कुठे शोधिशी रामेश्वर अन् कुठे शोधिशी काशी . . . .
एकोणनव्वद सालची गोष्ट. स्वीट टॉकरीणबाई आणि आठ महिन्याच्या पुनवला घेऊन मी बोटीवर रुजू होण्यासाठी कलकत्त्याला गेलो. (हल्ली मूल दोन वर्षाचं झाल्याशिवाय बोटीवर नेता येत नाही. तेव्हां नियम वेगळे होते. आम्हीही young and stupid होतो.) मात्र खराब हवामानामुळे बोट काही दिवस बंदरात येवू शकणार नव्हती. मी ग्रेट ईस्टर्न शिपिंग कंपनीमध्ये नोकरी करीत होतो. कलकत्त्याला आमच्या कंपनीचं गेस्ट हाऊस होतं. तिथे आमची राहाण्याची सोय केली गेली.
उन्हाळ्याचे दिवस होते. बाहेर फिरणं अवघड होतं. गेस्ट हाऊसचा मॅनेजर बोलका होता. अन् धार्मिक देखील. त्यानी तिथल्या काली मंदिराचं खूप छान वर्णन केलं.
मी देवळात जाणारा नव्हे. म्हणजे नास्तिक वगैरे अजिबात नाही. माझ्या मते देवत्व ही एक एकमेवाद्वितीय शक्ती आहे. तिला अनुभवण्यासाठी आपण आपल्या देवघरातल्या देवासमोर जसं शांतपणे ध्यान करू शकतो तसं बाहेर कधीच करता येत नाही. ज्याला घरची मूर्ती मनःशांती देते त्याला मंदिरातील मूर्तींची जरूर पडत नाही आणि ज्याला घरची मूर्ती पुरेशी वाटत नाही त्याला जगातल्या सगळी देवळं कमीच पडतात.
मात्र कित्येक मंदिरांत अप्रतिम कोरीव काम आणि वास्तुशास्त्र (architecture) असतं ते बघायला जरूर जावंच.
इतकं प्रसिद्ध देऊळ शहरात, हातात भरपूर वेळ आणि आग्रह करायला मॅनेजर. आम्ही जायचं ठरवलं. कलकत्त्याच्या काळ्या पिवळ्या ऍम्बॅसेडर टॅक्स्या. त्यांचा मीटर दिखाव्यापुरताच. दर वेळेला हुज्जत घालण्याशिवाय पर्याय नाही. जाऊन, दर्शन होईपर्यंत थांबून परत येण्यापर्यंतचे पैसे शीख ड्रायव्हरबरोबर ठरवून निघालो.
टॅक्सीतून उतरल्याबरोब्बर तिथल्या पंड्यांनी आम्हाला गराडा घातला. आमच्या नशिबानी तो कुठलाही खास पूजेचा दिवस नसल्यामुळे गर्दी नव्हती. आम्ही कोणाशीही न बोलता देवळाकडे चालत राहिलो. हळुहळु एक एक जण गळत गळत गेला. आम्ही चपलांच्या स्टॅन्डपर्यंत पोहोचलो तोपर्यंत आमच्या बरोबर एकच पंडा उरला होता. त्याला मी “काय पैसे घेणार” म्हणून विचारलं.
“साहबजी, भगवानके दर्शनकी कोई कीमत होती है क्या?”
“मुझे दर्शनके साथ साथ इस मंदिरका इतिहास, उसकी बनावट और उससे जुडी कहानियोंमे दिलचस्पी है। वो भी बताओगे?”
“हां हां, क्यों नही!”
मी पैसे ठरविल्याशिवाय एकही पाऊल पुढे टाकायला नको होतं. मात्र गर्दी नव्हती, buyer’s market होतं. त्यामुळे मी ही तितका सावधपणा दाखवला नाही.
पंधरा मिनिटातच कार्यक्रम आटोपला. मंदिराची माहिती देणार होतात त्याची आठवण करून दिल्यावर “ये जागृत मंदिर है। यहांपर मांगी हुई हर मन्नत पूरी हो जाती है”। वगैरे अर्थहीन वाक्यं टाकून त्यानी आमची बोळवण केली. काय पैसे द्यायचे म्हणून मी त्याला विचारल्यावर त्यानी त्याच्या कार्यक्षमतेमुळेच आम्हाला मिळालेल्या सुंदर आणि निवांत दर्शनाची कॅसेट वाजवली आणि रकमेचा आकडा माझ्यावरच सोडला.
माझ्यातल्या कोकणस्थानी शंभर भरपूर झाले असं ठरवलं. मग माझ्यातला मरीन इंजिनियर जागा झाला आणि त्यानी शंभरचे दोनशे केले.
खिशातून शंभराच्या दोन नोटा (आजचे दोनशे नव्हे. एकोणनव्वद सालचे!) काढलेल्या बघून पंड्यानी आंबट चेहरा केला. पैसे घेतले आणि “ये क्या?” अशा अर्थाची रेकॉर्ड लावली.
हे काही प्रमाणात अपेक्षितच होतं. मी देखील “हे वाजवीपेक्षा जास्तच आहेत” वगैरे अशा वेळेला आपण सगळेच जी रेकॉर्ड डीफॉल्टनी वाजवतो ती वाजवत परतीच्या मार्गाला लागलो तर त्यानी माझी वाट अडवली.
“मी तुला आधीच विचारलं होतं तेव्हां तू आकडा माझ्यावरच का सोडलास?” वगैरे वादविवाद झाले. मात्र तो काही वाट सोडे ना!
“आप ऐसे नही जा सकते”। आता त्याचा स्वर देखील बदलला!
“देखता हूं कौन रोकता है” असं म्हणत मी त्याला वळसा घालून जायला लागलो. माझ्या हातात पुनव होती. बंगाली भाषेत काहीतरी बोलत त्यानी पुनवला दंडाला धरून खस्कन् ओढलं!
माझं डोकं सटकलं बिटकलं नाही कारण तो माझा पिंड नाही. मात्र इंजिनियरिंगला असताना घेतलेले स्वसंरक्षणाचे (आणि मित्रांबरोबर चिकार प्रॅक्टिस केलेले पण प्रत्यक्ष आयुष्यात त्यानंतर कधीही न वापरलेले) धडे वापरण्याची वेळ आली होती.
मुलीच्या संरक्षणासाठी मी तिला तरी दूर ओढीन किंवा त्याचा हात दूर ढकलीन हेच अपेक्षित होतं. मात्र स्वसंरक्षणाच्या फिलॉसॉफीप्रमाणे तुमची पहिली चाल पूर्णपणे अनपेक्षित असली पाहिजे. मी एक पाऊल चटकन् पुढे टाकलं आणि दोघही पंड्याच्या अंगावरच रेललो. तो गडबडला आणि तोल सांभाळायला मागे सरकला.
मला उत्तम संधी दिसली. गुप्तांगावर लाथ मारायची असली की ती फुटबॉलला मारतात तशी दातओठ खाऊन मारायची नसते. एक तर त्याकरता पाय मागे घेऊन स्टार्ट घ्यावा लागतो ज्यामुळे समोरच्याला पूर्वसूचना मिळून ती चुकवायची संधी मिळते. शिवाय अशी लाथ मारताना मारणार्याचा तोल जाण्याची शक्यता असते. लाथ चुकली तर हमखास जातोच.
कुठलाही स्टार्ट न घेता ही लाथ दोन halves मध्ये मारायची असते. जणु गुढग्यानीच लाथ मारतोय अशा वेगानी गुढगा उचलायचा आणि मांडीचं हाड horizontal झालं की सर्व ताकदीनिशी फक्त पावलानी लाथ मारायची.
सगळी थियरी लिहायला आणि वाचायला वेळ लागतो खरा, पण प्रॅक्टिकल क्षणार्धातच संपलं!
परफेक्ट घाव बसल्याचा आवाज आला. त्याच्या हातातलं सामान खळ्ळकन् जमिनीवर पडलं अन् मागोमाग तो देखील. त्याला उलटीचे कोरडे रेच यायला लागले.
मी स्वतःला शांत डोक्याचा समजतो पण दर खेपेला माझ्या आधी स्वीट टॉकरीणबाईच सावरते. आता काय होणार याचा तिला अंदाज आला. तिनी पुनवला माझ्या हातातून घेतलं अन् म्हणाली, “तू नीघ.”
मी झपाझप चालत टॅक्सी स्टॅन्डकडे निघालो. अर्ध्या मिनिटातच “भागो मत, ठहरो!” अशा आरोळ्या ऐकू येऊ लागल्या. मी मागे वळून बघितलं तर आठ दहा पंड्यांचं टोळकं माझ्या दिशेनी येत होतं. बहुतेक जण वयानी माझ्याहून मोठे, त्यांची पोटं देखील. मी सहज पळून जाऊ शकलो असतो. मात्र मग ते स्वीट टॉकरीणबाई आणि पुनव कडे वळण्याची शक्यता होती.
मोठ्या देवळांबाहेर एक पोलीस चौकी नेहमी असतेच. अर्धवट चालत, अर्धवट पळत मी तिच्या शोधात निघालो. मागे टोळकं. टॅक्सी स्टॅन्डजवळ पोहोचलो तर काही टॅक्सी ड्रायव्हर्स घोळक्यात उभे होते. त्यांना पोलीस चौकी कुठे आहे म्हणून विचारलं. त्यांनी बोटानी दाखवलं. दूर नव्हती. हायसं वाटून मी तिथे गेलो तर चौकीला कुलूप! “पोलीस, पोलीस” असं ओरडंत पुन्हा पळालो. थोड्या वेळात लक्षात आलं की ते टोळकं माझ्या मागावर दिसंत नाहिये. हायसं वाटून लपत छपत टॅक्सी स्टॅन्डकडे परत आलो आणि जे दृष्य बघितलं त्यानी पोटात गच्कन् गोळाच आला!
पुनवला छातीशी कवटाळून स्वीट टॉकरीणबाई टॅक्सीच्या आत बसली होती! टॅक्सीच्या बॉनेटवर आणि काचेवर पंडे थपडा मारत होते आणि शिव्या देत होते! टॅक्सी ड्रायव्हर पंड्यांना शांत करण्याचा प्रयत्न करंत होता.
आता पोलिसांना शोधण्यात वेळ घालवणं शक्य नव्हतं. मी सरळ टॅक्सीकडे गेलो. मला पाहिल्याबरोबर मोर्चा माझ्याकडे वळला. समोरून दोघा जणांनी माझे हात धरले. एक जण मागून आला आणि त्यानी एकाच वेळेस माझ्या दोन्ही खिशांत हात घातले आणि क्षणार्धात दोन्ही खिसे रिकामे झाले! पाकीट, पेन, रुमाल, सगळं गुल! (अशा प्रकारची पाकीटमारी दक्षिण अमेरिकेत चिकार चालते. मात्र दुसर्या कुणीकडे दिसत नाही.) मी ओरडलो!
पुढच्यांनी मला जोरात मागे ढकललं. बहुदा मागच्यानी पायात पाय घातला असावा कारण मी पाठीवर पडलो. दुसर्याच क्षणी माझ्या उजव्या खांद्यावर सणसणीत लाथ बसली! मी डोक्यामागे बोटं एकमेकात अडकवून चेहर्याला आणि डोक्याला दोन्ही बाजूंनी मनगटांनी प्रोटेक्शन दिलं, गुढगे छातीपाशी घेऊन मुटकुळं केलं आणि कुशीवर वळलो. पुढच्या दहा सेकंदात पंधरा वीस लाथा पोटात, बरगड्यांवर आणि पाठीवर बसल्या!
वयाच्या सतराव्या वर्षापासून मी सेफ्टी शूज वापरले होते. त्यांच्या चवड्यांना स्टीलची वाटी असते. भंकस भंकसमध्ये मित्रांनी आणि मित्रांना मारलेल्या लाथांचा वेदनानुभव गाठीशी होता. त्यामुळे आता मरणाच्या वेदना आणि इजा होणार अशी माझी खात्री होती. पण पंडे अनवाणी होते. अपेक्षेपेक्षा खूपच कमी दुखलं! (नंतर लक्षात आलं की adrinalin मुळे तेव्हां दुखलं नाही. नंतर सगळं उट्ट निघालं!)
जितक्या अचानक लाथा सुरू झाल्या होत्या तितक्याच अचानक थांबल्या. सगळे मला शिव्या देत निघून गेले. पण आयाबहिणींच्या नाही. मला वाईट मरण येणार, आमच्या सार्या कुटुंबाचा सर्वनाश होणार, मी नरकात जाणार वगैरे शाप टाइपच्या शिव्या.
सबंद मारामारीला फक्त तीस सेकंद लागले होते. मारामारी कसली? फक्त मारी. मी मारायला हात देखील उगारू शकलो नव्हतो.
माझा चष्मा फुटला होता, मुका मार लागला होता, पैसे चोरीला गेले होते, कपड्यांची वाट लागली होती. पण मुख्य म्हणजे पुनव आणि स्वीट टॉकरीणबाई सुरक्षित होत्या.
टॅक्सीवाल्यांनी मला उभं केलं आणि पाणी दिलं. आता इथे आणखी थांबण्यात शहाणपणा नव्हता. लगेच जवळच्या पोलीस स्टेशनला जाणं इष्ट होतं.
मात्र आता कोणीच आम्हाला पोलीस स्टेशनला न्यायला तयार होईना. (मंदिरमे फॉर्वर्ड युनियन है, साहब। हमे उठानेमे उनको पाच मिनिटभी नही लगेंगे।) पश्चिम बंगालमधल्या इन्डस्ट्रीची वाट लावण्यात या 'फॉर्वर्ड' यूनियनचा सिंहाचा वाटा आहे. या युनियनचा मला आणि बोटीवरच्या सगळ्या लोकांना चांगलाच (म्हणजे वाईट) अनुभव होता. भलताच दरारा. आक्रमक आणि अतिरेकी. भारतीय बोटी जेव्हां जगाची चक्कर मारून परत भारतात येत तेव्हां कित्येक खलाशांची सुट्टीची वेळ झालेली असे. त्यांना उतरवून नवे खलाशी घेतले जात. ते जर या यूनियनचे सभासद असले तर कामाची वाट लागत असे. बोट बंदरात नेणं हे खर्चिक काम असतं. तरी देखील फक्त खलाशी बदलण्यासाठी कंपन्या बोटी मद्रासला नेत, तिथे नवे खलाशी घेत आणि मगच बोट कलकत्त्याला आणंत.
नवखं शहर, दुसर्या दिवशी बोटीवर रुजू होणं महत्वाचं, पंडे फॉर्वर्ड युनियनचे सभासद आणि पहिली लाथ मीच मारलेली. या सर्वाचा विचार करता पोलीस स्टेशनचा विचार सोडून गेस्ट हाऊसचा रस्ता धरला.
झालेल्या आरडाओरड्यामुळे पुनवनी भोकाड पसरलेलं, टॅक्सी ड्रायव्हर काहीतरी अखंड बोलत होता जे बाहेरच्या आवाजामुळे मला कळंत नव्हतं, भयानक उकाडा आणि ट्रॅफिक, आतापर्यंत माझं शरीरही ठणकायला लागलं होतं, आणि झाल्या प्रकाराचा मनस्ताप! डोकं लागलं भणभणायला!
फार वर्षांपूर्वी मी आणि स्वीट टॉकरीणबाईंनी एक गोष्ट ठरवली आहे आणि आम्हाला त्याचा कित्येकदा फार उपयोग झाला आहे. ती म्हणजे, ‘जर कुठल्याही परिस्थितीचा खूप त्रास व्हायला लागला तर मोठमोठ्यानी हसायचं!’ पहिलं मिनिट बळेबळेच हसावं लागतं. मग एकमेकाचं बघून खरोखरच हसायला येतं.
यानी समस्या काही आपोआप सुटत नाही. ती आपल्यालाच सोडवायची असते. मात्र मळभ दूर होतं आणि उत्तर सोपं वाटायला लागतं.
आम्ही दोघं खदाखदा हसायला लागलो. पुनव रडायची थांबली. ड्रायव्हरला काही कळेना. तोही गप्प झाला. आरशात आमच्याकडे बघून तो देखील हसायला लागला. थोड्या वेळानी आम्ही हसायचे थांबलो.
“साहब, आप दोनो इतने हँस रहे हो, आपने जानबूझके लफडा किया क्या?”
“नही नही,” असं म्हणून त्याला संकटकाळी हसण्याचा कानमंत्र मी देणार इतक्यात हिनी मला थांबवलं. भंकस करण्याची हिला कुठे आणि कधी हुक्की येईल काही सांगता येत नाही. त्याला म्हणाली, “सिंगसाब, अभी प्रॉब्लेम खतम कहाँ हुआ है? हम दोनो ये सोचके हँस रहे थे की थोडीही देरमें हम गेस्ट हाऊस पहुंच जाएंगे। आपको देने के लिये हमारे पास एक भी पैसा नही है, ये जब आपको मालूम होगा तब क्या होगा!”
एका क्षणाचाही विलंब न करता तो उत्तरला, “होना क्या है बहनजी, आज आपने जो सहा है वो देखनेके बाद सिर्फ हैवान ही आपसे पैसे मांग सकता है। मेरे पास पांचसो के आसपास रुपये हैं। वो आपके आगे के प्रवासके लिये रख लीजिये”।
मी आणि स्वीट टॉकरीणबाईनी एकमेकाकडे आश्चर्यानी पाहिलं. स्वीट टॉकरीणबाई अभंगाची ओळ गुणगुणली, “कुठे शोधिशी रामेश्वर अन् कुठे शोधिशी काशी?”
मला आठवलं की लहान असताना माझ्या आईनी मला आणि बहिणीला सांगितलं होतं, “जर कधी तुम्ही हरवलात किंवा दुसर्या कुठल्या संकटात सापडलात आणि सगळेच अनोळखी असतील तर मदत शीख मनुष्याकडे मागा.”
प्रवासी आयुष्यामुळे पैसे आणि कागदपत्र नेहमीच दोन ठिकाणी विभागून ठेवायची सवय मला होती. त्यामुळे पैशाचा प्रश्न नव्हता. मी ड्रायव्हरच्या खांद्यावर हात ठेवून म्हटलं, “उसकी जरूरत नही होगी। वो मजाक कर रही थी। मगर एक बात मैं जरूर कहूंगा। आपके विचार बहुतही बडे हैं”।
त्याला आग्रहानी आमच्या गेस्ट हाऊसमध्ये जेवायला घातलं.
निघताना म्हणाला, “जय राम जी की”.
मी उत्तर दिलं “सत् स्री अकाल”.
वाचने
17157
वाचनखूण
प्रतिक्रिया
51
वाह. कधीतरी एकदम चांगले अनुभव येतात आणी माणुसकीवरचा उडु लागलेला विश्वास परत बसतो. उत्तम.
बापरे!
स्थानिकांशी कधीही वाद घालू नये पण असे अनुभव येत असतातच !
In reply to वाइट अनुभव by कपिलमुनी
अहो वाद नै..धुतला त्यांनी एकाला. ते पण त्याच्याच गल्लीत.
भयानक अनुभव .
वाईट आणि चांगला असे दोन्ही अनुभव तुम्हाला एकाच वेळेस अनुभवयास मिळाले.
छान अनुभव..!!
कहाणी चित्रपटातलं कलकत्ता डोळ्यासमोर तरंगला..
छान अनुभव..!!
कहाणी चित्रपटातलं कलकत्ता डोळ्यासमोर तरंगला..
छान अनुभव..!!
कहाणी चित्रपटातलं कलकत्ता डोळ्यासमोर तरंगला..
काली मंदिर .. पंडे..? सुदैवाने तुम्ही त्या ठगांच्या तावडितुन सुरक्षित सुटलात हेच खुप झालं .
व्यक्तिशः मला कलकत्ता आवडतं. बहुतेकांना काली मंदिर ला असा अनुभव आला आहे जो सेम जगन्नाथ पुरी ओरिसा ला पण येतो . तुमचा अनुभव अगदीच वेगळा त्यातनं मार्ग काढलात बेस्ट .
ओरिसा ला कबिसूर्य नगर ला राहिलेलो एक महिना देवाच्या नावाने लुटतात अक्षरशः कलकत्त्याला कित्येक वाऱ्या झाल्या आहेत हे सगळं करण्यामागे एकतर देवभोळेपणा किंवा त्या राज्यांची ग्रामीण आर्थिक परिस्थिती कारणीभूत असावी . असो अशी वेळ येऊ नये तुम्हाला मार्ग काढता आला तेवढं बस्स सध्यातरी .अधिक बोलो तर विषयांतर होईल .
जाता जाता -अंदमान ला बंगाली लोकांना खूप शिव्या घालतात त्यांच्या वृत्तीमुळे
धन्यवाद!
@कपिलमुनी - वाद घालायला लागू नये म्हणूनच वाजवीपेक्षा जास्त पैसे देवू केले. तरीपण !
@सिरुसेरि - आम्हाला टॅक्सीवाल्यानी सांगितलं की ते मला धूत होते तेव्हां कोणीतरी 'पुलीस आयी, पुलीस आयी' असं ओरडलं म्हणून इतक्या तडकाफडकी माझी सुटका झाली.
लेखन शैली तुमची मस्त आहे. हानामारीचा प्रसंग घडूनही तुम्ही हसत आहात हे डोळ्यासमोर तरळुन गेलं. प्रसंगाचा शेवट झकास. दुसऱ्या ठिकाणी कधीही हुस्त्या घालायच्या नाही, हे धोरण नेहमी चांगलं असतं.
-दिलीप बिरुटे
अरे बापरे!
आम्हाला कधी असले प्रसंग आले नाहीत नशीब.
वाईट आणि चांगला - दोन्ही अनुभव मनुष्यस्वभावाची दोन टोके दाखवतात.
तुमचे सर्व लेख म्हणजे वाचकांना पर्वणीच असते.
बापरे!
काय मस्त लिहिलंय.डोळ्यासमोर उभा राहिला प्रसंग.
भयंकर प्रसंग. कलकत्यात असाच काही अनुभव आमच्या एका नातलगाला आला होता. बाकी जिथे लाल झंडा असतो, तिथल्या लोकांशी वाद घालू नये, हे नेहमीच लक्ष्यात ठेवते. (कितीही शिकलेले दिसले तरीही).
बाप रे , पंडे आणि फॉरवर्ड युनियन शी संबंधित ??? (भगव्या ऐवजी लाल बावटा ??)
असो, असा अनुभव (लुटण्याचा) जेजुरी ला सुद्धा येतो, आता तर काय, जय मल्हार शिरेल नंतर तर फुल्ल लुटालूट ....
In reply to बाप रे , पंडे आणि फॉरवर्ड by पगला गजोधर
जेजुरीत मागील वर्षी ट्रस्टी बदल्यापासून खूप बदल झाला आहे.
In reply to पग जी by विशुमित
असे ऐकून आहे...
In reply to असे ऐकून आहे... by विशुमित
हे अशे सगळे पंडे दलाल दल्ले, यांना लाथ मारून घालवून दिले पाहिजे,
दक्षिणा मागायला आले की पश्चिम भागावर लाथ मारली पाहिजे यांच्या ....
(हा स्वखुशीने कोणी भाविक दक्षिणा देत असेल तर त्याला देऊ द्यावी )
सर्वसामान्य लोक व देवदर्शन (मूर्तीदर्शन ) यांच्यात एजंट नकोत...
सर्व मोठ्या देवस्थान / पूजास्थळ नॅशनलाईज झाले पाहिजेत.
In reply to हे अशे सगळे पंडे दलाल दल्ले, by पगला गजोधर
सहमत..
लहान तोंडी मोठा घास... देवाच्या आणि आपल्यामध्ये दक्षिणा सारखी अजन्ट्स हवेतच कशाला?
काय म्हणताय??
(आपण तर बेल-फुल पण नाही घेत पायताण काढून बुंगाट गाभाऱ्यात पाळतो)
In reply to सहमत.. by विशुमित
आणखीन मोठा घास. दक्षीणा घेणारे एजंट असतात तिथे देव असतो का ? आणि असलाच तर हे सगळे तो नुसता बघत बसतो का आणि बघतच असेल तर असा देव काय कामाचा
In reply to आणखीन मोठा घास. दक्षीणा by मराठी_माणूस
मारवाडी मित्राच्या घरी जेवताना "एका घासात एक फुलका" ची आठवण झाली.
तुमचे सगळेच लेख आवडतात, अर्थात हाही आवडला.
तरुण रक्त म्हटलं तरी लाथ घालणे फारच झालं आणि तेसुद्धा पंड्याला.
बापरे!!!
टॅक्सीवाले मिसेस आणि मुलीला त्रास देत असताना तुम्ही तिकडे धावलात, हाणामारी होणार हे माहिती असुन.. एरवी विचार करुन भीती वाटते पण माणुस स्वतःला संतापलेल्या जमावाच्या हातात सोपवुन देतो..कुटुंबाला वाचवण्यासाठी.. __/\__
मागे एकदा चर्चा झाली होती की आपण आपला जीव वाचवु की लेकराचा.. मला नेहमीच वाटतं की आपण लेकराचा वाचवु..
भारी अनुभव ! थोडक्यात सुटलात हे चांगले झाले.
अनोळखी जागी, हातघाईवर न येता, "माझे तुमच्या संस्कृतीतुमच्या देशा/राज्या/शहरा/गावाबद्दल खूप चांगले मत आहे. ते खराब का करत आहात?" असे वैचारिक/भावनिक धोबीपछाड उपयोगी पडतात. अशाने, कधी कधी, आपल्या विरोधातले काही लोक फुटून, आपली बाजू घेऊन, उरलेल्यांना आवरतात असा अनुभव आहे. कमीत कमी शारिरीक इजा होत नाही.
सर्वजण,
धन्यवाद!
@कंजूस - जेव्हां त्यानी माझ्या मुलीवर हात उचलला तेव्हां त्यानी लक्ष्मणरेषा ओलांडली. मग तो पंडा का असे ना!
पिराताई - तुम्ही अशा पद्धतीनी वर्णन केलं आहे की मलाच मी काहीतरी भारी केल्यासारखं वाटतय. धन्स!! त्या आठदहा जणांऐवजी जर पन्नास असते आणि हातात तलवारी असत्या तर मला त्यांच्याकडे जाण्याचं धारिष्ट झालं असतं की नाही याची शंका आहे. त्यामुळे घरच्या सुरक्षिततेत जरी असं वाटलं की आपण नक्की लेकरालाच वाचवू तरी प्रत्यक्ष प्रसंग आला तर सामान्य माणूस काय निर्णय घेईल याबद्दल खात्री देणं अवघड आहे.
डॉ. म्हात्रे - माझे तुमच्या संस्कृती, तुमच्या देशा/राज्या/शहरा/गावाबद्दल खूप चांगले मत आहे. ते खराब का करत आहात?" हा अप्रोच सगळ्यात योग्य आहे. पण तेव्हां माझ्या डोक्यात अजिबात असा विचारदेखील आला नाही.
In reply to सर्वजण, by स्वीट टॉकर
पण त्या केसमध्ये तलवारी लेकीवर उगारलेल्या असतील. म्हणुन तुम्ही तेव्हाही गेलाच असतात असं माझं मत!
पिराताई,
येवढा विश्वास दाखविल्याबद्दल धन्यवाद! मात्र तलवारींशी इन्टर्व्ह्यू झाल्यानंतर लेख लिहिता आला असता असं वाटत नाही. ;)
In reply to पिराताई, by स्वीट टॉकर
बाकी अनुभव लेखन भारीच!
थोडक्यात वाचलात साहेब.
पण तुम्ही त्याला नको त्या ठिकाणी लाथ का मारलीत? त्या फ्रॅक्शन ऑफ सेकंद मधे ति प्रक्षीप्त क्रीया असेल असं वाटत नाहि, कारण तुम्ही त्याला पहिले व्यवस्थीत डिस-बॅलेन्स केलं. मग एव्हढी टोकाची क्रिया का बरं?
“जर कधी तुम्ही हरवलात किंवा दुसर्या कुठल्या संकटात सापडलात आणि सगळेच अनोळखी असतील तर मदत शीख मनुष्याकडे मागा.”ह्म्म्म्म. पॉईण्ट आहे. अवांतरः भारतात विवीध धर्मीयांची इतकी स्थानं आहेत. पण कुठल्या चर्च वा गुरुद्वारासंबंधी अशी लुटमार्/हातापाई ऐकायला येत नाहि. हिंदुंची देवस्थानं जितकी मोठी तेव्हढंच दर्शन खोटं असं का व्हावं कळत नाहि. अपवाद आहेच म्हणा.
In reply to बापरे. by अर्धवटराव
गुरु , डेरा सच्चा सौदा किंवा कुठल्याही गुरूंचा राजकारणावर खूप प्रभाव आहे बिलकुल भ्रष्ट आहेत ते .
अबाऊट चर्च भारतात कित्येक मिशनर्यांनी कसा पैसा कमवला सगळ्यांना माहित आहेत. जगातही चर्चेस आणि त्यांचं अर्थकारण नक्की पहा त्यामुळे श्रद्धा आहे लुटणारे आहेत काही झालं तरी जाणारे लोकही आहेत . ह्याला काही उपाय नाही. जस वर कोणीतरी जेजुरी चा उल्लेख केला कितीही नाही म्हटलं तरी मला जावंच लागत आमचं कुलदैवत आहे . पण देवाच्या नावाने जी सामान्य लोक तिथे येतात त्यांची परवड पाहणं पैशासाठी लुटणं लग्न झालं कि बायकांना ५ पायऱ्या उचलून घेऊन जाणं हे सर्व पहिल की मूड जातो .अश्या कित्येक प्रथा वेगवेगळ्या ठिकाणी आहेत . सो हे चालणारच आहे .
In reply to बापरे. by अर्धवटराव
अमेरिकेत असताना क्रिश्चन कलीग कडून चर्च ला कसे कंपल्सरी डोनेशन द्यावे लागते. न दिल्यास कम्युनिटीत कसे एकटे पडायला होते - वगैरे ऐकले आहे.
डोनेशन ची रक्कम थोडीथोडकी नसते आणि वन टाईम नसते - हे ही पक्के.
तो आपला धर्म नसल्यान आणि तो जिथे मेजोरिटीत आहे तिथला अनुभव नसल्याने आपल्याला ' आल इज वेल ' असे वाटू शकते.
@ अर्धवटराव - तुम्ही त्याला पहिले व्यवस्थीत डिस-बॅलेन्स केलं.'मग एव्हढी टोकाची क्रिया का बरं?' तुमचा प्रश्न अगदी रास्त आहे.
माझी तेव्हांची क्रिया काही रागाच्या भरात केलेली नव्हती. एखाद्याने आपल्याला निष्कारण एक बुक्का मारला तर प्रत्युत्तर म्हणून त्याला आपण फक्त एक बुक्का मारणे हे माझ्या मते अजिबात चूक आहे. आपण इतके बुक्के मारले पाहिजेत की पुन्हा आपल्याला बुक्का मारायला तो धजावता कामा नये.
आपण इतके बुक्के मारले म्हटल्यावर आपल्याला त्याची किंमत या ना त्या मार्गानी चुकती करायला लागणार हे ओघाओघानी आलंच! त्याची तयारी मात्र हवी.
आपण एक बुक्क्याला एकच बुक्का मारून थांबलो तर कंट्रोल शत्रूच्याच हातात राहातो. तो आता लाथ मारायला मोकळा होतो.
In reply to @ अर्धवटराव - तुम्ही त्याला by स्वीट टॉकर
पण अशा बर्स्ट्मोड बुक्काबुक्कीत समोरच्याला गंभीर इजा झाली असती, ( सदर प्रकरणात त्याचे प्राण जायचे चान्सेस सुद्धा होते ) तर तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर काय बेतली असती ? कल्पनाच करवत नाहि.
श्वास रोखून ठेवायला लावणारा अनुभव..तुमची लिहीण्याच्या हातोटीने सगळा प्रसंग डोळ्यासमोर उभा केला. देवाच्या आणि आपल्यात मध्यस्थ बघितले की चीड येते.
स्वीटटॉकरजी
तुम्हाला जो अनुभव आला तो खरोखर भयावह आणि वाईटच आहे. तुम्ही तुमच्यावर झालेल्या अन्याया विरोधात इच्छा असुनही पोलिस तक्रार करु शकला नाहीत अशी परीस्थीती अशी मजबुरी वाट्याला येणे उद्बेगजनकच आहे.
जे झाले ते सोडुन द्या ते तुमच्या हातात काही नव्हते मात्र अजुनही एक उपाय तुम्ही नव्हे आपण सर्वांनी करायलाच हवा. ज्याची सुरुवात तुम्ही केलेलीच आहे एकप्रकारे.
अशा जागांविषयी अशा पंड्याविषयी जमेल तितके जास्तीत जास्त प्रचाराची साधने वापरुन फेसबुक व्हॉटस अप जे काय असेल ते. टुरीझम च्या साइटीवर ऑफीसात कुठे फिडबॅक घेतला जात असेल तिथे , मित्रमंडळी, नातेवाईकांत सर्वत्र मोठ्या प्रमाणात हा अनुभव शेअर करत रहावा. त्यात मंदीराचे नाव, पंडे कुठे गाठतात, फोटो असतील तर अती उत्तम जमेल तेवढे मटेरीयल ओपन करुन हायलाइट करुन शेअर करीत राहावे. आणि
या बदमाषांना मॅक्सीमम एक्सपोज करत रहावे, यांची माउथ पब्लीसीटी करत रहावी. इतर व्यक्ती जे इथे भेट देतील त्यांना किमान हे सर्व वाचुन या धोक्याचा एक "अवेयरनेस" तरी निर्माण होइल. व जी व्यक्ती सावध आहे अगोदरच ती या प्रकारापासुन स्वतःचा बचाव करु शकेल.
तर आपण जसा हा लेख लिहीला तसा अधिकाधिक प्रचार अशा जांगांचा व जिथे जिथे असे धोके आहेत त्याची पब्लीसीटी करावी.
असे मला आपले एक वाटते.
In reply to विषण्ण करणारा अनुभव ! यावर एक उपाय करता येइल. by मारवा
अश्याने आपणच भविष्यातले पर्यटक कमी करु
आयुष्यात भेटणार काही ना काही तरी शिकवून जातो हे नक्की ..
लगे रहो गोडबोले !
बापरे! वाईट अनुभव, पण देवस्थानाला असेच अनुभव येतात. आम्ही तिरुपतीला गेलो असताना इतकी गर्दी होती की आमचा तीन वर्षांचा मुलगा घुसमटला. त्यानंतर कोणत्याही देवस्थानाला एकतर जायचेच नाही किंवा मुलगा मोठा झाल्यावर जायचे असे ठरवले. नंतर कधी गेलोच नाही हेही खरेच!
तुमचे लेख वाचणं हाच एक छान अनुभव असतो.
पुढच्या लेखाची वाट बघतोय.
@मारवा - तुमचे विचार योग्यच आहेत. मात्र असं लिहायला लागलं की आपण काय हेतूने लिहीत आहोत हा हेतू दूर राहून हे हिंदू धर्माविरुद्ध लिहिलं आहे अशी कल्पना होवून विषय भलतीकडेच फरफटला जातो.
खरं सांगायचं तर मला पंड्यांचा फारसा राग येत नाही. त्यांनी काही आपल्याला आपल्या घरातला देव सोडून इकडे या अशी जबरदस्ती केली का? आपण आपल्या पायांनी चालत त्यांच्या तावडीत गेलो. मग ते आपल्या वीकनेसचा फायदा घेणारच! ही जगाची रीतच आहे. अयोग्य असली तरी.
@विशुमित -मारवाडी मित्राच्या घरी जेवताना "एका घासात एक फुलका" ची आठवण झाली. हे काय आहे?
In reply to @विशुमित -मारवाडी मित्राच्या by स्वीट टॉकर
एका श्वासात तीन प्रश्न :) ;)
In reply to @विशुमित -मारवाडी मित्राच्या by स्वीट टॉकर
मोठ्या घासा वरून चर्चा चालू होती...आमच्या सारखे गावाकडचे शेतकरी मोठी चपाती खातात... मारवाडी मित्राच्या घरी फुलके (छोट्या छोट्या रोट्या), त्याने वाढली कि एका घासात एक फुलका हाणायचा....२० फुलके खाल्ले..२० घासात जेवण आटोपलं.
बाकी तुमचा धागा उघडला की, त्याच्या शीर्षकाच्या गाण्यातील घट्टम कानात गुंजतो.. कुठे शोधिसी रामेश्वर...
भयानक अनुभव. तुम्ही हलक्याफुलक्या प्रकारे मांडला असला तरी त्यावेळी खूपच भीतीदायक वाटलं असणार.
असाच काहीसा अनुभव चेन्नैच्या त्या प्रसिद्ध स्ट्रीट मार्केटमधे यायचा. (नाव विसरलो पण चेन्नईतल्या पॅरीज / पॅरिस एरियात असलेले विक्रेते.). वस्तूची चौकशी जरी केली तरी ते विक्रेते ती वस्तू आपल्या हातातच बळंच कोंबायचे. आणि मग आता हात लावला म्हणजे ती विकत घेतलीच असं म्हणून पैशासाठी धमक्या द्यायचे. आजूबाजूचे अन्य विक्रेते टोळी करुन घेराव घालायचे, शिव्या द्यायचे. प्रसंगी गुद्दागुद्दीवर उतरायचे.
बर्मा बाजार की काय ते नाव विसरलो. आता कदाचित तो नसेलही. आमचे सगळे संदर्भ जुने.
@गवि - बर्मा बझार. बरोबर. स्मगल केलेल्या वस्तू तिथे मिळायच्या. तिथे रेग्युलर गुंडगिरीच चालायची! मला वाटतं आता वस्तू उघडपणे आयात होतात त्यामुळे त्या बर्मा बझारचं प्रयोजनच नाहिसं झालं आहे. आता आहे की नाही कुणास ठाऊक.
तिथली एक मजेदार आठवण आहे. (मारामारीची नाही.) टाकीन एखादे दिवशी.
आयुष्यभराचा अनुभव आहे. तरी तुम्ही धीराने घेतलेत आणि तुमच्या 'स्वीट टॉकरीण' मॅडम ना सलाम
वाह. कधीतरी एकदम चांगले अनुभव