मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मसालेभात

शाल्मली · · पाककृती
साहित्य:- १ वाटी बासमती तांदूळ अर्धी वाटी चौकोनी आकारात चिरलेला कोबी (ऐच्छिक) १ लहान भोपळीमिरची चौकोनी आकारात चिरून मूठभर मटाराचे दाणे ३ मोठे चमचे कोरडं खोबरं १ चमचा धने, जिरे, ३/४ लवंगा, काळी मिरी लहान तुकडा दालचिनी १ चमचा दही १०-१२ काजू २-३ हिरव्या मिरच्या ५-६ कढिपत्त्याची पाने १ इंच आलं - किसून १ चमचा गोडा आणि गरम मसाला १ चमचा साखर चवीनुसार मीठ २ मोठे चमचे तेल फोडणीचे साहित्यः- मोहरी, जिरे, हिंग, हळद, तमालपत्र. कृती:- तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास निथळत ठेवावेत. एका कढल्यात कोरडं खोबरं, धने-जिरे, लवंग काळीमिरी, दालचिनी असे वेगवेगळे भाजून घ्यावे आणि गार झाल्यावर मिक्सरमधून काढावे. एका गॅसवर २ वाट्या पाणी गरम करण्यास ठेवावे. कूकरमधे तेल गरम करून मोहरी, जिरं, हिंग, हळद, तमालपत्र घालून फोडणी करून घ्यावी. त्यात हिरवी मिरची, किसलेलं आलं घालावे. का़जू घालून ते चांगले परतून घ्यावेत. त्यात कोबी, भो.मिरच्यांचे तुकडे, मटाराचे दाणे घालून चांगले परतून घ्यावे. आता त्यात भिजवलेले तांदूळ घालून चांगले परतून घ्यावे. त्यात मिक्सरमधून वाटून घेतलेला मसाला घालावा. आता यात चांगले गरम झालेले पाणी घालावे. या मिश्रणाला उकळी आली की त्यात गोडा मसाला, गरम मसाला, फेटलेले दही, १ चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घालावे. कुकरला झाकण लावून २ शिट्ट्या होऊ द्याव्यात. भात मुरल्यावर एका ताटात भाताची मूद पाडून त्यावर ओलं खोबरं, कोथिंबीर आणि तूप घालून गरम असतानाच फस्त करावा. :) टीप:- मसालेभातात शक्यतो हिरवी मिरचीच घालावी. तिखट घातल्याने रंग बदलतो. असा गरम गरम भात आणि त्याबरोबर टोमॅटोचे सार एकदम झकास लागते. --शाल्मली.

वाचने 8868 वाचनखूण प्रतिक्रिया 21

शंकरराव Tue, 02/17/2009 - 19:18
फोटो आवडला फक्त भातावर चा तो मधला (तो गटणे स्टाईल च्यायनीज पदार्थ ओळखा ...)खाद्या पदार्था ऍवजी मस्त कोथीबीर टाकली तर लई बेस्ट दिसेल अन चवीला बी झकास लागेल

In reply to by शंकरराव

शाल्मली Wed, 02/18/2009 - 15:47
शंकरराव, भातावर खोबरं घालून त्यावर काजू ठेवला आहे.
कोथीबीर टाकली तर लई बेस्ट दिसेल
नक्कीच.. तसे कृतीमध्ये सांगितले आहेच.. पण काय करणार आमच्या इथे कोथिंबीर मिळतेच असं नाही. म्हणून मी वरून कोथिंबीर घातली नाही. :) --शाल्मली.

सहज Tue, 02/17/2009 - 19:23
अरे वा आता केला पाहीजे. फक्त भोपळी मिरचीपेक्षा तोंडली असलेला मसालेभात "ऑथेंटीक" वाटतो मला. :-) कोबीदेखील अनैच्छीक :-)

In reply to by सहज

शाल्मली Wed, 02/18/2009 - 15:51
फक्त भोपळी मिरचीपेक्षा तोंडली असलेला मसालेभात "ऑथेंटीक" वाटतो मला.
तोंडली घालूनही मसालेभात छानच लागतो. तश्या ह्या भातात फ्लॉवर, कोबी, भो.मिरची, वांगी कोणत्याही भाज्या छानच लागतात. डाळिंब्या घालूनही हा भात मस्त लागतो.
कोबीदेखील अनैच्छीक
ओक्के. मग तुम्ही कोबी वगळूनच टाका.. :) --शाल्मली.

प्राजु Tue, 02/17/2009 - 19:26
वाटलेला मसाला आणि पुन्हा गरम मसाला?? हे दोन्ही घातलं तर एकदम घशाला जळजळीत नाही का वाटणार? कारण वाटणात काळी मिरी, लवंग आणि दालचिनी आहेच ना. भाताचा रंग एकदम छान आला आहे. भाज्यामध्ये, फ्लॉवर, गाजर, मटार, भोपळी मिरची, कोबी.. जितक्या असतील तितक्या छान लागतात. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by खादाड_बोका

शाल्मली Tue, 02/17/2009 - 19:58
गोडा मसाला आणि गरम मसाल्यामध्ये काय फरक आहे ??
गोडा मसाला म्हणजेच काळा मसाला जो भाजी-आमटीसाठी वापरतात. आणि गरम मसाला म्हणजे लवंग, मिरी, दालचिनी, धने, जिरे, शहाजिरे, वेलदोडा यापासून करतात तो. आणि वाटणात लवंग, मिरी, दालचिनी हे पदार्थ वाटणात असल्याने गरम मसाला घालताना त्या अंदाजाने घालावा. अथवा चव बघून मग त्या प्रमाणात घालावा. --शाल्मली.

सुनील Tue, 02/17/2009 - 20:51
पाकृ आणि फोटो सुंदर. गरम मसाला जर थोडा परतला गेला तर त्याचा स्वाद चांगला येतो. म्हणून, गरम मसाला फोडणीत आणि उकळी आली की गोडा मसाला, असा बदल केला तर? भोपळी मिरची सोबतच वांगीदेखिल चालू शकतील, असे वाटते. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

रेवती Tue, 02/17/2009 - 21:28
आज काय विशेष शाल्मलीबाई? ही पाकृ न आवडणारा माणूस(ह्यात बायकाही आल्या) विरळाच! आज एकदम मसालेभात, जिलबी असे पदार्थ मिपावर बघून भारतात असल्यासारखं वाटतय. मीही मसालेभात जवळजवळ अश्याच पद्धतीने करते. गरम मसाला किंचितच घालते. भाज्याही बदलून कधी कोबी तर कधी तोंडली घालते (जी भाजी असेल ती..). फोडणीनंतर घातलेला प्रत्येक पदार्थ चांगला परतला जाणे महत्वाचे नाही का?:) फोटू छान आलाय. गरम भाताबरोबर टोमॅटोचं सार.;) छानच. रेवती

In reply to by रेवती

वल्लरी Wed, 02/18/2009 - 08:14
मीही मसालेभात जवळजवळ अश्याच पद्धतीने करते. गरम मसाला किंचितच घालते. भाज्याही बदलून कधी कोबी तर कधी तोंडली घालते (जी भाजी असेल ती..). फोटू छान आलाय असेच म्हणते,,, :) ---वल्लरी

विसोबा खेचर Tue, 02/17/2009 - 22:38
फोटू पाहून शेवटच्या घटका मोजू लागलो..! पाकृ आणि फोटू, दोन्हीही जबरा...! :) शाल्मलीतै, येऊ द्यात प्लीज अजूनही अश्याच बहारदार पाकृ! तात्या.

रामोजी Wed, 02/18/2009 - 00:42
व्वा..तोंडाला पाणि सुट्ले. पण भाता वरती घात्लेल्या 'सॉसेज' ची पाक्रू कुठे आहे :)

In reply to by रामोजी

बाप्पा Wed, 02/18/2009 - 14:44
सॉसेज नव्हे रामोजी ते. मला तर तो किसलेला नारळ आणी त्यावर तळलेला काजु दिसतोय. सॉसेज मांसाहारी पदार्थ आहे आणि सॉसेजच्या शक्यतो चकत्या असतात.

सर्किट Wed, 02/18/2009 - 14:04
लिखाळशेट, मज्जा चाल्लीये. -- सर्किट

स्वाती राजेश Wed, 02/18/2009 - 17:32
रेसिपीही छान आहे...त्यात कांदा-लसूण नसल्यामुळे नैवेद्याच्या ताटामधे याचे स्थान असायचे, माझी आई नेहमी असाच भात करते, पण फक्त मटार, आणि कोबी किंवा तोंडली वापरते..गरम मसाला वापरत नाही..त्यामुळे हा भात कमी तिखट लागतो. घशाला त्रास होत नाही..

चित्रा Wed, 02/18/2009 - 18:25
मस्त दिसतोय मसालेभात! फोटो पाहून (बहुतेक सर्व लग्नांच्या) आठवणी जागृत झाल्या.

शितल Wed, 02/18/2009 - 20:28
शाल्मलीताई, पाककृती मस्तच आणि फोटो तर सुंदरच.. आम्ही असा मसालेभात सोलकढी बरोबर खातो. मस्त लागतो. :)