Skip to main content

सखे ठोठावते आहेस कुठले दार देहाचे?

लेखक ॐकार यांनी सोमवार, 16/02/2009 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्यावाचून संध्याकाळ माझी लांबली होती तुझ्या पदरात सोनेरी उन्हे मी बांधली होती सुखाची काळजी काही करावी लागली नाही मुळी दु़:खेच माझी दीनवाणी, गांजली होती भले झाली असावी वेळ झोपेची, कसा झोपू? तुझ्या डोळ्यांतली स्वप्ने मगाशी भांडली होती सखे ठोठावते आहेस कुठले दार देहाचे? अशी ही कोणती इछा? कुठे मी डांबली होती? सुदैवाने तिला प्रेमात हे कळलेच नाही की बरा होतो जरासा मी, तशी ती चांगली होती खरे तर चंद्र केव्हाचा मला विसरून गेलेला कधीची चांदणी दारात माझ्या टांगली होती तुझ्या सोईप्रमाणे हातचे धरलेस तू मजला स्वतःची आकडेवारी कुठे मी मांडली होती?

वाचने 2820
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

तुझ्या सोईप्रमाणे हातचे धरलेस तू मजला स्वतःची आकडेवारी कुठे मी मांडली होती? खल्लास! एक अत्यंत सशक्त व दर्जेदार काव्य वाचल्याचा आनंद मिळाला. ओंकारा, जियो..! या सुंदर काव्याकरता तुला माझ्याकडून एका संध्याकाळी दारू सप्रेम भेट! भेटू लौकरच पुण्यात..! :) तात्या.

छान गजल !! येउ देत अजुन देखील !! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

तुझ्या सोईप्रमाणे हातचे धरलेस तू मजला स्वतःची आकडेवारी कुठे मी मांडली होती? ++++++++++++++++ मस्तच .... --अवलिया

In reply to by अवलिया

सुंदर गजल! हातच्याचा शेर विशेष आवडला. चतुरंग

छान रे ॐकार .. आवडली गझल.

आवडली गझल !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मतल्याचा शेर आवडला खूपच... >> तुझ्या सोईप्रमाणे हातचे धरलेस तू मजला स्वतःची आकडेवारी कुठे मी मांडली होती? हा शेरही खूप आवडला. --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com