तरी जागा बर्‍याच कमी आहेत कारण बसपाची मते विखुरलेली आहेत. गोव्याचा विचार केला तर असे का झाले हे समजून येईल. भाजपला काँग्रेसपेक्षा ४% मते जास्त दिसत असली तरी गोवा हे लहान राज्य आहे हे लक्षात घेता या दोन पक्षांमधील मतांमध्ये अंतर ३७,८३० मते आहे. त्यापैकी भाजपने काँग्रेसपेक्षा सुमारे ८,४०० मते एकाच मतदारसंघात-- कुंभारजुआ मतदारसंघात घेतली आहेत (एकूण ४१% चे मताधिक्य). एकंदरीतच भाजपचे उमेदवार जिंकले आहेत ते बर्‍याच मताधिक्याने जिंकले आहेत (अल्डोनामध्ये सुमारे २१% नी, कळंगूटमध्ये १९% नी, कुडचाडेमध्ये ४२% नी, मये मध्ये २०%, म्हापसामध्ये ३५% नी वगैरे). भाजपचा पराभव झाला आहे त्या मतदारसंघांमध्ये इतक्या मताधिक्याने पराभव झालेला नाही (काणकोणमध्ये साडेसात टक्क्यांनी, कुंकोळीमध्ये ६% नी, फातोर्ड्यात ६% नी वगैरे). नाही म्हणायला भाजपचा मुरगावमध्ये विजय १% पेक्षा कमी मतांनी झाला तर मान्द्रेमध्ये २५% नी पराभव झाला. पण अशा मतदारसंघांची संख्या त्यामानाने कमी. त्यामुळे जिथे जास्त मताधिक्याने विजय मिळाला तिथे तेवढी जास्त मतांची टक्केवारी वाढली. पण जिथे पराभव झाला तिथे काँग्रेसला थोड्याच अधिक मताधिक्यामुळे एक जागा पदरात पडली.
सुभाष वेलिंगकरांनी मुद्दाम गोवा सुरक्षा मंच स्थापन करून भाजपविरूद्ध निवडणुक लढवून भाजपला पाडण्याचे काम केले.
गोवा सुरक्षा मंचाचा भाजपला त्रास होईल असे वाटले होते. पण तसे निकालात दिसत नाही. गोवा सुरक्षा मंच किंवा शिवसेनेमुळे भाजपला एकही जागा गमावावी लागलेली नाही. म.गो.पक्षाने मात्र आपली मते लक्षणीय प्रमाणात वाढवली आहेत. इतकी वर्षे म.गो.पक्ष उतरणीला लागलेला पक्ष होता आणि गेली काही वर्षे ढवळीकर बंधूंवरच त्यांची भिस्त होती. यावेळी प्रियोळमधून दीपक ढवळीकरांचा पराभव झाला तरीही मडकईमधून सुदीन मडकईकरांनी आपला गड राखला. इतकेच नव्हे तर पेडणे आणि सावर्डे या दोन आणखी जागाही त्यांनी जिंकल्या. या दोन जागांवर १९९४ नंतर प्रथमच म.गो.पक्षाने विजय मिळवला आहे. १३% मते मिळाल्यास फार जागा मिळत नाहीत. तिरंगी लढतीत बर्‍यापैकी जागा मिळवायच्या असतील तर किमान २५% ते २७% मते हवीत.

उ.प्र. मध्ये २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने फक्त १५% मते मिळवून फक्त ४७ जागा जिंकल्या होत्या. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला तब्बल ४२% मते व ८० पैकी ७३ जागा मिळाल्या होत्या. २०१७ मध्ये भाजपने ३९.८% मते मिळवून तब्बल ३२४ जागा जिंकल्या आहेत. भाजपची अंदाजे २.२% मते घटली. बसपने २०१४ च्या तुलनेत २% मते जास्त मिळविली. सपने सुद्धा २% मते जास्त मिळविली, परंतु काँग्रेसने २०१२ च्या तुलनेत (७.५%) दीड टक्का मते गमाविली (६%). सप + काँग्रेसने एकूण एकत्रित २८% मते मिळविली तर बसपने २२% मते मिळविली. परंतु भाजपने सप-काँग्रेसच्या तुलनेत तब्बल १२% मते जास्त मिळविल्याने त्यांना तब्बल ८०% जागा जिंकता आल्या. २०१९ मध्ये विधानसभेची व मुख्यमंत्रीपदासाठी मारामारी नसल्याने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उ. प्र. मध्ये सप व बसप यांची युती होईल असे मला वाटते. काँग्रेस अर्थातच त्यांच्यात सामील होईल. सप व बसप या दोघांसाठीही आता अस्तित्वाची लढाई आहे. दोन्ही पक्षांच्या नाकापर्यंत पाणी आलेले आहे. दोघे विरूद्ध लढले तर पुन्हा एकदा २०१४ ची पुनरावृत्ती होऊ शकेल या भीतिने दोन्ही पक्ष राजद व संजद प्रमाणे लोकसभेसाठी मतभेद विसरून एकत्र येऊ शकतील. कदाचित २०१८ मध्ये मायावतीच्या राज्यसभेच्या खासदारकीची मुदत संपल्यानंतर युतीची पूर्वतयारी म्हणून सप आपल्याकडील जास्तीची मते बसपला देऊन मायावतीला राज्यसभेवर निवडून यायला मदत करेल. २०१८ मध्ये उ. प्र. चे राज्यसभेतील १० खासदार मुदत संपल्यामुळे निवृत्त होत आहेत. त्यात मायावतीचा समावेश आहे. राज्यसभेवर पुन्हा एकदा निवडून येण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला विधानसभेतील किमान ३७ खासदारांची मते मिळवावी लागतील. सपकडे ४७ व काँग्रेसकडे ७ आमदार असून मायावतीकडे १९ आमदार आहेत. या तिघांची एकूण संख्या ७३ असून त्यांचे जास्तीत जास्त २ खासदार निवडून येऊ शकतात. सप व काँग्रेसचा एकत्रित एकच खासदार निवडून येऊ शकतो. जर हे तीन पक्ष एकत्र आले नाहीत तर दुसरा खासदार भाजपचा असेल. ते टाळण्यासाठी सप मायावतीला मते देऊन निवडून आणू शकतो. मायावतीचे खरे शत्रुत्व मुलायम सिंहशी आहे. अखिलेशबरोबर तिचे तेवढे शत्रुत्व नाही. त्यामुळे अखिलेश व मायावती आणि काँग्रेस एकत्र येऊ शकतात व तसे झाले तर भाजपला २०१४ ची पुनरावृत्ती करणे अत्यंत अवघड असेल कारण या तिघांची एकत्रित मते ५०% हून अधिक आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

मला देखील पहिले धक्का बसला होता, पण आता मला फार काही अयोग्य वाटत नाही. मझ्या मते ती परिस्थिती अशी होती. १. मगोप हे तसेही भाजपाचे भागीदार होते. यावेळी त्यांनी युती मोडली, पण ते तसेही सत्तेतील भागीदारच होते, त्यामुळे त्यांचा पाठिंबा अपेक्षित होताच. त्यामुळे भाजपा मुळातच १३ + ३ =१६ होताच. २. गोवा फोरवर्ड वगैरे पक्षांना भाजपाबरोबर जाणे तसे हिताचे होते. त्यामुळे त्यांनी जर स्वतःहून भाजपाला संपर्क करून पाठिंबा देऊ केला असेल तर तो भाजपाने नाकारणे किंवा आडमुठी भूमिका घेणे (केवळ आम्ही फार नैतिक आहोत म्हणून) हा आतबट्ट्याचा व्यवहार ठरला असता. त्यामुळे भाजपाने केले त्यात फार काही चुकीचे केले असे वाटत नाही

In reply to by आनन्दा

दोन्ही बाजू आहेत. काँग्रेसवाले पण वेळेत नेता निवड /आघाडी करू शकले नाहीत ती त्यांची चूक आहेच. बाकी भाजपने पण कुणाला फोडले नाही. छोटे पक्ष स्वतः येतात कोण काय करणार पण ते नंतर वाटेल तेव्हा कोलांटी पण मारू शकतात. प्रतिष्ठा आणि काहीहीकरून जास्तीत जास्त राज्ये काबीज करायची हा भाजपचा प्लान असू शकतो म्हणून पर्रीकर फौजदारकी सोडून हवालदार होत आहेत. पर्रीकर गोवा फॉरवर्ड पार्टीच्या विजय सरदेसाईना 'फिक्सर' म्हणतात त्यांनीच हे सरकार पण फिक्स केले असेल तर नैतिकता वगैरे गप्पा मारू नयेत. नाहीतरी महाराष्ट्रात पण प्रचारात 'एनसीपी - न्याचुरली करप्ट पार्टी' म्हणत सेटिंग केलेलेच होते आता गोव्यात पण 'फिक्सर'ला बरोबर घेतलेच आहे, शिवसेना-भाजप प्रचारात एकमेकांना दूषणे देताना काही हातचे ठेवत नाहीत मात्र नंतर एक होतात. थोडक्यात सब घोडे बारा टक्के!